"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Tuesday, October 24, 2017

संप संपतील काय ?

            जेव्हा आपण एखादं नित्यकार्य करत असतो आणि दुसऱ्याला त्याची जाणीव अथवा कदर नाही असं वाटलं आणि ते जाणवून द्यायचं असेल तर त्याची सोपी पद्धत म्हणजे ते काम न करणं. अशातून समोरच्याला ते काम झालं नाही की आपली किंमत कळते. लहानपणी निबंधाच्या नेहमीच्या विषयांपैकी एक ठरलेला विषय म्हणजे ‘आई संपावर गेली तर..?’ त्याचाही साधारण मथितार्थ हाच असायचा की, आई दिवसभर अनेक कामं शांतपणे निपटत असते. आई एखादा दिवस काही काम न करता बसून राहिली तर तीची किंमत कळेल, तिच्या कामाचे मूल्य कळेल, कष्टांची जाणीव होईल वगैरे...
            समाजव्यवस्थेत एखादे गावं-नगर, तालुका, जिल्हा, राज्य, देश चालवायला अनेक घटक आपापले काम करत असतात. राज्यव्यवस्थेच्या कार्यकारीमंडळ, कायदेमंडळ, न्यायव्यवस्था या प्रमुख आधारस्तम्भांबरोबरच प्रशासन, विविध सेवा पुरवणारे, शेतकरी, कामकरी, शिक्षक, व्यापारी, डॉक्टर्स, सैनिक, रेल्वे कर्मचारी, बँक कर्मचारी हे सर्वचजण आणि याही व्यतिरिक्त कित्येक लोक संपूर्ण व्यवस्था आणि समाज चालवत असतात. हे सर्व घटक एकमेकांवर कळत-नकळत अवलंबून असतात. यातल्या कुठल्याही एका घटकाने अथवा वर्गाने आपले काम करायला नकार दिला तर संपूर्ण व्यवस्था आहत होते. काही घटक असे असतात की संपूर्ण व्यवस्था कोलमडू शकते. उदा. रेल्वेच्या मोटरमन संघटनेने संप पुकारला आणि लोकल्स व इतर ट्रेन्स धावल्याच नाहीत तर मोठीच अडचण निर्माण होईल. तीच गोष्ट अन्नदात्या शेतकऱ्याबाबत. तीच गोष्ट आरोग्यसेवा पुरवणाऱ्या डॉक्टर्सबाबत.

संपाची कारणे :- लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केल्याप्रमाणे संपाचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे लक्ष वेधणे व मागण्यांची पूर्तता करून घेण्याचा प्रयत्न करणे. संपकऱ्यांच्या मागण्या ह्या त्या त्या क्षेत्रानुसार बदलतात. उदा. कुणाला पगारवाढ हवी असेल, कुणाला बोनस तर कुणाला हमीभाव, कर्जमाफी. कुणाला वेतनआयोग शिफारशी लागू करून हव्या असतील तर कुणाला काही सवलती हव्या असतील. कुणाला हल्ले रोखण्यासाठी एखादा कायदा हवा असेल तर कुणाला एखाद्या क्षेत्र-व्यवसायाबद्दल केलेला कायदा रद्द व्हायला हवा असेल. अशाप्रकारे विविध मागण्या त्या-त्या क्षेत्रातील मंडळींच्या असू शकतात.

रास्त आणि वाजवी मागण्या विरुद्ध अवास्तव आणि अवाजवी मागण्या :- खरं तर कुठल्याच एका क्षेत्रातील व्यक्तीला दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्तीच्या समस्यांची जाणीव पूर्णपणे होऊ शकत नाही. त्या व्यक्तीशी आपुलकीने बोलल्यानंतर अथवा प्रत्यक्ष त्याच्याबरोबर राहून काही काळ अनुभव घेतल्यानंतर सहवेदना निर्माण होऊ शकते. शेतकरी संपाच्या वेळेला भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्यानंतर, दूध ओतल्यानंतर काहीजणांनी हा संप भंपक व राजकीय किनार असलेला आहे असे मत व्यक्त केले तर काहीजणांनी शेतकऱ्याच्या जीवनाचे भयाण वास्तव समोर आणले.
     डॉक्टरांवर काही ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ले केल्यानंतरही दोन्ही बाजू समोर आल्या. त्यात काही डॉक्टर अवयवविक्री कशी करतात इथपासून ते उगीच चाचण्या करायला लावून पॅथॉलॉजी लॅबशी संधान साधून कसे कमिशन कमावतात याचीही माहिती समोर आली. पण डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण घेताना कसे कर्ज काढून प्रवेश मिळवला, खडतर शिक्षण कसे पूर्ण केले, शिकाऊ डॉक्टर असताना खेडोपाडी-दुर्गम भागात जाऊन कसे अनुभव घेतले असेही मन हेलावून टाकणारे प्रसंग समाजमाध्यमांतून छापून आले.
      एसटी कर्मचारी संपाच्याहीवेळी ऊन, पाऊस वाऱ्यात एसटी चालवणाऱ्या चालकांची हलाखीची परिस्थिती इथपासून ते शाळा-कॉलेज केवळ एसटी मुळे कसे शक्य झाले याचीही उदाहरणे दिली गेली.
     त्यामुळे मागण्या रास्त आणि वाजवीही असू शकतात अथवा अवास्तव आणि अवाजवीही असू शकतात. ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ हेच खरे! सारासार विचार करून , दोन्ही बाजू ऐकून घेऊन सुयोग्य निर्णय देऊन मार्ग काढण्याचे काम न्यायालयाचे आहे.


संप : हुकूमशाही आणि लोकशाही :- हुकूमशाहीत बऱ्याच गोष्टी चालत नाहीत आणि घडल्याच तर त्या निर्दयीपणे चिरडून टाकल्या जातात. लोकशाहीचा फायदा हा की, आचार विचाराचे स्वातंत्र्य, शासनातील लोकसहभाग, शासकांवरील संयत टीकाटिप्पणी, धोरणांचा विरोध हे होऊ शकते. लोकशाहीत मुक्तपणे व्यक्त होता येते. पण ‘हुकूमशाहीत ज्या गोष्टी चालत नाहीत त्या सर्वच लोकशाहीत चालतात, नव्हे तो आपला हक्कच असतो’ अशा गैरसमजात राहण्याचे काही कारण नाही. उदा. हुकूमशाहीत शासकीय उत्पादन कारखान्यातील कामगारांनी आळस अथवा कामात चालढकल केलेली चालत नाही; पण म्हणून ते लोकशाहीत चालेल असं नव्हे. हुकूमशाहीत राष्ट्रविरोधी बोललेले, लिहिलेले खपवून घेतले जात नाही याचा अर्थ ते लोकशाहीत चालवून घेतले जाईल असा नव्हे. काही गोष्टी समाजहित लक्षात घेऊन करायच्याच नसतात आणि संप ही त्यातलीच एक गोष्ट असं मला वाटतं.  

संप पारतंत्र्यातील जनतेचा आणि स्वतंत्र भारतातील जनतेचा :- पारतंत्र्याच्या काळात गांधीजींनी असहकार आंदोलनाची दिलेली हाक आपण इतिहासात वाचली आहे. त्यामागचा उद्देशच हा होता की, भारतीय लोक हे इंग्रज शासनयंत्रणा चालवण्यासाठी कार्यरत आहेत आणि त्यांनी काम करायला जर नकार दिला तर संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडेल व इंग्रजांना राज्य करणे कठीण होऊन जाईल. तेव्हा शासन परकीयांचे होते. आज घर आपले आहे; शासन स्वकीयांचे आहे. त्यामुळे गांधीजींनी केलेल्या असहकार आंदोलनाची काठी आधारासाठी घेऊन आपला संप समर्थनीय ठरवणे ही मोठीच चूक ठरेल. गांधीजी ‘यंग इंडिया’तील दि. २०.४.१९२१ च्या आपल्या एका लेखात म्हणतात, “असहकाराच्या चळवळीचा उद्देश इंग्रजांना आमच्याशी सन्मान्य अटींवर सहकार करण्याला आवाहन देणे हा नाही तर या देशातून त्यांना निघून जायला सांगणे हा आहे. ही चळवळ त्यांच्या आमच्यामधले संबंध शुद्ध पायावर रचणारी, आमच्या स्वाभिमानाला आणि प्रतिष्ठेला शोभेल अशारीतीने त्या संबंधाला रूप देणारी अशी आहे.”
     तेव्हा आज स्वतंत्र भारतात संप करून जनतेला वेठीला धरून आपल्या मागण्या मान्य करायला लावायच्या का हे ज्याचे त्याने ठरवायचे.

संप बुद्धिजीवी वर्गाचा आणि कामकरी वर्गाचा; संप सरकारी नोकरांचा आणि खाजगी कर्मचाऱ्यांचा :- संपकऱ्यांची वर्गवारी करायची झाल्यास ती प्रामुख्याने या दोन वर्गात आणि चार विभागात करता येईल.
डॉक्टर्स, वकील अशा बुद्धिजीवी वर्गाने केलेला संप व शेतकरी, एसटी चालक-वाहक अशांनी केलेला संप यात समान सूत्र ‘काम ठप्प होणे’ हेच असते. या संपांच्या समर्थनार्थ या वर्गवारीचा उपयोग नाही. म्हणजेच डॉक्टरांनी केलेला संप जितका चुकीचा तेवढाच शेतकऱ्यांनी केलेला संपही चुकीचाच.
     सरकारी नोकर खाजगी कंपनीच्या तुलनेत सहज संपावर जाऊ शकतात. लेखणीबंदसारखी भुक्कडगिरी करू शकतात. खाजगी कंपनीत संप केल्यास मालकाकडून त्वरित लत्ताप्रहार होण्याची शक्यता असते. मिल कामगार संपाने कशी वाताहत झाली हे आपल्याला ठाऊक आहे. नुकतेच पुण्याच्या सुप्रसिद्ध चितळे कंपनीतही कामगारांनी संप केल्याची बातमी होती. सैन्य, पोलीस कर्मचारी यांना तर संपावर जाण्याची मुभाच नाही.

संपाचे परिणाम :- संपाचे एकूण व्यवस्थेवर होणारे परिणाम हे तो संप कोणाचा आहे ह्यावर ठरत असले तरी वर म्हटल्याप्रमाणे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असल्याने परिणाम हा होतोच. त्यातून हा संप डॉक्टर्स, औषधविक्रेते, पेट्रोल पंप चालक अशांचा असेल तर प्रसंगी मानवी जीवन संपण्याची, कुणीतरी दगावण्याचीही शक्यता दाट असते हे अनुभवातून आपण वेळोवेळी पाहिले आहे. आणि खरंतर असे करण्याचा अधिकार कोणालाच नाही. संप राजकीय हेतूंनी प्रेरित असेल तर शासनावर त्याचा काही परिणाम होणारही नाही, पण बरेचदा संप अंशतः यशस्वीही होताना दिसतो. संपामुळे प्रश्नांवर तोडगा निघेलच अथवा ते सुटतीलच असे नसले तरी ते प्रश्न चर्चेत येतात हे नक्की. 


