"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, August 17, 2016

गोहत्याबंदी, गोरक्षा आणि गोरक्षक

प्रस्तावना - सहिष्णुता हे हिंदू समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. दुसऱ्याची बाजू समजून घेणे, त्याच्या मताचा आदर करणे पण त्याचवेळी आपली तत्वे, निष्ठा यांचा त्याग न करणे हे हिंदू समाजासाठी नवीन नाही. दुसऱ्याला जबरदस्तीने आपले मत मानायला लावणे, अत्याचार करून आपला विचार त्याच्यावर लादणे, दंड देऊन आपला पाईक बनवणे हे हिंदुत्वाला मान्य नाही.
हिंदू हा सृष्टीशी आपले नाते जोडणारा निसर्गपूजक समाज आहे. इथले सण-उत्सव, परंपरा या निसर्गाशी जोडलेल्या आहेत. वटपौर्णिमा, नागपंचमी, बैलपोळा, बैसाखी, बिहू असे कित्येक उत्सव हे सृष्टीशी असलेल्या आपल्या नात्याचे स्मरण करण्यासाठी आहेत. इथल्या कथा-कहाण्या-पुराण यातूनही हा विचार प्रकट होतो. मग देवतांचे वाहन म्हणून अगदी उंदरापासून राजहंसापर्यंत सर्वांना स्थान आहे. खारीपासून जटायूपर्यंत सर्वांनी आपले धर्मरक्षणाचे कर्तव्य येनकेनप्रकारेण बजावलेले आहे.
सहिष्णू याचा अर्थ स्वत्व हरवलेला, स्वाभिमान संपलेला असा होत नाही. त्याचमुळे इथल्या देवता शस्त्रसंपन्न आहेत. आई भवानी, कृष्ण, विष्णू, मारुती, महादेव या सर्वांचे आपापले शस्त्र आहे. पुराणातून अस्त्रांचा उल्लेखही आढळतो. कारण शस्त्रांशिवाय शास्त्रे टिकवता येत नाहीत याची जाणीव हिंदू समाजाला आहे. संस्कृत भाषा पहिली असता हिंसा/मारणे यासाठी विपुल शब्दभांडार, क्रियापदे मिळतील. संस्कृत शब्दकोशातील पान दर पान अशा शब्द-क्रियापदांनी भरलेले आहे. आर्य मांस खातच नसतील असे मी छातीठोकपणे म्हणून शकत नाही. किंबहुना नदीच्या काठावर स्थिर होईपर्यंत, शेतीसाठीचा सलग कालावधी वास्तव्यासाठी मिळेपर्यंत क्षुधाशांतीसाठी आर्य सामिष भोजन करतही असावेत. काही सुभाषितांमध्ये मांस खाण्याचा उल्लेख आढळतो, उपनिषदात मांस शिजवून खाण्याचा विधी आहे. स्वामी विवेकानंदानी मांसाहार करण्याचा स्वीकार केलेला आहे. पूर्वांचलातील काही जनजाती ज्या अजून ख्रिश्चन झालेल्या नाहीत त्यामध्ये अजूनही गोमांस खाल्ले जाते. या सर्वाचा संदर्भ पुढे येईलच पण तूर्तास एवढे निश्चित की इथला समाज हा शाकाहार-मांसाहार याबाबत अत्यंत आग्रही होता असे वाटत नाही.
आपल्या इथे काही गोष्टी या पवित्र मानल्या गेल्या आहेत. तसा संस्कार हिंदू मनावर असल्यामुळे आणि त्याचे नैसर्गिक, व्यावहारिक, शास्त्रीय, प्राकृतिक, वैज्ञानिक फायदे असल्यामुळे. उदा. तुळस, आंब्याची पाने, नारळ, गाय या आणि अशा निसर्गातील घटकांना समाजाने पवित्रता प्रदान केली. ह्यातला गाय हा अत्यंत गरीब प्राणी. उपमाही दिली जाते ‘गरीब गायीसारखा’!
गाय, तिचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ - भारत हा कृषिप्रधान देश आहे. म्हणजेच येथील बहुसंख्य जनता प्रामुख्याने शेती, शेतमजुरी, शेतमाल, धान्य, वितरण अन्य उत्पादने त्याचा व्यापार यावर उदरभरणासाठी अवलंबून आहे. आणि भारतातील शेती ही बैल, रेडे यांना नांगराला जोडून केली जाते. बैलांची उत्पत्ती ही गोवंशातूनच होते. गायीचा तर सर्वार्थाने उपयोग होतो. बाळाला मिळणारे आईचे स्तनपान सुटल्यानंतर दूध प्रामुख्याने उपलब्ध होते ते गाईपासून. गाईच्या दुधापासून दही, ताक, लस्सी, चक्का, लोणी, तूप, मस्का, पनीर असे अन्य दुग्धजन्य पदार्थ होतात, ज्याचा केवळ पौष्टिक म्हणून नव्हे, तर समारंभात वा कार्यक्रमात पेढा, श्रीखंड, खरवस, मिठाई, खवा, बासुंदी अशारीतीनेही वापर होतो. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त गायीचा उपयोग मोठा आहे. गोमूत्र, शेणाने जमीन सारवणे, शेणखत, बायोगॅस आणि मृत्यूनंतर चामडे याहीदृष्टीने गाईचा उपयोग होतो. असा अन्य कुठल्याही प्राण्याचा भारतात सर्वार्थाने उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्याला कामधेनु म्हणून गाईचे महत्व कळायला परिश्रम पडू नयेत. म्हणूनच गाईच्या स्थानी ३३ कोटी देवांची कल्पना केली गेली, गोग्रास, गोस्पर्श याला महत्व दिले गेले, गोपालन करणारा गोपाल हा आमचा भगवान श्रीकृष्ण महाराज झाला. दही-दूध-लोणी चोरणारा सर्वात मोठा चोर (चौराग्रगण्यं) बनला आणि एकूणच समाजाने हे गाईचे महत्व ओळखले. पिढ्यानपिढ्या गाईला पूज्य मानणारा समाज इथे वास्तव्य करून आहे. त्यामुळे ह्या देशाच्या संस्कृती आणि परंपरेत गाईचे महत्व आणि स्थान वादातीत आहे. पण याचे महत्व घोड्याने शेती करणाऱ्या आणि उंटाचे दूध पिणाऱ्या समाजाला कळणे कठीणच आहे. असे असूनही शेवटी गाय-बैल भाकड झाल्यानंतर त्यांचा त्याग शेतकऱ्याला करावाच लागतो. अर्थात जर त्याला भाकड गाई-बैल यांच्यापासून आधुनिक मार्गाने पैसे कसे कमवावे हे माहित नसेल तर (काही ठिकाणी असे प्रयोग झाल्याचे वाचले आहे) अथवा त्याची भावनिक गुंतागुंत नसेल तर. अशा परिस्थितीत कोणी न्यायचे या पशूंना? किंवा हे प्राणी मेल्यानंतर काय करायचे? ढोर ओढणारा वेगळा समाज अस्तित्वात आला. गावकुसाबाहेर राहणारा, चामडे कमावणारा, पायताण शिवणारा असे समाजगट पिढ्यानपिढ्या हे काम करत राहिले. स्वतःला हिंदू समजत आले. इतरांनी त्यांना हिंदू म्हणून वागवले का? सन्मानाची वागणूक दिली का, मुख्य प्रवाहात, ग्राम उत्सवात सामील करून घेतले का, मंदिर प्रवेश मुक्तपणे दिला का, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिले का हे प्रश्न अगदीच अप्रासंगिक नाहीत पण लेखनसीमेस्तव आत्ता तूर्तास सोडून द्यायला हवेत.
