"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, October 16, 2013

वाजवा रे वाजवा...

प्रत्येक जागेची, परिसराची स्वतःची अशी ओळख असते, वैशिष्ट्य असतात. आणि तसंच त्यांचे विशिष्ट प्रश्नसुद्धा असतात. उदा. कोणाच्या जवळ चांगल्या शाळा-कॉलेजेस असतात पण विमानतळ जवळ असल्याने विमानांचा आवाज येत राहतो. तर कुणाचे घर समुद्राकाठी असल्याने नित्य समुद्रदर्शन, सागरी वारा यांचा आस्वाद घेता येतो पण खाऱ्या दमट हवेने घरातली सॉकेट्स आणि अन्य उपकरणे खराब होतात.

शिवाजी पार्क आणि परिसर ही एक नितांतसुंदर गोष्ट आहे. तिथे राहणाऱ्यांना तर हे माहितीच आहे पण बाहेरच्याही अनेकांचे तसे मत आहे. मोठे मैदान, स्वच्छ हवा, गर्द झाडी, आबालवृद्धांसाठी विविध जागा उद्याने, मुली-स्त्रिया-बालके यांच्यादृष्टीने सुरक्षित, हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन, उद्यानगणेश मंदिर, तरणतलाव, बंगाल क्लब-कालीमातेचे मंदिर, केरळी समाज, जिमखाना, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक...बघा लिहीतच राहिलो. मूळ विषयापासून थोडेसे भरकटलोच. असे सर्व प्रकारांनी युक्त असले तरी शिवाजी पार्कच्या स्वतःच्या अशा समस्याही आहेत. भटके कुत्रे, मद्यप्राशनास बसणारे लोक, आवाज, गर्दी, कचरा, खेळाडूंचा उत्साहाच्या भरात मारलेला चेंडू इ. विविध वेळी होणारी गर्दी उदा. गणेशोत्सव, ६ डिसेम्बरचा महापरिनिर्वाणदिन आणि पूर्वी होत असत त्या राजकीय सभा.

राजकीय सभांना तर खासच मजा येत असे. अटलजींची भाषणे तर मला स्पष्टपणे आठवतात. त्यांचा आवाज, ओजस्वी विचार आणि  त्या भारदस्त आवाजाचा समोरच्या इमारतींवर आपटून येणारा प्रतिध्वनी. असंख्य प्रज्वलित मने ऐकत असत ते भाषण. शिवसेनेचा दसरा मेळावा असे त्यादिवशीची संध्याकाळसुद्धा खास असे. असंख्य भगवे ध्वज वाऱ्यावर गर्वाने फडकत असत, सभेला वेळ असल्याने पूर्ण मोकळे मैदान, पोलीस बंदोबस्त आणि  वाऱ्यावर पसरणारे अजरामर सूर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’. मग हळूहळू वर्दळ वाढत जात असे. जत्थ्याने येणारे शिवसैनिक, भगव्या साड्या नेसून एकत्र येणाऱ्या महिला, मैदान भरायला सुरुवात होत असे. त्यातच कधीतरी भाषणं सुरु होत असत. काही चिरक्या, काही घोगऱ्या तर काही तारस्वरातील अशी विविध पट्टीतली भाषणं होत असत. मनोहर जोशींचे भाषण सुरु झाले की तो जणू सिग्नल असे की आता बाळासाहेब येणार. मग घरातून निघायचं...

भारदस्त आवाजात बाळासाहेबांचे भाषण सुरु होई. भाषणाआधी सुरु झालेले फटाके भाषण चालू झाले तरी फुटतच राहात. मग नाट्यमय रीतीने अंगुलीनिर्देश करत “ए बास करा ते आता”...मग एकही फटाका फुटत नसे. (अगदी तसेच हल्ली मनसेच्या सभेत होते! असो.) तर मग भाषणातून अंगार फुलवत, जोशपूर्ण हाक घालत थेट हृदयाला भिडणारे भाषण होत असे. काहीकाही शेलक्या, कमरेखालच्या टिप्पण्या ऐकायला वाईट वाटत असे. त्यातले काही तर मला अजूनही आठवतात. कानात प्राण आणून आपले ऐकणारे लाखो जण असताना त्यांच्यासमोर हीन अभिरुची ठेवणे मला पटत नसे. पण लोकांना ते आवडत असे. मला ते भाषण म्हणजे शिवसेनेच्या ‘विचारांचे सोने लुटायला या’ या जाहिरातीत उल्लेख केलेले सोने मुळीच वाटत नसे. अर्थात कोणाला किती ‘कॅरेट’ आवडेल, झेपेल, पेलेल हे प्रत्येकावर अवलंबून आहे. असो.

