"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Saturday, November 13, 2010

येस सर येस सर, थ्री बॅग्ज फुल!

कॉमनवेल्थ खेळांनी आपल्या देशात ‘कसलेले’ खेळाडू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आणि आता ‘आदर्श’ खेळाडू पुढे आले. टी.व्ही.वर एखादी मालिका चालू असते..आणि लेखक प्रेक्षकांना धक्के देण्याचा प्रयत्न करत असतो..भाग तर वाढतच राहतात आणि प्रेक्षक आधीचे संकट विसरून नव्याचा नव्याने विचार करायला लागतात, ते पुढचे संकट येईपर्यंतच! तसेच भारतातील भ्रष्टाचाराच्या मालिकेचे झाले आहे. नवे प्रकरण पुढे येते ते केवळ मागचे पडद्यामागे घालण्यासाठी. राजकारणाची घृणा निर्माण करण्याला राजकारणीच कारणीभूत आहेत.सेवाग्राम च्या निमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा गांधीजींच्या तत्वांना हरताळ फासल्याचे सिद्ध केले. काय तो तमाशा माणिक ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी रंगवलेला. शैले शैले न माणिक्यं’ असं म्हणतात. इथे तर जागोजागी अशी माणकं सापडतील. दिल्लीला पैसे पाठवावे लागतात म्हणे. प्रदेशाध्यक्षच असा तर बाकी काय वर्णावे! ‘येस मॅडम येस मॅडम थ्री बॅग्ज फुल’ असे बालगीत आता शाळांमधून शिकवावे लागणार आहे! 

आता आदर्श सोसायटीमध्ये कशाप्रकारे खिरापत वाटली आहे ते पुढे येतंच आहे. यात कित्येक सनदी अधिकारी सुद्धा गुंतलेले आहेत. सर्वांनी फाईल पुढे सरकविण्याचा पुरेपूर मोबदला घेतलेला आहे. वास्तविक युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना ह्या जागा देण्यात याव्यात असे धोरण ठरवून बांधलेली ही सोसायटी. त्याची कशी वासलात लावली पहा. कोंकणात तर दहशतीच्या जोरावर, विमानतळाच्या नावावर, देवस्थानच्या जागांचे नियम बदलून सर्वच प्रकारांनी जमिनी हडपण्याचे प्रकार सुरु आहेत. महाबळेश्वरची जमीन हे तर याचे प्रातिनिधिक उदाहरण. यात ‘कंट्रीसाईड’ चे नेते सहभागी आहेत. हे सर्व जनतेने विसरावे म्हणून राहुल गांधीने सिमीच्या तुलनेचे प्यादे पुढे केले. काँग्रेसचा मुख्यमंत्री हा स्वकर्तृत्वाने मुख्यमंत्री होण्याऐवजी आधीच्या मुख्यमंत्र्याने केलेल्या ‘घोटाळ्यांमुळे’च त्या पदावर आरूढ होताना दिसतो आहे.

शरद पवार तर राजकारणावर पडलेली कीड आहे. ‘राष्ट्रवादी’ या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे. काँग्रेसमधून फुटून निघणे आणि परत तिथेच पाट लावणे हा तर छंद. सोनिया इटालियन आणि हे राष्ट्रवादाला मान्य नाही, म्हणून हे निघाले बाहेर. आणि आता काय! पदराखालचे मांजर बनून उपभोग घेतायत. शेतकरी विटून गेला आहे. धान्य सडून जातं आहे. जमिनी नापीक होत आहेत. आणि हे महाशय क्रिकेट बोर्डाच्या लफड्यात रस घेताहेत. यांचे शिलेदार गुंडांच्या मांडीला मांडी लावून उरूस साजरे करतायत. आजवर कशाचेच सोयरसुतक नसलेले हे सगळे जनतेच्या पैशावर माजले आहेत. श्री.बा.रानडेंच्या ‘लेजीम’ कवितेतल्याप्रमाणे “दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले!”

पण भ्रष्टाचार ही एका पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. सत्ताच फार कमी कालावधीसाठी मिळाल्याने कमी भ्रष्टाचार झाला असे तर नव्हे? ‘साधनशुचिता’ सांगणारेसुद्धा यात मस्त रीतीने लोळत आहेत. आपले अस्तित्व हे ‘चिखल ओला असेपर्यंतच’ हे जणू शब्दशः लक्षात घेऊन चिखल कसा ओला होईल हे पाहण्यात गुंतले आहेत. अशाने कमळात भुंगे अडकत राहतील हे तर खरेच पण ‘कमळ’ सडायला वेळ लागणार नाही. किंबहुना ती प्रक्रिया कधीच सुरु झाली आहे. दिल्लीपासून डोंबिवलीतल्या गल्लीपर्यंत याचा अनुभव येतो आहे.