गोमांस भक्षण - तेव्हा इथल्या समाजातील काही घटक गाईला – बैलाला मारून त्याचे मांस खातात. अन्य हिंदू समाजही गाय सोडल्यास अन्य प्राण्यांवर यथेच्छ ताव मारतो. रानडुक्कर, ससा, कासव, बकरा, कोंबडी, मासे, खेकडे, बदक, मांजर हे खाणार्यांची संख्या विपुल आहे. बृहदारण्यक उपनिषदात ‘ज्याला ख्यातनाम विद्वान, सभा गाजवणारा, ऐकत रहावेसे शब्द बोलणारा, सर्व वेद जाणणारा, आणि दीर्घायुष्य लाभलेला असा पुत्र हवा असेल त्याने आपल्या बायकोसोबत तूप घालून असा भात खावा ज्यात तरुण अथवा मोठ्या बैलाचे मांस शिजवून घातले आहे. अशाने ते (दाम्पत्य) अशाप्रकारच्या मुलाला जन्म देऊ शकतील.” हा ६.४.१८ चा स्वैरानुवाद आहे. स्वामी विवेकानंदांनीही मांसाहार करण्याचे समर्थन केले आहे. मग गायच का अपवाद ठरावी? हा प्रश्न अप्रस्तुत नाही. त्याचे उत्तर गाईला बहुसंख्य हिंदू समाज पूज्य मानतो आणि वर म्हटल्याप्रमाणे कृषिआधारित अर्थव्यवस्था असल्याने गोवंशरक्षण हवे. शिवाय वर उल्लेखलेल्या प्राण्याचे उपयोग असले तरी गाईएवढा सर्वार्थाने उपयोग कुठल्याही प्राण्याचा होत नाही. 
गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर - हिंदुस्थानातील हिंदुत्वाची कास धरणारे दोन महान नेते म्हणजे गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर! दोघांनीही गाईला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. पण दोघांनी विविध मार्गाने आणि वेगवेगळी कारणे देऊन गोरक्षणाचे महत्व अधोरेखित केले. गांधीजींचे थोडेसे धार्मिक, सांस्कृतिक, पूज्यभावना या अंगाने जाणारे तर स्वातंत्र्यवीरांचे वैज्ञानिक, practical, उपयुक्तता या अंगाने जाणारे. पण अंततोगत्वा गोवंश राहावा, त्याचे रक्षण व्हावे हीच दोघांची मनीषा! गांधीजी म्हणतात, THE COW is a poem of pity. One reads pity in the gentle animal. She is the mother to millions of Indian mankind. Protection of the cow means protection of the whole dumb creation of God. The ancient seer, whoever he was, began with the cow. The appeal of the lower order of creation is all the more forcible because it is speechless. (YI, 6-10-1921, p. 36)
My ambition is no less than to see the principle of cow protection established throughout the world. But that requires that I should set my own house thoroughly in order first. (YI, 29-1-1925, p. 38)
My religion teaches me that I should by personal conduct instill into the minds of those who might hold different views, the conviction that cow-killing is a sin and that, therefore, it ought to be abandoned.
(YI, 29-1-1925, p. 38)
या आणि अशा धर्तीवर गांधीजींनी अनेक ठिकाणी आपले गोवंशरक्षणाबद्दलचे विचार प्रकट केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, गोरक्षणाचे दृष्टीनेही आजच्या वैज्ञानिक युगात पशूस देवता मानणारी ती खुळचट गोमहात्मे सांगून भागणार नाही. तसली भाबडी प्रवृत्ती राष्ट्रांत पसरविण्याचे सोडून जर आमचे गोरक्षक व्याख्याते ह्या कृषिप्रधान देशांत त्या उपयुक्त पशूचा आर्थिक उपयोग किती मोठा आहे, गायीची नि बैलाची वीण कशी वाढवावी, त्यांच्या मलमूत्रांची खते कशी करावी, गायीच्या दुधा-तुपाचे संवर्धनाचे प्रयोगहि उत्कृष्ट प्रकार कोणते, गुण कोणते, हे सर्व प्रयोगसिद्ध नि रासायनिक घटकांसह प्रत्यक्षनिष्ठ भाषेत सांगतील नि गोशाळाप्रभृति  संस्था गायीच्या आणि बैलाच्या जोपासनेचा मनुष्यास अधिकात अधिक प्रत्यक्ष उपयोग कसा होईल याच ऐहिक दृष्टीने चालवतील तरच आता गोरक्षणाचे महत्त्व लोकांस अधिक पटणारे आहे. त्यामुळे गोवंशरक्षण झाले पाहिजे याबद्दल दुमत नाही. गोपालन आणि गोरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वच गोपालन करणारे असतील आणि गोहत्या कोणी करणार नसेल तर गोरक्षणाचे प्रयोजन उरत नाही. पण कोणी गाय कापणार असेल, वासरे मारणार असेल तर मग गोरक्षणासाठी काहीजण आक्रमक होऊ शकतात. शिवचरित्रात बाल शिवाजीचा एक प्रसंग वाचायला मिळतो. कसाई गायीला ओढत-फरफटत नेत होता. बाल शिवाजीने त्याला थांबवून गाईला सोडून देण्याची विनंती केली. साहजिकच कसायाने नकार देत आपले काम चालूच ठेवले. त्यावर डोळ्यात खदिरांगार फुललेल्या त्या तेजस्वी बाल शिवाजीने पूर्वकल्पना देत त्या कसायाचा हात बुंध्यापासून उडवला. तेव्हा संस्कृतीच्या मानबिंदूंची, प्रतिकांची विटंबना, हत्या होताना लोक आक्रमक होण्याची शक्यता टाळता येत नाही. पण त्यावेळची परिस्थिती, राज्यव्यवस्था, कायदेपद्धती, संविधानाचे राज्य याचाही विचार व्हायला हवा. अथवा एकाने केलेली हत्या योग्य आणि दुसऱ्याने केलेली चूक असे म्हणता येणार नाही. मुळात भारतीय संविधानात गोहत्या रोखण्याच्या दृष्टीने कायदेमंडळाने प्रयत्न करावेत असे मार्गदर्शक तत्व आहे. तेव्हा घटनेचा आधार गोवंश हत्याबंदीला आहे. आता बऱ्याच राज्यांनी गोवंशहत्याबंदीचे कायदे लागू केले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊन मारहाण करणे, शेण खायला लावणे असले प्रकार होताच कामा नयेत.
