कोणत्याही समाजव्यवस्थेत जेव्हा एखादा गट, एखादी
विचारधारा सर्वात प्रबळ होते तेव्हा त्याचा व्यत्यास म्हणून स्वाभाविकपणेच विरुद्ध
विचारधारा, विरोधी नेतृत्व प्रबळ होण्याचा प्रयत्न करते. मग भांडवलशाहीच्या
विरोधात उदयाला आलेल्या साम्यवाद असेल किंवा साम्यवादाला टक्कर देणारा धार्मिक
उन्माद असेल, अशारीतीने एक गट प्रबल झाला की दूसरा आपलीही हत्यारे परजून येतो,
त्यात नेतृत्व उभे राहते, घडत जाते.
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन हे
आणि असे अन्य नेते हे त्यांना संघटनात्मक प्रशिक्षणाची पार्श्वभूमी असली तरीही
त्यावेळच्या विरोधाच्या वातावरणामुळे अधिक झळाळून उठले. त्यांचे नेतृत्व हे
काळाच्या कसोटीवर तावून-सुलाखून निघाले. आंदोलनातून नेतृत्व सिद्ध होत गेले.
संघर्षातून फळ साध्य होत गेले. अर्थात त्यामागे केवळ विरोध नसून विधायक कार्याची
आस, साधनशुचिता, ध्येयनिष्ठा, तळमळ या आणि अशा गुणांचा आग्रह होताच. पण तरीही
विरोध असला की अधिक बलवान कोंब बाहेर पडून सशक्त बनत जातो हा निसर्गनियमच आहे.
हार्दिक पटेल, कन्हैय्याकुमार हे या निसर्गक्रमाचेच
निकाल आहेत. आऊटकम आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजप यांचा विजय
जसा निश्चित होऊ लागला तसे अगदी शिवसेनेने सुद्धा (अर्थात त्यांच्या सवयी आणि
संस्कारांप्रमाणे) दामोदरदास मोदी यांचेही नाव जाहीर सभेतून काढायला कमी केले
नाही. अफजलखानाच्या फौजा वगैरेही आले. विरोधकांनी मोट बांधायचा प्रयत्न केला. अगदी
कसोशीने केला. पण प्रत्यही दिसणारे प्रचंड घोटाळे, विकासकामांबाबतची उदासीनता,
बिनकण्याचे नेतृत्व या आणि अशा गोष्टींमुळे विटलेल्या जनतेने बदल घडवून आणला. आणि
भाजप अगदी सुरक्षित बहुमताने सत्तेवर आला. नरेंद्र मोदींचे निर्विवाद नेतृत्व
शीर्षस्थानी जाऊन बसले आणि विरोधक म्लानमुखाने आपला पराभव स्वीकारता झाले. अगदी
त्याचवेळेला हे स्पष्ट होते की विरोध वाढणार.
विरोधकांना सावरायला वेळ हवा होता. नवे हीरोज शोधायला
अवकाश हवा होता. गुजरातेत हार्दिक पटेल ला हवा देऊन झाली. त्यावेळी पटेल समाजाने
हार्दिक नावाच्या नवतरुणाच्या नेतृत्वाखाली असे आंदोलन छेडले की कुणाला वाटले हा
मोदींना आता आव्हान उभे करणार. बिहारमधील नितीशकुमार आणि आघाडीच्या विजयाने पुन्हा
धुगधुगी आली. आणि इथेच कन्हैय्याचा जन्म निश्चित होता!
