"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Saturday, February 1, 2014

दगडू, खळ्ळखटॅक आणि दगडू...

दुपार झाली. दगडू उठला. माध्यान्हिक आटोपताच चहा हजर झाला. दगडूने पेपरवर नजर फिरवली. साहेबांचा आदेश वाचला “इंग्रजी पाट्यांना काळे फासा.” दगडू खुशीत आला. त्याला ‘काम’ मिळाले. साहेब म्हणतच तर असतात ‘प्रत्येक हाताला काम!’. दगडूने फोनाफोनी केली आणि चार रिकामटेकडी टाळकी जमवली. २ जण एयरपोर्टवर नाईट शिफ्ट करून आलेले आणि एकाची चायनीज गाडी संध्याकाळी लागायची होती, एक जण नोकरीच्या शोधात होता.
दगडू म्हणाला “आपला नाव झाला पायजेल अशी पाटी निवडूया”. कार्यकर्ते सुचवायला लागले - घेलाशेठ वेलजी चं किराणा मालाचं दुकान आहे... नवीनच झालंय... इंग्रजी नाव लावलंय साल्याने...  ‘वेणीचंद किरोडीमल सुपर मार्केट’. विचारलं तर म्हणतो, ‘ते आमचे वडिल्ची याद में’.. त्यालाच काळं फासूया. अरे ते ‘महावीर ग्लास वर्क्स’ आहे ना ते फोडू. असे विविध पर्याय समोर आल्यावर दगडू विचारमग्न झाला. घेलाशेठ ने गणपतीला २००० मोदकांचं सामान मोफत दिलं होतं. आणि महावीर ने गड क्र. XX च्या खिडक्या आणि दरवाज्यासाठी फुकट काचा दिल्या होत्या. एकदम दगडूला आठवलं की आपल्या मुलाची शाळा ‘सर्वोदय हायस्कूल’! सायबांची मुलं ‘बाम्ब्ये स्काटीश’ मधे असल्याने आपणही इंग्रजी माध्यमात घातलेल्या आपल्या मुलाच्या शाळेचं नाव. इंग्रजी पाटी. तेवढाच शाळेत आपला बोलबाला पण होईल. चला रे...
अशीच एक दुपार.. साहेबांचा आदेश “xx मोबाईल कंपनी मराठीतून उद्घोषणा करत नाही”. फासा काळे, फोडा काचा. चला रे... पण मध्येच स्थानिक नेत्याचा फोन – आंदोलन तूर्तास करायचे नाहीये. बोलणी झाली आहेत. दगडू शांत.
अशीच एक दुपार.. साहेबांचा आदेश “.......” . . . चला रे...
आताशा दगडू समजून चुकला होता की सारखे काळे लागते, सारखे सारखे दगड लागतात. म्हणून दगडूने ‘दामले आणि कंपनी’ च्या दुकानातून धाक दाखवून २ बुधले काळा रंग आणून पक्याच्या ग्यारेजमधे ठेवला होता. आणि चंदूला दगड जमवून ठेवायला सांगितले होते. हो, मराठीच्या रक्षणासाठी सदैव तयार राहायला हवे. साहेब सुद्धा अहोरात्र झटत असतात पक्षवृद्धीसाठी!
आणि अशातच साहेब गरजले “टोल भरू नका..कोणी आडवे आले तर तुडवा”.. झाले...दगडू गीअरमधे ...एव्हाना दगडू चा कार्यकर्ता संच वाढला होता. पण सुरुवातीचे शिलेदार अंगावर केसेस आल्याने हैराण होऊन मागे पडले होते. घरची दुखणी, स्वतःच्या केसेस आणि पैसे याचे गणित घालत ते शिलेदार दगडूचा चेहराही पाहण्यास तयार नव्हते. पण दगडू ला कुठे पर्वा होती. मराठीच्या संरक्षणासाठी एवढा त्याग तर करावाच लागणार ना. शिवाय दोघे गेले तर चौघे येतील अशी स्थिती होती. दगडूवर स्थानिक नेत्याचा वरदहस्त असल्याने त्याला काही चिंता नव्हती... शेवटी मुलाचे डोनेशन भरलेल्या आणि मुलीला कॉलेजात अॅडमिशन मिळवून दिलेल्या स्था.ने.साठी एवढे करायलाच हवे. आता दगडू चांगलाच तयार झाला होता. ‘आदेश दिला की आंदोलन सुरु करायचे आणि संदेश मिळाला की बंद करायचे’ त्यानुसारच दगडू आपल्या प्रदेशातील कार्यकर्त्यांना निर्देश द्यायचा.. हल्ली तर दगडूच सांगू शकतो बोलणी कधी फलद्रूप होणार आणि आंदोलन कधी बंद होणार. कार्यकर्ते भक्तिभावाने दगडू कडे पाहतात. हल्ली त्याच्या वेशातसुद्धा आमूलाग्र बदल झालाय. आधी रंगीत पण साधे शर्ट घालणारा दगडू आता कडक खादीचा पांढराशुभ्र शर्ट घालतो. पहिली दोन बटणे उघडी टाकणे गरजेचे. गळ्यात पूर्वी मारुतीच्या काळ्या दोऱ्यात अडकवलेलं साईबाबांचं लॉकेट असे तिथे आता सोन्याची जाड साखळी आलीये. त्यात वाघनखं. कपाळावर उभे गंध. मनगटात जाड साखळी. बोटांत आंगठ्या. ४ मोबाईल्स. तोंडात पान आणि तत्सम. आपले आयुष्य मार्गी लागले ते केवळ साहेबांमुळे असं सांगायला दगडू कधीच विसरत नाही. ‘साहेब नसते तर आज आपण कुठे असतो