"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, April 21, 2011

निष्पर्णा...

कोकणातले माळावरचे हे
  निष्पर्ण अन् एकाकी झाड पाहून...निष्पर्णा

निष्पर्णा कधी तुला वाटले, पान-कळ्यांनी भरून जावे,
फुला-फळांनी अवचित केव्हा, पानोपानी बहरून यावे |
माळावरती उभा एकटा, कुणीच नाही तुला सोबती,
जसा उगवला दिवस एकटा, तशीच सरते रात्र एकटी |
तप्त उन्हाच्या झळा सोसता, वठून गेली अवघी काया,
अपुले कोणीच नाही म्हणता, कोणावरती करशी माया |
दाटून येता घन आभाळी सळसळ अपुली व्यक्त करावी,
बरसून जाता मेघ चि अवघा, पिऊन घ्यावा पानोपानी |
अंगोपांगी शहारणारा थंड हिवाळा शीतल वारा,
शुष्क तुला पण कसा कळावा थरारणारा गोड शहारा |
चैत्र पालवी, वसंत अथवा, येऊन जावो ग्रीष्म उन्हाळा,
उरी निरंतर जपत रहाणे, वांझपणाच्या तप्त झळा |
असे एकटे किती जहाले सोसत अपुले भाग्य निरंतर,
अंती सारे एकएकटे, हेच खरे तर फक्त चिरंतन!
                                               
                                                -विक्रमSaturday, April 16, 2011

मार्तंडराव आणि फ्रेंच मिसळ

फ्रान्स चे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी त्यांच्या देशामध्ये मुस्लिम स्त्रियांनी बुरखा परिधान करण्यावर बंदी घातली आहे. निर्णयामागील धार्ष्ट्याचे कौतुक आहे; पण निर्णयाचे काय? या घोषणेने भारतातील काही लोकांनीही अगदी आनंद व्यक्त केला. आणि ‘मुस्लिम समाजाला अशाप्रकारे सार्कोझी यांनी एक प्रकारे जबरदस्ती केली आहे आणि ते योग्य आहे’, ‘भारतातही हे व्हायला हवे, पण आपले सरकारच लेचेपेचे आहे’ इ. अशाही प्रतिक्रिया ऐकायला, वाचायला मिळाल्या. पण हे ‘स्वधर्माभिमानी’(?) हे सोयीस्कररित्या विसरतात की भारतात विशेषतः उत्तरेत बऱ्याच जातींत, समाजात हिंदू स्त्रिया सुद्धा अवगुंठनात असतात. ‘घुंगट’ तेवढा चालेल आणि ‘बुरखा’ नाही ही असहिष्णुता आणि भेद चुकीचा आहे.या विषयात जबरदस्ती होऊ शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव चेहरा पाहण्याची मुभा सुरक्षाकर्मींना द्यायला हवी. पण समाजात वावरताना तुम्ही बुरखा/घुंगट घेऊ नका असे लादणे चुकीचे आहे. काही ठिकाणी उलट समाजातूनच जबरदस्ती होते, त्या स्त्रीची इच्छा नसतानाही. अशा ठिकाणी चाप लावायला हवा, जर खरी हिम्मत असेल तर!

तसेच काहीसे कोल्हापूर मधे! फ्रान्स आणि कोल्हापूर, तसे साधर्म्य काहीच नाही. पण 'मार्तंडराव' दोन्हीकडे आहेत! आणि ते मानवतेच्या तत्त्वांची सरमिसळ बनवत असतात; तिखटजाळ! ती असते 'मार्तंडरावांची फ्रेंच मिसळ'! कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात आत्तापर्यंत स्त्रियांना प्रवेश नव्हता हे ऐकून धक्काच बसला. त्यावर मनसेचे आ. राम कदम आणि भाजपच्या सौ. नीता केळकर यांनी आंदोलन केले ही एक स्वागतार्ह बाब आहे. राजकारणी लोकांवर आगपाखड करताना चांगल्या कामाकडे काणाडोळा करून चालणार नाही. अशा ठिकाणी केवळ प्रवेशासाठी जोर जबरदस्ती केली तर ते योग्यच आहे. बरं इथेही धर्ममार्तंडांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. त्यांनी चूक दुरुस्त करण्याचे सोडाच, पण या स्थितीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी भोंगळ शास्त्रीय कारणे देऊन तार्किकदृष्ट्या या चुकीच्या प्रथेचे स्पष्टीकरण दिले. वाचा ‘सनातन प्रभात’ - http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2011/04/blog-post_4640.html

