"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, June 10, 2012

हिंदू नेतृत्वावर योजनाबद्ध आक्रमण?

भारतीय प्रसारमाध्यमांच्या बाबतीत अनेकदा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. ‘पेड न्यूज’ असेल अथवा ‘स्टिंग ऑपरेशन’ ‘मीडियाचे काही खरे नाही’ असा सूर उमटत असतो. शिवाय मध्यंतरी एक इमेल मोठ्या प्रमाणावर फिरत होता, ज्यात न्यूज चॅनेल्सची मालकी खरी कोणाची आहे आणि त्यानुसार कोणत्या बातम्या किती प्रमाणात द्यायच्या हे ठरत असते असा विषय होता. आणि त्यामुळे आपल्याला चॅनेल्सवर दिसणारे चेहरे आणि बसवलेले विचारवंत हे ‘बोलके बाहुले’ आहेत. त्यांच्या हातात काहीच नसते (कागद सोडले तर!).

पण गेल्या काही वर्षांत सरकार कडून या विकाऊ प्रसारमाध्यमांच्या मदतीने एक षडयंत्र चालू असावे असा संशय येतो. समाजातील विकृती चव्हाट्यावर आणून समाजमनाला प्रबोधित करायलाच हवे. अंधश्रद्धा, घातक रुढी, भ्रष्टाचार याबाबत संप्रदाय, जाती असा भेदभाव न करता प्रसारमाध्यमांनी ते मांडायलाच हवे.

हिंदू धर्माचा कोणी एकच शीर्षस्थ नेता नाही. एक धर्मग्रंथ नाही. एकच पूजापाठ नाही. देव तर किमान तेहतीस कोटी! आणि ही अशी विविधता, मतांचे वेगळेपण हे तर हिंदुत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तेव्हा हिंदू समाजाला एकत्र करणे महाकर्मकठीण! पण तरीही असे प्रयत्न वेळोवेळी या भरतभूमीत होत राहिले आणि हिंदू, हिंदू म्हणून टिकून राहिले. या हिंदूराष्ट्राची ओळख पुसण्याचे किती प्रयत्न झाले..पण ज्याप्रमाणे ओहोटीनंतर सागराचे बलिष्ठ गर्जन पुन्हा उचंबळून येऊन किनारा भरून टाकते, त्याप्रमाणे हिंदू समाज असंख्य पीडा, अत्याचार यांना तोंड देऊन झळाळून उठला आहे.
वर्तमान समाजात काही प्रवचनकार, महाराज, बाबा, स्वामी, बापू, अम्मा, आई, देवी असे दिसतात ज्यांच्या मागे हिंदू समाजाचा फार मोठा वर्ग आहे. प्रत्येकामागे स्वतःचे असे जनसंग्रह आहेत. या सर्वांनाच वाईट म्हणण्याची आवश्यकता नाही. आणि त्यात जे वाईट आहेत त्यांना उघड केलेच पाहिजे. पण हे करत असताना केवळ हिंदू धर्म आणि हिंदू समाज यालाच लक्ष्य करण्याची आवश्यकता नाही.

आसाराम बापू – यांच्या मागे गुजरात, महाराष्ट्र या राज्यातील खूप मोठा जनसमुदाय आहे. रंगपंचमीला तर अहमदाबादच्या आश्रमात आलेले उधाण पाहण्यासारखे असते. स्वतः बापू हातात एक भलामोठा पाईप घेऊन जमलेल्या असंख्य लोकांवर पाणी उडवत असतात. ‘ऋषिप्रसाद’ या नावाने यांचे मासिक निघते. बऱ्यापैकी वाचनीय असते. ऋतूमानानुसार पौष्टिक, चविष्ट ठरतील अशा पाककृती दिलेल्या असतात. मुलांसाठी कथा, श्लोक असतात.
यांच्यावर/आश्रमावर आरोप झाले की त्यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्याला त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अजून पुढे काही झाले नाही. आरोप खरे-खोटे, कोणाला काही ठाऊक नाही. मात्र प्रतिमा मलिन झाली हे नक्की.

