"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, November 8, 2018

अनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई


७. वीर सुरेंद्र साई

पारतंत्र्यातील हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी सर्वच प्रांतांतील क्रांतिकारक आपापल्या शक्तीनुसार क्रांतिकार्य करत होते. आपण आजवर अनामवीरा या मालिकेतून प्रामुख्याने महाराष्ट्र आणि बंगाल प्रांतातील अल्पख्यात क्रांतिकारक पाहिले आहेत. आज जरा ओरिसाकडे जाऊ. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले एक राज्य. मोठ्या राज्यांच्या भाऊगर्दीत दुर्लक्षित राहिलेले राज्य. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत  म्हणजे १९४७ ते २०१८ या कालावधीत संपूर्ण राज्यात केवळ एकच विमानतळ होता. सप्टेंबर २०१८ ला झरसुगुडा इथे राज्यातला दुसरा विमानतळ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केला. त्याला वीर सुरेंद्र साई विमानतळ हे नाव देण्यात आले आहे. केवळ आपणच नव्हे तर भारतातील अनेकजणांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले. त्यामुळे आजचे आपले अनामवीर तेच आहेत – वीर सुरेंद्र साई.
इंग्रज जेव्हा आपला जम भारतात बसवू पाहत होते तेव्हा सामान्य जनता तर यथाशक्ती प्रतिकार करत होतीच पण भारतातील आधीपासून अस्तित्वात असलेली काही राजघराणीसुद्धा इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारण्याचा सोपा मार्ग अव्हेरून  इंग्रजांना जशी जमेल तशी टक्कर देत होते. ओरिसातील चौहान राजघराणे इंग्रजांना सामील झालेले नव्हते, पण त्यांचे संबंध तेवढेही ताणले गेले नव्हते. या घराण्यातील चौथे राजे मधुकर साई १८२७ ला निपुत्रिक म्हणून निवर्तले. इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईच्या बाबतीत जे केले तसेच याही प्रकारात झाले. त्यांनी मोहन कुमारी या राणीला राज्यपदी बसवले. या साऱ्या प्रकाराला सुरेंद्र साईचा प्रखर विरोध होता. स्वतः राजघराण्यातील असल्याने डावलले जाणे त्याला मान्य नव्हते. इंग्रजांच्या कुटील नीतीचा त्याला पूर्ण अंदाज आला होता. राज्य खालसा करण्याच्या दृष्टीने इंग्रजांनी उचललेल्या पावलांना वेळीच प्रतिरोध केला नाही तर ते आपले राज्य गिळंकृत करणार याबद्दल सुरेंद्रच्या मनात तिळमात्र संशय नव्हता.
राणी मोहन कुमारीच्या जमीन महसूलविषयक धोरणाचा गोंडी, बिन्झाल अशा जनजातीतील, वनवासी लोकांना आणि जमीनदारांना जाच होऊ लागला. इंग्रजांनी मोहन कुमारीची उचलबांगडी केली आणि तिच्या जागी नारायण सिंगाची नेमणूक केली. सुरेंद्रच्या जखमेवर मीठच चोळले गेले. त्याचा अधिकार पुन्हा एकदा नाकारला गेला होता. सुरेंद्रने जनजातीतील लोकांना संघटित करायला आणि त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष भडकवायला सुरुवात केली. नारायण सिंगाच्या राजवटीत बंड झाले. इंग्रज फौजांविरुद्ध लढत असताना सुरेंद्र, त्याचा भाऊ उद्यंत साई आणि त्यांचे काका बलराम सिंह यांना पकडण्यात आले. त्यांची रवानगी हजारीबाग तुरुंगात करण्यात आली. बलराम सिंहाचा तिथेच कारावासात मृत्यू झाला. इथे नारायण सिंग सुद्धा १८४९ मध्ये मरण पावला. तोही निपुत्रिक मरण पावल्याने पुन्हा सुरेंद्रचा अधिकार निर्माण झाला. लॉर्ड डलहौसी ने १८४९ ला संबलपूर चे राज्य इंग्रजी साम्राज्याचा भाग बनवले.
सुरेंद्र कारावासात असल्याने काही करू शकला नाही, पण लवकरच संधी चालून आली आणि १८५७ चा उठाव झाला. या उठावाचा भाग म्हणून उठावात भाग घेणाऱ्या लोकांनी हजारीबाग चा तुरुंग फोडला आणि त्यातून सुरेंद्र आणि उद्यंत या दोघांचीही सुटका झाली. त्यांच्याबरोबर जवळपास ३२ जणांची सुटका करण्यात आली. सुरेंद्रने संबळपूर च्या सामान्य जनतेला इंग्रजांविरुद्ध संघटित करायला पुन्हा एकदा सुरुवात केली. वनवासींची भाषा, भूषा, रीतीरिवाज यावर इंग्रज घाला घालतच होते. सुरेंद्रने त्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करायला सुरुवात केली. जनता संघटित होऊ लागल्याचे पाहून इंग्रजांनी आपले कुशल सेनाधिकारी संबळपूर ला पाठवायला सुरुवात केली. मेजर फॉर्स्टर, कॅप्टन एल. स्मिथ हे असे अधिकारी होते ज्यांच्या नावावर भारतातील इतर ठिकाणचे उठाव यशस्वीरित्या मोडून काढण्याचे यश जमा होते. हे अधिकारी इंग्रजी सैन्यासह संबळपूर ला येऊन डेरेदाखल झाले. मेजर फॉर्स्टर ला पूर्ण लष्करी व मुलकी अधिकारी देऊन त्या भागाचा कमिशनर बनवण्यात आले होते. पण सुरेंद्रने त्याच्या हाती काहीच लागू दिले नाही. शेवटी १८६१ ला मेजर फॉर्स्टर ला हलवण्यात आले. नंतर आलेल्या मेजर इम्पे ने सुद्धा खूप प्रयत्न करून पाहिला, पण स्थानिकांची मजबूत साथ असेलला सुरेंद्र इंग्रजांना चकवतच राहिला. मेजर इम्पे ने आधीच्या धोरणात बदल केला. त्याने रसद तर तोडलीच पण त्याचबरोबर हिंसक लढाई सोडून संवाद आणि वार्तालाप सुरु केला. हे अर्थातच त्याने इंग्रज सरकारच्या संमतीने सुरु केले. हा लष्करी डावपेचाचा एक भाग म्हणून तो करत होता हे सुरेंद्र च्या लक्षात आले नाही. तो एक सच्चा वनवासी होता. निसर्गपूजक, निसर्गात रममाण होणाऱ्या सुरेंद्र ला हे कुटील डावपेच कळले नाहीत ह्यात फारसे नवल काही नाही. इम्पे च्या आश्वासनांवर विसंबून सुरेंद्र ने लढाई थांबवली. उत्तम तलवार चालवणारा सुरेंद्र शांततेत राहू लागला. मेजर इम्पेच्या मृत्यूपर्यंत हे चालू राहिले. पण इम्पेचा मृत्यू झाला आणि ताबडतोब सरकारने पुन्हा लढाई तीव्र केली. नव्याने तयार केल्या गेलेल्या मध्य प्रांतात (Central Province) ३० एप्रिल १८६२ ला संबळपूर चा समावेश करण्यात आला. गाफील आणि बेसावध असलेल्या सुरेंद्र ला, त्याच्या साथीदारांना आणि नातेवाईकांना इंग्रज सेनेने अगदी सहज पकडले. विश्वासघात करून त्यांना असीरगड च्या तुरुंगात पाठवण्यात आले. २३ मे १८८४ ला सुरेंद्र साई चा मृत्यू असीरगड च्या तुरुंगातच झाला. संबळपूर हा शेवटी शेवटी इंग्रजांच्या अधिपत्याखाली आलेला भारताचा भाग. त्याचे कारण म्हणजे वीर सुरेंद्र साई ने चेतवलेले जनमानस.
साई ला संबळपूरच्या प्रदेशातील लोक ‘बीरा’ या नामाभिधानानेच ओळखतात. बीरा म्हणजेच वीर! ओदिशाच्या जनतेचा हा नेहमीच आरोप आहे की इतिहासकार, प्रशासन, लेखक इत्यादींनी वीर सुरेंद्र साईवर नेहमीच अन्याय केलाय. त्याच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी प्रसिद्धी त्याला कधीच मिळाली नाही. ओडिशा सरकारने २००९ मध्ये राज्यातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नामकरण वीर सुरेंद्र साई युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी असे केले. २००५ मध्ये त्यांचा पुतळा संसद भवन आवारात बसवण्याचे ठरविण्यात आले. त्यांच्या नावे पोस्टाचे तिकीट काढण्यात आले आहे. आणि लेखाच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे ओरिसामधील दुसऱ्या विमानतळाला वीर सुरेंद्र साई चे नाव देण्यात आले आहे.



संदर्भ:-
१.      वीर सुरेंद्र साई – एन.के.साहू
२.      पश्चिम ओरिसा अग्रणी संगठन प्रकाशित वीर सुरेंद्र साई – सी. पसायत  