वर्तमान घटना - चरखी-दादरी या उत्तर प्रदेशातील ठिकाणी गैरमुस्लिम जमावाने अखलाक नावाच्या एका मुस्लीम माणसाला मारले. कारण दिले गेले की त्याच्याकडे गोमांस होते. त्याच्या परसदारी वासराचे पाय सापडले इत्यादि. पुढे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (forensic lab) कदाचित हे सिद्धही झाले असेल की त्याचेकडे गोमांस होते. पण म्हणून जमावाने त्याच्या केलेल्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही. दिल्लीत डॉ. नारंग नावाच्या एका उमद्या हिंदू तरुण दंतवैद्यकाची हत्या बिगरहिंदू जमावाने केली. त्यावर मोठे रान उठले नाही ते कदाचित डॉ. नारंग हिंदू असल्याने असेल आणि या प्रकरणात गायीचा काही संबंध नव्हता. पुन्हा एक दृश्य झळकले की काही दलित तरुणांना एका गाडीला दोरीने बांधून त्यांना लोखंडी सळयांनी काही तरुणांनी मारले. (http://abpmajha.abplive.in/india/gujrat-una-dalit-protest-in-loksabha-rajyasabha-255341) आरोप हाच की ते गोवंशाची तस्करी करत होते. महाराष्ट्रातही पुण्याजवळ नसरापूर येथे मारहाण झाली ( http://abpmajha.abplive.in/pune/pune-bogus-gorakshak-allegedly-beaten-up-trader-of-nasrapur-265767 ), काही ठिकाणी अशाप्रकारे गायींची वाहतूक करणाऱ्यांना जबरदस्ती शेण खायला लावण्यात आले. मला व्यक्तिशः गोसेवेसाठी झटणाऱ्या, केसेस दाखल करणाऱ्या एका वकिलाचा पुढीलप्रमाणे मेसेज आला - India Today: Karnataka Chief Minister Siddaramaiah's son Rakesh passes away in Belgium. http://google.com/newsstand/s/CBIwgfbc0yw
Siddharamaiah as soon as becoming CM of Karnataka started Cow slaughtering in the state which was stopped by the then BJP govt. when they were in power.
Baap ke Paap ne Bete ko nigal liya.
Om shanti shanti shanti.
Let's see who is the next target in his family.
आणि एकुणातच देशभर असे गोरक्षक जोमाने कामाला लागल्याचे दिसले. आरोप-प्रत्यारोप होत राहिले. अशांनी नाहक बळी जातातच पण त्याचे चित्रीकरण पुढील दहशतवादी तयार व्हायला उपयुक्त ठरते. त्यामुळे  अशा तऱ्हेचे सामाजिक सौहार्द बिघडविण्याचे प्रयत्न चालू असताना कडक शासन, अशा गडबड करणाऱ्या तत्वांना समज देण्याचे काम कोणीच करताना दिसून येईना. गुजरातच्या उना येथील तरुणांना गाडीला बांधून मारतानाचा व्हिडिओ पाहून मीही व्यथित झालो. फेसबुकवर त्यादिवशी १ ऑगस्ट ला माझा विचार प्रकट केला.   
आणि या सर्व विचित्र पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना या संदर्भात एक प्रश्न विचारला गेला आणि ते बरसले. (http://indianexpress.com/article/india/india-news-india/pm-narendra-modi-says-he-gets-angry-at-those-running-shops-in-name-of-cow-protection-2958092/) ८०% गोरक्षक बोगस असल्याचे म्हणाले. ७ ऑगस्ट ला हे वृत्त आले. ह्यामुळे काही नमोभक्तही नाराज झाले. ते म्हणू लागले की आम्हाला आता आरोपी असल्यासारखे वाटते आणि मुळात मोदींनी ही ८०% टक्केवारी आणली कुठून? आता मुळात जेव्हा नरेंद्र मोदींसारखा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आणि पंतप्रधान काही विधान करतो तेव्हा त्याला काही आधार तर असेल. आपल्याला जी माहिती कळते, दिसते, दाखवली जाते त्यापेक्षा अधिक माहिती त्यांना निश्चितच प्राप्त होत असली पाहिजे आणि तीही अखिल भारतीय स्तरावर. आणि मुळात आपण आपल्याला ८०% का समजावे आपण त्या २० टक्क्यातले आहोत असे समजावे; नव्हे तसा विश्वास हवा. कर नाही त्याला डर कशाला. आता राहता राहिला मुद्दा ८०% च का? तर त्याचा अर्थ बहुतांश असा असावा. कारण मोदी म्हणाले ८०% गोरक्षक हे गोरक्षणाच्या नावाखाली अवैध धंदे करत आहेत याचा अर्थ देशात एक लाख अमुक हजार अमुकशे अमुक गोरक्षक आहेत आणि त्यातील ऐंशी हजार तमुकशे तमुक लोक अवैध धंदे करतात असा होत नाही. 'त्या शाळेतील ५०% शिक्षक चांगले आहेत, ५०%हून अधिक वकील नाडतात, ७०% डॉक्टरांचे केमिस्टशी साटंलोटं असतं' या आणि अशा विधानांमागे खरोखरीची टक्केवारी, प्रमाण नसते. त्यामुळे ८०% म्हणजे बव्हंशी, मोठ्या प्रमाणावर. आणि शिवाय उघड झालेल्या घटनांवरून ते दिसतच होते. त्यामुळे कुणाही गोभक्ताने व्यथित होण्याचे काहीच कारण नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका गोरक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पहिल्यापासूनच आग्रही राहिला आहे. द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात गोहत्या बंदीसाठी देशभर स्वाक्षरी संग्रह करण्यात आला आणि तत्कालीन राष्ट्रपतींना तो देशाची मागणी म्हणून देण्यात आला. हा सनदशीर प्रयत्न होता. अन्यथा त्याचवेळी हिंसेचे समर्थन करून जबरदस्तीने गोहत्या थांबवण्याचा प्रयत्न संघाने केला असता. पण लोकशाही मूल्यांवर अढळ निष्ठा असणाऱ्या संघाने स्वाक्षरी संग्रह केला. सामाजिक सौहार्द नाही बिघडवला. म्हणून वर्तमान घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वक्तव्यानंतर संघानेही आपले अधिकृत विधान माननीय सरकार्यवाहांचे वक्तव्य म्हणून ७ ऑगस्ट ला प्रसिद्ध केले.
त्यामुळे आता संदेश स्पष्ट आहे. हिंदुत्व चळवळीला बदनाम करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तत्वांवर राज्य सरकारांनी कठोरतेने कारवाई करायला हवी.

