"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, March 27, 2013

विश्व स्वामी विवेकानंदांचे - लेखांक ३

स्वामीजींनी पश्चिमी विचारजगताला तर हलवून सोडलेच परंतु भारताचीही अखंड परिक्रमा करून त्यांनी ठिकठिकाणी जी भाषणे दिली ती आपल्याला आजही मार्गदर्शक आहेत.

स्वामीजींच्या काळातला भारत म्हणजे अखंड भारत. ज्यात आत्ताचा पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादींचाही समावेश होता. या भागातसुद्धा हिंदू वस्ती मोठ्या प्रमाणावर होती. स्वामीजींनी लाहोरमध्ये केलेल्या एका अत्यंत महत्वपूर्ण भाषणाचा आज आपण या लेखात विचार करणार आहोत. स्वामीजींची सभा तेथील आर्य समाज व सनातन धर्म सभा यांनी आयोजित केली होती. त्यात स्वामीजींनी “The common bases of Hinduism” या विषयावर भाषण केले.

आजच्या भारतवासीयांसाठी तर या भाषणातून राष्ट्रीय एकत्मतेसाठीचे आवश्यक पैलू स्वामीजींनी प्रकट करून दाखवले आहेत. ज्या भागात स्वामीजी बोलत होते तेथे पंजाबी-शीख संप्रदायाचे प्रमाण खूप अधिक असल्याने त्यांनी आपल्या भाषणात गुरु नानकांचे उदाहरण देऊन सुरुवात केली आणि मग गुरु गोविंद सिंहांचे उदाहरण दिले. गुरु नानक यांनी ज्याप्रमाणे आपले बाहू पसरून सर्वांना प्रेमाचे आवाहन केले आणि केवळ हिंदू अथवा मुसलमानच नव्हे, तर अख्ख्या जगाला कवेत घेण्याची क्षमता दर्शविली त्याप्रमाणे आपण आपली अंतःकरणे प्रेमाने ओतःप्रोत भरण्याची आवश्यकता आहे. या प्रेमाचा दाखला देऊन पुढे स्वामीजी गुरु गोविंद सिंहांच्या वीरत्वाचा गौरवपूर्वक उल्लेख करतात. आपल्याच लोकांसाठी लढून, रक्त सांडून जेव्हा त्याच लोकांनी त्यांची साथ सोडली तेव्हाही न चिडता, न रागावता गुरु गोविंद सिंह एखाद्या शरविद्ध घायाळ सिंहाप्रमाणे दक्षिण भारतात निघून गेले. परकीयांशी ते झुंजले; पण स्वकीयांशी त्यांनी वैर नाही मांडले. शक्तीबरोबरच असे प्रेम आपण आपल्या मनात जागृत ठेवायला हवे.
आपण हिंदू अनेक पंथ-उपपंथ, संप्रदाय, वैचारिक गट यात विभागले गेलो आहोत. मुक्त विचार करायचा म्हणजे अशा विविध पंथांचा उदय होणं हे साहजिकच आहे. पण त्यातूनही आपल्याला एकात्मता साध्य करावीच लागेल. आणि ती करण्यासाठी आपल्याला सर्वांना आपली हृदये विशाल करावी लागतील. राष्ट्राच्या एकतेचे उदात्त ध्येय समोर ठेवून वरवर दिसणारे भेद बाजूला सारून मूलगामी एकत्वाचा वेध घ्यावा लागेल. भांडणे पुरे झाली. संघर्ष खूप झाले. आता प्रेमाने जिंकावयास हवे.

आपण सारे ‘हिंदू’ आहोत. ‘हिंदू’ हा शब्द वापरल्यावर स्वामीजी म्हणतात की ‘हिंदू’ या शब्दाला आज कोणताही अर्थ प्राप्त झाला असूद्या, (लक्षात हे घ्यावयास हवे की त्यावेळची परिस्थिती खचितच अभिमानाने आणि निर्भयपणे हिंदू असण्याचा उच्चार करण्याची नव्हती) पण मी मात्र ‘हिंदू’ या शब्दाचा उल्लेख गौरवपूर्वकच करतो आहे. आपण आपल्या कर्तृत्वाने जगाला हे दाखवून देऊ की जे अध्यात्मिक आहे, गौरवपूर्ण आहे ते म्हणजेच हिंदू! आणि जगातल्या कोणत्याही भाषेतील सर्वोच्च, पवित्रतम असा शब्द म्हणजे हिंदू. आपल्या पूर्वजांचा अभिमान आपण बाळगायला हवा. जेवढा आपल्या भूतकाळाचा अभ्यास आपण करू तेवढा हा अभिमान अधिकाधिक वाढतच जाईल. तेव्हा आपल्या रक्तात हा अभिमान भरून घ्या आणि जगदुद्धारासाठी तयार व्हा. तुम्ही तेव्हाच स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ शकता जेव्हा ‘हिंदू’ या शब्दाच्या केवळ उच्चारणानेही तुमच्या शरीरातून विजेची लहर सळसळून जात असेल.

