६ एप्रिल च्या DNA-Mumbai मधे १३ व्या पानावर (http://epaper.dnaindia.com/epapermain.aspx?queryed=9&eddate=4/6/2011) आलेला हा लेख. श्री. जॉन मॅकलिथन यांनी लिहिलेला हा लेख आहे. उमेदीच्या काळात हिंदूविरोध करून आता उतारवयात काही गोष्टी त्यांना पटल्यात, समजल्यात. त्यांनी मान्य केले आहे हेही नसे थोडके! ते स्वान्तःसुखाय मी भाषांतरित केले आणि मग इथे प्रकाशित केले.
जेव्हा काँग्रेस पक्षाने मला पद्मश्री पुरस्कार दिला तेव्हा मी अचंबित झालो – आजवर हा पुरस्कार मिळवणारा मी एकमेव विदेशी पत्रकार आहे. शिवाय भारतातील माझ्या ४० वर्षांच्या राजकीय वार्तांकनातून मी कायमच नेहरू घराणेशाहीवर उघड टीका करत आलेलो आहे. अलीकडेच कोणीतरी माझ्याबद्दल म्हटले की, “हा एक खडूस ब्रिटीश वार्ताहर आहे, ज्याने उतारवयात अशा देशात राहणे पसंत केले आहे ज्या देशाबद्दल त्याला कधीच आस्था नव्हती.”
ऑपरेशन ब्ल्यू स्टार पासून सुरुवात झाली. इंदिरा गांधींवर टीका करणाऱ्या फार कमी पाश्चिमात्य वार्ताहरांपैकी मी एक होतो. आणि तेव्हापासूनच मी म्हणत आलेलो आहे की सुवर्णमंदिरावरची सशस्त्र कारवाई आणि त्यानंतरचे शिखांवर झालेले अत्याचार यामुळे सर्व शिखांमध्ये एक कटुतेची भावना निर्माण झाली, जी दूर करणे आजही कठीण आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, जरी त्यावेळी हिंदू भारत बहुसंख्येने राजकीयदृष्ट्या इंदिराविरोधी होता, तरीही त्यांना न जुमानणाऱ्या अल्पसंख्यक समुदायाबद्दल (शिखांबद्दल) असलेल्या इंदिरा गांधींच्या दडपशाहीबाबत त्याने उघडपणे सहमती आणि आनंदच व्यक्त केला.
इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करून उलट माझी प्रसिद्धी वाढवायलाच मदत केली. त्यांनी मला अल्पावधीसाठी भारताबाहेर घालवून दिले खरे, पण त्यामुळे बहुसंख्य भारतीय जनता माझा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ ऐकू लागली, कारण त्यांना ते घटनांचे सुयोग्य वार्तांकन वाटत असे.
जेव्हा राजीव गांधी सत्तेवर आले तेव्हा ते राजकीय व्यवस्था बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत असं मला वाटलं, पण जुनी खोडं बदलत नाहीत हे पाहताच त्यांनी लगेच प्रयत्न सोडून दिले. श्रीलंकेतील त्यांच्या मूर्ख धाडसाबद्दल मी त्यांच्यावर टीकाही केली, पण तरीही जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा मला वाईट वाटलं.
काश्मीरमध्ये मी खोऱ्यातील काश्मिरी मुसलमानांच्या मानवी अधिकारांच्या पायमल्लीबद्दल राजीवजी आणि त्यानंतरच्या काँग्रेस सरकारांशी अत्यंत कडवेपणाने झुंज दिली. काश्मीरच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये पाकिस्तानी सहभागाचा काहीच पुरावा भारतीय सरकारकडे नाही हे दाखवून देणारा मीच पहिला होतो. म्हणून मी दरवेळी माझ्या वार्तांकनाची सुरुवात आवर्जून अशी करत असे – “दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत असल्याचा भारताचा आरोप” किंवा “भारताच्या कब्जातील/अखत्यारीतील काश्मीरमध्ये निवडणुका”. अन्य विदेशी पत्रकारांनीसुद्धा काश्मीरबाबत हीच भाषा वापरायला सुरुवात केली आणि ते नेहमीच मुसलमानांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल बोलत असत, पण ज्यांना त्यांच्या वंशपरंपरागत भूमीतून केवळ दहशत पसरवून हाकलून देण्यात आले होते, त्या ४,००,००० हिंदूंबद्दल ते कधीच बोलले नाहीत. (मीसुद्धा त्याबाबत मौनच बाळगले.)
