आदल्या दिवशी मलिंगाला शिव्या घालून, सचिनला डोक्यावर घेऊन, दणाणा नाचून भारत झोपला होता. गादीवर आळसत पडला होता. जणू स्वर्गातून खाली भूलोकी न्याहाळावे काय चालू आहे म्हणून टी.व्ही. चा अंगाखाली आलेला रिमोट चाचपून काढला आणि टी.व्ही. चालू केला. सगळ्याच वृत्तवाहिन्यांवर कोणीतरी गांधी टोपी घातलेला एक वयस्कर ‘मराठी’ माणूस दिसायला लागला. जरा कूस बदलून ‘इंडिया’ पण ‘अटेन्शन’ मधे आला. हा स्टार माझा अथवा झी २४ तास नव्हे...अगदी गेला बाजार आयबीएन-लोकमत पण नाही. हे तर हिंदी-इंग्लिश २४ तास दळण दळणारे. पण मग कोण आहे बरं हा माणूस?
भारताने ग्लासमागे आल्याने मोठ्ठी दिसणारी सिगारेट हेरली. कालचा रिता ‘ग्लास’ बाजूला करून ती उचलली. शिलगावली. चुरगळलेली चादर बाजूला केली. समोर ठणाणा सुरूच. “अण्णा ने शुरू किया अनशन”, “जन-लोकपाल पर अडे अण्णा”, “अण्णा की चेतावनी”. चला काहीतरी ‘मॅटर’ झालेला दिसतोय! उठून निदान चहा-बिहा बघायला हवा.
इंडिया ने आपले वाढवलेले केस खाजवले. जाम डोक्यात काही शिरेना. कोण बरं हा. कधी पहिला तर नाही. पण दिल्लीत ठाण मांडून आहे आणि सगळे मिडीयावाले चिवचिवाट करतायत म्हणजे नक्कीच काहीतरी इश्यू झालाय! चला उठायलाच हवं. वेफर्स पण थोडेच उरलेत. फ्रीजमधला डाएट कोक काढून धब्कन कोचावर बूड आदळले. समोर सुरूच “अण्णा की मांग”, “सरकार पर बढा दबाव”, “Anna Hajare demands people’s participation”. ब्लॅकबेरी वर सफाईदारपणे बोटं फिरली ‘whos dis Anna yaar?!’ समोरून निमिषार्धात उत्तर ‘Donno yar, letz google it’.
तोपर्यंत दिवस बऱ्यापैकी वर चढला होता. दूध टाकणाऱ्या मुलांनी दूध टाकले होते, हातगाडीवाले वजनदार हातगाडी संथपणे ओढत पुलावर चढले होते, रस्त्याचे खोदकाम सुरु झाले होते, शेतकरी ढवळ्या-पवळ्या ला हाकारत नांगरट करत होता, सिग्नलवर लिंबू-मिरची, फुलांचे गुच्छ, पुस्तक-मासिकांचे गठ्ठे घेऊन लगबग सुरु होती, रस्ते झाडले जात होते, शांताबाई पदर खोचून भांड्यांचा ढीग घासत होती.
जंतर-मंतर वर माणसं दिसू लागली. टळटळीत दुपार झाली. कष्टकरी वर्गाने डबे उघडले, रखमा शेतावर कांदा-भाकर घेऊन गेली. इंडिया ने परत msg धाडला, ‘its sumthng biggr thn wht V thoght, letz join’. समोरून उत्तर, ‘k. b redy dwn. cming in ma car’. इंडिया ने कपाट उघडले ... कोणती जीन्स या ‘इव्हेंट’ ला सूट होईल...ठीक. आता which belt....७ पट्ट्यांमधील एकाचे भाग्य उदेले. पुढे fab India चे कडक इस्त्री केलेले काही आणि मुद्दाम थोडेसे चुरगळून तयार करून ठेवलेले काही कुडते होते. ओके. या ‘अॅजिटेशन’ ला ‘मॅच’ झाला पाहिजे ना. ती ‘--- चॅनेल’ ची बेब मलाच गाठणार. so I will be on air! कपडे करता करता मनोमन - yaar Anna is doing sumthng gret but!
भारताने चहा करून घेतला. समोर सुरूच “अण्णा का अल्टीमेटम”, “शरद पवार ने दिया इस्तीफा” ... अरे हे तर आपले राळेगणसिद्धीवाले! अण्णा हजारे. भारताच्या डोक्यात काहीतरी चमकले. त्या नादात अर्धे भिजलेले बिस्कीट कपात गळून पडले. चरफडत त्याने चमचा आणला. उद्या ऑफिसात चर्चा होणार नक्की तेव्हा आता बाहेर निघण्याची तयारी करावी लागणार हे तो समजून चुकला!