कारण असे दिले की, स्त्रियांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश का करू नये, यामागे शास्त्र आहे. मंदिरात पूजा करतांना वेदमंत्र म्हटले जातात. वेदमंत्र म्हटल्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. स्त्रियांची जननेंद्रिये ही शरिराच्या आतील बाजूस असल्यामुळे त्यांनी वेदमंत्र म्हटल्यास या उष्णतेचा त्यांना पुष्कळ त्रास होऊ शकतो. त्यांच्या गर्भाशयावर तिचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते; म्हणून शास्त्रानुसार स्त्रियांना वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार नाही, परिणामी वेदमंत्रांसहित पूजा करण्याचाही अधिकार त्यांना नाही.हे वाचल्यावर तर हसावे की रडावे हेच कळत नाही. ह्यांना वेदही कळले नाहीत आणि शास्त्रही कळले नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाबाबत किती झुंज दिली. त्यावेळीसुद्धा असल्या स्वयंघोषित बुद्धीशून्य कर्मठ लोकांनी विरोध केला. अक्षरशः दगडफेक केली. आणि धर्मात हे असलं मान्य नाही वगैरे तारे तोडले. असा धर्म सोडावा असं बाबासाहेबांच्या मनात आलं तर मग त्यात वावगं ते काय? जम्मू-काश्मीर मधेही या असल्या तथाकथित धर्मनेत्यांनी त्याकाळी परधर्मात जावे लागलेल्या लोकांना राजा हिंदू करून घेताना धमकी दिली, की जर त्यांना हिंदू केले तर आम्ही सरोवरात उड्या घेऊन प्राणार्पण करू. राजा घाबरला. आणि ते अहिंदूच राहिले. म्हणून ती बट्ट वगैरे आडनावे! म्हणजेच हे असे प्रकार घडतच आले आहेत आणि हेच खरे हिंदू धर्माचे शत्रू आहेत.

दुसरं कारण पुढे करण्यात आलं आहे की, दुसरे असे की, गाभाऱ्यात मंत्रोच्चार करून देवतेच्या तत्त्वाला आवाहन केलेले असते. त्याचे पावित्र्य राखायलाच हवे. धर्मशास्त्राने सांगितलेल्या कोणत्याही शास्त्रविधानामध्ये अभ्यासहीन पालट करणे, त्याच्या विरोधात वर्तन करणे, हे पाप आहे. ते करणार्‍याला त्याचे फळ भोगावे लागते.हास्यास्पदच आहे हे कारण. देवतेच्या तत्त्वाला आवाहन आणि ते देवतेच्याच अंशाने अपवित्र होते? भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, “सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो” – सर्वांच्या हृदयात माझा निवास आहे. पुरुषांना जी माता उदरात वाढवते तिच्यामुळे मंदिर अपवित्र होईल? मनात विकार आणि अविचार घेऊन जाणारे पुरुष मंदिर विटाळत नसतील तर कोणाही महिलेमुळे केवळ ती महिला आहे म्हणून मंदिराचे ‘पावित्र्य’ नष्ट होईल हे अशक्यच आहे.