Friday, September 14, 2018

अनामवीरा ६ - शचीन्द्रनाथ सान्याल



६. शचीन्द्रनाथ सान्याल
             “ ‘हिंदुस्थान’ हे एकराष्ट्र नसून अनेक राष्ट्रांचा समूह आहे” ही धारणा पद्धतशीरपणे पसरवण्याचा प्रयत्न केवळ परकीय सत्तांकडूनच नव्हे; तर परकियांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या कित्येक एतद्देशीय तथाकथित इतिहासकार असामींकडूनही अगदी आजही होताना दिस्तोदिसतो. याचे प्रमुख कारण म्हणजे या देशात हिंदू समाजाने मनोमन जपलेली विविधता! या विविधतेही समान संस्कृतीमूल्ये, चिन्हे, आचरणाच्या पद्धती, जय-पराजयाच्या समान संकल्पना, प्रांतोप्रांतीच्या राष्ट्रपुरुषांबद्दल अभिमानाची भावना यातून भावात्मक राष्ट्रसंकल्पना प्रतीत होते. एकराष्ट्रीयत्वाची भावना ही अनुभूतीची गोष्ट आहे.
            संक्षेपाने राष्ट्र संकल्पनेबद्दल नमूद करण्याचे कारण एवढेच की, ‘अनामवीरा’ मालिकेतील सर्वचजण आमच्यासाठी राष्ट्रपुरुष आहेत. ते बंगाल, महाराष्ट्र, पंजाब अशा ‘प्रांतांसाठी’ लढले नाहीत – ते रयतेसाठी लढले – ते या पवित्र भूमीच्या पवित्रतम कणासाठी लढले, गंगा-सिंधू-सरस्वतीच्या जलबिंदूसाठी त्यांनी रक्तबिंदू अर्पण केले. हे राष्ट्र स्वतंत्र राहावे म्हणून त्यांनी भारतमातेच्या चरणी रुधिराभिषेक केला. दुसरी बाजू म्हणजे आधीच्या इतिहासातील महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोबिंदसिंह यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली होती.
आजचा अनामवीर ‘शचीन्द्रनाथ सान्याल’ याचा जन्म १८९३ मध्ये बनारसला हरिनाथ सान्याल व खिरोदवासिनी देवी यांच्यापोटी झाला. बालपणीच त्याला भारतमातेच्या स्वातंत्र्याची आस लागली; पण विविध मार्गांमुळे निर्माण झालेले द्वंद्व किंवा वैचारिक संघर्ष शचीन्द्रनाथ सान्याल यांच्या आयुष्यात पाहायला मिळते. बनारसला क्रांतिकारी संघटनेची सुरुवात शचीन्द्रनाथने केल्यानंतर कलकत्त्याहून आलेल्या एका समवयस्क मित्राचा प्रभाव त्यांच्यावर पडू लागला. त्याची भेट होण्याआधी सशस्त्र क्रांती हाच एकमेव पर्याय हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी आहे, त्यासाठी पुरेसा शस्त्रसंग्रह करावा लागेल, युवकांची संघटना उभारावी लागेल अशा विचारांचा होता शचीन्द्रनाथ. तो शिवाजीला (शिवाजी महाराजांना) आदर्श पुरुष मानत असे. ‘तू मोठेपणी कोण होणार’ असे वडिलांनी विचारले असता तो म्हणत असे मी शिवाजी होणार, नेपोलियन होणार. पण आता ह्या मित्राने शची च्या मनात द्वंद्व निर्माण केले. केवळ पंधरा-सोळा वयाचे दोघेही जण. त्या मित्राचे विचार हे विरक्तीकडे झुकणारे होते. संन्यास घ्यावा आणि सामाजिक कामापासून वेगळे होऊन स्वतःच्या उन्नतीसाठी साधना करत जीवन व्यतीत करावे असे त्याचे म्हणणे होते. शचीसाठी हे समाजापासून दूर जाणे, आपली आपण साधना करत राहणे कठीणच होते. परंतु त्या मित्राच्या मते, मनुष्याचा श्रेष्ठ आदर्श म्हणजे जीवनात ईश्वरप्राप्ती करून घेणे, सत्याची अनुभूती घेणे आणि त्यानंतरच समाजासाठी काम करणे उचित राहील. ईश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय समाजाची सेवा करणे म्हणजे आंधळ्याने आंधळ्याला मार्गदर्शन करण्यासारखे आहे.  ईश्वराच्या साक्षात्कारानंतर त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या आज्ञेनुसार समाजाची सेवा करणे सार्थकी लागेल. आपल्या मतांना पुष्टी देण्यासाठी त्या मित्राने श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रांचा उल्लेख केला. शची च्या मनातील द्वंद्व संपेना. एका बाजूला तो समाजापासून दूर जाऊ शकत नव्हता पण मित्राचेही म्हणणे त्याला अगदीच अमान्य नव्हते. सहा महिने ही घालमेल चालली. शची ने श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची चरित्रे वाचली. त्यांच्या वचनांवर एकांतात एकाग्रतेने त्याने गहन विचार केला. उपनिषद आणि गीतेचा अनुवाद त्याने वारंवार वाचला, साधू-संतांच्या सहवासात राहिला. पण विश्वकल्याणाची कामना करणारे साधू-संत हिंदुस्थान पारतंत्र्यात असताना स्वतःच्याच कल्याणात मग्न आहेत हे त्याला जाणवले. ते लोकांमध्ये मिसळत नाहीत, त्यांना राष्ट्रभक्ती, स्वदेशप्रेम यांबद्दल उचित मार्गदर्शन करत नाहीत तर केवळ परमार्थ, ईश्वरसाधना, भजन यात मग्न राहतात. शेवटी गीतेतील कर्मयोगाने त्याच्या मनातील द्वंद्व संपवले. स्वामी विवेकानंदांनी केलेला कर्मयोग व संन्यास यांचा योग्य मिलाफ त्याच्या मनातील वादळ शांत करता झाला. कुठलाही मार्ग उच्च अथवा नीच नाही. प्रत्येक मार्ग आपापल्या ठिकाणी योग्यच आहे, विविध महापुरुषांनी वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सत्याची अनुभूती घेतली आहे. तेव्हा एकाच गंतव्याकडे जाणारे विविध मार्ग असू शकतात आणि ते सर्व योग्यही असू शकतात याबद्दल त्याच्या मनाची खात्री पटली. आपले आयुष्य कर्मयोगी बनून व्यतीत करण्याचे त्याने ठरवले. भारतात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांची सद्गुणावली एकवटलेले महापुरुष जन्माला यावेत अशी त्याची इच्छा होती. कर्महीन झाल्यामुळे भारतवर्षाचे अधःपतन झाले आहे ही त्याची धारणा दृढ होत गेली.
श्री अरविंद घोषांच्या रूपाने (औरोबिंदो घोष) त्याला आध्यात्म आणि स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व याचा योग्य संगम पहायला मिळाला. १९११ ला योगी अरविंदांची भेट घेण्यासाठी त्याने पुदुच्चेरी गाठले. पण दुर्दैवाने भेट होऊ शकली नाही. १९२० ला काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पाहिले की महात्मा गांधींचा उदय राष्ट्रीय क्षितिजावर झाला आहे. क्रांतिकारी आंदोलनाच्या विरोधात असणाऱ्या गांधीजींच्या विचारांनी त्याला अस्वस्थ केले. बेळगाव कॉंग्रेस अधिवेशनात गांधीजींच्या भाषणाने व्यथित होऊन त्याने प्रत्युत्तर म्हणून एक पत्र गांधीजींना पाठवले जे १२ फेब्रुवारी १९२५ च्या ‘यंग इंडिया’ मध्ये जसेच्या तसे प्रकाशित करण्यात आले व सोबत गांधीजीनी त्याला दिलेले उत्तरही!
१९२३ च्या सुमारास शचीचा संबंध कम्युनिस्ट विचारधारेशी आला. साम्यवादाच्या सिद्धांतांचा सखोल अभ्यास त्याने केला. विशेषत्वाने साम्यवादाचे आर्थिक चिंतन त्याला पटले, पण बाकी बाबतीत तो शेवटपर्यंत साम्यवादी विचारधारेच्या विरूद्धच राहिला. धार्मिक वृत्ती, हिंदू धर्माप्रती आस्था, जनसामान्यांची सेवा यामुळे शचीन्द्रनाथ साम्यवादाच्या भोवऱ्यात अडकले नाहीत. आधुनिक विज्ञानातून प्राचीन भारतीय दर्शनशास्त्राच्या सिद्धांतांची पुष्टीच होत जात आहे असे शचीचे म्हणणे होते. आपल्या देशातील काही लोक परानुकरणामुळे आत्मवादाचा स्वीकार करत नाहीत आणि जे लोक आत्मवादावर विश्वास ठेवतात त्यांचीही ते खिल्ली उडवतात.
“राष्ट्रीय क्षेत्रामध्ये जे लोक त्याग आणि वीरवृत्तीने पुढे जात असतात त्यांच्या विचारधारेचा प्रभाव सामान्य तरुणांवर पडत असतो, आणि रशियन क्रांतीच्या आंदोलनाच्या यशस्वीतेमुळे आपल्या देशातील बहुतांश तरुण त्यामागे जाताना दिसतात. पण सगळ्याच्या मुळाशी आर्थिक कारणे आहेत या मार्क्सवादी सिद्धांताशी मी सहमत नाही. साम्यवादाचा स्पर्श नसलेल्या जगातील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इटली, अमेरिका, जपान इत्यादि देशांकडेही पहायला हवे. त्यांच्याकडूनही शिकायला हवे.”
अशी वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्या शचीन्द्रनाथने अनुशीलन समितीची एक शाखा १९१३ ला पटण्याला सुरु केली. गदर कटाच्या आखणीत त्याचा सिंहाचा वाट होता. तो कट फेब्रुवारी १९१५ ला उघडकीला आल्यानंतर शची भूमिगत झाला. रासबिहारी बोसांचा तो अगदी जवळचा सहकारी होता. बोस जपानला निसटल्यानंतर सान्याल हा भारतीय क्रांतिकारकांचा सर्वात ज्येष्ठ नेता बनला. सान्यालच्या कटातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा देऊन त्याची रवानगी अंदमान निकोबारच्या सेल्युलर तुरुंगात करण्यात आली. तिथे त्याने ‘बंदी जीवन’ हे पुस्तक लिहिले. त्याची तात्पुरती सुटका करण्यात आली खरी पण स्वस्थ बसेल तर तो क्रांतिकारक कसला! हाडाचा देशभक्त असलेला शची पुन्हा इंग्रज विरोधी कारवायात गुंतून गेला. त्याची पुन्हा तुरुंगात पाठवणी करण्यात आली आणि त्याचे बनारसमधील कुटुंबाचे घर जप्त करण्यात आले.
१९२२ ला असहकार आंदोलन संपल्यानंतर सान्याल, रामप्रसाद बिस्मिल आणि अन्य क्रांतिकारकांनी ऑक्टोबर १९२४ च्या सुमारास हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना केली. संस्थेचे घोषणापत्र (manifesto) शचीनेच तयार केले. ३१ डिसेंबर १९२४ च्या दिवशी उत्तर भारतातील मोठ्या शहरांमधून ते वाटले गेले.
काकोरी कटातील सहभागाबद्दल शचीन्द्रनाथला पुन्हा तुरुंगवास घडला. पण ऑगस्ट १९३७ ला नैनी सेन्ट्रल तुरुंगातून त्याला सोडण्यात आले. त्यामुळे पोर्ट ब्लेअर च्या सेल्युलर तुरुंगात दोनदा धाडण्यात आलेला क्रांतिकारक हाही आगळावेगळा बहुमान शचीच्या नावावर आहे. कारावासातच शचीला टीबी झाला आणि त्याला त्याच्या अंतिम महिन्यांमध्ये गोरखपूरच्या तुरुंगात पाठवण्यात आले. शची १९४२ मधे निधन पावला.
दिल्लीच्या आत्माराम एंड संस, कश्मीरी गेट, दिल्ली यांनी शचीचे आत्मवृत्त ‘बंदी जीवन’ हे ३ भागात प्रसिद्ध केले आहे. इंटरनेटवरही त्याचे पीडीएफ वाचायला मिळू शकेल. 

Sunday, April 29, 2018

अनामवीरा - ५ बिनोय कृष्ण बसू

५. बिनोय कृष्ण बसू 

वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी मृत्यूला कवटाळणारा बिनोय क्रांतीचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी आपली समिधा अर्पण करता झालाच पण क्रांतीपथावर अग्रेसर होणाऱ्या युवकांसाठी प्रेरणास्थानही ठरला.

मुन्शीगंज जिल्ह्यातल्या रोहितभोग या गावी (आताच्या बांगलादेशात) पेशाने अभियंता असलेले वडील रेबतीमोहन बसू आणि आई क्षीरोदबाशिनी देबी यांच्यापोटी ११ सप्टेंबर १९०८ रोजी बिनोय चा जन्म झाला. त्याची आई धार्मिक होती. ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा आणि अधर्माचा विनाश या गोष्टी बिनोय च्या मनावर लहानपणीच ठसल्या असाव्यात. त्याबरोबरच बिनोय च्या आधीच्या फळीतील क्रांतिकारकांचे कर्तृत्वसुद्धा त्याला प्रेरणा देऊन गेले असणार यात काहीच शंका नाही.

ढाक्याला आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिनोयने पुढील शिक्षणासाठी मिटफोर्ड मेडिकल स्कूल (आताचे सर सलिमुल्लाह मेडिकल कॉलेज) मधे प्रवेश घेतला. पण कॉलेजमधे शिकतानाच क्रांतीकार्याशी बिनोय चा संबंध आला. हेमचंद्र घोष यांचा प्रभाव बिनोयवर पडला आणि त्याने ‘युगांतर पार्टी’शी संबंध असलेल्या ‘मुक्ती संघ’ या गुप्त गटाचे सदस्यत्व स्वीकारले. युगांतर अथवा जुगांतर या संघटनेबद्दल प्रस्तुत लेखमालेच्या आधीच्या लेखांमधे संदर्भ आला आहे. जहाल क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीसाठी स्थापन केलेल्या या संघटनेला एकामागून एक तरुण जोडले गेले. बिनोय सुद्धा त्या कोवळ्या तरुणांपैकीच एक!

