"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, November 8, 2018

अनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई


७. वीर सुरेंद्र साई

पारतंत्र्यातील हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी सर्वच प्रांतांतील क्रांतिकारक आपापल्या शक्तीनुसार क्रांतिकार्य करत होते. आपण आजवर अनामवीरा या मालिकेतून प्रामुख्याने महाराष्ट्र आणि बंगाल प्रांतातील अल्पख्यात क्रांतिकारक पाहिले आहेत. आज जरा ओरिसाकडे जाऊ. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले एक राज्य. मोठ्या राज्यांच्या भाऊगर्दीत दुर्लक्षित राहिलेले राज्य. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत  म्हणजे १९४७ ते २०१८ या कालावधीत संपूर्ण राज्यात केवळ एकच विमानतळ होता. सप्टेंबर २०१८ ला झरसुगुडा इथे राज्यातला दुसरा विमानतळ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केला. त्याला वीर सुरेंद्र साई विमानतळ हे नाव देण्यात आले आहे. केवळ आपणच नव्हे तर भारतातील अनेकजणांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले. त्यामुळे आजचे आपले अनामवीर तेच आहेत – वीर सुरेंद्र साई.
इंग्रज जेव्हा आपला जम भारतात बसवू पाहत होते तेव्हा सामान्य जनता तर यथाशक्ती प्रतिकार करत होतीच पण भारतातील आधीपासून अस्तित्वात असलेली काही राजघराणीसुद्धा इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारण्याचा सोपा मार्ग अव्हेरून  इंग्रजांना जशी जमेल तशी टक्कर देत होते. ओरिसातील चौहान राजघराणे इंग्रजांना सामील झालेले नव्हते, पण त्यांचे संबंध तेवढेही ताणले गेले नव्हते. या घराण्यातील चौथे राजे मधुकर साई १८२७ ला निपुत्रिक म्हणून निवर्तले. इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईच्या बाबतीत जे केले तसेच याही प्रकारात झाले. त्यांनी मोहन कुमारी या राणीला राज्यपदी बसवले. या साऱ्या प्रकाराला सुरेंद्र साईचा प्रखर विरोध होता. स्वतः राजघराण्यातील असल्याने डावलले जाणे त्याला मान्य नव्हते. इंग्रजांच्या कुटील नीतीचा त्याला पूर्ण अंदाज आला होता. राज्य खालसा करण्याच्या दृष्टीने इंग्रजांनी उचललेल्या पावलांना वेळीच प्रतिरोध केला नाही तर ते आपले राज्य गिळंकृत करणार याबद्दल सुरेंद्रच्या मनात तिळमात्र संशय नव्हता.
राणी मोहन कुमारीच्या जमीन महसूलविषयक धोरणाचा गोंडी, बिन्झाल अशा जनजातीतील, वनवासी लोकांना आणि जमीनदारांना जाच होऊ लागला. इंग्रजांनी मोहन कुमारीची उचलबांगडी केली आणि तिच्या जागी नारायण सिंगाची नेमणूक केली. सुरेंद्रच्या जखमेवर मीठच चोळले गेले. त्याचा अधिकार पुन्हा एकदा नाकारला गेला होता. सुरेंद्रने जनजातीतील लोकांना संघटित करायला आणि त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष भडकवायला सुरुवात केली. नारायण सिंगाच्या राजवटीत बंड झाले. इंग्रज फौजांविरुद्ध लढत असताना सुरेंद्र, त्याचा भाऊ उद्यंत साई आणि त्यांचे काका बलराम सिंह यांना पकडण्यात आले. त्यांची रवानगी हजारीबाग तुरुंगात करण्यात आली. बलराम सिंहाचा तिथेच कारावासात मृत्यू झाला. इथे नारायण सिंग सुद्धा १८४९ मध्ये मरण पावला. तोही निपुत्रिक मरण पावल्याने पुन्हा सुरेंद्रचा अधिकार निर्माण झाला. लॉर्ड डलहौसी ने १८४९ ला संबलपूर चे राज्य इंग्रजी साम्राज्याचा भाग बनवले.
