"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, November 28, 2012

तुमच्या माझ्यातले - मोरेश्वर आणि मोरू

मोरेश्वर उठले. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणून त्यांनी बिछाना सोडला. अलीकडे टूथपेस्ट महाग झाल्याने त्यांनी सोसायटीतल्या कडुनिंबाच्या झाडाच्या काड्या आणायला सुरुवात केली होती. त्यातलीच एक काडी चघळत त्यांनी बायकोला चहा टाकायला सांगितला. हल्ली ते कोराच चहा पीत असत कारण वाढत्या वयातल्या मुलांना महाग झालेले दूध मिळाले पाहिजे. मग ‘गंगे च यमुने चैव’ करत थंडगार पाण्याची बादली अंगावर ओतून घेऊन ते अंग पुशीत बाहेर आले. गरम पाण्याच्या आंघोळीची एवढ्या वर्षांची सवय त्यांनी हल्ली ‘वर्षाला सहाच सिलिंडर’ म्हटल्यावर सोडून दिली होती. गीझर लावला होता पण कोळशा घोटाळ्याने वीज उत्पादन कमी झाले आणि प्रति युनिट दर मात्र वाढले. तेव्हा गीझर जळल्यापासून दुरुस्तीच्या भानगडीत ते पडलेच नाहीत. ‘प्रकृतीला बरा’ अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत कोऱ्या चहाचे कडू घोट रिचवीत ते पेपरवर नजर टाकत होते... मनाला निराश करणाऱ्या १४ बातम्या वाचल्यावर शेवटी ‘सचिनला फेरारी भेट मिळाली’ आणि ‘वर्ल्ड कपची भारत-पाक  सेमिफायनल फिक्स्ड होती’ या बातम्या वाचून निःश्वास टाकत ते उठले.

बायकोने दिलेला डबा आणि नेहमीची ब्याग सांभाळत ते कचेरीला निघाले. जिना उतरत असतानाच त्यांना महापालिकेत अभियंता असलेल्या xxx चे घर दिसले. डोळे दिपतील असे दार आणि दिवाणखान्यात भिंतीवर चिकटलेला मोठ्ठा सपाट टी.व्ही. पाहतानाच त्यांना डोकं आपटू पाहात असलेला भिंतीतून बाहेर आलेला ए.सी. चुकवावा लागला. दुसऱ्याच्या घरात पाहू नये ही बालपणीची शिकवण आठवत मोरेश्वर निघाले..

उशीर झालेला असल्याने ते टॅक्सीला हात करणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की ह्या टॅक्सीवाल्यांची भाडे आकारण्याची पद्धत सदोष आहे असे आपण सकाळीच वाचले आहे. नक्की कोणते दरपत्रक वापरायचे यात वाद आहे आणि फसवणूक होत आहे. मोरेश्वर ना वाटले की आपली नक्कीच फसवणूक होणार.. त्यातून पुढे हिंदीत भांडायचे म्हणजे ‘थांब तुमको दिखाता है, आणि शेवटी चल पुलिस के पास...’ हे सारं कठीण होऊन बसायचं. त्यापेक्षा बसने गेलेलं बरं. मग ते बस स्टॉपवर गेले तेवढ्यात त्यांना आज वाचलेली बातमी आठवली ‘बेस्ट ची भाडेवाढ – प्रवाशांत असंतोष’. त्यांनी विचार केला एक स्टॉप चालत गेलं तर जुनंच भाडं होईल ऑफिसपर्यंत..मग स्वारी चालत निघाली. मनात हाच विचार की ‘दिवसाला थोडं तरी चालावं...प्रकृतीसाठी बरं असतं ते’. स्वतःच्या मनाचं समाधान करत असताना त्यांना वरच्या xxxचा मुलगा दिसला मोटारसायकलवरून.मात्र त्याच्या कॉलेजच्या विरुद्ध दिशेने निघाला होता तो. मोरेश्वरनी विचार करणं सोडून दिलं कारण आधीच उशीर झाला होता...