पहिल्या महायुद्धानंतर बिनोय चे वडील कलकत्त्याला परतले परंतु बिनोय मात्र ढाक्यालाच राहिला. १९२८ कलकत्त्याला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ‘बंगाल स्वयंसेवक’ दलाची (Bengal Volunteers) निर्मिती केली. बिनोयने त्याची शाखा ढाक्याला सुरु केली. ‘ऑपरेशन फ्रीडम’ ची आखणी करण्यात आली. ही मोहीम इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात होती ज्यांनी आपल्या अनन्वित अत्याचारांनी केवळ क्रांतिकारक नव्हे तर सामान्य जनतेला छळले होते. अमानुषतेची परिसीमा गाठणारे हे आसुरी पोलीस अधिकारी ‘संपवणे’ हाच एकमेव मार्ग उरला होता. वृद्ध, स्त्रिया, बालके यांच्यावरही पशुवत् अत्याचार करणाऱ्या वर्दीतील दैत्यांना दुर्गेच्या उपासकांनी यमसदनास धाडले नसते तरच नवल! आणि याच अर्थाने वंदे मातरम् गीतातील ‘कोटी कोटी भुजैर्धृतखरकरवाले, अबला केनो मां एतो बोले’, आणि ‘बाहु ते तुमि मां शक्ती’ ह्या पंक्ती असाव्यात. शेवटी भारतमाता ही दशप्रहरणधारिणी असली तरी ती काही चित्रातून बाहेर येणार नाही दैत्यांचं निर्दालन करायला. ते काम तिच्या जीवित सुपुत्रांनाच करायचं आहे. त्यामुळे बिनोय सारख्या कोवळ्या तरुणांनी जुलमी इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन फ्रीडम’ हाती घेतले.

१९३० च्या ऑगस्ट महिन्यात इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस लोमन (Lowman) हा मेडिकल स्कूल हॉस्पिटल मधे आजारी पोलीस अधिकाऱ्याला पाहण्यासाठी येणार होता. त्यावेळी त्याची हत्या करण्याचा कट आखण्यात आला. २९ ऑगस्ट १९३०. पारंपरिक बंगाली वेषात बिनोय हॉस्पिटल मधे वाट पाहत थांबला होता. सावज टप्प्यात येताच अगदी जवळून बिनोय ने त्यावर पिस्तुल चालवले. जागच्या जागी लोमन मरण पावला. त्याच्याबरोबरचा होडसन हा पोलीस अधीक्षक (Superintendant of Police) गंभीररित्या जखमी झाला. बिनोय तिथून सटकण्यात यशस्वी झाला खरा, पण बिनोयनेच हे कृत्य केल्याबद्दल पक्की माहिती पोलिसांना होती आणि त्यामुळे त्याचे कॉलेज मॅग्झिन मधून घेतलेले रेखाचित्र आणि त्याच्यावर त्याकाळी लावलेले १०,००० रुपयाचे इनाम (काही संदर्भांनुसार ५,००० रुपये) सगळीकडे प्रदर्शित करण्यात आले. पण बिनोय नाट्यमयरित्या पोलिसांना चकवा देत राहिला. ह्या सुमारास नेताजींनी बिनोय ला परदेशात पाठवता येईल असे सांगितले. पण विनम्रतेने नकार देऊन बिनोय ने हिंदुस्थानातच राहणे पसंत केले. कारण नियतीच्या मनात त्याच्या हातून अजून कार्यभाग साधणे होते.

ऑगस्ट महिन्याच्या बंगालमधील मुसळधार पावसात गुडघ्याएवढ्या साचलेल्या पाण्यातून दोन मुस्लीम वेशातील युवक वाट काढत चालले होते. दोलाईगंज या जवळच्या रेल्वे स्टेशनवर ते चालले होते. स्टेशन पोलिसांनी गजबजलेले होते. बिनोय चे रेखाचित्र सगळीकडे लावण्यात आले होते. ट्रेन ढाक्याहून नारायणगंजला आली. पोलिसांनी प्रत्येक डब्यात कसून तपासणी सुरु केली. बिनोय आणि त्याचा सहकारी तृतीय श्रेणीच्या खच्चून भरलेल्या डब्यात होते. ट्रेन पूर्णपणे थांबल्यावर बिनोय व त्याचा सहकारी धक्क्याच्या दिशेने चालू लागले कारण कलकत्त्याला पोहोचण्यासाठी बोटीने मेघना नदी पार करून जाणे आवश्यक होते. पोलिसांची करडी नजर बोटींवरही होती. परंतु मधल्या वेळात बिनोय आणि त्याचा सहकारी हे आधीचे रूप बदलून आता एक जमीनदार आणि त्याचा नोकर झाले होते. त्याच्या सहकाऱ्याचे नाव सुपती रॉय होते. बोटीचा प्रवास पूर्ण झाल्यावर सिल्डाह या मुख्य टर्मिनसवर उतरण्याऐवजी ते तुलनेने कमी वर्दळ असलेल्या डमडम स्टेशनवर उतरले. तिथून मध्य कोलकात्याच्या वलीउल्लाह गल्लीत काही काळ वास्तव्य करून लगेच कात्रसगढ जवळच्या एका कोळसा खाणीच्या आसपासच्या परिसरात बिनोय स्थलांतरित झाला. तिथून पुढे उत्तर कोलकात्याच्या एका, तुलनेने शांत असलेल्या परिसरात, बिनोय ने आपले बस्तान हलवले. पण पोलीस आपल्या मागावर आहेत आणि ते आपल्यापर्यंत लवकरच पोहोचतील अशी कुणकुण असलेल्या बिनोय ने पोबारा केला आणि त्याची माहिती खरी ठरली. तत्कालीन पोलिसप्रमुख चार्ल्स तेगार्ट पोलीस ताफ्यासह बिनोय च्या शेवटच्या पत्त्यावर येऊन पोहोचला. सारे एका चित्रपटाप्रमाणे चालले होते जणू!

बिनोय आणि त्याच्या सहकाऱ्यांचे पुढील लक्ष्य होते पोलीस महासंचालक (कारागृह), कर्नल एन.एस.सिम्प्सन (Inspector General of Prisons). कारागृहात बद्ध असणाऱ्या क्रांतिकारकांच्या छळाचा बदला घेण्याचे निश्चित झाले. पण त्याचवेळी एकूणच इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये दहशत व भिती पसरण्यासाठी सेक्रेटरिएट बिल्डिंगवरही हल्ला करण्याचे निश्चित करण्यात आले. ८ डिसेंबर १९३० ला बिनोय आणि त्याचे सहकारी दिनेश गुप्ता आणि बादल गुप्ता युरोपियन वेषात ‘रायटर्स बिल्डिंग’मध्ये प्रवेश करते झाले. तिथे कर्नल सिम्प्सन ला जागच्या जागी ठार मारण्यात आले. आपल्या दहशतीसाठी प्रसिद्ध असलेलले ट्वायनॅम, प्रेंटिस, नेल्सन हे अन्य अधिकारीही चकमकीत जखमी झाले. चकमक काहीकाळ चालली. पोलिसांना अधिक कुमक येऊन मिळाली. सर्व शस्त्रसाठ्यासह सज्ज पोलीस आणि अपुऱ्या साधनांनिशी लढणारे बिनोय व त्याचे सहकारी ही असमान लढाई फार चालली नाही. राष्ट्रभक्त स्वाभिमानी बिनोय, दिनेश आणि बादल ला शत्रूच्या हाती लागायचेच नव्हते. बादल ने पोटॅशियम सायनाईड घेऊन इहलोकीची यात्रा संपवली तर अनामवीर बिनोय आणि दिनेश यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. बिनोय ला इस्पितळात नेण्यात आले जिथे १३ डिसेंबर १९३० ला त्याची प्राणज्योत मालवली. दिनेश मात्र वाचला. त्याच्यावर खटला भरून, दोषी म्हणून सिद्ध करून त्याला फाशी देण्यात आले.
रायटर्स बिल्डिंग चे एक जुने छायाचित्र 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डलहौसी चौकाचे नामकरण बिनोय-बादल-दिनेश बाघ (बी.बी.डी. चौक) असे करण्यात आले.

‘रायटर्स बिल्डिंग’च्या पहिल्या मजल्यावरील भिंतीवर त्यांच्या प्रेरक स्मृतीसाठी नावे कोरण्यात आली आहेत. अशारीतीने आगामी पिढ्यांसाठी, युवा क्रांतिकारक, देशभक्त यांच्यासाठी प्रेरणा बनून वयाच्या केवळ २२ व्या वर्षी बिनोय बसू अनंतात विलीन झाला...

Sunday, December 10, 2017

अनामवीरा-४

4. शशिभूषण रायचौधुरी ऊर्फ शशिदा


शिक्षक आणि शेतकरी यांच्या प्रमाणे नवनिर्मितीचं मूलभूत काम क्वचितच अन्य समाजघटक करत असतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही या दोन्ही घटकांचे अनन्यसाधारण योगदान आहे. 

तसंही क्रांतिकारक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शस्त्र परजून ब्रिटिश राजवटीवर चालून जाणारा युवक येतो, जो नंतर फासावर बलिदान देतो; पण वैचारिक क्रांती, शस्त्रहीन असूनही जाज्वल्य देशाभिमान जोपासणे, नि:शस्त्र राहून अखंड कार्य करीत राहणे अशा गोष्टी आपल्या लेखी कदाचित क्रांती या घटकात मोडणाऱ्या नाहीत, म्हणून आपण अशांना समाजसुधारक, विचारवंत म्हणतो पण अशांनीही आपले जीवन राष्ट्रयज्ञाच्या बलिवेदीवर समर्पित केल्याने आणि क्रांती कार्यातील आपला वाटा उचलल्याने मी त्यांनाही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकच म्हणेन. आणि अशांपैकीच थोडी वेगळी वाट चोखाळणारे एक अल्पपरिचित क्रांतिकारक म्हणजे बंगाल प्रांतातील शशिभूषण रायचौधुरी उर्फ शशिदा! 

आठ जानेवारी १८६३ ला बराकपूरच्या जवळील तेघारिया गावी सौदामिनी देवी आणि आनंदचंद्र या प्रतिष्ठित दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेला शशिभूषण हा त्या दाम्पत्याचा सगळ्यात लहान मुलगा. स्वतः सोडेपूर उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतानाच शशीने गरीब घरातील मुलांसाठी पारंपरिक पद्धतीने शिक्षण देणारी पाठशाळा सुरू केली. अशा मुला-कुटुंबांना अन्यथा ख्रिश्चन धर्मप्रसारक हेरत असत. कालांतराने शशिभूषणने प्रौढांसाठीचे सायंकालीन वर्ग सुरू केले त्यातून बंगाली भाषा, इतिहास, गणित या बरोबरीने विणकाम, शेती, रेशीमकिड्यांची पैदास अशा प्रकारचे जीवनोपयोगी प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्तीही केली. 

१८८० ला कलकत्त्याच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्युशनची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याचे पुढचे शिक्षण सुरू झाले. तिथले संचालक ईश्वरचंद्र विद्यासागर आणि शिक्षक म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी, खुदीराम बोस (हुतात्मा नव्हे) अशांचा सहवास लाभला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी योगेंद्र विद्याभूषणला इटालियन क्रांतिकारक मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे आपल्या भाषणातून प्रसिद्ध करायला सांगितली होती. शिवाय कॉलेजमध्ये चंडीदास घोष यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक प्रशिक्षणाचा तास चालत असे. अशा वातावरणात शशिभूषण शांत राहणे शक्यच नव्हते. आनंदमोहन बसूच्या सहकार्याने शशीने विद्यार्थी संघटना सुरू केली. शशी नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन शरीरसाधना करीत असे. पारंपरिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणासाठी तो स्वामी विवेकानंदांना भेटल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. स्वामी विवेकानंदांच्या ‘व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण’ या विचारांनी शशिभूषणच्या जीवनाची दिशा निश्चित केली. 