रामदेव बाबा  
यांच्याबद्दल सध्या भारतीय जनतेला फारच माहिती झालेली आहे. योग प्रचाराचे कार्य नेटाने केले अनेक वर्ष करून ‘पतंजली योग विद्यापीठ’ ची स्थापना केली. त्याद्वारे आयुर्वेद, वनौषधी यांना पुन्हा एकदा जनमानसात रुजवण्याचे काम केले. शेकडो ठिकाणी औषधी उत्पादने विकणारे दुकाने काढली जिथे मोफत वैद्यकीय सल्ला दिला जातो. ‘आस्था’ वाहिनीवरून दररोज सकाळी प्राणायामाचे प्रसारण. देशभर प्रवास करून हजारोंच्या संख्येची शिबिरे घेतात, ज्याला लोक भल्या पहाटे घरून सतरंज्या आणून हजेरी लावतात. आणि केवळ योग-प्राणायाम नव्हे तर त्याबरोबर राष्ट्रवादी विचारांचे प्रकटीकरण करतात. प्राणायामाचा एवढा प्रसार केला की लोक ट्रेनमधून प्रवास करताना बसून, बागेत बसून, मैदानात बसून, कट्ट्यावर बसून, डोळे मिटून पोटं हलवताना दिसतात. सामान्य स्तरावर प्राणायामाचा एवढा प्रचार होईल असे भाकितसुद्धा कुणी करू शकले नसते. हल्ली ते भ्रष्टाचारावर आणि काळ्या पैशावर घसरले आहेत. विदेशी बँकात जमा असणारे काळे धन परत आणावे म्हणून त्यांची लढाई चालू आहे. दिल्लीतल्या त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर सरकारने मध्यरात्री केलेली कारवाई कुविख्यात आहे. म्हातारे-कोतारे, महिला न बघता सरळ त्या निद्रिस्त जमावावर लाठीहल्ला चढवणाऱ्या पोलिसांना कोणाचे तसे आदेश होते हे लपून राहिलेले नाही. हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

कम्युनिस्ट पार्टीच्या वृंदा करात यांनी रामदेव बाबांच्या आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना हाताशी धरून संप घडवून आणला. बाहेर बातम्या आणवल्या की आयुर्वेदिक औषधात प्राणांच्या हाडाची पूड असते म्हणे. पुढे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (forensic lab) ते आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाले. पण नाव खराब झालेच. विक्रीवर/उत्पादनावर परिणाम झालाच. आणि त्यावेळी करात प्रभृतींची ‘कम्युनिस्ट पार्टी’ ही काँग्रेसप्रणित आघाडी सरकारचा एक महत्वाचा साथीदार होती. त्यामुळे रामदेव बाबांवर आरोप करणे हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

नरेंद्र महाराज – नरेंद्र महाराज महाराष्ट्रातील नाणीज येथे मूळ आश्रम असलेले एक पंथनेते. ह्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आज महाराष्ट्रात आहे. नरेंद्र महाराजांच्या कृपाप्रसादाने कामे होतात, आजार बरे होतात, प्रापंचिक सुख लाभते असे मानणारा मोठा भक्तगण आहे. प्रचंड गर्दी यांच्या सभांना होते. बरं ‘दारू सोडा, त्याचे वाईट परिणाम होतात’, ‘हिंदुत्वावर, आपल्या देवांवर श्रद्धा ठेवा’, ‘गायींचे रक्षण करा’, ‘धर्मांतरणाने काय दूरगामी परिणाम होणार आहेत’, ‘धर्मांतरणाचे षडयंत्र/कावा काय आहे’ हा आणि अशा प्रकारचा उपदेश ते जनसभांतून करत असतात. हे आवश्यकच कार्य आहे. ह. मो. मराठे लिखित ‘एक माणूस एक दिवस’ या पुस्तक मालिकेत एक प्रकरण नरेंद्र महाराजांवर आहे. त्यातून महाराजांची कार्यपद्धती स्पष्ट होते. ते वाचकांनी वाचणे सयुक्तिक राहील पण त्यांच्या कामाचा एक मुख्य पैलू, जो त्या ‘दिवसाच्या’ कार्यभागात ठळकपणे आलेला नाही तो म्हणजे त्यांचे परावर्तनाचे काम. परावर्तन म्हणजे जे हिंदू अन्य संप्रदायात गेले आहेत उदा. मुस्लिम अथवा ख्रिश्चन झाले आहेत त्यांना पुन्हा हिंदू करून घेणे. शिवरायांनी नेताजी पालकरच्या बाबतीत केले तसे. कारण एखादी व्यक्ती/कुटुंब जेव्हा अहिंदू होते तेव्हा त्याचे त्या कुटुंबावर, समाजावर, देशावर होणारे परिणाम गांधीजींनी आपल्या लिखाणातून स्पष्ट केले आहेत. तेव्हा हे निकडीचे काम नरेंद्र महाराज करीत असतात. आजवर हजारो हिंदूंचे अशा प्रकारे हिंदू धर्मात पुनरागमन झाले आहे. हे काम करायलाही हिंमत लागते. असे काम करणाऱ्या मसुराश्रमाच्या स्वामी श्रद्धानंदांचा एका मुस्लिम माथेफिरू युवकाने चाकू भोसकून खून केला होता हे विसरता येत नाही.