Friday, April 29, 2016

कन्हैय्याचा खेळ...

कोणत्याही समाजव्यवस्थेत जेव्हा एखादा गट, एखादी विचारधारा सर्वात प्रबळ होते तेव्हा त्याचा व्यत्यास म्हणून स्वाभाविकपणेच विरुद्ध विचारधारा, विरोधी नेतृत्व प्रबळ होण्याचा प्रयत्न करते. मग भांडवलशाहीच्या विरोधात उदयाला आलेल्या साम्यवाद असेल किंवा साम्यवादाला टक्कर देणारा धार्मिक उन्माद असेल, अशारीतीने एक गट प्रबल झाला की दूसरा आपलीही हत्यारे परजून येतो, त्यात नेतृत्व उभे राहते, घडत जाते.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन हे आणि असे अन्य नेते हे त्यांना संघटनात्मक प्रशिक्षणाची पार्श्वभूमी असली तरीही त्यावेळच्या विरोधाच्या वातावरणामुळे अधिक झळाळून उठले. त्यांचे नेतृत्व हे काळाच्या कसोटीवर तावून-सुलाखून निघाले. आंदोलनातून नेतृत्व सिद्ध होत गेले. संघर्षातून फळ साध्य होत गेले. अर्थात त्यामागे केवळ विरोध नसून विधायक कार्याची आस, साधनशुचिता, ध्येयनिष्ठा, तळमळ या आणि अशा गुणांचा आग्रह होताच. पण तरीही विरोध असला की अधिक बलवान कोंब बाहेर पडून सशक्त बनत जातो हा निसर्गनियमच आहे.

हार्दिक पटेल, कन्हैय्याकुमार हे या निसर्गक्रमाचेच निकाल आहेत. आऊटकम आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजप यांचा विजय जसा निश्चित होऊ लागला तसे अगदी शिवसेनेने सुद्धा (अर्थात त्यांच्या सवयी आणि संस्कारांप्रमाणे) दामोदरदास मोदी यांचेही नाव जाहीर सभेतून काढायला कमी केले नाही. अफजलखानाच्या फौजा वगैरेही आले. विरोधकांनी मोट बांधायचा प्रयत्न केला. अगदी कसोशीने केला. पण प्रत्यही दिसणारे प्रचंड घोटाळे, विकासकामांबाबतची उदासीनता, बिनकण्याचे नेतृत्व या आणि अशा गोष्टींमुळे विटलेल्या जनतेने बदल घडवून आणला. आणि भाजप अगदी सुरक्षित बहुमताने सत्तेवर आला. नरेंद्र मोदींचे निर्विवाद नेतृत्व शीर्षस्थानी जाऊन बसले आणि विरोधक म्लानमुखाने आपला पराभव स्वीकारता झाले. अगदी त्याचवेळेला हे स्पष्ट होते की विरोध वाढणार.

विरोधकांना सावरायला वेळ हवा होता. नवे हीरोज शोधायला अवकाश हवा होता. गुजरातेत हार्दिक पटेल ला हवा देऊन झाली. त्यावेळी पटेल समाजाने हार्दिक नावाच्या नवतरुणाच्या नेतृत्वाखाली असे आंदोलन छेडले की कुणाला वाटले हा मोदींना आता आव्हान उभे करणार. बिहारमधील नितीशकुमार आणि आघाडीच्या विजयाने पुन्हा धुगधुगी आली. आणि इथेच कन्हैय्याचा जन्म निश्चित होता!

कन्हैय्यामध्ये विशेष काहीच नाही. मोदींच्या झंझावाती लाटेने विरोधकांच्या भूगर्भात जी प्रचंड पोकळी निर्माण झाली ती भरून काढायला कोणीही चालला असता.. राहुल गांधीत तेही झेपण्याचे, झेलण्याचे किमान सामर्थ्य नाही त्यामुळे मग कन्हैय्या सारखे नेतृत्व उभे राहते, मिरवते! आणि त्याला दत्तक घ्यायला सप्तर्षी, केतकर, मानव, नितीश अशा टुकारांची रीघ लागते. समाजवादी विचारसरणीला, चळवळीला घरघर लागून कित्येक वर्षे झाली. झब्बा-लेंगा घालून आणि शबनम लावून फिरणाऱ्या काळ्या दाढ्या पांढऱ्या झाल्या पण म्हणावा तसा तरुणांचा भरणा झाला नाही. युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दल वगैरे फसलेले प्रयोग आशा ठेवून बसले. संघटना बांधता आल्या नाहीत. आणि त्याचवेळेला ह्या समाजवादी विचारसरणीने ज्या संघ विचारधारेला विरोध केला ती वाढत गेली. खाकी चड्डी, प्रत्यक्ष शाखेत महिलांना नसलेला प्रवेश, हिंदुत्व, भगवा झेंडा या सर्वावर टीका-टिप्पणी, टिंगल करूनही संघाचे काम भारतभर वाढले. अधिकाधिक तरुण संघधारेत स्वतःहून सामील होत गेले. संघविचार घेऊन चालणाऱ्या अन्याय संस्था विविध क्षेत्रात आदर्श काम उभे करू लागल्या. सेवाकार्यांचे प्रचंड जाले अनेक समाजोपयोगी प्रकल्प संघ कार्यकर्त्यांनी उभे केले. आणि तशातच सार्वत्रिक निवडणुकात संघ विचारधारेला सर्वात जवळ असणारा राजकीय पक्ष भाजप राजकीय व्यासपीठाचे केंद्रस्थान व्यापून राहिला.