सुरेंद्र कारावासात असल्याने काही करू शकला नाही, पण लवकरच संधी चालून आली आणि १८५७ चा उठाव झाला. या उठावाचा भाग म्हणून उठावात भाग घेणाऱ्या लोकांनी हजारीबाग चा तुरुंग फोडला आणि त्यातून सुरेंद्र आणि उद्यंत या दोघांचीही सुटका झाली. त्यांच्याबरोबर जवळपास ३२ जणांची सुटका करण्यात आली. सुरेंद्रने संबळपूर च्या सामान्य जनतेला इंग्रजांविरुद्ध संघटित करायला पुन्हा एकदा सुरुवात केली. वनवासींची भाषा, भूषा, रीतीरिवाज यावर इंग्रज घाला घालतच होते. सुरेंद्रने त्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करायला सुरुवात केली. जनता संघटित होऊ लागल्याचे पाहून इंग्रजांनी आपले कुशल सेनाधिकारी संबळपूर ला पाठवायला सुरुवात केली. मेजर फॉर्स्टर, कॅप्टन एल. स्मिथ हे असे अधिकारी होते ज्यांच्या नावावर भारतातील इतर ठिकाणचे उठाव यशस्वीरित्या मोडून काढण्याचे यश जमा होते. हे अधिकारी इंग्रजी सैन्यासह संबळपूर ला येऊन डेरेदाखल झाले. मेजर फॉर्स्टर ला पूर्ण लष्करी व मुलकी अधिकारी देऊन त्या भागाचा कमिशनर बनवण्यात आले होते. पण सुरेंद्रने त्याच्या हाती काहीच लागू दिले नाही. शेवटी १८६१ ला मेजर फॉर्स्टर ला हलवण्यात आले. नंतर आलेल्या मेजर इम्पे ने सुद्धा खूप प्रयत्न करून पाहिला, पण स्थानिकांची मजबूत साथ असेलला सुरेंद्र इंग्रजांना चकवतच राहिला. मेजर इम्पे ने आधीच्या धोरणात बदल केला. त्याने रसद तर तोडलीच पण त्याचबरोबर हिंसक लढाई सोडून संवाद आणि वार्तालाप सुरु केला. हे अर्थातच त्याने इंग्रज सरकारच्या संमतीने सुरु केले. हा लष्करी डावपेचाचा एक भाग म्हणून तो करत होता हे सुरेंद्र च्या लक्षात आले नाही. तो एक सच्चा वनवासी होता. निसर्गपूजक, निसर्गात रममाण होणाऱ्या सुरेंद्र ला हे कुटील डावपेच कळले नाहीत ह्यात फारसे नवल काही नाही. इम्पे च्या आश्वासनांवर विसंबून सुरेंद्र ने लढाई थांबवली. उत्तम तलवार चालवणारा सुरेंद्र शांततेत राहू लागला. मेजर इम्पेच्या मृत्यूपर्यंत हे चालू राहिले. पण इम्पेचा मृत्यू झाला आणि ताबडतोब सरकारने पुन्हा लढाई तीव्र केली. नव्याने तयार केल्या गेलेल्या मध्य प्रांतात (Central Province) ३० एप्रिल १८६२ ला संबळपूर चा समावेश करण्यात आला. गाफील आणि बेसावध असलेल्या सुरेंद्र ला, त्याच्या साथीदारांना आणि नातेवाईकांना इंग्रज सेनेने अगदी सहज पकडले. विश्वासघात करून त्यांना असीरगड च्या तुरुंगात पाठवण्यात आले. २३ मे १८८४ ला सुरेंद्र साई चा मृत्यू असीरगड च्या तुरुंगातच झाला. संबळपूर हा शेवटी शेवटी इंग्रजांच्या अधिपत्याखाली आलेला भारताचा भाग. त्याचे कारण म्हणजे वीर सुरेंद्र साई ने चेतवलेले जनमानस.
साई ला संबळपूरच्या प्रदेशातील लोक ‘बीरा’ या नामाभिधानानेच ओळखतात. बीरा म्हणजेच वीर! ओदिशाच्या जनतेचा हा नेहमीच आरोप आहे की इतिहासकार, प्रशासन, लेखक इत्यादींनी वीर सुरेंद्र साईवर नेहमीच अन्याय केलाय. त्याच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी प्रसिद्धी त्याला कधीच मिळाली नाही. ओडिशा सरकारने २००९ मध्ये राज्यातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नामकरण वीर सुरेंद्र साई युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी असे केले. २००५ मध्ये त्यांचा पुतळा संसद भवन आवारात बसवण्याचे ठरविण्यात आले. त्यांच्या नावे पोस्टाचे तिकीट काढण्यात आले आहे. आणि लेखाच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे ओरिसामधील दुसऱ्या विमानतळाला वीर सुरेंद्र साई चे नाव देण्यात आले आहे.



