"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Saturday, April 14, 2012

बिहार दिन : आईये मेहरबां, बैठिये जानेजां...

गुप्तहेर श्रीयुत बंडू यांनी मध्यंतरी एक फोनवरील संभाषण टॅप केले आहे. बंडू आमचे खासे असल्याने आम्हांस त्यांनी ते ऐकवले. आणि आपण सर्वच आमचे खासे असल्याने आपणांस ते ऐकवण्यावाचून आम्हांस राहवले नाही!
प्रस्तुत कॉल हा इये मुंबईचिये नगरीतून थेट बिहार प्रांती लावण्यात आला होता!
Smiling Old Man (SOM) and Angry Young Man (AYM)
दोन टोकांकडून बोलणाऱ्या माणसांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी बंडू यांनी संकेतशब्द वापरले आहेत. फोन लावणारी व्यक्ती म्हणजे Angry Young Man (AYM) आणि दुसरी व्यक्ती Smiling Old Man (SOM). तेव्हा आपले डोके थोडे खाजवा आणि या व्यक्तींना ओळखा...
ट्रींSSSग ट्रींSSSग...... ट्रींSSSग ट्रींSSSग..... ट्रींSSSग (एस टी डी असल्याने दीर्घ लांब रिंगा बरं का!)
SOM : हल्लू... कौनो बोलत है ?
AYM : अरे हम वो मुंबैसे हा बोलतो है |
SOM : बोल बोल.. तोहे हमरी याद कैसन बा?
AYM : हमरीतुमरी पे आनेका वेळ हो गया ना!
SOM : का बिटवा, अबु क्या हुवा?
AYM : अबु को झब्बू दिया एक बार.. अब वो जूना हो गया ना.. पब्लिक को भी
कुछ नया मंगता!
SOM : अच्छा तब हमरी याद हुई गवा.. बोलो क्या करना है?
AYM : बिहार दिन मनाने को येवो मुंबई में..
SOM : अरे उ तो हो गया.. अब काहेका?
AYM : ना भैय्या ना.. हमरी मान तो इतवार के दिन आ जा.. हमरे पोरोंको सुट्टी रहता उस दिन!
SOM : ओ अब किसलिए?
AYM : अबे चाचा,.. (पुढे काही बोलणार इतक्यात पलीकडून)
SOM : चाचा मत बोल..चाचा मत बोल... तुम चाचा को क्या करता तुमरे मुल्क में, मैं अच्छा जानत हूं! डर लगता जी! लुच्चा बोल.. चलेगा..चाच्चा नै!
AYM : छोड़. दिल पे मत ले यार.. वो तो चलता रहता है..
SOM : बोल.
AYM : चुनाव हो गया.. अच्छा प्रदर्शन रहा मेरा..
SOM : तुभी प्रदर्शन लगाता है? तेरा भाई लगाता है न प्रदर्शन ?
AYM : वो नै रे.. चुनाव परिणाम अच्छा आया.. अभी कुछ करके पब्लिक को गरम रखना मंगता की नै? यू.पी. हो गया. अब बिहार. देखा ना कैसा समाजवादी को मुनाफा हुआ वहापे? मै भी उसका कारण. यहाँ मौका दिया की नै उनको, उनके लोगोंको सपोर्ट देने में! अब देखो तुमको भी होगा..
SOM : हं..शातीर दिमाग!
AYM : अरे क्या यार..बचपन से देखता जो आया हूँ!
