"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, November 22, 2009

जाहिरात - कशासाठी? कोणासाठी?

जाहिरातींचे विश्व हे एक मनोरंजक विश्व आहे. आपण कळत-नकळत कित्येक जाहिराती बघत असतो. मालिकांच्या मधल्या विश्रांतीत, रस्त्यावरील मोठ्या होर्डिंग्जवर, वृत्तपत्रात, रेल्वेच्या डब्यात, बस वर, भिंतीं वर वगैरे. किंबहुना या जाहिरातींमुळे माध्यमांचा फायदा होत असतो आणि किंमत कमी ठेवणे शक्य होत असते. सध्या जाहिरातींचे महत्व खूपच वाढलेले आहे. वृत्तपत्रसृष्टीत तर विनोदाने असे म्हटले जाते की जाहिराती छापून उरलेल्या जागेसाठी बातम्यांचा विचार करावा लागतो!
या सर्व जाहिराती पाहात असताना आपल्या मनात ते उत्पादन ठसत असते. आपले उत्पादन अधिकाधिक लोकांसमोर अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जावे हाच जाहिरातदारांचा प्रयत्न असतो. मालिकांच्या मधल्या जाहिराती बरेच प्रेक्षक "म्यूट" करूनच ऐकतात. पण या जाहिरातीसुद्धा मनोरंजनच असते. त्यात उपहास, विडंबन, अतिशयोक्ती अशी विनोदनिर्मितीला आवश्यक तत्त्वे असतात. त्यामुळे जाहिराती 'एन्जॉयकरणे हाही भाग होऊ शकतो.


जाहिरातींचा पगडा मुलांवर आणि एकूणच जनमानसावर असतो; त्यामुळे आपल्या जाहिरातीतून काही अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा यांचे प्रकटीकरण तर होत नाही ना याची खबरदारी घ्यावयास हवी. पीअर्स साबणाच्या जाहिरातीतून "बाबर चा मुलगा हुमायून, हुमायून चा अकबर" या निरर्थक ओळींमधून आपण कोणाची आठवण ताजी ठेवत आहोत? आपल्या भूमीवरील ते आक्रमक काही प्रात:स्मरणीय पुरुष नव्हेत! दाढीच्या फेसाची जाहिरात असो वा रेझर ची त्यात स्त्रिया हा अविभाज्य घटक असतो. किंबहुना पुरुषापेक्षा स्त्रीलाच
त्या जाहिरातीत अधिक 'दाखवले' जाते. लाईफबॉय साबणाच्या जाहिरातीत आपण पाहतो की, 'घेतली हजार कुटुंब. बिल्डिंग A मध्ये काही नाही बदललं आणि बिल्डिंग B मध्ये साबण बदलला’. आता साहाजिक विचार आहे की या एवढ्या हजार कुटुंबांवर यांनी कसं लक्ष ठेवलं असेल? तेही महिने?? आजाराला फक्त साबणाचा वापर कारणीभूत नसतो, तर खाण्यापिण्याच्या पद्धती, सवयी, पोषक आहार, व्यायाम अशा इतर अनेक गोष्टी असतात. आणि मगहेल्दी होईल सारा हिंदुस्तानअसे स्वप्नील चित्र आपल्यासमोर ठेवले जाते. कॉम्प्लानच्या जाहिरातीत एक महिला म्हणते की, मी आणि माझ्या सख्या माता कॉम्प्लानमुळे मुलं दुप्पट वेगाने वाढतात हे जाणून घेण्यासाठी भेट दिली आणि ते ठिकाण असते "डिपार्टमेंट ऑफ न्यूट्रिशन". असे डिपार्टमेंट कुठे आहे, सरकारी आहे की खाजगी आहे, ही सर्व माहिती त्यांनी दाखवावीच असं नाही, परंतु या उत्पादनांच्या मागे धावणार्या पालकांनी ते पारखून, चौकशी करून घेतले पाहिजे. कंपनीला वाटले पाहिजे की आपल्याला या गोष्टी विचारल्या जातात.


काही काही जाहिराती लक्षात राहतात. उदा. अमूलची रस्त्यावरील होर्डिंग्ज. फेविकोल च्या जाहिराती - फेविकोलच्या संपलेल्या डब्यातून दाणे टिपणार्या कोंबडीचे फुटणारे अंडे, ट्रकमधून जाणारी माणसे . हॅप्पीडेंट व्हाईटच्या जाहिरातीसुद्धा कल्पक असतात.
हत्तींचे चमकणारे दात, दिवे आणि झुंबर म्हणून दात उघडून बसलेली मुले!


ज्या जाहिरातींतून गैरसमज पसरवला जातो, अथवा ज्या चुकीचे दावे करतात, अथवा ज्या जाहिराती योग्य स्पर्धेस बाधक आहेत अशांची तक्रार आपण The Advertizing Standards Council of India या संस्थेकडे करू शकतो. त्यांची वेबसाईट www.ascionline.org ही आहे. काही जाहिरातींच्या बाबतीत आम्ही या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. योग्य वेळी त्या इथे लिहीनच. तोपर्यंत आपणसुद्धा यात सहभागी होऊन चुकीच्या जाहिरातींवर कारवाई करायला भाग पाडूया.

2 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. मलाही असंच वाटलं होतं, ती pears ची जाहिरात बघून !!!
  आणि मला वाटलाच की तुलाही ते जाणवलं असणार !!!

  मला वाटत जाहोरातीएवढं लोकांना वेडं बनवणार माध्यम दुसरं नसेल ...
  मी मध्ये एकदा आजारी असताना खूप अशक्त झालो. मी डॉक्टरांना TV वर ज्या tonic च्या जाहिराती दाखवतात, त्याबद्दल विचारलं ; तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं होतं ," ज्या वस्तूची जाहिरात 'करावी' लागते तयार नक्की काहीतरी त्रुटी असते!" ... तुझा हा लेख वाचून मला ते उद्गार आठवले !!
  अर्थात हे १०० टक्के खरं नाहे म्हणा पण त्यात तथ्य जरूर आहे
  हं आता लेखाबद्दल
  लेख प्रवाही आहे .. पण एकदम संपला असं वाटलं

  आणखी काय सांगू ? लेखाचा उत्तरार्ध आहे का ? असल्यास आवडेल

  ReplyDelete