३. चळवळीतील कार्यकर्त्याच्या मनात नेहमीच उत्साह भरलेला वाटत असला आणि त्याला तो तसा दाखवावाही लागत असला तरीसुद्धा नैराश्याचे, उद्विग्नतेचे क्षण त्याचीही सोबत करतच असतात. आणि हे प्रत्येक चळवळीत असतं; मग तो संघाचा स्वयंसेवक असो, साम्यवादी युवक असो अथवा विद्यार्थी संघटना, कामगार संघटना यांमधला कार्यकर्ता असो. हे जणू रहाटगाडगं असतं. उत्साहाने भरून वर येऊन रितं होऊन खाली जायचं असतं...नवा उत्साह भरून घेण्यासाठी.
अशाच काहीशा नैराश्यातून जात असताना निरोप मिळाला की अमुक दिवशी परमपूजनीय सुदर्शन जी सायं शाखेत येणार आहेत. तयारीला लागले सर्वजण. परमपूजनीय सरसंघचालक जी शाखेत येणार म्हणजे अहोभाग्य आणि शिवाय सोहळाच जणू. अशा अनुभवांमुळे “संघ म्हणजे एकाधिकारशाही, हुकूमशाही, फॅसिस्ट...” अशी संघबाह्य मंडळीत जी चर्चा चालते आणि आपल्या अगाध ज्ञानाचा जो प्रकाश ते पडतात त्याने करमणूकच होत असते.
तो दिवस उजाडला, निरोप सुरु होते. संध्याकाळ झाली आणि ठीक ६.२५ ला परमपूजनीय सरसंघचालकांचे आगमन झाले. शाखा लागली. दणदणीत ६५ संख्या होती. वेगवेगळे गण सुरु झाले. आणि पूजनीय सुदर्शन जी प्रत्येक गणात जाऊन थोडा-थोडा वेळ कार्यक्रम घेऊ लागले. काही गणात त्यांनी खेळ घेतले, काही ठिकाणी योग घेतले. उत्साहाचे वायुमंडल तयार झाले.
प्रार्थना होऊन शाखा सुटली. आता त्यांना गाडीपर्यंत निरोप द्यायला जायचं...तेवढ्यात एक ज्येष्ठ कार्यकर्ते मला घेऊन पुढे झाले आणि पूजनीय सुदर्शनजींना म्हणाले, “आज विक्रम का जनमदिन है |” मी पटकन पाया पडलो. मला उभे करत त्यांनी आशिर्वाद तर दिलेच पण म्हणाले, “सर्वांसाठी काही टॉफी वगैरे आणल्या की नाही?”, मी हसून धाडसाने उत्तरलो, “वाटणार होतो, पण तुम्ही आलात आणि अचानक फारच संख्या वाढली”. ते मनमोकळे हसले आणि म्हणाले, “बालांसाठी तरी आणायच्या”. मग आम्ही गाडीपर्यंत सर्वजण निघालो.
सर्व कष्टाचं, परिश्रमाचं चीज झालं त्यादिवशी! परमपूजनीय सरसंघचालक वाढदिवसाला पूर्णवेळ आपल्या शाखेत असावेत, त्यांनी प्रत्येक गणात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आशीर्वाद द्यावेत यापरते अधिक भाग्य ते कोणते!
४. संघाच्या शाखेत कोणालाच प्रतिबंध नाही. उघड्या मैदानावर चालणाऱ्या या शाखा म्हणजे समाजाचे शक्तिकेंद्र. समाज अभिसरणाचा यशस्वी प्रयोग. यात सर्व समाजगटांतले, आर्थिक स्तरातले, जातींमधले स्वयंसेवक येत असतात. राहणीमान, शाळा, भाषा, चालीरीती, वस्ती हे सर्व भिन्न...पण स्वयंसेवकत्वाची भावना आसेतुहिमाचल तीच! ते सूत्र सर्वांना गुंफणारे. आणि एकदा ते सूत्र भिनले की मग हिंदुत्वाचे म्हणजे अखिल मानवजातीला, निसर्गाला आपलेसे मानणारे विश्वबंधुत्वाचे सूत्र आपोआप येते. त्यामुळे नित्य शाखेत जर वेगळा चष्मा लावलात तर दिसेल की काही मराठी, बंगाली, गुजराती, तेलुगू, तमिळ स्वयंसेवक खेळतायत, गीतं म्हणतायत. काही ब्राह्मण, भंडारी, तेली, लोहार, माळी, मराठे, नवबौद्ध, जैन असे स्वयंसेवक उच्चरवाने प्रार्थना म्हणताहेत..पुढे यातील कित्येकजण हा विचार समजून घेऊन प्रचारक म्हणून बाहेर पडलेले आहेत, काहीजण संघाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. हे सर्वजण आपापले प्रांतिक, भाषिक, सांप्रदायिक अभिनिवेश विसरून एकत्र येत असतात.
apratim.........salya kay mast lihito re tu.............Asech lihit raha.....
ReplyDeleteMi mazya shakheche anubhav tula mail karato........