"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, October 22, 2010

ठसे

मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला लागलो. सुरुवातीला खूप कंटाळा करत असे..पण हळूहळू संध्याकाळ झाली की राहावेनासे व्हायला लागले..पावले शाखेकडे वळत असत.
आज अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे मी एक ‘स्वयंसेवक’ आहे. ही अनुभूती आहे.

आज कितीक उन्हाळे, पावसाळे आणि हिवाळे शाखेच्या संघस्थानावर घालवले. अनेक वर्ग, बैठका, संघ शिक्षा वर्ग, शिबिरे यात सहभागी झालो..माझ्या कार्यक्षेत्रातील कित्येक घरांमध्ये त्या कुटुंबाचा सदस्यच झालो.

ज्याप्रमाणे वाळूत किंवा मातीत त्यावरून चालणाऱ्या असंख्य लोकांचे ठसे उमटत राहतात..काही पुसले जातात, काही खोलवर राहतात...तसेच आजवरच्या संघकार्यात स्मृतीपटलावर कोरले गेलेले काही ‘ठसे’!





१. मी लहान असताना मला शाखेत न्यायला एक शिक्षक येत असत. मी बिल्डींगमध्ये सायकलवरून फेऱ्या मारत असताना ते ठरलेल्या वेळी न चुकता, न कंटाळता येऊन मला घेऊन जात असत. खेळ उत्तम खेळत असत. पुढे ते CA झाले. मध्यंतरीच्या कालावधीत काही क्षुल्लक कारणांनी ते कामातून बाजूला झाले. मी जबाबदारी घेऊन कामाला लागेपर्यंत ते पूर्णतः बाजूला झाले होते. मला वाटत असे कामामुळे, वेळेअभावी येणे होत नसेल. पण मग लक्षात आलं की काहीतरी बिनसलं आहे.
पण मी संपर्क सुरु ठेवला. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता त्यांच्या मुलाला शाखेत घेऊन जाण्यासाठी ते मला सांगत होते! एव्हाना ते मूळ कारणसुद्धा विसरले. गणपतीला मी गेलो होतो तेव्हा निवांत गप्पा झाल्या. माझ्याबरोबर काही तरुण स्वयंसेवक होते. जुन्या आठवणी सांगून त्यांना उद्देशून ते म्हणाले, “मी ह्यांना सोडलं ....तरी ह्यांनी मला सोडलं नाही”! चष्म्यातून चमकणाऱ्या डोळ्यातली भावुकता ‘ठसा’ उमटवून गेली!


२. लहानपणी मी एका दिवाळी वर्गाला गेलो होतो. हनुमान टेकडी नावाच्या एका ठिकाणी हा वर्ग होता. रात्री थंड हवा होती. झोपण्याची वेळ झाली. आमच्या शाखेतील आम्ही बरेचजण असल्याने लगेच झोपू हे अशक्यच होतं. पडून गप्पा मारत होतो. काहीजण झोपून गेले. मंद वारा वाहात होता. टेकडी असल्याने अंधार बऱ्यापैकी होता. दूरवर कुठेतरी दिव्याचा प्रकाश जाणवत होता. मला अनोळखी ठिकाणी झोप येतच नसे. अजूनही नाही येत. तर शेवटी मी एकटाच जागा राहिलो डोळे मिटून. साधारण १-१.३० च्या सुमारास मला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. एक वृद्ध स्वयंसेवक आले...आणि ज्यांच्या अंगावरची चादर बाजूला गेली आहे त्यांच्यावर नीट पांघरून गेले. त्या थंडीमध्ये आपले स्वयंसेवक नकळत कुडकुडू नयेत म्हणून ही काळजी! मग पुन्हा दोनेक तासांनी.. ह्यावेळी मला चाहूल लागल्यावर मी मुद्दाम अर्धवट चादर बाजूला करून ठेवली. ते आले..आणि अंगावर व्यवस्थित चादर घालून गेले. एवढं छान वाटलं.. मग पहाटेपर्यंत अजून एकदा फेरी झाली. मी पुन्हा एकदा तो ऊबदार अनुभव घेतला. लहानच होतो..आमच्या शाखेतून गेलेल्या सर्व स्वयंसेवकात सर्वात लहान! तेव्हा कळलं नव्हतं की हा पक्का ‘ठसा’ अशी कायमची साथ करेल म्हणून...