१९०० ला कलकत्यात अनुशीलन समितीसाठी काही चारित्र्यवान आणि सक्षम तरुणांची मागणी शशिभूषणकडे करण्यात आली. तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या शशिदाने सतीश मुखर्जी, निबारण भट्टाचार्य, इंद्रनाथ नंदी, निखिलेश्वर राय मौलिक, जतींद्रनाथ मुखर्जी असे युवक पाठवले. 

याच सुमारास रवींद्रनाथ टागोरांचे शांतिनिकेतन आकार घेत होते. ६ जानेवारी १९०२ ला शिक्षकांच्या पहिल्या तुकडीत शशिदा सहभागी झाले. मार्च १९०२ ला शशिदा कलकत्त्याला परतले ते अनुशीलन समितीच्या उद्घाटनासाठी. अनुशीलन समितीने शशिदांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्रमजीवी विद्यालय’ सुरू केले.

बंगालमधील थंडीच्या दिवसातील एक संध्याकाळ. हिवाळ्यामुळे अंधार लवकर झालेला. दिवेलागणी होऊन कचेऱ्यांतून लोक आपापल्या घरी परतत होते. ठिकठिकाणच्या कालिमाता मंदिरांतून घंटानाद आणि सर्बमाँगल माँगल्ये शिबे सर्बार्थसाधिके या श्लोकाचे स्वर अनुनादित होत होते आणि पारंपारिक वेशातले बंगाली स्त्री पुरुष बाजारहाट करायला बाहेर पडले होते. त्याचवेळी ‘श्रमजीवी विद्यालय’ गॅसबत्त्या-कंदील यांनी उजळून गेले होते. कामकरी वर्गातील गरीब घरातील स्त्री पुरुष हातात कंदील घेऊन विद्यालयात येत होते. तिथे केवळ अक्षरओळख अथवा साक्षरता हे लक्ष्य नसून येणाऱ्या प्रौढांना साबण बनवणे, शिवणकाम, उदबत्त्या बनविणे, विणकाम, मातीची भांडी बनविणे असे रोजगाराभिमुख प्रशिक्षणही दिले जात होते, बाजारात त्या उत्पादनांची विक्री करणारे ‘छात्र भंडार’ होते ज्याची जबाबदारी नंतर अमरेंद्रनाथ चॅटर्जी यांनी घेतली .

१९०४ च्या अखेरीस शशिदा बिहारमधील मुंगेरला गेले. तिथे निमधारी सिंह आणि अन्य प्रांतीय नेत्यांच्या सहकार्याने त्यांनी ‘आदर्श विद्यालय’ सुरू केले. १९०५ मध्ये ते ओरिसाला गेले आणि त्यांच्या प्रेरणेतून उत्कलमणी गोपालबंधू दास यांनी शारीरिक व सांस्कृतिक शिक्षण देणारे केंद्र भुवनेश्वरला चालू केले. १९०९ला ‘सत्यवादी विद्यालय’ सुरू झाले.

शशिदांचे अनुशीलन समितीतील सहकारी सशस्त्र क्रांतीचा मार्ग समांतर रीतीने चोखाळत होतेच पण अलीपूर बॉम्ब खटल्यानंतर सरकारने क्रांतिकारी संघटनांना त्वेषाने दडपायला सुरुवात केली. १९०९च्या सुमाराला रासबिहारी बोस यांच्यावर ब्रिटिशांची करडी नजर आहे असा सुगावा लागल्याने शशिदांनी रासबिहारींना डेहराडूनला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. शशिदा स्वतः दौलतपूर कॉलेजच्या हॉस्टेलचे अधीक्षक म्हणून रुजू झाले. शशिदा, उपप्राचार्य महेंद्रनाथ सेठ, विद्यार्थी नेता भूपेंद्र कुमार दत्ता हे तिघेही एकत्र राहात असत. पुढे १९१७ ला तिघांनाही एकत्रच अटक करण्यात आली; पण तत्पूर्वी दररोज सकाळी आणि संध्याकाळी शारीरिक व्यायाम, कसरत, योग-ध्यान, निवडक वाचन, देव देशभक्तीपर गीते यासाठी तरुण एकत्र जमत असत. बाघा जतीन (ज्यांचे चरित्रही आपण या अनामवीरा मालिकेत कालांतराने पाहणार आहोत) सुद्धा १९११पासून आपल्या प्रवासात या कॅम्पसला आवर्जून भेट देत असत. त्यांच्या प्रेरणेने तरुण घोडेस्वारी, पोहणे, लष्करी कवायत हेही करू लागले १९१३ च्या सुमारास दामोदर नदीला भीषण पूर आला. जनजीवन विस्कळीत झाले. शशिदांनी स्वयंसेवक दल बनवून बाघा जतिनच्या नेतृत्वाखाली दामोदर नदी पूरग्रस्त सहाय्यतेसाठी पाठवून दिला . 

या सर्व कालावधीत म्हणजेच १९१० ते १९१५ मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार कलकत्त्यात होते. वैद्यकीय शिक्षण घेत होते. ते अनुशीलन समितीचेही सदस्य होते. दामोदर नदी पूरग्रस्त सहायतेसाठी तेही गेले होते, त्यामुळे स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन शशिभूषण रॉयचौधुरी तरुणांना जमवून सकाळी आणि संध्याकाळी जे शारीरिक बौद्धिक प्रशिक्षण देत असत त्याचा पूर्ण परिणाम डॉक्टर हेडगेवारांनी १९२५ ला स्थापना केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर दिसून येतो त्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेतील कार्याचे प्रत्यक्षातील क्रियान्वयन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने झाले व संघशाखा त्याचे मूर्तस्वरूप ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये .

१९१५ ला बाघा जतिनच्या हौतात्म्याने शशिदा व्यथित झाले आणि अधिक गतीने सेवा कार्य त्यांनी सुरू केले. १९१७ ला ब्रिटिश सरकारने शशिदांना अटक केली पण त्यांना झालेला टीबी लक्षात घेता सरकारने त्यांची पत्नी ऊर्मिला देवी, मुलगी राणी आणि दुर्गा आणि मुलगा अशोक यांच्यासह आधी दौलतपूर आणि नंतर खुलना येथे त्यांना स्थानबद्धतेत ठेवले. १९१९ ला सुटका झाल्यानंतर ते तेघारिया येथे परतले. त्यांच्या शाळेचा दर्जा सुधारणे, मलेरियाबाबत जनजागृती करणे या कामाला त्यांनी जुंपून घेतले. अखेर एप्रिल १९२२ला मृत्यूने गाठेपर्यंत त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले .

Sunday, December 3, 2017

अनामवीरा - ३

3. बसंत कुमार बिस्वास



“बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए” । हा आनंद सिनेमातला डायलॉग आपल्याला आठवत असेल. हा डायलॉग प्रत्यक्ष जगलेला, उणंपुरं २० वर्षांचं आयुष्य लाभलेला बसंत कुमार बिस्वास हा आहे आजचा अनामवीर! 


महाराष्ट्र, बंगाल, पंजाब म्हणजे क्रांतिकारकांसाठी सुपिक भूमीच जणू. स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक अशांपासून प्रेरणा घेऊन क्रांतिकार्यासाठी जीवन समर्पण करणारे हजारो युवक प्रांतोप्रांती तयार झाले. वधस्तंभावर जाणारा एक युवक म्हणजे पुढच्या कित्येक वीरांसाठी प्रेरणा. ६ फेब्रुवारी १८९५ ला बंगालमधील नादिया जिल्ह्यातील पोरगछा या ठिकाणी मतिलाल आणि कुंजबाला बिस्वास या दाम्पत्याच्या पोटी बसंतचा जन्म झाला. दिगंबर बिस्वास आणि मन्मथनाथ बिस्वास अशा क्रांतिकारकांच्या घराण्यात जन्मल्यामुळे त्याच्याही धमन्यांतून क्रांतीचे रक्त न खेळते तरच नवल! गावातल्याच शाळेत त्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली पण पुढे बसंत जवळच्याच माधवपूर नावाच्या गावातील शाळेत जाऊ लागला जिची स्थापना प्रख्यात समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक गगनचंद्र बिस्वास यांनी केली होती . पुढे १९०६ ला मुरगच्चा शाळेत त्याचा प्रवेश झाला जिथे खिरोधचंद्र गांगुली हे मुख्याध्यापक होते. खिरोधचंद्राच्या मार्गदर्शनाखाली बसंतचा स्वातंत्र्यलढ्यातील प्रवास सुरू झाला. आणि पुढे मग रासबिहारी बोस यांच्या संपर्कात आल्यानंतर बसंतचे शस्त्रास्त्रे व स्फोटके यातील प्रशिक्षण सुरू झाले. रासबिहारी त्याला बिशे दास अशी प्रेमळ हाक मारत असत.

१९११ ला किंगजॉर्ज पंचम याचा भारतप्रवास होता आणि राजधानी म्हणून कलकत्त्याऐवजी दिल्लीची घोषणाही झाली होती. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग कलकत्त्याहून दिल्लीत आला होता. त्याचा स्वागतसमारंभ होता. तो दिवस होता, २३ डिसेंबर १९१२.  दिल्लीच्या चांदणी चौकात मोठीच सजावट करण्यात आली होती. सर्वत्र रोषणाई केली गेली होती. फुलांच्या माळांची आरास लक्ष वेधून घेत होती. आणि एका सजवलेल्या गजराजाचे आगमन झाले. मऊ झूल पांघरलेल्या त्या हत्तीवरच्या हौद्यात लॉर्ड हार्डिंग व त्याची पत्नी बसले होते. अन्याय आणि जुलूम यांची परकीय राजवट असली तरी आत्मविस्मृत भारतीय कसे स्वत्व विसरून आपले जंगी स्वागत करत आहेत ही मौज पाहण्यात हार्डिंग दाम्पत्य मग्न होते. आजूबाजूच्या आत्मशून्य गर्दीत एका तरुणीची तीक्ष्ण व भेदक नजर चहूबाजूंना फिरत होती. बरोबरच्या तरुणाबरोबर तिची नेत्रपल्लवीही चालली होती. तो क्षण आला आणि त्या तरुणीने हार्डिंगच्या दिशेने बाँब भिरकावला. बाँबसुद्धा गद्दार निघाला! त्याने अभागी माहुताचा बळी घेतला पण हार्डिंग दाम्पत्य बचावले. चार्ल्स हार्डिंगला जखमा झाल्या. हत्ती बावचळून गेला. सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. काही क्षणांपूर्वीच्या समारंभमग्न चांदणी चौकाचे स्वरूप एकदमच बदलून गेले. जो तो वाट फुटेल तिथे पळू लागला. याच गर्दीचा फायदा घेऊन ती तरुणी व तिचे सहकारी निसटले. ती तरुणी म्हणजेच पौरुषत्वाचे दर्शन घडविणारा पोरसवदा बसंत होता! त्याच्याबरोबरचा साथीदार म्हणजे मन्मथनाथ बिस्वास! आणि या कटाचे योजक सूत्रधार होते रासबिहारी बोस.
 

सर्व क्रांतिकारकांनी कमालीची गुप्तता बाळगली. पण ब्रिटिशांनी हा हल्ला मनाला लावून घेतला. त्यांनी बारकाईने तपास सुरु केला. सहभागी लोकांची नावे सांगणाऱ्यांना मोठी इनामे जाहीर करण्यात आली. पण हाताशी काहीच लागत नव्हते. गंमतीचा भाग म्हणजे त्यादिवशी रासबिहारी बोस त्या गर्दीतून निसटून रेल्वेने डेहराडून ला येऊन आपल्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट मधे दाखल झाले. आणि काही महिन्यांनी लॉर्ड हार्डिंग ची भेट डेहराडून ला त्यांच्या कार्यालयात असताना त्याच्या सन्मानार्थ मेजवानीचेही आयोजन त्यांनी केले. त्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून हार्डिंग सहीसलामत वाचल्याबद्दल ईश्वराचे आभारही मानले गेले! पण फंदफितुरीचा शाप लागलेल्या समाजाविरुद्ध लढणे सोपे असते. ब्रिटिशांना हळूहळू सुगावा लागत होता.