अंततः :- जी नोकरी अथवा जो व्यवसाय आपण स्वेच्छेने स्वीकारला आहे त्याबाबत पगारवाढ नाही, अडचणी आहेत, बोनस नाही म्हणून संप करणे चुकीचेच आहे. जपानसारख्या देशात म्हणे निषेध नोंदवायला अथवा मागण्या समोर ठेवायला अधिक तास काम करतात. खरे खोटे मला माहित नाही. पण भारतासारख्या देशात जिथे मठ्ठ शासन आहे तिथे अशा उपायांनी परिणाम होणार नाही हेही खरेच. एका उदाहरणात बूट बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांनी निषेध नोंदवायला अधिक तास काम करून फक्त एकाच पायातील बूट बनवून ठेवले जेणेकरून प्रशासनाला त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्यावेच लागले. असो. संपकऱ्यांच्या दृष्टीने काही अन्यायकारी, दमनकारी, शोषणयुक्त असेल तर योग्य ठिकाणी दाद मागावी, न्यायव्यवस्थेचा आधार घ्यावा; न पेक्षा नोकरी सोडून द्यावी. अन्यथा आज ह्यांचा संप उद्या त्यांचा संप ह्यात सगळ्यांचीच कामे रेंगाळतात ज्याचा एकूणच व्यवस्थेवर परिणाम होत असतो. तेव्हा जेवढ्या लवकर हे संप संपतील तितके बरे. 

Wednesday, March 22, 2017

राजसंन्यास


पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा ४ ज्ञात युवकांनी मध्यरात्रीच्या गहन काळोखात कापून काढला आणि तो जवळच्या प्रवाहात फेकून दिला. या प्रवाहपतित आणि दिग्भ्रमित तरुणांमुळे राम गणेश गडकरी हे नाव आणि त्यांची साहित्यकृती ‘राजसंन्यास’ नाटक हे दोघेही प्रकाशझोतात आले. अचानक महाराष्ट्रात पुन्हा राम गणेश गडकरी कोण होते? संभाजी महाराज चरित्र? आणि त्याआडून नेहमीचा आवडता खेळ ‘तुही जात कंची हाय ?’ हे सुरु झाले.

मीही जिज्ञासा शमविण्यासाठी ‘राजसंन्यास’ शोधण्याच्या मागे लागलो. शोध जवळच्याच वाचनालयात संपला. श्री. वसंत सावरकर यांनी चालवलेल्या वसंत वाचनालयाने दखल घेऊन माझ्यासाठी ‘संपूर्ण गडकरी’- खंड पहिला (१९८४ चे पुनर्मुद्रण) त्वरित शोधून काढले. त्यांना आणि कर्मचाऱ्यांना धन्यवाद देऊन नाटक वाचायला सुरुवात केली. आज ते वाचून पूर्ण केल्यानंतर ब्लॉगच्या वाचकांसमोर माझी प्रतिक्रिया व्यक्त करावी म्हणून हा लेखनप्रपंच.

या पाच अंकी नाटकाची सुरुवात मालवणच्या पाणकोट सिंधुदुर्गात होते. तुळशी, मंजुळा, दौलतराव, संभाजीराजे, तानाजी मालुसरेंचा मुलगा रायाजी, रायाजीची प्रेयसी शिवांगी, जिवाजीपंत, देहू, कबजी, हिरोजी, साबाजी, येसूबाई, ही प्रमुख पात्रे आहेत. मी ज्या प्रतीतून वाचले त्यात तरी सुरुवातीला पात्र परिचय दिलेला नाही त्यामुळे वाचकाला नाटक वाचता वाचता पात्रांचा आपसातील संबंध लावत लावतच पुढे जावे लागते.  संपूर्ण नाटक संभाजीराजांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहे अथवा त्यांच्याभोवती फिरते असे मला मुळीच वाटले नाही. सुरुवातीला संभाजीराजांचा प्रवेश आहे आणि शेवटी आहे. त्या दोन्ही ठिकाणी संभाजीराजे चारित्र्याने, स्त्री-संबंधाने थोडेसे ढिले होते असे दाखवले आहे. सुरुवातीला तुळशीबरोबरचे त्यांचे वागणे आणि शेवटचे साबाजीबरोबर बोलणे, जे बऱ्याचअंशी स्वगत प्रकारचे म्हणजे स्वतःच कबुली दिल्यासारखे आहे, (पहा पृ. २, ३, ४, ५, ६) या दोन ठिकाणी लेखकाने संभाजीराजांना रंगेल दाखवले आहे. ते आक्षेपार्ह वाटण्यासारखे आहे. 

जिवाजी/जिवाजीपंत हा कीर्द-खतावण्या लिहिणारा, लेखणी धरणारा, कारकुनी करणारा असा दाखवला आहे. त्याला स्पष्टपणे ब्राह्मण दाखविलेले नसले तरी तो बिगर मराठा असल्याचे त्याच्या स्वतःबद्दलच्या संवादातून जाणवते. त्याला स्वतःच्या कारकुनी पेशाचा माज आहे. लेखणीच्य ताकदीवर कुणाचेही बरेवाईट करू शकतो ही प्रौढी तो स्वतःच मिरवतो. पण त्याला नाटककाराने वाईटच दाखवले आहे. तो शिवाजीराजांबद्दल अनुदार उद्गार काढतो तसेच समर्थ रामदासांबद्दलही काढतो. रामदास स्वामींना अगदी एकेरी लेखून तो बोलतो. देहू नावाच्या पात्राला स्वतः पराक्रमी राजा होण्याची ईर्ष्या असते. तो अंगापिंडाने मजबूत असतो पण बुद्धीने थोडा कमीच दाखवला आहे, त्यामुळे त्याला हा जिवाजीपंत आपल्या घोळात घेतो आणि तुला जर शिवाजी सारखा राजा व्हायचे असेल तर रामदासासारखा कोणीतरी तुझ्यामागे हवा आणि तो मी होऊ शकतो अशी आशा दाखवतो. अशा कारकुनाशिवाय राजाचे चालत नाही वगैरे. पण त्यासाठी तो मोबदला मागताना दाखवला आहे. अगदी दारू-बाई असा मोबदला. त्यामुळे ह्या ब्राह्मण-ब्राह्मणसदृश पात्राला नाटककाराने चांगलेच वाईट, दुटप्पी भूमिका घेणारा असे रंगवले आहे हेही लक्षात घ्यावे लागेल. पहा पृ. १.
पहा पृ. १
साबाजी हा एक अत्यंत इमानी मावळा. तो कसेतरी करून संभाजीराजे ज्या छावणीत शेवटी कैद असतात तिथे बुरखा पांघरून प्रवेश मिळवतो आणि त्यांना तिथून बाहेर निघून जाण्याची विनंती करतो कारण त्याच्याकडे बेगमेकडून मिळवलेला एक शिक्का असतो ज्याच्या आधारावर कुठल्याही चौकशीविना विनासायास छावणीतून बाहेर निसटण्याची हमी तो राजांना देतो. पण धीरोदात्त संभाजीराजे त्याला नकार देतात. ह्या शेवटच्या भागात संभाजीराजे स्वतःच्या तथाकथित केलेल्या वाईट कृत्यांची कबुली देतात. सर्वांची माफी मागतात असे दाखवले आहे. यासाठी नाटककाराने कुठली ऐतिहासिक साधने वापरली आहेत, कुठल्या बखरी वगैरेंचा संदर्भ घेतला आहे, कुठल्या कागदपत्रांच्या आधारे हे सर्व लिहिले आहे ह्याचा बोध होत नाही. परंतु त्यातील काही संवाद हे मला व्यक्तिशः अयोग्य आणि अनाठायी वाटले. लेखकाला पात्र रंगविण्याची मुभा असली तरी संभाजीराजांसारखे ऐतिहासिक पात्र रंगवताना विशेष काळजी घ्यायला हवी होती. ज्यांनी प्राणांतिक हालअपेष्टा सोसूनही शेवटपर्यंत हिंदू धर्म सोडला नाही आणि अभिमानाने मृत्यूला कवटाळते झाले त्या संभाजीराजांबाबत बोलताना एवढे उद्गार काढणे अनुचितच वाटतात. केवळ हिंदुत्वाला चिकटून राहिल्याने छळछावणीत कितीही अत्याचार झाले तरी ‘हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार’ हे संभाजीराजांनीच दाखवून दिले! त्यामुळे थोडे तारतम्य बाळगता आले असते, पण ते लेखकाचे स्वातंत्र्य. खाली दिलेल्या काही उताऱ्यांवरून वाचकांना कल्पना येईलच पण वानगीदाखल हे उद्धरण पहा:-
संभाजी : गोब्राह्मणप्रतिपालक हिंदूपदपादशहा श्रीमंत छत्रपति संभाजीमहाराज! नाही, साबाजी, ही माझी किताबत नाही! संभाजी हा म्हणजे केवळ रंडीबाज छाकटा! काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकवटून छत्रपतींनी बांधिलेल्या राष्ट्रतीर्थाची – श्रीगंगासागराची ज्याने व्यभिचाराच्या दिवाणखान्यातील मोरी बनवली तो हा संभाजी ! वैराग्याच्या वेगाने फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूबाजाचे तोंड पुसण्याचा दस्तरुमाल केला !  महाराष्ट्रलक्ष्मीच्या वैभवाचा जरीपटका फाडून त्याची रंडेसाठी काचोळी केली ! साबाजी, माझ्या नऊ वर्षांच्या नावलौकीकाची इमारत नीटपणे पाहा ! चिटणीसाला हत्तीच्या पायाखाली तुडवून तिचा पाया घातला.  मातोश्री सोयराबाईसाहेबांना जितेपणी भिंतीत चिणून तिच्या भिंती उभारल्या; ती पातकी इमारत उंचावता उंचावता कळसाला पोचण्यापूर्वीच कोसळून तिच्याखाली संभाजीचा चुराडा होऊन गेला. ...
 पहा पृ. २
 पहा पृ. ३
 पहा पृ. ४
 पहा पृ. ५
पहा पृ. ६
इत्यादि मजकूर हा खचितच संभाजीराजांना मानणाऱ्या कुठल्याही धर्माभिमान्यास लागेल असाच आहे. त्यातून त्यांचा पुतळा संभाजी उद्यानात असणे हे थोडेसे विपरीतच आहे. आता पुतळा आधी बसवला की उद्यानाचे नामकरण आधी झाले ही माहिती ह्या संदर्भात महत्वाची असली तरी ती माझ्याकडे तूर्तास नाही. आणि कसेही असले तरी  अर्थात त्यांचा पुतळा उखडून टाकणे आणि तोही मध्यरात्रीच्या काळोखात ह्यात काय शौर्य आहे देव जाणे. आणि ती गोष्टही आत्ताच का व्हावी हे सांगायलाही कोण मोठ्या राजकीय विश्लेषकाची आवश्यकता नाही. असो. कसेही असले तरी नाटकातून संभाजीराजांच्या प्रतिमेला मलीन केल्याचे जाणवते आणि हे माझे व्यक्तिगत आकलन आणि मत आहे.


