"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, April 29, 2018

अनामवीरा - ५ बिनोय कृष्ण बसू

५. बिनोय कृष्ण बसू 

वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी मृत्यूला कवटाळणारा बिनोय क्रांतीचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी आपली समिधा अर्पण करता झालाच पण क्रांतीपथावर अग्रेसर होणाऱ्या युवकांसाठी प्रेरणास्थानही ठरला.

मुन्शीगंज जिल्ह्यातल्या रोहितभोग या गावी (आताच्या बांगलादेशात) पेशाने अभियंता असलेले वडील रेबतीमोहन बसू आणि आई क्षीरोदबाशिनी देबी यांच्यापोटी ११ सप्टेंबर १९०८ रोजी बिनोय चा जन्म झाला. त्याची आई धार्मिक होती. ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा आणि अधर्माचा विनाश या गोष्टी बिनोय च्या मनावर लहानपणीच ठसल्या असाव्यात. त्याबरोबरच बिनोय च्या आधीच्या फळीतील क्रांतिकारकांचे कर्तृत्वसुद्धा त्याला प्रेरणा देऊन गेले असणार यात काहीच शंका नाही.

ढाक्याला आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिनोयने पुढील शिक्षणासाठी मिटफोर्ड मेडिकल स्कूल (आताचे सर सलिमुल्लाह मेडिकल कॉलेज) मधे प्रवेश घेतला. पण कॉलेजमधे शिकतानाच क्रांतीकार्याशी बिनोय चा संबंध आला. हेमचंद्र घोष यांचा प्रभाव बिनोयवर पडला आणि त्याने ‘युगांतर पार्टी’शी संबंध असलेल्या ‘मुक्ती संघ’ या गुप्त गटाचे सदस्यत्व स्वीकारले. युगांतर अथवा जुगांतर या संघटनेबद्दल प्रस्तुत लेखमालेच्या आधीच्या लेखांमधे संदर्भ आला आहे. जहाल क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीसाठी स्थापन केलेल्या या संघटनेला एकामागून एक तरुण जोडले गेले. बिनोय सुद्धा त्या कोवळ्या तरुणांपैकीच एक!

पहिल्या महायुद्धानंतर बिनोय चे वडील कलकत्त्याला परतले परंतु बिनोय मात्र ढाक्यालाच राहिला. १९२८ कलकत्त्याला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ‘बंगाल स्वयंसेवक’ दलाची (Bengal Volunteers) निर्मिती केली. बिनोयने त्याची शाखा ढाक्याला सुरु केली. ‘ऑपरेशन फ्रीडम’ ची आखणी करण्यात आली. ही मोहीम इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात होती ज्यांनी आपल्या अनन्वित अत्याचारांनी केवळ क्रांतिकारक नव्हे तर सामान्य जनतेला छळले होते. अमानुषतेची परिसीमा गाठणारे हे आसुरी पोलीस अधिकारी ‘संपवणे’ हाच एकमेव मार्ग उरला होता. वृद्ध, स्त्रिया, बालके यांच्यावरही पशुवत् अत्याचार करणाऱ्या वर्दीतील दैत्यांना दुर्गेच्या उपासकांनी यमसदनास धाडले नसते तरच नवल! आणि याच अर्थाने वंदे मातरम् गीतातील ‘कोटी कोटी भुजैर्धृतखरकरवाले, अबला केनो मां एतो बोले’, आणि ‘बाहु ते तुमि मां शक्ती’ ह्या पंक्ती असाव्यात. शेवटी भारतमाता ही दशप्रहरणधारिणी असली तरी ती काही चित्रातून बाहेर येणार नाही दैत्यांचं निर्दालन करायला. ते काम तिच्या जीवित सुपुत्रांनाच करायचं आहे. त्यामुळे बिनोय सारख्या कोवळ्या तरुणांनी जुलमी इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन फ्रीडम’ हाती घेतले.

१९३० च्या ऑगस्ट महिन्यात इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस लोमन (Lowman) हा मेडिकल स्कूल हॉस्पिटल मधे आजारी पोलीस अधिकाऱ्याला पाहण्यासाठी येणार होता. त्यावेळी त्याची हत्या करण्याचा कट आखण्यात आला. २९ ऑगस्ट १९३०. पारंपरिक बंगाली वेषात बिनोय हॉस्पिटल मधे वाट पाहत थांबला होता. सावज टप्प्यात येताच अगदी जवळून बिनोय ने त्यावर पिस्तुल चालवले. जागच्या जागी लोमन मरण पावला. त्याच्याबरोबरचा होडसन हा पोलीस अधीक्षक (Superintendant of Police) गंभीररित्या जखमी झाला. बिनोय तिथून सटकण्यात यशस्वी झाला खरा, पण बिनोयनेच हे कृत्य केल्याबद्दल पक्की माहिती पोलिसांना होती आणि त्यामुळे त्याचे कॉलेज मॅग्झिन मधून घेतलेले रेखाचित्र आणि त्याच्यावर त्याकाळी लावलेले १०,००० रुपयाचे इनाम (काही संदर्भांनुसार ५,००० रुपये) सगळीकडे प्रदर्शित करण्यात आले. पण बिनोय नाट्यमयरित्या पोलिसांना चकवा देत राहिला. ह्या सुमारास नेताजींनी बिनोय ला परदेशात पाठवता येईल असे सांगितले. पण विनम्रतेने नकार देऊन बिनोय ने हिंदुस्थानातच राहणे पसंत केले. कारण नियतीच्या मनात त्याच्या हातून अजून कार्यभाग साधणे होते.