बसंतच्या मागावर पोलीस लागले. बसंत पोलिसांना गुंगारा देत होता पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार करायला आलेल्या बसंतला २६ फेब्रुवारी १९१४ ला पोलिसांनी बरोबर पकडले. पोलीस आज ना उद्या आपल्यालाही पकडणार ही खात्री झाल्याने रासबिहारी चंदननगर ला स्थलांतरित झाले. तिथे भूमिगत राहिल्यानंतर एप्रिल १९१५ ला ते जपानला निघाले. 

इथे २३ मे १९१४ ला दिल्ली-लाहोर कटाचा खटला सुरु झाला. ५ ऑक्टोबर ला बसंत ला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अमीर चरिध, अबधबिहारी आणि बालमुकुंद या तिघांना त्याच खटल्यात फाशीची शिक्षा फर्मावली गेली. ‘ब्रिटिशांचे शासन छान होते हो, त्यांची न्यायव्यवस्था वाखाणण्यासारखी होती’ असे उमाळे आजही दाटून येणाऱ्या लोकांची कमी नाही. त्यांनी पुढील घटनाक्रम लक्षात घेण्याजोगा आहे. 

बसंतला फाशीची शिक्षा न होता जन्मठेपेची झाली. त्यामुळे फाशीसाठी आग्रही असणाऱ्या सरकारने लाहोर उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावेळी बसंत हा अल्पवयीन असल्याची वास्तविकता बदलण्यासाठी अंबाला सेंट्रल जेलमधील रेकॉर्ड्स बदलण्यात आले. बसंत होता त्यापेक्षा २ वर्षांनी मोठा असल्याचे दाखवण्यात आले. त्यानुसार त्यावर आरोपनिश्चिती करून त्याला दोषी ठरवून पंजाब मधल्या अंबाला सेंट्रल जेलमध्ये ११ मे १९१५ ला फाशी देण्यात आले. विसाव्या वर्षी धीरोदात्तपणे वधस्तंभावर जाणारा बसंत हा विसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्यलढयातील सर्वात तरुण क्रांतिकारकांपैकी एक ठरला. 

आज आम्ही बसंतला विसरलो असू, पण जपानच्या टोकियो शहरात तेत्सुकोंग हिओची गार्डन या उद्यानात रासबिहारींनी बसवलेला बसंतचा पुतळा पहायला मिळतो. नादिया या त्याच्या जन्मठिकाणी मुरगच्चा स्कूल आणि सुवेंदु मेमोरियल ट्रस्ट ह्या ठिकाणी तसेच रबीन्द्रभवन ऑडिटोरियम, कृष्णनगर इथे त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारके आहेत. 

संसदेच्या म्युझियममध्ये मात्र त्यांचे तैलचित्र लावायला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचा कार्यकाळ उजाडावा लागला. आमच्या पाठ्यपुस्तकात बसंतच्या वाटयाला किती ओळी आणि त्याही कधी येतील हे कुणालाच सांगता यायचे नाही. त्यामुळे ह्या लेखाद्वारे एक छोटीशी पणती आपले जीवन भारतमातेच्या चरणी अर्पण करणाऱ्या अनामवीर बसंतच्या स्मृतिसाठी!

Sunday, November 26, 2017

अनामवीरा - २

अनामवीरा या मालिकेतील दुसरे पुष्प गुंफताना आज आपण पाहणार आहोत श्री गेंदालाल दीक्षित यांचे संक्षिप्त चरित्र .



गेंदालाल यांचा जन्म तीस नोव्हेंबर १८८८ रोजी आताच्या उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील माई गावी झाला . वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचे निधन झाल्यानंतर वडील भोलानाथ दीक्षित यांनी त्यांचा सांभाळ केला . गावीच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इटावाच्या सरकारी हायस्कूलात त्यांनी पुढचे शिक्षण घेतले आणि आग्र्याहून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले . औरैया येथील शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी पत्करली . राष्ट्रकार्याचा योग काही जणांच्या कपाळीच लिहिलेला असतो . त्यामुळे ते कुठेही असले, कुठल्याही नोकरीधंद्यात-व्यवसायात असले तरी तो योग त्यांना स्वस्थ बसू देत नाही.. तसेच काहीसे गेंदालाल दीक्षित यांचे झाले . 
जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचा घाट घातला तेव्हा स्वदेशी चळवळ संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली. त्याच सुमारास  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ज्वलंत अग्रलेख वाचून पंडित गेंदालाल दीक्षित यांच्याही मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटली. आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे, या स्वातंत्र्यप्राप्तीच्या यज्ञामध्ये आपणही योगदान दिले पाहिजे असे त्यांच्या मनाला वाटू लागले . त्यावेळी लोकमान्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला शिवजयंती उत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता उत्तर भारतातही त्याचे अनुकरण व्हावे असे दीक्षित यांना वाटू लागले . त्यासाठी त्यांनी शिवाजी समितीची स्थापना केली . नोकरीमध्ये सुट्टी घेऊन जवळच्याच ग्वालियर किंवा ग्वाल्हेर संस्थानात ते जाऊन पोहोचले . ग्वाल्हेर संस्थानातील लोक हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे आणि शिवाजी महाराजांप्रती कमालीचा आदर असणारे होते . तिथली बरीच कुटुंबं मूळची  महाराष्ट्रातीलच होती . दीक्षित यांनी तिथल्या तरुणांना स्वातंत्र्यलढयात सहभागी होण्याचे आणि त्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्याचे आव्हान केले . 
शिवाजी समितीच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे साहित्य छापून आणायला सुरुवात केली . राष्ट्रकार्यात जुंपलेल्या प्रचारकाचे काम दुहेरी स्वरूपाचे असते, सज्जन लोकांना शक्तिशाली बनवणे आणि शक्तिशाली लोकांना सज्जन बनवणे अशी दोन्ही कामे त्याला करावी लागतात . त्यामुळेच मध्य प्रदेशातील भिंड आणि मुरैना भागातील दरोडेखोरांकडे गेंदालाल दीक्षितांचे लक्ष न वळते तरच नवल . ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गनिमी कावा वापरून औरंगजेब आणि अन्य मुघल सरदारांच्या फौजांना सळो की पळो करून सोडले होते त्याप्रमाणेच केंदाला दीक्षितांनी या दरोडेखोरांना शस्त्रास्त्रे जमून इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केले . याच दरोडेखोरांनी आग्रा आणि ग्वालियर जवळच्या ग्रामीण भागात दरोडे घालून दीक्षितांना अर्थसहाय्य करायला सुरुवात केली . 
सोमदेव नावाच्या एका क्रांतिकारकांनी दीक्षित आणि रामप्रसाद बिस्मिल यांची ओळख करून दिली . रामप्रसाद बिस्मिल यांनी शाहजहांपूरमध्ये मातृवेदी नावाची एक संघटना स्थापन केली होती. त्यामुळे रामप्रसाद बिस्मिल व गेंदालाल दीक्षित यांची भेट झाली तर त्यातून दोघांच्याही कार्याला पुष्टी मिळेल असा विचार सोमदेव यांनी केला . 
२८ जानेवारी १९१८ ला बिस्मिल यांनी ‘देशवासियों के नाम संदेश’ या नावाने एक पत्रक बनवले आणि ते सगळीकडे वितरित केले . त्यातल्या ‘मैनपुरी की प्रतिज्ञा’ या कवितेचा विशेष परिणाम जनमानसावर झाला . त्याच्यानंतर तीन ठिकाणी छापे घालून निधी उभारणी करण्यात आली . पोलिसांनी पत्रक छापणाऱ्यांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण बिस्मिल पोलिसांच्या हाती लागले नाहीत . पुढे दिल्ली व आग्र्याच्या मध्ये अजून एका छाप्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना मिळालेल्या खबरीनुसार बिस्मिल व त्यांच्या साथीदारांना पकडण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला . कमालीचे चपळ असलेल्या बिस्मिल यांनी यमुना नदीमध्ये उडी घेतली आणि पाण्याखालून पोहत पोहत तीर गाठला . पोलिसांना वाटले की बिस्मिल यांचा अंत पाण्यात बुडून झाला . त्याचवेळी दलपतसिंह नावाच्या युवकाने केलेल्या फितुरीमुळे श्री गेंदालाल दीक्षित आणि त्याच्या काही साथीदारांना पकडण्यात मात्र पोलिसांना यश मिळाले. त्यांना पकडून आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवण्यात आले . 
बिस्मिलनी आग्र्याच्या किल्ल्यात दीक्षितांची भेट घेतली आणि पलायनाचा बेत आखला; परंतु तो प्रत्यक्षात येण्यापूर्वीच दीक्षित यांना मैनपुरीला  नेण्यात आले जेथे त्यांच्याविरुद्ध ‘मैनपुरी कटाचा खटला’ दाखल करण्यात आला . दीक्षितांनी उत्तर प्रांतातल्या दरोड्यांचा खुलासा करण्यासाठी आपण तयार असल्याचे दाखवले आणि पोलिसांनी त्यावर विश्वसून त्यांना मातृवेदी संघटनेच्या तरुणांबरोबर कैदेत ठेवले . मैनपुरीच्या तुरुंगाधिकाऱ्यांना श्री गेंदालाल दीक्षित यांनी असे पटवून दिले की सरकारी साक्षीदार रामनारायण यांना त्यांच्याबरोबर जर ठेवले तर अजून काही जणांचा पर्दाफाश करता येईल आणि त्यांना सुद्धा पकडता येईल . तुरुंगाधिकाऱ्यांनी श्री गेंदालाल दीक्षित व सरकारी साक्षीदार रामनारायण यांना एकाच हातकडीने बांधून ठेवले . पण क्रांतिकार्यात तरबेज असलेल्या दीक्षित यांनी रामनारायण यांच्यासकट कैदेतून पोबारा केला  . मैनपुरीच्या पोलीस जेलमधून गेंदालाल  दीक्षित निसटले आणि दिल्लीला जाऊन राहिले . एक नोव्हेंबर १९१९ ला मैनपुरीच्या मॅजिस्ट्रेटनी, श्री बी एस क्रिस यांनी, सर्व आरोपींविरुद्ध निर्णय घोषित केला आणि दीक्षित व रामप्रसाद बिस्मिल यांना फरार म्हणून घोषित केले . दीक्षितांनी वेषांतर करून दिल्लीतील आपले घर गाठले परंतु त्यांच्या वडिलांनी आपल्यावर आणि घरावर बला नको म्हणून पोलिसांना कळविण्याचा निर्णय घेतला . दीक्षितांनी कशीबशी  वडिलांची समजूत काढली व घर सोडण्याचा निर्णय घेतला . दोन तीन दिवसांत घर सोडून गेंदालाल निघाले दिल्लीतील एका प्याऊवर त्यांनी नोकरी पत्करली . शरीरप्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. टीबीने आता भीषण स्वरूप धारण केले होते . सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या अशा क्रांतिकारकांची सोय स्वतःच्याच काय, पण अन्य कुठल्याही घरात होऊ नये याहून अधिक दुर्दैव ते कोणते!
त्यांनी आपल्या धाकट्या भावाला व पत्नीला बोलावून घेतले. पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू पाहून ते म्हणाले, " तुम रोती क्यों हो ? पत्नी ने रोते हुए उत्तर दिया मेरा संसार में कौन है ?