शिवाय महाराज जमलेल्या निधीतून अपंगांना चल-खुर्च्यांचे (wheel chairs) वाटप, महिलांना शिवणयंत्रे, गावांना अॅम्ब्युलन्स चे लोकार्पण अशी कामे संस्थान तर्फे करत असतात. त्यांच्या ‘धर्मक्षेत्र’ या मासिकातून त्याची सचित्र माहिती दरवेळी येत असते. शिवाय श्रीरामसेतू वाचवण्याच्या आंदोलनात ते खूप सक्रिय राहिलेले आहेत. नुकताच पुन्हा त्या विषयावर त्यांनी आपल्या मासिकात लेख लिहिला आहे. अशा कामांमुळे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस ची त्यांच्यावर वक्रदृष्टी वळती ना तरच नवल!
आता याला विरोध कसा करायचा? मग अंधश्रद्धेचं लचांड मागे लावून दिलं. अं.नि.स. तयार आहेच. सरकारी तालावर नाचून काम करणाऱ्या गैर-सरकारी संस्थांची आपल्या राज्यात-देशात काही कमी नाही. चांगल्या कामाबाबत शाबासकी देऊन मग त्यातील अनिष्ट प्रथा संपविण्याबाबत बोलणार असाल तर तुमचा हेतू शुद्ध असल्याचे स्पष्ट होईल, अथवा तुमच्यावरचे प्रश्नचिन्ह कायम राहील. नरेंद्र महाराजांना शंकराचार्य म्हणणे आम्हाला स्वतःला व्यक्तिशः पटत नाही. पण कोणी कोणाला काय म्हणावे आणि कोणात काय पहावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि वैय्यक्तिक मतांचा प्रश्न आहे, ज्याचा आम्हाला पूर्ण आदर आहे.

तेव्हा नरेंद्र महाराजांचे काम हे वाखाणण्यासारखे आहे एवढे निश्चित. त्याला विरोध करणे आणि सांप्रदायिक म्हणणे हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

अनिरुद्ध बापू – महाराष्ट्रात विशेषतः शहरी भागात बापूंचा मोठा भक्तगण आढळतो. टीका करणारेही अनेकजण आढळतात. बापूंच्या कार्यक्रमांना गर्दी तर असतेच पण त्यांच्या चांगल्या विधायक कामांनाही गर्दी असते.

बापू रामरक्षेचे पठण करायला सांगतात. आज हिंदू घरांमधून रामरक्षा हद्दपार होत असताना त्याचे पठण होणे ही आनंदाची बाब आहे. ज्या ‘विष्णुसहस्त्रनामातून’ आपल्या हिंदूंची नावे ठेवली जातात त्या विष्णुसहस्त्रनामातील एकेक नाम घेऊन त्यावर प्रवचन करतात मराठीत आणि मग साईसच्चरितावर हिंदी मध्ये प्रवचन करतात. खूप गर्दी असते. शिवाय त्यांचे २ भक्त मी जवळून पाहतो आहे. आपले काम व्यवस्थित करून फावल्या वेळात ते नामजप करत असतात. रिकाम्या वेळात सूत वळण्यासारख्या यंत्रावर काही करत असतात. हे विशेष आहे. 


बापूंच्या प्रेरणेतून ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ आणि ‘अनिरुद्धाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अशा दोन संस्था कार्यरत आहे. पुराच्या वेळेला, सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या वेळी, गणेशोत्सवात-दहीहंडीच्या वेळेला, अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाला अशा गरजेच्या वेळी हे कार्यकर्ते दिसून येतात. हे चांगले काम नाही काय? एवढे लोक आपले घर सोडून प्रशिक्षण घेऊन जर गर्दीच्या वेळी उभे राहत असतील तर बापूंनी घातलेल्या सादेला माणुसकीने ओ दिली असेच म्हणावे लागेल. परंतु हे काम पुढेच येत नाही. पुढे येतात ते आरोप-प्रत्यारोप. 