SOM : ठीक. मै आता चल.. थोडा मार खाया तो ही कुछ मिलेगा यहाँ पे!
AYM : अरे तुझे कौन मारेगा..! हमरा पागल बच्चा लोग थोडा गुस्ताखी करेगा..तोडेगा फोड़ेगा..काला रंग थोडा यहाँ-वहाँ... फिर पोलिस उनको अंदर करेगा.. उनके घर जा के थोडा बसनेका! फिर देख!
SOM : और?
AYM : और क्या.. तीन-चार घंटे का होगा ये सब नाटक. फिर तू फ्री..और मै फ्री! वो अंदर किये हुवा रहेगा तीन-चार दिन अंदर.. फिर आयेगा बाहर.. केस चलेगा तीन-चार साल.. तब तक नया लड़का लोग मिलेगा ना भाय! ऐसेच हवा होता है अपना!
SOM : यार ये सीखना मंगता मेरे को.. मै तो विकास की बाते करता रहता हूँ|
AYM : मेरी मान तो ये अपना ले.. और फिर देख! विकास बिकास वो सब झूट है. वो किसको मंगता? पब्लिक को तमाशा, नौटंकी, पत्थर, पोलिस, ऐसा मसाला मंगता!
SOM : ठीक है| हम आवत है|
AYM : तोहरे स्वागत की तैय्यारी करता हूँ|
(फोन ठेऊन लगेच... “ए चला रे.. फटाके जमवा, दगड जमवा”. “पण साहेब, फटाके कशाला?” . “अरे गाढवा त्याशिवाय मी म्हणणार कसं (तर्जनीने चष्मा डोळ्यांवर सरकवत) “फटाके पुरे करा आता... मग अजून जरा वाजवायचे.. “बास रे आता”. कार्यकर्ता भावविभोर होऊन, “साहेब तुस्सी ग्रेट हो!”  
---------------------------------------------------------------------------
चहाच्या टपरीवर...
पंडितराव भैय्याजी चटपल्लीवार – काय सांगून राहिलं बे हे?
सोपानराव नानासाहेब वटवल्लीवार – तेच की रे, जुनंच तर सांगतंय. पोट्टे झाले उतावळे..कार्यक्रम नको द्यायला?
चटपल्लीवार – ह्ये बेनं बसतंय गाडीत  एशीत  अन् दितय लाऊन तंटा!
वटवल्लीवार – पोरायला बी तेच आवडतंय तर तू न् मी का त्रास करून राहिलो?
चटपल्लीवार – आरं गड्या, लुक्सान राज्याचं होतंय, देशाचं होतंय..
वटवल्लीवार – हितं कुणाला पडलीये बे? तू नगं परेशान होऊ.. होऊदे काय तो झांगडगुत्ता! ते आईस्क्रीम आलं बग की तुज्या हातावर इत्ळून..
चटपल्लीवार – व्हय की गड्या..ह्येच तर होतंय.. मायला ह्यांच्या.. हे झगडल्याचं दाखईतेत अन् आमचं काम बोंबलतंय ह्या आईस्क्रीमवाणी!
वटवल्लीवार – अक्करमाशे ह्ये.. काम ना धंदे! दंगा कराय्ले पोट्टे उदंड झाले! रिकाम्या डोक्यात ईष भरायचं अन् रिकाम्या हातात दगड द्यायचे! तपेक्षा रोजगार द्या म्हनावं रिकाम्या हाताइले.
चटपल्लीवार – चल उनात तापून राहिलो..सावली हुडकू..
वटवल्लीवार – चल बाबा. ह्येंच्या नादी लागनं म्हंजे आविष्याचा आपटीबार करन्यासारकं हाये बग!


