"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, November 8, 2018

अनामवीरा ७ - वीर सुरेंद्र साई


७. वीर सुरेंद्र साई

पारतंत्र्यातील हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी सर्वच प्रांतांतील क्रांतिकारक आपापल्या शक्तीनुसार क्रांतिकार्य करत होते. आपण आजवर अनामवीरा या मालिकेतून प्रामुख्याने महाराष्ट्र आणि बंगाल प्रांतातील अल्पख्यात क्रांतिकारक पाहिले आहेत. आज जरा ओरिसाकडे जाऊ. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले एक राज्य. मोठ्या राज्यांच्या भाऊगर्दीत दुर्लक्षित राहिलेले राज्य. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत  म्हणजे १९४७ ते २०१८ या कालावधीत संपूर्ण राज्यात केवळ एकच विमानतळ होता. सप्टेंबर २०१८ ला झरसुगुडा इथे राज्यातला दुसरा विमानतळ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केला. त्याला वीर सुरेंद्र साई विमानतळ हे नाव देण्यात आले आहे. केवळ आपणच नव्हे तर भारतातील अनेकजणांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले. त्यामुळे आजचे आपले अनामवीर तेच आहेत – वीर सुरेंद्र साई.
इंग्रज जेव्हा आपला जम भारतात बसवू पाहत होते तेव्हा सामान्य जनता तर यथाशक्ती प्रतिकार करत होतीच पण भारतातील आधीपासून अस्तित्वात असलेली काही राजघराणीसुद्धा इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारण्याचा सोपा मार्ग अव्हेरून  इंग्रजांना जशी जमेल तशी टक्कर देत होते. ओरिसातील चौहान राजघराणे इंग्रजांना सामील झालेले नव्हते, पण त्यांचे संबंध तेवढेही ताणले गेले नव्हते. या घराण्यातील चौथे राजे मधुकर साई १८२७ ला निपुत्रिक म्हणून निवर्तले. इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईच्या बाबतीत जे केले तसेच याही प्रकारात झाले. त्यांनी मोहन कुमारी या राणीला राज्यपदी बसवले. या साऱ्या प्रकाराला सुरेंद्र साईचा प्रखर विरोध होता. स्वतः राजघराण्यातील असल्याने डावलले जाणे त्याला मान्य नव्हते. इंग्रजांच्या कुटील नीतीचा त्याला पूर्ण अंदाज आला होता. राज्य खालसा करण्याच्या दृष्टीने इंग्रजांनी उचललेल्या पावलांना वेळीच प्रतिरोध केला नाही तर ते आपले राज्य गिळंकृत करणार याबद्दल सुरेंद्रच्या मनात तिळमात्र संशय नव्हता.
राणी मोहन कुमारीच्या जमीन महसूलविषयक धोरणाचा गोंडी, बिन्झाल अशा जनजातीतील, वनवासी लोकांना आणि जमीनदारांना जाच होऊ लागला. इंग्रजांनी मोहन कुमारीची उचलबांगडी केली आणि तिच्या जागी नारायण सिंगाची नेमणूक केली. सुरेंद्रच्या जखमेवर मीठच चोळले गेले. त्याचा अधिकार पुन्हा एकदा नाकारला गेला होता. सुरेंद्रने जनजातीतील लोकांना संघटित करायला आणि त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष भडकवायला सुरुवात केली. नारायण सिंगाच्या राजवटीत बंड झाले. इंग्रज फौजांविरुद्ध लढत असताना सुरेंद्र, त्याचा भाऊ उद्यंत साई आणि त्यांचे काका बलराम सिंह यांना पकडण्यात आले. त्यांची रवानगी हजारीबाग तुरुंगात करण्यात आली. बलराम सिंहाचा तिथेच कारावासात मृत्यू झाला. इथे नारायण सिंग सुद्धा १८४९ मध्ये मरण पावला. तोही निपुत्रिक मरण पावल्याने पुन्हा सुरेंद्रचा अधिकार निर्माण झाला. लॉर्ड डलहौसी ने १८४९ ला संबलपूर चे राज्य इंग्रजी साम्राज्याचा भाग बनवले.
