"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Tuesday, February 26, 2013

विश्व स्वामी विवेकानंदांचे - लेखांक १.

स्वामी विवेकानंद यांचे हे १५० वे जयंती वर्ष. त्यानिमित्ताने 'श्री गजानन आशिष' या मासिकात माझी लेखमाला छापून येते आहे. तीच इथे पुनः प्रकाशित करत आहे.

विश्व स्वामी विवेकानंदांचे
स्वामी विवेकानंद म्हणताच वातावरण एकदम चैतन्यमय होऊन जाते. जगाला सद्विचार देण्यासाठी प्रचंड प्रवासाची तयारी, खडतर मार्गाचा हसतमुखाने स्वीकार, जगदुद्धाराचे भव्य स्वप्न, अदम्य उत्साह आणि अक्षय ऊर्जा म्हणजेच स्वामीजींचे जीवन.
भारतमाता ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी तर आहेच आणि तसे जगातले इतर देशही तेथे जन्म घेणाऱ्या लोकांसाठी असतात. परंतु भारत केवळ मातृभूमीचा दर्जा घेऊन थांबत नाही तर ती एक ‘पुण्यभूमी’ झालेली आहे. ‘पुण्यभूमी’ का, तर इथे अशा अनेक धर्मपरायण, कर्मशील, त्यागी पुण्यवंतांनी जन्म घेतला अन् आपल्या जीवनाचे तेवते नंदादीप उभे करून ठेवले ज्यामुळे त्या प्रकाशात भरतभू ‘पुण्यभूमी’ म्हणून उजळली गेली, नावाजली गेली. ‘ईश्वर्दर्शन आम्हाला घडले आहे, तुम्हालाही ते घडू शकेल. तुम्ही पापी नाही’ असा उद्घोष करणाऱ्या पुण्यावंतांची ही जननी.
धर्मरक्षणार्थ आहुती देणारे वीर-वीरांगना, शीलरक्षणार्थ अग्नीला कवटाळणाऱ्या पवित्र स्त्रिया, न्यायासाठी स्वतःची सत्ता-संपत्ती, कवच-कुंडले, अगदी मांससुद्धा निरिच्छपणे काढून ठेवणारे राजे, असुरनिर्दालनासाठी आपल्या हाडांचे अर्पण तात्काळ ठेवणारे ऋषी या सर्वांमुळे ‘पुण्यभूमी’ भारतमाता विश्वगुरूपदी आरूढ झाली होती. आज खेदाने ‘होती’ असेच म्हणावे लागते आहे. पण ही केवळ आजची परिस्थिती नाही. कालौघात संस्कारांचे अवमूल्यन, दायित्वाचे विस्मरण, निष्ठांची भेसळ, तत्वांची सरमिसळ अशामुळे विविध समाजसुधारक, संत यांनी वेळोवेळी प्राचीन तत्वांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. आणि या संतमालिकेतील एक म्हणजेच श्रीरामकृष्ण परमहंस.
श्रीरामकृष्णांचे जीवन हे खूप विलक्षण पण अत्यंत साधे. त्यांनी असा शिष्यपरिवार घडविला जो सूर्यापासून निघालेल्या किरणांप्रमाणे भारतभर तर पोहोचलाच पण पश्चिम जगतालाही अचंबित करून सोडता झाला. स्वामी अखंडानंद, स्वामी अभेदानंद, स्वामी निखिलानंद, स्वामी शर्वानंद, स्वामी तेजोमयानंद या आणि अशा त्यागमयी स्वामींनी ठिकठिकाणी आश्रम स्थापन केले, लोकांना ईश्वरसाधना करायला शिकवली, वेदांताचा म्हणजेच उपनिषदांचा सखोल अभ्यास करून त्यावर टीकेसहित भाषांतरे प्रकाशित केली. या श्रीरामकृष्णांच्या शिष्यपरिवारातले सर्वात गाजलेले नाव म्हणजे स्वामी विवेकानंद.
आज स्वामीजींची विशेषत्वाने आठवण करण्याचे औचित्य म्हणजे त्यांची १२ जानेवारी २०१३ रोजी असणारी १५० वी जयंती.