स्थानिक समस्या : कोणत्याही राजकीय सभेनंतर पुढचे बरेच दिवस मैदानाची अवस्था भयानक असे. एकतर स्टेज उतरवायला, मैदानात खड्डे खणून गाडलेले बांबू काढायला काही दिवस लागत असत. मग खोदलेले खड्डे, खिळे, सुतळी, दोरखंड, पत्रके, प्लास्टिकच्या पिशव्या, बसायला आणलेले वर्तमानपत्राचे कागद तसेच काही दिवस राहात असे. बकाल झालेले असे ते सुंदर शिवाजी उद्यान अभागी बलात्कारित स्त्रीप्रमाणे आपल्या जखमा बऱ्या होण्याची वाट पाहत असे. संघशाखेत खेळणाऱ्या आम्हां लहान मुलांच्या पायांना कितीवेळा खिळे, काचा, ब्लेड्स, पत्रे लागून पाय कापले आहेत त्याची गणतीच नाही. मग मंदिरात जाऊन हळद भरायची लगेच. घरी गेल्यावर टिट्यानस चं इंजक्शन घेण्यास पिटाळत असत! असो.

शांतता क्षेत्र : जेव्हा शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित झाले तेव्हा आसपासच्या नागरिकांनी निःश्वास टाकला कारण आता तिथे राजकीय सभा होऊ शकणार नव्हत्या. आवाजापासून तर मुक्तता लाभणारच होती पण कचरा, उखडलेले मैदान, दादागिरी, दोन-दोन दिवस मैदान बंद असणे यापासून मुक्तता मिळणार होती. आणि तसेच झाले. राजकीय सभा बंद झाल्या. मैदान खेळायला जास्त दिवस उपलब्ध होऊ लागले. पण हे औट घटकेचेच स्वप्न ठरले. दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिवसेना उच्च न्यायालयात गेली. म्हणजे आधी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेला अर्ज केला आणि तो पालिकेने उच्च न्यायालयाचा आदेश दाखवून नाकारला म्हणून त्याविरुद्ध सेना न्यायालयात गेली.

रामलीला बंद! : विजयादशमी च्या १० दिवसांमध्ये शिवाजी पार्काच्या एका कोपऱ्यात चालणारी रामलीला हे खासे आकर्षण असे. मोफत प्रवेश असे. स्टेजवर नाचणारे वानरगण, हनुमंत आणि मग शेवटच्या दिवशी मोठ्ठ्या रावण प्रतिकृतीचे दहन. त्यात फटाके वगैरे ठासून भरलेले असत. रामलीलेला बऱ्यापैकी गर्दी असे. रामलीला महोत्सव समिती का अशी काहीतरी संस्था वर्षानुवर्षे हे सादरीकरण करत असे. बाबांबरोबर दरवर्षी रामलीलेला जायचे हा प्रघातच झाला होता जणू. खूप मजा यायची.
पण प्रभूच्या मनात काही वेगळेच होते. ‘शांतता क्षेत्रामुळे’ रामलीला महोत्सव समितीला परवानगी नाकारली गेली. आता शिवाजी पार्कवर रामलीला होत नाही! पण शिवसेना मात्र उच्च न्यायालयात गेली होती.

उच्च न्यायालय : गेल्यावर्षी जेव्हा शिवसेनेने न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा न्यायालयाने ठराविक निर्बंध घातले. आवाजाची मर्यादा, साउंड बॅरियर, शिवाजी पार्कच्या वापराऐवजी पुढील वर्षी वेगळे मैदान अशा काही बाबी सांगितल्या होत्या. तेव्हा सभा पार पडली. पण त्या सभेतसुद्धा न्यायालयाचा अवमान करणारी आणि थोडक्यात ‘आम्ही सगळ्याला फाट्यावर मारतो’ अशी भाषा होती. पण बिनकण्याच्या न्यायालयाने त्यावर काहीच केले नाही. भीड चेपलेल्या सेनेने याहीवर्षी महापालिकेने फेटाळलेल्या परवानगी विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