ता.क. :- वरील वृत्त छापून होताच सकाळच्या चहा बरोबरचा ‘टाईम्स ऑफ इंडिया’ खालील बातमी घेऊन आला.. खरोखरच, बंडू तुम्ही फार चाणाक्ष आहात.. आपले स्पेशल ब्रांच मधले काम असेच सुरु ठेवा.  http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Raj-softens-calls-off-stir-against-Nitish-invite-on-Bihar-Divas/articleshow/12657788.cmsSaturday, April 7, 2012

हे सुरांनो ...


 हे सुरांनो...
जीवनाच्या अंतकाली हे सुरांनो साथ द्या,
चाललो मी दूर आता, एकदा मज हात द्या |
रंगलेल्या मैफिली अन् भंगलेल्या बैठकी,
जाहलेले सोहळे अन् छेडलेल्या बंदिशी |
श्रीफळे अन् शालजोड्या  रास त्यांची ती पहा,
मी जहालो मात्र साधन, त्या सुरांचा मान हा |
भारलेल्या त्या स्वरांनी मैफिली या गच्च भरती,
सूर ते विरता उरे जी मोजकी गर्दी अनोखी |
संपले ते सर्व आता आसनेही रिक्त झाली,
दाटला अंधार सारा आळवू द्या भैरवी |
गीत माझे ऐकणारे कोणी येथे आज नाही,
गीतसुद्धा शुष्क आहे, पूर्वीचा तो साज नाही |
सूर मजला स्पष्ट दिसतो पोहोचणे पण शक्य नाही,
कंप हा कंठास माझ्या भिवविते वार्धक्य राही |
तरीही पुन्हा एकदा मज पैलतीरी पार नेणे,
शिकविले ना केधवांही जीवनी या हार घेणे |
संपलेल्या या दिव्याला, आज पुन्हा वात द्या,
जीवनाच्या अंतकाली, हे सुरांनो साथ द्या |


                         ---विक्रम 


Sunday, April 1, 2012

पान, घोडा, भाकरी आणि सरकार.

भूदलप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी पंतप्रधानांना लिहिलेली गोपनीय चिट्ठी/पत्र फुटले आणि एका नव्याच गोष्टीला तोंड फुटले. आधीच जनरल अडचणीत आले होते ते जन्मदिनांकाच्या वादामुळे. आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी धक्कादायक विधाने केली आहेत आणि तीही देशाच्या सुरक्षेबाबत. एकूणात हा सर्व प्रकार दुःखदायक आहे. चिंताजनक सुद्धा आहे.
त्यांचे म्हणणे की भूदलाकडे असलेली शस्त्रात्रे कालबाह्य झाली आहेत. रणगाड्यांना लागणारा दारूगोळा नाही. हवाई सिद्धतेच्या ९७% कालबाह्य आहे. रात्रीच्या वेळी लागणारी (night vision devices etc.) उपकरणे नाहीत. आणि अशा अन्य अनेक भयावह गोष्टी.( http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-03-28/india/31248793_1_army-chief-vk-singh-cbi-probe-bribe-offer)

सेनाध्यक्षांप्रती कितीही आदर आम्हाला असला तरी प्रस्तुत गोष्टीत ते चुकले असंच म्हणावं लागेल. एकतर तुम्हाला फार उशिरा जाग आली.. निवृत्तीला २-३ महिने राहिले असताना. बरं ती भ्रष्टाचाराची मागणी तुम्ही कार्यभार सांभाळल्यावर लगेच झाली होती.. तेव्हाच तुम्ही बोलायला हवे होते. शिवाय मधे जन्मदिनांकाचा वाद झाला, ज्यात तुम्ही सरकारला सर्वोच्च न्यायालयात खेचलेत. आता तुम्ही राग काढत आहात असं कोणी म्हणालं तर ते चूक ठरू नये. ती चिठ्ठी तुम्ही लीक केली नसेल पण ती तुम्हाला गुप्त ठेवता आली असती नक्कीच. आणि ती जर लीक झालीच असेल तर कशी ते तुम्ही पळभरात शोधून काढून त्याचा निकाल लावता आला असता. तेव्हा त्या लीक होण्यात तुमचा सहभाग नाहीच हे खरे वाटत नाही.