अन्य प्रादेशिक पक्षांचेसुद्धा यात भरीव योगदान आहे. मुंबईतील आदर्शमधे कोणाचा ‘हात’ असेलही परंतु अन्य कित्येक ठिकाणी मराठी बांधवांना मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरु आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जवळून वेध घेतला असता तिथे प्रचंड प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याचे समजले. व्यक्तिला पैसे देण्याचे दिवस संपले. या निवडणुकीत तर सरळ सोसायटीला त्यांची संख्या विचारून तितके गुणिले ठरलेले प्रमाण अशी रक्कम वाटपासाठी हातात दिल्याचे ऐकले. हा ट्रेंड नव्यानेच निर्माण झाला आहे. चाळी विकत घेऊन, टॉवर उभे करायचे आणि मग त्यात जागा घेणे मराठी माणसाला परवडते होय? मग मागल्या दराने मुंबईत परप्रांतीय आल्याची ओरड आहेच! हो अर्थात ते परप्रांतीय हे नव्हे हां...गरीब परप्रांतीय.

सगळी गुंडगिरी, धाकदपटशा, मवालीगिरी, मुजोरपणा, दहशत, मस्तवालपणा हे या ‘लोकप्रतिनिधींनी’ आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वदूर पोहोचवले आहे. मी मध्यंतरी ‘राज्य मानवाधिकार आयोगात’ काम करत असताना या सर्व बाबींचा खूप जवळून अभ्यास करायला मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले तक्रारदार, त्यांच्या तक्रारी, अनुभव हे सगळे चित्र भयावह आहे. प्रसारमाध्यमं तरी कुठे नेक राहिलीत? ‘पेड न्यूज’ ची लज्जत बऱ्याचजणांनी चाखली आहे. सापडले किती हा भाग वेगळा.


स्वतःला ‘बादशहा’ म्हणवून घ्यायचे, ‘लोकमान्य लोकशक्ती’ म्हणायचे आणि कारभार मात्र संशयास्पद करायचा. ‘सोनियांच्या कणखर नेतृत्वावर जीव ओवाळून टाकलेले’, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या ‘इंदिरांच्या सुरम्य आठवणी काढणारे’, काल्पनिक भगवा दहशतवाद निर्माण करून कोणाच्यातरी इशाऱ्यावर ‘भगव्या दहशतवादावर चवीने लिहिणारे’ हे जेव्हा पत्रकारितेचे धडे देतात, भाषणं ठोकतात तेव्हा हसू येतं. माझा महाराष्ट्र इतका रसातळाला गेला असेल याचे बाहेरून दर्शन होत नाही. बडा घर पोकळ वासा अशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे.

क्रांती वगैरे होणे किमान या दशकात तरी शक्य वाटत नाही. या घाण राजकारणाला कंटाळून चालणार नाही. सज्जनशक्तीचा सहभाग वाढायला हवा. उमेदवार म्हणून उभे राहायलाही हरकत नाही. पक्ष न पाहता योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. अपक्ष असला तरी चालेल. किंबहुना अपक्ष उमेदवार जेवढे अधिक निवडून जातील तेवढे बरे होईल. प्रारंभी घोडेबाजाराला ऊत येईल हे खरेच. पण उमेदवार चांगले असल्याने ती शक्यता कमी आणि जशी त्यांची संख्या वाढेल तसा हा बाजार कमी होईल. स्वप्निल चित्र असले तरी सुरुवात करायला हरकत नाही. ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल... 

4 comments:

 1. Mala vatat B.M.C. jagatli saglyat currupt Lsb asel.Aaj Thane jilhyat deshatlya sarvadhik mahapalika ahet pan ya sarv mahapalika kshetrtlya 50% adhik bhandhkam anidhikrut ahet.ektya Thane mahapalika kshetrat 70 bhandhkam anadhikrut ahet.Karnatakat gelya mahinyatil ghatna lajirvanya hotya.Aaaj mhatla tar MMRDA region madhye ekach kay anek ADARSH bharle ahet.

  ReplyDelete
 2. भ्रष्टाचारावर लिहलेस ते योग्यच पण राजकारणावर नको! ते ही नावे घेऊन नकोच नको असे मला वाटते !!
  आगे आपकी मर्जी !!!

  ReplyDelete
 3. nave gheu nayet. baki kamlatli keed purvajanchya doordrushtitun sutli navti. pan 'baba vakyam pramanam' manla gela nahi. karan putra pautra baba zalyanantar tyanni tyanchya babancha aikaycha sodla. aso.. tya doordrushtila pranam.

  ReplyDelete