"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, October 7, 2012

समाज भीषणतेचे वास्तव दर्शन : भाग - २


लहानपणी कधीतरी सर्कशीत मृत्युगोलातील चित्तथरारक कसरत पाहिल्याचे आठवते. २ मोटारसायकलस्वार त्या मृत्युगोलात अधिकच्या आकारात गोल गोल चक्र घेत असतात. अन् प्रेक्षक भयचकित होऊन तो खेळ पाहत राहतात.

मुंबईतल्या रस्त्यांवर असे मृत्युगोलातील जीवघेणे खेळ आज कित्येक जणांचे बळी घेऊन राहिले आहेत. परंतु अजूनही गांभीर्याने याचा विचार होताना दिसत नाही. हेल्मेट सक्तीचा जेवढा आग्रह पोलीस करताना दिसतात तेवढा मोटारसायकलस्वाराचं वय, लायसन्स, वेग, आवाज याबाबतीत करताना दिसत तरी नाहीत.

चारचाकी गाडी आणि दुचाकी यात सर्वात मुख्य फरक आहे तो म्हणजे ‘तोल’ सांभाळण्याचा. दुचाकी पडण्याला जास्त वाव असतो. शिवाय हेल्मेट नसेल तर डोक्याला मार लागतो अन् हेल्मेट असेल तर मान मोडण्याचा, मुरगळण्याचा संभाव असतो. तरुणाईने खरंच आपल्याला बाईक चा उपयोग किती, आवश्यकता किती अन् शौक किती याचा विचार करायला हवा.

१२ वी मध्ये शिकणारा एक स्वयंसेवक. डिझेलची ‘एन्फिल्ड’ घेऊन जेजे च्या फ्लायओव्हर वरून धडधडत चालला होता.. उतारावर तोल गेला अन् घसटत फरफटत गेला..डोक्याला जबरी मार लागून मृत झाला. त्याच्या आई वडिलांना हा खूप मोठा धक्काच होता. पण घडायचे ते घडले होते.
दुसऱ्या एका उदाहरणात २ जण चालले होते मोटारसायकलवरून. चालवणारा १२वीत अन् मागे बसलेला १०वीत. वरळी सीफेस येताच वेग घेतला १००-१२० चा. अन् काळाने झडप घातली. तोल गेला...दोघेही वाईट रीतीने फुटपाथला आपटले..१० वीतल्या मुलाचे डोके (कवटी) फुटली, चेहरा विद्रूप झाला आणि तेव्हा जो बेशुद्ध झाला तो ५ दिवस तसाच होता हॉस्पिटल मधे. आणि त्यातच निवर्तला. आई-वडिलांवर दुःखाची कुऱ्हाड. १२ वीतल्या मुलाचा खांद्यातून हात निखळला आहे, चेहरा प्रचंड सुजलाय पण सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. म्हटलं तर दोघेही अल्पवयीन. दोघांकडेही लायसन्स नाही. आणि झालेल्या गोष्टीचा फारसा अन्वयार्थ लावण्यातही काही अर्थ नाही. या वर्षभरात अशी अजून ३ उदाहरणे ऐकली. ही फार भीषण परिस्थिती आहे. पालकांनीच यावर नियंत्रण ठेवायला हवे.

बँकेतील एक बाई सांगत होत्या की त्यांच्याकडे एक माणूस आला अचानक ३५-४० हजार रुपये काढायला; जेव्हा त्याच्या खात्यात बॅलन्स फक्त लाखभर रुपयेच होता. आता बँकेतील कर्मचारी ओळखत असतात आपल्या नियमित खातेधारकांना. त्यांचे एक नातेसंबंध तयार झालेले असतात म्हणून त्या बाईंनी विचारले की काही अडचण आहे का? त्या व्यक्तीच्या कॉलेजवयीन मुलाने बाईक विकत घेण्यासाठी हट्ट धरला होता. कारण अगदी साधे सोप्पे होते..त्या मुलाच्या ‘ग्रुप’मधील सर्वांकडे मोटारसायकली होत्या! आणि हेच सार्वत्रिक चित्र आहे. कीर्ती कॉलेज, रुईया कॉलेज आणि तत्सम अन्य कॉलेजबाहेर बघा. बाईक्स ची भलीमोठी रांग असते. पूर्वी नंबरप्लेटवर ‘आई’ ‘दादा’ वगैरे लिहिलेलं असे. क्वचित ‘मी मराठा’ वगैरे. आता राजकीय पक्षाचे चट्टेरीपट्टेरी रंग दिसतात! एकमेकाची बाईक घेऊन फिरायला अन् फिरवायला नेणारी मुले दिसतील. जवळपास राहणारीच असतात..वरळी पोलीस कँप, माहीम पोलीस कॉलनी, मच्छिमार कॉलनी, दादर, बीडीडी चाळी, लालबाग-परळ इ. पण तरीही ‘गाडी’ हवीच असते. शिवाय इंधन दरवाढीचा काही फरक पडताना दिसून येत नाही. आज शिवाजी पार्कला भरधाव वेगात ‘फटफटी’ हे नाव सार्थ करत ४-४ चकरा मारणारे घनचक्कर दिसून येतात. गाडी पार्क करतानाही इंजिन चालूच. अजून एक स्टाईल म्हणजे बाईक दुकानासमोर उभी करायची चालू अवस्थेत, न्यूट्रल मधे आणि उतरून सिगारेट घेऊन पेटवून यायचं.. तोपर्यंत इंधन जळतच असतं. मग पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मोर्चात सामील व्हायला परत मोकळे!

