"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, October 9, 2009

वनवासी कल्याण आश्रम

भारतामध्ये शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येबरोबरच एक मोठा वर्ग आज गिरिकन्दरी राहतो आहे. वाहतूक व्यवस्था तर नाहीच परंतु मानवी जीवन सुसह्य बनविणार्या कोणत्याच यांत्रिक वस्तू नाहीत. प्राथमिक वैद्यकीय व्यवस्था, औषधे, कपडे यांचा अभाव आणि शिक्षण वगैरे तर दूरच. अशा आदिम अवस्थेत राहणारा हा वर्ग भारतात 'आदिवासी' म्हणून ओळखला जातो. गिरिशिखरी राहून कंदमुळं, फळं अशा गोष्टी खाऊन काबाडकष्ट करून उपजीविका चालविणारा आणि कधी बाह्य जगाशी संबंध आलाच तर बव्हंशी फसवला आणि नाडला जाणारा समाज!

आधी या समाजाला 'आदिवासी' म्हणणेच चूक आहे. कोण आधी कोण नंतर राहावयास आले, असा विचार केला तर मग शहरातीलही बरेचजण 'आदिवासी' होतील! म्हणूनच शहरवासी, ग्रामवासी ह्याप्रमाणे वनात राहणारे ते 'वनवासी'. त्यामुळे 'आदिवासी' या शब्दाऐवजी 'वनवासी' शब्दच आपण वापरला पाहिजे. जेव्हा या वनवासी बांधवांचा विकास होईल तेव्हा समग्र समाजाच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वाच्या जवळ जाईल, कारण हा समाज पोहोचायला खूप कठीण आहे आणि म्हणून अंतिम घटकांपैकी एक आहे.

वनवासी हे निसर्गपूजक आहेत. वृक्ष, नाग, सूर्य, नदी ह्यांना ते देवता मानतात. त्यादृष्टीने ते पूर्णपणे हिंदूच आहेत. परंतु ’तुम्ही हिंदू आहात’ असं जाणीवपूर्वक सांगायला कोणी गेलं नव्हतं. जेव्हा ख्रिश्चन मिशनरी या देशात आले आणि आपले सावज शोधू लागले तेव्हा हे वनवासी त्यांच्या नजरेतून सुटले असते तरच नवल! त्यांनी वनवासी बांधवांना सुविधा दे‌ऊ केल्या व बदल्यात ख्रिश्चन मत त्यांच्यावर लादले.

अशाप्रकारचे दुर्भाग्यपूर्ण मतपरिवर्तन सुरु असतानाच बाळासाहेब देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मध्य प्रदेशात काम करत होते. त्यांना जो प्रदेश दिला होता त्यातील जशपूर या ठिकाणी अशी उपासना पद्धतीची चाललेली विक्री त्यांनी हेरली. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची स्थापना १९५२ साली केली. वनवासी बंधूंची उन्नती आणि त्यांची मूळ उपासनापद्धती टिकवून ठेवणे ही आव्हाने समोर ठेवून वनवासी कल्याण आश्रम कामाला लागली. या कामी त्यांना जशपूरच्या राष्ट्रीय दृष्टिकोण असलेल्या महाराजांचे फार सहकार्य झाले.

हळुहळू आश्रमाचे कार्यक्षेत्र वाढू लागले. समाजातील सज्जनशक्तीचे सहकार्य लाभू लागले. आणि वनवासी कल्याण आश्रमाने एका नव्या पहाटेची निश्चिती केली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, प्रचारक, व.क.आ चे कार्यकर्ते या सर्वांमुळे आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशभरातील दुर्गम भागांमध्ये काम सुरु आहे. त्याचे संख्यात्मक विवरण पुढे दिले आहे. सद्यस्थितीत ३१५ हून अधिक जिल्ह्यांत , १०,००० हून अधिक ठिकाणी आश्रमाचे काम सुरु आहे. यात शेकडो पूर्णवेळ कार्यकर्ते समर्पित वृत्तीने काम करत आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रात पुढील प्रमाणे काम सुरु आहे-