याचा विचारही करवत नाही’ असं तो साश्रुनयनांनी आणि सद्गदित कंठाने म्हणतो. आपल्या वडिलांनीसुद्धा पूर्वी खस्ता खाल्ल्या आणि पक्ष वाढवला पण त्यांना कोणी मान दिला नाही ही खंत तो बोलून दाखवतो. खिशातले पैसे खर्च करून पत्रक छापल्याचे आणि आईने घरी बनवून दिलेली खळ घेऊन सायकलवरून पत्रके चिकटवीत निघालेल्या आपल्या गरीब बापाचे खरे चित्र तो उभे करतो. साहेबांच्या साहेबांची १४ कोटीची घोषित संपत्ती असल्याचे वृत्त त्याला विचलित करत नाही! एकूण दगडू स्वतःच्या ‘कर्तबगारीवर’ खूष आहे. आता त्याला पुढे नगरसेवक म्हणून तिकीटसुद्धा मिळेल अशी अटकळ अनेकजण बांधतात. अशातच साहेबांनी मुलाखती घेणार असं जाहीर केलंय. त्याने ३ नवीन खादीचे शर्ट्स खरेदी (‘राणावत फैशन्स’ मधून मोफत!) केलेत. दगडू स्वप्नं पाहतोय..
असाच एक दिवस उजाडतो तो दगडूचे विश्व हलवून सोडत. आईला छातीत असह्य कळा सुरु होतात. दगडू फोनाफोनी करतो. पक्षाची रुग्णवाहिका त्वरित येते. त्यावर स्था.ने. चा फोटो आणि वकुबानुसार लहानमोठे असे अजून ४३ फोटो असतात! आईला घेऊन प्रवास सुरु होतो. त्या विभागातील सर्वोत्तम हॉस्पिटल पाऊण तासावर असते. वाटेत एका ठिकाणी रास्ता रोको असतो. दगडूच्याच पक्षाचा आणि साहेबांच्याच आदेशानुसार. टायर्स ना आगी लावून टाकलेल्या असतात. रस्ता बंद असतो. दगडू चरफडतो. बाजूच्या गल्लीतून काढून म्हणजे १५ मिनिटं अधिक मोडणार. प्रवास सुरु. पुढे एका ठिकाणी प्रचंड वाहनकोंडी कारण अर्ध्याहून अधिक रस्त्यावर कार्यक्रमाचा दादागिरी करून घातलेला मंडप. धीम्या गतीने पुढे. प्रवास सुरूच. पुढे शाळेच्या बाहेर गलका आणि जोरदार आंदोलन. कार्यकर्ते कुंड्या उचलून फेकताय्त कारण ५० रु. शुल्कवाढ झालीये. पुन्हा बाजूच्या गल्लीत. अजून १० मिनिटं मोडणार. प्रवास सुरु. दिसायला लागले हॉस्पिटल. पण एवढा शुकशुकाट का ते दगडू ला कळेना. जवळ गेल्यावर समजले की आज पहाटेच ‘साहेबांच्या’ एका नातेवाईकाचे निधन ह्या इथे झाले जो इथे ६ दिवस उपचारात होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. डॉक्टर्स चिडून संपावर गेलेय्त. दगडू चरफडला – साला त्याला मरायला आणि ह्यांना आंदोलन करायलाही हाच दिवस मिळाला..रुग्णवाहिका गर्रकन फिरवून दुसऱ्या हॉस्पिटलकडे प्रवास सुरु. जिथे पोहोचायला १ तास लागणार. वाटेत साहेबांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन. कार्यकर्त्यांच्या दुचाक्या, झेंडे, अरेरावी. प्रवास सुरु. हॉस्पिटल आले. पण साहेबप्रणित कर्मचारी संघटनेचा संप. शेवटी स्वतः व्हीलचेअर आणून त्यात आईला बसवले आणि ढकलत ढकलत डॉक्टरांकडे नेईपर्यंत आईचे प्राणोत्क्रमण. दगडू सुन्न.
...सर्व आटोपून घरी आल्यावर दगडू विचारमग्न. साला काय मिळवलं आपण! आणि काय गमावलं! ज्या आईने तळहातावरच्या फोडासारखं जपून आपल्याला वाढवलं तिला साधे उपचारदेखील आपण मिळवून देऊ शकलो नाही. काय अर्थ राहिला. हे सारं कशामुळे, कोणामुळे? आपणसुद्धा असे काहीजणांच्या दुःखाला आणि नुकसानाला कारणीभूत असू का? हे बंद नको का व्हायला? हे कधी शाळा नाही काढू शकले, अवैध धंदे नाही बंद करू शकले, बांबू,  दांडा,  उखडू,  फोडू,  गाडू,  छाटू,  कापू अशी भाषा यांनी कधी बांगलादेशींविरोधात नाही वापरली. दगडू चं डोकं गरगरायला लागलं. ग्लानीत तो झोपून गेला. दुसऱ्यादिवशी उठला तेच मुळी एका ठराविक विचाराने. मी नाही या निरर्थक भानगडीत पडणार. तरुणांना यात गुंतवून त्यांची आयुष्य आणि घरंदारं मी नाही उद्ध्वस्त करणार. आता चांगले जगायचे. ही घाण अधिक नाही वाढवायची. होता होईल तो अधिकाधिक जणांना शहाणे बनवायचे. आपण पोळून निघालो तर खरेच पण या युवकांना नाही जळायला द्यायचे.
दगडू आता कष्ट करतो. साहेबांच्या आदेशाशी त्याला देणंघेणं नाही. आईच्या फोटोला नमस्कार करताना तो चांगलं वागण्याची आठवण स्वतःच्या मनाला करून देतो.