दुचाकीला विरोध नाही. गरजेला प्रत्येकाला चालवता आलीच पाहिजे. गावाला तर ती आवश्यकता आहे. पण जीव धोक्यात घालून, प्राणांची पर्वा न करता करायला ते काही देशरक्षण नव्हे. कॉलेजात गेलेला आपला मुलगा काय करतो आहे हे कदाचित आई-वडिलांना माहितही नसेल आणि तसे लक्ष ठेवणे शक्यही नसते, परंतु आपल्या मुलाला कितीही हट्ट केला तरी बाईक घेऊ न देणे हे तर पालकांनी निष्ठुरपणाने करायला हवे अन्यथा त्याच्या भीषण परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी.

या लेखामुळे एखाददुसऱ्या पालकाने जरी आपला निर्णय बदलला आणि मुलाच्या हितासाठी बाईक न घेऊन देण्याच्या निर्णयावर ठाम राहिला तरी लेखनसार्थक झाल्यासारखे वाटेल.

या शृंखलेतील आधीचा लेख वाचण्यासाठी - http://vikramwalawalkar.blogspot.in/2012/10/blog-post.html

क्रमशः ...

Tuesday, October 2, 2012

समाज भीषणतेचे वास्तव दर्शन : भाग - १


गेल्या काही दिवसातील अनुभव हे समाज स्थितीचे दुःखद पण वास्तविक दर्शन घडवणारे होते. मन विषण्ण आणि सुन्न करणारे होते आणि म्हणूनच ते सर्वांसमोर मांडावे असे वाटले.

त्याचे शाखेत येणे बंद झाल्याने एका नववीतल्या स्वयंसेवकाच्या घरी गेलो होतो. शाखेत बोलवायला आणि हिवाळी शिबीराला येणार का ते विचारायला. तसा सुट्टीचाच कालावधी होता, घरचेही कुठे बाहेर जाणार नव्हते; पण तरी आई त्याला सोडला तयार नव्हती. खूप विचारले असता म्हणाली हा मित्रांबरोबर सिगरेट ओढतो आणि त्यामुळे त्याला हल्ली आम्ही कुठेच सोडत नाही. मलाही तो धक्काच होता. एका मोठ्या देवळात पुजारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचा हा प्रतिनिधी. सकाळ संध्याकाळ पूजा-अर्चा, पुरुषसूक्त, नियमित संध्या, सोवळे नेसून भस्म विलेपन करणारा हा असंही काही करत असेल यावर विश्वासच बसेना. मी त्याला घेऊन बाहेर गेलो. गुरुद्वाराच्या पायरीवर बसून खूप गप्पा मारल्या. त्याने खुलासा केला तो असा : “आमच्या जवळ राहणारी २ तिसरीत शिकणारी मुले आहेत. ज्यांना त्यांचे आजोबा पैसे देऊन स्वतःसाठी सिगारेट्स आणायला दुकानात पाठवतात. एक दिवस आजोबांनी सांगितलेलं नसतानाही ती मुले पैसे घेऊन स्वतःसाठी (!) सिगारेट घेऊन आली. मग एका गुप्त ठिकाणी जाऊन आम्ही ‘पहिला’ अनुभव घेतला! एक झापाचे पडीक बांधकाम होते, जे आमचा अड्डाच बनले. मग झाडाची पाने आणून त्यात भुसा भरून धुमसणाऱ्या भुशाचा ‘कश’ इ. गोष्टी सुरु झाल्या. आणि एकदा कोणीतरी बघितल्यावर घरी समजले.” तो पुढे डोळ्यांत पाणी आणत म्हणाला, “आई-बाबांना आणि आजोबांना कळले तेव्हा मला खूप वाईट वाटले. मी ती गोष्ट करत असताना वाटायचे आपण खूप काहीतरी सॉलिड करत आहोत. वर्गातली इतर सगळी मुलं तुच्छ आहेत आणि आपण हिरो आहोत असं वाटायचं. पण मी तुम्हाला वचन देतो, यापुढे कधीच आयुष्यात असं करणार नाही.” माझा कार्यभाग झाला होता. मी त्याला घरी घेऊन गेलो. घरचेही शिबिराला सोडायला तयार झाले. पण त्या तिसरीतल्या मुलांचं काय? त्यांच्या आजोबांची योग्यता काय? केवळ वयामुळे आजोबा?