कन्हैय्यामध्ये विशेष काहीच नाही. मोदींच्या झंझावाती लाटेने विरोधकांच्या
भूगर्भात जी प्रचंड पोकळी निर्माण झाली ती भरून काढायला कोणीही चालला असता.. राहुल
गांधीत तेही झेपण्याचे, झेलण्याचे किमान सामर्थ्य नाही त्यामुळे मग कन्हैय्या
सारखे नेतृत्व उभे राहते, मिरवते! आणि त्याला दत्तक घ्यायला सप्तर्षी, केतकर, मानव, नितीश
अशा टुकारांची रीघ लागते. समाजवादी विचारसरणीला, चळवळीला
घरघर लागून कित्येक वर्षे झाली. झब्बा-लेंगा घालून आणि शबनम लावून फिरणाऱ्या
काळ्या दाढ्या पांढऱ्या झाल्या पण म्हणावा तसा तरुणांचा भरणा झाला नाही. युवक
क्रांती दल, राष्ट्र सेवा दल वगैरे फसलेले प्रयोग आशा ठेवून बसले. संघटना बांधता
आल्या नाहीत. आणि त्याचवेळेला ह्या समाजवादी विचारसरणीने ज्या संघ विचारधारेला
विरोध केला ती वाढत गेली. खाकी चड्डी, प्रत्यक्ष शाखेत महिलांना नसलेला प्रवेश,
हिंदुत्व, भगवा झेंडा या सर्वावर टीका-टिप्पणी, टिंगल करूनही संघाचे काम भारतभर
वाढले. अधिकाधिक तरुण संघधारेत स्वतःहून सामील होत गेले. संघविचार घेऊन चालणाऱ्या
अन्याय संस्था विविध क्षेत्रात आदर्श काम उभे करू लागल्या. सेवाकार्यांचे प्रचंड
जाले अनेक समाजोपयोगी प्रकल्प संघ कार्यकर्त्यांनी उभे केले. आणि तशातच सार्वत्रिक
निवडणुकात संघ विचारधारेला सर्वात जवळ असणारा राजकीय पक्ष भाजप राजकीय व्यासपीठाचे
केंद्रस्थान व्यापून राहिला.
ह्यामुळे विरोधाच्या अळंब्या उगवणार हे निश्चित होते.
हार्दिक पटेल चे आंदोलन, FTII मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन, जेएनयू मधील
विद्यार्थ्यांचे (बेरोजगारांचे?) आंदोलन याला भाजपविरोधी पक्ष, नेते यांजकडून हवा
मिळत गेली. प्रस्थापित व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात लढा देण्यात नेहमीच मजा
असते, तरुणाईला ते हवेहवेसे असते. विधायक कार्यापेक्षा ते सोपे असते. आणि नेहमीच
विघातक कार्य हे तुलनेने सोपे असते. झाड तोडणे सोपे पण वाढवणे कठीण! सुरुंग लावून
शाळा उडवून देणे सोपे पण चार विद्यार्थ्यांना एकत्र करून शिकविणे कठीण! त्यामुळेच
असे Anti-establishment लढे जगभर होत राहतात आणि त्यातला विचार हा खरोखरच चांगला
असेल, अन्याय्यकारक राजवटीच्या विरोधात असेल तर समाज तो विचार उचलून धरत
वेळप्रसंगी जुलमी सत्ता उलथवूनही टाकतो.
त्यामुळे हे समजून कन्हैय्या आणि जागोजागच्या
आंदोलनांशी व्यक्त होण्याची रणनीती आखली पाहिजे. प्रसारमाध्यमांना कुणीही चालतो.
बातम्या देणे याहीपेक्षा बातम्या तयार करण्याकडे हल्ली कल असतो. बातम्या दरवेळी
असतातच नाही. किंवा विधायक बातम्या असतातही. पण त्यावर च्यानेल चालत नाही.