शैक्षणिक प्रकल्प-वसतिगृहे - १९, प्राथमिक शाळा - २, माध्यमिक शाळा - २, बाल संस्कार केंद्रे - १२

लाभार्थी - १,६००

आर्थिक विकास प्रकल्प-औद्योगिक शिक्षण केंद्र - २८, शेतकी प्रकल्प - ४, बचत गट - ५५८

लाभार्थी - १६,०००

आरोग्य प्रकल्प-साप्ताहिक आरोग्य केंद्रे - ४, दैनिक केंद्रे - १, आरोग्य रक्षक - ५८६

लाभार्थी - ४,००,०००

खेलकूद केंद्रे - १५

श्रद्धा जागरण केंद्रे - ६०

एकूण प्रकल्प १,१२३

पूर्णवेळ कार्यकर्ते ८१ - ६५ पुरुष, १६ महिला.

वनवासी कल्याण आश्रमाला सहकार्य करण्यासाठी आपण या लेखाला प्रतिसाद देऊ शकता.Thursday, October 8, 2009

तरुण आहे कार्य(कर्ता) अजुनी...

बाल हे देशाचे भवितव्य असतात, तरुण हे देशाचे बलस्थान असते, तर प्रौढ अथवा ज्येष्ठ हे देशाची प्रतिष्ठा असतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने तरुणांचे महत्व ओळखले आहे. स्वामी विवेकानंदांनी तरुणांचे महत्व ओळखले होते. त्यांच्या कार्यवाहीच्या योजनेत त्यांनी तरुणालाच केंद्रस्थानी मानले होते. स्वामीजी म्हणतात, " अतुलनीय धैर्याने युक्त अनुशासित युवा शक्ती हीच देशाच्या भवितव्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. युवकांमध्ये ध्येयवाद असतो. ध्येयवादाला वास्तवात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात स्वत:ला झोकून देण्याची निर्भयता युवकांमध्ये असते. याशिवाय ध्येयाचा शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा करण्याचे मानसिक व शारीरिक बळ युवकाकडे असते. केवळ त्यांच्यातील ऊर्जेला दिशा देण्याची आवश्यकता असते. त्यांच्यासमोर योग्य आणि उदात्त ध्येय ठेवलं गेलं तर त्यावर श्रध्दा ठेवून अत्यंत उत्साहाने ते काम करू लागतात." (श्री. सिद्धाराम पाटील यांच्या ब्लॉगमधून (psiddharam.blogspot.com) साभार).

आपल्या देशातील राजकीय पक्षांनी ही युवाशक्ती ओळखली नसती तरच नवल! युवकांना पक्षात सामील करून घेण्यासाठी विद्यार्थी संघटना हे एक साधन समजले जाते. आणि युवकसुद्धा आपल्या राजकीय महत्वाकांक्षांना न्याय देण्यासाठी विद्यार्थी संघटनांचा उपयोग करून घेतात हे सर्वश्रुतच आहे.या विद्यार्थी संघटना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांची जडण-घडण याबाबत खरंच किती विचार करतात हा प्रश्नच आहे. प्रत्येक मोठ्या पक्षाची त्या पक्षाशी संलग्न अशी विद्यार्थी संघटना आज अस्तित्वात आहे. नवीन पक्षसुद्धा आपली विद्यार्थी संघटना असावी म्हणून प्रयत्नशील असतात। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थी संघटनेत सामील करून घेण्याची अहमहमिकाच लागलेली असते. त्यातून वाद आणि हाणामारीसुद्धा होते. माझ्या कॉलेज जीवनात मी या सर्वाचा साक्षीदार आहे...मूक साक्षीदार नव्हे, तर सहभागी साक्षीदार!