शिवाय ह्यावर प्रतिवाद करताना मशिदी, मुसलमान ह्यांचे उदाहरण देऊन आव्हान केले आहे, की तिथेही महिलांना प्रवेश नसतो, तिथे आंदोलन करा. हे म्हणजे समोरच्याच्या घरात कचरा आहे, तो काढा, आमच्या घरातला तसाच राहू दे, असं म्हणण्यासारखं आहे. अथवा इस्लामसुद्धा मग हिंदू धर्माप्रमाणेच शास्त्रशुद्ध आणि तार्किक आहे असं म्हणावं लागेल..तेही आमच्या ‘मार्तंडरावांना’ पचनी नाही पडणार!

उगाच धर्मशास्त्र-धर्मशास्त्र म्हणून भुई थोपटून धर्माचे पालन केल्याचा आव आणणे चुकीचे आहे. हिंदुत्वाला पुष्ट करायचे असेल तर अशा भेदाभेदांच्या भावना संपुष्टात आणाव्या लागतील. त्याचे उगीच समर्थन करत बसू नये. कालौघात जो बदलत नाही तो विलयाला जातो. हिंदुत्वाचे टिकून राहण्याचे कारण म्हणजे तो लवचिक आहे उपचारांच्या बाबतीत आणि कट्टर आहे मूलतत्वांच्या बाबतीत उदा. सत्य, अहिंसा, सदाचार, प्रेम, विश्वबंधुत्व, ईश्वराचा सर्वांभूती निवास, आत्मौपम्य बुद्धि, समानता, पापभीरूता, परोपकार, कर्तव्यपालन, धर्माचरण इ. हे हिंदुत्वाचे अपरिवर्तनीय भाग आहेत. आणि अन्य कर्मकांड, पद्धती हे परिवर्तनीय भाग आहेत. त्यात युगानुकूल परिवर्तन झालेच पाहिजे. अन्यथा काळाच्या कठीण कसोटीवर कसा कस लागेल? एक गोष्ट आठवते- ‘प्रभाते तैलदीपं ज्वालयति’ अशा अर्थाचे सुभाषित होते. म्हणजे पहाटे तेलाचा दिवा लावून अभ्यासाला बसावे. आज जर ‘मार्तंडराव’ म्हणाले की, ‘मुला, बंद कर ती ट्युबलाईट आणि तेलाचा दिवा लावून बस अभ्यासाला’, तर मग दिवेच लागतील. म्हणून त्यातला ‘तेलाचा दिवा’ हा युगानुकूल परिवर्तनाचा भाग झाला. हे समजून हिंदुत्वाचे अनुसरण केले पाहिजे.

तालिबान, लादेन, फतवे असोत की अमेरिकेत झालेला कुराण जाळण्याचा प्रकार असो, सार्कोझींचा दडपण्याचा प्रयत्न असो की वर्ल्ड ट्रेड सेंटर ला दिलेली धडक असो ही सर्व असहिष्णुतेची उदाहरणे आहेत. जगभरात सांप्रदायिक असहिष्णुता डोकं वर काढत असताना हिंदुत्वाकडून जगाच्या (विचारी माणसांच्या, अभ्यासू लोकांच्या) आशा आहेत. विश्वबंधुत्वाचा आणि मानवी जीवन उन्नत बनवणारा (आयुर्वेद, योग, संस्कृत, संगीत इ.) हिंदुत्वाचा आशय जगात सर्वमान्य होत आहे. आपल्यालासुद्धा त्यात निर्णायक भूमिका बजावायची आहे.


अपेक्षित चित्र! "विराट सागर समाज अपना, हम सब इसके बिंदु है,
संस्कृती सब की एक चिरंतन, खून रगों में हिंदू है |"


तेव्हा ‘मार्तंडराव’, उगीच वायफळ गोष्टींत शक्ती न दवडता धर्मांतरित होणारा वनवासी, आजही असमानतेचे चटके सोसणारा दलित वर्ग, तुटणारा पूर्वांचल, धुमसणारे काश्मीर, दक्षिणेतील लव्ह-जिहाद अशा कित्येक बाबी आहेत. तेव्हा गाभाऱ्यातून बाहेर या आणि अशा वस्त्या, वाड्या, पाडे इथे मनात समरसतेचा भाव घेऊन जा आणि प्रेम द्या. स्नेहसूत्रात बांधा सर्वांना. तिथे तुम्हाला मनात सल आणि वेदना घेऊनही हिंदू म्हणून टिकून राहिलेली पण तुमची वाट बघत असलेली मंडळी दिसतील. त्यांच्या डोळ्यातली आशा संपण्याच्या आत पोहोचूया. नाहीतर उशीर होईल... 

