"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Monday, August 16, 2010

खरे ‘शहीद’ कोण? जिहाद ते जन्नत व्हाया शहीद!

गेल्या काही दशकांत वाढलेल्या आव्हानांमुळे वर्तमानपत्रात दररोज सुरक्षा दलाचे कोणी ना कोणी ‘शहीद’ झाल्याची बातमी असते. कुठे काश्मीर मध्ये तर कुठे नक्षलींनी केलेल्या भ्याड हल्ल्यात. आपणही सहजगत्या वापरतो, एवढे सैनिक ‘शहीद’ झाले.. ‘शहीद’ अमुक अमुक अमर रहे.. वगैरे.
पण आपण विचार केलाय का की, ‘शहीद होणे’ म्हणजे नक्की काय होणे? केवळ लढताना जो मृत्यू पावेल त्याला ‘शहीद’ म्हणायचे का? करकरे, कामटे, साळसकर, ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन हे सगळे नक्की ‘शहीद’ झाले, की अतिरेकी ‘शहीद’ झाले? त्यासाठी ह्या शब्दाच्या मुळाशी जायला हवे.

पहिल्यापासूनच आपल्या येथल्या ‘पंडितांना’ अल्पसंख्यकांचे काय प्रेम! उतू जाणारे ते प्रेम सरकारी शक्ती आणि सरकारी साधनसामुग्री ठराविक समुदायासाठी न वापरावयास लावते तरच नवल. ती परंपरा चालूच आहे. म्हणून ठराविक यात्रांसाठी ‘स हज’ अनुदान दिले जाते, आणि ठराविक यात्रांवर हल्ले होऊन यात्रेकरू ‘अमर’ झाले तरी ‘नाथ’कृपा होत नाही. काही भाषांना कोण प्रोत्साहन दिले जाते. ज्यातला ओ का ठो कळत नाही त्या ऊर्दू कडे खासे लक्ष पुरवले जाते. पण सर्व भारतीय भाषांची जननी असलेल्या संस्कृतच्या पदरी सरकारदरबारी उपेक्षाच!

हल्ली च्या हिंदी बातम्या देणाऱ्या वाहिन्या म्हणजे निव्वळ टाकाऊ प्रकार झाला आहे. हा खरा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण त्यात वाढलेल्या ऊर्दू शब्दांचे प्रमाण लक्षणीय आहे. चांगले शब्द हिंदीत उपलब्ध असतानाही अगम्य ऊर्दू शब्द वापरण्याची भारीच हौस. ‘महज’, ‘रुझान’, ‘नतीजा’, ‘गौरतलब’, ‘पुख्ता इंतजाम’, ‘मौजूद’, ‘मशहूर’, ‘खारिज’, ‘वक्त’, ‘पैगाम’, ‘बावजूद’ असे अनेक शब्द तुम्हालाही जाणवतील. संस्कृतप्रचुर शब्द वापरून हिंदी बोलल्यास अधिक गम्य तर होईलच, परंतु ती छान आभूषणांनी सजलेल्या सौंदर्यवती युवतीप्रमाणे भासेल. पण आपल्यावर अज्ञानाचा आणि दुर्लक्ष करण्याचा बुरखा चढल्याने आपण असा प्रयत्न करत नाही.

नतीजा ऐवजी परिणाम, वक्त ऐवजी समय, मौजूद ऐवजी उपस्थित, रुझान ऐवजी अनुमान, मशहूर ऐवजी विख्यात असे सोपे प्रतिशब्द आहेत. शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या अशाच प्रकारातून आला आहे ‘शहीद’. मी माझ्या मागील एका लेखात भाषा हा केवळ शब्दसमूह नसून भाषेला इतिहास, परंपरा, विचार, संस्कृती यांची झालर असते असा विचार मांडला होता (पहा : "नावात काय (नाही) आहे?" ) त्यामुळे काही शब्दांचे भाषांतर होऊ शकत नाही, कारण त्याला विशिष्ट भूमिका, तत्वे चिकटलेली असतात. म्हणूनच ‘जिहाद’, ‘गाझी’, ‘दार-उल्-हरब’, ‘बुतशिकन’, ‘काफिर’, ‘कत्लेआम’ अशा शब्दांचे विशिष्ट अर्थ आहेत. ते समजून घेणे आवश्यक आहे. ते शब्द त्यासाठीच वापरणे योग्य होईल. आणि याच रांगेत उभा आहे ‘शहीद’.

‘जिहाद’ मुळे सध्या संपूर्ण जगच भाजून निघत असल्याने मी त्याचा अर्थ स्पष्ट करण्याची गरज नाही. ज्याने त्याने अर्थ समजावा. ज्याला जेवढा चटका बसला असेल आणि जो जितक्या प्रमाणात भाजला असेल त्याला ‘जिहाद’ चा अर्थ तेवढा कळेल. तर जो जिहाद करतो आणि ज्याला जन्नत प्राप्त होते तो शहीद होतो. म्हणजेच जिहाद, शहीद आणि जन्नत असा प्रवास आहे. जिहाद ते जन्नत व्हाया शहीद. आता आपले सैनिक यात कुठे बसतात? “ "Shaheed" is only applied to those who sacrifice their lives for Allah's (God's) cause.  They have no fear; they only fear Allah and want to obey Him and to serve Him.” आणि शिवाय “The Shaheed must have in his intention to risk his life only for Allah and not for anyone else.” पहा : http://www.2600.com/news/mirrors/harkatmujahideen/www.harkatulmujahideen.org/jihad/t-shahed.htm 



२६/११ च्या हल्ल्यात नक्की कोण ‘शहीद’ झाले? आता लक्षात आले असेल. शिवाय केवळ शहीद च्या वापरापलिकडे जाऊन त्याचे ‘शहादत’ असेही एक रूप वापरणे सुरु आहे. ‘शहादत पर हुई राजनीती’, ‘शहादत पर शक’, ‘शहादत की सियासत’ इ. हा प्रकार थांबायला हवा. आपण अभिमानाने पोस्टर लावतो ‘शहीदांचा अभिमान’! आपली भावना पक्की आणि तीव्र असते. पण शब्दाने होतो ब्रह्मघोटाळा. ठराविक विचारसरणीसाठी, कट्टर बनून, जन्नत मिळवण्यासाठी ठराविक जणच शहीद होतात.
तेव्हा आपल्या वीरांचा अपमान आपणच थांबवूया. मराठीत सुंदर शब्द/शब्दसमूह आहेत, ‘वीरगतीला प्राप्त झाले’, ‘बलिदान केले’, ‘हौतात्म्य पत्करले’, ‘प्राणार्पण केले’, ‘धारातीर्थी पडले’, ‘प्राणांची बाजी लावून’, यातून जो भाव प्रकट होतो तो आपल्याला अभिप्रेत असायला हवा. म्हणूनच ‘अफझलखान शहीद झाला’, पण ‘तानाजी मालुसरेंनी मुलाच्या लग्नापेक्षा सिंहगडावर हौतात्म्य पत्करले’ आणि ‘बाजी प्रभू खिंड लढवताना धारातीर्थी पडले’. तेव्हा आगामी काळात आपल्या शालेय पुस्तकात ‘तानाजी मालुसरे शहीद झाले’ असे छापून आल्याचे दुर्दैवी चित्र पाहायचे नसेल तर हा विचार प्रसृत करायला हवा.
   

Sunday, July 11, 2010

"सारे प्रवासी ओढीचे"...








प्रस्तुत लेख हा खरंतर लोकाग्रहास्तव लिहिला आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ह्यावर्षीच्या तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गाला नागपूरला गेलो होतो. तिथून परतल्यावर बऱ्याच स्वयंसेवक/कार्यकर्त्यांनी उत्सुकतेपोटी विचारलं, “काय काय झालं तिथे?” आणि त्याहूनही दुप्पट संघद्वेष्ट्यांनी विचारले, “नक्की काय केलंस तिथे?”  आणि म्हणूनच या लेखात माहितीही येईल आणि भावनिक प्रसंगही येतील. संपूर्ण लेख म्हणजे मी जर तांब्याभर अमृत-रसपान केले असेल तर त्यातला एक थेंब तुम्हाला चाखायला देण्यासारखे आहे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वतःची अशी एक अनोखी कार्यपद्धती आहे. उघड्या मैदानावर चालणाऱ्या नित्य शाखा हा एक भाग झाला. त्यातून स्वयंसेवकांचे प्रशिक्षण तर होतच असते परंतु ज्या हिंदू संघटनाचा संघ उच्चार करत असतो, त्यासाठी आवश्यक ते सहजीवन केवळ एक तासाच्या शाखेत भेटून होऊ शकत नाही. शिवाय शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रशिक्षणासाठी वर्गांची गरज भासली जी ‘संघ शिक्षा वर्ग’ या माध्यमातून पूर्ण केली जाते.