ह्यामुळे विरोधाच्या अळंब्या उगवणार हे निश्चित होते. हार्दिक पटेल चे आंदोलन, FTII मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन, जेएनयू मधील विद्यार्थ्यांचे (बेरोजगारांचे?) आंदोलन याला भाजपविरोधी पक्ष, नेते यांजकडून हवा मिळत गेली. प्रस्थापित व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात लढा देण्यात नेहमीच मजा असते, तरुणाईला ते हवेहवेसे असते. विधायक कार्यापेक्षा ते सोपे असते. आणि नेहमीच विघातक कार्य हे तुलनेने सोपे असते. झाड तोडणे सोपे पण वाढवणे कठीण! सुरुंग लावून शाळा उडवून देणे सोपे पण चार विद्यार्थ्यांना एकत्र करून शिकविणे कठीण! त्यामुळेच असे Anti-establishment लढे जगभर होत राहतात आणि त्यातला विचार हा खरोखरच चांगला असेल, अन्याय्यकारक राजवटीच्या विरोधात असेल तर समाज तो विचार उचलून धरत वेळप्रसंगी जुलमी सत्ता उलथवूनही टाकतो.

त्यामुळे हे समजून कन्हैय्या आणि जागोजागच्या आंदोलनांशी व्यक्त होण्याची रणनीती आखली पाहिजे. प्रसारमाध्यमांना कुणीही चालतो. बातम्या देणे याहीपेक्षा बातम्या तयार करण्याकडे हल्ली कल असतो. बातम्या दरवेळी असतातच नाही. किंवा विधायक बातम्या असतातही. पण त्यावर च्यानेल चालत नाही. अशावेळेला घटना फुगवून दाखवणे, हवा देणे, भडकवणे अशी कामे प्रसारमाध्यमे शांतपणे करीत असतात. तेव्हा जेएनयू मधील अफजल गुरूच्या वर्षश्राद्धाच्या वेळेला जमलेली टोळकी ही तद्दन रिकामटेकडी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे Anti-establishment खाज असलेली आहेत. अन्यथा अन्य संस्थांमध्ये खरंच मान मोडून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे करायला वेळाही नसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच उदाहरण घ्या ना! कशा खडतर अवस्थेतून त्यांनी आपला मार्ग बनवला. असे कित्येक दलित, सवर्ण विद्यार्थी आज विविध शैक्षणिक संस्थानांमध्ये विद्याभ्यास करत आहेत. त्यामुळे पहिल्या भाषणात आपली जी गरिबी कन्हैय्याने गाईली तिच्या अगदी विपरीत वर्तन त्याचे आहे. आणि तो तथाकथित पुरोगामी पक्षांनी उभा केलेला एक कठपुतली बाहुला आहे जो त्याचे बोलविते धनी हलवत राहणार तोपर्यंत हलत राहणार. त्यावर अधिक वेळ घालविण्याची आवश्यकता नाही. अगदी संपूर्ण देशातील तरुणाई अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली होती. आज काय अवस्था आहे? तेव्हा अशा तात्कालिक, धनपूरित, राजकीय हेतूप्रेरित आंदोलनांना विरोध करायची आवश्यकता नाही. ती आपोआपच थंड होणार आहेत कारण ते तोतयांचे बंड आहे.

या सर्वांमध्ये नरेंद्र मोदी काय करत आहेत हेही जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. नरेंद्र मोदी अक्षरशः अनुल्लेखाने अशांना मारत आहेत. परदेश प्रवास, त्यात भारताला दूरगामी फायदे मिळवून देणारे करार, संबंध दृढ करणे, हिंदू संस्कृतीचा विश्वसंचार कसा होईल हे पाहणे, देशांतर्गत विकासकामे, वीजनिर्मिती, रस्ते बांधणी, पारदर्शी व्यवहार, स्वच्छता, आरोग्य अशा विषयांवर ते काम करत आहेत. त्यांच्याकडे अशा आंदोलनांवर बोलायलाही वेळ नाही. कन्हैय्या “मोदी जी का सूत पकडकर बोलू” असं बोबड्या शैलीत टाळीखेचक म्हणाला तरी मोदी गप्पच! मन की बात मधेही एकदम वेगळेच विषय. म्हणजे थोडक्यात कबड्डीच्या खेळाप्रमाणे आपल्या पाल्यात घुसून ‘असहिष्णुता, असहिष्णुता, आजादी, आजादी’ असे ओरडणाऱ्या, घुमणाऱ्या खेळाडूला मोदींसारखा अनुभवी कप्तान फक्त जोखत आहे. अक्ख्या टीमला मागेच राहायची खूण करत आहे कारण अजून खऱ्या समस्यांची टचलाईन कन्हैय्याने टच केलेलीच नाही. मोदींचे उत्साही पाठीराखे पुढे गेले तर ते बाद होणार आहेत कारण कन्हैय्याला समस्या सोडवण्यात रस नाहीचे. त्याला केवळ गडी बाद करायचे आहेत, जाळ्यात ओढायचे आहेत, चांगल्या कामावरून लक्ष हटवायचे आहे. वात पहायची ती त्याचा दम निघेपर्यंत. तो उत्तेजक विधाने करणार, मोदी मराठवाड्यात आले नाहीत म्हणणार पण विचलित होण्याची काहीच गरज नाही कारण मराठवाड्यातील जनता जाणेल सरकार काय करते आहे. त्याचा दम निघाला की जाईल वापस! हार्दिक आहेच तिथे उभा घाम पुसत. तेव्हा घटनेने दिलेल्या अधिकारात तो सभा घेत असेल, भाषणे ठोकत असेल तर करू द्या त्याला. भाषणांना गर्दी होऊनही पुढे काय होते हे आपण जाणत नाही काय! त्याला भारतभर फिरू द्या. त्याच्यामागच्या शक्तींना आसुरी आनंद मिळू द्या. न्यायालयाने त्याला संपूर्ण निर्दोष ठरविलेले नाही. तो निर्णय योग्यवेळी होईलच तूर्तास नाटकाचे खेळ पाहत राहणे, आज मुंबई, उद्या पुणे, परवा अमरावती.. निवडणुकात विशेष खेळ..काही जागा राखीव!