Wednesday, August 17, 2016

गोहत्याबंदी, गोरक्षा आणि गोरक्षक

प्रस्तावना - सहिष्णुता हे हिंदू समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. दुसऱ्याची बाजू समजून घेणे, त्याच्या मताचा आदर करणे पण त्याचवेळी आपली तत्वे, निष्ठा यांचा त्याग न करणे हे हिंदू समाजासाठी नवीन नाही. दुसऱ्याला जबरदस्तीने आपले मत मानायला लावणे, अत्याचार करून आपला विचार त्याच्यावर लादणे, दंड देऊन आपला पाईक बनवणे हे हिंदुत्वाला मान्य नाही.
हिंदू हा सृष्टीशी आपले नाते जोडणारा निसर्गपूजक समाज आहे. इथले सण-उत्सव, परंपरा या निसर्गाशी जोडलेल्या आहेत. वटपौर्णिमा, नागपंचमी, बैलपोळा, बैसाखी, बिहू असे कित्येक उत्सव हे सृष्टीशी असलेल्या आपल्या नात्याचे स्मरण करण्यासाठी आहेत. इथल्या कथा-कहाण्या-पुराण यातूनही हा विचार प्रकट होतो. मग देवतांचे वाहन म्हणून अगदी उंदरापासून राजहंसापर्यंत सर्वांना स्थान आहे. खारीपासून जटायूपर्यंत सर्वांनी आपले धर्मरक्षणाचे कर्तव्य येनकेनप्रकारेण बजावलेले आहे.
सहिष्णू याचा अर्थ स्वत्व हरवलेला, स्वाभिमान संपलेला असा होत नाही. त्याचमुळे इथल्या देवता शस्त्रसंपन्न आहेत. आई भवानी, कृष्ण, विष्णू, मारुती, महादेव या सर्वांचे आपापले शस्त्र आहे. पुराणातून अस्त्रांचा उल्लेखही आढळतो. कारण शस्त्रांशिवाय शास्त्रे टिकवता येत नाहीत याची जाणीव हिंदू समाजाला आहे. संस्कृत भाषा पहिली असता हिंसा/मारणे यासाठी विपुल शब्दभांडार, क्रियापदे मिळतील. संस्कृत शब्दकोशातील पान दर पान अशा शब्द-क्रियापदांनी भरलेले आहे. आर्य मांस खातच नसतील असे मी छातीठोकपणे म्हणून शकत नाही. किंबहुना नदीच्या काठावर स्थिर होईपर्यंत, शेतीसाठीचा सलग कालावधी वास्तव्यासाठी मिळेपर्यंत क्षुधाशांतीसाठी आर्य सामिष भोजन करतही असावेत. काही सुभाषितांमध्ये मांस खाण्याचा उल्लेख आढळतो, उपनिषदात मांस शिजवून खाण्याचा विधी आहे. स्वामी विवेकानंदानी मांसाहार करण्याचा स्वीकार केलेला आहे. पूर्वांचलातील काही जनजाती ज्या अजून ख्रिश्चन झालेल्या नाहीत त्यामध्ये अजूनही गोमांस खाल्ले जाते. या सर्वाचा संदर्भ पुढे येईलच पण तूर्तास एवढे निश्चित की इथला समाज हा शाकाहार-मांसाहार याबाबत अत्यंत आग्रही होता असे वाटत नाही.
आपल्या इथे काही गोष्टी या पवित्र मानल्या गेल्या आहेत. तसा संस्कार हिंदू मनावर असल्यामुळे आणि त्याचे नैसर्गिक, व्यावहारिक, शास्त्रीय, प्राकृतिक, वैज्ञानिक फायदे असल्यामुळे. उदा. तुळस, आंब्याची पाने, नारळ, गाय या आणि अशा निसर्गातील घटकांना समाजाने पवित्रता प्रदान केली. ह्यातला गाय हा अत्यंत गरीब प्राणी. उपमाही दिली जाते ‘गरीब गायीसारखा’!
गाय, तिचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ - भारत हा कृषिप्रधान देश आहे. म्हणजेच येथील बहुसंख्य जनता प्रामुख्याने शेती, शेतमजुरी, शेतमाल, धान्य, वितरण अन्य उत्पादने त्याचा व्यापार यावर उदरभरणासाठी अवलंबून आहे. आणि भारतातील शेती ही बैल, रेडे यांना नांगराला जोडून केली जाते. बैलांची उत्पत्ती ही गोवंशातूनच होते. गायीचा तर सर्वार्थाने उपयोग होतो. बाळाला मिळणारे आईचे स्तनपान सुटल्यानंतर दूध प्रामुख्याने उपलब्ध होते ते गाईपासून. गाईच्या दुधापासून दही, ताक, लस्सी, चक्का, लोणी, तूप, मस्का, पनीर असे अन्य दुग्धजन्य पदार्थ होतात, ज्याचा केवळ पौष्टिक म्हणून नव्हे, तर समारंभात वा कार्यक्रमात पेढा, श्रीखंड, खरवस, मिठाई, खवा, बासुंदी अशारीतीनेही वापर होतो. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त गायीचा उपयोग मोठा आहे. गोमूत्र, शेणाने जमीन सारवणे, शेणखत, बायोगॅस आणि मृत्यूनंतर चामडे याहीदृष्टीने गाईचा उपयोग होतो. असा अन्य कुठल्याही प्राण्याचा भारतात सर्वार्थाने उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्याला कामधेनु म्हणून गाईचे महत्व कळायला परिश्रम पडू नयेत. म्हणूनच गाईच्या स्थानी ३३ कोटी देवांची कल्पना केली गेली, गोग्रास, गोस्पर्श याला महत्व दिले गेले, गोपालन करणारा गोपाल हा आमचा भगवान श्रीकृष्ण महाराज झाला. दही-दूध-लोणी चोरणारा सर्वात मोठा चोर (चौराग्रगण्यं) बनला आणि एकूणच समाजाने हे गाईचे महत्व ओळखले. पिढ्यानपिढ्या गाईला पूज्य मानणारा समाज इथे वास्तव्य करून आहे. त्यामुळे ह्या देशाच्या संस्कृती आणि परंपरेत गाईचे महत्व आणि स्थान वादातीत आहे. पण याचे महत्व घोड्याने शेती करणाऱ्या आणि उंटाचे दूध पिणाऱ्या समाजाला कळणे कठीणच आहे. असे असूनही शेवटी गाय-बैल भाकड झाल्यानंतर त्यांचा त्याग शेतकऱ्याला करावाच लागतो. अर्थात जर त्याला भाकड गाई-बैल यांच्यापासून आधुनिक मार्गाने पैसे कसे कमवावे हे माहित नसेल तर (काही ठिकाणी असे प्रयोग झाल्याचे वाचले आहे) अथवा त्याची भावनिक गुंतागुंत नसेल तर. अशा परिस्थितीत कोणी न्यायचे या पशूंना? किंवा हे प्राणी मेल्यानंतर काय करायचे? ढोर ओढणारा वेगळा समाज अस्तित्वात आला. गावकुसाबाहेर राहणारा, चामडे कमावणारा, पायताण शिवणारा असे समाजगट पिढ्यानपिढ्या हे काम करत राहिले. स्वतःला हिंदू समजत आले. इतरांनी त्यांना हिंदू म्हणून वागवले का? सन्मानाची वागणूक दिली का, मुख्य प्रवाहात, ग्राम उत्सवात सामील करून घेतले का, मंदिर प्रवेश मुक्तपणे दिला का, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिले का हे प्रश्न अगदीच अप्रासंगिक नाहीत पण लेखनसीमेस्तव आत्ता तूर्तास सोडून द्यायला हवेत.
गोमांस भक्षण - तेव्हा इथल्या समाजातील काही घटक गाईला – बैलाला मारून त्याचे मांस खातात. अन्य हिंदू समाजही गाय सोडल्यास अन्य प्राण्यांवर यथेच्छ ताव मारतो. रानडुक्कर, ससा, कासव, बकरा, कोंबडी, मासे, खेकडे, बदक, मांजर हे खाणार्यांची संख्या विपुल आहे. बृहदारण्यक उपनिषदात ‘ज्याला ख्यातनाम विद्वान, सभा गाजवणारा, ऐकत रहावेसे शब्द बोलणारा, सर्व वेद जाणणारा, आणि दीर्घायुष्य लाभलेला असा पुत्र हवा असेल त्याने आपल्या बायकोसोबत तूप घालून असा भात खावा ज्यात तरुण अथवा मोठ्या बैलाचे मांस शिजवून घातले आहे. अशाने ते (दाम्पत्य) अशाप्रकारच्या मुलाला जन्म देऊ शकतील.” हा ६.४.१८ चा स्वैरानुवाद आहे. स्वामी विवेकानंदांनीही मांसाहार करण्याचे समर्थन केले आहे. मग गायच का अपवाद ठरावी? हा प्रश्न अप्रस्तुत नाही. त्याचे उत्तर गाईला बहुसंख्य हिंदू समाज पूज्य मानतो आणि वर म्हटल्याप्रमाणे कृषिआधारित अर्थव्यवस्था असल्याने गोवंशरक्षण हवे. शिवाय वर उल्लेखलेल्या प्राण्याचे उपयोग असले तरी गाईएवढा सर्वार्थाने उपयोग कुठल्याही प्राण्याचा होत नाही. 
गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर - हिंदुस्थानातील हिंदुत्वाची कास धरणारे दोन महान नेते म्हणजे गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर! दोघांनीही गाईला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. पण दोघांनी विविध मार्गाने आणि वेगवेगळी कारणे देऊन गोरक्षणाचे महत्व अधोरेखित केले. गांधीजींचे थोडेसे धार्मिक, सांस्कृतिक, पूज्यभावना या अंगाने जाणारे तर स्वातंत्र्यवीरांचे वैज्ञानिक, practical, उपयुक्तता या अंगाने जाणारे. पण अंततोगत्वा गोवंश राहावा, त्याचे रक्षण व्हावे हीच दोघांची मनीषा! गांधीजी म्हणतात, “THE COW is a poem of pity. One reads pity in the gentle animal. She is the mother to millions of Indian mankind. Protection of the cow means protection of the whole dumb creation of God. The ancient seer, whoever he was, began with the cow. The appeal of the lower order of creation is all the more forcible because it is speechless. (YI, 6-10-1921, p. 36)
My ambition is no less than to see the principle of cow protection established throughout the world. But that requires that I should set my own house thoroughly in order first. (YI, 29-1-1925, p. 38)