पण असे गल्लोगल्लीतले ‘दगडू’ सुधारायला त्यांच्या आईला जावंच लागेल का...

10 comments:

  1. चला, शोधून काढू या त्या दगडू ला!

    ReplyDelete
  2. COMMENT RECEIVED FROM Shri. Prakash Tendolkar from United States.
    .
    Vikram,
    Good story.... praying for more 'dagdu turnarounds'.

    The fact is after such a dagdu leaves his paksha, he has to become 'bhumigat' and migrate to a far off land. I met such a turned around dagdu, who was attacked a couple of times but got saved by God's grace. He left India and came to US in 'bhumigat' mode and then continued his education in US.

    ReplyDelete
  3. सुंदर….विक्रम. शेवटचे वाक्य फार महत्वाचे…अशी वेळ येण्य्याआधीच अश्या सगळ्या दगडूना परमेश्वर सद्बुद्धि देवो अशी अपेक्षा करुया

    ReplyDelete
  4. मुंबई सारख्या महानगरात देशाच्या काना-कोपरयातून कफल्लक अवस्थेत हजारो तरुण येतात आणि स्वकष्टाने स्वत:चे आयुष्य जसे जमेल तसे घडवतात. पण दगडू आणि त्याच्यासारख्या इतर मराठी तरुणांना मात्र हे जमू शकता नाही. कारण त्यांना एका अहंगंडाने ग्रासलेले असते. तो गंड म्हणजे "मुंबई आहे मराठी माणसाची". मग आम्ही मुंबईच्या मालकांनी पडेल ते कष्ट कसे करायचे? आम्ही फक्त "खळळ खटयाक" करायचे.
    माझ्या मते या अहंगंडाला मोठ्या प्रमाणात शिवसेना जबाबदार आहे. मराठी माणसाची आत्मसंतुष्ट वृत्ती सुद्धा तितकीच कारणीभूत आहे. एका अख्ख्या पिढीला विकासाच्या दिशेने प्रेरित करण्याची संधी शिवसेनेला होती. पण त्यांनी ती गमावली. आता मनसे पुन्हा तोच खेळ करत आहे. मध्यंतरी "झेंडा" या चित्रपटात हा विषय मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न झाला होता.

    ReplyDelete
  5. wah...sundar vastvik lekh aahe...

    ReplyDelete
  6. उत्तम... गाजर-हलव्याचे वास्तव मांडलेस अन् प्रत्येक हरणार्या सश्याचे वास्तव. अनेक दगडूंच्या मनात विस्तव नक्कीच पेटवणार तूझा हे लेख.

    ReplyDelete