पंडित जी ने एक ठंठी सांस ली मुस्कुराकर कहने लगे – ‘’ आज लाखो विधवाओं का कौन है ? लाखो अनाथो का कौन है ? 22 करोड़ भूखे किसानो का कौन है ? दासता में जकड़ी हुई भारत माता का कौन है ? जो इन सबका मालिक है वही तुम्हारा भी | तुम अपने आपको परम सौभाग्वती समझना , यदि मेरे प्राण इसी प्रकार देश – प्रेम की लगन में निकल जावे और मैं शत्रुओ के हाथ न आऊ | मुझे तो दुःख तो केवल इतना है कि मैं अत्याचारियों को अत्याचार का बदला न दे सका , मन ही मन में रह गयी | मेरा यह शरीर नष्ट हो जाएगा , किन्तु मेरी आत्मा इन्ही भावो को लेकर फिर दूसरा शरीर धारण करेगी | अबकी बार नवीं शक्तियों के साथ जन्म लेंगे शत्रुओ का नाश करूंगा ‘’ 
उस समय उनके मुख पर एक दिव्य ज्योति का प्रकाश छा गया | आप फिर कहने लगे रहा खाने – पीने का , सो तुम्हारे पिता जीवित है | तुम्हारे भाई है , मेरे कुटुम्बी है ; और फिर मेरे मित्र है जो तुम्हे अपनी माता समझ तुम्हारा आदर करेंगे | "  भावाने त्यांची अवस्था बघून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांच्या पत्नीला एका दुसऱ्या ठिकाणी ठेवून तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला . त्याने बघितले तर पंडितजींचे केवळ मृत शरीर शय्येवर पडून होते . २१ डिसेंबर १९२० ला दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये टीबीने त्यांचे निधन झाले . गेंदालाल दीक्षित म्हणत असत , 
थाती नर तन पाय के, क्यों करता है नेह ।
मुँह उज्ज्वल कर सौंप दे, जिसको जिसकी देह ।।

स्वतः श्री रामप्रसाद बिस्मिल यांनी हिंदीमध्ये गेंदालाल दीक्षित यांचे चरित्र लिहून ते कानपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या प्रभा नावाच्या नियतकालिकात तीन सप्टेंबर १९२४ च्या अंकात अज्ञात या टोपणनावाने लिहिले आहे . 
दिल्लीच्या आत्माराम अँड सन्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या मन्मथनाथ गुप्ता यांच्या ‘भारतीय क्रांतिकारी आंदोलन का इतिहास’ आणि प्रभात प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या श्रीकृष्ण सरल यांच्या ‘क्रांतिकारी कोश’ या पुस्तकांत अधिक माहिती वाचता येईल. 


Saturday, November 18, 2017

अनामवीरा - १

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारक आपल्याला माहिती असतात परंतु अशाही अगणित क्रांतिकारकांची मालिका भारतीय स्वातंत्र्यलढ्यात होऊन गेली ज्यांच्याबाबत दुर्दैवाने आपल्याला फारशी माहिती नसते.
          अशाच काही क्रांतिकारकांबद्दल आपल्याला अंशरूपाने का होईना थोडीफार माहिती व्हावी, त्यांचे संक्षिप्त चरित्र वाचून आपल्याला त्यांच्याबाबत अधिक वाचण्याची प्रेरणा मिळावी आणि आपल्या कुटुंबातील, परिसरातील शालेय वयोगटातील मुलांना तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ही लेखमाला अवश्य वाचून दाखवावी, म्हणून हा लेखनप्रपंच! दर शनिवारी सकाळी इथेच, या ब्लॉगवर एक नवीन पुष्प!
 यात मुख्यत्वे इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती आणि वाचनालयातील पुस्तके यांच्या आधारे लेख लिहिले आहेत. त्यात काही चुकाही असू शकतील, काही संदर्भही चुकले असण्याची शक्यता आहे; त्यामुळे जाणकारांनी त्यावर अवश्य प्रकाश टाकावा व मला लेखात झालेल्या चुका जरूर सुचवाव्यात ही विनंती.

 आपल्याला ही "अनामवीरा" लेखनमाला कशी वाटली हेही मला प्रतिसाद देऊन अवश्य कळवावे.
१. विष्णू गणेश पिंगळे 


पुण्यातल्या तळेगाव-ढमढेरे येथे जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. ९ भावंडांमधले हे सर्वात लहान. सुरुवातीला तळेगाव येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या महाराष्ट्र विद्यालय या शाळेत प्रवेश घेतला. तिथे शिकत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात ते आले. त्या अलौकिक स्वातंत्र्यसूर्याचा स्पर्श होताच विष्णूच्या मनात स्वातंत्र्यप्राप्ती आणि राष्ट्रप्रेम यांचे बीज न अंकुरते तरच नवल! महाराष्ट्र विद्यालय बंद पडल्यानंतर १९०८ साली तळेगावच्या समर्थ विद्यालयात त्यांना भरती करण्यात आलं. दुर्दैवाने १९१० साली ब्रिटीश सरकारने समर्थ विद्यालयही बंद करून टाकलं. ह्या घटनांवरून त्याकाळी शिक्षणाची आणि त्यातूनही राष्ट्रीय विचार देणाऱ्या शिक्षणाची कशी परवड होत होती हे लक्षात येतं.
विष्णूने पुढे मुंबई गाठली आणि गोविंदराव पोतदार यांच्या ‘पायोनियर अल्कली वर्क्स’ या कंपनीत माहीमला नोकरी करू लागला. इथेही श्रीयुत पोतदार हे राष्ट्रीय विचारांचे होते आणि स्फोटकांच्या बाबतीतले तज्ञ होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विष्णूची ओळख करून दिली. त्यातल्या हरी लक्ष्मण पाटील या वसईला राहणाऱ्या वकिलांशी विष्णूची खास मैत्री झाली. पुढे स्वदेशी चळवळ ऐन भरात असताना जपानी हातमाग उद्योगांपासून प्रेरणा घेऊन पिंगळे यांनी लातूरजवळ स्वतःचा स्वदेशी हातमाग सुरु केला. पण त्यांची मनिषा ही नेहमीच एक अभियंता बनावं अशी होती.
 विष्णू गणेश पिंगळे यांनी अमेरिकेत जाण्याचा आपला मनोदय थोरले बंधू केशवराव यांचेकडे रेल्वेस्थानकावर प्रकट केला. प्रवासाला सुरुवात झाली. हाँगकाँग मार्गे ते अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत १९१२ साली त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग ला प्रवेश घेतला.  अमेरिकेतल्या सिअटेल (Seattle) विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. अमेरिकेत असतानाचा ते इंडिअन रेव्होल्युशनरी पार्टीया संस्थेचे सभासद झाले आणि त्यांनी सशस्त्र दलांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष पसरवायला सुरुवात केली. अनेक नावे बदलून आणि वेषांतर करून त्यांनी देशभर प्रवास केला. ठिकठिकाणी ते इंग्रजांच्या विरुद्धच्या असंतोषाची बीजे पेरीत गेले. जनमानस चेतवीत गेले.
गदर कटाचा भाग झाले. ऑक्टोबर १९१४ ला स्वतः पिंगळे, सत्येन भूषण सेन, कर्तारसिंग सराभा आणि काही शीख क्रांतिकारक अमेरिकेतून निघाले. सत्येन आणि पिंगळे चीनमधे काही दिवस थांबले. त्यांचा उद्देश होता तहाल सेन आणि अन्य नेत्यांना भेटून सहकार्याची चाचपणी करणे. डॉ सन् यत् सेन यांचीही भेट चीनमधे झाली. नोव्हेंबर १९१४ ला सत्येन आणि पिंगळे कलकत्त्यात पोहोचले. तिथे सत्येन ने पिंगळेंची ओळख जतिंद्रनाथ मुखर्जी म्हणजेच बाघा जतिन यांच्याशी करून दिली. बाघा जतिन यांच्याशी विस्तृत चर्चा झाल्यावर त्यांनी पिंगळेंना रासबिहारी बोस यांच्याकडे बनारसला पाठवले. बनारस त्यावेळी क्रांतिकारकांचे केंद्र बनले होते. तिथून लाहोर, कलकत्ता, अमृतसर, बनारस असा प्रवास पिंगळे करत राहिले. क्रांतिकारकांमधला दुवा म्हणून कार्यरत राहिले. इंग्रज सैन्याच्या विविध तुकड्यांमधील सैनिकांच्या संपर्कात राहिले. सगळं व्यवस्थित जुळवत आणलं होतं. फेब्रुवारी १९१५ ला उठाव करायचा असं ठरलं. पंजाबमधले २३ वे घोडदळ २१ फेब्रुवारीच्या दिवशी उठाव करून शस्त्रे हस्तगत करून आपल्या अधिकाऱ्यांना मारून टाकणार होते. त्यावर लगेच २६ वी पलटण पंजाबात बंड करणार होती; जो लाहोर आणि दिल्लीच्या उठावांसाठी संकेत ठरला होता. क्रांतिकारकांनी ढाक्यातल्या शीख सैनिकांना आपल्यात सामील करून घेण्यात यश मिळवले होते. जर पंजाबातला उठाव यशस्वी झाला तर हावरा स्टेशनला येणारी ‘पंजाब मेल’ रद्द झाली असती. आणि हाच संकेत तिथल्या उठावासाठी ठरला होता. दळणवळणाची साधने मुळातच तुटपुंजी, वेगवान साधनांचा तर अभाव, आणि वरून इंग्रज गुप्तहेर खात्याची वक्रदृष्टी ह्यातून मार्ग काढण्यासाठी असे संकेत ठरले होते. पण,........
नेहमीचाच शाप पुन्हा एकदा! फंदफितुरी! पंजाब सी.आय.डी. ने किरपाल सिंग नावाच्या अमेरिकेतून परतलेल्या आपल्या गुप्तहेराच्या मदतीने सर्व कट अगदी अंतिम क्षणी यशस्वीरित्या जाणून घेतला. हा किरपाल २३ व्या घोदडळात सैनिक असलेल्या बळवंत सिंग चा भाऊ होता. १५ फेब्रुवारी १९१५ ला लाहोर ला रासबिहारी यांच्याकडे पिंगळेंसकट डझनभर क्रांतिकारक जमले होते. तिथे किरपाल सिंग ने प्रवेश मिळवला होता.
१३०व्या बलुच रेजिमेंटचा रंगून इथला उठाव २१ फेब्रुवारीला मोडून काढण्यात आला. २६ वी पंजाब, ७ वी राजपूत, २४ वा जाट तोफखाना हे सगळे उठाव मोडून काढण्यात आले. फिरोझपूर, आग्रा, लाहोर हे सारे उठाव निर्दयीपणे चिरडून टाकण्यात आले. तरीही कर्तारसिंग आणि पिंगळे यांनी १२ व्या घोडदळ रेजिमेंट मधे मेरठ (मीरत) ला उठाव घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कर्तारसिंग यांना बनारसहून अटकेत घेण्यात आले आणि पिंगळे यांना मेरठहून २३ मार्च १९१५ च्या रात्री अटक करण्यात आली.  
२३ मार्च १९१५ ला त्यांना अटक करण्यात आली त्यावेळी त्यांच्या ताब्यात अति ज्वालाग्राही स्फोटके सापडली. तत्कालीन मुंबई पोलिसांच्या रिपोर्टनुसार ‘लॉर्ड हार्डिंग्ज वर दिल्लीत जो बॉम्ब फेकण्यात आला होता तशाप्रकारचे १० बॉम्ब्स विष्णू पिंगळेंकडे होते’. एक अख्खी रेजिमेंट उडवून देण्यासाठी हे पुरेसे होते. ह्यानंतर मोठ्या प्रमाणावर धरपकड झाली. रासबिहारी बोस लाहोरहून मे १९१५ ला जपानला निसटले. ग्यानी प्रीतम सिंग, स्वामी सत्यानंद पुरी, आणि अन्य नेते थायलंड वगैरे देशांमध्ये निघून गेले.
विष्णू गणेश पिंगळेंवर ब्रिटीश सैन्यातील सैनिकांना भडकवण्याचा आणि इंग्रजी सत्ता उलथून टाकण्यासाठीचा असंतोष सैन्यदलात पसरवण्याच आरोप ठेवण्यात आला. कर्तारसिंग, हरनाम सिंग, भाई परमानंद यांच्याबरोबरीने ‘लाहोर कटाचा खटला’ डिफेन्स ऑफ इंडिया अॅक्ट, १९१५ च्या अंतर्गत निर्मिलेल्या विशेष प्राधिकरणाने एप्रिल १९१५ मधे चालवून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. १७ नोव्हेंबर १९१५ ला लाहोर च्या सेन्ट्रल जेलमध्ये त्यांना आणि कर्तारसिंग यांना फासावर चढविण्यात आले. किती त्वरेने हा खटला चालवला गेला असेल पहा. एक तेजस्वी शलाका त्यांच्या रूपाने स्वातंत्र्याच्या नभोमंडळात चमकून गेली, अनेकांना प्रेरणा देऊन गेली, भावी पिढ्यांसाठी राष्ट्रभक्तीचे नंदादीप तेवत ठेवून गेली..
त्यांचे पुण्यस्मरण म्हणून मुंबईतील चिंचपोकळी येथील एका रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे.