संदर्भ:-
१.      वीर सुरेंद्र साई – एन.के.साहू
२.      पश्चिम ओरिसा अग्रणी संगठन प्रकाशित वीर सुरेंद्र साई – सी. पसायत  

Friday, September 14, 2018

अनामवीरा ६ - शचीन्द्रनाथ सान्याल



६. शचीन्द्रनाथ सान्याल
             “ ‘हिंदुस्थान’ हे एकराष्ट्र नसून अनेक राष्ट्रांचा समूह आहे” ही धारणा पद्धतशीरपणे पसरवण्याचा प्रयत्न केवळ परकीय सत्तांकडूनच नव्हे; तर परकियांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या कित्येक एतद्देशीय तथाकथित इतिहासकार असामींकडूनही अगदी आजही होताना दिस्तोदिसतो. याचे प्रमुख कारण म्हणजे या देशात हिंदू समाजाने मनोमन जपलेली विविधता! या विविधतेही समान संस्कृतीमूल्ये, चिन्हे, आचरणाच्या पद्धती, जय-पराजयाच्या समान संकल्पना, प्रांतोप्रांतीच्या राष्ट्रपुरुषांबद्दल अभिमानाची भावना यातून भावात्मक राष्ट्रसंकल्पना प्रतीत होते. एकराष्ट्रीयत्वाची भावना ही अनुभूतीची गोष्ट आहे.
            संक्षेपाने राष्ट्र संकल्पनेबद्दल नमूद करण्याचे कारण एवढेच की, ‘अनामवीरा’ मालिकेतील सर्वचजण आमच्यासाठी राष्ट्रपुरुष आहेत. ते बंगाल, महाराष्ट्र, पंजाब अशा ‘प्रांतांसाठी’ लढले नाहीत – ते रयतेसाठी लढले – ते या पवित्र भूमीच्या पवित्रतम कणासाठी लढले, गंगा-सिंधू-सरस्वतीच्या जलबिंदूसाठी त्यांनी रक्तबिंदू अर्पण केले. हे राष्ट्र स्वतंत्र राहावे म्हणून त्यांनी भारतमातेच्या चरणी रुधिराभिषेक केला. दुसरी बाजू म्हणजे आधीच्या इतिहासातील महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोबिंदसिंह यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली होती.
आजचा अनामवीर ‘शचीन्द्रनाथ सान्याल’ याचा जन्म १८९३ मध्ये बनारसला हरिनाथ सान्याल व खिरोदवासिनी देवी यांच्यापोटी झाला. बालपणीच त्याला भारतमातेच्या स्वातंत्र्याची आस लागली; पण विविध मार्गांमुळे निर्माण झालेले द्वंद्व किंवा वैचारिक संघर्ष शचीन्द्रनाथ सान्याल यांच्या आयुष्यात पाहायला मिळते. बनारसला क्रांतिकारी संघटनेची सुरुवात शचीन्द्रनाथने केल्यानंतर कलकत्त्याहून आलेल्या एका समवयस्क मित्राचा प्रभाव त्यांच्यावर पडू लागला. त्याची भेट होण्याआधी सशस्त्र क्रांती हाच एकमेव पर्याय हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी आहे, त्यासाठी पुरेसा शस्त्रसंग्रह करावा लागेल, युवकांची संघटना उभारावी लागेल अशा विचारांचा होता शचीन्द्रनाथ. तो शिवाजीला (शिवाजी महाराजांना) आदर्श पुरुष मानत असे. ‘तू मोठेपणी कोण होणार’ असे वडिलांनी विचारले असता तो म्हणत असे मी शिवाजी होणार, नेपोलियन होणार. पण आता ह्या मित्राने शची च्या मनात द्वंद्व निर्माण केले. केवळ पंधरा-सोळा वयाचे दोघेही जण. त्या मित्राचे विचार हे विरक्तीकडे झुकणारे होते. संन्यास घ्यावा आणि सामाजिक कामापासून वेगळे होऊन स्वतःच्या उन्नतीसाठी साधना करत जीवन व्यतीत करावे असे त्याचे म्हणणे होते. शचीसाठी हे समाजापासून दूर जाणे, आपली आपण साधना करत राहणे कठीणच होते. परंतु त्या मित्राच्या मते, मनुष्याचा श्रेष्ठ आदर्श म्हणजे जीवनात ईश्वरप्राप्ती करून घेणे, सत्याची अनुभूती घेणे आणि त्यानंतरच समाजासाठी काम करणे उचित राहील. ईश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय समाजाची सेवा करणे म्हणजे आंधळ्याने आंधळ्याला मार्गदर्शन करण्यासारखे आहे.  