सुरेंद्र कारावासात असल्याने काही करू शकला नाही, पण लवकरच संधी चालून आली आणि १८५७ चा उठाव झाला. या उठावाचा भाग म्हणून उठावात भाग घेणाऱ्या लोकांनी हजारीबाग चा तुरुंग फोडला आणि त्यातून सुरेंद्र आणि उद्यंत या दोघांचीही सुटका झाली. त्यांच्याबरोबर जवळपास ३२ जणांची सुटका करण्यात आली. सुरेंद्रने संबळपूर च्या सामान्य जनतेला इंग्रजांविरुद्ध संघटित करायला पुन्हा एकदा सुरुवात केली. वनवासींची भाषा, भूषा, रीतीरिवाज यावर इंग्रज घाला घालतच होते. सुरेंद्रने त्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करायला सुरुवात केली. जनता संघटित होऊ लागल्याचे पाहून इंग्रजांनी आपले कुशल सेनाधिकारी संबळपूर ला पाठवायला सुरुवात केली. मेजर फॉर्स्टर, कॅप्टन एल. स्मिथ हे असे अधिकारी होते ज्यांच्या नावावर भारतातील इतर ठिकाणचे उठाव यशस्वीरित्या मोडून काढण्याचे यश जमा होते. हे अधिकारी इंग्रजी सैन्यासह संबळपूर ला येऊन डेरेदाखल झाले. मेजर फॉर्स्टर ला पूर्ण लष्करी व मुलकी अधिकारी देऊन त्या भागाचा कमिशनर बनवण्यात आले होते. पण सुरेंद्रने त्याच्या हाती काहीच लागू दिले नाही. शेवटी १८६१ ला मेजर फॉर्स्टर ला हलवण्यात आले. नंतर आलेल्या मेजर इम्पे ने सुद्धा खूप प्रयत्न करून पाहिला, पण स्थानिकांची मजबूत साथ असेलला सुरेंद्र इंग्रजांना चकवतच राहिला. मेजर इम्पे ने आधीच्या धोरणात बदल केला. त्याने रसद तर तोडलीच पण त्याचबरोबर हिंसक लढाई सोडून संवाद आणि वार्तालाप सुरु केला. हे अर्थातच त्याने इंग्रज सरकारच्या संमतीने सुरु केले. हा लष्करी डावपेचाचा एक भाग म्हणून तो करत होता हे सुरेंद्र च्या लक्षात आले नाही. तो एक सच्चा वनवासी होता. निसर्गपूजक, निसर्गात रममाण होणाऱ्या सुरेंद्र ला हे कुटील डावपेच कळले नाहीत ह्यात फारसे नवल काही नाही. इम्पे च्या आश्वासनांवर विसंबून सुरेंद्र ने लढाई थांबवली. उत्तम तलवार चालवणारा सुरेंद्र शांततेत राहू लागला. मेजर इम्पेच्या मृत्यूपर्यंत हे चालू राहिले. पण इम्पेचा मृत्यू झाला आणि ताबडतोब सरकारने पुन्हा लढाई तीव्र केली. नव्याने तयार केल्या गेलेल्या मध्य प्रांतात (Central Province) ३० एप्रिल १८६२ ला संबळपूर चा समावेश करण्यात आला. गाफील आणि बेसावध असलेल्या सुरेंद्र ला, त्याच्या साथीदारांना आणि नातेवाईकांना इंग्रज सेनेने अगदी सहज पकडले. विश्वासघात करून त्यांना असीरगड च्या तुरुंगात पाठवण्यात आले. २३ मे १८८४ ला सुरेंद्र साई चा मृत्यू असीरगड च्या तुरुंगातच झाला. संबळपूर हा शेवटी शेवटी इंग्रजांच्या अधिपत्याखाली आलेला भारताचा भाग. त्याचे कारण म्हणजे वीर सुरेंद्र साई ने चेतवलेले जनमानस.
साई ला संबळपूरच्या प्रदेशातील लोक ‘बीरा’ या नामाभिधानानेच ओळखतात. बीरा म्हणजेच वीर! ओदिशाच्या जनतेचा हा नेहमीच आरोप आहे की इतिहासकार, प्रशासन, लेखक इत्यादींनी वीर सुरेंद्र साईवर नेहमीच अन्याय केलाय. त्याच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी प्रसिद्धी त्याला कधीच मिळाली नाही. ओडिशा सरकारने २००९ मध्ये राज्यातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नामकरण वीर सुरेंद्र साई युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी असे केले. २००५ मध्ये त्यांचा पुतळा संसद भवन आवारात बसवण्याचे ठरविण्यात आले. त्यांच्या नावे पोस्टाचे तिकीट काढण्यात आले आहे. आणि लेखाच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे ओरिसामधील दुसऱ्या विमानतळाला वीर सुरेंद्र साई चे नाव देण्यात आले आहे.



संदर्भ:-
१.      वीर सुरेंद्र साई – एन.के.साहू
२.      पश्चिम ओरिसा अग्रणी संगठन प्रकाशित वीर सुरेंद्र साई – सी. पसायत