"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, October 8, 2009

तरुण आहे कार्य(कर्ता) अजुनी...

बाल हे देशाचे भवितव्य असतात, तरुण हे देशाचे बलस्थान असते, तर प्रौढ अथवा ज्येष्ठ हे देशाची प्रतिष्ठा असतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने तरुणांचे महत्व ओळखले आहे. स्वामी विवेकानंदांनी तरुणांचे महत्व ओळखले होते. त्यांच्या कार्यवाहीच्या योजनेत त्यांनी तरुणालाच केंद्रस्थानी मानले होते. स्वामीजी म्हणतात, " अतुलनीय धैर्याने युक्त अनुशासित युवा शक्ती हीच देशाच्या भवितव्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. युवकांमध्ये ध्येयवाद असतो. ध्येयवादाला वास्तवात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात स्वत:ला झोकून देण्याची निर्भयता युवकांमध्ये असते. याशिवाय ध्येयाचा शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा करण्याचे मानसिक व शारीरिक बळ युवकाकडे असते. केवळ त्यांच्यातील ऊर्जेला दिशा देण्याची आवश्यकता असते. त्यांच्यासमोर योग्य आणि उदात्त ध्येय ठेवलं गेलं तर त्यावर श्रध्दा ठेवून अत्यंत उत्साहाने ते काम करू लागतात." (श्री. सिद्धाराम पाटील यांच्या ब्लॉगमधून (psiddharam.blogspot.com) साभार).

आपल्या देशातील राजकीय पक्षांनी ही युवाशक्ती ओळखली नसती तरच नवल! युवकांना पक्षात सामील करून घेण्यासाठी विद्यार्थी संघटना हे एक साधन समजले जाते. आणि युवकसुद्धा आपल्या राजकीय महत्वाकांक्षांना न्याय देण्यासाठी विद्यार्थी संघटनांचा उपयोग करून घेतात हे सर्वश्रुतच आहे.या विद्यार्थी संघटना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांची जडण-घडण याबाबत खरंच किती विचार करतात हा प्रश्नच आहे. प्रत्येक मोठ्या पक्षाची त्या पक्षाशी संलग्न अशी विद्यार्थी संघटना आज अस्तित्वात आहे. नवीन पक्षसुद्धा आपली विद्यार्थी संघटना असावी म्हणून प्रयत्नशील असतात। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थी संघटनेत सामील करून घेण्याची अहमहमिकाच लागलेली असते. त्यातून वाद आणि हाणामारीसुद्धा होते. माझ्या कॉलेज जीवनात मी या सर्वाचा साक्षीदार आहे...मूक साक्षीदार नव्हे, तर सहभागी साक्षीदार!

विद्यार्थी संघटनांमधून विद्यार्थी नेतृत्व तयार होते ही खरी गोष्ट आहे. परंतु निकोप वातावरण न राहता सध्या गोष्टीही विकोपाला जातात हेही तितकेच खरे. राजकीय पक्षांनी विद्यार्थी संघटनांना प्रोत्साहन देण्यामागे त्यांचा उद्देश स्पष्ट असतो. त्यांना एकतर जास्त विचार न करणारी, तत्पर, तडफदार अशी तयार फौज मिळत असते आणि नेतृत्वनिर्मितीही होत असते. हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीत तरुणांकडे पुरेशा प्रमाणात पैसा, वाहन, वेळ, एखादे फुटकळ पद या गोष्टी असतात. त्यामुळे असे तरुण लगेच उपलब्ध होऊ शकतात. पण कोणत्या गोष्टींसाठी ते उपलब्ध केले जातात ह्यावर विचार होतो का?