My religion teaches me that I should by personal conduct instill into the minds of those who might hold different views, the conviction that cow-killing is a sin and that, therefore, it ought to be abandoned.
(YI, 29-1-1925, p. 38)
या आणि अशा धर्तीवर गांधीजींनी अनेक ठिकाणी आपले गोवंशरक्षणाबद्दलचे विचार प्रकट केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, “गोरक्षणाचे दृष्टीनेही आजच्या वैज्ञानिक युगात पशूस देवता मानणारी ती खुळचट गोमहात्मे सांगून भागणार नाही. तसली भाबडी प्रवृत्ती राष्ट्रांत पसरविण्याचे सोडून जर आमचे गोरक्षक व्याख्याते ह्या कृषिप्रधान देशांत त्या उपयुक्त पशूचा आर्थिक उपयोग किती मोठा आहे, गायीची नि बैलाची वीण कशी वाढवावी, त्यांच्या मलमूत्रांची खते कशी करावी, गायीच्या दुधा-तुपाचे संवर्धनाचे प्रयोगहि उत्कृष्ट प्रकार कोणते, गुण कोणते, हे सर्व प्रयोगसिद्ध नि रासायनिक घटकांसह प्रत्यक्षनिष्ठ भाषेत सांगतील नि गोशाळाप्रभृति  संस्था गायीच्या आणि बैलाच्या जोपासनेचा मनुष्यास अधिकात अधिक प्रत्यक्ष उपयोग कसा होईल याच ऐहिक दृष्टीने चालवतील तरच आता गोरक्षणाचे महत्त्व लोकांस अधिक पटणारे आहे.” त्यामुळे गोवंशरक्षण झाले पाहिजे याबद्दल दुमत नाही. गोपालन आणि गोरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वच गोपालन करणारे असतील आणि गोहत्या कोणी करणार नसेल तर गोरक्षणाचे प्रयोजन उरत नाही. पण कोणी गाय कापणार असेल, वासरे मारणार असेल तर मग गोरक्षणासाठी काहीजण आक्रमक होऊ शकतात. शिवचरित्रात बाल शिवाजीचा एक प्रसंग वाचायला मिळतो. कसाई गायीला ओढत-फरफटत नेत होता. बाल शिवाजीने त्याला थांबवून गाईला सोडून देण्याची विनंती केली. साहजिकच कसायाने नकार देत आपले काम चालूच ठेवले. त्यावर डोळ्यात खदिरांगार फुललेल्या त्या तेजस्वी बाल शिवाजीने पूर्वकल्पना देत त्या कसायाचा हात बुंध्यापासून उडवला. तेव्हा संस्कृतीच्या मानबिंदूंची, प्रतिकांची विटंबना, हत्या होताना लोक आक्रमक होण्याची शक्यता टाळता येत नाही. पण त्यावेळची परिस्थिती, राज्यव्यवस्था, कायदेपद्धती, संविधानाचे राज्य याचाही विचार व्हायला हवा. अथवा एकाने केलेली हत्या योग्य आणि दुसऱ्याने केलेली चूक असे म्हणता येणार नाही. मुळात भारतीय संविधानात गोहत्या रोखण्याच्या दृष्टीने कायदेमंडळाने प्रयत्न करावेत असे मार्गदर्शक तत्व आहे. तेव्हा घटनेचा आधार गोवंश हत्याबंदीला आहे. आता बऱ्याच राज्यांनी गोवंशहत्याबंदीचे कायदे लागू केले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊन मारहाण करणे, शेण खायला लावणे असले प्रकार होताच कामा नयेत.
वर्तमान घटना - चरखी-दादरी या उत्तर प्रदेशातील ठिकाणी गैरमुस्लिम जमावाने अखलाक नावाच्या एका मुस्लीम माणसाला मारले. कारण दिले गेले की त्याच्याकडे गोमांस होते. त्याच्या परसदारी वासराचे पाय सापडले इत्यादि. पुढे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (forensic lab) कदाचित हे सिद्धही झाले असेल की त्याचेकडे गोमांस होते. पण म्हणून जमावाने त्याच्या केलेल्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही. दिल्लीत डॉ. नारंग नावाच्या एका उमद्या हिंदू तरुण दंतवैद्यकाची हत्या बिगरहिंदू जमावाने केली. त्यावर मोठे रान उठले नाही ते कदाचित डॉ. नारंग हिंदू असल्याने असेल आणि या प्रकरणात गायीचा काही संबंध नव्हता. पुन्हा एक दृश्य झळकले की काही दलित तरुणांना एका गाडीला दोरीने बांधून त्यांना लोखंडी सळयांनी काही तरुणांनी मारले. (http://abpmajha.abplive.in/india/gujrat-una-dalit-protest-in-loksabha-rajyasabha-255341) आरोप हाच की ते गोवंशाची तस्करी करत होते. महाराष्ट्रातही पुण्याजवळ नसरापूर येथे मारहाण झाली ( http://abpmajha.abplive.in/pune/pune-bogus-gorakshak-allegedly-beaten-up-trader-of-nasrapur-265767 ), काही ठिकाणी अशाप्रकारे गायींची वाहतूक करणाऱ्यांना जबरदस्ती शेण खायला लावण्यात आले. मला व्यक्तिशः गोसेवेसाठी झटणाऱ्या, केसेस दाखल करणाऱ्या एका वकिलाचा पुढीलप्रमाणे मेसेज आला - India Today: Karnataka Chief Minister Siddaramaiah's son Rakesh passes away in Belgium. http://google.com/newsstand/s/CBIwgfbc0yw
Siddharamaiah as soon as becoming CM of Karnataka started Cow slaughtering in the state which was stopped by the then BJP govt. when they were in power.
Baap ke Paap ne Bete ko nigal liya.
Om shanti shanti shanti.
Let's see who is the next target in his family.
आणि एकुणातच देशभर असे ‘गोरक्षक’ जोमाने ‘कामाला’ लागल्याचे दिसले. आरोप-प्रत्यारोप होत राहिले. अशांनी नाहक बळी जातातच पण त्याचे चित्रीकरण पुढील दहशतवादी तयार व्हायला उपयुक्त ठरते. त्यामुळे  अशा तऱ्हेचे सामाजिक सौहार्द बिघडविण्याचे प्रयत्न चालू असताना कडक शासन, अशा गडबड करणाऱ्या तत्वांना समज देण्याचे काम कोणीच करताना दिसून येईना. गुजरातच्या उना येथील तरुणांना गाडीला बांधून मारतानाचा व्हिडिओ पाहून मीही व्यथित झालो. फेसबुकवर त्यादिवशी १ ऑगस्ट ला माझा विचार प्रकट केला.   
आणि या सर्व विचित्र पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना या संदर्भात एक प्रश्न विचारला गेला आणि ते बरसले. (http://indianexpress.com/article/india/india-news-india/pm-narendra-modi-says-he-gets-angry-at-those-running-shops-in-name-of-cow-protection-2958092/) ८०% गोरक्षक बोगस असल्याचे म्हणाले. ७ ऑगस्ट ला हे वृत्त आले. ह्यामुळे काही नमोभक्तही नाराज झाले. ते म्हणू लागले की आम्हाला आता आरोपी असल्यासारखे वाटते आणि मुळात मोदींनी ही ८०% टक्केवारी आणली कुठून? आता मुळात जेव्हा नरेंद्र मोदींसारखा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आणि पंतप्रधान काही विधान करतो तेव्हा त्याला काही आधार तर असेल. आपल्याला जी माहिती कळते, दिसते, दाखवली जाते त्यापेक्षा अधिक माहिती त्यांना निश्चितच प्राप्त होत असली पाहिजे आणि तीही अखिल भारतीय स्तरावर. आणि मुळात आपण आपल्याला ८०% का समजावे आपण त्या २० टक्क्यातले आहोत असे समजावे; नव्हे तसा विश्वास हवा. कर नाही त्याला डर कशाला. आता राहता राहिला मुद्दा ८०% च का? तर त्याचा अर्थ ‘बहुतांश’ असा असावा. कारण मोदी म्हणाले ८०% गोरक्षक हे गोरक्षणाच्या नावाखाली अवैध धंदे करत आहेत याचा अर्थ देशात एक लाख अमुक हजार अमुकशे अमुक गोरक्षक आहेत आणि त्यातील ऐंशी हजार तमुकशे तमुक लोक अवैध धंदे करतात असा होत नाही. 'त्या शाळेतील ५०% शिक्षक चांगले आहेत, ५०%हून अधिक वकील नाडतात, ७०% डॉक्टरांचे केमिस्टशी साटंलोटं असतं' या आणि अशा विधानांमागे खरोखरीची टक्केवारी, प्रमाण नसते. त्यामुळे ८०% म्हणजे बव्हंशी, मोठ्या प्रमाणावर. आणि शिवाय उघड झालेल्या घटनांवरून ते दिसतच होते. त्यामुळे कुणाही गोभक्ताने व्यथित होण्याचे काहीच कारण नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका – गोरक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पहिल्यापासूनच आग्रही राहिला आहे. द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात गोहत्या बंदीसाठी देशभर स्वाक्षरी संग्रह करण्यात आला आणि तत्कालीन राष्ट्रपतींना तो देशाची मागणी म्हणून देण्यात आला. हा सनदशीर प्रयत्न होता. अन्यथा त्याचवेळी हिंसेचे समर्थन करून जबरदस्तीने गोहत्या थांबवण्याचा प्रयत्न संघाने केला असता. पण लोकशाही मूल्यांवर अढळ निष्ठा असणाऱ्या संघाने स्वाक्षरी संग्रह केला. सामाजिक सौहार्द नाही बिघडवला. म्हणून वर्तमान घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वक्तव्यानंतर संघानेही आपले अधिकृत विधान माननीय सरकार्यवाहांचे वक्तव्य म्हणून ७ ऑगस्ट ला प्रसिद्ध केले.
त्यामुळे आता संदेश स्पष्ट आहे. हिंदुत्व चळवळीला बदनाम करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तत्वांवर राज्य सरकारांनी कठोरतेने कारवाई करायला हवी.