Tuesday, February 2, 2016

लोकसंख्या असंतुलन आणि भविष्यातील आव्हाने

भारताची लोकसंख्या हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. पण हीच लोकसंख्या त्यातील तरुण वर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे नवीन शक्तीच्या स्वरूपात उभी होताना दिसत आहे. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला हात ही जरी प्रथमतः सरकारची जबाबदारी असली तरी अनेक संस्था संघटना या दिशेने काम करत आहेत. चीन ने सुद्धा आपले ‘एक कुटुंब: एक अपत्य’ हे धोरण आता सोडून देऊन दोन अपत्यांचे नवे धोरण अंगिकारले आहे. त्यामागे कमी होत जाणाऱ्या तरुण लोकसंख्येचाही विचार त्यांनी केला आहे.
भारतामध्ये लोकसंख्येचा हा प्रचंड डोलारा आणि त्याचा नैसर्गिक तथा मानवनिर्मित संसाधनांवर पडणारा ताण हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच भारतात ‘हम दो-हमारे दो’ ह्या घोषणेचा जाणीवपूर्वक प्रसार केला गेला.  दोनपेक्षा जास्त अपत्ये असतील तर निवडणूक लढविण्यास बंदी अथवा निर्वाचित सदस्याला अनर्ह ठरविणे असेही बदल कायद्यात केले गेले. पुढे जाऊन ‘हम दो-हमारा एक’ हेसुद्धा रूढ होऊ लागले.  पण केवळ हिंदू समाज जर ही बंधने स्वतःवर घालून घेणार असेल किंवा त्याचे पालन करणार असेल आणि अन्य काही समाजघटक मात्र ‘हम पांच-हमारे पच्चीस’ या बेजबाबदार भूमिकेतून वागणार असतील आणि होणारी अपत्ये हे कुणा ईश्वरी शक्तीचे देणे मानणार असतील तर ह्या प्रश्नाचा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करावा लागेल. कुणा संप्रदायाने संततीनियमनाच्या साधनांना धर्मबाह्य ठरवायचे (पहा : पोप यांचे मे २००५ मधील भाषण, मार्च २००९ मधे पोप बेनेडिक्ट १६ वे यांचे कॅमेरून देशाच्या भेटीदरम्यानचे वक्तव्य आणि त्यांचेच मे २००९ मधील काँगोलीझ बिशप्स च्या परिसंवादातील भाषण) यामुळे मग हिंदू समाजातील काही नेते आग्रहीपणे इशारा देताना दिसतात की आता हिंदूंनी ‘हम दो-हमारे दो’ ही भूमिका सोडून दिली पाहिजे. त्यावर मग टीकेची झोडही उठते आणि ते एकूण देशप्रकृतीला हानिकारक असल्याचेही सांगितले जाते पण मूळ समस्येवर अभावानेच विचार होतो.
एखाद्या समाजाची लोकसंख्या क्रमशः कमी होत गेली तर गणितीय पद्धतीने ठराविक कालावधीनंतर तो समाज अस्तित्वहीन ठरू शकतो हे दाखवणारे सोदाहरण व्हिडिओज पुष्कळ संख्येने इंटरनेटवर पाहायला मिळतात. त्या समाजाची लोकसंख्या लयास जाणे म्हणजे त्याची संस्कृती नष्ट होणे. त्या समाजाने उचलून धरलेली, जोपासलेली, पिढ्यानपिढ्या संक्रमित केलेली जीवनमूल्ये संपुष्टात येणे. एखाद्या देशाच्या सैन्यात तिथला मूळ समाज बहुसंख्येने न राहता बाहेरून आलेला, अथवा तिथल्या मातीशी देणेघेणे नसलेला समाज जर वाढला तर काय होईल? रशिया, फ्रान्ससकट अनेक देशांना  हाच प्रश्न भेडसावतो आहे. केवळ लोकसंख्या असली तरी असे ‘राष्ट्र’ हे ‘राष्ट्र’ म्हणून जिवंत राहील काय? तिथल्या पुत्रवत् समाजाशिवाय त्या राष्ट्राची चिती अस्तित्वात राहील काय? ज्याप्रमाणे चांगल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती जपणे हे हे गरजेचे आहे त्याचप्रमाणे चांगले विचार देणारा आणि आचरण करणारा सदाचारी, सहिष्णू समाज अस्तित्वात राहणे हेही मानवतेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.
भारताची जनगणना झाल्यानंतर एक विदारक वास्तव समोर येते, ते म्हणजे इथल्या हिंदू समाजाचा घटता लोकसंख्या दर. ह्याला विविध कारणे देता येतील. वर उल्लेखिलेल्याशिवाय बांगलादेश आणि अन्य ठिकाणाहून होणारी घुसखोरी, भारत सोडून परदेशात स्थायिक होणारी जनसंख्या, आमिष दाखवून, छळ-कपट करून, भय दाखवून होणारे परावर्तनाचे प्रयत्न अशीही कारणे त्याला आहेत. या विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिक चिंतित आहेतच. विविध माध्यमातून यावर चर्चाही सुरु झाल्या आहेत. या भीषण वास्तवाचा सामना करणे आता पटू लागले आहे. काही वर्षांपूर्वी संघाने या विषयावर जनजागरण अभियान सुद्धा केले होते. नुकत्याच पार पडलेल्या रांची येथील अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत एक प्रस्ताव पारित केला आहे. त्या प्रस्तावाबद्दल चिंतन करणे आणि समाजातील केवळ बुद्धिजीवीच नव्हे तर जनसामान्य लोकांपर्यंत हा प्रस्ताव पोहोचवणे हे गरजेचे ठरते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – अखिल भारतीय कार्यकारी मंडळ द्वारा पारित प्रस्ताव – २०१५.
देश में जनसंख्या नियंत्रण हेतु किए विविध उपायों से पिछले दशक में जनसंख्या वृद्धि दर में पर्याप्त कमी आयी है. लेकिनइस सम्बन्ध में अखिल भारतीय कार्यकारी मंडल का मानना है कि 2011 की जनगणना के पांथिक आधार पर किये गये विश्लेषण से विविध संप्रदायों की जनसंख्या के अनुपात में जो परिवर्तन सामने आया हैउसे देखते हुए जनसंख्या नीति पर पुनर्विचार की आवश्यकता प्रतीत होती है. विविध सम्प्रदायों की जनसंख्या वृद्धि दर में भारी अन्तर,अनवरत विदेशी घुसपैठ व मतांतरण के कारण देश की समग्र जनसंख्या विशेषकर सीमावर्ती क्षेत्रों की जनसंख्या के अनुपात में बढ़ रहा असंतुलन देश की एकताअखंडता व सांस्कृतिक पहचान के लिए गंभीर संकट का कारण बन सकता है.
विश्व में भारत उन अग्रणी देशों में से था, जिसने वर्ष 1952 में ही जनसंख्या नियंत्रण के उपायों की घोषणा की थीपरन्तु सन् 2000 में जाकर ही वह एक समग्र जनसंख्या नीति का निर्माण और जनसंख्या आयोग का गठन कर सका. इस नीति का उद्देश्य 2.1 की सकल प्रजनन-दर’ की आदर्श स्थिति को 2045 तक प्राप्त कर स्थिर व स्वस्थ जनसंख्या के लक्ष्य को प्राप्त करना था. ऐसी अपेक्षा थी कि अपने राष्ट्रीय संसाधनों और भविष्य की आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए प्रजनन-दर का यह लक्ष्य समाज के सभी वर्गों पर समान रूप से लागू होगा. परन्तु 2005-06 का राष्ट्रीय प्रजनन एवं स्वास्थ्य सर्वेक्षण और सन् 2011 की जनगणना के 0-6 आयु वर्ग के पांथिक आधार पर प्राप्त आंकड़ों से असमान’ सकल प्रजनन दर एवं बाल जनसंख्या अनुपात का संकेत मिलता है. यह इस तथ्य में से भी प्रकट होता है कि वर्ष 1951 से 2011 के बीच जनसंख्या वृद्धि दर में भारी अन्तर के कारण देश की जनसंख्या में जहां भारत में उत्पन्न मतपंथों के अनुयायिओं का अनुपात 88 प्रतिशत से घटकर 83.8प्रतिशत रह गया है, वहीं मुस्लिम जनसंख्या का अनुपात 9.8 प्रतिशत से बढ़ कर 14.23 प्रतिशत हो गया है.
इसके अतिरिक्तदेश के सीमावर्ती प्रदेशों यथा असमपश्चिम बंगाल व बिहार के सीमावर्ती जिलों में तो मुस्लिम जनसंख्या की वृद्धि दर राष्ट्रीय औसत से कहीं अधिक हैजो स्पष्ट रूप से बंगलादेश से अनवरत घुसपैठ का संकेत देता है. माननीय सर्वोच्च न्यायालय द्वारा नियुक्त उपमन्यु हजारिका आयोग के प्रतिवेदन एवं समय-समय पर आये न्यायिक निर्णयों में भी इन तथ्यों की पुष्टि की गयी है. यह भी एक सत्य है कि अवैध घुसपैठिये राज्य के नागरिकों के अधिकार हड़प रहे हैं तथा इन राज्यों के सीमित संसाधनों पर भारी बोझ बन सामाजिक-सांस्कृतिकराजनैतिक तथा आर्थिक तनावों का कारण बन रहे हैं.
पूर्वोत्तर के राज्यों में पांथिक आधार पर हो रहा जनसांख्यिकीय असंतुलन और भी गंभीर रूप ले चुका है. अरुणाचल प्रदेश में भारत में उत्पन्न मत-पंथों को मानने वाले जहां 1951 में 99.21 प्रतिशत थे, वे 2001 में 81.3 प्रतिशत व 2011 में 67 प्रतिशत ही रह गये हैं. केवल एक दशक में ही अरूणाचल प्रदेश में ईसाई जनसंख्या में 13 प्रतिशत की वृद्धि हुई है. इसी प्रकार मणिपुर की जनसंख्या में इनका अनुपात 1951 में जहां 80 प्रतिशत से अधिक था, वह 2011 की जनगणना में 50 प्रतिशत ही रह गया है. उपरोक्त उदाहरण तथा देश के अनेक जिलों में ईसाईयों की अस्वाभाविक वृद्धि दर कुछ स्वार्थी तत्वों द्वारा एक संगठित एवं लक्षित मतांतरण की गतिविधि का ही संकेत देती है.
अखिल भारतीय कार्यकारी मंडल इन सभी जनसांख्यिकीय असंतुलनों पर गम्भीर चिंता व्यक्त करते हुए सरकार से आग्रह करता है कि -
1.      देश में उपलब्ध संसाधनोंभविष्य की आवश्यकताओं एवं जनसांख्यिकीय असंतुलन की समस्या को ध्यान में रखते हुए देश की जनसंख्या नीति का पुनर्निर्धारण कर उसे सब पर समान रूप से लागू किया जाए.
2.      सीमा पार से हो रही अवैध घुसपैठ पर पूर्ण रूप से अंकुश लगाया जाए. राष्ट्रीय नागरिक पंजिका का निर्माण कर इन घुसपैठियों को नागरिकता के अधिकारों से तथा भूमि खरीद के अधिकार से वंचित किया जाए.
अखिल भारतीय कार्यकारी मंडल सभी स्वयंसेवकों सहित देशवासियों का आवाहन करता है कि वे अपना राष्ट्रीय कर्तव्य मानकर जनसंख्या में असंतुलन उत्पन्न कर रहे सभी कारणों की पहचान करते हुए जन-जागरण द्वारा देश को जनसांख्यिकीय असंतुलन से बचाने के सभी विधि सम्मत प्रयास करें.