पुढील लेख :- vikramwalawalkar.blogspot.in/2017/11/blog-post_26.html


Tuesday, October 24, 2017

संप संपतील काय ?

            जेव्हा आपण एखादं नित्यकार्य करत असतो आणि दुसऱ्याला त्याची जाणीव अथवा कदर नाही असं वाटलं आणि ते जाणवून द्यायचं असेल तर त्याची सोपी पद्धत म्हणजे ते काम न करणं. अशातून समोरच्याला ते काम झालं नाही की आपली किंमत कळते. लहानपणी निबंधाच्या नेहमीच्या विषयांपैकी एक ठरलेला विषय म्हणजे ‘आई संपावर गेली तर..?’ त्याचाही साधारण मथितार्थ हाच असायचा की, आई दिवसभर अनेक कामं शांतपणे निपटत असते. आई एखादा दिवस काही काम न करता बसून राहिली तर तीची किंमत कळेल, तिच्या कामाचे मूल्य कळेल, कष्टांची जाणीव होईल वगैरे...
            समाजव्यवस्थेत एखादे गावं-नगर, तालुका, जिल्हा, राज्य, देश चालवायला अनेक घटक आपापले काम करत असतात. राज्यव्यवस्थेच्या कार्यकारीमंडळ, कायदेमंडळ, न्यायव्यवस्था या प्रमुख आधारस्तम्भांबरोबरच प्रशासन, विविध सेवा पुरवणारे, शेतकरी, कामकरी, शिक्षक, व्यापारी, डॉक्टर्स, सैनिक, रेल्वे कर्मचारी, बँक कर्मचारी हे सर्वचजण आणि याही व्यतिरिक्त कित्येक लोक संपूर्ण व्यवस्था आणि समाज चालवत असतात. हे सर्व घटक एकमेकांवर कळत-नकळत अवलंबून असतात. यातल्या कुठल्याही एका घटकाने अथवा वर्गाने आपले काम करायला नकार दिला तर संपूर्ण व्यवस्था आहत होते. काही घटक असे असतात की संपूर्ण व्यवस्था कोलमडू शकते. उदा. रेल्वेच्या मोटरमन संघटनेने संप पुकारला आणि लोकल्स व इतर ट्रेन्स धावल्याच नाहीत तर मोठीच अडचण निर्माण होईल. तीच गोष्ट अन्नदात्या शेतकऱ्याबाबत. तीच गोष्ट आरोग्यसेवा पुरवणाऱ्या डॉक्टर्सबाबत.

संपाची कारणे :- लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केल्याप्रमाणे संपाचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे लक्ष वेधणे व मागण्यांची पूर्तता करून घेण्याचा प्रयत्न करणे. संपकऱ्यांच्या मागण्या ह्या त्या त्या क्षेत्रानुसार बदलतात. उदा. कुणाला पगारवाढ हवी असेल, कुणाला बोनस तर कुणाला हमीभाव, कर्जमाफी. कुणाला वेतनआयोग शिफारशी लागू करून हव्या असतील तर कुणाला काही सवलती हव्या असतील. कुणाला हल्ले रोखण्यासाठी एखादा कायदा हवा असेल तर कुणाला एखाद्या क्षेत्र-व्यवसायाबद्दल केलेला कायदा रद्द व्हायला हवा असेल. अशाप्रकारे विविध मागण्या त्या-त्या क्षेत्रातील मंडळींच्या असू शकतात.

रास्त आणि वाजवी मागण्या विरुद्ध अवास्तव आणि अवाजवी मागण्या :- खरं तर कुठल्याच एका क्षेत्रातील व्यक्तीला दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्तीच्या समस्यांची जाणीव पूर्णपणे होऊ शकत नाही. त्या व्यक्तीशी आपुलकीने बोलल्यानंतर अथवा प्रत्यक्ष त्याच्याबरोबर राहून काही काळ अनुभव घेतल्यानंतर सहवेदना निर्माण होऊ शकते. शेतकरी संपाच्या वेळेला भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्यानंतर, दूध ओतल्यानंतर काहीजणांनी हा संप भंपक व राजकीय किनार असलेला आहे असे मत व्यक्त केले तर काहीजणांनी शेतकऱ्याच्या जीवनाचे भयाण वास्तव समोर आणले.
     डॉक्टरांवर काही ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ले केल्यानंतरही दोन्ही बाजू समोर आल्या. त्यात काही डॉक्टर अवयवविक्री कशी करतात इथपासून ते उगीच चाचण्या करायला लावून पॅथॉलॉजी लॅबशी संधान साधून कसे कमिशन कमावतात याचीही माहिती समोर आली. पण डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण घेताना कसे कर्ज काढून प्रवेश मिळवला, खडतर शिक्षण कसे पूर्ण केले, शिकाऊ डॉक्टर असताना खेडोपाडी-दुर्गम भागात जाऊन कसे अनुभव घेतले असेही मन हेलावून टाकणारे प्रसंग समाजमाध्यमांतून छापून आले.
      एसटी कर्मचारी संपाच्याहीवेळी ऊन, पाऊस वाऱ्यात एसटी चालवणाऱ्या चालकांची हलाखीची परिस्थिती इथपासून ते शाळा-कॉलेज केवळ एसटी मुळे कसे शक्य झाले याचीही उदाहरणे दिली गेली.
     त्यामुळे मागण्या रास्त आणि वाजवीही असू शकतात अथवा अवास्तव आणि अवाजवीही असू शकतात. ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ हेच खरे! सारासार विचार करून , दोन्ही बाजू ऐकून घेऊन सुयोग्य निर्णय देऊन मार्ग काढण्याचे काम न्यायालयाचे आहे.


संप : हुकूमशाही आणि लोकशाही :- हुकूमशाहीत बऱ्याच गोष्टी चालत नाहीत आणि घडल्याच तर त्या निर्दयीपणे चिरडून टाकल्या जातात. लोकशाहीचा फायदा हा की, आचार विचाराचे स्वातंत्र्य, शासनातील लोकसहभाग, शासकांवरील संयत टीकाटिप्पणी, धोरणांचा विरोध हे होऊ शकते. लोकशाहीत मुक्तपणे व्यक्त होता येते. पण ‘हुकूमशाहीत ज्या गोष्टी चालत नाहीत त्या सर्वच लोकशाहीत चालतात, नव्हे तो आपला हक्कच असतो’ अशा गैरसमजात राहण्याचे काही कारण नाही. उदा. हुकूमशाहीत शासकीय उत्पादन कारखान्यातील कामगारांनी आळस अथवा कामात चालढकल केलेली चालत नाही; पण म्हणून ते लोकशाहीत चालेल असं नव्हे. हुकूमशाहीत राष्ट्रविरोधी बोललेले, लिहिलेले खपवून घेतले जात नाही याचा अर्थ ते लोकशाहीत चालवून घेतले जाईल असा नव्हे. काही गोष्टी समाजहित लक्षात घेऊन करायच्याच नसतात आणि संप ही त्यातलीच एक गोष्ट असं मला वाटतं.  

संप पारतंत्र्यातील जनतेचा आणि स्वतंत्र भारतातील जनतेचा :- पारतंत्र्याच्या काळात गांधीजींनी असहकार आंदोलनाची दिलेली हाक आपण इतिहासात वाचली आहे. त्यामागचा उद्देशच हा होता की, भारतीय लोक हे इंग्रज शासनयंत्रणा चालवण्यासाठी कार्यरत आहेत आणि त्यांनी काम करायला जर नकार दिला तर संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडेल व इंग्रजांना राज्य करणे कठीण होऊन जाईल. तेव्हा शासन परकीयांचे होते. आज घर आपले आहे; शासन स्वकीयांचे आहे. त्यामुळे गांधीजींनी केलेल्या असहकार आंदोलनाची काठी आधारासाठी घेऊन आपला संप समर्थनीय ठरवणे ही मोठीच चूक ठरेल. गांधीजी ‘यंग इंडिया’तील दि. २०.४.१९२१ च्या आपल्या एका लेखात म्हणतात, “असहकाराच्या चळवळीचा उद्देश इंग्रजांना आमच्याशी सन्मान्य अटींवर सहकार करण्याला आवाहन देणे हा नाही तर या देशातून त्यांना निघून जायला सांगणे हा आहे. ही चळवळ त्यांच्या आमच्यामधले संबंध शुद्ध पायावर रचणारी, आमच्या स्वाभिमानाला आणि प्रतिष्ठेला शोभेल अशारीतीने त्या संबंधाला रूप देणारी अशी आहे.”
     तेव्हा आज स्वतंत्र भारतात संप करून जनतेला वेठीला धरून आपल्या मागण्या मान्य करायला लावायच्या का हे ज्याचे त्याने ठरवायचे.

संप बुद्धिजीवी वर्गाचा आणि कामकरी वर्गाचा; संप सरकारी नोकरांचा आणि खाजगी कर्मचाऱ्यांचा :- संपकऱ्यांची वर्गवारी करायची झाल्यास ती प्रामुख्याने या दोन वर्गात आणि चार विभागात करता येईल.
डॉक्टर्स, वकील अशा बुद्धिजीवी वर्गाने केलेला संप व शेतकरी, एसटी चालक-वाहक अशांनी केलेला संप यात समान सूत्र ‘काम ठप्प होणे’ हेच असते. या संपांच्या समर्थनार्थ या वर्गवारीचा उपयोग नाही. म्हणजेच डॉक्टरांनी केलेला संप जितका चुकीचा तेवढाच शेतकऱ्यांनी केलेला संपही चुकीचाच.
     सरकारी नोकर खाजगी कंपनीच्या तुलनेत सहज संपावर जाऊ शकतात. लेखणीबंदसारखी भुक्कडगिरी करू शकतात. खाजगी कंपनीत संप केल्यास मालकाकडून त्वरित लत्ताप्रहार होण्याची शक्यता असते. मिल कामगार संपाने कशी वाताहत झाली हे आपल्याला ठाऊक आहे. नुकतेच पुण्याच्या सुप्रसिद्ध चितळे कंपनीतही कामगारांनी संप केल्याची बातमी होती. सैन्य, पोलीस कर्मचारी यांना तर संपावर जाण्याची मुभाच नाही.