विद्यार्थी संघटनांमधून विद्यार्थी नेतृत्व तयार होते ही खरी गोष्ट आहे. परंतु निकोप वातावरण न राहता सध्या गोष्टीही विकोपाला जातात हेही तितकेच खरे. राजकीय पक्षांनी विद्यार्थी संघटनांना प्रोत्साहन देण्यामागे त्यांचा उद्देश स्पष्ट असतो. त्यांना एकतर जास्त विचार न करणारी, तत्पर, तडफदार अशी तयार फौज मिळत असते आणि नेतृत्वनिर्मितीही होत असते. हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीत तरुणांकडे पुरेशा प्रमाणात पैसा, वाहन, वेळ, एखादे फुटकळ पद या गोष्टी असतात. त्यामुळे असे तरुण लगेच उपलब्ध होऊ शकतात. पण कोणत्या गोष्टींसाठी ते उपलब्ध केले जातात ह्यावर विचार होतो का?

लोकसभेतील रालोआच्या पराभवाला आणि संपुआच्या विजयाला वृध्द विरुद्ध तरुण ह्याही परिमाणाचे कारण होते. परंतु रालोआने त्याला परिपक्व विरुद्ध अवखळ असे स्वरूप दिले होते. जनतेने कौल दिला. ह्यातून सर्वांनीच धडा घ्यायला हवा. नाहीतर "तरुण आहे कार्य(कर्ता) अजुनी...रालोआ निजलास का रे" असं म्हणावं लागेल. हळुहळू वृद्धत्वाकडे झुकणारे नेते शीर्षस्थ पदावर राहून संपूर्ण पक्षाला आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छित असतील तर ते कधीच साध्य होणार नाही, कारण तरूण तुर्कांना म्हातारे अर्क आपल्या मुठीत ठेवू शकत नाहीत। त्यापेक्षा योग्य वेळ येताच त्यांनी सन्मानाने उच्च पदावरून पाय उतार व्हावे आणि ‘सांगेन युक्तीच्या चार’ या भूमिकेत शिरावे. 'काँग्रेसने तरुण नेतृत्वाला संधी दिली' हे जर राहुल गांधींकडे बघून आपण म्हणणार असू तर ते चूक ठरेल कारण तो काँग्रेसच्या घराणेशाहीचा स्वाभाविक आविष्कार आहे.
परंतु तरीही संपुआने ज्योतिरादित्य सिंधिया, पायलट, अगाथा संगमा, मिलिंद देवरा अशा अनेकांना लोकसभेत जिंकून आणून एक तरुण नेतृत्वाची फळीच उभी केली आहे. यातील बहुतेकांच्या मागे त्यांच्या घराण्याचे नाव असले तरीही हे तरुण नेतृत्व आश्वासक आहे। या चौदाव्या लोकसभेतील खासदारांचे सरासरी वय ५२.७ आहे. तर २५ ते ४० या वयोगटातील सदस्यांचे प्रमाण १५% आहे जे १४व्या लोकसभेत केवळ ६.३% होते. आणि ७१ ते १०० या वयोगटातील सदस्यांचे प्रमाण ११.७% वरून केवळ ७% आले आहे. अखिल भारतीय स्तरावर झालेला हा बदल स्वागतार्ह आहे. (pic courtesy: greathindu.com)

संसदेतील या बदलाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बदल होणार का? महाराष्ट्रसुद्धा तरूण नेतृत्व पाहील का, हे विधानसभेचे निकालच सांगू शकतील. मनसे च्या स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग राजकारणात सक्रिय झाला हे मान्य करावेच लागेल. विघातक की विधायक हा वाद-प्रतिवाद करण्याचा मुद्दा होऊ शकेल, परंतु तो नंतरचा मुद्दा आहे. मनसेच्या स्थापनेतून तरुणांचे राजकीयीकरण (politicization of youth) मात्र झाले. तरुण राजकीय मुद्यांवर तावातावाने बोलू लागले, आपली मते मांडू लागले, वेळप्रसंगी शक्तिप्रदर्शन करू लागले. या तरुणांना विधायक कामांमध्ये जोडायला हवे. परंतु कदाचित तसे होताना आत्ता दिसत आहेत तेवढे तरुण दिसणार नाहीत. त्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, कारण हुल्लडबाजी करणे सोपे असते पण नि:स्वार्थ बुद्धीने काम करणे कठीण असते. त्यामुळेच प्रसिद्धीपासून लांब राहून आपले काम करत राहणार्या सामाजिक संस्थांमध्ये तरूण कमीच दिसतात. समाजकारणात नाही तर नाही, परंतु विधायक राजकारणात तरूणांची संख्या वाढली तरी चित्र समाधानकारक असेल. अन्य राजकीय पक्ष मनसेकडे जाणारा तरुण वर्ग पाहून नक्कीच धास्तावले आहेत. युवक काँग्रेस, भा.ज.यु.मो. आणि तत्सम सर्वांनाच आपल्या रणनीतीची फेररचना करावी लागणार आहे।