अशावेळेला घटना फुगवून दाखवणे, हवा देणे, भडकवणे अशी कामे प्रसारमाध्यमे शांतपणे
करीत असतात. तेव्हा जेएनयू मधील अफजल गुरूच्या वर्षश्राद्धाच्या वेळेला जमलेली
टोळकी ही तद्दन रिकामटेकडी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे Anti-establishment खाज
असलेली आहेत. अन्यथा अन्य संस्थांमध्ये खरंच मान मोडून शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना हे करायला वेळाही नसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच उदाहरण घ्या
ना! कशा खडतर अवस्थेतून त्यांनी आपला मार्ग बनवला. असे कित्येक दलित, सवर्ण
विद्यार्थी आज विविध शैक्षणिक संस्थानांमध्ये विद्याभ्यास करत आहेत. त्यामुळे
पहिल्या भाषणात आपली जी गरिबी कन्हैय्याने गाईली तिच्या अगदी विपरीत वर्तन त्याचे
आहे. आणि तो तथाकथित पुरोगामी पक्षांनी उभा केलेला एक कठपुतली बाहुला आहे जो
त्याचे बोलविते धनी हलवत राहणार तोपर्यंत हलत राहणार. त्यावर अधिक वेळ घालविण्याची
आवश्यकता नाही. अगदी संपूर्ण देशातील तरुणाई अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या पाठीशी
भक्कमपणे उभी राहिली होती. आज काय अवस्था आहे? तेव्हा अशा तात्कालिक, धनपूरित,
राजकीय हेतूप्रेरित आंदोलनांना विरोध करायची आवश्यकता नाही. ती आपोआपच थंड होणार
आहेत कारण ते तोतयांचे बंड आहे.
या सर्वांमध्ये नरेंद्र मोदी काय करत आहेत हेही जाणून
घेणे औत्सुक्याचे आहे. नरेंद्र मोदी अक्षरशः अनुल्लेखाने अशांना मारत आहेत. परदेश
प्रवास, त्यात भारताला दूरगामी फायदे मिळवून देणारे करार, संबंध दृढ करणे, हिंदू
संस्कृतीचा विश्वसंचार कसा होईल हे पाहणे, देशांतर्गत विकासकामे, वीजनिर्मिती,
रस्ते बांधणी, पारदर्शी व्यवहार, स्वच्छता, आरोग्य अशा विषयांवर ते काम करत आहेत.
त्यांच्याकडे अशा आंदोलनांवर बोलायलाही वेळ नाही. कन्हैय्या “मोदी जी का सूत पकडकर
बोलू” असं बोबड्या शैलीत टाळीखेचक म्हणाला तरी मोदी गप्पच! मन की बात मधेही एकदम
वेगळेच विषय. म्हणजे थोडक्यात कबड्डीच्या खेळाप्रमाणे आपल्या पाल्यात घुसून
‘असहिष्णुता, असहिष्णुता, आजादी, आजादी’ असे ओरडणाऱ्या, घुमणाऱ्या खेळाडूला
मोदींसारखा अनुभवी कप्तान फक्त जोखत आहे. अक्ख्या टीमला मागेच राहायची खूण करत आहे
कारण अजून खऱ्या समस्यांची टचलाईन कन्हैय्याने टच केलेलीच नाही. मोदींचे उत्साही
पाठीराखे पुढे गेले तर ते बाद होणार आहेत कारण कन्हैय्याला समस्या सोडवण्यात रस
नाहीचे. त्याला केवळ गडी बाद करायचे आहेत, जाळ्यात ओढायचे आहेत, चांगल्या कामावरून
लक्ष हटवायचे आहे. वात पहायची ती त्याचा दम निघेपर्यंत. तो उत्तेजक विधाने करणार,
मोदी मराठवाड्यात आले नाहीत म्हणणार पण विचलित होण्याची काहीच गरज नाही कारण
मराठवाड्यातील जनता जाणेल सरकार काय करते आहे. त्याचा दम निघाला की जाईल वापस!
हार्दिक आहेच तिथे उभा घाम पुसत. तेव्हा घटनेने दिलेल्या अधिकारात तो सभा घेत
असेल, भाषणे ठोकत असेल तर करू द्या त्याला. भाषणांना गर्दी होऊनही पुढे काय होते
हे आपण जाणत नाही काय! त्याला भारतभर फिरू द्या. त्याच्यामागच्या शक्तींना आसुरी
आनंद मिळू द्या. न्यायालयाने त्याला संपूर्ण निर्दोष ठरविलेले नाही. तो निर्णय योग्यवेळी
होईलच तूर्तास नाटकाचे खेळ पाहत राहणे, आज मुंबई, उद्या पुणे, परवा अमरावती..
निवडणुकात विशेष खेळ..काही जागा राखीव!