Tuesday, April 12, 2011

जरा चुकीचे, जरा बरोबर ! अण्णा हजारे आणि आंदोलन.


आदल्या दिवशी मलिंगाला शिव्या घालून, सचिनला डोक्यावर घेऊन, दणाणा नाचून भारत झोपला होता. गादीवर आळसत पडला होता. जणू स्वर्गातून खाली भूलोकी न्याहाळावे काय चालू आहे म्हणून टी.व्ही. चा अंगाखाली आलेला रिमोट चाचपून काढला आणि टी.व्ही. चालू केला. सगळ्याच वृत्तवाहिन्यांवर कोणीतरी गांधी टोपी घातलेला एक वयस्कर ‘मराठी’ माणूस दिसायला लागला. जरा कूस बदलून ‘इंडिया’ पण ‘अटेन्शन’ मधे आला. हा स्टार माझा अथवा झी २४ तास नव्हे...अगदी गेला बाजार आयबीएन-लोकमत पण नाही. हे तर हिंदी-इंग्लिश २४ तास दळण दळणारे. पण मग कोण आहे बरं हा माणूस?

भारताने ग्लासमागे आल्याने मोठ्ठी दिसणारी सिगारेट हेरली. कालचा रिता ‘ग्लास’ बाजूला करून ती उचलली. शिलगावली. चुरगळलेली चादर बाजूला केली. समोर ठणाणा सुरूच. “अण्णा ने शुरू किया अनशन”, “जन-लोकपाल पर अडे अण्णा”, “अण्णा की चेतावनी”. चला काहीतरी ‘मॅटर’ झालेला दिसतोय! उठून निदान चहा-बिहा बघायला हवा.

इंडिया ने आपले वाढवलेले केस खाजवले. जाम डोक्यात काही शिरेना. कोण बरं हा. कधी पहिला तर नाही. पण दिल्लीत ठाण मांडून आहे आणि सगळे मिडीयावाले चिवचिवाट करतायत म्हणजे नक्कीच काहीतरी इश्यू झालाय! चला उठायलाच हवं. वेफर्स पण थोडेच उरलेत. फ्रीजमधला डाएट कोक काढून धब्कन कोचावर बूड आदळले. समोर सुरूच “अण्णा की मांग”, “सरकार पर बढा दबाव”, “Anna Hajare demands people’s participation”. ब्लॅकबेरी वर सफाईदारपणे बोटं फिरली ‘whos dis Anna yaar?!’ समोरून निमिषार्धात उत्तर ‘Donno yar, letz google it’.

तोपर्यंत दिवस बऱ्यापैकी वर चढला होता. दूध टाकणाऱ्या मुलांनी दूध टाकले होते, हातगाडीवाले वजनदार हातगाडी संथपणे ओढत पुलावर चढले होते, रस्त्याचे खोदकाम सुरु झाले होते, शेतकरी ढवळ्या-पवळ्या ला हाकारत नांगरट करत होता, सिग्नलवर लिंबू-मिरची, फुलांचे गुच्छ, पुस्तक-मासिकांचे गठ्ठे घेऊन लगबग सुरु होती, रस्ते झाडले जात होते, शांताबाई पदर खोचून भांड्यांचा ढीग घासत होती.