सत्यसाईबाबा – आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी गाव. सत्यसाईबाबा. चमत्कार. भक्तगण. याहीपलीकडे  त्यांच्या प्रेरणेतून चालवण्यात येणारी कित्येक कामे आहेत जी खरेतर सरकारने करायला हवी होती, पण सरकार नाकाम ठरल्याने ह्यांनी उभारली आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका, शाळा, कॉलेजेस, पेयजल सुविधा इ.
त्यांच्या चमत्कारांना विरोध असावा. पण त्यामुळे त्यांनी केलेले काम नजरेआड करता येत नाही. केवळ एक चमत्कारी बाबा म्हणून त्यांचे व्यक्तिचित्रण करणे अयोग्य आहे. प्रसारमाध्यमं सुद्धा चांगली बाजू सोडून जे नको तेच दाखवत बसतात. प्रसारमाध्यमांना चांगले दाखविण्यास कोणी बंदी केली आहे का? कोणी बंदी केली आहे? हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

श्री श्री रविशंकर – ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या नावाने आपले काम उभे करणाऱ्या श्री श्री रविशंकरांना आता सर्वजण ओळखतात. सौम्य, सोज्ज्वळ प्रतिमा असलेले हे ‘गुरुजी’, ‘आचार्य’ या नामाभिधानांनी आपल्या भक्त परिवारात प्रसिद्ध आहेत. भारतातल्या उच्चभ्रू समाजात हिंदुत्वाचे जागरण अवघड पण निकडीचे झाले होते, आजही आहे. उत्तम शिक्षण, त्यामुळे उत्तम नोकरी आणि त्यामुळे लट्ठ पगार, त्यामुळे क्लब-गाड्या-छंद असे काहीसे सुखासीन जीवन असणाऱ्या आणि पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव व स्वीकार असलेल्या घरांमध्ये आज श्री श्री पोहोचले आहेत. त्या समाजात ‘गुरुजींची’ भक्ती केली जाते.

श्री श्रीं चे काम हेसुद्धा विविध पैलूंचे आहे. भगवद्भक्ती करण्यासाठी उत्तम संगीतयोजना वापरून भजनांची/स्तोत्रांची निर्मिती यांनी केलेली आहे. शास्त्रीय संगीताला उजाळा देण्यासाठी ‘ब्रह्मनाद’ नावाने काही कार्यक्रम देशभर झाले, ज्यात लोकांनी आपापल्या ठिकाणी ठराविक रागाचा ठराविक पद्धतीने अभ्यास केला-समान पद्धतीने सराव केला आणि ज्याचे शेवटी नियत दिवशी हजारो जणांनी एकत्रित वादन केले. आमच्या आवडत्या हंसध्वनी रागातील हे सादरीकरण –कोणी म्हणेल की ह्या अशा ‘ब्रह्मनाद’ प्रकारच्या कार्यक्रमांनी काय होणार आहे? त्यापेक्षा स्वच्छता, वृक्षारोपण, मुलांना शिकवणे, आरोग्यसेवा ही समाजसेवा उपयुक्त ठरेल. पण ह्याची दुसरी बाजू अशी आहे की, एवढे लोक नियमित सरावासाठी जमत होते आपापल्या ठिकाणी, आणि मग एकत्रित वादनासाठी जमले. हा सर्व काल हे सर्वजण वाईट विचार, मत्सर, क्रोध, असत्यवचन, मदिरापान अशा आणि इतर अनिष्ट गोष्टींपासून दूर राहिले. हे चांगले कर्म नव्हे तर काय! आणि त्याचे कर्मफल मिळाल्याशिवाय राहील का? तेवढी पापाची/वाईटाची राशी कमी झाली. असेच त्यांचे नियमित ‘सत्संग’ चालतात. तरुण, कॉलेजविद्यार्थी यांच्यासाठी ‘YES plus’ नावाचा कार्यक्रम चालतो. ज्यात तरुणांना व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास यासबंधाने प्रशिक्षण दिले जाते. 
योगासने आणि सूर्यनमस्कार यांवर भर दिलेला आहे. नुकतीच त्यांनी एक मोठी ‘इव्हेंट’ केली. http://yogathon.in/  त्याचे थीम साँग (साईटवर जाताच खाली वाजू लागते) हे ज्या वर्गात त्यांचे काम अभिप्रेत आहे त्याला अगदी साजेसे असे आणि अपीलिंग होते! स्वतः श्री श्री देशभर फिरून कार्यक्रम घेत असतात.
येणाऱ्या काळात श्री श्रीं वर आरोप होण्याची शक्यता आहे. त्यात त्यांची कसोटी तर लागणारच आहे, पण त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या वर्गाची/भक्तगणाचीही त्यानिमित्ताने परीक्षाच जणू होणार आहे. येणारा काळच चित्र स्पष्ट करेल..