प्राथमिक शिक्षा वर्ग हा विभाग स्तरावर होतो आणि ७ दिवसांचा असतो. मग प्रथम संघ शिक्षा वर्ग २१ दिवसांचा प्रांत स्तरावर होतो. उदा. कोंकण प्रांत, बंगाल प्रांत, आसाम प्रांत इ. त्यानंतर मग कार्यकर्त्याला द्वितीय संघ शिक्षा वर्गाला पाठवले जाते, जो एकेका क्षेत्राचा होतो आणि २१ दिवसांचा असतो. उदा. पश्चिम क्षेत्र (महाराष्ट्र, गोवा व गुजरात), दक्षिण क्षेत्र (कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश). हे प्रशिक्षण घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात संघकार्याचा अनुभव घेतल्यावर मग कार्यकर्त्याला तृतीय संघ शिक्षा वर्गाला पाठवले जाते. जो ३० दिवसांचा आणि केवळ नागपूरलाच होतो. हा अखिल भारतीय वर्ग असल्याने येथे संपूर्ण भारतातून कार्यकर्ते येतात. दरवर्षी जवळपास १००० च्या आत कार्यकर्ते असतात.

ह्यावर्षी वर्गात ८८१ कार्यकर्ते होते. आम्हाला विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी ८५ शिक्षक होते व या सर्वांची व्यवस्था पाहण्यासाठी १५०-२०० स्वयंसेवक होते. भोजन व्यवस्था, जल व्यवस्था, वस्तू भांडार, रुग्णालय, विद्युत व ध्वनी, यातायात(परिवहन), स्वच्छता, प्रक्षालन, रक्षणव्यवस्था असे विभाग होते. आणि हे सर्व स्वयंसेवकांनीच सांभाळले. १ व्यवस्थाप्रमुख, त्यांच्या सहकार्यासाठी सोबतीला प्रत्येक विभागाचा प्रमुख आणि त्यांच्या विभागाच्या संचात नागपूर व आजूबाजूच्या परिसरातून महिनाभर काढून आलेले स्वयंसेवक. रात्री १२-१ पर्यंत फिरणारे व ३.३०-४.०० ला परत उठणारे व्यवस्थाप्रमुख! असे सर्व मिळून आम्ही जवळपास १२०० जण महिनाभर एकत्र राहिलो.




यात वयानुसार आणि विषयानुसार गण पाडले होते. म्हणजे ज्यांनी दंडयुद्ध विषय निवडला आहे आणि कॉलेजवयीन आहेत असे एका गणात. योगासन विषय आणि वय यानुसार वेगळे गण. अशी विभागणी होती. आमच्या गणात २४ जण होते. आम्ही २४ जणांनी एका कक्षात राहायचे. यात पंजाब मधून १, गुजरात १, आंध्र प्रदेश ३, बंगाल १, केरळ १, आसाम १, तामिळनाडू १, हिमाचल प्रदेश १, महाराष्ट्र ३, राजस्थान ३, दिल्ली १, मध्य प्रदेश २, उत्तर प्रदेश १, ओरिसा १, कर्नाटक १, झारखंड १, असे कार्यकर्ते होते.

वर्ग प्रारंभ झाला. पहाटे ३.४५ ला शंख(बिगुल) वाजत असे. आम्ही ३.१५-३० ला उठून, एकमेकांना उठवून मुखमार्जनाला जात असू. मग चहा घेऊन स्मृति-मंदिराच्या दिशेने पावले वळत असत.
पवित्र पावन स्मृति-मंदिर. ऊर्जेचा आणि प्रेरणेचा अक्षय्य स्त्रोत.
स्मृति-मंदिरात आद्य सरसंघचालक आणि संघ संस्थापक परमपूजनीय डॉ. हेडगेवारांचा पूर्णाकृती पुतळा आहे. सचेतन शिल्पच ते. त्याखाली तळघरात त्यांची समाधीस्थली आहे. आणि समोर पूजनीय श्रीगुरुजींचे स्मृतिचिन्ह. पहाटेच्या त्या प्रहरी अत्यंत भावविभोर वातावरण असतं. थंडगार, मंद वारा वहात असतो आणि स्मृति-मंदिरासमोर काही प्रांतातले स्वयंसेवक प्रांतशः बसून आपापल्या भाषेतील डॉ. व श्रीगुरुजी यांचे स्मरण करणारी गीते गात असतात. आसमंतातून वाहणाऱ्या शीतल वायुलहरींना या स्वरलहरी साथ करत असतात. कुठे मल्याळम तर कुठे बंगाली गीत चालू असते. तोच भाव, तीच आर्तता. हळूहळू पूर्वेला लाली चढत असते. कोणी हौशी सूर्यनमस्कार, जोर बैठका काढत असतो तर कोणी आदल्या दिवशीचे दंडाचे प्रयोग दुसऱ्याला शिकवत असतो. बाजूला सर्व शिक्षकांचा गण चालू असतो. त्यांनी आज शिक्षार्थ्यांना जे शिकवायचे आहे त्याची उजळणी.






मग सर्वजण केवळ एका शिट्टीसरशी आपापल्या गणात बसतात. एक आखूड शिट्टी आणि ८८१ जण ४२ पंक्तींमध्ये ६० सेकंदांच्या आत. कुठेही आवाज नाही. गडबड नाही. मग एकात्मता स्तोत्र सुरु होते. त्यात भारतातील प्रमुख नद्या, पर्वत, तीर्थक्षेत्रे असे प्राकृतिक उल्लेख झाल्यानंतर महान स्त्रिया, महापुरुष, साहित्यिक, संशोधक, योद्धे, क्रांतिकारक अशांचे स्मरण केले जाते. मग एकात्मता मंत्र होऊन संघस्थानाला प्रारंभ होतो.

संघस्थान म्हणजे शारीरिक प्रशिक्षणाचाच भाग. यात कालांश (periods) पाडलेले असतात. योगासन, दंडयुद्ध, पदविन्यास, खेळ अशा तासिका असतात. शारीरिक दृष्ट्या चिवट, चपळ आणि मजबूत बनविण्यासाठी या संघास्थानाचा खूप उपयोग होतो. दंडयुद्ध आणि नियुद्धात झुंजार वृत्ती वाढवण्याचा आणि आक्रमणाचा सामना करण्याचा सराव होतो. यात आधी द्वंद्व म्हणजे एक विरुद्ध एक, मग एक विरुद्ध दोन, एक विरुद्ध पाच आणि शेवटी एक विरुद्ध अनेक असा सराव होतो.
 दंडयुद्ध. प्रकार "एक विरुद्ध अनेक" (हल्लाफोड)
संघस्थान झाल्यावर २० मिनिटांचा श्रमसाधना कालांश. यामध्ये स्वयंसेवकांच्या गटांना ठराविक काम नेमून दिलेले असते. उदा. शौचालाय स्वच्छता, संघस्थानाचे रेखांकन, स्मृती-मंदिर परिसर स्वच्छता इ. आणि मग न्याहारी.





