"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, February 19, 2014

रामू आणि झाकिर

गावात एकच शाळा होती. अन् तिथले गुरुजी सर्व वर्ग घ्यायचे. गाव छोटं असल्याने सर्वजण एकमेकाला ओळखत असत. गावातल्या देवपंचायतनाच्या जवळ रामू राहत असे. तिथून डाव्या अंगानं थोडं पुढे गेलं की चढावावर रामूच्या खास मित्राचं म्हणजेच झाकिरचे घर येत असे. दोघांचीही अगदी घट्ट मैत्री होती. शाळेत जाताना एकत्र, नदीवर पोहायला जाताना एकत्र, जत्रेला सोबत. मैत्रीची घट्ट वीण जपत दोघंही मजेत जगत होते.

रामूचे वडील ग्रामपंचायत कार्यालयात कारकून होते तर झाकिरचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत कारकून होते. दोघांचीही मैत्री होती. साधारण आर्थिक दर्जा तोच होता. दिवाळीला झाकिर, त्याचा मोठा भाऊ हनिफ आणि धाकटी बहीण रझिया हे रामूच्या घरी कंदील बनवायला जमत असत आणि रामू ईदच्या दिवशी झाकिर बरोबर शीरकुर्म्याचा आस्वाद घेत धूप जाळत असे. मग मजमुआचे अत्तर लावून ऐटीत घरी येणे हा रामूचा ठरलेला क्रम होता.

रामू आणि झाकिर तसे अभ्यासातही सारखेच गुण मिळवत असत. रामूचं गणित चांगलं होतं आणि झाकिर चा भूगोल. दोघांनी एकमेकाला अडलेल्या गोष्टी शिकवायच्या असा जणू अलिखित करारच झाला होता दोघांमध्ये. शाळेत जाताना शिवमंदिरात घंटा वाजवून रामू बाहेर येत असे तर मशिदीच्या धूपाचा अंगारा लावल्याशिवाय झाकिर पुढे जात नसे. त्यांच्या मैत्रीच्या आड या गोष्टी कधीच आल्या नाहीत. रामूचे मंदिरात श्रद्धेने जाणे आणि त्याच, तितक्याच, तशाच श्रद्धेने झाकिरचे मशिदीत जाणे एवढाच काय तो फरक दोघांमध्ये होता. बाकी सर्व सारखे.. घरची आर्थिक परिस्थिती, आई-वडिलांचे शिक्षण, त्यांचे कामाचे तास, पगार, कष्ट, नैसर्गिक अडीअडचणी हे सर्व सारखे. हाकेच्या अंतरावर तर घरे होती दोघांची. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी फुटकी कौले बदलण्याचा कार्यक्रम ठरलेला. एकूण कौलं झाकिरचे बाबा घेऊन येणार आणि मग दोन्ही घरांवर ती कौलं चढणार. तर उन्हाळ्यात लागणारी झापं रामूचे बाबा घेऊन येणार आणि मग दोन्ही अंगणात मस्त सावलीची सोय होणार..

एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे रामू आणि झाकिर मोठे होत होते. एक दिवस वर्गात शिक्षक आले आणि फी गोळा करताना म्हणाले झाकिर, “आजपासून तुझी फी माफ!” रामूला आणि झाकिर ला दोघांनाही प्रश्न पडला की नेहेमीप्रमाणे रामूची फी तर जमा करून घेतली; मग झाकिर ची फी का माफ केली? त्यांनी जास्त विचार केला नाही. शाळा सुटली. झाकिरने फी च्या पैशातील थोडे पैसे खर्च करून चिक्की घेतली आणि दोघंही चिक्की खात खात घरी परतले. 

पुन्हा काही महिन्यांनी अशाच एका दिवशी शिक्षक वर्गात आल्यावर त्यांनी झाकिर ला उभे राहायला सांगितले. त्याला फी तर माफ होतीच पण शिवाय आता शिष्यवृत्ती मिळणार होती. शिक्षकांनी त्याला सांगितले की, “आता तुला दर महिन्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे तेव्हा हा अर्ज घरी घेऊन जा आणि त्यावर अब्बा-अम्मीची सही घेऊन ये”. पुन्हा दोघंही पुरते चक्रावून गेले. रामू बुचकळ्यात पडला की शिक्षक बरोब्बर झाकिरचीच निवड का करतात? मला का अर्ज दिला नाही?
रामू आणि झाकिर दोघेही विचारी मनाचे होते. एखादी गोष्ट का घडली याचा ते विचार करत असत आणि प्रसंगी ज्येष्ठांना विचारत असत.

रामूने घरी येऊन बाबांना हा प्रश्न विचारला तर ते निरुत्तर झाले. त्यांना हे काही ठाऊकच नव्हते. ते म्हणाले शाळेतील शिक्षकांनाच विचार. झाकिरच्या बाबतही असाच प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी दोघं नेहमीप्रमाणे शाळेत गेले अन् त्यांनी शिक्षकांना विचारले.

आता मोठाच पेच निर्माण झाला. रामू तर विचारत होता की झाकिर ला मिळणारी सवलत मला का नाही? शिक्षकांना सुचेना की ह्या निरागस मनांना काय सांगावे? खरं उत्तर तर एका वाक्यात अन् अत्यंत सोप्पं होतं. रामूला सांगायचं की, “झाकिर केवळ मुसलमान आहे म्हणून त्याला फी माफ आणि शिष्यवृत्ती; तर तू हिंदू आहेस म्हणून तुला काही मिळणार नाही”, खरंतर सरकारी फतवाच तसा होता. पण शिक्षक धजावले नाहीत.

रामूचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. पुढे रामू मोठा होईल तेव्हा त्याला समजून येईल की शाळेत नक्की काय झालं. त्याचे ते व्रण कायम राहतील. आपल्या कष्ट करणाऱ्या बापाला केवळ तो हिंदू असल्यामुळे सवलत मिळाली नाही हे समजायला रामूला वेळ लागणार नाही. तर आपला बाप हा पैसे भरू शकत असताना आणि तयारी असताना सरकारने आपल्याला मिंधं का बनवलं हे न कळायला झाकिर काही कायम लहान राहणार नव्हता.

जैन, बौद्ध,शीख, मुस्लीम, ख्रिश्चन ह्या सर्वांना सवलती देऊन सरकार केवळ आणि केवळ हिंदूंना बाहेर ठेवते आहे हे त्यांना कळून चुकणार होते. किंबहुना ह्या सर्वांना सवलती देणार ह्याचाच दुसरा अर्थ असा की ‘हिंदू असाल तर तुम्हाला सवलती मिळणार नाहीत’. हा भेद राष्ट्रीय जीवनाच्या खोलवर रुतवणारे किती पापराशी जमा करत आहेत ह्याचा हिशोब कोणीच लावू शकणार नव्हते.

रामू अन् झाकिर ची दृष्ट लागण्याजोगी मैत्री यामुळे अजिबात बदलणार नव्हती पण एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी मात्र बदलणार होती हे नक्की...





No comments:

Post a Comment