ईश्वराच्या साक्षात्कारानंतर त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या आज्ञेनुसार समाजाची सेवा करणे सार्थकी लागेल. आपल्या मतांना पुष्टी देण्यासाठी त्या मित्राने श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रांचा उल्लेख केला. शची च्या मनातील द्वंद्व संपेना. एका बाजूला तो समाजापासून दूर जाऊ शकत नव्हता पण मित्राचेही म्हणणे त्याला अगदीच अमान्य नव्हते. सहा महिने ही घालमेल चालली. शची ने श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची चरित्रे वाचली. त्यांच्या वचनांवर एकांतात एकाग्रतेने त्याने गहन विचार केला. उपनिषद आणि गीतेचा अनुवाद त्याने वारंवार वाचला, साधू-संतांच्या सहवासात राहिला. पण विश्वकल्याणाची कामना करणारे साधू-संत हिंदुस्थान पारतंत्र्यात असताना स्वतःच्याच कल्याणात मग्न आहेत हे त्याला जाणवले. ते लोकांमध्ये मिसळत नाहीत, त्यांना राष्ट्रभक्ती, स्वदेशप्रेम यांबद्दल उचित मार्गदर्शन करत नाहीत तर केवळ परमार्थ, ईश्वरसाधना, भजन यात मग्न राहतात. शेवटी गीतेतील कर्मयोगाने त्याच्या मनातील द्वंद्व संपवले. स्वामी विवेकानंदांनी केलेला कर्मयोग व संन्यास यांचा योग्य मिलाफ त्याच्या मनातील वादळ शांत करता झाला. कुठलाही मार्ग उच्च अथवा नीच नाही. प्रत्येक मार्ग आपापल्या ठिकाणी योग्यच आहे, विविध महापुरुषांनी वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सत्याची अनुभूती घेतली आहे. तेव्हा एकाच गंतव्याकडे जाणारे विविध मार्ग असू शकतात आणि ते सर्व योग्यही असू शकतात याबद्दल त्याच्या मनाची खात्री पटली. आपले आयुष्य कर्मयोगी बनून व्यतीत करण्याचे त्याने ठरवले. भारतात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांची सद्गुणावली एकवटलेले महापुरुष जन्माला यावेत अशी त्याची इच्छा होती. कर्महीन झाल्यामुळे भारतवर्षाचे अधःपतन झाले आहे ही त्याची धारणा दृढ होत गेली.
श्री अरविंद घोषांच्या रूपाने (औरोबिंदो घोष) त्याला आध्यात्म आणि स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व याचा योग्य संगम पहायला मिळाला. १९११ ला योगी अरविंदांची भेट घेण्यासाठी त्याने पुदुच्चेरी गाठले. पण दुर्दैवाने भेट होऊ शकली नाही. १९२० ला काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पाहिले की महात्मा गांधींचा उदय राष्ट्रीय क्षितिजावर झाला आहे. क्रांतिकारी आंदोलनाच्या विरोधात असणाऱ्या गांधीजींच्या विचारांनी त्याला अस्वस्थ केले. बेळगाव कॉंग्रेस अधिवेशनात गांधीजींच्या भाषणाने व्यथित होऊन त्याने प्रत्युत्तर म्हणून एक पत्र गांधीजींना पाठवले जे १२ फेब्रुवारी १९२५ च्या ‘यंग इंडिया’ मध्ये जसेच्या तसे प्रकाशित करण्यात आले व सोबत गांधीजीनी त्याला दिलेले उत्तरही!