आमच्या गटाला यात एक दिवस काम आले ते कंपोस्ट खताचे! म्हणजे दररोज च्या १०००-१२०० जणांच्या जेवणाचे जे खरकटे २ मोठाल्या पिंपात आणि एका गाड्यात जमा केले जात असे ते दूर संघस्थानाच्या शेवटी २ मोठे खड्डे खणून त्यात ओतायचे, विशिष्ट पावडर शिंपडून माती लोटायची. आमच्या गणशिक्षकांनी आम्हा ४ जणांना सांगितले, “जाओ और तुरंत वह सब जूठन (खरकटे) लेकर आओ”.  आम्ही लगेच गेलो. २ पिंपे लाकडी गाडीवर चढवली आणि निघालो. त्या ठिकाणी जाऊन पोहोचताच पिंपे खाली उतरवायला गाडीवर चढलो तोच दुसरे शिक्षक म्हणाले, “अरे आतल्या प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या करा”. त्या पिम्पातील ब्रह्मांडाकडे बघताच पोटातील प्रतिक्षिप्त क्रिया होऊ लागल्या. मंथन चालू असतानाच खाली उभ्या असलेल्या एका स्वयंसेवकाने एक छोटी काठी दिली. काम सुरु झाले. हळूहळू ती काठी गेली आणि सरळ हाताने काम चालू झाले. एकदा हात घातल्यावर काय. मग १० मिनिटे तो कार्यक्रम चालला. आतमध्ये भाताची शिते, मिरच्या, कांदे, लोणच्याच्या फोडी, लगदा, आणि अन्य पदार्थांचे अंश होते. आदल्या दिवशी “जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर होते”, ते ते सर्व आता विपरीत स्थितीत होते! जवळपास सर्व प्लास्टिक वेगळे केले. मग ती पिंपे उतरवली. शिक्षक म्हणाले, “अरे विक्रम, तुला ग्लोव्ज नाही दिले?”. मी कपाळावर हात (मारला असता, स्वच्छ असता तर!) न मारता म्हटले, “फार लवकर सांगितलेत..आता उद्या द्या”. पण माझी खात्री आहे की त्यांनी मुद्दामहून माझी तयारी होण्यासाठी हे असं करवून घेतलं. अन्य स्वयंसेवकांनी तोपर्यंत खड्डा खणून मोठा केला होता. काहींनी पिंपे आत ओतली. पावडर शिंपडून माती लोटली. कालांश पूर्ण झाला! मग न्याहारी. आता कशाने आणि कितीवेळ हात धुऊ असं झालं होतं...पण वेळ एवढा कमी की उशीर झाला तर न्याहारी नाही मिळायची. म्हणून हात धुतले, समाधान करून घेतले आणि न्याहारी खाल्ली. दिवसभराचा विचार करताना जाणवलं की आपल्याला १० मिनिटांसाठी काय वाटलं...परंतु ज्यांचा जन्मच अशा कामामध्ये जातो ते आयुष्य काय असेल? किती श्रमप्रतिष्ठा देतो त्या कामाला आपण? त्यांनी हे काम करायचे नाकारले तर? शहरांचे काय होईल? सोसायट्यांचे काय होईल? असो. श्रीरामकृष्ण परमहंसांची एक गोष्टही आठवली. असं म्हणतात की रामकृष्णांनी साधनाकालामधे अंतिम टप्प्यात संपूर्ण कलकत्त्याचा मैला जिथे टाकला जात असे तिथे जाऊन २ कांड्या सरळ आत खुपसल्या व ते ग्रहण करायला सुरुवात केली. सर्वच ब्रह्म. स्वहस्ते आश्रमातील शौचालयं साफ करणाऱ्या गांधीजींचीही आठवण आली. सकाळी एकात्मता स्तोत्रात आपण ही नावे उगाच नाही घेत हे जाणवलं!










स्नान आणि घोषवर्ग आटोपून मग असे योगनिद्रा (म्हणजे शवासन/चैतन्यासन) आणि चर्चा. चर्चागट वेगळे असत. शैक्षणिक आणि कामाच्या स्वरूपावर हे चर्चागट पाडले होते. विविध विषयांवर चर्चा होत असे. या चर्चेला दिशा देण्यासाठी चर्चा प्रवर्तक असतात. चर्चा गटात दररोज एकाने आपला विस्तृत परिचय द्यायचा असतो. म्हणजे आपला संघप्रवेश कसा झाला, घरी कोण-कोण आहेत, आपल्या क्षेत्राचा परिचय, प्रसिद्ध गोष्टी वगैरे...आमच्या चर्चा गटात आंध्र प्रदेश चा राजू होता. विस्तृत परिचय चालू होता..आणि आम्ही अवाक झालो. कारण राजू तोडक्या-मोडक्या हिंदी-इंग्रजीत सांगत होता, “I lost my father...यहां आनेका बाद”. मग चर्चागट प्रवर्तकांनी विचारलं, “तुम गये नही”? ..“हम जाके वापस आया.”  सर्वजण स्तब्ध. चर्चा प्रवर्तक मग भानावर येत पुढे म्हणाले कैसा हुवा वगैरे. पण राजूचे उदाहरण सर्वांच्या काळजावर कायमचे उमटून गेले! वर्गात आल्यावर ८ दिवसांनी कळतं की, घरी वडील गेले आहेत आणि तो स्वयंसेवक वर्गातून घरी जाऊन अंत्यसंस्कार आटोपून १ दिवस राहून परत वर्गात येऊन समरस होऊन जातो. याला काय म्हणावं?

चर्चागट कधीकधी खूप रंगतो. परस्परविरोधी मतं असतात. प्रत्येकजण युक्तिवाद करत असतो. परंतु या सर्वांना नंतर समेवर आणून कोरसमध्ये ‘संघराग’ गायला लावणे हे चर्चा प्रवर्तकाचे काम. आणि यात कालांश संपल्याचा शंख(बिगुल) कधी वाजतो ते कळतही नाही. 




चर्चागट झाल्यावर प्रवचन कालांश. यात संघ अधिकारी येऊन शाखेची बौद्धिक/शारीरिक/संपर्क रचना, धर्मजागरण विभाग, असे एकेक विषय स्पष्ट करतात. ४ दिवस प्रचार अथवा सेवा विभागाचे प्रशिक्षण. आणि मग संध्याकाळचे बौद्धिक.




संघबाह्य मंडळींमध्ये या बौद्धिकाबद्दल खूप भ्रामक कल्पना आहेत. बौद्धिक रटाळ, शुष्क, तेच तेच असतं इ. पण बौद्धिक म्हणजे एक मेजवानी असते. विचारधारेत न्हाऊन निघणे म्हणजे काय ते बौद्धिक ऐकल्यावर जाणवतं. काठावर बसून नदीचे पाणी भलतेच गार असणार हो, खूप खोल असणार हो, आत प्राणी असतील हो, विषारी वनस्पती असतील हो अशा नाना शंकाकुशंका काढणारे कधी पोहतही नाहीत आणि पोहणाऱ्यांना प्रोत्साहनही देत नाहीत. पोहणारे मात्र मजा तर घेतातच पण प्रवाह म्हणजे काय आणि प्रवाहाच्या उलट पोहणे म्हणजे काय हे अनुभवतात. काठावरच्यांना काय सांगणार त्यात काय आनंद असतो ते! कधी कधी काठावरचे निसर्गाच्या तडाख्यासरशी पडतात येऊन प्रवाहात. सवय नसल्याने नाका-तोंडात जाऊ लागतं पाणी. पण मग पोहणारे त्यांना आधाराचा हात देतात. तसं या बौद्धिकांचं वर्णन काय करणार. ते अनुभवायलाच हवं. संघाचे मूलगामी चिंतन काय आहे? विचारधारेचे आणि कार्यपद्धतीचे अपरिवर्तनीय भाग कोणकोणते आहेत? कोणत्या बाबींमध्ये युगानुकूल परिवर्तन होऊ शकते? संघ ध्येयप्राप्तीसाठी कोणत्या मार्गावरून मार्गक्रमणा करत आहे? हिंदुत्व, एकात्म मानवतावाद, धर्म, राष्ट्रीयता, स्वदेशी, आर्थिक चिंतन, शैक्षणिक चिंतन, राजकीय चिंतन, राष्ट्र-संकल्पना, परमपूजनीय डॉक्टरजींचे जीवन अशा अनेक बाबींवर बौद्धिक होतं. 