लोकसभेतील रालोआच्या पराभवाला आणि संपुआच्या विजयाला वृध्द विरुद्ध तरुण ह्याही परिमाणाचे कारण होते. परंतु रालोआने त्याला परिपक्व विरुद्ध अवखळ असे स्वरूप दिले होते. जनतेने कौल दिला. ह्यातून सर्वांनीच धडा घ्यायला हवा. नाहीतर "तरुण आहे कार्य(कर्ता) अजुनी...रालोआ निजलास का रे" असं म्हणावं लागेल. हळुहळू वृद्धत्वाकडे झुकणारे नेते शीर्षस्थ पदावर राहून संपूर्ण पक्षाला आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छित असतील तर ते कधीच साध्य होणार नाही, कारण तरूण तुर्कांना म्हातारे अर्क आपल्या मुठीत ठेवू शकत नाहीत। त्यापेक्षा योग्य वेळ येताच त्यांनी सन्मानाने उच्च पदावरून पाय उतार व्हावे आणि ‘सांगेन युक्तीच्या चार’ या भूमिकेत शिरावे. 'काँग्रेसने तरुण नेतृत्वाला संधी दिली' हे जर राहुल गांधींकडे बघून आपण म्हणणार असू तर ते चूक ठरेल कारण तो काँग्रेसच्या घराणेशाहीचा स्वाभाविक आविष्कार आहे.
परंतु तरीही संपुआने ज्योतिरादित्य सिंधिया, पायलट, अगाथा संगमा, मिलिंद देवरा अशा अनेकांना लोकसभेत जिंकून आणून एक तरुण नेतृत्वाची फळीच उभी केली आहे. यातील बहुतेकांच्या मागे त्यांच्या घराण्याचे नाव असले तरीही हे तरुण नेतृत्व आश्वासक आहे। या चौदाव्या लोकसभेतील खासदारांचे सरासरी वय ५२.७ आहे. तर २५ ते ४० या वयोगटातील सदस्यांचे प्रमाण १५% आहे जे १४व्या लोकसभेत केवळ ६.३% होते. आणि ७१ ते १०० या वयोगटातील सदस्यांचे प्रमाण ११.७% वरून केवळ ७% आले आहे. अखिल भारतीय स्तरावर झालेला हा बदल स्वागतार्ह आहे. (pic courtesy: greathindu.com)

संसदेतील या बदलाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बदल होणार का? महाराष्ट्रसुद्धा तरूण नेतृत्व पाहील का, हे विधानसभेचे निकालच सांगू शकतील. मनसे च्या स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग राजकारणात सक्रिय झाला हे मान्य करावेच लागेल. विघातक की विधायक हा वाद-प्रतिवाद करण्याचा मुद्दा होऊ शकेल, परंतु तो नंतरचा मुद्दा आहे. मनसेच्या स्थापनेतून तरुणांचे राजकीयीकरण (politicization of youth) मात्र झाले. तरुण राजकीय मुद्यांवर तावातावाने बोलू लागले, आपली मते मांडू लागले, वेळप्रसंगी शक्तिप्रदर्शन करू लागले. या तरुणांना विधायक कामांमध्ये जोडायला हवे. परंतु कदाचित तसे होताना आत्ता दिसत आहेत तेवढे तरुण दिसणार नाहीत. त्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, कारण हुल्लडबाजी करणे सोपे असते पण नि:स्वार्थ बुद्धीने काम करणे कठीण असते. त्यामुळेच प्रसिद्धीपासून लांब राहून आपले काम करत राहणार्या सामाजिक संस्थांमध्ये तरूण कमीच दिसतात. समाजकारणात नाही तर नाही, परंतु विधायक राजकारणात तरूणांची संख्या वाढली तरी चित्र समाधानकारक असेल. अन्य राजकीय पक्ष मनसेकडे जाणारा तरुण वर्ग पाहून नक्कीच धास्तावले आहेत. युवक काँग्रेस, भा.ज.यु.मो. आणि तत्सम सर्वांनाच आपल्या रणनीतीची फेररचना करावी लागणार आहे।

येणारा काळ हा भारतासाठी मोठ्या प्रमाणावर युवाशक्ती पुरविणारा असेल असे म्हटले जाते. लोकसंख्येच्या पोतानुसार (pattern) तरुणांचे प्रमाण लक्षणीय होणार आहे. त्यामुळे कार्यशक्ती तर वाढेलच, परंतु राजकीय क्षेत्रातही बदल होतील. तेव्हा त्यादृष्टीने आत्तापासून पावले उचलणारा यशस्वी ठरेल.

4 comments:

  1. shabbas Vikram! this writing seems to be out of Ganavesh.

    ReplyDelete
  2. Good Vikram,
    You have given food to think over for young generation

    ReplyDelete
  3. लेखाचा दर्जा आणि विचार उत्तमच आहेत. परंतु तरुणांना जशी दिशा योग्य हवी तशीच लेखालाही ! लेखाला एक "शेवट" द्यायचा राहून गेला असं मला वाटतं. पण विचार उत्तम !!!
    चित्र नुसतंच टाकलंयस पण फार बोलकं आहे . आवडलं, माझ्या हे लक्षात आलं नव्हतं!

    ReplyDelete