इंडियाच्या घराखाली हॉर्न वाजला. इंडिया १७ व्या मजल्यावर दोन्ही लिफ्टची बटणे दाबून वाट बघत उभा होता. एक लिफ्ट १५ वर तर एक १३ वर! हातात स्क्रोल सुरूच होते. अपडेट राहायला हवे. ‘this anna is bringing revolution’! लिफ्टमध्ये महागडा पण घुसमटवणारा उंची सुवास मागे ठेऊन इंडिया गाडीत शिरला. जंतर-मंतर कडे सुसाट! ‘do u feel he wil win d battle’? ‘letz c’. जंतर-मंतर आले. घोषणाबाजी सुरु.
भारताला तर स्टेजवर कोणी हवशे-नवशे-गवशे दिसून राहिले. ‘बे हे एरवी तर त्याहिंची बाजू घेऊन भांडतेत आज काहून अण्णाले साथ करून ऱ्हायले?’ ‘मायला तो भगवी पागोटे-कफनीवाला तर लुच्चा एक नंबरी. ‘अग्नीतच प्रवेश’ करायला हवा त्याने. अण्णाला संगत करतेत!’ ते बग टी.वी.वर कोकलते. मायला सगळ्या चटक-चांदण्या, भटक-भवान्या, गॉगलवाले हिरो अण्णाला पाठिंबा देतेत. xxव्यांनो एवढी वर्षं कुठे व्हतात?
संध्याकाळ होऊ लागली. घोषणाबाजी करून घसे सुकले होते. बिसलेरी, पेप्सी, सेवन-अप् वाहिले. कोकलून कोकलून गरज भासली कोकची. ‘letz go to McDnld’, ‘no, plz yar, Anna is on fast, V wil go 2 CCD, only cofi 2de’. ‘decide fast yaar, v hav 2 join Anna, battl isnt ovr!!’. इंडियाच्या चलाख आणि तयार मित्राने झोळीतून मेणबत्त्यांचे बॉक्स आणले होते. प्रत्येकाला वाटली गेली. कँडल मार्च निघाला. Youth is united! Fight against corruption. We are with U Anna! पुठ्ठे हलत होते! रात्र व्हायला आली. अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या. सामान्य जनता वगैरे जिंकली. इंडिया आणि मित्र घराकडे निघाले. पिझ्झा घरपोच ऑर्डर झाले.
भारत विचार करत होता, अण्णांनी कसली गॅप काढली यार..वर्ल्ड कप संपला आणि आय.पी.एल. सुरु व्हायच्या मधल्या वेळात. मिडिया तर ब्लँक होती चिंतेत. साला मिडीयाला पण मसाला मिळाला. नाहीतर कुठे कळणार होतं काय जजंतरम्-ममंतरम् चालू आहे ते. ड्राफ्ट कमिटीत समावेश झाला पण कोणाचा? इतक्या सहजगत्या? बेदी कुठे राहिल्या? २-२ ‘आभूषणं’ काय करतायत? की पुन्हा एकदा तोच अदृश्य ‘हात’ या सर्व बाहुल्या सफाईदारपणे नाचवणारा? असो. झालं ते काहीतरी सॉलिडच झालं. आता हा कायदा आला की नंदनवन म्हणतात ते हेच होणार! चंदूच्या वेळी डोनेशन द्यावं लागलं, आता श्रद्धाच्या वेळी नाही द्यावं लागणार. कायदा येतोय ना! आई गेल्यावर पाण्याचा मीटर नावावर करायला वॉर्डात---...जाउदे. आता तसं नाही व्हायचं. कायदा येतोय ना! शिक्षणसम्राट झाले, साखर कारखाने होतेच, त्यांच्या वाईनरीज उघडल्या. पण उद्या बंद होणार हे सर्व. कायदा येतोय ना! पोलिसाला पावती फाडायलाच लागणार, चहापाण्यावर नाही चालायचं. कायदा येतोय ना! आर्.टी.ओ. स्वच्छ होणार. कायदा येतोय ना! भारत हर्षवायूने वेडा व्हायची पाळी आली. हे स्वप्न बघता बघता दिवसभराच्या श्रमाने तो कधी झोपून गेला त्याचं त्यालाच कळलं नाही. झोप आलीये की ग्लानी आली हेही समजण्याएवढे त्राण त्याच्यात राहिले नव्हते! रस्त्यावर पिवळा प्रकाश ओकणारे दिवे लागले होते. संधिप्रकाश पसरला होता.
हातगाडीवाले चंची उघडून गावगप्पा मारत होते, खोदकाम करून पुष्ट झालेले काळेकभिन्न बाहू बाळाला घेऊन घरी चालले होते, सिग्नलवरची दिवसभराची कमाई लहान हात मोजत होते, ढवळ्या-पवळ्या ला वैरण-आंबोण टाकून धोंडीबा ओट्यावर विसावत होता, झाडू-टोपल्या एकत्र ठेऊन कामगार हात-पाय धूत होते, शांताबाई कडोसरीच्या चुरगळलेल्या नोटा पाहत होती आणि रखमा निढळाचा घाम पुसून कंदील लावत होती.