बौद्धिक झाल्यावर चहापान-न्याहारी आणि गणवेश तयारी. सर्वजण आपापल्या गणवेशाला कडक तयार करत असतात. बुटांना आणि पट्ट्याला पॉलिश करून गणवेश चढवून सर्वजण संघस्थानावर येतात. सकाळप्रमाणेच संध्याकाळचे संघस्थान. पण संध्याकाळच्या तासिका वेगळ्या. त्यात आचारपद्धती, संचलन, रचना, समता, यांचा अभ्यास. संघस्थान प्रार्थना होऊन संपते. सकाळचे संघस्थान प्रारंभ होताना जो सूर्यनारायण पूर्वेहून कौतुकाने बघत असतो तोही आता संघस्थान संपणार या मनस्थितीत स्वगृही जात असतो. संधिप्रकाशात ध्वज उतरत असताना शंखाचे निनादणारे स्वर वातावरण भावूक बनवतात.




दुपारचे चर्चागट झाल्यावर भोजन असतं आणि संध्याकाळी संघस्थान झाल्यावर एखादा माहितीप्रद कार्यक्रम झाल्यावर भोजन. संघ शिक्षा वर्गातील भोजन हा एक पाहण्यासारखा सोहळाच असतो. पंगत बसलेली असते. ठराविक गणांना वाढप व्यवस्था (वितरण) दिलेली असते. प्रत्येकाचा गाळा ठरलेला असतो, तिथेच त्याने वाढप करायचे. जवळपास ९०० जणांची पंगत मोठ्या सभागृहात बसत असे आणि त्याला वाढपव्यवस्था. कुठेही गडबड नाही-गोंधळ नाही. भोजन मंत्र होतो. आणि मग भोजनाला सुरुवात. पहिली पंगत झाल्यावर मग त्यातील ज्यांना नेमून दिलेले असेल त्यांनी दुसऱ्या पंगतीत पहिल्या वितरणाच्या स्वयंसेवकांना वाढायचे. क्वचित एक दिवस खडा-भोजन असते. म्हणजे गणवेश न उतरवता उभ्याने जेवायचे. जेवणही लवकर आटोपले पाहिजे आणि गणवेशाला कळताही कामा नये भोजन झाले ते! कधी मौन कालांश. म्हणजे बाहेरून जाणाऱ्यांना वाटेल अरे सभागृहात तर कोणीच नाही, पण प्रत्यक्षात ९०० जण आनंदाने जेवत असतात!




जेवण झाल्यावर मग गप्पा मारत मारत सर्वजण निद्रेच्या अधीन होतात. हा साधारण दिनक्रम. यात घोषवर्ग, शहरातून संचलन, विशेष सराव या गोष्टी चालतच असतात. हळूहळू शेवटचे दिवस सुरु झाल्याची जाणीव होऊ लागते. सगळ्यांची मने अस्वस्थ होऊ लागतात. एकमेकांचे संपर्काचे पत्ते, दूरध्वनी घेणं सुरु होतं. जाहीर समारोपाच्या प्रात्यक्षिकांची तयारी जोरात सुरु असते. शिवाय सर्व शारीरिक विषयांवर परीक्षाही असते. त्याचा अभ्यासक्रम लावला जातो. एकमेकांना विचारून, शिकवून, शिकून परीक्षेला तयार होतात.




जाहीर सामारोपातील घोष प्रात्यक्षिक.





जाहीर समारोप मोठ्या उत्साहात होतो. आलेल्या सर्व प्रेक्षकांसमोर व प्रमुख अतिथींसमोर शिक्षार्थी महिन्याभराच्या प्रशिक्षणाची झलक सादर करतात. होणाऱ्या कौतुकाने साफल्य वाटत असले तरी मनात उद्या आपण विलग होणार ही भावना घर करून असते.

जाहीर समारोपाचे विहंगम दृश्य.






दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वजण शुचिर्भूत होऊन, शाखावेशात बौद्धिक सभागृहात येतात. दीक्षांत समारोह असतो. दीक्षांताचे उद्बोधन झाले की प्रार्थना होते आणि मग सर्व शिक्षार्थी तृतीय वर्ष शिक्षित होतात!
आपापल्या कार्यक्षेत्रात जायचे. महिनाभर ज्यांच्याबरोबर राहिलो त्यांना निरोप द्यायचा. 

स्मृतीमन्दिराजवळ भेटायचे ठरलेले असते. आदल्या दिवशी सर्वांचे मोबाईल मिळाल्याने छायाचित्रं काढणं सुरु असतं. एकमेकाला आलिंगन देऊन ‘या हृदयीचे त्या हृदयी घालूया’ हा संघमंत्र जपत-जगत हळूहळू आपापल्या प्रवासाला लागतात सारे. साऱ्या वातावरणात उत्साह आणि खिन्नता यांचे एक अजबच मिश्रण असते. स्मृतिमंदिरात गर्दी होते. सर्व डोळ्यात साठवून घेऊन विशाल भारत आपल्या प्रवासाला निघतो. कोणी पार उत्तर सीमेला जाणार, कोणी दक्षिण किनाऱ्यावर. कोणी पूर्वांचलात जाणार तर कोणी पश्चिम किनारपट्टीवर. वर्गातून प्रेरणा घेऊन काही स्वयंसेवक ‘प्रचारक’ म्हणून निघतात. म्हणजे घर सोडून संघ सांगेल तिथे ‘पूर्णवेळ’ संघाचेच काम करायचे. अशा प्रचारकांचे मनोज्ञ दर्शन या वर्गात घडते.

परत असे एकत्र भेटणे तेही गणातील २४ जणांनी हे अशक्यच. तेव्हा कधी भेट होईल हे सांगता येत नसते. ‘मायेच्या हळव्या स्पर्शाने’ आभाळानेही धरणीवर थेंबांचा शिडकावा केलेला असतो. मृद्गंध सुटलेला असतो. इथे ‘सारे प्रवासी घडीचे’ नसतात तर ‘सारे प्रवासी ओढीचे’ झालेले असतात. आणि आपले हजारो जणांचे विशाल कुटुंब असल्याचा अनुभव घेऊन पुलकित झालेली ही मने नव्या चैतन्याची आणि स्फूर्तीची संघपहाट आणण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात उमेदीने परततात. 

Tuesday, July 6, 2010

“नावात काय ( नाही) आहे?”



“नावात काय आहे?”  असं हिटलरने म्हटलं आहे. का चमकलात? जर नावात काही नसेल तर हिटलर काय आणि शेक्सपियर काय...काय फरक पडणार आहे? परंतु असं चालणार नाही. नावाशिवाय गोष्टी अनाकलनीय आणि दुर्बोध होतील. आणि गोंधळ उडेल तो वेगळाच. म्हणजे विशिष्ट नावाची आवश्यकता तर आहे.

पण ही आवश्यकता केवळ एखाद्या गोष्टीचा निर्देश करण्यासाठी आहे का? अगदी मुळात जेव्हा शब्द अस्तित्वात आले किंवा येतात त्यावेळेला निर्देशनासाठी म्हणून. परंतु त्याचा जसजसा वापर होऊ लागतो तसा त्या शब्दामागचा संभार वाढत जातो. वर्षानुवर्षांच्या, पिढ्यांपिढ्यांच्या वापराने नावाला विशिष्ट वजन, अस्मिता, इतिहास, प्रेरणा जोडत जाते. त्या नामोच्चाराबरोबरच त्याला चिकटलेला इतिहास जागृत होतो. ‘पानिपत’. म्हटले तर ठिकाणाचे नाव. पण आठवतोच ना इतिहास? ‘पावनखिंड’, ‘हळदीघाटी’, ‘झाशी’, ‘कुरुक्षेत्र’, ‘सिंहगड’ अशा नावांनी वीरश्री संचारते आणि आपण यशस्वीरित्या परतून लावलेल्या रानटी आक्रमणांची आठवण येते. तसंच ‘काशी’, ‘वृंदावन’, ‘केदारनाथ’, ‘प्रयाग’, ‘रामेश्वरम्’ ही नावे येताच आपल्या मनात ईश्वर, भक्ती, अध्यात्म असे पवित्र भाव दाटून येतात. आपली तीर्थक्षेत्रे आहेत ती. पण तेच ‘अयोध्या’, ‘सोमनाथ’, ‘अमरनाथ’, ‘तुळजाभवानी’ या नावांनी वेगळे आणि संमिश्र भाव येतात. आपण सत्य रक्षणासाठी, न्याय मिळवण्यासाठी वेळोवेळी दिलेले, देत असलेले लढे आठवतात.