Tuesday, January 26, 2016

असहिष्णुतेच्या नावानं...

कोळसा खाणी, २-जी, दुष्काळ सहाय्यता निधी घोटाळा, सिंचन घोटाळा या आणि अशा घोटाळ्यांनी गांजलेल्या जनतेला ‘स्वच्छ भारत’ स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सत्तापालट करावा लागला आणि त्यानंतर सुरु झाली हळूहळू असहिष्णुतेवर चर्चा! कायदा-सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे आद्यकर्तव्य. समाजात शांतता आणि सौहार्द असेल, सारे गुण्यागोविंदाने नांदत असतील तरच समाज विकासाच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. केवळ रस्ते, पाणी, वीज असली तरी भांडणारा, झगडणारा समाज प्रगती करू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारांनी पोलीस दल, गुप्तचर यंत्रणा यांचा योग्य तो वापर करून समाजात खेळीमेळीचे आणि सुरक्षित वातावरण राहील हे पहायचे असते. ज्याप्रमाणे गोध्रा हत्याकांड झाल्यानंतर गुजरात सरकारवर चहुबाजूंनी ताशेरे ओढले गेले, किंवा २६/११ चा हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठली आणि सरकारने त्वरित पावले उचलत उपाययोजना केली, त्याचप्रमाणे दादरीमधील निंदनीय घटना घडल्यानंतर मात्र तेथील राज्य सरकारला कोणीच जाब विचारला नाही. एकदम येथील हिंदू समाज हा असहिष्णू झाल्याचा आभास निर्माण केला गेला.
साहित्यिक, कलाकार, संशोधक यांनी निषेध म्हणून आपल्याला मिळालेले कित्येक वर्षांपूर्वीचे पुरस्कार परत करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी एकच कारण दिले की संपूर्ण देशात असहिष्णुतेचे वातावरण पसरले आहे. यातील फोलपणा तेव्हाच सर्वांना समजला कारण आजची परिस्थिती ही कितीतरी पटीने चांगली असे दिवस आणि अशा रात्रीही येथील समाजाने पूर्वी अनुभवल्या आहेत. ठराविक समाजाची घरे जाळणे, ठराविक समाजाला अगदी दिवसाढवळ्या ट्रेन्समधून बाहेर काढून मारणे, स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी आणि स्वतःचे बूड स्थिर करण्यासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणे, न्यायालयांचे निर्णय कायदे करून वाकवणे, सत्तेच्या हव्यासापायी विनाकारण हजारो लोकांना तुरुंगात डांबून हजारो कुटुंबांची वाताहत करणे यावेळी जणू असहिष्णुताही घाबरून कुठल्यातरी कोनाड्यात लपून बसली होती की काय म्हणून कुणाला त्यावेळी पुरस्कार परत करावे वाटले नाहीत!