येणारा काळ हा भारतासाठी मोठ्या प्रमाणावर युवाशक्ती पुरविणारा असेल असे म्हटले जाते. लोकसंख्येच्या पोतानुसार (pattern) तरुणांचे प्रमाण लक्षणीय होणार आहे. त्यामुळे कार्यशक्ती तर वाढेलच, परंतु राजकीय क्षेत्रातही बदल होतील. तेव्हा त्यादृष्टीने आत्तापासून पावले उचलणारा यशस्वी ठरेल.

Wednesday, October 7, 2009

उत्तर प्रदेश च्या "पुतळाबाईसाहेब" !

'अखेर कमाई'
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
---कुसुमाग्रज.

पुतळ्यांचे राजकारण हा विषय जुनाच आहे. परंतु उत्तर प्रदेशात मायावतींनी पुतळे उभारणीचा जो सपाटा लावला आहे त्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लगावलेल्या चपराकीनंतरसुद्धा त्यांनी काम सुरूच ठेवले. महाराष्ट्रात पुतळ्यांचे राजकारण काही कमी नाही. उत्तर प्रदेश, बिहार च्या नावाने बोटे मोडणार्याँनी आपल्या राज्यातील शिवरायांच्या पुतळ्यावरून जे राजकारण सुरु आहे ते पहावे. खरंतर शिवरायांचा पुतळा समुद्रात उभारणे आणि तोही सरकार म्हणत असलेल्या उंचीचा हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक तर आहेच, परंतु अव्यवहार्य आणि शिवरायांच्या तत्त्वाला विरोधी असेच आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे आहे ते शिवरायांचा खरा इतिहास लहानपणापासून शिकवणे, वाचू देणे, अभ्यासाला लावणे. तिथे मात्र अफझलखानास वाईट दाखवण्यापासून कचरायचे, कारण काहीजणांच्या म्हणे भावना दुखावल्या जातात! ज्याने तुळजाभवानी फोडली आणि शेकडो हिंदू मंदिरांचा विध्वंस केला त्याला धर्मांध म्हणायला कचरायचे!! हा खरा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो.गेलेल्या गणमान्य व्यक्तीचे स्मरण राहावे म्हणून पुतळे उभे करणे समजू शकतो. परंतु हयात असलेल्या मुख्यमंत्र्याने करदात्यांच्या पैशातून आपलेच पुतळे उभे करायचे? उत्तर प्रदेश च्या "पुतळाबाईसाहेब" स्वतःचे पुतळे बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांच्याबरोबरीने उभे करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चाप लावायचा प्रयत्न केला आहे आणि न्यायालयाशी राजकारण करू नका असेही सुनावले आहे. पण न्यायालयाला जुमानतील तर ते राजकारणी कसले, ते तर कसलेले राजकारणी!


एकाच ठिकाणी ४ पुतळे?!?