जंतर-मंतर वर माणसं दिसू लागली. टळटळीत दुपार झाली. कष्टकरी वर्गाने डबे उघडले, रखमा शेतावर कांदा-भाकर घेऊन गेली. इंडिया ने परत msg धाडला, ‘its sumthng biggr thn wht V thoght, letz join’. समोरून उत्तर, ‘k. b redy dwn. cming in ma car’. इंडिया ने कपाट उघडले ... कोणती जीन्स या ‘इव्हेंट’ ला सूट होईल...ठीक. आता which belt....७ पट्ट्यांमधील एकाचे भाग्य उदेले. पुढे fab India चे कडक इस्त्री केलेले काही आणि मुद्दाम थोडेसे चुरगळून तयार करून ठेवलेले काही कुडते होते. ओके. या ‘अॅजिटेशन’ ला ‘मॅच’ झाला पाहिजे ना. ती ‘--- चॅनेल’ ची बेब मलाच गाठणार. so I will be on air! कपडे करता करता मनोमन - yaar Anna is doing sumthng gret but!

भारताने चहा करून घेतला. समोर सुरूच “अण्णा का अल्टीमेटम”, “शरद पवार ने दिया इस्तीफा” ... अरे हे तर आपले राळेगणसिद्धीवाले! अण्णा हजारे. भारताच्या डोक्यात काहीतरी चमकले. त्या नादात अर्धे भिजलेले बिस्कीट कपात गळून पडले. चरफडत त्याने चमचा आणला. उद्या ऑफिसात चर्चा होणार नक्की तेव्हा आता बाहेर निघण्याची तयारी करावी लागणार हे तो समजून चुकला!

इंडियाच्या घराखाली हॉर्न वाजला. इंडिया १७ व्या मजल्यावर दोन्ही लिफ्टची बटणे दाबून वाट बघत उभा होता. एक लिफ्ट १५ वर तर एक १३ वर! हातात स्क्रोल सुरूच होते. अपडेट राहायला हवे. ‘this anna is bringing revolution’! लिफ्टमध्ये महागडा पण घुसमटणारा उंची सुवास मागे ठेऊन इंडिया गाडीत शिरला. जंतर-मंतर कडे सुसाट! ‘do u feel he wil win d battle’? ‘letz c’. जंतर-मंतर आले. घोषणाबाजी सुरु.

भारताला तर स्टेजवर कोणी हवशे-नवशे-गवशे दिसून राहिले. ‘बे हे एरवी तर त्याहिंची बाजू घेऊन भांडतेत आज काहून अण्णाले साथ करून ऱ्हायले?’ ‘मायला तो भगवी पागोटे-कफनीवाला तर लुच्चा एक नंबरी. ‘अग्नीतच प्रवेश’ करायला हवा त्याने. अण्णाला संगत करतेत!’ ते बग टी.वी.वर कोकलते. मायला सगळ्या चटक-चांदण्या, भटक-भवान्या, गॉगलवाले हिरो अण्णाला पाठिंबा देतेत. xxव्यांनो एवढी वर्षं कुठे व्हतात?  

संध्याकाळ होऊ लागली. घोषणाबाजी करून घसे सुकले होते. बिसलेरी, पेप्सी, सेवन-अप् वाहिले. कोकलून कोकलून गरज भासली कोकची. ‘letz go to McDnld’, ‘no, plz yar, Anna is on fast, V wil go 2 CCD, only cofi 2de’. ‘decide fast yaar, v hav 2 join Anna, battl isnt ovr!!’. इंडियाच्या चलाख आणि तयार मित्राने झोळीतून मेणबत्त्यांचे बॉक्स आणले होते. प्रत्येकाला वाटली गेली. कँडल मार्च निघाला. Youth is united! Fight against corruption. We are with U Anna! पुठ्ठे हलत होते! रात्र व्हायला आली. अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या. सामान्य जनता वगैरे जिंकली. इंडिया आणि मित्र घराकडे निघाले. पिझ्झा घरपोच ऑर्डर झाले.