राजीव गांधीच्या पत्नी म्हणून सोनिया गांधींबद्दल मी कधीच विचार केला नव्हता, पण त्यांच्या मृत्युनंतर सोनियांनी ज्या तऱ्हेने काँग्रेसवर आपली हुकुमत गाजवायला सुरुवात केली ते पाहून मला काळजी वाटली, त्यामुळे मला माझ्या नेहरू घराणेशाहीवरील वार्तांकनांमध्ये म्हणावे लागले : “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा एकाच कुटुंबावर अवलंबून राहावा हे दुःखदायक आहे; एका राष्ट्रीय पक्षाची एका व्यक्तीसमोर पत्करलेली संपूर्ण शरणागती खेदजनक आहे. प्रश्न हा आहे की : पंतप्रधानपदासाठी आपली उमेदवारी सिद्ध करण्यासाठी सोनिया गांधींकडे काय आहे? देश चालवणे हे एखादी कंपनी चालवण्यापेक्षा खूप अधिक गुंतागुंतीचे आहे. कोणत्याही व्यवसायात आधी शिकाऊ म्हणून उमेदवारी करणे गरजेचे असते – राजकारणात तर जास्तच गरजेचे”. या उद्गारांबद्दल सोनिया गांधी नाराज झाल्याचे मी ऐकले.
पुढे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलामांनी त्यांना सांगितले की, त्यांनी त्यांचा इटालियन व भारतीय असे दोन्ही पासपोर्ट्स बराच काळ ठेवले आहेत ज्यामुळे भारताच्या पंतप्रधानपदापासून त्यांना वंचित राहावे लागले. परंतु त्या पडद्यामागे भारताच्या सर्वोच्च नेत्या झाल्या. मी त्यावेळी उद्गारलो : “अत्यवस्थ आणि नेतृत्वहीन काँग्रेसने जन्माने इटालियन आणि बाप्तिस्म्याने रोमन कॅथोलिक असलेल्या सोनिया गांधींशी स्वतःला जोडून घेतले आहे.” या वक्तव्यासाठी त्यांनी मला कधीच माफ केले नाही. आज मी यत्किंचितही संदेह न बाळगता म्हणू शकतो की, “जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा काँग्रेस आणि भारत या दोन्हीवर त्यांनी अधिराज्य गाजवलेला काळ हे एक अंधारयुग म्हणून नमूद केले जाईल, प्रचंड भ्रष्टाचाराचे आणि अगदी हुकुमशाही नाही तरी एकाधिकारशाहीकडे झुकणाऱ्या लोकशाहीचे आणि अभारतीय पण माझ्यासारख्या धर्माने ख्रिश्चन असणाऱ्या व्यक्तीच्या हातात एकवटलेले. नुकतेच विकीलीक्सने दाखवून दिल्याप्रमाणे बोफोर्सपासून २-जी पर्यंतच्या घोटाळ्यातील (त्या) मुख्य लाभार्थी असल्याचे सत्यही बाहेर येईल, ज्या लाभाचा वापर त्या मतं विकत घेण्यासाठी करतात.
मला एका गोष्टीचं अनेकदा खूप आश्चर्य वाटतं की भारतीय- हिंदू, माफ करा पण या देशातील बहुसंख्य बुद्धिजीवी हिंदू आहेत – मी माझ्या ऐन उमेदीच्या काळात या देशातील ८५० दशलक्ष हिंदूंवर आणि जगभरातील अब्जावधी हिंदूंवर कडवी टीका करूनही माझ्यावर ते खूपच प्रेम करतात!
आज मला पश्चात्ताप होतो. मला खरोखरंच असं वाटतं की भारताला अभिमानाने असं म्हणता आलं पाहिजे की “हो, आमच्या सभ्यतेचा पाया हिंदू आहे.” हिंदुत्वाचे गुणविशेष आणि प्रदीर्घ काळ टिकून राहण्याचे मुख्य कारण म्हणजे ते उभे राहून भांडत नाही. ते बदल स्वीकारते आणि आधुनिक होते आणि शोषून घेते – हाच खरा शास्त्रशुद्ध आणि योग्य मार्ग आहे. मला विश्वास वाटतो की हिंदूधर्म हा या सहस्त्रकाचा धर्म ठरेल कारण तो स्वतःला बदलांशी जुळवून घेतो.
_______________________________________________________________________
मूळ लेखक : जॉन मॅकलिथन. मुक्त अनुवाद : विक्रम नरेंद्र वालावलकर.
khuup chaan!!! prabodhan karnara lekh!! anuwaad uttam!!!
ReplyDelete"सौ चूहे खाके बिल्ली हज को चली" अशी अवस्था श्री. माकालीथान यांची झाली आहे असे वाटते. की यामागे आणखी काही गणित आहे, ते येणारा काळच ठरवेल.
ReplyDelete