सुनावणी : न्यायालयात सुनावणीचेवेळी मी उपस्थित होतो. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यात पुढे आले की गेल्यावेळी न्यायालयाने परवानगी देताना यावर्षी आधी MMRDA मैदानासाठी परवानगी चा अर्ज करावा असे सांगितले होते. पण तो अर्ज सेनेने केलेलाच नाही. त्यासाठी कारण काय तर म्हणे ‘सेनानेतृत्व विचाराअंती अशा निर्णयाप्रत आले की MMRDA मैदान हे दसरा मेळाव्यासाठी योग्य नाही’. आणि त्याचे भाडे ७० लाख रुपये आहे. जवळ रेल्वेस्थानक नाही इ. म्हणजे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन तर नाहीच केले शिवाय आणखी ही गुर्मी की आम्हाला ते योग्य वाटले नाही! याचा विरुद्ध बाजूने समाचार घेत हे स्पष्ट केले की जवळची स्टेशन्स किती अंतरावर आहेत, स्टेशनपासून स्कायवॉक आहे इ.

पुढे शिवसेनेच्या वतीने अशी बाजू मांडण्यात आली की दसरा मेळावा हे एक सामाजिक-सांस्कृतिक संमेलन आहे. socia-religious function. आणि व्यासपीठावर आपट्याची पाने देऊन सोने देवाणघेवाणीचा कार्यक्रम केला जातो. आता मेळावा होऊन गेलाय. मनोहर जोशी यांना व्यासपीठावर नक्की काय दिले गेले हे आम जनतेने पाहिलेच आहे. श्रीफळ दिले की वाटाण्याच्या अक्षता लावल्या! आपट्याची पाने दिली की नाही माहित नाही पण पंतांच्या तोंडाला मात्र पाने पुसली! पण कोर्टासमोर छातीठोकपणे हे विधान केले गेले. कोर्टाने ते ग्राह्य धरले! शेवटी सोने देवाणघेवाणीचा कार्यक्रम पडला हो! मान्यता मिळायलाच हवी! विरुद्ध बाजूने असाही युक्तिवाद केला की एखाद्या गरिबाला वाटले की आपल्या मुलाचे लग्न एखादे महागडे सभागृह घेऊन करण्यापेक्षा मध्यवर्ती असलेल्या शिवाजी पार्कच्या मोकळ्या मैदानात करावे, तर त्याला ते उपलब्ध नाही. तो राजकीय कार्यक्रम नसूनही आणि धार्मिक कार्यक्रम असूनही त्याला परवानगी नाही पण राजकीय पक्षाला ते मिळू शकते! न्यायालयाचे हूं नाही की चू नाही!

गेल्यावेळी सुद्धा ध्वनिमर्यादा ओलांडली गेली होती आणि त्यासाठी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. याहीवर्षी पुन्हा पोलिसांनी ध्वनिमर्यादा उल्लंघनासाठी गुन्हा दाखल केला आहे. पण कोर्टात युक्तिवाद केला गेला की आजूबाजूने देवी जात असतात, जवळच बंगाल क्लब आहे त्याचा आवाज असतो असे विविध आवाज मिसळून ध्वनिमर्यादा ओलांडली जाते. तिथे मात्र आवाज कुणाचा??? तर इतरांचा! अशाप्रकारे सर्वप्रकारे न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून सभा झाली.