क्रमशः   
पुढे वाचण्यासाठी -  http://vikramwalawalkar.blogspot.com/2010/11/httpvikramwalawalkar.html

9 comments:

  1. मी ही जायचो लहानपणी शाखेत. पहाटे पहाटे..एकदम छान भारून गेल्यासारखा काळ होता.
    आमच्या घरात आजोबा, आजी, बाबा पक्के संघाचे..संघाची गाणी खड्या आवाजात तोंडपाठ म्हणून मी बाबांकडून बक्षीसही मिळवायचो.

    नंतर मग शंभरातल्या नव्वद मुलांचे जे होते तेच झाले..

    आता मागे वळून पाहताना बरेच काही तेव्हा न दिसलेले दिसते. संघाची शिस्त तोंडात बोट घालण्यासारखी होती. कितीही मोठ्या संमेलनाला वगैरे कधी "भगदड का माहोल", "अफरा तफरी" किंवा "तुडवा तुडवी" नसायची. लीडरचे ऐकणे बस्स...


    संघाच्या ज्येष्ठ व्यक्तींकडून केल्या जाणा-या कुपोषणग्रस्त / अतिरेकीग्रस्त लहान मुलांमधले कार्य या गोष्टीसाठी मी/ कुटुंबाने अजूनही देणगी देण्याचे धोरण ठेवले आहे आणि विशेष म्हणजे पंधरा एक वर्षापूर्वी दिलेल्या देणगीच्या व्याजाचा विनिमय कोणत्या विद्यार्थ्यासाठी केला आणि त्याचे प्रगतीपुस्तक आम्हाला दर वर्षी येते.
    संघाच्या मनुष्याच्या हाती देणगी देताना एक खात्री असते की ते हात स्वच्छ आहेत आणि यातला पैसा न पैसा ज्या साठी दिला त्या सत्कार्यासाठी जाणार आहे.

    ReplyDelete
  2. Continued:...

    दुसरीही बाजू दिसते.. त्या लहानपणच्या शाखेत शिकवले जाणारे खेळ "कराची किसकी है ?" किंवा एकूण पाक / मुस्लीम यांविरोधात अगदी कोवळ्या न कळत्या वयात विष पेरणे आणि त्याच्या अगदी उलट म्हणजे खरेच तुफान दंगली झाल्या तेव्हा मात्र तिथल्या शाखेने मुस्लीम बहुल एरियातल्या एकाकी हिंदू घरांकडे न फिरकता अत्यंत सेफ जागी ध्वज संचालन करणे वगैरे ते ही आठवते. हे सर्व कदाचित लोकल लेव्हलचे असू शकेल.

    शिक्षणाची / घरादाराची वाट लावून नोकरी धंदा किमान पोटापुरते ही न कमावता संघाला "वाहून" घेण्याचे काही जणांचे धोरण ते ही आठवते.. एक विचार प्रवाह असणे ठीक पण नादी लागणे वाईटच..

    दुर्दैवाने धर्माची अत्यंत अतिरेकी अस्मिता जपणारे गट जेव्हा (उदा. मुस्लीम) एका बाजूला तयार होतात तेव्हा दुसरी बाजूही तशी आपोआप बनतेच आणि समतोलासाठी ते कदाचित आवश्यक ही असावे. अजूनही संघ संयत आहे आणि तसाच रहावा ही इच्छा.

    ReplyDelete
  3. अप्रतिम... खुपच सुंदर अनुभव आहेत दोन्ही... !!