Monday, October 5, 2009

पठतु संस्कृतम् -- वदतु संस्कृतम् |

एक सुंदर जाहिरात पाहण्यात आली. आपणही ती पाहिली असेल. 'बजाज डिस्कव्हर' या मोटार सायकलची जाहिरात. त्याच्या बर्याच जाहिराती आहेत त्यात भारतातील विविध आणि सामान्यत: अपरिचित अशा गोष्टी दाखवल्या आहेत. ह्याच मालिकेतील एक म्हणजे कर्नाटकातील 'मत्तूर' या गावात सर्वजण संस्कृत भाषेतच व्यवहार करतात. म्हणजे त्यांची बोलीभाषाच संस्कृत आहे.ही गोष्ट अथवा आश्चर्य हे बहुतेक भारतीयांना अपरिचितच होते. 'संस्कृतभारती' ही संस्था गेली कित्येक दशके संस्कृत च्या प्रचार प्रसाराला वाहून घेऊन काम करते आहे. त्यांच्या पत्रकात अशा गावांचा उल्लेख आढळतो. आणि अशा अनेक संस्था आज काम करत आहेत. परंतु हे काम चालू असतानाच दुर्दैवाने आज जगात संस्कृत चा उल्लेख 'एक मृत भाषा' (a dead language) असा केला जातो. विशेषत: इंग्रजी शब्दकोशात असा उल्लेख आढळतो. परंतु आपल्या देशातील इंग्रजाळलेल्या मानसिकतेचे लोकसुद्धा असा उल्लेख करतात. मी कॉलेजातून अनेक प्राध्यापकांना असे प्रतिपादन करताना बघितले/ऐकले आहे. गंमत म्हणजे त्याच महाविद्यालयात संस्कृत शिकवले जात असते..परंतु लॅटीन या मृतवत भाषेच्या बरोबरीने संस्कृतचे थडगे बांधण्याची कोण घाई झालेली असते! संधी मिळाली तर दोघींनाही एकाच थडग्यात पुरतील. परंतु एक आश्वासक चित्र उभे राहते आहे.

संस्कृतचा वाढता संचार ही एक आनंददायक बाब आहे. आणि नेमके हेच या जाहिरातीतून प्रतिबिंबित होतेय. आता 'बजाज डिस्कव्हर' सारख्या वेगाने हा प्रसार व्हावा म्हणून आपणच प्रयत्न करावयाचा आहे!

Sunday, October 4, 2009

'सेवाभारती'चे अभिनंदन!


जायचे दिवस आले असताना पावसाने पुरती भंबेरी उडवून दिली आहे. तीही काही जिल्ह्यांमध्ये नव्हे; तर चक्क ३ राज्यांच्या चांगल्याच प्रशस्त भागावर संकट ओढवले आहे. आपल्या राज्याचा विचार करता कोंकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सांगली, सोलापूर इत्यादी पूरपरिस्थितीत सापडला आहे.

तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे याही भागात पक्षांच्या आणि त्यांच्या मान्यवर नेत्यांच्या सभा ठरल्या होत्या. परंतु त्या सर्व त्या सर्वांनी रद्द केल्या आहेत. हे योग्यच झाले. आधीच पिचलेल्या जनतेला अजून का पिडायचे! परंतु चिंतनीय बाब ही आहे की, एकाही नेत्याला या भागाला भेट द्यावी आणि तेथे काही आपात्कालीन सेवा-व्यवस्था सुरु करावी असे अजून तरी वाटलेले नाही. महाराष्ट्राची, मराठीची चिंता वाटणारे, केंद्रात मंत्रिपदे भूषविणारे, खासदार असलेले, उभे असलेले, बसून असलेले अशा कोणाच नेत्याला चिंता वाटू नये?

गडगंज संपत्ती सांभाळणारे हे सर्व वेगळाच 'पूर' वाहवण्याच्या चिंतेत आहेत. ते असो. चालायचेच. पण मुंबईत २६ जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमध्ये आम्ही केलेले काम आठवले. प्रत्यक्ष मदत व नंतर निधी संकलन हे सर्व रा.स्व.संघाच्या प्रेरणेतून केले होते त्याची संस्मरणीय आठवण झाली. आताही अपवाद म्हणून की काय किंवा स्वाभाविक म्हणून की काय, 'सेवाभारती' ही संघ प्रेरणेतून चालणारी संस्था कामाला लागली सुद्धा आहे। नि:स्वार्थ भावनेने आणि राजकीय फायदा नसताना निरलसपणे काम करत राहणाऱ्या अशा संस्था जेवढ्या अधिक बलिष्ठ होतील तेवढेच अधिक समाजकार्य होईल!

Saturday, October 3, 2009

'वेक अप मराठी माणसा' !