स्वामीजींचे विचार हे केवळ आध्यात्मिक नाहीत. ते व्यक्तित्वाच्या विविध पैलूंना घडवणारे आहेत. आत्मविश्वास भरणारे, शिवभावाने जीवसेवा करण्यास प्रवृत्त करणारे, त्यागाचे महत्व ठसवणारे आहेत. स्वामीजी ‘योद्धा संन्यासी’ होते. राष्ट्र आणि समाज यांचा विचार करता त्यावरही स्वामीजींचे विस्तृत साहित्य उपलब्ध आहे. अस्पृश्यता, जातिभेद यांचे निर्मूलन, स्त्रियांप्रती आदरयुक्त भावना, तीव्र देशभक्ती आणि प्रखर राष्ट्रवाद, विजिगीषु भावना यांचेच जागरण त्यांनी केले. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी या सर्वांचा साकल्याने विचार करायला स्वामीजींनी शिकवले. ‘तुम्ही पापी आहात. जर केवळ त्याचीच भक्ती केलीत तर ईश्वर तुमची पापे माफ करेल अन्यथा नरकात जाल’ ह्या पश्चिमी जगताच्या विचाराला छेद देत स्वामीजींनी ‘तुम्ही पापी तर नाहीच. पण तुम्ही तर अमृताचे पुत्र आहात’ असा घोष केला. त्यांच्या विचाराचे पश्चिम जगताने स्वागत केले. कित्येक ठिकाणी ‘वेदांत सोसायटीज’ स्थापन झाल्या. भगिनी निवेदितांसारखे जन्माने पाश्चात्य असलेले अनुयायीही त्यांना मिळाले. पुढे श्रीरामकृष्णांचे अनेक शिष्य योजनाबद्ध रीतीने अमेरिका, इंग्लंड इथे जाऊन वास्तव्यास राहिले आणि त्यांनी ही चळवळ पुढे नेली.
जवाहरलाल नेहरुंपासून ते वीर सावरकरांपर्यंत विविध विचारधारांच्या नेत्यांनीही स्वामीजींच्या विचारांची आवश्यकता वेळोवेळी स्वीकारली आहे. आज स्वामीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने देशभर अनेक संस्था-संघटना विविध कार्यक्रम करत आहेत. जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप पसरलेल्या आपल्या देशाला स्वामीजींच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. आजची भीषण संकटे आणि भयावह आव्हाने पाहता आपण एका सूत्रात बध्दपरिकर होऊन संघटित शक्तीच्या स्वरूपातच सामोरे गेल्यास विजयी होऊ. एकरस समाजनिर्मितीचे प्रयत्न आज व्हायला हवेत.
आबालवृद्धांची आवश्यकता डोळ्यासमोर ठेवून विविध कार्यक्रमांची योजना करावी लागेल. स्पर्धा, खेळ, चर्चा, वादविवाद, एकत्रीकरण, वाचन, साहित्य-विक्री, मनन-चिंतन ह्यातून स्वामीजींच्या विचारांचा प्रसार-प्रचार करावा लागेल. आम्ही यासाठी एका मंचाची निर्मिती केली आहे. वर्षभराच्या ह्या सर्वच कार्यक्रमात संपूर्ण समाजाचे तन-मन-धन पूर्वक योगदान लागणार आहे. हा जगन्नाथाचा रथ आपण सारे मिळून ओढूया. आपल्याला जसे जमेल तसे सहकार्य करुया. आपणही ह्या कामाबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असाल, सहभागी होऊ शकत असाल तर अवश्य संपर्क साधा.
जनसेवा ही ईश्वरभक्ती, बोध ह्यातला उमगूया,
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वां सांगूया ||