पण आता एकदम सर्वांना जाणवू लागले की देशात असहिष्णुता फोफावली आहे. मग इथल्याच समाजाच्या आधारावर मोठ्या झालेल्या काही कलाकारांनी आपल्या बायकोचा हवाला देऊन खुल्या मंचावरून सांगितले की त्यांना एवढे असुरक्षित वाटते की ‘हा देशच सोडून जावे’. पण त्यांना कुठल्या देशात ‘सुरक्षित’ वाटते ते सांगणे मात्र शिताफीने टाळले. आसपासचे सोडा पण अन्य खंडातील एकही देश सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये असा दिसत नाही की, जो सुरक्षित आणि सहिष्णू समाजाची शाश्वती देऊ शकेल. त्यामुळे इथला मुळातच सहिष्णू असलेला आणि आपल्या घरातच साप पाळून त्यांना दुग्धपान करायची सवय असलेला समाज न खवळता तरच नवल! बहुतांश समाजाने वरील प्रकारच्या वक्तव्यावर तिखटपणे प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. प्रसारमाध्यमातून त्याचे पडसाद उमटू लागले आणि मग असहिष्णुतेचा प्रचार करणाऱ्यांना मोकळे रानच मिळाले. विविध विषय आणि खऱ्या समस्या यांवरून लक्ष उडवून विनाकारण समाजात तेढ पसरवण्याचे उद्योग सुरु झाले. संसदेचे कामकाज रोखायला काही इंधन तयार झाले.
याच सुमारास फ्रान्समधे अतिरेक्यांनी हल्ला केला. तोही कुठे? तर संगीताच्या कार्यक्रमाला जमलेल्या रसिक, निःशस्त्र लोकांवर. त्यावरही आपल्या येथील काही तथाकथित विचारवंत तावातावाने ह्या सर्वामागची ‘आर्थिक गणिते’, तेलाचे राजकारण वगैरे समजावून सांगत होते! कधीकधी तर असे वाटते की आपल्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेपर्यंत खऱ्या दहशतवादाला हे लोक ओळखणारच नाहीत काय? एखाद्या गटाच्या, अतिरेकी संघटनेच्या विस्तारामागे, शस्त्रास्त्र पुरवठ्यामागे जशी आर्थिक बाजू असते तशी त्या अतिरेकालाही आर्थिक कारणे असतीलच. ‘तण्डुलाः प्रस्थमूलाः’ हे आहेच; पण ज्यामुळे हजारो पद्मिनी जोहार करत्या झाल्या, ज्यामुळे संभाजीराजांना हालहाल करून ठार मारले गेले, ज्यामुळे जोरावरसिंह आणि फतेहसिंह ह्या गुरुपुत्रांना भिंतीत जिवंत चिणून मारले गेले, आगगाड्या भरून मृतदेह स्वतंत्र भारतात पाठवले गेले आणि अशी असंख्य उदाहरणे जी देताना लेखणी झिजेल पण अत्याचारांची मालिका संपणार नाही, त्या सांप्रदायिक उन्मादाला मोकळेपणाने ओळखण्यात एवढी भीड का पडावी? आणि त्याहून घोर थट्टा म्हणजे अशा रानटी, अमानवी आणि राक्षसी जमातीची तुलना ही सुसंस्कृत, शांतताप्रिय, सहिष्णू हिंदू समाजाशी करायची. संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे,                 
                                       अहं स्वर्णम् न मे दुःखं अग्निदाहेन ताडयेत् |
  एतद् तु मे महादुःखं गुञ्जया सह तोलनम् ||
म्हणजे थोडक्यात सोन्याला दागिना घडवताना अगदी आगीत तापवून, वितळवून दागिना घडवतानाही दुःख होत नाही पण जेव्हा त्याची व्यवहारात गुंजेशी तुलना (वजन मापण्यासाठी एका पारड्यात सोन्याचा दागिना आणि दुसऱ्यात गुंजेच्या बिया) केली जाते तेव्हा सोन्याला खरे दुःख होते.
१०८ वेळा नदीवर जाऊन आंघोळ करण्याची सहिष्णुता हा समाज जपतो. उकळत्या तेलात टाकले आणि शरीरदाह केला तरी ईश्वरावरची अतूट निष्ठा मानणारा हा समाज आहे. सतरावेळा लढाईत पराभव करून शरण मागितल्यानंतर उदार मनाने अभय देणारा हा समाज आहे. ह्या समाजाला सहिष्णुतेचे पाठ कोणी शिकवायला नकोत. त्याच्या रक्तातच सहिष्णुता आहे. गौतम बुद्ध, भगवान महावीर, शिबीराजा, चिलया बाळ, कर्ण, युधिष्ठिर अशी मालिका केवळ याच पावन भूमीवर होऊ शकते. दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे, त्याच्याही मताचा आदर करणे हे अगदी चार्वाकापासून चालत आलेले आहे. पण म्हणून त्याचवेळी हा समाज वीर्यहीन नाही याचीही जाण ठेवणे गरजेचे आहे. गोमातेच्या रक्षणासाठी कायदेशीर लढाई देणारा पण त्याचवेळी पूर्वकल्पना देऊन कसायाचा हात बुंध्यापासून कलम करणारा, स्वतःचे मुलगे लढाईत मारले गेल्यावरही अभेद्य आत्मविश्वासाने हुंकार भरणाऱ्या शीख गुरुंच्या ‘इन सिख्वन के शीश पर, वार दिये सुत चार | चार मरे तो क्या हुआ, जीवित कई हजार’ या वाणीचे स्मरण करणारा, आणि तीच परंपरा आजही जपत ‘माझी मुलेही देशरक्षणासाठी सैन्यातच जातील’ म्हणणाऱ्या वीरगती प्राप्त कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी, वीरप्रसवा यांचा हा समाज आहे. त्यामुळे कुणा छछोर माणसाची बायको शयनगृहात त्याला काय म्हणते ह्याला महत्व द्यायचे, की स्वप्राणांचे बलिदान देणाऱ्या पतीच्या चितेच्या प्रकाशात आपल्या मुलांनाही मातृभूमीच्या ओंजळीत अर्पण करणाऱ्या वीरपत्नीचे धीरोद्गार मनात जपायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.