म्हणजेच आपल्या भारतात आपल्याला जो संघर्षरत परंतु विजिगीषु इतिहास, जी वैभवशाली परंपरा आणि ज्या समृद्ध, अर्थवाही, आशयघन भाषा लाभल्या आहे त्यामुळे स्थानांच्या नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळेच आपण ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’, ‘बॉम्बे’, ‘कलकत्ता’ ही नावे बदलली. असं म्हणतात की रविंद्रनाथ टागोरांचे आडनाव हे खरे तर ‘ठाकूर’. पण ब्रिटीशांनी त्याचे केले ‘टागोर’. ते तसेच चालू राहिले! तशीच बंडोपाध्याय, चट्टोपाध्याय व मुखोपाध्याय ही नावे उच्चारायला कठीण म्हणून त्याचे केले गेले अनुक्रमे ‘बॅनर्जी’, ‘चटर्जी’ व ‘मुखर्जी’! आणि त्यातच आपल्याला स्वभाषेची अॅलर्जी आणि राखायची  ब्रिटीशांची मर्जी! म्हणून जो येईल तो सोयीनुसार बदलतो नावे.

भारतात आपण अजूनही अशाच काही स्थानांची नावे जपून आहोत, जी बदलण्याची आवश्यकता आहे. औरंगाबाद. औरंगजेबाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे नाव! आणि औरंगाबाद म्हणजे औरंग्या ‘बाद’ झाला असे नव्हे, तर आबादी-आबाद मधला आबाद जोडला औरंगला आणि झाला औरंगाबाद. तसंच उस्मानाबाद, अहमदनगर, हैदराबाद, अहमदाबाद, दौलताबाद, अलाहाबाद, निजामपूर, गाझियाबाद, मोरादाबाद अशी एक न संपणारी जखमांची यादी भारतभर विखुरलेली आहे. ज्या निजामाने अत्याचार केले, औरंग्याने मुलुख च्या मुलुख बेचिराख केले त्यांची आठवण आपण जपत आहोत का? धर्मांध औरंग्याने संभाजीराजांनी हिंदू धर्म सोडावा म्हणून हालहाल करून मारले. परंतु सिंहाचा बछडा मृत्यूला घाबरला नाही. ‘स्वधर्मे निधनं श्रेय:’ हे वचन जगून दाखवले त्या धर्मवीर संभाजीराजांचे नाव तिथे हवे. तिथली राष्ट्रभक्त जनता जिल्हा-‘संभाजीनगर’ म्हणूनच सांगते. अन्य ठिकाणीही आपण औरंगाबादला संभाजीनगर म्हणणेच सुरु केले पाहिजे. असे बदल हळूहळूच घडत असतात.

त्यामुळे भारतभर असे विविध आबाद आहेतच.. आणि आबादीही वाढते आहे! तिथल्या जनतेने जागृत होऊन आणि शासनाने पुढाकार घेऊन ही अपमानजनक आणि कटू स्मृतींची चिन्हे मिटवायला हवीत.
जर कोणी असा युक्तिवाद केला की “आम्हाला बुवा औरंगाबाद म्हटल्यावर केवळ स्थानाचाच बोध होतो, इतिहास-बितिहास काऽही आठवत नाही.” तर त्याचे स्पष्टीकरण वर काही स्थानांचा उल्लेख करून पुरेसे झालेले आहे.

नावाबाबतीत आपल्या देशाचेही तसेच. विचारून पहा- आपल्या देशाचे नाव काय? ‘भारत अथवा हिंदुस्थान’ लगेच उत्तर येते...आणि इंग्रजीत? -‘इंडिया’. सोप्पे आहे! मग त्या व्यक्तीला त्याचे नाव विचारा.. उदाहरणार्थ प्रकाश. मग इंग्रजीत? Mr. Light?? नाही. प्रकाशच राहणार. फार तर Mr. प्रकाश. जपानीत? प्रकाश. अरबीत? प्रकाशच. एव्हाना तो माणूस चिडायला लागलेला असतो. मग जगातली कोणतीही भाषा असो आसामी, तामिळ, सिंधी, रशियन, फ्रेंच; हे प्रकाश काही बदलणार नाही. मग जर आपले नाव जगाच्या पाठीवरल्या कोणत्याही भाषेत बदलत नाही तर मग आपल्या देशाचे नाव तरी का बदलावे? हिंदी-मराठीत भारत आणि इंग्रजीत इंडिया हा हास्यास्पद प्रकार थांबवूया. मान्य आहे की शतकांच्या गुलामगिरीमुळे हा पगडा आहे. पण आता आपल्याला जर जाणीव झाली आहे, समजले आहे तर तरी बदलूया.

आपली राष्ट्रीयता भारतीय आहे. इंडियन नव्हे! तेव्हा इंग्रजीत लिहितानाही (अर्ज भरतानाही) Nationality (राष्ट्रीयता) समोर अभिमानाने Bharateey लिहूया. सुदैवाने आपल्या घटनाकारांनी संविधानाच्या सुरुवातीलाच म्हणून ठेवले आहे ‘India that is Bharat’. त्यामुळे कोणी आपल्याला आक्षेप घेऊ शकत नाही. काही बुद्धिजीवी विचारवंत मला म्हणतीलही की “एकच बोध होणार आहे तर हे भारत आणि इंडिया असा भेद कशाला?” अगदी बरोबर. तर मग आपण भारत हेच म्हणूया ना. आणि ज्या पूर्वसूरींनी, संविधान बनवताना ‘India that is Bharat’ अशी सुरुवात केली ती का केली? ती केली नसती. सरळ इंडिया म्हणून पुढे गेले असते. पण आज न उद्या भारत हे नाव प्रस्थापित व्हावे आणि इंडिया हे गळून पडावे ही अंतर्निहित इच्छा असल्यानेच त्यांनी असे म्हणून ठेवले.


तेव्हा नावात काय आहे असे शेक्सपियरला वाटले असेल ते भाषेमुळे अथवा अन्य कारणांनी. स्वाभाविकही आहे ते. पण इथे त्यामुळे ‘जॅक अँड जिल्’ आणि ‘हम्प्टी-डम्प्टी’ एवढे ते सोपे नाही. इथल्या ‘राम-शाम’ लाही इतिहास आणि प्रीती आहे आणि ‘सीता-गीता’ लाही वनवास आणि नीती आहे! भारतातील अर्थवाही, सुस्पष्ट आणि आशयघन भाषांमुळे नावांना विशिष्ट अर्थ तर आहेच पण समृद्ध परंपरेमुळे, संघर्षरत आणि विजिगीषु इतिहासामुळे नावांना एक विशिष्ट बोध आहे.

झुगारा ते अन्यायाचे आणि गुलामीचे जोखड आणि अभिमानाने सांगा आपल्या देशाचे नाव.

भारतमाता की जय!



Tuesday, May 4, 2010

मानवी बॉम्ब...

मानवी बॉम्ब म्हणजे ‘स्वतःच्या अंगाला स्फोटकं बांधून घेऊन ती नियोजित स्थळी, नियोजित वेळी उडवून देणे’. हा झाला प्रचलित अर्थ. परंतु मला हा अर्थ अभिप्रेत नाही. ज्या माणसाच्या मनात येतं की ‘आपण स्फोट घडवून आणवून दहशतवादी कृत्य करावं’ तोच खरा ‘मानवी बॉम्ब’!

असे मानवी बॉम्ब का निर्माण होतात? जगभर चाललेल्या या थैमानाला एकच एक कारण नाही. आंतरराष्ट्रीय धोरणापासून, सांप्रदायिक अभिनिवेश, भावनिक गुंतागुंत, आर्थिक देवघेव, प्रादेशिक अस्मिता ही आणि अशी इतर कारणं आहेत. भारतीय उपखंडात हे सर्वच प्रकार पहावयास मिळतात. पण भारतात गेल्या काही दशकात नवीन प्रकार अस्तित्वात आले आहेत. आणि त्याचाच उहापोह या लेखात केला आहे.

