"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, October 3, 2010

प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः
प्रस्तुत लेखात एकल विद्यालयया एका विलक्षण प्रयोगाची यशस्वी कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला असल्याने थोडेसे इतिहासात जाऊन शिक्षणाची परिस्थिती काय होती हे पहावे लागणार आहे. आजच्यासारखीच शिक्षणाच्या ......असं म्हणायला प्रवृत्त करणारी परिस्थिती होती का?


या विषयाचा उहापोह वेगळ्या लेखात केला आहे. प्रस्तुत लेखाचा उद्देश केवळ एक चांगले, समाजोपयोगी काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या कामाला सहाय्यभूत ठरणारे आधारस्तंभ वाढवणे हा आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे. आणि जेव्हा खेडी स्वयंपूर्ण होतील तेव्हा भारत संपन्न होईल. शहरांचा विस्तार हा देशाच्या विकासाचा मापदंड नाही म्हणता येणार. ग्रामाधारित विकासपथच अनुसरावा लागेल. भारतात कित्येक ठिकाणी हा प्रयोग यशस्वीरित्या चालू आहे. मध्य प्रदेशातील चित्रकूट-गोंडा हे तर त्याचे उत्तम उदाहरण. आणि हा विकास म्हणजेसुद्धा केवळ भौतिक संसाधने आणि रोजगाराच्या संधी नव्हेत. तर शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, संस्कार या बाबींचा अंतर्भाव असलेला विकासपथ.

ग्रामीण शिक्षणाची परिस्थिती आपल्याला चांगलीच माहिती आहे. आंदण दिलेल्या अंगणवाड्या कोण बागडण्यासाठी वापरतात ते वेळोवेळी छापून येतच असतं. एकवेळ बिरबलाची खिचडी होईल तयार...पण दुपारच्या पुरवलेल्या जेवणाची काय 'खिचडी' होते ते वेगळं सांगायची गरज नाही. जिथे अन्य सोयी-सुविधा आहेत अशा गावांचे ठीक आहे. परंतु जिथे एस.टी. सुद्धा पोहोचली नाही, अशा ठिकाणी कोण जाणार..

पण समाजाला प्रबळ करण्याचे कार्य म्हणजेच ईश्वरी कार्य असे समजून काम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच काही व्यक्तींनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन १९८६ साली डॉ. राकेश पोपली या अमेरिकेहून भारतात परतलेल्या अणुशास्त्रज्ञाने आणि त्यांच्या पत्नी रमा पोपली (बालशिक्षण तज्ञ) यांनी एक शिक्षकी शाळेची सुरुवात केली. झारखंड मधील रांची पासून १२५ किमी वर असणाऱ्या गुमला या ठिकाणच्या वनवासी बांधवांच्या क्षेत्रात ही मुहूर्तमेढ रोवली गेली. हळूहळू हा अमृतवेल वाढत गेला. २ वर्षांनी मदनलाल अगरवालांनी धनबाद जवळ ६० गावात अशा शाळा सुरु केल्या. मग हे वर्धिष्णू कार्य १९९५-९६ साली १२०० शाळांपर्यंत जाऊन पोहोचले.

२०००-०१ साली या सर्व चळवळीला अधिकृत रूप आले ते 'एकल विद्यालय फौंडेशन' च्या स्थापनेने. या फौंडेशनच्या वतीने शिक्षकांना आधी प्रशिक्षण दिले जाते. मग असे प्रशिक्षित शिक्षक ह्या एक-शिक्षकी शाळा चालवण्यासाठी पाठवले जातात.  ते त्या गावात राहतात. आणि गावातील मुलांना एकत्र करून शिकवतात. एक सुंदर पहाट त्या गावात झालेली असते. ज्ञानकिरण त्या गावात प्रवेशलेले असतात. मग ह्याच विद्यार्थ्यातून कधी कधी पुढे असे शिक्षक मिळतात. 'एक दीप से जला दूसरा' अशी ही चळवळ वाढते आहे. या चळवळीतून कित्येक प्रश्न सुटत आहेत. केवळ शिक्षणाचा प्रसार, साक्षरता याही पलीकडे जाऊन, आरोग्य, स्वावलंबन याचा अंतर्भाव होतो आहे. म्हणजेच पर्यायाने नक्षली वळवळीत जे कदाचित ओढले जाऊ शकले असते, ते आज सन्मानाचे आणि देशहिताला सहाय्यभूत असे जीवन जगात आहेत. काही ठिकाणी नक्षली दहशतवादी ह्या चळवळीमुळे परिवर्तित झाल्याचे दिसून आले आहे. काश्मीरसारख्या ठिकाणीसुद्धा 'एकल विद्यालय' घट्ट पाय रोवून  काम करते आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा भाव परिपुष्ट होतो आहे.  


 एकल विद्यालयाच्या माध्यमातून भारताची अखंडता टिकवण्याचा प्रयत्न.- जम्मू आणि काश्मीर.


आजमितीला ३४,३४३ शाळा एकल विद्यालय चालवीत आहे. ह्या शाळांमधून शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या १०,३०,२९० आहे. हा सर्व अवाढव्य कारभार चालवायला निष्ठावान कार्यकर्ते लागत असतात. राष्ट्रीय विचाराने भारलेले आणि स्वयंप्रेरणेने कामात उतरणारे कार्यकर्ते आज ईश्वरी कृपेमुळे मिळत आहेत. सर्वांच्या मनात 'हे ईश्वरी कार्य' आहे आणि 'त्यासाठी आपण कटिबद्ध झालो आहोत' हा भाव आहे. कारण सर्वांचे लक्ष्य शेवटी 'परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं' हेच तर आहे.

नेहेमी वाईट गोष्टी आपल्यासमोर आणून, आपल्याला त्या बघायला लावून एक निराशाजनक चित्र आजची प्रसारमाध्यमे उभी करत असतात. अशा चांगल्या कामांची दखल क्वचितच घेतली जाते. तेव्हा आपण ह्या कामाची वाच्यता अधिक लोकांपर्यंत तर करूच पण या कामाला आपला अमूल्य वेळ, निधी, संसाधने देऊन ही चळवळ वाढती ठेवू. 

अंधाराचे भय बाळगण्यापेक्षा तेवणारी पणती न विझण्याची काळजी घेऊ आणि अजून पणत्या लावण्याचा प्रयत्न करू!

चिरविजयाच्या संकल्पाने हृदये काठोकाठ भरू | मातृभूमीच्या दिग्विजयाची सुप्त मनीषा पूर्ण करू ||


संदर्भ:- www.ekal.org, http://www.causes.com/causes/2781http://www.youtube.com/watch?v=QFlaCRXoMJAhttp://www.youtube.com/watch?v=CzMSBhLPO2Q&feature=related

3 comments:

  1. फ़ारच छान ! ह्यावेळी विडीओ आणि खाली संदर्भ दिले आहेस.ही कल्पना चांगली वाटली.वाचा आणि पहा सुद्धा !!
    पुन्हा एकदा अभिनंदन व शुभेच्छा !!

    ReplyDelete