संपाचे परिणाम :- संपाचे एकूण व्यवस्थेवर होणारे परिणाम हे तो संप कोणाचा आहे ह्यावर ठरत असले तरी वर म्हटल्याप्रमाणे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असल्याने परिणाम हा होतोच. त्यातून हा संप डॉक्टर्स, औषधविक्रेते, पेट्रोल पंप चालक अशांचा असेल तर प्रसंगी मानवी जीवन संपण्याची, कुणीतरी दगावण्याचीही शक्यता दाट असते हे अनुभवातून आपण वेळोवेळी पाहिले आहे. आणि खरंतर असे करण्याचा अधिकार कोणालाच नाही. संप राजकीय हेतूंनी प्रेरित असेल तर शासनावर त्याचा काही परिणाम होणारही नाही, पण बरेचदा संप अंशतः यशस्वीही होताना दिसतो. संपामुळे प्रश्नांवर तोडगा निघेलच अथवा ते सुटतीलच असे नसले तरी ते प्रश्न चर्चेत येतात हे नक्की. 


अंततः :- जी नोकरी अथवा जो व्यवसाय आपण स्वेच्छेने स्वीकारला आहे त्याबाबत पगारवाढ नाही, अडचणी आहेत, बोनस नाही म्हणून संप करणे चुकीचेच आहे. जपानसारख्या देशात म्हणे निषेध नोंदवायला अथवा मागण्या समोर ठेवायला अधिक तास काम करतात. खरे खोटे मला माहित नाही. पण भारतासारख्या देशात जिथे मठ्ठ शासन आहे तिथे अशा उपायांनी परिणाम होणार नाही हेही खरेच. एका उदाहरणात बूट बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांनी निषेध नोंदवायला अधिक तास काम करून फक्त एकाच पायातील बूट बनवून ठेवले जेणेकरून प्रशासनाला त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्यावेच लागले. असो. संपकऱ्यांच्या दृष्टीने काही अन्यायकारी, दमनकारी, शोषणयुक्त असेल तर योग्य ठिकाणी दाद मागावी, न्यायव्यवस्थेचा आधार घ्यावा; न पेक्षा नोकरी सोडून द्यावी. अन्यथा आज ह्यांचा संप उद्या त्यांचा संप ह्यात सगळ्यांचीच कामे रेंगाळतात ज्याचा एकूणच व्यवस्थेवर परिणाम होत असतो. तेव्हा जेवढ्या लवकर हे संप संपतील तितके बरे. 

Wednesday, March 22, 2017

राजसंन्यास


पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा ४ ज्ञात युवकांनी मध्यरात्रीच्या गहन काळोखात कापून काढला आणि तो जवळच्या प्रवाहात फेकून दिला. या प्रवाहपतित आणि दिग्भ्रमित तरुणांमुळे राम गणेश गडकरी हे नाव आणि त्यांची साहित्यकृती ‘राजसंन्यास’ नाटक हे दोघेही प्रकाशझोतात आले. अचानक महाराष्ट्रात पुन्हा राम गणेश गडकरी कोण होते? संभाजी महाराज चरित्र? आणि त्याआडून नेहमीचा आवडता खेळ ‘तुही जात कंची हाय ?’ हे सुरु झाले.

मीही जिज्ञासा शमविण्यासाठी ‘राजसंन्यास’ शोधण्याच्या मागे लागलो. शोध जवळच्याच वाचनालयात संपला. श्री. वसंत सावरकर यांनी चालवलेल्या वसंत वाचनालयाने दखल घेऊन माझ्यासाठी ‘संपूर्ण गडकरी’- खंड पहिला (१९८४ चे पुनर्मुद्रण) त्वरित शोधून काढले. त्यांना आणि कर्मचाऱ्यांना धन्यवाद देऊन नाटक वाचायला सुरुवात केली. आज ते वाचून पूर्ण केल्यानंतर ब्लॉगच्या वाचकांसमोर माझी प्रतिक्रिया व्यक्त करावी म्हणून हा लेखनप्रपंच.

या पाच अंकी नाटकाची सुरुवात मालवणच्या पाणकोट सिंधुदुर्गात होते. तुळशी, मंजुळा, दौलतराव, संभाजीराजे, तानाजी मालुसरेंचा मुलगा रायाजी, रायाजीची प्रेयसी शिवांगी, जिवाजीपंत, देहू, कबजी, हिरोजी, साबाजी, येसूबाई, ही प्रमुख पात्रे आहेत. मी ज्या प्रतीतून वाचले त्यात तरी सुरुवातीला पात्र परिचय दिलेला नाही त्यामुळे वाचकाला नाटक वाचता वाचता पात्रांचा आपसातील संबंध लावत लावतच पुढे जावे लागते.  संपूर्ण नाटक संभाजीराजांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहे अथवा त्यांच्याभोवती फिरते असे मला मुळीच वाटले नाही. सुरुवातीला संभाजीराजांचा प्रवेश आहे आणि शेवटी आहे. त्या दोन्ही ठिकाणी संभाजीराजे चारित्र्याने, स्त्री-संबंधाने थोडेसे ढिले होते असे दाखवले आहे. सुरुवातीला तुळशीबरोबरचे त्यांचे वागणे आणि शेवटचे साबाजीबरोबर बोलणे, जे बऱ्याचअंशी स्वगत प्रकारचे म्हणजे स्वतःच कबुली दिल्यासारखे आहे, (पहा पृ. २, ३, ४, ५, ६) या दोन ठिकाणी लेखकाने संभाजीराजांना रंगेल दाखवले आहे. ते आक्षेपार्ह वाटण्यासारखे आहे. 

जिवाजी/जिवाजीपंत हा कीर्द-खतावण्या लिहिणारा, लेखणी धरणारा, कारकुनी करणारा असा दाखवला आहे. त्याला स्पष्टपणे ब्राह्मण दाखविलेले नसले तरी तो बिगर मराठा असल्याचे त्याच्या स्वतःबद्दलच्या संवादातून जाणवते. त्याला स्वतःच्या कारकुनी पेशाचा माज आहे. लेखणीच्य ताकदीवर कुणाचेही बरेवाईट करू शकतो ही प्रौढी तो स्वतःच मिरवतो. पण त्याला नाटककाराने वाईटच दाखवले आहे. तो शिवाजीराजांबद्दल अनुदार उद्गार काढतो तसेच समर्थ रामदासांबद्दलही काढतो. रामदास स्वामींना अगदी एकेरी लेखून तो बोलतो. देहू नावाच्या पात्राला स्वतः पराक्रमी राजा होण्याची ईर्ष्या असते. तो अंगापिंडाने मजबूत असतो पण बुद्धीने थोडा कमीच दाखवला आहे, त्यामुळे त्याला हा जिवाजीपंत आपल्या घोळात घेतो आणि तुला जर शिवाजी सारखा राजा व्हायचे असेल तर रामदासासारखा कोणीतरी तुझ्यामागे हवा आणि तो मी होऊ शकतो अशी आशा दाखवतो. अशा कारकुनाशिवाय राजाचे चालत नाही वगैरे. पण त्यासाठी तो मोबदला मागताना दाखवला आहे. अगदी दारू-बाई असा मोबदला. त्यामुळे ह्या ब्राह्मण-ब्राह्मणसदृश पात्राला नाटककाराने चांगलेच वाईट, दुटप्पी भूमिका घेणारा असे रंगवले आहे हेही लक्षात घ्यावे लागेल. पहा पृ. १.
पहा पृ. १
साबाजी हा एक अत्यंत इमानी मावळा. तो कसेतरी करून संभाजीराजे ज्या छावणीत शेवटी कैद असतात तिथे बुरखा पांघरून प्रवेश मिळवतो आणि त्यांना तिथून बाहेर निघून जाण्याची विनंती करतो कारण त्याच्याकडे बेगमेकडून मिळवलेला एक शिक्का असतो ज्याच्या आधारावर कुठल्याही चौकशीविना विनासायास छावणीतून बाहेर निसटण्याची हमी तो राजांना देतो. पण धीरोदात्त संभाजीराजे त्याला नकार देतात. ह्या शेवटच्या भागात संभाजीराजे स्वतःच्या तथाकथित केलेल्या वाईट कृत्यांची कबुली देतात. सर्वांची माफी मागतात असे दाखवले आहे. यासाठी नाटककाराने कुठली ऐतिहासिक साधने वापरली आहेत, कुठल्या बखरी वगैरेंचा संदर्भ घेतला आहे, कुठल्या कागदपत्रांच्या आधारे हे सर्व लिहिले आहे ह्याचा बोध होत नाही. परंतु त्यातील काही संवाद हे मला व्यक्तिशः अयोग्य आणि अनाठायी वाटले. लेखकाला पात्र रंगविण्याची मुभा असली तरी संभाजीराजांसारखे ऐतिहासिक पात्र रंगवताना विशेष काळजी घ्यायला हवी होती. ज्यांनी प्राणांतिक हालअपेष्टा सोसूनही शेवटपर्यंत हिंदू धर्म सोडला नाही आणि अभिमानाने मृत्यूला कवटाळते झाले त्या संभाजीराजांबाबत बोलताना एवढे उद्गार काढणे अनुचितच वाटतात. केवळ हिंदुत्वाला चिकटून राहिल्याने छळछावणीत कितीही अत्याचार झाले तरी ‘हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार’ हे संभाजीराजांनीच दाखवून दिले! त्यामुळे थोडे तारतम्य बाळगता आले असते, पण ते लेखकाचे स्वातंत्र्य. खाली दिलेल्या काही उताऱ्यांवरून वाचकांना कल्पना येईलच पण वानगीदाखल हे उद्धरण पहा:-
संभाजी : गोब्राह्मणप्रतिपालक हिंदूपदपादशहा श्रीमंत छत्रपति संभाजीमहाराज! नाही, साबाजी, ही माझी किताबत नाही! संभाजी हा म्हणजे केवळ रंडीबाज छाकटा! काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकवटून छत्रपतींनी बांधिलेल्या राष्ट्रतीर्थाची – श्रीगंगासागराची ज्याने व्यभिचाराच्या दिवाणखान्यातील मोरी बनवली तो हा संभाजी ! वैराग्याच्या वेगाने फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूबाजाचे तोंड पुसण्याचा दस्तरुमाल केला !  महाराष्ट्रलक्ष्मीच्या वैभवाचा जरीपटका फाडून त्याची रंडेसाठी काचोळी केली ! साबाजी, माझ्या नऊ वर्षांच्या नावलौकीकाची इमारत नीटपणे पाहा ! चिटणीसाला हत्तीच्या पायाखाली तुडवून तिचा पाया घातला.  मातोश्री सोयराबाईसाहेबांना जितेपणी भिंतीत चिणून तिच्या भिंती उभारल्या; ती पातकी इमारत उंचावता उंचावता कळसाला पोचण्यापूर्वीच कोसळून तिच्याखाली संभाजीचा चुराडा होऊन गेला. ...
 पहा पृ. २
 पहा पृ. ३
 पहा पृ. ४
 पहा पृ. ५
पहा पृ. ६
इत्यादि मजकूर हा खचितच संभाजीराजांना मानणाऱ्या कुठल्याही धर्माभिमान्यास लागेल असाच आहे. त्यातून त्यांचा पुतळा संभाजी उद्यानात असणे हे थोडेसे विपरीतच आहे. आता पुतळा आधी बसवला की उद्यानाचे नामकरण आधी झाले ही माहिती ह्या संदर्भात महत्वाची असली तरी ती माझ्याकडे तूर्तास नाही. आणि कसेही असले तरी  अर्थात त्यांचा पुतळा उखडून टाकणे आणि तोही मध्यरात्रीच्या काळोखात ह्यात काय शौर्य आहे देव जाणे. आणि ती गोष्टही आत्ताच का व्हावी हे सांगायलाही कोण मोठ्या राजकीय विश्लेषकाची आवश्यकता नाही. असो. कसेही असले तरी नाटकातून संभाजीराजांच्या प्रतिमेला मलीन केल्याचे जाणवते आणि हे माझे व्यक्तिगत आकलन आणि मत आहे.