१९२३ च्या सुमारास शचीचा संबंध कम्युनिस्ट विचारधारेशी आला. साम्यवादाच्या सिद्धांतांचा सखोल अभ्यास त्याने केला. विशेषत्वाने साम्यवादाचे आर्थिक चिंतन त्याला पटले, पण बाकी बाबतीत तो शेवटपर्यंत साम्यवादी विचारधारेच्या विरूद्धच राहिला. धार्मिक वृत्ती, हिंदू धर्माप्रती आस्था, जनसामान्यांची सेवा यामुळे शचीन्द्रनाथ साम्यवादाच्या भोवऱ्यात अडकले नाहीत. आधुनिक विज्ञानातून प्राचीन भारतीय दर्शनशास्त्राच्या सिद्धांतांची पुष्टीच होत जात आहे असे शचीचे म्हणणे होते. आपल्या देशातील काही लोक परानुकरणामुळे आत्मवादाचा स्वीकार करत नाहीत आणि जे लोक आत्मवादावर विश्वास ठेवतात त्यांचीही ते खिल्ली उडवतात.
“राष्ट्रीय क्षेत्रामध्ये जे लोक त्याग आणि वीरवृत्तीने पुढे जात असतात त्यांच्या विचारधारेचा प्रभाव सामान्य तरुणांवर पडत असतो, आणि रशियन क्रांतीच्या आंदोलनाच्या यशस्वीतेमुळे आपल्या देशातील बहुतांश तरुण त्यामागे जाताना दिसतात. पण सगळ्याच्या मुळाशी आर्थिक कारणे आहेत या मार्क्सवादी सिद्धांताशी मी सहमत नाही. साम्यवादाचा स्पर्श नसलेल्या जगातील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इटली, अमेरिका, जपान इत्यादि देशांकडेही पहायला हवे. त्यांच्याकडूनही शिकायला हवे.”
अशी वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्या शचीन्द्रनाथने अनुशीलन समितीची एक शाखा १९१३ ला पटण्याला सुरु केली. गदर कटाच्या आखणीत त्याचा सिंहाचा वाट होता. तो कट फेब्रुवारी १९१५ ला उघडकीला आल्यानंतर शची भूमिगत झाला. रासबिहारी बोसांचा तो अगदी जवळचा सहकारी होता. बोस जपानला निसटल्यानंतर सान्याल हा भारतीय क्रांतिकारकांचा सर्वात ज्येष्ठ नेता बनला. सान्यालच्या कटातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा देऊन त्याची रवानगी अंदमान निकोबारच्या सेल्युलर तुरुंगात करण्यात आली. तिथे त्याने ‘बंदी जीवन’ हे पुस्तक लिहिले. त्याची तात्पुरती सुटका करण्यात आली खरी पण स्वस्थ बसेल तर तो क्रांतिकारक कसला! हाडाचा देशभक्त असलेला शची पुन्हा इंग्रज विरोधी कारवायात गुंतून गेला. त्याची पुन्हा तुरुंगात पाठवणी करण्यात आली आणि त्याचे बनारसमधील कुटुंबाचे घर जप्त करण्यात आले.
१९२२ ला असहकार आंदोलन संपल्यानंतर सान्याल, रामप्रसाद बिस्मिल आणि अन्य क्रांतिकारकांनी ऑक्टोबर १९२४ च्या सुमारास हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना केली. संस्थेचे घोषणापत्र (manifesto) शचीनेच तयार केले. ३१ डिसेंबर १९२४ च्या दिवशी उत्तर भारतातील मोठ्या शहरांमधून ते वाटले गेले.
काकोरी कटातील सहभागाबद्दल शचीन्द्रनाथला पुन्हा तुरुंगवास घडला. पण ऑगस्ट १९३७ ला नैनी सेन्ट्रल तुरुंगातून त्याला सोडण्यात आले. त्यामुळे पोर्ट ब्लेअर च्या सेल्युलर तुरुंगात दोनदा धाडण्यात आलेला क्रांतिकारक हाही आगळावेगळा बहुमान शचीच्या नावावर आहे. कारावासातच शचीला टीबी झाला आणि त्याला त्याच्या अंतिम महिन्यांमध्ये गोरखपूरच्या तुरुंगात पाठवण्यात आले. शची १९४२ मधे निधन पावला.
दिल्लीच्या आत्माराम एंड संस, कश्मीरी गेट, दिल्ली यांनी शचीचे आत्मवृत्त ‘बंदी जीवन’ हे ३ भागात प्रसिद्ध केले आहे. इंटरनेटवरही त्याचे पीडीएफ वाचायला मिळू शकेल. 