जगाला ज्या भस्मासुराने भंडावून सोडलं आहे, तो ‘सांप्रदायिक अभिनिवेशापोटी’ (धार्मिक नव्हे! कारण धर्म आणि रिलीजन यात फरक आहे. रिलीजन म्हणजे संप्रदाय होऊ शकेल) जन्माला आलेला आहे. आपलाच संप्रदाय (ज्याला लोक धर्म म्हणतात) श्रेष्ठ आणि बाकीचे टाकाऊ. असे इतर संप्रदाय, उपासनापद्धती मानणारे ‘नॉन बिलिव्हर्स’ आहेत आणि त्यांना संपवले पाहिजे, या विचाराने प्रेरित दहशतवादी आपण पहिले आहेत. आणि आज नव्याने नव्हे, तर पूर्वीपासून होणारी आक्रमणं, अत्याचार, कत्तली, प्रार्थनास्थळांचे विध्वंस, जबरदस्तीचे मतांतरण असे प्रकार आपल्या पूर्वसुरींनी अनुभवले आहेत. त्यामुळे भारतात तो प्रकार आहेच. मला त्याचं नाव घेण्याची गरज नाही. सर्वविदित सत्याचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही. पण काळजीचा प्रश्न आहे तो म्हणजे हिंदुत्वाला मानणारे, हिंदुत्वासाठी काम करणारे आणि हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे काहीजण या मार्गाला लागत आहेत की काय? की काही समीकरणे जुळविण्यासाठी मुद्दाम त्यांना गोवलं जातंय? दोन्ही बाजू समान करून समीकरण जुळविण्यात आणि आपली राजकीय गणितं पक्की करण्यात राजकारण्यांचा हात कोणी धरू शकणार नाही.

असे प्रकार घडत असतीलही. ते अस्वीकारार्ह आहेतच. पण ते ‘घडू नयेत म्हणून’, ‘का घडतायत’ याचा मागोवा घ्यायला हवा. त्यामुळे क्षणभरासाठी असे धरून चालू की, असे काही अगदी तुरळक प्रकार घडले आहेत. अहिंसा, शांती, विश्वकल्याण, एकात्म मानवदर्शन यांचा घोष करणाऱ्या हिंदुत्वाचा ज्यांना अभिमान आहे ते अशा मार्गाला का वळतायत? आणि जर ते वळत असतील तर हा घातक मार्ग सुरुवातीलाच बंद करायला हवा.

धर्माला संरक्षणासाठी शस्त्रावलंब करण्याचे वावडे नाही. जवळपास प्रत्येक हिंदू देवतेच्या हातात शस्त्र आहे. पण ते असुरनिर्दालनासाठी. आपल्याच देशात अशांतता माजवण्यासाठी नव्हे. आपल्या देशात क्रांतीकार्याला तोटा नाही. क्रांतिकारक हे स्वातंत्र्यपूर्व काळात शस्त्रे मिळवून, शास्त्र शिकून स्फोटकं बनवून त्याचा वापर करत असत. हिंदुत्ववादी क्रांतिकारकांना याचे वावडे नव्हते. स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, मदनलाल धिंग्रा असतील किंवा डॉ. हेडगेवार असतील, या सर्वांनी या मार्गाचा अंशतः अनुभव घेतला होता. डॉ. हेडगेवार (रा.स्व.संघ संस्थापक) जेव्हा कलकत्त्याला शिकायला गेले, तेव्हा बंगाल हे क्रांतिकारकांचे एक प्रमुख केंद्र होते. अनुशीलन समितीच्या कार्यात डॉ. सहभागी झाले. जेव्हा बॉम्ब बनवण्याच्या छुप्या जागेमध्ये चुकीने बॉम्बस्फोट झाला आणि इंग्रज सरकारद्वारा धरपकड सुरु झाली तेव्हा डॉ. हेडगेवारांना या मार्गाच्या मर्यादितपणाची जाणीव झाली. त्यांच्या लक्षात आलं की या मार्गाने स्वातंत्र्यप्राप्ती अनिश्चित, सुदूर आणि विलंबित आहे. म्हणून त्यांनी तो मार्ग सोडून दिला.

आजचे हिंदुत्ववादी या मार्गाकडे वळतायत का? आज भारत स्वतंत्र आहे. आपले सरकार आहे. आपले राज्य आहे. मग अजूनही या निष्फळ मार्गाकडे वळणे पसंत का करावे?

देशातील सरकारचे धोरण हे बहुसंख्य समाजाच्या विरोधात आणि अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचे राहिले आहे. शाहबानो प्रकरणात सरकार त्वरेने झुकले, न्यायव्यवस्थेला फाट्यावर मारले आणि अशी अनेक उदाहरणे स्वतंत्र भारतात बघायला मिळाली, ज्यामुळे सरकारच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आजचे ‘मानवी बॉम्ब’ हे सरकार आणि असे नेते निर्माण करत आहेत.
ही कोणत्या प्रकारची धर्मनिरपेक्षता? 
या देशातील संसाधनांवर सर्वांचा समान हक्क आहे हे सांगण्याचे सोडून ‘अल्पसंख्यांकांचा अग्रहक्क आहे’ असे आग्रहाने प्रतिपादणारे पंतप्रधान. वारंवार विद्वेषमूलक विधाने करूनही मोकाट राहणारे जामा मशिदीचे इमाम, पण शंकराचार्यांना त्वरेने पकडणारे सरकार. सच्चर समितीचा अहवाल लादू पाहणारे सरकार. विकासाच्या नावाखाली रामसेतू तोडण्याचा प्रयत्न करणारे सरकार, ‘कुतुब मिनार’ मुळे मेट्रोचा मार्ग बदलू शकते. ‘हिंदूंची आत्मघातकी पथके निर्माण झाली पाहिजेत’ अशी चिथावणीखोर भाषणे करणारे तथाकथित हिंदू नेते आणि काही ‘सम्राट’. हिंदूंची जनजागृती करण्याच्या नावाखाली विद्वेष पसरविणाऱ्या संस्था. म्हाडामध्ये अल्पसंख्यांकांसाठी राखीव जागा/घरे ठेवण्याचे सुतोवाच करणारे निर्लज्ज शरद पवार. त्यांची बाजू घेऊन बाष्कळ विधानं करणारे जितेंद्र आव्हाड. केवळ हिंदू विद्यार्थ्यांना फी लावणारे राज्य सरकार. पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावर यात हिंदुत्ववाद्यांचा हात असू शकतो अशी मुक्ताफळं उधळणारे राज्य सरकार. आणि धड काही न सांगता येणारे, या राज्याचे गृहराज्यमंत्री बागवे (हेच ते ज्यांनी स्वामीनिष्ठा दाखविण्यासाठी राहुल गांधींचे जोडे उचलून कवटाळले होते! त्यांच्याकडून अधिक काय अपेक्षा असणार म्हणा!). या २ बातम्या पहा- १) http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=9937 २) http://www.esakal.com/esakal/20100409/5654627742262238642.htm. या परस्परविरोधी बातम्या आहेत. एक तर तपास पूर्ण झाल्याशिवाय बडबड का करावी? आणि ठाम माहिती असल्याशिवाय अशा गोष्टी प्रकट करू नयेत. मराठीतील एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे ‘सुमार’ संपादक मोठ्या आवेशाने आपल्या लेखात नेहेमीच गुळगुळीत विधाने करतात, ‘दहशतवादाला कोणता धर्म नसतो’ वगैरे. पण मग चवीने स्फोटामागे ‘हिंदू दहशतवादी’ असल्याचेही छापतात. का हा दुटप्पीपणा? बहुसंख्य समाजाला डिवचणे म्हणजे धर्मनिरपेक्षता का? काश्मिरी पंडितांचे हलाखीचे जीवन न दिसणारी तीस्ता सेटलवाड. भारतमातेचे आणि हिंदू देवतांचे नग्न चित्र रेखाटणारा विकृत हुसेन. त्याला सन्मानित करणारे सरकार. हुसेन गेल्याची हळहळ व्यक्त करणारी देशद्रोही जमात. अशा सर्व प्रकारांमुळे उद्रेक होण्याला वाव मिळतो. फहीम, सबाउद्दीन निर्दोष सुटतात, पण प्रज्ञासिंग, पुरोहित हे अटकेत राहतात आणि निकालाअभावी पिचत राहतात. ही धर्मनिरपेक्षता का? दहशतवाद्यांना भेटणारा, मदत करणारा बेशरम अबू आझमी मोकळा राहू शकतो ही बाबच रक्त तापण्यास पुरेशी आहे. दिल्लीत बाटला हाऊस एन्काऊंटरमध्ये ज्यांनी जीवाची बाजी लावून अतिरेक्यांना नरकात पाठवलं त्या हुतात्मा मोहनचंद्र शर्मांवर संशय घेतो अमरसिंग. कोणाच्या दाढीला कुरवाळण्यासाठी? ही समाजवादी पार्टी खरोखरच ‘स’माजवादी पार्टी (माजासहित!) झाली आहे. संघावर वर्षानुवर्षे तोंडसुख घेण्यात धन्यता मानणारे महाराष्ट्रातील समाजवादी कुठे ‘ग्रेट भेट’ घेण्यात मग्न आहेत? त्यांना हे समाजवादाच्या नावाखाली काय चालू आहे ते दिसत नाही का? स्वतःच्या पायाखाली काय जळते आहे ते पहा!