पुढे स्वामीजी ‘आपले राष्ट्र’ या बिंदूचे विश्लेषण करतात. ज्याप्रमाणे व्यक्तीला कर्माचा सिद्धांत लागू होतो त्याप्रमाणे अगदी राष्ट्रांच्या बाबतीतही तो लागू होतो. प्रत्येक राष्ट्राला ठराविक कार्य करायचे आहे. आपली स्पष्ट भूमिका बजावायची आहे. लहानपणी आपण कथा ऐकल्या असतील की, सातासमुद्रापार एक पक्षी असतो आणि एखाद्या व्यक्तीचा प्राण त्याच्यात असतो. तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला कितीही मारा, काहीही करा..त्या पक्ष्याचा प्राण आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला काही होत नाही. तसेच प्रत्येक राष्ट्राचा ठराविक एका गोष्टीत प्राण असतो. ती गोष्ट असेपर्यंत ते राष्ट्र अस्तित्वात राहते. टोळधाडीसारखी आक्रमणे आणि नृशंस संघर्ष होऊनही इथली जमात टिकाव धरून राहिली. आणि केवळ विजयाने उभीच राहिली नाही तर आक्रमणांचा करायला सज्ज झाली. कारण इथल्या पूर्वजांनी आपल्याला असा विचार दिला जो केवळ विज्ञानाच्या प्रगतीने साध्य होणार नाही. वेद आणि उपनिषद यातून असे विचार आपल्यात रुजवले गेले की जे आज पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित होत राहिले आहेत आणि आपल्या धमन्यांमधील रक्ताच्या बिंदू-बिंदूमधून वाहत आहेत. हा हिंदुत्वाचा विचार आपण जोपर्यंत आपल्यात टिकवून ठेऊ आणि पुढे संक्रमित करू तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक संकटातून आपण भक्त प्रल्हादासारखे तावूनसुलाखून बाहेर पडू. 

आपल्या देशात अनेक संप्रदाय निर्माण झाले आहेत आणि होतही राहणार आहेत परंतु सांप्रदायिक झगडे व्हायला नकोत. संप्रदाय असावेत पण सांप्रदायिकता नसावी. म्हणून आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवले ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति’ म्हणजे सत्य एकच आहे पण विद्वान त्याला विविध नावांनी संबोधतात. तेव्हा हा विचार शैव, वैष्णव, गाणपत्य, बौद्ध, जैन, शीख अशा सर्वांनीच मनाशी धरून एकात्मतेचा पुनरुच्चार केला पाहिजे.

पुढे स्वामीजींनी ईश्वर संकल्पना, इथल्या हिंदूचे ईश्वराबद्दलचे सर्वसाधारण मत, उपनिषदातील आत्मन् हा विचार, आत्म्याचे अमरत्व या आणि अशा गोष्टींवर सुंदर विवेचन केले आहे. हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. त्याचे मनन-चिंतन करण्यासारखा आहे. 

Saturday, March 9, 2013

विश्व स्वामी विवेकानंदांचे - लेखांक २.

लेख क्र. १ वाचा - http://vikramwalawalkar.blogspot.in/2013/02/blog-post.html

थोरांचे बालपण सुद्धा थोरच असते. त्यातले प्रसंग हे त्यांच्या आयुष्याची दिशा आणि ध्येय स्पष्ट करणारे असतात. श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज यांचे बालपण सुद्धा सुरस आणि प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद म्हणजेच बालपणीचा नरेंद्र. माता भुवनेश्वरीदेवी आणि विश्वनाथ दत्त यांच्यापोटी जन्मलेला नरेंद्र त्याच्या बालपणीच्या प्रसंगांतून आपल्याला बरेच काही शिकवून जातो.

महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवासारखाच पश्चिम बंगालमधला दुर्गापूजेचा सण! अत्यंत उत्साहाचा, ऊर्जेचा, आनंदाचा आणि धामधुमीचा. फुललेल्या बाजारपेठा, गजबजलेले रस्ते, रमलेले बाळगोपाळ, उत्सवी खरेदी. चहूदिशांनी उत्साह ओसंडून वाहत असतो. अशाच एका दुर्गापूजेसाठी नरेंद्रच्या आईने त्यांना बाजारातून दुर्गेची मूर्ती आणण्यासाठी पाठवले.