    ReplyDelete
  4. मी आज वैद्य झालो आहे.. मी लहानपणी ६,७,८ व्या इयत्तेत असताना डोंबिवली च्या विक्रमादित्य सायम ह्या शाखेत जात असे. आयुष्यात प्रथमच शाळेशिवाय कोणत्यातरी ठिकाणी मला जाण्याची संधी मिळाली होती.
    माझे अनेक वर्ग मित्र हर्षद प्रभुदेसाई , महेश प्रभुघाटे , महेश वाक्‌चौरे , आशिष वाळींबे , अनमोल धर्माधिकारी , विनायक देशपांडे , विरेंद्र देवस्थळी , इतरांची नाव निटशी आठवतही नाहीत,..सगळे येत असत ! गुरुवारी विक्रम थत्ते (?) बौद्‍धिक घेत असत ...वैभव जंजिरकर तरूण शिक्षक तर एखादा बाल शाखेत येणे टाळत आहे हे कळाले तर ..घरी जाऊन .."तुला आमंत्रण द्यायला आलो आहे !" असे म्हणून त्याला पुन्हा घेऊन येत असत ! शाखेत झालेले संस्कार त्यावेळी फक्त स्फुरण देत होते..पण भविष्यातल्या तरूणाचा व्यक्तिमत्वाचा पाया सुद्धा रचत होते.
    डोंबिवली च्या टिळक शाळेत झालेले एक दिवसिय शिबिर...तेथे आयुष्यात प्रथमच खाल्लेला खिचडी भात + कढी + पापड...्जो मी कधीही घरी खात नव्हतो ..आणि आजपर्यंत ती चव जीभेवर रेंगाळते आहे....कल्याण च्या कोन गावात झालेले ३ दिवसिय शिबिर........तीथे आलेला अनुभव... कोबीची पातळ भाजी ...!! ...नाष्ट्याला फक्त चवळिच्या घुगर्‍या ...पहाटे ४ः३० ला उठणे आणि थंड पाण्याने केलेली आंघोळ... सारे काही नविन होते...आणि गस्त देत सावधान उभे रहाणे .. पहारा देणे सारे अनुभव नविन होते,... मकरध्वज नावाचा मोठा सांघिक खेळ कळत नव्हता पण मजा येत होती...
    सारे अनुभव रोमांचकारी होते.!!
    मधल्या काळात सारे वर्गमित्र वेगवेगळ्या क्षेत्रात गेले ... आयुष्याच्या प्रवाहाचा वेग व दिशा प्रत्येकाला दूर घेऊन गेल्यात... आत्ता कदाचित शाखा आठवत ही नसेल... पण अजून ही संध्या ६.३० वाजले की माझ्या क्लिनीक च्या समोरचे मैदान बघीतले की मला नेहरू मैदान आठवते.. शाखेची आठवण येते...!
    असो...
    डोंबिवली सुटली नवी मुंबईत रहायला आलो ... आणि हळू हळू नविन संस्कृती overtake करू लागली..
    पण आजही सारे अनुभव...रक्षाबंधनाच्या राखी बांधण्याचा कार्यक्रम ... रविवारचे सांघिक सगळे काही सुखद अनुभव आहेत !
    ज्या शिरिष आपटे शिक्षकांनी...त्यांची नोकरी संभाळून डोंबिवलीची शाखा चालवली...आमच्या वर संस्कार केले...त्यांना शतशः प्रणाम !!
    ह्या दसर्‍याला आमच्या इथे सानपाड्यात संचलन होते... सकाळी सकाळी क्लिनिक ला जायला निघालो आणि स्वयंसेवकांचे शिस्तबद्‍ध संचलन बघून अंगावर रोमांच आले ... आणि क्षणभर का होईना मन भूतकाळात डोंबिवलीच्या विक्रमादित्य शाखेत गेले.... चौकात उभ्या स्वयंसेवकाला मी कुतुहलाने विचारले आज इथे कार्यक्रम आहे ...की शिबिर आहे ... तेव्हा पूर्वीची ओळख असल्या प्रमाणे तो ही म्हणाल जूहीनगर च्या अमृता विद्यालयात शिबिर असून सानपाडा पोलिस चौकी ते अमृता विद्यालय
    संचलन आहे !! आणि नकळत तो म्हणाला ... "येत जा !!"....आणि मला वैभव शिक्षकांची आठवण झाली !!
    माझ्या जडण घडणीत शाखेचा मोठा वाटाअ आहे...विक्रम वालावलकर ला बघून मला नेहमी वाटते,... मी जे आयुष्य अर्धवट सोडून येथवर आलो ... ते तो जगतो आहे... मला त्याचा क्षणभर हेवा ही वाटतो ! आणि अभिमान ही !!...
    मित्रा धन्यवाद !!
    भगवन धंन्वंतरी तुला निरोगी दिर्घायुष्य देवोत आणि मातृभूमीसाठी तुझ्या हातून विधायक कार्य घडो !
    लोभ आहेच अधिक दृढ होवो !!
    वैद्य प्र प्र व्याघ्रसुदन !

    ReplyDelete
  5. @ अभिनय , @ हेरंब - धन्यवाद.

    ReplyDelete
  6. @ नचिकेत @ वैद्य व्याघ्रसूदन - दोघांनीही वेळात वेळ काढून आपले अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद. असे अनुभव प्रत्येकालाच येत असतात...ते इतरांशी वाटून घेतल्याने आनंद द्विगुणित करतात..आणि तुम्ही ते केल्याने समाधान वाटले.

    ReplyDelete
  7. sundar lekh. shakheshi jyanch^ ghatt^ nat^ ahe asha lokanchi tyatli tanmayta ani bhavanik guntawanuk me jawalun anubhavali ahe. Ase anek thase umtalyane ch he ek kutumb tayar zale ahe ase watte...

    ReplyDelete