खरं सांगायचं तर राज्यशास्त्र हा माझ्या अभ्यासाचा विषय आणि राजकारण हा माझ्या
रुचीचा विषय राहिला असला तरी प्रत्यक्ष राजकारण, प्रचार, पक्षकार्य यात मी कधीच
सहभागी झालेलो नाही किंबहुना कटाक्षाने स्वतःला या सर्वांपासून दूर ठेवत आलेलो
आहे.
भाग्य चांगले असल्याने लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक
झालो. संघकार्यात टिकून राहात कार्यकर्ता झालो. राजकारणात भाग घ्यावा अशी ना कधी
इच्छा झाली ना कधी सूचना केली गेली. समाजाच्या संघटनाचे काम करत असताना सारेच आपले
आहेत हा विचार मनात घेऊनच काम करायला शिकलो. संघाचे काम हे ‘सर्वेषां अविरोधेन’
आहे हा पूजनीय श्रीगुरुजींचा दिशादर्शक विचार. आणि समाजाची जी विविध अंगे आहेत उदा
शिक्षण, आरोग्य, क्रीडा, वैद्यकीय, भाषा, संस्कृती, व्यापार, धर्म इ. त्यातलेच एक
राजकारण आहे. राजकारण आपल्याला अस्पृश्य नाही. अन्य क्षेत्रांप्रमाणे त्याचाही
विचार व्हावा. प्रचलित राजकारणाच्या शुद्धीकरणाचा विचार आपणही करावा. पण पक्षीय
राजकारणापासून कटाक्षाने अलिप्त राहावे. कारण राजकारणात आज मित्र, उद्या शत्रू,
पुन्हा परवा मित्र असे बेभरवशाचे सारे असल्याने आपल्याला ते जमणारे नाही. शिवाय
‘वारांगना एव नृपनीती’ असल्याने आपण त्यात पडू नये. राजकारणात एकाची बाजू
घेतल्यावर स्वाभाविकच बाकी सारे विरोधक होतात, आपली इच्छा असो वा नसो! त्यामुळे
ज्याला समाज संघटनाचे काम करायचे आहे त्याने राजकारणात न पडलेलेच बरे.
पण तरीही या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही बऱ्यापैकी सक्रिय राहिलो.
लोकसभेच्या वेळी केवळ अधिकाधिक लोकांनी मतदान करावे असा आग्रह धरला होता. किंबहुना
शत-प्रतिशत मतदान हे परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आवाहन केले होते
त्यामुळे सर्व स्वयंसेवक वर्ग त्यात उतरला. अखिल भारतभर सगळीकडे लोकांना आग्रह,
विनंती, जागृती या माध्यमातून मतदानाचे आवाहन केले आणि भारतीय जनतेने त्याला
उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढली.
खरं सांगायचं तर विधानसभेच्या वेळीही केवळ मतदानाचाच आग्रह धरणार होतो. पण
युती तुटली आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. त्यात हिंदुत्वाचा मुद्दा
काढला गेला, मराठी-गुजराती वाद अगदी जाणीवपूर्वक निर्माण केला गेला, लोकांच्या
मनात विविध भयगंड रुजवले गेले, स्वतःच्या वर्तमानपत्रातून निर्बुद्धासारखी विखारी
टीका केली गेली, शिवाजी महाराजांना प्रांतीयतेच्या सीमांनी बांधण्याचा अश्लाघ्य
प्रयत्न केला गेला, हिंदुत्वाची टिमकी वाजवणारे मराठी-गुजराती असा वाद निर्माण
करताना कचरले नाहीत, नरेंद्र मोदींवर – देशाचे पंतप्रधान असून – निम्नपातळीवर जाऊन
टीका-टिप्पणी करण्यात आली. हे सर्व एवढे वाढले की संघाचे नव्याने स्वयंसेवक झालेले
काहीजण आपसात मराठी-गुजराती करून एकमेकाची महाराष्ट्रनिष्ठा विचारायला लागले..आणि
या सर्वांमुळे समाजाचा एक घटक म्हणून मला त्यात पडावे लागले.
माझ्या अंगाला वाळू लावून नाचण्याचा सेतू बंधनाला कितपत फायदा होईल हा भाग
अलाहिदा परंतु मला खोटे बघवले नाही. निरर्गल आरोप, वाईट शब्दात खिल्ली उडविणे,
लहान तोंडी मोठा घास घेणे याचा विरोध करण्याची अंतःऊर्मी मला स्वस्थ बसू देईना.
फोटोशॉपिंगच्या माध्यमातून खालच्या पातळीवर जाऊन बनवलेली चित्रे मला प्रचारात
खेचून गेली. दुसऱ्याचे आई-बाप काढायचे आणि स्वतःचे काढल्यावर त्याला मारायचे, काळे
फासायचे, तोडफोड करायची हे तर जणू त्यांचे व्यवच्छेदक लक्षण. महाराष्ट्राच्या
राजकारणाचे मवालीगिरीत कोणी रुपांतर केले हे महराष्ट्राच्या जनतेला वेगळे सांगायला
नको. विचारांची मुक्तता नाही, मोकळेपणाने विरोधी विचार स्वीकारणे नाही, ‘हटाओ
लुंगी बजाओ पुंगी’ यांसारखी देशविघातक आरडाओरड करायची, मराठी तरुणांची स्वप्ने
दाबून ठेऊन छोट्या महत्त्वाकांक्षेत त्यांना जखडून ठेवायचं आणि स्थानिक पातळीवर
दादागिरी करत राहायची, स्वतः निवडणूक कधी लढवायची नाही या सर्वांमुळे मला
पहिल्यापासूनच युती पचली नव्हती. पण युती झाली तेव्हा मी केवळ ३ वर्षांचा होतो.