Friday, April 29, 2016

कन्हैय्याचा खेळ...

कोणत्याही समाजव्यवस्थेत जेव्हा एखादा गट, एखादी विचारधारा सर्वात प्रबळ होते तेव्हा त्याचा व्यत्यास म्हणून स्वाभाविकपणेच विरुद्ध विचारधारा, विरोधी नेतृत्व प्रबळ होण्याचा प्रयत्न करते. मग भांडवलशाहीच्या विरोधात उदयाला आलेल्या साम्यवाद असेल किंवा साम्यवादाला टक्कर देणारा धार्मिक उन्माद असेल, अशारीतीने एक गट प्रबल झाला की दूसरा आपलीही हत्यारे परजून येतो, त्यात नेतृत्व उभे राहते, घडत जाते.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन हे आणि असे अन्य नेते हे त्यांना संघटनात्मक प्रशिक्षणाची पार्श्वभूमी असली तरीही त्यावेळच्या विरोधाच्या वातावरणामुळे अधिक झळाळून उठले. त्यांचे नेतृत्व हे काळाच्या कसोटीवर तावून-सुलाखून निघाले. आंदोलनातून नेतृत्व सिद्ध होत गेले. संघर्षातून फळ साध्य होत गेले. अर्थात त्यामागे केवळ विरोध नसून विधायक कार्याची आस, साधनशुचिता, ध्येयनिष्ठा, तळमळ या आणि अशा गुणांचा आग्रह होताच. पण तरीही विरोध असला की अधिक बलवान कोंब बाहेर पडून सशक्त बनत जातो हा निसर्गनियमच आहे.

हार्दिक पटेल, कन्हैय्याकुमार हे या निसर्गक्रमाचेच निकाल आहेत. आऊटकम आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजप यांचा विजय जसा निश्चित होऊ लागला तसे अगदी शिवसेनेने सुद्धा (अर्थात त्यांच्या सवयी आणि संस्कारांप्रमाणे) दामोदरदास मोदी यांचेही नाव जाहीर सभेतून काढायला कमी केले नाही. अफजलखानाच्या फौजा वगैरेही आले. विरोधकांनी मोट बांधायचा प्रयत्न केला. अगदी कसोशीने केला. पण प्रत्यही दिसणारे प्रचंड घोटाळे, विकासकामांबाबतची उदासीनता, बिनकण्याचे नेतृत्व या आणि अशा गोष्टींमुळे विटलेल्या जनतेने बदल घडवून आणला. आणि भाजप अगदी सुरक्षित बहुमताने सत्तेवर आला. नरेंद्र मोदींचे निर्विवाद नेतृत्व शीर्षस्थानी जाऊन बसले आणि विरोधक म्लानमुखाने आपला पराभव स्वीकारता झाले. अगदी त्याचवेळेला हे स्पष्ट होते की विरोध वाढणार.

विरोधकांना सावरायला वेळ हवा होता. नवे हीरोज शोधायला अवकाश हवा होता. गुजरातेत हार्दिक पटेल ला हवा देऊन झाली. त्यावेळी पटेल समाजाने हार्दिक नावाच्या नवतरुणाच्या नेतृत्वाखाली असे आंदोलन छेडले की कुणाला वाटले हा मोदींना आता आव्हान उभे करणार. बिहारमधील नितीशकुमार आणि आघाडीच्या विजयाने पुन्हा धुगधुगी आली. आणि इथेच कन्हैय्याचा जन्म निश्चित होता!

कन्हैय्यामध्ये विशेष काहीच नाही. मोदींच्या झंझावाती लाटेने विरोधकांच्या भूगर्भात जी प्रचंड पोकळी निर्माण झाली ती भरून काढायला कोणीही चालला असता.. राहुल गांधीत तेही झेपण्याचे, झेलण्याचे किमान सामर्थ्य नाही त्यामुळे मग कन्हैय्या सारखे नेतृत्व उभे राहते, मिरवते! आणि त्याला दत्तक घ्यायला सप्तर्षी, केतकर, मानव, नितीश अशा टुकारांची रीघ लागते. समाजवादी विचारसरणीला, चळवळीला घरघर लागून कित्येक वर्षे झाली. झब्बा-लेंगा घालून आणि शबनम लावून फिरणाऱ्या काळ्या दाढ्या पांढऱ्या झाल्या पण म्हणावा तसा तरुणांचा भरणा झाला नाही. युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दल वगैरे फसलेले प्रयोग आशा ठेवून बसले. संघटना बांधता आल्या नाहीत. आणि त्याचवेळेला ह्या समाजवादी विचारसरणीने ज्या संघ विचारधारेला विरोध केला ती वाढत गेली. खाकी चड्डी, प्रत्यक्ष शाखेत महिलांना नसलेला प्रवेश, हिंदुत्व, भगवा झेंडा या सर्वावर टीका-टिप्पणी, टिंगल करूनही संघाचे काम भारतभर वाढले. अधिकाधिक तरुण संघधारेत स्वतःहून सामील होत गेले. संघविचार घेऊन चालणाऱ्या अन्याय संस्था विविध क्षेत्रात आदर्श काम उभे करू लागल्या. सेवाकार्यांचे प्रचंड जाले अनेक समाजोपयोगी प्रकल्प संघ कार्यकर्त्यांनी उभे केले. आणि तशातच सार्वत्रिक निवडणुकात संघ विचारधारेला सर्वात जवळ असणारा राजकीय पक्ष भाजप राजकीय व्यासपीठाचे केंद्रस्थान व्यापून राहिला.

ह्यामुळे विरोधाच्या अळंब्या उगवणार हे निश्चित होते. हार्दिक पटेल चे आंदोलन, FTII मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन, जेएनयू मधील विद्यार्थ्यांचे (बेरोजगारांचे?) आंदोलन याला भाजपविरोधी पक्ष, नेते यांजकडून हवा मिळत गेली. प्रस्थापित व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात लढा देण्यात नेहमीच मजा असते, तरुणाईला ते हवेहवेसे असते. विधायक कार्यापेक्षा ते सोपे असते. आणि नेहमीच विघातक कार्य हे तुलनेने सोपे असते. झाड तोडणे सोपे पण वाढवणे कठीण! सुरुंग लावून शाळा उडवून देणे सोपे पण चार विद्यार्थ्यांना एकत्र करून शिकविणे कठीण! त्यामुळेच असे Anti-establishment लढे जगभर होत राहतात आणि त्यातला विचार हा खरोखरच चांगला असेल, अन्याय्यकारक राजवटीच्या विरोधात असेल तर समाज तो विचार उचलून धरत वेळप्रसंगी जुलमी सत्ता उलथवूनही टाकतो.

त्यामुळे हे समजून कन्हैय्या आणि जागोजागच्या आंदोलनांशी व्यक्त होण्याची रणनीती आखली पाहिजे. प्रसारमाध्यमांना कुणीही चालतो. बातम्या देणे याहीपेक्षा बातम्या तयार करण्याकडे हल्ली कल असतो. बातम्या दरवेळी असतातच नाही. किंवा विधायक बातम्या असतातही. पण त्यावर च्यानेल चालत नाही. अशावेळेला घटना फुगवून दाखवणे, हवा देणे, भडकवणे अशी कामे प्रसारमाध्यमे शांतपणे करीत असतात. तेव्हा जेएनयू मधील अफजल गुरूच्या वर्षश्राद्धाच्या वेळेला जमलेली टोळकी ही तद्दन रिकामटेकडी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे Anti-establishment खाज असलेली आहेत. अन्यथा अन्य संस्थांमध्ये खरंच मान मोडून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे करायला वेळाही नसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच उदाहरण घ्या ना! कशा खडतर अवस्थेतून त्यांनी आपला मार्ग बनवला. असे कित्येक दलित, सवर्ण विद्यार्थी आज विविध शैक्षणिक संस्थानांमध्ये विद्याभ्यास करत आहेत. त्यामुळे पहिल्या भाषणात आपली जी गरिबी कन्हैय्याने गाईली तिच्या अगदी विपरीत वर्तन त्याचे आहे. आणि तो तथाकथित पुरोगामी पक्षांनी उभा केलेला एक कठपुतली बाहुला आहे जो त्याचे बोलविते धनी हलवत राहणार तोपर्यंत हलत राहणार. त्यावर अधिक वेळ घालविण्याची आवश्यकता नाही. अगदी संपूर्ण देशातील तरुणाई अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली होती. आज काय अवस्था आहे? तेव्हा अशा तात्कालिक, धनपूरित, राजकीय हेतूप्रेरित आंदोलनांना विरोध करायची आवश्यकता नाही. ती आपोआपच थंड होणार आहेत कारण ते तोतयांचे बंड आहे.

या सर्वांमध्ये नरेंद्र मोदी काय करत आहेत हेही जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. नरेंद्र मोदी अक्षरशः अनुल्लेखाने अशांना मारत आहेत. परदेश प्रवास, त्यात भारताला दूरगामी फायदे मिळवून देणारे करार, संबंध दृढ करणे, हिंदू संस्कृतीचा विश्वसंचार कसा होईल हे पाहणे, देशांतर्गत विकासकामे, वीजनिर्मिती, रस्ते बांधणी, पारदर्शी व्यवहार, स्वच्छता, आरोग्य अशा विषयांवर ते काम करत आहेत. त्यांच्याकडे अशा आंदोलनांवर बोलायलाही वेळ नाही. कन्हैय्या “मोदी जी का सूत पकडकर बोलू” असं बोबड्या शैलीत टाळीखेचक म्हणाला तरी मोदी गप्पच! मन की बात मधेही एकदम वेगळेच विषय. म्हणजे थोडक्यात कबड्डीच्या खेळाप्रमाणे आपल्या पाल्यात घुसून ‘असहिष्णुता, असहिष्णुता, आजादी, आजादी’ असे ओरडणाऱ्या, घुमणाऱ्या खेळाडूला मोदींसारखा अनुभवी कप्तान फक्त जोखत आहे. अक्ख्या टीमला मागेच राहायची खूण करत आहे कारण अजून खऱ्या समस्यांची टचलाईन कन्हैय्याने टच केलेलीच नाही. मोदींचे उत्साही पाठीराखे पुढे गेले तर ते बाद होणार आहेत कारण कन्हैय्याला समस्या सोडवण्यात रस नाहीचे. त्याला केवळ गडी बाद करायचे आहेत, जाळ्यात ओढायचे आहेत, चांगल्या कामावरून लक्ष हटवायचे आहे. वात पहायची ती त्याचा दम निघेपर्यंत. तो उत्तेजक विधाने करणार, मोदी मराठवाड्यात आले नाहीत म्हणणार पण विचलित होण्याची काहीच गरज नाही कारण मराठवाड्यातील जनता जाणेल सरकार काय करते आहे. त्याचा दम निघाला की जाईल वापस! हार्दिक आहेच तिथे उभा घाम पुसत. तेव्हा घटनेने दिलेल्या अधिकारात तो सभा घेत असेल, भाषणे ठोकत असेल तर करू द्या त्याला. भाषणांना गर्दी होऊनही पुढे काय होते हे आपण जाणत नाही काय! त्याला भारतभर फिरू द्या. त्याच्यामागच्या शक्तींना आसुरी आनंद मिळू द्या. न्यायालयाने त्याला संपूर्ण निर्दोष ठरविलेले नाही. तो निर्णय योग्यवेळी होईलच तूर्तास नाटकाचे खेळ पाहत राहणे, आज मुंबई, उद्या पुणे, परवा अमरावती.. निवडणुकात विशेष खेळ..काही जागा राखीव!