ऑगस्ट महिन्याच्या बंगालमधील मुसळधार पावसात गुडघ्याएवढ्या साचलेल्या पाण्यातून दोन मुस्लीम वेशातील युवक वाट काढत चालले होते. दोलाईगंज या जवळच्या रेल्वे स्टेशनवर ते चालले होते. स्टेशन पोलिसांनी गजबजलेले होते. बिनोय चे रेखाचित्र सगळीकडे लावण्यात आले होते. ट्रेन ढाक्याहून नारायणगंजला आली. पोलिसांनी प्रत्येक डब्यात कसून तपासणी सुरु केली. बिनोय आणि त्याचा सहकारी तृतीय श्रेणीच्या खच्चून भरलेल्या डब्यात होते. ट्रेन पूर्णपणे थांबल्यावर बिनोय व त्याचा सहकारी धक्क्याच्या दिशेने चालू लागले कारण कलकत्त्याला पोहोचण्यासाठी बोटीने मेघना नदी पार करून जाणे आवश्यक होते. पोलिसांची करडी नजर बोटींवरही होती. परंतु मधल्या वेळात बिनोय आणि त्याचा सहकारी हे आधीचे रूप बदलून आता एक जमीनदार आणि त्याचा नोकर झाले होते. त्याच्या सहकाऱ्याचे नाव सुपती रॉय होते. बोटीचा प्रवास पूर्ण झाल्यावर सिल्डाह या मुख्य टर्मिनसवर उतरण्याऐवजी ते तुलनेने कमी वर्दळ असलेल्या डमडम स्टेशनवर उतरले. तिथून मध्य कोलकात्याच्या वलीउल्लाह गल्लीत काही काळ वास्तव्य करून लगेच कात्रसगढ जवळच्या एका कोळसा खाणीच्या आसपासच्या परिसरात बिनोय स्थलांतरित झाला. तिथून पुढे उत्तर कोलकात्याच्या एका, तुलनेने शांत असलेल्या परिसरात, बिनोय ने आपले बस्तान हलवले. पण पोलीस आपल्या मागावर आहेत आणि ते आपल्यापर्यंत लवकरच पोहोचतील अशी कुणकुण असलेल्या बिनोय ने पोबारा केला आणि त्याची माहिती खरी ठरली. तत्कालीन पोलिसप्रमुख चार्ल्स तेगार्ट पोलीस ताफ्यासह बिनोय च्या शेवटच्या पत्त्यावर येऊन पोहोचला. सारे एका चित्रपटाप्रमाणे चालले होते जणू!

बिनोय आणि त्याच्या सहकाऱ्यांचे पुढील लक्ष्य होते पोलीस महासंचालक (कारागृह), कर्नल एन.एस.सिम्प्सन (Inspector General of Prisons). कारागृहात बद्ध असणाऱ्या क्रांतिकारकांच्या छळाचा बदला घेण्याचे निश्चित झाले. पण त्याचवेळी एकूणच इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये दहशत व भिती पसरण्यासाठी सेक्रेटरिएट बिल्डिंगवरही हल्ला करण्याचे निश्चित करण्यात आले. ८ डिसेंबर १९३० ला बिनोय आणि त्याचे सहकारी दिनेश गुप्ता आणि बादल गुप्ता युरोपियन वेषात ‘रायटर्स बिल्डिंग’मध्ये प्रवेश करते झाले. तिथे कर्नल सिम्प्सन ला जागच्या जागी ठार मारण्यात आले. आपल्या दहशतीसाठी प्रसिद्ध असलेलले ट्वायनॅम, प्रेंटिस, नेल्सन हे अन्य अधिकारीही चकमकीत जखमी झाले. चकमक काहीकाळ चालली. पोलिसांना अधिक कुमक येऊन मिळाली. सर्व शस्त्रसाठ्यासह सज्ज पोलीस आणि अपुऱ्या साधनांनिशी लढणारे बिनोय व त्याचे सहकारी ही असमान लढाई फार चालली नाही. राष्ट्रभक्त स्वाभिमानी बिनोय, दिनेश आणि बादल ला शत्रूच्या हाती लागायचेच नव्हते. बादल ने पोटॅशियम सायनाईड घेऊन इहलोकीची यात्रा संपवली तर अनामवीर बिनोय आणि दिनेश यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. बिनोय ला इस्पितळात नेण्यात आले जिथे १३ डिसेंबर १९३० ला त्याची प्राणज्योत मालवली. दिनेश मात्र वाचला. त्याच्यावर खटला भरून, दोषी म्हणून सिद्ध करून त्याला फाशी देण्यात आले.
रायटर्स बिल्डिंग चे एक जुने छायाचित्र 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डलहौसी चौकाचे नामकरण बिनोय-बादल-दिनेश बाघ (बी.बी.डी. चौक) असे करण्यात आले.

‘रायटर्स बिल्डिंग’च्या पहिल्या मजल्यावरील भिंतीवर त्यांच्या प्रेरक स्मृतीसाठी नावे कोरण्यात आली आहेत. अशारीतीने आगामी पिढ्यांसाठी, युवा क्रांतिकारक, देशभक्त यांच्यासाठी प्रेरणा बनून वयाच्या केवळ २२ व्या वर्षी बिनोय बसू अनंतात विलीन झाला...