'वेक अप सिद' या सिनेमाच्या चर्चेमुळे प्रसारमाध्यमे आणि ते ज्यांना मूर्ख बनवत आहेत अशा मराठी माणसाला 'वेक अप' म्हणण्याची वेळ आली आहे. या चित्रपटात म्हणे काही ठिकाणी मुंबई ऐवजी 'बॉम्बे' असा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. त्यावर काहींनी 'आंदोलनात्मक' पवित्रा घेतल्याने चित्रपट निर्मात्याने जाहीर माफी वगैरे मागितली. सर्व बातम्या-वाहिन्यांनी हे वृत्त लगेच मीठ मसाला लावून, त्या चित्रपटातील काही दृश्ये दाखवून एक रिपोर्टच बनवला आणि त्याचे प्रक्षेपण केले.

खरंतर हा इतका नगण्य विषय आहे, की यावर आंदोलन करायचीही गरज नाही. पण निवडणुकीचा काळ आहे भाऊ. संधी सोडेल कोण! पण लोकं उगाच भारावून वगैरे जातात. आपल्या अस्मितेचे संरक्षण केले गेले.

खरी आंदोलनाची गरज कुठे आहे ठाऊक आहे का? आपल्या मुंबई शहरात २ रेल्वे स्थानके आहेत ज्यांची नावे आहेत 'एल्फिन्स्टन रोड' आणि 'ग्रँट रोड'. कशी पडली ही नावे? कोण होते हे 'एल्फिन्स्टन' आणि 'ग्रँट'? हे होते २ इंग्रज
अधिकारी ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या २ स्वातंत्र्यसैनिकांना तोफेने उडवण्याचा आदेश दिला आणि तो अंमलात आणला. त्या हुतात्म्यांची नावे होती सय्यद हुसेन आणि मंगल गाडिया. आता एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज ही नावे बदलणे दूर परंतु; त्या रेल्वेस्थानकांची नावे बदलू शकलो तरी खूप. संयुक्त महाराष्ट्राचे हुतात्मे अजूनही 'रिटर्न्स' देतात हो...परंतु हे २ तसे अनामवीर काय मिळवून देतील राजकारणात? आणि म्हणूनच त्यांच्या छाताडावर अजूनही ही स्थानके दिमाखात नावे मिरवत उभी आहेत.

आता 'वेक अप सिद' च्या कालच्या नाट्यामागे काय असू शकते?!?! स्वतः चित्रपट कर्त्यानेच/निर्मात्यानेच सांगितले असावे की, मी असा वापर केला आहे. आंदोलन केल्यासारखे करा, मी लगेच 'क्षमा' मागतो. सर्व प्रसार माध्यमांतून 'मोफत' प्रसिद्धी! दोघांनाही...चित्रपटालाही आणि मराठीच्या संरक्षणासाठी उभे 'ठाकले' ल्याही सर्वांनाच! तेव्हा निवडणुकीच्या धामधुमीत जाहिरातींचे भाव कडाडलेले असताना असेही प्रकार केले जातात. आहे की नाही गंमत!

Friday, October 2, 2009

" We are responsible for what we are, and whatever we wish ourselves to be, we have the power to make ourselves. If what we are now has been the result of our own past actions, it certainly follows that whatever we wish to be in future can be produced by our present actions; so we have to know how to act. "

-Swami Vivekanand.


हे स्वामी विवेकानंदांचे माझ्या वाचनात आलेले अत्यंत तार्किक आणि सुंदर अमृतवचन आहे. मला वाटलेला त्याचा स्वैर अनुवाद : " आपण जे आहोत आणि आपण जे होऊ इच्छितो त्याला आपण स्वतःच कारणीभूत असतो, स्वतःला घडविण्याची शक्ती आपल्यातच आहे. आपण आत्ता जे आहोत तो गतकाळातील आपल्या स्वतःच्या कर्माचा (क्रियांचा) परिणाम असेल, तर त्यावरून साहजिकच हे सिद्ध होतं की आपल्याला भविष्यात जे व्हायचं आहे ते आपण आपल्या वर्तमानकाळातील कर्माने (क्रियांनी) घडवू शकतो; म्हणजे आपल्याला माहिती हवे की आपण काय करायचे आहे."