पुढे मोठं झाल्यानंतर मनात हे शल्य डाचत असे की आपल्या पसंतीच्या पक्षाला का
मतदान करता येऊ नये? बरं ध्येयधोरणे वेगवेगळी, कार्यक्रम वेगवेगळे, कार्यपद्धती
वेगवेगळी, टीका सदोदित..एवढे असूनही का मतदान करायचे? ती मानसिक घुसमट थांबली..
भाजप ने अन्य पक्षातील लोकांना घेऊन लगेच तिकिटे दिली याला मी राजकीय डावपेच
म्हणून शकत नाही. त्याला मी दूरदृष्टीहि म्हणू शकत नाही. काही म्हणायचेच असेल तर
भाजप ज्या कर्मनिष्ठांचा वैचारिक वारसा सांगतो त्या नीतिवान नेत्यांचा तो घोर
पराभव होता. सत्तालालसेपायी त्या विचारनिष्ठ धुरिणांना न पटणारी ती तडजोड होती.
मला अस्वस्थ करणारी ही गोष्ट होती आणि आहे. पण तरीही भाजपने पूर्वाश्रमीच्या
मित्रपक्षावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. शिवरायांचे राजकारण केले नाही,
हिंदुत्वाला आपली खाजगी प्रॉपर्टी कधी बनवले नाही. कोण कोणाचे किती फोटो छापतो
यावरून त्याची निष्ठा मोजली नाही. आणि याचाच मला त्रास झाला.
ही हिंदू मानसिकता आहे. दुर्बलाच्या बाजूने उभे राहणे ही स्वाभाविक भावना आहे.
मी नाटकी बोलत नाही परंतु भाजपने जर अशाप्रकारे कुणाच्या शिवनिष्ठेवर प्रश्न उठवले
असते, कुणाचे फोटो छापले आहेत-नाहीत यावरून अश्या कोत्या प्रकारचे राजकारण केले
असते, मराठी-गुजराती अशाप्रकारची समाजात फूट पाडण्याचे, तेढ निर्माण करण्याचे
प्रयत्न केले असते तर मी त्याविरोधात उभा राहिलो असतो. परत तेच, माझ्या अशा
विरोधाचा कुणाला किती फायदा-तोटा झाला असता हा मुद्दा माझ्या लेखी संभवतच नाही. जे
होईल ते होईल पण माझ्या मनाला जे पटत नाही त्याचा विरोध मी करणारच.
शिवाय ज्या प्रकारे कुजबूज आघाडी भाजप च्या पूर्वमित्रांनी उघडली आणि त्याला
विरोध केला असता धमकावण्याचे प्रयत्न केले त्यावरून मी सुद्धा फेसबुक, whatsapp
अशा माझ्या हाताशी असणाऱ्या साधनांद्वारे आघाडी उघडली. त्यावरसुद्धा काहीजणांनी मग
भाजपविरोधी पोस्ट्स टाकायला सुरुवात केल्यावर मी त्या सरळ उडवायला लागलो. कारण
स्वतः हवे तसे खालच्या पातळीवर जाऊन campaign करायचे आणि दुसरा कोणी बोलला की
त्याला धमकावत राहायचे, प्रश्न करत राहायचे हे मला मान्य नव्हते आणि नाही. म्हणून
माझ्या पोस्ट्सवर मला न पटणारी कॉमेंट आली की मी ती पुसून टाकायला सुरुवात केली.
हे वादविवादाच्या सर्वसंमत तत्वांना धरून नाही याची मला पूर्ण जाणीव असूनही मी तसे
केले कारण लढाईत समोरचा कसेही वार करत असेल तर केवळ ढाल धरून बसणे मला मान्य नाही.
या माझ्या नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकाराने मित्र चिडल्यासारखे झाले, followers
(फेसबुकवर रूढार्थाने followers) unfollow व्हायला लागले आणि ते स्वाभाविकही होते.
पण मी त्याची परवा केली नाही. आज निवडणूक संपल्यावर त्या सर्वांना सॉरी म्हणणे
माझे कर्तव्य आहे. निवडणुका येतील जातील, सरकारे स्थापन होतील, युत्या-आघाड्या
तुटतील-जुळतील पण आपल्यात मनभेद नकोत. झाले गेले विसरून जाऊ. मुद्दाम हे सर्व
निकाल लागण्याआधीच स्पष्ट केले कारण निकालानंतर काय चित्र असेल माहिती नाही.
तेव्हा या लेखाचा कदाचित वेगळा अर्थ लावला जाऊ शकला असता म्हणून निकालाआधीच हे
सर्व लिहून मन मोकळे केले...