माता अमृतानंदमयी तथा अम्मा – तामिळनाडू मध्ये अम्मांचा भक्तगण आढळतो. मुंबईसारख्या शहरातही अम्मांचा कार्यक्रम अलोट गर्दीमध्ये पार पडतो. दाक्षिणात्य जनतेमध्ये अम्मांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांनी सुद्धा शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ स्थापन केले आहे. पण कितीजणांना ते ठाऊक असेल कल्पना नाही. पण यांच्याविरुद्धही एका ब्लॉगवर लेखन आढळले मध्यंतरी. अजून त्यामानाने तशी टीका नाही होत अम्मांवर.
असे अजून कित्येक आहेत पूज्य मोरारी बापू, श्री. रमेशभाई ओझा, स्वामी महामंडलेश्वर इ. वरील सर्वांवर आरोप होतात असं नाही. पण कित्येकांवर झाले आहेत आणि काहीजणांवर निकटच्या भविष्यात अपेक्षित आहेत. म्हणून वानगीदाखल काहीजणांचा उल्लेख या लेखात केला आहे.


अहिंदू समाजातील आवश्यक बदल – 
मुस्लिम – अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीती हिंदू समाज सोडल्यास अन्य संप्रदायात नाहीत काय? ३ वेळा ‘तलाक’ उच्चारण करताच घटस्फोट मिळतो, आधुनिक विज्ञान-गणित यापासून वेगळे केवळ एकांगी असे मदरसा शिक्षण द्यायचे, आपल्या खाजगी तीर्थयात्रेसाठी सरकारकडून निधी घ्यायचा, येथील हिंदू समाजाला प्रिय असणाऱ्या गोवंशावर सुरा फिरवायचा, समान नागरी कायद्याला विरोध करायचा, वंदे मातरम म्हणायचे नाही या गोष्टी बदलायला नकोत का? (http://vikramwalawalkar.blogspot.in/2011/06/blog-post.html) नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षांत क्रमबद्ध रीतीने हज अनुदान संपुष्टात आण असे निकालपत्र दिले आहे. पण तरीही नवीन हज हाऊस चे बांधकाम, निधी वितरण जोरात सुरु आहे. शासन का गुढगे टेकते आहे? मुंबई ला एक हज हाऊस आहेच खूप वर्षांपासून. नुकतेच नागपूर ला एक बांधून झाले. आता संभाजीनगर (औरंगाबाद) ला नव्या हज हाऊस चे बांधकाम सुरु आहे. एरवी तुमच्याकडे निधी नाही शिक्षणासाठी, ग्रामविकासासाठी, एस.टी. साठी, सिंचनासाठी, विद्युतनिर्मितीसाठी. मग इथे का उडवता पैसा?

ख्रिश्चन – वनवासींना आमिषे दाखवून ख्रिश्चन बनवायचे, कॉन्व्हेंट शाळांमधून टिकली-बांगड्या यांसारख्या हिंदू चिन्हांवर बंदी घालायची, पूर्वांचलातल्या ख्रिस्ती समाजात अराष्ट्रीय विचारांचे रोपण करून त्याला चालना द्यायची, आजारी लोकांना येशू हाच तारणकर्ता असल्याचे भासवून भोंगळ उपचार/पाणी/ताईत यांच्या नावाखाली ख्रिश्चन बनवायचे, अपंग पाणी शिंपडताच चालू लागले, मुके बोलू लागले, बहिरे ऐकू लागले अशा जाहिराती करून ख्रिस्ती प्रसार करायचा या गोष्टी थांबायला नकोत का? http://christianaggression.org/

ही अंधश्रद्धा नाही का? त्याचे ‘निर्मूलन’ करावे असे कोणत्या समितीला वाटत नाही का? एरवी कोणी चर्चमध्ये जायला, बायबल वाचायला, त्याचे गुणगान गायला आमचा विरोध नाही. किंबहुना आम्हीच ‘सर्मन ऑन द माउंट’ श्रद्धेने वाचतो. त्यात आम्हाला आमचे हिंदुत्व आड येत नाही. परंतु तुम्ही जर धर्माची विक्री करत असाल तर आमचा विरोध हा राहणारच.

तेव्हा या अशा सर्व गोष्टींकडे काणाडोळा करून जर हिंदू धर्माच्या नेतृत्वाला लक्ष्य केले जात असेल तर तो षडयंत्राचा भाग नव्हे काय? आता स्वामी नित्यानंद आणि तत्सम लोकांना उघडे केल्याबद्दल धन्यवादच द्यायला हवेत. पण अन्य बाबतीत आम्हाला एका मोठ्या कारस्थानाचा भाग वाटतो आणि म्हणून तो लिखाणातून प्रकट करावा असं वाटलं..