Sunday, April 29, 2018

अनामवीरा - ५ बिनोय कृष्ण बसू

५. बिनोय कृष्ण बसू 

वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी मृत्यूला कवटाळणारा बिनोय क्रांतीचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी आपली समिधा अर्पण करता झालाच पण क्रांतीपथावर अग्रेसर होणाऱ्या युवकांसाठी प्रेरणास्थानही ठरला.

मुन्शीगंज जिल्ह्यातल्या रोहितभोग या गावी (आताच्या बांगलादेशात) पेशाने अभियंता असलेले वडील रेबतीमोहन बसू आणि आई क्षीरोदबाशिनी देबी यांच्यापोटी ११ सप्टेंबर १९०८ रोजी बिनोय चा जन्म झाला. त्याची आई धार्मिक होती. ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा आणि अधर्माचा विनाश या गोष्टी बिनोय च्या मनावर लहानपणीच ठसल्या असाव्यात. त्याबरोबरच बिनोय च्या आधीच्या फळीतील क्रांतिकारकांचे कर्तृत्वसुद्धा त्याला प्रेरणा देऊन गेले असणार यात काहीच शंका नाही.

ढाक्याला आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिनोयने पुढील शिक्षणासाठी मिटफोर्ड मेडिकल स्कूल (आताचे सर सलिमुल्लाह मेडिकल कॉलेज) मधे प्रवेश घेतला. पण कॉलेजमधे शिकतानाच क्रांतीकार्याशी बिनोय चा संबंध आला. हेमचंद्र घोष यांचा प्रभाव बिनोयवर पडला आणि त्याने ‘युगांतर पार्टी’शी संबंध असलेल्या ‘मुक्ती संघ’ या गुप्त गटाचे सदस्यत्व स्वीकारले. युगांतर अथवा जुगांतर या संघटनेबद्दल प्रस्तुत लेखमालेच्या आधीच्या लेखांमधे संदर्भ आला आहे. जहाल क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीसाठी स्थापन केलेल्या या संघटनेला एकामागून एक तरुण जोडले गेले. बिनोय सुद्धा त्या कोवळ्या तरुणांपैकीच एक!