पुढची २ उदाहरणे तशी समांतरच. तपशीलांचा थोडाफार फरक परंतु प्रातिनिधिक उदाहरणे. महानगरपालिकेच्या चतुर्थ वर्ग श्रेणीच्या कामगारांच्या वस्तीत एका स्वयंसेवकाचे– ‘क्ष’ चे घर. वस्ती बव्हंशी नवबौद्ध. आई ५ घरची धुणीभांडी करणारी. लहानपणापासून ‘क्ष’ स्वयंसेवक. सध्या १३ वीत. एक दिवस अचानक आईचा फोन येतो –“जरा येऊन जाल का? काम आहे”. मला २ दिवस जमत नाही.. तिसऱ्या दिवशी गेलो तर समजते, ‘क्ष’ परवाच घर सोडून गेला आहे तो अजून काही परतलेला नाही. ‘क्ष’ चा फोन लावून पाहतो तर बंद. अजून थोडी फोनाफोनी केली, त्याच्या मित्र म्हणवणाऱ्या वस्तीतील काही मित्रांना ‘प्रेमळ’ डोस दिले. पाचव्या मिन्टाला मला फोन. म्हटले तुला भेटायचे आहे. त्याचे उत्तर: आज शक्य नाही, मी लांब आहे. उद्या संध्याकाळी भेटू. मी म्हटले हरकत नाही. मी वाट पाहेन. मग एक इमोशनल मेसेज केला. त्याच्या मोबाईलवर मेसेज पाहताच मला पीसीओवरून फोन..”कुठे आहात, आत्ताच भेटायचे आहे”. भेट होते. मी गप्पा मारायला सुरुवात करतो. पाच मिनिटात तो म्हणतो, “चला घरी जाऊया”.. मी मुद्दाम थोडे खेचतो, म्हणतो “कशाला, राहा की जरा बाहेर”. त्याला राहवत नाही. मी घरी घेऊन जातो. आईवडील आश्चर्यचकित. आईच्या डोळ्याला थार नाही. ३ दिवस गायब असलेला मुलगा अर्ध्या तासात घरी. यश माझे नाही, त्या अजब बंधनाचे यश. मुख्य मुद्दा हा की, आईवडील संध्याकाळी बाहेर सोडत नाहीत. संगत वाईट असा त्यांचा संशय. दारू पिऊन येईल अशी भीती. त्याचे म्हणणे माझे मित्र चांगले. तिढा कसा सुटावा. दोन्ही पारडी तोलताना माझा जीव मेटाकुटीला. मधेमधे त्याच्या नावाने बोटं मोडणारी आजी. मामी दाताने दुधाच्या पिशवीचा कोपरा फाडून चहा टाकते. छोट्याशा खोलीत मी ठराविक दिशेने चर्चा नेण्याच्या प्रयत्नात. शेवटी ठरते काहीबाही. चहा झाल्यावर  “उद्या नक्की या” या आग्रहात मी घर सोडतो. पण सर्व घटनाक्रम माझी पाठ सोडत नाही...

कारण असाच एक दुसरा मुलगा ‘य’ संपूर्णपणे दुसऱ्या वस्तीतला. उच्चशिक्षित आईवडिलांचा. उत्तम सांपत्तिक स्थितीतला. ‘य’ १४ वीत. आई-वडील चिंतेत कारण वर्षभरापासून ‘य’ वाईट संगतीत. रात्री उशिरा घरी येणे, कधीकधी दारू पिऊन येणे. मध्यंतरी २ दिवस गायब होता. तिसऱ्या दिवशी आला. विचारल्यावर म्हणतो रत्नागिरीला होतो! मोबाईल तर विकलाच होता. पण शिवाय वडिलांकडे अजून पैशाची मागणी. त्या २ दिवसांतली मित्रांची उधारी फेडायला. विचारल्यावर उलट म्हणतो, “मला पोट नाही का? भुकेसाठी घेतले पैसे”. आई वडील चिंतादग्ध होऊन एका प्रख्यात गुप्तहेर बाईंकडे. जाणून घ्यायला की ‘य’ नक्की कोणाच्या संगतीत असतो. पैसे गेले पण संगत समजली नाही. मुलाचा फोन आल्यावर/लागल्यावर आईवडील त्या बाईंना सांगत की ‘य’ इथे असावा..त्या म्हणत माझे एजंट्स पाठवते. शोध शून्य! मग एका प्रख्यात स्तंभलेखक डॉ.मानसोपचारतज्ञाकडे. तिथेही भरमसाठ पैसा मोजून हाती काहीच नाही.

या प्रातिनिधिक उदाहरणांची खोली खूप गहन आहे. संध्याकाळी मैदानात, चौपाटीवर, बागेत तरुणांचे अनेक गट दिसतात मद्यप्राशन करताना. घरी काय होत असेल त्यांच्या? प्रकृतीचं काय? लग्नाआधी मुलीला अन् तिच्या घरच्यांना कल्पना देत असतील का? हा सगळा पैसा कुठून येतो? काहीही असलं तरी संध्याकाळी अतूट श्रद्धेने देवघरात निरांजन लावणाऱ्या त्या माउलीच्या डोळ्यातील समई कायम तेवत असते मुलाची वाट बघत...