"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Tuesday, May 20, 2014

काका ...

काका! हो. काकाच नाव पुरेसं आहे त्यांच्यासाठी. आम्हा सर्वांचेच काका होते ते! त्यांचं नाव-आडनाव जाणून घेण्याची गरज नाही भासली कधी.

ठेंगणा बांधा, लहानपणी आट्यापाट्या, खो-खो खेळल्याने चपळ शरीर, पांढरे केस, कपाळाला काळा बुक्का, साधासा चष्मा, पंधरा सादर लेंगा, क्वचित शर्ट, खांद्याला झोळी, प्रेमळ डोळे आणि चेहऱ्यावर नेहमी हसू. प्रसन्न व्यक्तिमत्व!

काका एकटेच राहायचे. बाबामहाराज आर्वीकर हे त्याचं सर्वस्व होतं. त्यांच्यावरच्या भक्तीपोटी काका अविवाहित राहिले आणि भक्तिमार्गात रमले. बाबामहाराज जाऊन कितीतरी वर्ष झाली पण जगाला प्रेम अर्पण करण्याचा त्यांचा संदेश काकांनी तंतोतंत पाळला.

काका स्वतःचं जेवण स्वतः करत, कपडे स्वतः धूत आणि सर्व कामं आनंदाने करत. आम्ही कधी थकूनभागून काकांकडे गेलो की पाणी आणि एखादा लाडू, केळं हे तर हमखास मिळेच पण त्याबरोबर एखादी गरमागरम चपाती किंवा तूप-मीठ-भात खाऊन जाण्याचा आग्रह असे. त्यांचं जेवण नेहमीच चविष्ट असे कारण त्यात ते अम्च्यावरची माया ओतत असत आणि आपुलकीने वाढत असत. बिटाची कोशिंबीर, गरमागरम डाळीची आमटी अहाहा!

कधीकधी काका खुंटीवरची एकतारी काढून तल्लीन होऊन भजनं म्हणत असत. ती श्रीकृष्णाची मूर्तीच त्यांची माता-पिता-बंधू होती. आम्हीही रममाण होऊन जात असू. हिंदी-मराठी भजनं, त्यांच्या चाली श्रवणीय असत.

काका साधे होते. त्यांना जगाचे छक्के-पंजे कळले नाहीत. स्वार्थ साधणे जमले नाही आणि कुणाचे दडपण झुगारणे शक्य झाले नाही. सतत एखाद्या दडपणाखाली, कुणाच्यातरी ताणाखाली आपले जीवन व्यतीत करत असतानाही हसतमुख राहून सर्वांची प्रेमळपणाने सेवा करत राहणे हे काकांकडून शिकण्यासारखे!

आमच्या वाढदिवसाला त्यांचा आठवणीने फोन ठरलेला असे. “हां...काका बोलतोय...काय प्लान आज?...येऊन जा नक्की!”

आज काका आपल्यात नाहीत. त्यांना स्वर्गवासी होऊनही बरीच वर्षे झाली; पण त्यांच्या  वाढदिवशी आम्हाला प्रकर्षाने त्यांची आठवणं झाल्याशिवाय राहत नाही. वाटतं जावं त्यांच्या घरी. तिथे बेल वाजवल्यावर हसतमुखाने दार उघडतील आणि मोठ्ठ्याने म्हणतील, “या ss !”

काका खूप सश्रद्ध मानाने आणि तल्लीनतेने बाबामहाराजांच्या गोष्टी, प्रसंग, आठवणी, अनुभव आम्हाला सांगत असत. संतमंडळींचे भक्त म्हणजे लेकरं असतात हे आम्हाला जाणवलं. सोलापूर जवळच्या ‘माचणूर’ या गावाचं नाव ‘माचणूर’ कसं पडलं ती गोष्ट काका खूप रंगवून सांगत असत. मला त्यातली नावं आठवणार नाहीत पण एक मुघल सरदार रयतेवर अत्याचार करत आला आणि गावच्या शिवमंदिरावर लोकांची खूप श्रद्धा असल्याने तिथे तो नाश करायला पोहोचला. त्याने गोमांस आणलं होतं एका ताटात भरून; जे तो घेऊन गाभाऱ्यापर्यंत गेला खरा; पण तातावारचे वेष्टन/कापड दूर करताच चमत्कार नजरेस पडला. मांसाच्या तुकड्यांच्या जागी गुलाबपुष्पांच्या पाकळ्या होत्या. अशाप्रकारे ‘मांसाचा नूरच’ बदलला म्हणून तेव्हापासून ‘मांसनूर’ चे मग ‘माचणूर’ झाले. अशा कित्येक गोष्टींचा खजिना काकांकडे होता.

कालाष्टमी, रामजन्म अशा गोष्टी काका खूप उत्साहाने साजऱ्या करत असत. त्यामध्ये खूपजण सहभागी होत असत. काकांचे स्वयंपाकघर भक्तमंडळींच्या कुटुंबांनी भरून जात असे. ४०-४५ पाने उठत असत. मग दुसऱ्या दिवसापासून काका एकटेपणाचा उत्सव साजरा करत असत.

काकांना वर तोंड करून कुणाला बोलणे कधीच जमले नाही. पटलं नाही तरी चार खडे बोल सुनावता आले नाहीत. काकांनी निमूटपणे, सोशिकतेने सर्व सहन केलं. कदाचित त्यांच्यासमोर पर्यायही नसावा. अगतिक असावेत. पण आम्हाला हे शेवटीशेवटी कळलं. वेळप्रसंगी आपल्या घरी वयोवृद्ध, आजारी व्यक्तिंची त्यांनी केलेली शुश्रुषाही आम्ही पाहिली.


आज आम्ही त्यांना ओळखणारी मित्रमंडळी एकत्र जमतो तेव्हा हमखास त्यांच्या आठवणी निघतात. “जीवनात चांगले काम करावे” तर लोक तुमची चांगली आठवण काढतील हे काकांकडून शिकावे. देवाने त्यांना तसं अकालीच बोलावून घेतलं. खूप साधे, निर्मळ, आनंदी, उत्साही आणि प्रेमळ असणारे काका आज हवे होते; म्हणजे हक्काने सांगता आलं असतं, “काका आम्ही येतोय..काहीतरी फक्कड बेत करा!”

4 comments:

  1. pharach chan ! panich aala dolyat ekdam

    ReplyDelete
  2. Vikram, phaarach chaan aani yogya lihilays.. vaachta vaachta anek chaanglya vaait aathvani, anek prasanga dolyasamor yeun gele.. pratyek aathvanit, pratyek prasangaat aaplya saglyanmadhle badal janavle.. pan kaka maatra tasech hote.. saadhe, nirmal, aanandi, premal, utsaahi..

    ReplyDelete
    Replies
    1. हं. हे अगदी बरोबर निरीक्षण नोंदवलेस आशु. आपल्यात बदल झाले...पण ते तसेच राहिले..

      Delete