पहिल्या महायुद्धानंतर बिनोय चे वडील कलकत्त्याला परतले परंतु बिनोय मात्र ढाक्यालाच राहिला. १९२८ कलकत्त्याला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ‘बंगाल स्वयंसेवक’ दलाची (Bengal Volunteers) निर्मिती केली. बिनोयने त्याची शाखा ढाक्याला सुरु केली. ‘ऑपरेशन फ्रीडम’ ची आखणी करण्यात आली. ही मोहीम इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात होती ज्यांनी आपल्या अनन्वित अत्याचारांनी केवळ क्रांतिकारक नव्हे तर सामान्य जनतेला छळले होते. अमानुषतेची परिसीमा गाठणारे हे आसुरी पोलीस अधिकारी ‘संपवणे’ हाच एकमेव मार्ग उरला होता. वृद्ध, स्त्रिया, बालके यांच्यावरही पशुवत् अत्याचार करणाऱ्या वर्दीतील दैत्यांना दुर्गेच्या उपासकांनी यमसदनास धाडले नसते तरच नवल! आणि याच अर्थाने वंदे मातरम् गीतातील ‘कोटी कोटी भुजैर्धृतखरकरवाले, अबला केनो मां एतो बोले’, आणि ‘बाहु ते तुमि मां शक्ती’ ह्या पंक्ती असाव्यात. शेवटी भारतमाता ही दशप्रहरणधारिणी असली तरी ती काही चित्रातून बाहेर येणार नाही दैत्यांचं निर्दालन करायला. ते काम तिच्या जीवित सुपुत्रांनाच करायचं आहे. त्यामुळे बिनोय सारख्या कोवळ्या तरुणांनी जुलमी इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन फ्रीडम’ हाती घेतले.

१९३० च्या ऑगस्ट महिन्यात इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस लोमन (Lowman) हा मेडिकल स्कूल हॉस्पिटल मधे आजारी पोलीस अधिकाऱ्याला पाहण्यासाठी येणार होता. त्यावेळी त्याची हत्या करण्याचा कट आखण्यात आला. २९ ऑगस्ट १९३०. पारंपरिक बंगाली वेषात बिनोय हॉस्पिटल मधे वाट पाहत थांबला होता. सावज टप्प्यात येताच अगदी जवळून बिनोय ने त्यावर पिस्तुल चालवले. जागच्या जागी लोमन मरण पावला. त्याच्याबरोबरचा होडसन हा पोलीस अधीक्षक (Superintendant of Police) गंभीररित्या जखमी झाला. बिनोय तिथून सटकण्यात यशस्वी झाला खरा, पण बिनोयनेच हे कृत्य केल्याबद्दल पक्की माहिती पोलिसांना होती आणि त्यामुळे त्याचे कॉलेज मॅग्झिन मधून घेतलेले रेखाचित्र आणि त्याच्यावर त्याकाळी लावलेले १०,००० रुपयाचे इनाम (काही संदर्भांनुसार ५,००० रुपये) सगळीकडे प्रदर्शित करण्यात आले. पण बिनोय नाट्यमयरित्या पोलिसांना चकवा देत राहिला. ह्या सुमारास नेताजींनी बिनोय ला परदेशात पाठवता येईल असे सांगितले. पण विनम्रतेने नकार देऊन बिनोय ने हिंदुस्थानातच राहणे पसंत केले. कारण नियतीच्या मनात त्याच्या हातून अजून कार्यभाग साधणे होते.