भारत विचार करत होता, अण्णांनी कसली गॅप काढली यार..वर्ल्ड कप संपला आणि आय.पी.एल. सुरु व्हायच्या मधल्या वेळात. मिडिया तर ब्लँक होती चिंतेत. साला मिडीयाला पण मसाला मिळाला. नाहीतर कुठे कळणार होतं काय जजंतरम्-ममंतरम् चालू आहे ते. ड्राफ्ट कमिटीत समावेश झाला पण कोणाचा? इतक्या सहजगत्या? बेदी कुठे राहिल्या? २-२ ‘आभूषणं’ काय करतायत? की पुन्हा एकदा तोच अदृश्य ‘हात’ या सर्व बाहुल्या सफाईदारपणे नाचवणारा? असो. झालं ते काहीतरी सॉलिडच झालं. आता हा कायदा आला की नंदनवन म्हणतात ते हेच होणार! चंदूच्या वेळी डोनेशन द्यावं लागलं, आता श्रद्धाच्या वेळी नाही द्यावं लागणार. कायदा येतोय ना! आई गेल्यावर पाण्याचा मीटर नावावर करायला वॉर्डात---...जाउदे. आता तसं नाही व्हायचं. कायदा येतोय ना! शिक्षणसम्राट झाले, साखर कारखाने होतेच, त्यांच्या वाईनरीज उघडल्या. पण उद्या बंद होणार हे सर्व. कायदा येतोय ना! पोलिसाला पावती फाडायलाच लागणार, चहापाण्यावर नाही चालायचं. कायदा येतोय ना! आर्.टी.ओ. स्वच्छ होणार. कायदा येतोय ना! भारत हर्षवायूने वेडा व्हायची पाळी आली. हे स्वप्न बघता बघता दिवसभराच्या श्रमाने तो कधी झोपून गेला त्याचं त्यालाच कळलं नाही. झोप आलीये की ग्लानी आली हेही समजण्याएवढे त्राण त्याच्यात राहिले नव्हते! रस्त्यावर पिवळा प्रकाश ओकणारे दिवे लागले होते. संधिप्रकाश पसरला होता.

हातगाडीवाले चंची उघडून गावगप्पा मारत होते, खोदकाम करून पुष्ट झालेले काळेकभिन्न बाहू बाळाला घेऊन घरी चालले होते, सिग्नलवरची दिवसभराची कमाई लहान हात मोजत होते, ढवळ्या-पवळ्या ला वैरण-आंबोण टाकून धोंडीबा ओट्यावर विसावत होता, झाडू-टोपल्या एकत्र ठेऊन कामगार हात-पाय धूत होते, शांताबाई कडोसरीच्या चुरगळलेल्या नोटा पाहत होती आणि रखमा निढळाचा घाम पुसून कंदील लावत होती. 

Sunday, April 10, 2011

'Italian by birth and Catholic by baptism'

६ एप्रिल च्या DNA-Mumbai मधे १३ व्या पानावर (http://epaper.dnaindia.com/epapermain.aspx?queryed=9&eddate=4/6/2011) आलेला हा लेख. श्री. जॉन मॅकलिथन यांनी लिहिलेला हा लेख आहे. उमेदीच्या काळात हिंदूविरोध करून आता उतारवयात काही गोष्टी त्यांना पटल्यात, समजल्यात. त्यांनी मान्य केले आहे हेही नसे थोडके! ते स्वान्तःसुखाय मी भाषांतरित केले आणि मग इथे प्रकाशित केले.


जेव्हा काँग्रेस पक्षाने मला पद्मश्री पुरस्कार दिला तेव्हा मी अचंबित झालो – आजवर हा पुरस्कार मिळवणारा मी एकमेव विदेशी पत्रकार आहे. शिवाय भारतातील माझ्या ४० वर्षांच्या राजकीय वार्तांकनातून मी कायमच नेहरू घराणेशाहीवर उघड टीका करत आलेलो आहे. अलीकडेच कोणीतरी माझ्याबद्दल म्हटले की, “हा एक खडूस ब्रिटीश वार्ताहर आहे, ज्याने उतारवयात अशा देशात राहणे पसंत केले आहे ज्या देशाबद्दल त्याला कधीच आस्था नव्हती.”