जो कोणी दोषी असेल त्याच्यावर भारतीय न्यायप्रणाली अनुसार कारवाई केली पाहिजे, परंतु दुटप्पी धोरण आणि सरकारचा दबाव यामुळे बहुसंख्य समाजाच्या मनात आज चीड निर्माण होत राहिली आहे, त्याचा दबाव निर्माण होत राहिला आहे ज्याला कुठेतरी चुकीची वाट मिळत राहिली आहे. पण ही वाफ कोंडणारे या स्फोटांना कारणीभूत आहेत.

त्यामुळे जेव्हा जेव्हा हिंदुत्ववादी या प्रकरणात गोवले जातील तेव्हा ते खोटे असून समीकरण जुळविण्यासाठी असेल किंवा वाट चुकलेले हिंदुत्ववादी या प्रकारच्या घटनांमध्ये खरेच असतील तर ते वरील लोकांमुळे. बाहेरून भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्यांना ठराविक विचारसरणी आहे. केवळ भारतद्वेष नसून संपूर्ण जग पादाक्रांत करण्यासाठी निघालेली ती टोळधाड आहे. पण किमान भारतातच असे माथेफिरू तयार न होऊ देणे हे आपल्या हातात आहे. तेव्हा वैयक्तिक, राजकीय स्वार्थासाठी दुटप्पी भूमिका घेण्याचे सोडून देऊया आणि मानवी बॉम्ब तयार करणं थांबवूया.



हिंदू विद्यार्थ्यांनी काय गुन्हा केलाय? की हिंदू म्हणून जन्माला येणं हीच त्यांची चूक???

Wednesday, April 7, 2010

जनगणना- संस्कृत आणि 'घंटासूर'!


आपल्या महाकाय भारताच्या जनगणनेचे काम सुरू झाले आहे. जनगणना दर १० वर्षांनी होते आणि त्याचा साद्यंत वृत्तान्त सादर केला जातो. ही जनगणना का केली जाते? इतर अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे सरकारला आपली दिशा ठरवताना याचा खूप उपयोग होतो. जनगणनेने जातीनिहाय लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, उत्पन्न, लोकसंख्या वृद्धीदर, लोकसंख्येची घनता, स्त्री-पुरुष प्रमाण, मृत्युदर-जननदर असे अनेक बिंदू लक्षात येतात आणि त्यावर सरकार आपली आगामी काळाची धोरणे ठरवत असते. ही सर्व माहिती तर आपल्यालाही आहे. मग या लेखाचा प्रपंच कशासाठी?



मेकॉलेची दूरदृष्टी- एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला माहित नसावी पण माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. इंग्रज या देशातून निघून गेले तरी please, sorry आणि thanks हे ठेऊन गेले असे म्हणतात. पण एवढ्याच इंग्रजीपुरता हा प्रश्न सीमित नाही. मराठी ( किंवा भारतीय भाषांच्या ) शाळा ज्या झपाट्याने बंद होत आहेत , त्यामागे आपली भाषा व पर्यायाने संस्कृती संपवण्याचा विडा घेतलेले काहीजण या देशात आहेत. दुर्दैवाने "मराठी मराठी असा घोष कंठी, तयांची मुले मात्र कॉनव्हेंटी"! ही परिस्थिती असल्याने इतरांकडून आशा करणेच व्यर्थ आहे. तरीही आजवर संस्कृती, अस्मिता आणि स्वाभिमान याचे जतन सामान्य जनतेनेच, 'नाराज' न होता
केले आहे, कोण्या नेत्याने नव्हे, म्हणून तुम्हा-आम्हा सामान्य जनांसाठी हा लेखप्रपंच! मेकॉलेने जाताना अशी व्यवस्था करून ठेवली, की ज्या आधारे इंग्रज देशांना 'सुशिक्षित काळे मजूर' मिळत राहतील. जे शरीराने भारतीय असतील पण शिक्षणामुळे मनाने 'इंग्रज' असतील. असे इंग्रजाळलेले लोक सहजरीत्या कामाला उपलब्ध होतील अशी सोय करून इंग्रज गेले.



भाषा आणि संस्कार- कोणी म्हणेल की एखाद्या भाषेत शिक्षण घेतल्याने संस्कार, संस्कृती थोडीच बदलते? परंतु ह्याचे उत्तर दुर्दैवाने 'होय' असे आहे. भाषा ही केवळ अक्षरसमूह नव्हे...भाषा आली की त्याबरोबर त्यातल्या गोष्टी, त्यातले विचार, भावना, ती व्यक्त करण्याची पद्धत, उपमा या सर्व गोष्टी येतात. आणि सर्व गोष्टी भाषांतराने साध्य नाही होत, कारण त्या संस्कृतीत तो भावच जर नसेल तर तो व्यक्त कसा करणार? आता 'पतिव्रता', 'पुण्यशील', 'उपनयन', 'गर्भसंस्कार', 'तपस्या', 'वनवास' , 'रामराज्य', 'अश्वमेध', 'यज्ञ', 'वानप्रस्थ', 'ब्रह्मचारी' इ. शब्दांचे भाषांतर अशक्य कोटीतले आहेच. पण त्याच बरोबर काही गोष्टी जसे 'कालियामर्दन', ' 'झारीतील शुक्राचार्य', 'समुद्रमंथन', 'बुलंद दरवाजा', 'अस्मानी-सुलतानी', 'अन्न हे पूर्णब्रह्म', 'सात्विक भोजन', अशा गोष्टीही पूर्ण भावाप्रत भाषांतरित नाही करता येणार. आणि म्हणूनच भावना व्यक्त होणार नाहीत. जर या भावना कळल्या नाहीत तर संस्कारयुक्त बालक कसे घडेल? प्रस्तुत लेखाचा हा विषय नाही. पण आवश्यक वाटल्याने विषयांतर केले.

इंग्रजी माध्यमाच्या काही (विशेषतः कॉनव्हेंट) शाळांमधून तर कुंकू, टिळा, बांगड्या या गोष्टींवर बंदी असते! शिवाय आपसात संवादसुद्धा 'इंग्रजीतच' साधायचा, आपल्या मातृभाषेत नाही...अन्यथा 'पनिशमेंट' दिली जाते. का हा अट्टाहास? उत्तर शोधण्याची गरज नाही, कारण ते मेकॉलेने आधीच देऊन ठेवले आहे!

आता जनगणना आणि या षड्यंत्राचा काय संबंध? जनगणनेत भाषावार चित्रही स्पष्ट होते. आणि त्या आधारावर सरकार आपले भाषाविषयक धोरण ठरवत असते. कोणत्या भाषेला आधाराची गरज आहे? कोणती भाषा मृतवत आहे? कोणत्या भाषेवर आधारित कार्यक्रम, उपक्रम चालवले जावेत हे सर्व यातून ठरणार आहे.