पण यामुळे सरकारला स्वच्छतेचे प्रशस्तीपत्रक मिळत नाही. जनरलनी केलेले आरोप जर खरे असतील तर फार गंभीर आणि देशाच्या जीवावर बेतणारे आहेत. आणि ते खरे असण्याच्या शक्यतेलाच जास्त  वाव आहे असे आम्हाला सेनादलातील भूतपूर्व आणि वर्तमान अधिकाऱ्यांशी बोलल्यावर जाणवले. शिवाय नॉर्दन कमांड चे जनरल कमांडिंग ऑफिसर (GOC) लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक यांनीही या लाच देण्याच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे म्हटले आहे.( http://indiatoday.intoday.in/story/army-chief-general-v-k-singh-northern-command/1/182416.html). तेव्हा जनरलनी फार काही चूक केले असे वाटत नाही. देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा एक डावपेचाचा भाग असू शकतो की, प्रारंभीच कार्यभार सांभाळल्यावर बोलले असते किंवा बोलणार अशी कुणकुण जरी लागली असती तरी लगेच हकालपट्टी केली असती त्यांची. शिवाय अंतर्गत काही पावले उचलता येतात का याचीही त्यांनी चाचपणी आणि त्या दिशेने प्रयत्न केले असतील. पण जेव्हा त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला तेव्हा त्यांनी ही आखणी केली असावी. त्यांना कळून चुकले असणार की ही सरकार नावाची ढिम्म म्हैस भ्रष्टाचाराच्या चिखलातून बाहेर यायला तयारच नाही! एवढे झाल्यावरच त्यांनी हंटर उगारला असावा. कारण आता २-३ महिनेच तर राहिलेत..केले बडतर्फ तर करुद्या. देशहितासाठी बडतर्फ झालो तरी चालेल, कारण नाहीतर निष्ठेशी तडजोड केल्यासारखे होईल.  

दुसऱ्या तर्काला पुष्टी मिळणारी अजून एक बाब असू शकते ती म्हणजे, ही १४ कोटींच्या लाचेची दखल त्यांनी घेतली असेल लगेच..त्याविरुद्ध त्यांनी सरकारदरबारी धावही घेतली असेल..पण उलटपक्षी त्यांनाच सुनावण्यात आले असेल की, ‘लाच गुपचूप स्वीकारा..कारण आमचाही वाटा त्यातून यायचा आहे’. (महाराष्ट्रातील आधीचे काही मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, यांनी काय चालवले होते/आहे आपण जाणत नाही काय! जे आडात तेच पोहऱ्यात येणार) म्हणजेच केंद्रात काही फार वेगळे नसणार.. तर अशाप्रकारे जनरलना सुनावण्यात आले असेल. पण माणूस ताठ कण्याचा आणि प्रतिबद्ध असल्याने नकार दिला असणार..तेव्हा मग “थांब. सिस्टीम ला आव्हान देतोस काय! आता तुला दाखवतो”, अशा विचारातून जन्मदिनांकाचा घोळ घातला गेला असणार. जनरलची प्रतिमा डागाळावी हा उद्देश समोर ठेऊन हे प्रकरण घडले असावे.

तेव्हा तर्क विविध असले आणि सर्व शक्याशक्यतांचा खेळ असला तरी केंद्रातील सरकार ने सुरक्षेशी तडजोड केली आहे, भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि जनता हतबल आहे ही गोष्ट स्पष्ट दिसून येत आहे. सरकार बदलले पाहिजे. अर्थात भाजप अथवा भाजपप्रणित आघाडीला एवढी दीर्घकाळ सत्ता मिळाली तर तेव्हाही काही वेगळे चित्र नसेल म्हणा. कारण आजवर आपण बरेच चांगल्या शाळेतील ‘नापास’ विद्यार्थी बघितले आहेत! पण तरीही दीर्घकाळ सत्ता काँग्रेस च्या हातात राहिल्याने सध्याचे भयावह चित्र दिसते आहे. तेव्हा पान का सडले, घोडा का अडला आणि भाकरी का करपली ह्या प्रश्नांचे उत्तर मात्र एकच – फिरवले नाही म्हणून! त्यात आता सरकार ची भर पडली आहे इतकच.