ऑपरेशन ब्ल्यू स्टार पासून सुरुवात झाली. इंदिरा गांधींवर टीका करणाऱ्या फार कमी पाश्चिमात्य वार्ताहरांपैकी मी एक होतो. आणि तेव्हापासूनच मी म्हणत आलेलो आहे की सुवर्णमंदिरावरची सशस्त्र कारवाई आणि त्यानंतरचे शिखांवर झालेले अत्याचार यामुळे सर्व शिखांमध्ये एक कटुतेची भावना निर्माण झाली, जी दूर करणे आजही कठीण आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, जरी त्यावेळी हिंदू भारत बहुसंख्येने राजकीयदृष्ट्या इंदिराविरोधी होता, तरीही त्यांना न जुमानणाऱ्या अल्पसंख्यक समुदायाबद्दल (शिखांबद्दल) असलेल्या इंदिरा गांधींच्या दडपशाहीबाबत त्याने उघडपणे सहमती आणि आनंदच व्यक्त केला.

इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करून उलट माझी प्रसिद्धी वाढवायलाच मदत केली. त्यांनी मला अल्पावधीसाठी भारताबाहेर घालवून दिले खरे, पण त्यामुळे बहुसंख्य भारतीय जनता माझा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ ऐकू लागली, कारण त्यांना ते घटनांचे सुयोग्य वार्तांकन वाटत असे.

जेव्हा राजीव गांधी सत्तेवर आले तेव्हा ते राजकीय व्यवस्था बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत असं मला वाटलं, पण जुनी खोडं बदलत नाहीत हे पाहताच त्यांनी लगेच प्रयत्न सोडून दिले. श्रीलंकेतील त्यांच्या मूर्ख धाडसाबद्दल मी त्यांच्यावर टीकाही केली, पण तरीही  जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा मला वाईट वाटलं.

काश्मीरमध्ये मी खोऱ्यातील काश्मिरी मुसलमानांच्या मानवी अधिकारांच्या पायमल्लीबद्दल राजीवजी आणि त्यानंतरच्या काँग्रेस सरकारांशी अत्यंत कडवेपणाने झुंज दिली. काश्मीरच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये पाकिस्तानी सहभागाचा काहीच पुरावा भारतीय सरकारकडे नाही हे दाखवून देणारा मीच पहिला होतो. म्हणून मी दरवेळी माझ्या वार्तांकनाची सुरुवात आवर्जून अशी करत असे – “दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत असल्याचा भारताचा आरोप” किंवा “भारताच्या कब्जातील/अखत्यारीतील काश्मीरमध्ये निवडणुका”. अन्य विदेशी पत्रकारांनीसुद्धा काश्मीरबाबत हीच भाषा वापरायला सुरुवात केली आणि ते नेहमीच मुसलमानांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल बोलत असत, पण ज्यांना त्यांच्या वंशपरंपरागत भूमीतून केवळ दहशत पसरवून हाकलून देण्यात आले होते, त्या ४,००,००० हिंदूंबद्दल ते कधीच बोलले नाहीत. (मीसुद्धा त्याबाबत मौनच बाळगले.)