चालता चालता स्टॉपवर आले तोच बस येत होती, पण ती पूर्ण खचाखच भरली होती आणि त्यामुळे कंडक्टरने न थांबवताच ती पुढे घेतली. झालं. मोरूमधला स्वाभिमान जागा झाला पण वेळ नव्हता. तेव्हा चरफडत मोरूने टॅक्सीला हात दाखवला. ‘वो अपना XX है उधर जायेंगा क्या?’ ‘नाही साहब अब टॅक्सी छोडनी है’ म्हणत टॅक्सीवाला पसार झाला. ‘फिर रुकाईच क्यूं साला’ असं मनातल्या मनात मोठ्यांदा म्हणून मोरेश्वर घड्याळाकडे पाहात पुढच्या स्टॉपकडे निघाले. पुढच्या स्टॉपवर महेश भट्ट नामक विकृताने काढलेल्या अर्धनग्न स्त्रीच्या नव्या चित्रपटाची जाहिरात झळकली होती. मोरेश्वर मनातल्या मनात लाजले आणि ‘शिंच्याला कामधंदे नाहीत’ म्हणत पुढे निघाले. चित्रपटाच्या विचाराने पावलांनी गती घेतली होती. आपल्या काळातली गार्बो आणि मन्रो आठवत मोरेश्वर पुरते लालबुंद झाले होते. कालच कथासरित्सागर आणून दिलेल्या आपल्या मुलांचे कसे होणार ह्या चिंतेने ग्रस्त होत मोरेश्वर चौथ्या स्टॉपपर्यंत पोहोचले देखील. आता एकच स्टॉप राहिला होता. झपाझप पावले टाकत त्यांनी ऑफिसला जवळ केले. सगळे आपल्या घर्मचिंब अवताराकडे पाहात असल्याची सूक्ष्म जाणीव मनात घेऊन ते स्थानापन्न झाले. टेबलावर ठेवलेल्या फाईल्सची चळत त्यांनी जवळ खेचली...

संध्याकाळी मोरेश्वर घरी निघाले. त्यांना आठवलं घरी भाजी न्यायची आहे. अर्धाच किलो कोबी हवा होता, पण हो नाही करता करता भाजीवाल्याने अख्खा आहे म्हणून पाऊणशे किलोचा गड्डा टाकलाच पिशवीत. ३ रुपयाचा मसाला दे म्हणताच ‘साहब अभी ५ रुपयेका आता है मसाला’ म्हणत त्याने पिशवीत थोडी मिरची कोथिंबीर कोंबली. ‘तुम कम देओना लेकिन ३ रुपयेकाईच देओ’ असं बाणेदारपणे आपण म्हटल्याचं समाधान वाटत असतानाच मोरूच्या कानावर शब्द आदळले, ‘अब कहां रोते हो साहब दो रुपयेके लिये’..आजूबाजूची माणसं आपल्याकडे रोखून पाहतायत आणि गालातल्या गालात हसतायत असंही मोरेश्वरला वाटलं. पुन्हा आपला मोरू झालेला त्यांनी निमूटपणे मान्य केला आणि घरचा रस्ता धरला...

बायकोकडे भाजीची पिशवी देऊन जरा कुठे ते खुर्चीत बसत होते तर बायको करवादली ‘पुन्हा जून कोबी गळ्यात मारलान् मेल्याने, आणि मिरच्या केवढ्या कमी दिल्यात..फुकट दिल्या वाटतं!” समोरच्या घरातल्या टीव्हीवर छोट्या जेरीला पिटणारा टॉम पाहून त्यांना अचानक त्यांच्या स्वयंपाकखोलीत साडी नेसलेला आणि हातात कोबी नाचवणारा टॉम दिसू लागला. मोरेश्वर स्वतःशीच हसत बसले. टी.व्ही. लावला तर कोणत्याश्या नव्या घोटाळ्याचा खुलासा चालू होता. त्यातल्या रकमेची शून्य मोजत असतानाच त्यांना आपल्याला एक डास कडकडून चावत असल्याचे लक्षात आले. गेली कित्येक वर्षे हा डास – म्हणजे ह्याचेच सातभाई – आपले रक्त शोषत असतात आणि आपण मात्र काहीच करत नाही ह्याचे आश्चर्य वाटले मोरेश्वरना. महापालिकेचे धूर फवारणी वाले येऊन गेले की ५ दिवस बघायला नको. मग पुन्हा आहेच ये रे माझ्या मागल्या. जोपर्यंत गल्लीतला कचरा साफ होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. पण मग निवडणुकांची बातमी टी.व्ही. वर पाहताच त्यांना वाटले की भारतालाही काही ‘डास’ चिकटून आहेत दशकांपासून...! त्यांनी असहाय्यपणे दुसरा चॅनेल लावला तर त्यावर सांगत होते ‘अब आयेगा प्रलय और होगा सृष्टी का विनाश’. मोरेश्वर बेहद्द खुश झाले...