जरी हा स्वैरानुवाद जरा किचकट झाला असला तरीही हे अमृतवचन लक्षात ठेवण्यासारखे आणि सांगण्यासारखे आहे.
---------------------------------------X----------X----------X-------------------------------

आज गांधीजींची जयंती. महात्मा गांधींना नम्र अभिवादन. गांधीजींना कोणीही कितीही काहीही म्हणो परंतु मला खरोखरच गांधीजी म्हणजे एक निर्भय, सत्यप्रिय, प्रामाणिक व्यक्तिमत्व वाटतं. त्यांच्या चुका काढणं सोपं आहे. परंतु त्यांनी केलेल्या कामावर, त्यांच्या विचारावर बोलणं कठीण आहे. त्याचं साहित्य, त्यांचे विचार न वाचताच त्यांच्यावर टीका करणारे महाभाग मी पाहिले आहेत. गांधीजींचे हिंदुत्वाबाबत असलेले विचार हे अचंबित करणारे आहेत. रामनामाबाबत त्यांचे चिंतन अनोखे आहे.
त्यांचे काही विचार मला पटत नाहीत. परंतु आज गांधीजींची हेटाळणी करण्याचा जो प्रघात आहे, आणि शाळकरी मुलांनीसुद्धा काहीही न वाचता त्यांची टिंगल करण्याचा जो प्रकार आहे त्याचं वाईट वाटतं.

पुढे कधीतरी गांधीजींबद्दल सविस्तर लिहीनच. सध्या त्यांच्या जयंतीनिमित्ताने एवढेच पुरे.

Thursday, October 1, 2009

थंडोबा!

या मालिकेतील हा शेवटचा लेख. बंडोबा आणि गुंडोबा धुमाकूळ घालत असतानाच याला उत्तर देतील म्हणून प्रकर्षाने जे आठवतात ते म्हणजे 'थंडोबा'! लोकशाहीतील सर्वात महत्वाचा घटक- लोक, सामान्य जनता! शांतपणे आपला जीवनक्रम चालवणारे बहुसंख्य हे आज राजकारणापासून चार हात लांबच राहतात. निवडणुकीला मत द्यायलाही जर आपल्याला जमत नसेल तर नेत्यांवर तोंडसुख घेण्यात काहीच मतलब नाही.

हे लोक आज स्वस्थ बसून आहेत. उमेदवारांचे कर्तृत्व, त्यांचा धिंगाणा आणि त्यांची कोट्यवधींची संपत्ती पाहून मनोमन निराश, उद्विग्न होत आहेत. स.पा. च्या अबूंची अचंबित करणारी संपत्ती आहे तब्बल एक अब्ज! अशांना धडा कोण शिकवणार? आपल्या हातात बाकी काही नसले तरी 'आपटीबार' नक्कीच आहे. लहान मुलंच केवळ आपटीबार ला घाबरतात असं नाही..हे नेतेही खूप घाबरतात. पण थंडोबाच जर निराशेची चादर ओढून सुखेनैव झोपून राहणार असेल तर कुत्रं पीठ खाणारच! तेव्हा जागे व्हा. 'आपटीबार' आहेच हातात...फक्त वापर करा.

आता त्याचा वापर कुठे व कधी करायचा हे कळायला फार नाही, आपल्याच मतदारसंघातील उमेदवारांचा थोडा अभ्यास करायचा. वर्तमानपत्रांतून मतदारसंघनिहाय विश्लेषणे येतच असतात. त्यात आपले उमेदवार आणि त्यांची माहिती पाहून ठेवा.

बंडोबा आणि गुंडोबांच्या तावडीतून वाचायचे असेल तर थंडोबाला जागे व्हावेच लागेल. तेव्हा थंडोबा उठ आणि लोकशाही बळकट करण्यासाठी निराशेची चादर झटकून टाक. बघ आता तू झोपून राहिलास तर पुढे उठायाला फारच उशीर होईल. आत्ताच उन्हं चढायला लागलीयेत...