राजीव गांधीच्या पत्नी म्हणून सोनिया गांधींबद्दल मी कधीच विचार केला नव्हता, पण त्यांच्या मृत्युनंतर सोनियांनी ज्या तऱ्हेने काँग्रेसवर आपली हुकुमत गाजवायला सुरुवात केली ते पाहून मला काळजी वाटली, त्यामुळे मला माझ्या नेहरू घराणेशाहीवरील वार्तांकनांमध्ये  म्हणावे लागले : “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा एकाच कुटुंबावर अवलंबून राहावा हे दुःखदायक आहे; एका राष्ट्रीय पक्षाची एका व्यक्तीसमोर पत्करलेली संपूर्ण शरणागती खेदजनक आहे. प्रश्न हा आहे की : पंतप्रधानपदासाठी आपली उमेदवारी सिद्ध करण्यासाठी सोनिया गांधींकडे काय आहे? देश चालवणे हे एखादी कंपनी चालवण्यापेक्षा खूप अधिक गुंतागुंतीचे आहे. कोणत्याही व्यवसायात आधी शिकाऊ म्हणून उमेदवारी करणे गरजेचे असते – राजकारणात तर जास्तच गरजेचे”. या उद्गारांबद्दल सोनिया गांधी नाराज झाल्याचे मी ऐकले.

पुढे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलामांनी त्यांना सांगितले की, त्यांनी त्यांचा इटालियन व भारतीय असे दोन्ही पासपोर्ट्स बराच काळ ठेवले आहेत ज्यामुळे भारताच्या पंतप्रधानपदापासून त्यांना वंचित राहावे लागले. परंतु त्या पडद्यामागे भारताच्या सर्वोच्च नेत्या झाल्या. मी त्यावेळी उद्गारलो : “अत्यवस्थ आणि नेतृत्वहीन काँग्रेसने जन्माने इटालियन आणि बाप्तिस्म्याने रोमन कॅथोलिक असलेल्या सोनिया गांधींशी स्वतःला जोडून घेतले आहे.” या वक्तव्यासाठी त्यांनी मला कधीच माफ केले नाही. आज मी यत्किंचितही संदेह न बाळगता म्हणू शकतो की, “जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा काँग्रेस आणि भारत या दोन्हीवर त्यांनी अधिराज्य गाजवलेला काळ हे एक अंधारयुग म्हणून नमूद केले जाईल, प्रचंड भ्रष्टाचाराचे आणि अगदी हुकुमशाही नाही तरी एकाधिकारशाहीकडे झुकणाऱ्या लोकशाहीचे आणि अभारतीय पण माझ्यासारख्या धर्माने ख्रिश्चन असणाऱ्या व्यक्तीच्या हातात एकवटलेले. नुकतेच विकीलीक्सने दाखवून दिल्याप्रमाणे बोफोर्सपासून २-जी पर्यंतच्या घोटाळ्यातील (त्या) मुख्य लाभार्थी असल्याचे सत्यही बाहेर येईल, ज्या लाभाचा वापर त्या मतं विकत घेण्यासाठी करतात.

मला एका गोष्टीचं अनेकदा खूप आश्चर्य वाटतं की भारतीय- हिंदू, माफ करा पण या देशातील बहुसंख्य बुद्धिजीवी हिंदू आहेत – मी माझ्या ऐन उमेदीच्या काळात या देशातील ८५० दशलक्ष हिंदूंवर आणि जगभरातील अब्जावधी हिंदूंवर कडवी टीका करूनही माझ्यावर ते खूपच प्रेम करतात!

आज मला पश्चात्ताप होतो. मला खरोखरंच असं वाटतं की भारताला अभिमानाने असं म्हणता आलं पाहिजे की “हो, आमच्या सभ्यतेचा पाया हिंदू आहे.” हिंदुत्वाचे गुणविशेष आणि प्रदीर्घ काळ टिकून राहण्याचे मुख्य कारण म्हणजे ते उभे राहून भांडत नाही. ते बदल स्वीकारते आणि आधुनिक होते आणि शोषून घेते – हाच खरा शास्त्रशुद्ध आणि योग्य मार्ग आहे. मला विश्वास वाटतो की हिंदूधर्म हा या सहस्त्रकाचा धर्म ठरेल कारण तो स्वतःला बदलांशी जुळवून घेतो.  
_______________________________________________________________________

मूळ लेखक : जॉन मॅकलिथन. मुक्त अनुवाद : विक्रम नरेंद्र वालावलकर.