Tuesday, February 2, 2016

लोकसंख्या असंतुलन आणि भविष्यातील आव्हाने

भारताची लोकसंख्या हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. पण हीच लोकसंख्या त्यातील तरुण वर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे नवीन शक्तीच्या स्वरूपात उभी होताना दिसत आहे. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला हात ही जरी प्रथमतः सरकारची जबाबदारी असली तरी अनेक संस्था संघटना या दिशेने काम करत आहेत. चीन ने सुद्धा आपले ‘एक कुटुंब: एक अपत्य’ हे धोरण आता सोडून देऊन दोन अपत्यांचे नवे धोरण अंगिकारले आहे. त्यामागे कमी होत जाणाऱ्या तरुण लोकसंख्येचाही विचार त्यांनी केला आहे.
भारतामध्ये लोकसंख्येचा हा प्रचंड डोलारा आणि त्याचा नैसर्गिक तथा मानवनिर्मित संसाधनांवर पडणारा ताण हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच भारतात ‘हम दो-हमारे दो’ ह्या घोषणेचा जाणीवपूर्वक प्रसार केला गेला.  दोनपेक्षा जास्त अपत्ये असतील तर निवडणूक लढविण्यास बंदी अथवा निर्वाचित सदस्याला अनर्ह ठरविणे असेही बदल कायद्यात केले गेले. पुढे जाऊन ‘हम दो-हमारा एक’ हेसुद्धा रूढ होऊ लागले.  पण केवळ हिंदू समाज जर ही बंधने स्वतःवर घालून घेणार असेल किंवा त्याचे पालन करणार असेल आणि अन्य काही समाजघटक मात्र ‘हम पांच-हमारे पच्चीस’ या बेजबाबदार भूमिकेतून वागणार असतील आणि होणारी अपत्ये हे कुणा ईश्वरी शक्तीचे देणे मानणार असतील तर ह्या प्रश्नाचा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करावा लागेल. कुणा संप्रदायाने संततीनियमनाच्या साधनांना धर्मबाह्य ठरवायचे (पहा : पोप यांचे मे २००५ मधील भाषण, मार्च २००९ मधे पोप बेनेडिक्ट १६ वे यांचे कॅमेरून देशाच्या भेटीदरम्यानचे वक्तव्य आणि त्यांचेच मे २००९ मधील काँगोलीझ बिशप्स च्या परिसंवादातील भाषण) यामुळे मग हिंदू समाजातील काही नेते आग्रहीपणे इशारा देताना दिसतात की आता हिंदूंनी ‘हम दो-हमारे दो’ ही भूमिका सोडून दिली पाहिजे. त्यावर मग टीकेची झोडही उठते आणि ते एकूण देशप्रकृतीला हानिकारक असल्याचेही सांगितले जाते पण मूळ समस्येवर अभावानेच विचार होतो.
एखाद्या समाजाची लोकसंख्या क्रमशः कमी होत गेली तर गणितीय पद्धतीने ठराविक कालावधीनंतर तो समाज अस्तित्वहीन ठरू शकतो हे दाखवणारे सोदाहरण व्हिडिओज पुष्कळ संख्येने इंटरनेटवर पाहायला मिळतात. त्या समाजाची लोकसंख्या लयास जाणे म्हणजे त्याची संस्कृती नष्ट होणे. त्या समाजाने उचलून धरलेली, जोपासलेली, पिढ्यानपिढ्या संक्रमित केलेली जीवनमूल्ये संपुष्टात येणे. एखाद्या देशाच्या सैन्यात तिथला मूळ समाज बहुसंख्येने न राहता बाहेरून आलेला, अथवा तिथल्या मातीशी देणेघेणे नसलेला समाज जर वाढला तर काय होईल? रशिया, फ्रान्ससकट अनेक देशांना  हाच प्रश्न भेडसावतो आहे. केवळ लोकसंख्या असली तरी असे ‘राष्ट्र’ हे ‘राष्ट्र’ म्हणून जिवंत राहील काय? तिथल्या पुत्रवत् समाजाशिवाय त्या राष्ट्राची चिती अस्तित्वात राहील काय? ज्याप्रमाणे चांगल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती जपणे हे हे गरजेचे आहे त्याचप्रमाणे चांगले विचार देणारा आणि आचरण करणारा सदाचारी, सहिष्णू समाज अस्तित्वात राहणे हेही मानवतेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.
भारताची जनगणना झाल्यानंतर एक विदारक वास्तव समोर येते, ते म्हणजे इथल्या हिंदू समाजाचा घटता लोकसंख्या दर. ह्याला विविध कारणे देता येतील. वर उल्लेखिलेल्याशिवाय बांगलादेश आणि अन्य ठिकाणाहून होणारी घुसखोरी, भारत सोडून परदेशात स्थायिक होणारी जनसंख्या, आमिष दाखवून, छळ-कपट करून, भय दाखवून होणारे परावर्तनाचे प्रयत्न अशीही कारणे त्याला आहेत. या विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिक चिंतित आहेतच. विविध माध्यमातून यावर चर्चाही सुरु झाल्या आहेत. या भीषण वास्तवाचा सामना करणे आता पटू लागले आहे. काही वर्षांपूर्वी संघाने या विषयावर जनजागरण अभियान सुद्धा केले होते. नुकत्याच पार पडलेल्या रांची येथील अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत एक प्रस्ताव पारित केला आहे. त्या प्रस्तावाबद्दल चिंतन करणे आणि समाजातील केवळ बुद्धिजीवीच नव्हे तर जनसामान्य लोकांपर्यंत हा प्रस्ताव पोहोचवणे हे गरजेचे ठरते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – अखिल भारतीय कार्यकारी मंडळ द्वारा पारित प्रस्ताव – २०१५.
देश में जनसंख्या नियंत्रण हेतु किए विविध उपायों से पिछले दशक में जनसंख्या वृद्धि दर में पर्याप्त कमी आयी है. लेकिन, इस सम्बन्ध में अखिल भारतीय कार्यकारी मंडल का मानना है कि 2011 की जनगणना के पांथिक आधार पर किये गये विश्लेषण से विविध संप्रदायों की जनसंख्या के अनुपात में जो परिवर्तन सामने आया है, उसे देखते हुए जनसंख्या नीति पर पुनर्विचार की आवश्यकता प्रतीत होती है. विविध सम्प्रदायों की जनसंख्या वृद्धि दर में भारी अन्तर,अनवरत विदेशी घुसपैठ व मतांतरण के कारण देश की समग्र जनसंख्या विशेषकर सीमावर्ती क्षेत्रों की जनसंख्या के अनुपात में बढ़ रहा असंतुलन देश की एकता, अखंडता व सांस्कृतिक पहचान के लिए गंभीर संकट का कारण बन सकता है.
विश्व में भारत उन अग्रणी देशों में से था, जिसने वर्ष 1952 में ही जनसंख्या नियंत्रण के उपायों की घोषणा की थी, परन्तु सन् 2000 में जाकर ही वह एक समग्र जनसंख्या नीति का निर्माण और जनसंख्या आयोग का गठन कर सका. इस नीति का उद्देश्य 2.1 की ‘सकल प्रजनन-दर’ की आदर्श स्थिति को 2045 तक प्राप्त कर स्थिर व स्वस्थ जनसंख्या के लक्ष्य को प्राप्त करना था. ऐसी अपेक्षा थी कि अपने राष्ट्रीय संसाधनों और भविष्य की आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए प्रजनन-दर का यह लक्ष्य समाज के सभी वर्गों पर समान रूप से लागू होगा. परन्तु 2005-06 का राष्ट्रीय प्रजनन एवं स्वास्थ्य सर्वेक्षण और सन् 2011 की जनगणना के 0-6 आयु वर्ग के पांथिक आधार पर प्राप्त आंकड़ों से ‘असमान’ सकल प्रजनन दर एवं बाल जनसंख्या अनुपात का संकेत मिलता है. यह इस तथ्य में से भी प्रकट होता है कि वर्ष 1951 से 2011 के बीच जनसंख्या वृद्धि दर में भारी अन्तर के कारण देश की जनसंख्या में जहां भारत में उत्पन्न मतपंथों के अनुयायिओं का अनुपात 88 प्रतिशत से घटकर 83.8प्रतिशत रह गया है, वहीं मुस्लिम जनसंख्या का अनुपात 9.8 प्रतिशत से बढ़ कर 14.23 प्रतिशत हो गया है.
इसके अतिरिक्त, देश के सीमावर्ती प्रदेशों यथा असम, पश्चिम बंगाल व बिहार के सीमावर्ती जिलों में तो मुस्लिम जनसंख्या की वृद्धि दर राष्ट्रीय औसत से कहीं अधिक है, जो स्पष्ट रूप से बंगलादेश से अनवरत घुसपैठ का संकेत देता है. माननीय सर्वोच्च न्यायालय द्वारा नियुक्त उपमन्यु हजारिका आयोग के प्रतिवेदन एवं समय-समय पर आये न्यायिक निर्णयों में भी इन तथ्यों की पुष्टि की गयी है. यह भी एक सत्य है कि अवैध घुसपैठिये राज्य के नागरिकों के अधिकार हड़प रहे हैं तथा इन राज्यों के सीमित संसाधनों पर भारी बोझ बन सामाजिक-सांस्कृतिक, राजनैतिक तथा आर्थिक तनावों का कारण बन रहे हैं.
पूर्वोत्तर के राज्यों में पांथिक आधार पर हो रहा जनसांख्यिकीय असंतुलन और भी गंभीर रूप ले चुका है. अरुणाचल प्रदेश में भारत में उत्पन्न मत-पंथों को मानने वाले जहां 1951 में 99.21 प्रतिशत थे, वे 2001 में 81.3 प्रतिशत व 2011 में 67 प्रतिशत ही रह गये हैं. केवल एक दशक में ही अरूणाचल प्रदेश में ईसाई जनसंख्या में 13 प्रतिशत की वृद्धि हुई है. इसी प्रकार मणिपुर की जनसंख्या में इनका अनुपात 1951 में जहां 80 प्रतिशत से अधिक था, वह 2011 की जनगणना में 50 प्रतिशत ही रह गया है. उपरोक्त उदाहरण तथा देश के अनेक जिलों में ईसाईयों की अस्वाभाविक वृद्धि दर कुछ स्वार्थी तत्वों द्वारा एक संगठित एवं लक्षित मतांतरण की गतिविधि का ही संकेत देती है.
अखिल भारतीय कार्यकारी मंडल इन सभी जनसांख्यिकीय असंतुलनों पर गम्भीर चिंता व्यक्त करते हुए सरकार से आग्रह करता है कि -
1.      देश में उपलब्ध संसाधनों, भविष्य की आवश्यकताओं एवं जनसांख्यिकीय असंतुलन की समस्या को ध्यान में रखते हुए देश की जनसंख्या नीति का पुनर्निर्धारण कर उसे सब पर समान रूप से लागू किया जाए.
2.      सीमा पार से हो रही अवैध घुसपैठ पर पूर्ण रूप से अंकुश लगाया जाए. राष्ट्रीय नागरिक पंजिका का निर्माण कर इन घुसपैठियों को नागरिकता के अधिकारों से तथा भूमि खरीद के अधिकार से वंचित किया जाए.
अखिल भारतीय कार्यकारी मंडल सभी स्वयंसेवकों सहित देशवासियों का आवाहन करता है कि वे अपना राष्ट्रीय कर्तव्य मानकर जनसंख्या में असंतुलन उत्पन्न कर रहे सभी कारणों की पहचान करते हुए जन-जागरण द्वारा देश को जनसांख्यिकीय असंतुलन से बचाने के सभी विधि सम्मत प्रयास करें.