ईश्वरभक्त असलेला नरेंद्र रस्त्याने रमतगमत चालला होता. आज दुर्गा घरी येणार म्हणून त्याच्या बालमनाला कोण आनंद झाला होता. रस्ता पार करून पुढच्या चौकात गेले की आलेच मूर्तीचे दुकान. सगळीकडे लगबग सुरु होती. नरेंद्रने मूर्ती पाहिली. त्याचं श्रद्धाळू मन हरखून गेलं. दुर्गेचं ओज, शस्त्रधारी हात, तेजस्वी डोळे, विजयी मुद्रा आणि आशीर्वादाचा हात पाहून तो मनोमन सुखावला. मूर्ती हातात  घेतली अन् खूप जपून पावलं टाकत तो निघाला. एवढ्यात त्याला लांबून येणाऱ्या घोडागाडीचा आवाज आला. मान वळवून पाहतो तर काय, एक लहान मुलगी कडेवर एक बाहुली घेऊन आपल्याच तंद्रीत रस्ता पार करत होती. चाणाक्ष नरेंद्रने क्षणार्धात जाणले की घोडागाडी त्या मुलीला मध्यरस्त्यात गाठणार आणि तिच्या अंगावरून धडधडत पुढे निघून जाणार. इतर लोक श्वास रोधून पाहू लागले. पुढे काय वाढून ठेवले आहे हे त्या मुलीच्या मात्र ध्यानीमनीही नव्हते. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच नरेंद्रने हातातली मूर्ती बाजूला भिरकावली अन् धावत त्या मुलीला उचलून पार निघून गेला. घोडागाडी धडधडत निघून गेली. लगाम खेचण्याचा प्रयत्न केल्याने घोडे खिंकाळले आणि पुढे जाऊन थांबले. सारे अवाक् होऊन पाहू लागले. नरेंद्रच्या साहसाचे सर्वांनी कौतुक केले. पण नरेंद्र मात्र मनातून खट्टू झाला. त्याच्या हातातल्या मूर्तीचा पार चक्काचूर झाला होता. घरी आलेल्या खिन्न नरेंद्राला आईने विचारल्यावर त्याने सारा प्रकार कथन केला. आईने नरेन्द्राचे कौतुकच केले.

पुढे अखिल जगाला या नरेन्द्राने हाच उपदेश केला की ‘सर्व जीवमात्रांमध्ये ईश्वर विद्यमान आहे’, ‘शिवभावाने जीवसेवा करा’, ‘दारिद्रीनारायणाची सेवा करा’. त्या उपदेशाचे मूळ आईच्या त्या शिकवणुकीमध्ये तर आहेच पण गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांचाही वाटा या विचारांच्या जडणघडणीत आहे. आणि म्हणूनच ‘जीवे जीवे शिवस्वरूपं, सदा भावयतु सेवायाम्’ अशा रीतीने शाळा, रुग्णालये यांची उभारणी रामकृष्ण मिशन ने केली.


आज संपूर्ण विश्व धार्मिक कट्टरतेच्या आणि सांप्रदायिक असहिष्णुतेच्या कालखंडातून जात असताना विश्वबंधुत्वाचा उद्घोष करणे आणि अखिल जगताला बंधुत्वाचा संदेश देणे ही कामे या भरतभूमीतूनच व्हायची आहेत. आणि त्याचा पायाच स्वामीजींनी घालून ठेवला आहे.

नरेंद्रचे वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्त्यातील एक प्रतिष्ठित वकील होते. घरची परिस्थिती उत्तम होती. छोटा नरेंद्र एकदा घराच्या खिडकीत उभा होता. हिवाळ्याचे दिवस होते. बाहेरच्या गमतीजमती पाहत असतानाच नरेन्द्राचे लक्ष वेधले गेले ते एका अत्यंत गरीब माणसाकडे. त्या माणसाच्या अंगावर लज्जारक्षणापुरतेच कपडे होते. त्या थंडीत तो कुडकुडत होता आणि हळूहळू मार्गक्रमणा करत होता. एका सुभाषितात म्हटल्याप्रमाणे सज्जनांचे हृदय हे लोण्याप्रमाणे असते, परपीडा पाहून ते विरघळते. नरेन्द्राचे मन तरी द्रवल्याशिवाय कसे राहील? खोलीमध्ये नजर फिरवता वडिलांची किमती शाल झटकन नरेन्द्राच्या नजरेस पडली. कशाचाही विचार न करता त्याने ती शाल उचलली आणि धावतच खाली गेला. त्या गरीब व्यक्तिच्या अंगावर शाल पांघरल्यावर नरेन्द्राचे मन सुखावले. ती व्यक्तीही हरखून गेली. जिथे मुले आपली साधी पेन्सिल अथवा चेंडू दुसऱ्याला देत नाहीत तिथे बाल नरेन्द्राने घरातली किमती शाल त्या व्यक्तिच्या अंगावर पांघरून जणू इथल्या हजारो वर्षांच्या शिकवणुकीचा प्रत्ययच दिला. ‘परपीडा जाने रे’ या उक्तीचा व्यवहारातला धडाच जणू या कथेतून मिळतो.