ऑगस्ट महिन्याच्या बंगालमधील मुसळधार पावसात गुडघ्याएवढ्या साचलेल्या पाण्यातून दोन मुस्लीम वेशातील युवक वाट काढत चालले होते. दोलाईगंज या जवळच्या रेल्वे स्टेशनवर ते चालले होते. स्टेशन पोलिसांनी गजबजलेले होते. बिनोय चे रेखाचित्र सगळीकडे लावण्यात आले होते. ट्रेन ढाक्याहून नारायणगंजला आली. पोलिसांनी प्रत्येक डब्यात कसून तपासणी सुरु केली. बिनोय आणि त्याचा सहकारी तृतीय श्रेणीच्या खच्चून भरलेल्या डब्यात होते. ट्रेन पूर्णपणे थांबल्यावर बिनोय व त्याचा सहकारी धक्क्याच्या दिशेने चालू लागले कारण कलकत्त्याला पोहोचण्यासाठी बोटीने मेघना नदी पार करून जाणे आवश्यक होते. पोलिसांची करडी नजर बोटींवरही होती. परंतु मधल्या वेळात बिनोय आणि त्याचा सहकारी हे आधीचे रूप बदलून आता एक जमीनदार आणि त्याचा नोकर झाले होते. त्याच्या सहकाऱ्याचे नाव सुपती रॉय होते. बोटीचा प्रवास पूर्ण झाल्यावर सिल्डाह या मुख्य टर्मिनसवर उतरण्याऐवजी ते तुलनेने कमी वर्दळ असलेल्या डमडम स्टेशनवर उतरले. तिथून मध्य कोलकात्याच्या वलीउल्लाह गल्लीत काही काळ वास्तव्य करून लगेच कात्रसगढ जवळच्या एका कोळसा खाणीच्या आसपासच्या परिसरात बिनोय स्थलांतरित झाला. तिथून पुढे उत्तर कोलकात्याच्या एका, तुलनेने शांत असलेल्या परिसरात, बिनोय ने आपले बस्तान हलवले. पण पोलीस आपल्या मागावर आहेत आणि ते आपल्यापर्यंत लवकरच पोहोचतील अशी कुणकुण असलेल्या बिनोय ने पोबारा केला आणि त्याची माहिती खरी ठरली. तत्कालीन पोलिसप्रमुख चार्ल्स तेगार्ट पोलीस ताफ्यासह बिनोय च्या शेवटच्या पत्त्यावर येऊन पोहोचला. सारे एका चित्रपटाप्रमाणे चालले होते जणू!

बिनोय आणि त्याच्या सहकाऱ्यांचे पुढील लक्ष्य होते पोलीस महासंचालक (कारागृह), कर्नल एन.एस.सिम्प्सन (Inspector General of Prisons). कारागृहात बद्ध असणाऱ्या क्रांतिकारकांच्या छळाचा बदला घेण्याचे निश्चित झाले. पण त्याचवेळी एकूणच इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये दहशत व भिती पसरण्यासाठी सेक्रेटरिएट बिल्डिंगवरही हल्ला करण्याचे निश्चित करण्यात आले. ८ डिसेंबर १९३० ला बिनोय आणि त्याचे सहकारी दिनेश गुप्ता आणि बादल गुप्ता युरोपियन वेषात ‘रायटर्स बिल्डिंग’मध्ये प्रवेश करते झाले. तिथे कर्नल सिम्प्सन ला जागच्या जागी ठार मारण्यात आले. आपल्या दहशतीसाठी प्रसिद्ध असलेलले ट्वायनॅम, प्रेंटिस, नेल्सन हे अन्य अधिकारीही चकमकीत जखमी झाले. चकमक काहीकाळ चालली. पोलिसांना अधिक कुमक येऊन मिळाली. सर्व शस्त्रसाठ्यासह सज्ज पोलीस आणि अपुऱ्या साधनांनिशी लढणारे बिनोय व त्याचे सहकारी ही असमान लढाई फार चालली नाही. राष्ट्रभक्त स्वाभिमानी बिनोय, दिनेश आणि बादल ला शत्रूच्या हाती लागायचेच नव्हते. बादल ने पोटॅशियम सायनाईड घेऊन इहलोकीची यात्रा संपवली तर अनामवीर बिनोय आणि दिनेश यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. बिनोय ला इस्पितळात नेण्यात आले जिथे १३ डिसेंबर १९३० ला त्याची प्राणज्योत मालवली. दिनेश मात्र वाचला. त्याच्यावर खटला भरून, दोषी म्हणून सिद्ध करून त्याला फाशी देण्यात आले.
रायटर्स बिल्डिंग चे एक जुने छायाचित्र 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डलहौसी चौकाचे नामकरण बिनोय-बादल-दिनेश बाघ (बी.बी.डी. चौक) असे करण्यात आले.

‘रायटर्स बिल्डिंग’च्या पहिल्या मजल्यावरील भिंतीवर त्यांच्या प्रेरक स्मृतीसाठी नावे कोरण्यात आली आहेत. अशारीतीने आगामी पिढ्यांसाठी, युवा क्रांतिकारक, देशभक्त यांच्यासाठी प्रेरणा बनून वयाच्या केवळ २२ व्या वर्षी बिनोय बसू अनंतात विलीन झाला...