Tuesday, January 26, 2016

असहिष्णुतेच्या नावानं...

कोळसा खाणी, २-जी, दुष्काळ सहाय्यता निधी घोटाळा, सिंचन घोटाळा या आणि अशा घोटाळ्यांनी गांजलेल्या जनतेला ‘स्वच्छ भारत’ स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सत्तापालट करावा लागला आणि त्यानंतर सुरु झाली हळूहळू असहिष्णुतेवर चर्चा! कायदा-सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे आद्यकर्तव्य. समाजात शांतता आणि सौहार्द असेल, सारे गुण्यागोविंदाने नांदत असतील तरच समाज विकासाच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. केवळ रस्ते, पाणी, वीज असली तरी भांडणारा, झगडणारा समाज प्रगती करू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारांनी पोलीस दल, गुप्तचर यंत्रणा यांचा योग्य तो वापर करून समाजात खेळीमेळीचे आणि सुरक्षित वातावरण राहील हे पहायचे असते. ज्याप्रमाणे गोध्रा हत्याकांड झाल्यानंतर गुजरात सरकारवर चहुबाजूंनी ताशेरे ओढले गेले, किंवा २६/११ चा हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठली आणि सरकारने त्वरित पावले उचलत उपाययोजना केली, त्याचप्रमाणे दादरीमधील निंदनीय घटना घडल्यानंतर मात्र तेथील राज्य सरकारला कोणीच जाब विचारला नाही. एकदम येथील हिंदू समाज हा असहिष्णू झाल्याचा आभास निर्माण केला गेला.
साहित्यिक, कलाकार, संशोधक यांनी निषेध म्हणून आपल्याला मिळालेले कित्येक वर्षांपूर्वीचे पुरस्कार परत करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी एकच कारण दिले की संपूर्ण देशात असहिष्णुतेचे वातावरण पसरले आहे. यातील फोलपणा तेव्हाच सर्वांना समजला कारण आजची परिस्थिती ही कितीतरी पटीने चांगली असे दिवस आणि अशा रात्रीही येथील समाजाने पूर्वी अनुभवल्या आहेत. ठराविक समाजाची घरे जाळणे, ठराविक समाजाला अगदी दिवसाढवळ्या ट्रेन्समधून बाहेर काढून मारणे, स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी आणि स्वतःचे बूड स्थिर करण्यासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणे, न्यायालयांचे निर्णय कायदे करून वाकवणे, सत्तेच्या हव्यासापायी विनाकारण हजारो लोकांना तुरुंगात डांबून हजारो कुटुंबांची वाताहत करणे यावेळी जणू असहिष्णुताही घाबरून कुठल्यातरी कोनाड्यात लपून बसली होती की काय म्हणून कुणाला त्यावेळी पुरस्कार परत करावे वाटले नाहीत!

पण आता एकदम सर्वांना जाणवू लागले की देशात असहिष्णुता फोफावली आहे. मग इथल्याच समाजाच्या आधारावर मोठ्या झालेल्या काही कलाकारांनी आपल्या बायकोचा हवाला देऊन खुल्या मंचावरून सांगितले की त्यांना एवढे असुरक्षित वाटते की ‘हा देशच सोडून जावे’. पण त्यांना कुठल्या देशात ‘सुरक्षित’ वाटते ते सांगणे मात्र शिताफीने टाळले. आसपासचे सोडा पण अन्य खंडातील एकही देश सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये असा दिसत नाही की, जो सुरक्षित आणि सहिष्णू समाजाची शाश्वती देऊ शकेल. त्यामुळे इथला मुळातच सहिष्णू असलेला आणि आपल्या घरातच साप पाळून त्यांना दुग्धपान करायची सवय असलेला समाज न खवळता तरच नवल! बहुतांश समाजाने वरील प्रकारच्या वक्तव्यावर तिखटपणे प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. प्रसारमाध्यमातून त्याचे पडसाद उमटू लागले आणि मग असहिष्णुतेचा प्रचार करणाऱ्यांना मोकळे रानच मिळाले. विविध विषय आणि खऱ्या समस्या यांवरून लक्ष उडवून विनाकारण समाजात तेढ पसरवण्याचे उद्योग सुरु झाले. संसदेचे कामकाज रोखायला काही इंधन तयार झाले.
याच सुमारास फ्रान्समधे अतिरेक्यांनी हल्ला केला. तोही कुठे? तर संगीताच्या कार्यक्रमाला जमलेल्या रसिक, निःशस्त्र लोकांवर. त्यावरही आपल्या येथील काही तथाकथित विचारवंत तावातावाने ह्या सर्वामागची ‘आर्थिक गणिते’, तेलाचे राजकारण वगैरे समजावून सांगत होते! कधीकधी तर असे वाटते की आपल्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेपर्यंत खऱ्या दहशतवादाला हे लोक ओळखणारच नाहीत काय? एखाद्या गटाच्या, अतिरेकी संघटनेच्या विस्तारामागे, शस्त्रास्त्र पुरवठ्यामागे जशी आर्थिक बाजू असते तशी त्या अतिरेकालाही आर्थिक कारणे असतीलच. ‘तण्डुलाः प्रस्थमूलाः’ हे आहेच; पण ज्यामुळे हजारो पद्मिनी जोहार करत्या झाल्या, ज्यामुळे संभाजीराजांना हालहाल करून ठार मारले गेले, ज्यामुळे जोरावरसिंह आणि फतेहसिंह ह्या गुरुपुत्रांना भिंतीत जिवंत चिणून मारले गेले, आगगाड्या भरून मृतदेह स्वतंत्र भारतात पाठवले गेले आणि अशी असंख्य उदाहरणे जी देताना लेखणी झिजेल पण अत्याचारांची मालिका संपणार नाही, त्या सांप्रदायिक उन्मादाला मोकळेपणाने ओळखण्यात एवढी भीड का पडावी? आणि त्याहून घोर थट्टा म्हणजे अशा रानटी, अमानवी आणि राक्षसी जमातीची तुलना ही सुसंस्कृत, शांतताप्रिय, सहिष्णू हिंदू समाजाशी करायची. संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे,                 
                                       अहं स्वर्णम् न मे दुःखं अग्निदाहेन ताडयेत् |
  एतद् तु मे महादुःखं गुञ्जया सह तोलनम् ||
म्हणजे थोडक्यात सोन्याला दागिना घडवताना अगदी आगीत तापवून, वितळवून दागिना घडवतानाही दुःख होत नाही पण जेव्हा त्याची व्यवहारात गुंजेशी तुलना (वजन मापण्यासाठी एका पारड्यात सोन्याचा दागिना आणि दुसऱ्यात गुंजेच्या बिया) केली जाते तेव्हा सोन्याला खरे दुःख होते.
१०८ वेळा नदीवर जाऊन आंघोळ करण्याची सहिष्णुता हा समाज जपतो. उकळत्या तेलात टाकले आणि शरीरदाह केला तरी ईश्वरावरची अतूट निष्ठा मानणारा हा समाज आहे. सतरावेळा लढाईत पराभव करून शरण मागितल्यानंतर उदार मनाने अभय देणारा हा समाज आहे. ह्या समाजाला सहिष्णुतेचे पाठ कोणी शिकवायला नकोत. त्याच्या रक्तातच सहिष्णुता आहे. गौतम बुद्ध, भगवान महावीर, शिबीराजा, चिलया बाळ, कर्ण, युधिष्ठिर अशी मालिका केवळ याच पावन भूमीवर होऊ शकते. दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे, त्याच्याही मताचा आदर करणे हे अगदी चार्वाकापासून चालत आलेले आहे. पण म्हणून त्याचवेळी हा समाज वीर्यहीन नाही याचीही जाण ठेवणे गरजेचे आहे. गोमातेच्या रक्षणासाठी कायदेशीर लढाई देणारा पण त्याचवेळी पूर्वकल्पना देऊन कसायाचा हात बुंध्यापासून कलम करणारा, स्वतःचे मुलगे लढाईत मारले गेल्यावरही अभेद्य आत्मविश्वासाने हुंकार भरणाऱ्या शीख गुरुंच्या ‘इन सिख्वन के शीश पर, वार दिये सुत चार | चार मरे तो क्या हुआ, जीवित कई हजार’ या वाणीचे स्मरण करणारा, आणि तीच परंपरा आजही जपत ‘माझी मुलेही देशरक्षणासाठी सैन्यातच जातील’ म्हणणाऱ्या वीरगती प्राप्त कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी, वीरप्रसवा यांचा हा समाज आहे. त्यामुळे कुणा छछोर माणसाची बायको शयनगृहात त्याला काय म्हणते ह्याला महत्व द्यायचे, की स्वप्राणांचे बलिदान देणाऱ्या पतीच्या चितेच्या प्रकाशात आपल्या मुलांनाही मातृभूमीच्या ओंजळीत अर्पण करणाऱ्या वीरपत्नीचे धीरोद्गार मनात जपायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

Friday, October 17, 2014

खरं सांगायचं तर...