गेल्या जनगणनेतील धडा- गेल्या जनगणनेत असे लक्षात आले आहे, की आपल्या देशात इंग्रजी बोलणार्यांची संख्या खूप आहे आणि म्हणून इंग्रजीसाठी जास्त वाव (शाळा, शिक्षण, नोकरी) देण्याची गरज ओघानेच आली. याहून धक्कादायक बाब ही आहे, की इंग्रजी ही बहुसंख्य लोकांची 'मातृभाषा' असल्याचे सत्य(?) पुढे आले आहे. आणि संस्कृत तर मृतप्राय घोषित करण्याची कोण घाई झाली आहे! हे सर्व पुढे आले आहे ते जनगणनेतील आकडेवारीमुळे. गेल्या जनगणना वृत्तानुसार २ लाख २६ हजार ४४९ (२,२६,४४९) नागरिकांनी आपली प्रथम भाषा इंग्रजी असल्याचे नमूद केले, ८ कोटी ६० लाख नागरिकांनी द्वितीय आणि ३ कोटी ९० लाख नागरिकांनी इंग्रजी तृतीय भाषा असल्याचे नोंदविले. या सर्व अंकगणिताद्वारे हे 'सत्य'(?) प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला, की आपल्या देशात हिंदी खालोखाल सर्वाधिक बोलली जाणारी ज्ञात भाषा इंग्रजी आहे. सरकार (म्हणजे सरकारातील लोक) साहजिकच हा विचार करणार नाही की इंग्रजी ही या देशातील एवढ्या मोठ्या वर्गाची 'मातृभाषा' कशी काय असेल? 'इटलीच्या' प्रेरणेतून चालणार्यांना याच्याशी काय देणेघेणे! किंबहुना असे लक्षात येते की येत्या जनगणनेत हे चित्र अधिकच भयावह होणार आहे. तेव्हा 'इटलीच्या' किटलीतून चहा ऐवजी भलतेच काही आपल्या पेल्यात पडणार नाही ना याची आत्ताच चिंता करणे आवश्यक आहे.


आपले काय चुकले?- आपली चूक ही अज्ञानातून झालेली आहे. त्यामुळे चूक म्हणण्यापेक्षा त्याला दिशाभूल म्हणणे योग्य ठरेल. शिवाय त्यावेळी आपल्याला हा विषय माहितच नव्हता. खानेसुमारीसाठी आलेल्या अधिकार्यांनी जेव्हा आपल्याला विचारले "की कोणकोणत्या भाषा आपण जाणतो"? तेव्हा आपण अनवधानाने 'मराठी' आणि 'इंग्रजी' हे सांगून मोकळे झालो असणार. आपल्यापैकी काहींनी तर आधी 'इंग्रजी' आणि मग एका भारतीय भाषेचा उल्लेख केला असेल. 'संस्कृत' तर आपल्या मनी-ध्यानीही नाही! ८वी ते १०वी चे हमखास गुण आणि काही स्तोत्र हे सोडले तर आपले संस्कृत संपलेच की! यातूनच संस्कृतसाठी 'घंटासुराने' धोक्याची घंटा वाजवली आहे. आणि याच अनवधानातून झालेल्या चुकीवर उतारा म्हणून येणार्या जनगणनेकडे प्रसंगावधान राखून एक सुसंधी म्हणून पाहिले पाहिजे.


तुम्ही हे करणार ना?- आता जेव्हा आपल्याकडे अशी विचारणा होईल की कोणत्या ३ भाषा आपण जाणतो? तेव्हा 'मराठी' (आपली मातृभाषा), 'हिंदी' (आपली राष्ट्र्भाषा) आणि 'संस्कृत' (आपली भाषांची जननी-देवभाषा) अशा त्रिभाषासूत्राचा अवलंब करावा. सध्या ' 'हिंदी' ही राष्ट्रभाषा नाहीच' असा खोडसाळ प्रचार केला जात आहे आणि 'हिंदीद्वेष' जाणीवपूर्वक भिनवला जातो आहे. आपण तात्पुरते त्या बहकाव्यात आलो असलो, तरी आपल्यातील भांडणाचा फायदा विरुद्ध शक्तीला होणार नाही, एवढी काळजी घेतली तरी पुरे! म्हणून 'हिंदी' नसेल द्यायची तर ठीक, परंतु 'इंग्रजी' देऊ नये, जरी आपल्याला ती येत असली तरी. मग आपली मातृभाषा आणि संस्कृत या २ भाषा द्याव्यात. महत्वाची गोष्ट म्हणजे जनगणना करण्यासाठी आलेले कर्मचारी 'तुम्हाला ही भाषा खरोखरच येते का?' हे विचारू शकत नाहीत. दिलेली माहिती नोंदविण्याचे काम फक्त त्यांनी करायचे आहे. आणि शिवाय संस्कृतोद्भव शब्दच (गुरु, संगीत, पाठशाला, औषधी, वनस्पती, पर्वत, वृक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, राज्य, नौदल, सूर्यनमस्कार, योगासन इ.) आपल्या भारतीय भाषांमध्ये आहेत कारण ती या भाषांची जननी आहे. आपली नावेही 'संस्कृतोद्भव'च आहेत, 'प्रतिभा', 'मनमोहन', 'प्रणव', 'शरद', 'अशोक'...असो.


तात्पर्य- आपली गीर्वाणभारती ही आजही भारतात सन्मानावस्थेत आहे हे दाखविण्यासाठी दुर्दैवाने 'आकड्यांचा' आधार घ्यावा लागतो आहे. संस्कृतप्रेमी नागरिक, संस्कृत शिक्षक, प्राध्यापक, संस्कृत संस्थांचे कार्यकर्ते यांच्यावर तर विशेष जबाबदारी आहे. त्यांनी प्रथम भाषा संस्कृत द्यायला हवी. आणि या विचाराचे प्रकटीकरण आपापल्या माध्यमातून करायला हवे. भारतीय भाषा-भूषा, संस्कार, संस्कृती यांचे उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध असलेल्यांचे हे षड्यंत्र जसे वेळीच आपल्या लक्षात आले आहे, तसे ते आपण इतरांच्याही लक्षात आणून द्यायला हवे. वार्ताफलक, वृत्तपत्रलेखन, बातमी, इमेल अशा माध्यमांतून त्वरेने हा विचार प्रसृत करायला हवा कारण जनगणनेचा प्रारंभ झालेला आहे. विचित्र राजकारणाने मतपेटीवर डोळा ठेऊन जरी आज आपल्या भारतीय भाषा बोलणार्या विविध गटांमध्ये भांडणे लावली असली तरी 'माकड खवा घेऊन जाणार नाही' हे आपणच पहायला हवे आणि म्हणूनच भारतातील अन्य भाषांचा द्वेष करताना 'इंग्रजीचे' फावणार नाही हे पाहिले पाहिजे. येणारी जनगणना त्यादृष्टीने महत्वाची आहे.



-----विक्रम नरेन्द्र वालावलकर - (vnwbhai@gmail.com)



"हमारी सभी भाषाएँ चाहे वह तमिळ हो या बंगला, मराठी हो या पंजाबी हमारी राष्ट्रीय भाषाएँ हैं | वे सभी भाषाएँ और उपभाषाएँ अनेकों खिले हुए पुष्पों के समान हैं, जिससे हमारी राष्ट्रीय संस्कृती की सुरभि प्रसारित होती है | इन सभी के लिए प्रेरणा का स्त्रोत, भाषाओं की रानी, देववाणी संस्कृत रही है | अपने वैभव एवं पावन साहचर्य के कारण वही हमारे राष्ट्रीय पारस्पारिक व्यवहार के लिए एक महान संयोजक सूत्र है | किंतु दुर्भाग्य से आज उसका व्यवहार सामान्यरूप से नहीं होता | संपूर्ण देश की एक भाषा की समस्या के निराकरण के लिए जब तक संस्कृत स्थान नहीं ले लेती, सुविधा हेतु हमें हिंदी को प्रधानता देनी पडेगी |"

---परमपूजनीय श्रीगुरुजी (अमृतवाणी ३२:१)  


हा लेख तुम्ही मुक्तपणे अग्रेषित (fwd) करू शकता. लेखकाच्या परवानगी ची आवश्यकता नाही. पण ब्लॉगची/लेखाची जोडणी (लिंक) द्यावी.