अजून एक मुद्दा शिवसेनेच्या बाजूने मांडण्यात आला तो म्हणजे, आसपासच्या परिसरातील लोक ह्या मेळाव्याला येतात. शिवाजीपार्क आणि दादर ह्या परिसरातील लोकांचे ‘भले’ शिवसेनेने केले आहे आणि  त्यामुळे या परिसरातील लोकांचे सेनेला समर्थन आहे. तेव्हा हा स्थानिकांचा कार्यक्रम आहे. धडधडीत खोटे विधान. दादर-शिवाजीपार्क परिसर ज्या लोकसभा क्षेत्रात येतो त्याचा खासदार काँग्रेसचा, आमदार मनसेचा आणि सर्व नगरसेवक मनसेचे! जिथे शिवसेनेला लोकसभा, विधानसभा आणि महापालिका या तीनही स्तरांवर एकही जागा मिळू नये तिथे स्थानिक लोकांचा भरघोस पाठिंबा आहे असे म्हणणे कितपत योग्य ठरते? पण न्यायालयाला ते पटले बुआ!
अशाप्रकारे न्यायालयाने मग यंदाही दसरा मेळाव्याला परवानगी देण्याचे ठरविले. ‘हे सर्व आधीच ठरलेले होते’ अशी टिप्पणीही ऐकायला मिळाली. आधीच म्हणजे सर्वच ‘विधिलिखित’ असते अशा अर्थाने हो! असो. तर परवानगी देताना न्यायालयाने याहीवर्षी ध्वनीपातळी मोजण्यासाठी एक समिती नेमण्याचे आदेश दिले. त्या समितीत सुमेरा अब्दुलअली यांचा समावेश असावा असे म्हणताच त्या त्वरित म्हणाल्या ‘माफ करा न्यायमूर्ती महोदय, पण मला ह्या समितीवर राहायचे नाही.’ त्यावर न्यायमूर्तीनी का असे विचारताच बाणेदारपणे त्या म्हणाल्या की ‘माझ्या नोन्दी या निष्पक्ष असतात आणि त्यांना किंमत दिली जावी असं मला वाटतं’. त्यांनी गेल्यावर्षीच्या नोन्दी, त्यावर झालेला चौकशीचा फार्स, आरोप आणि पर्यायाने त्या नोन्दीन्ना दाखवलेली केराची टोपली याचा समाचार अक्षरशः दोन वाक्यात घेतला. सर्वजण सर्द झाले. आता हत्ती गेलाय म्हटल्यावर पुढे शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात आली की १३ तारखेला मेळावा असला तरी मैदान ११ तारखेपासूनच ताब्यात मिळावे तयारीसाठी. कोर्ट एवढे वाकले होते की हीसुद्धा मागणी लगेच मान्य करण्यात आली, पण विरुद्ध बाजूने लगेच निदर्शनास आणले की ही मागणी आत्ताच केली जात आहे, महापालिकेकडे केलेल्या अर्जात तशी मागणी नाही अथवा प्रस्तुत याचिकेतही तशी मागणी नाही. मग कोर्ट दोन पावले मागे गेले आणि १२ तारखेपासून मैदान दिले गेले. काय म्हणावे याला? (बातम्यात ११ तारखेपासून डीएल गेल्याचा उल्लेख आहे, लेख प्रकाशित होईपर्यंत न्यायालयाचा निर्णय शोधूनही संदर्भास उपलब्ध होऊ शकला नाही.)

कोर्टाच्या आत उपस्थित असलेल्या लोकांना खटकलेली बाब म्हणजे महापालिकेने न केलेला विरोध, राज्य सरकारने न केलेला विरोध. महापालिकेने तर अत्यंत संशयास्पद भूमिका घेतली. सरळ स्पष्टपणे विरोध करणे अपेक्षित असताना गुळमुळीत विधाने आणि बोटचेपेपणा का झाला हे सुद्धा अनाकलनीय आहे. खेळाचे मैदान, शांतता क्षेत्र, मैदानाची नंतर होणारी दुरवस्था असे सर्व बिंदू उपलब्ध असतानाही त्याचा अनुल्लेख हा खूप बोलका होता. न्यायदेवता आंधळी असते पण तिच्या पुजाऱ्यांनी डोळसपणा दाखवायला नको का?

आगामी काळ : न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायद्याच्या ताकदीचा असतो. त्याला कायद्याचेच वजन असते. आणि कायद्यासमोर सर्वजण सारखे असतात. तेव्हा उद्या जर कोणी मैदानावर धार्मिक कार्यक्रम केले तर कुणालाही वावगे वाटू नये. कोणत्या तोंडाने त्याला विरोध करायचा? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा असे होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटना ही सर्वोपरि आहे आणि तिने सर्व भारतीय नागरिकांना समानतेने जगण्याचा हक्क दिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अशा निर्णयामुळे हे मैदान आता अशाप्रकारच्या सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांना खुलेच झाले आहे अशी भावना सामान्य जनतेची झाल्यास त्यात काहीही चुकीचे नाही. आणि असे सामाजिक-धार्मिक-पारंपरिक कार्यक्रम झाल्यास त्याला विरोध होऊ शकत नाही.

कायद्याचे भय राहात नाही हा एक प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक असतो. किंवा काहीजण कायदा वाकवून घेऊ शकतात आणि तसा टेम्भा मिरवतात हाही प्रकार लोकशाहीसाठी लाजिरवाणा असतो. आणि त्यात सहभागी असणारे (सहकार्य करणारे अथवा कृतीहीन राहून मदत करणारे) सर्वजण हे लोकशाहीचे आणि न्याय-समतेचे मारेकरी असतात.


तेव्हा आता शिवाजी उद्यान कार्यक्रमांना खुले झाले आहे हो SSS ... अशी दवंडी पिटत उच्चरवाने म्हणायला हरकत नाही ‘वाजवा रे वाजवा...’