खरं सांगायचं तर राज्यशास्त्र हा माझ्या अभ्यासाचा विषय आणि राजकारण हा माझ्या रुचीचा विषय राहिला असला तरी प्रत्यक्ष राजकारण, प्रचार, पक्षकार्य यात मी कधीच सहभागी झालेलो नाही किंबहुना कटाक्षाने स्वतःला या सर्वांपासून दूर ठेवत आलेलो आहे.

भाग्य चांगले असल्याने लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक झालो. संघकार्यात टिकून राहात कार्यकर्ता झालो. राजकारणात भाग घ्यावा अशी ना कधी इच्छा झाली ना कधी सूचना केली गेली. समाजाच्या संघटनाचे काम करत असताना सारेच आपले आहेत हा विचार मनात घेऊनच काम करायला शिकलो. संघाचे काम हे ‘सर्वेषां अविरोधेन’ आहे हा पूजनीय श्रीगुरुजींचा दिशादर्शक विचार. आणि समाजाची जी विविध अंगे आहेत उदा शिक्षण, आरोग्य, क्रीडा, वैद्यकीय, भाषा, संस्कृती, व्यापार, धर्म इ. त्यातलेच एक राजकारण आहे. राजकारण आपल्याला अस्पृश्य नाही. अन्य क्षेत्रांप्रमाणे त्याचाही विचार व्हावा. प्रचलित राजकारणाच्या शुद्धीकरणाचा विचार आपणही करावा. पण पक्षीय राजकारणापासून कटाक्षाने अलिप्त राहावे. कारण राजकारणात आज मित्र, उद्या शत्रू, पुन्हा परवा मित्र असे बेभरवशाचे सारे असल्याने आपल्याला ते जमणारे नाही. शिवाय ‘वारांगना एव नृपनीती’ असल्याने आपण त्यात पडू नये. राजकारणात एकाची बाजू घेतल्यावर स्वाभाविकच बाकी सारे विरोधक होतात, आपली इच्छा असो वा नसो! त्यामुळे ज्याला समाज संघटनाचे काम करायचे आहे त्याने राजकारणात न पडलेलेच बरे.

पण तरीही या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही बऱ्यापैकी सक्रिय राहिलो. लोकसभेच्या वेळी केवळ अधिकाधिक लोकांनी मतदान करावे असा आग्रह धरला होता. किंबहुना शत-प्रतिशत मतदान हे परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आवाहन केले होते त्यामुळे सर्व स्वयंसेवक वर्ग त्यात उतरला. अखिल भारतभर सगळीकडे लोकांना आग्रह, विनंती, जागृती या माध्यमातून मतदानाचे आवाहन केले आणि भारतीय जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढली.

खरं सांगायचं तर विधानसभेच्या वेळीही केवळ मतदानाचाच आग्रह धरणार होतो. पण युती तुटली आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. त्यात हिंदुत्वाचा मुद्दा काढला गेला, मराठी-गुजराती वाद अगदी जाणीवपूर्वक निर्माण केला गेला, लोकांच्या मनात विविध भयगंड रुजवले गेले, स्वतःच्या वर्तमानपत्रातून निर्बुद्धासारखी विखारी टीका केली गेली, शिवाजी महाराजांना प्रांतीयतेच्या सीमांनी बांधण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला गेला, हिंदुत्वाची टिमकी वाजवणारे मराठी-गुजराती असा वाद निर्माण करताना कचरले नाहीत, नरेंद्र मोदींवर – देशाचे पंतप्रधान असून – निम्नपातळीवर जाऊन टीका-टिप्पणी करण्यात आली. हे सर्व एवढे वाढले की संघाचे नव्याने स्वयंसेवक झालेले काहीजण आपसात मराठी-गुजराती करून एकमेकाची महाराष्ट्रनिष्ठा विचारायला लागले..आणि या सर्वांमुळे समाजाचा एक घटक म्हणून मला त्यात पडावे लागले.

माझ्या अंगाला वाळू लावून नाचण्याचा सेतू बंधनाला कितपत फायदा होईल हा भाग अलाहिदा परंतु मला खोटे बघवले नाही. निरर्गल आरोप, वाईट शब्दात खिल्ली उडविणे, लहान तोंडी मोठा घास घेणे याचा विरोध करण्याची अंतःऊर्मी मला स्वस्थ बसू देईना. फोटोशॉपिंगच्या माध्यमातून खालच्या पातळीवर जाऊन बनवलेली चित्रे मला प्रचारात खेचून गेली. दुसऱ्याचे आई-बाप काढायचे आणि स्वतःचे काढल्यावर त्याला मारायचे, काळे फासायचे, तोडफोड करायची हे तर जणू त्यांचे व्यवच्छेदक लक्षण. महाराष्ट्राच्या राजकारणाचे मवालीगिरीत कोणी रुपांतर केले हे महराष्ट्राच्या जनतेला वेगळे सांगायला नको. विचारांची मुक्तता नाही, मोकळेपणाने विरोधी विचार स्वीकारणे नाही, ‘हटाओ लुंगी बजाओ पुंगी’ यांसारखी देशविघातक आरडाओरड करायची, मराठी तरुणांची स्वप्ने दाबून ठेऊन छोट्या महत्त्वाकांक्षेत त्यांना जखडून ठेवायचं आणि स्थानिक पातळीवर दादागिरी करत राहायची, स्वतः निवडणूक कधी लढवायची नाही या सर्वांमुळे मला पहिल्यापासूनच युती पचली नव्हती. पण युती झाली तेव्हा मी केवळ ३ वर्षांचा होतो.
पुढे मोठं झाल्यानंतर मनात हे शल्य डाचत असे की आपल्या पसंतीच्या पक्षाला का मतदान करता येऊ नये? बरं ध्येयधोरणे वेगवेगळी, कार्यक्रम वेगवेगळे, कार्यपद्धती वेगवेगळी, टीका सदोदित..एवढे असूनही का मतदान करायचे? ती मानसिक घुसमट थांबली..

भाजप ने अन्य पक्षातील लोकांना घेऊन लगेच तिकिटे दिली याला मी राजकीय डावपेच म्हणून शकत नाही. त्याला मी दूरदृष्टीहि म्हणू शकत नाही. काही म्हणायचेच असेल तर भाजप ज्या कर्मनिष्ठांचा वैचारिक वारसा सांगतो त्या नीतिवान नेत्यांचा तो घोर पराभव होता. सत्तालालसेपायी त्या विचारनिष्ठ धुरिणांना न पटणारी ती तडजोड होती. मला अस्वस्थ करणारी ही गोष्ट होती आणि आहे. पण तरीही भाजपने पूर्वाश्रमीच्या मित्रपक्षावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. शिवरायांचे राजकारण केले नाही, हिंदुत्वाला आपली खाजगी प्रॉपर्टी कधी बनवले नाही. कोण कोणाचे किती फोटो छापतो यावरून त्याची निष्ठा मोजली नाही. आणि याचाच मला त्रास झाला.

ही हिंदू मानसिकता आहे. दुर्बलाच्या बाजूने उभे राहणे ही स्वाभाविक भावना आहे. मी नाटकी बोलत नाही परंतु भाजपने जर अशाप्रकारे कुणाच्या शिवनिष्ठेवर प्रश्न उठवले असते, कुणाचे फोटो छापले आहेत-नाहीत यावरून अश्या कोत्या प्रकारचे राजकारण केले असते, मराठी-गुजराती अशाप्रकारची समाजात फूट पाडण्याचे, तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले असते तर मी त्याविरोधात उभा राहिलो असतो. परत तेच, माझ्या अशा विरोधाचा कुणाला किती फायदा-तोटा झाला असता हा मुद्दा माझ्या लेखी संभवतच नाही. जे होईल ते होईल पण माझ्या मनाला जे पटत नाही त्याचा विरोध मी करणारच.

शिवाय ज्या प्रकारे कुजबूज आघाडी भाजप च्या पूर्वमित्रांनी उघडली आणि त्याला विरोध केला असता धमकावण्याचे प्रयत्न केले त्यावरून मी सुद्धा फेसबुक, whatsapp अशा माझ्या हाताशी असणाऱ्या साधनांद्वारे आघाडी उघडली. त्यावरसुद्धा काहीजणांनी मग भाजपविरोधी पोस्ट्स टाकायला सुरुवात केल्यावर मी त्या सरळ उडवायला लागलो. कारण स्वतः हवे तसे खालच्या पातळीवर जाऊन campaign करायचे आणि दुसरा कोणी बोलला की त्याला धमकावत राहायचे, प्रश्न करत राहायचे हे मला मान्य नव्हते आणि नाही. म्हणून माझ्या पोस्ट्सवर मला न पटणारी कॉमेंट आली की मी ती पुसून टाकायला सुरुवात केली. हे वादविवादाच्या सर्वसंमत तत्वांना धरून नाही याची मला पूर्ण जाणीव असूनही मी तसे केले कारण लढाईत समोरचा कसेही वार करत असेल तर केवळ ढाल धरून बसणे मला मान्य नाही.


या माझ्या नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकाराने मित्र चिडल्यासारखे झाले, followers (फेसबुकवर रूढार्थाने followers) unfollow व्हायला लागले आणि ते स्वाभाविकही होते. पण मी त्याची परवा केली नाही. आज निवडणूक संपल्यावर त्या सर्वांना सॉरी म्हणणे माझे कर्तव्य आहे. निवडणुका येतील जातील, सरकारे स्थापन होतील, युत्या-आघाड्या तुटतील-जुळतील पण आपल्यात मनभेद नकोत. झाले गेले विसरून जाऊ. मुद्दाम हे सर्व निकाल लागण्याआधीच स्पष्ट केले कारण निकालानंतर काय चित्र असेल माहिती नाही. तेव्हा या लेखाचा कदाचित वेगळा अर्थ लावला जाऊ शकला असता म्हणून निकालाआधीच हे सर्व लिहून मन मोकळे केले...