वाचता-वाचता येणारी झोप ही सर्वोत्तम असते हे तर खरेच; पण
झोपच उडवणारे पुस्तक म्हणजेच उत्तम पुस्तक हेही तितकेच खरे!
गेल्या आठवड्यात मी हे पुस्तक पूर्ण केल्याच्या रात्री शांत
झोपू शकलो नाही. आणि तेव्हाच निश्चित केले की आपल्या वाचकांपर्यंत, विचार करणाऱ्या
लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवायचे.
लेखकाचा आणि माझा पूर्वपरिचय नाही. मी पुस्तकातील पात्रांना
भेटलेलो नाही. पण महानाट्य काय असू शकते आणि ते किती भयानक असू शकते याची केवळ
कल्पना पुस्तक वाचल्यावर येते. लेखक विक्रम विनय भावे. एक संसारी मराठी हिंदू
तरुण. एका चित्रपटगृहाबाहेरच्या झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल आरोपी. सध्या जामिनावर
बाहेर.
कारागृहात असताना लेखकाचा अगदी जवळून सबंध येतो मालेगाव
स्फोटासंदर्भात आरोपी असलेल्या हिंदू आणि मुस्लिम बंद्यांशी. लेखक हा त्यावेळी
लेखक नसतो. सहबंदी असतो. त्याला लेखनाचा पूर्वानुभव असावा असे शैलीवरून वाटते पण
तसा उल्लेख कोठे नाही. सहज गप्पा म्हणून विषय निघतात आणि लेखकासमोर एक प्रचंड मोठे
महानाट्य उलगडत जाते. हिंदू आरोपी मेजर श्री. रमेश उपाध्याय, लेफ्टनंट कर्नल श्री.
प्रसाद पुरोहित, श्री. समीर कुलकर्णी, श्री. राकेश धावडे, श्री. अजय राहिरकर,
श्री. शाम साहू, श्री. शिवनारायण कलसंग्रा, श्री. जगदीश म्हात्रे आणि शंकराचार्य
स्वामी यांच्याबरोबर एकाच अंडासेल मध्ये
व्यतीत केलेला काळ अन् कालांतराने तिथे आलेले मुस्लिम आरोपी उदा. डॉ. फारूक इकबाल
अहमद मगदूमी या सर्वांमुळे या नाट्याचे धागे जुळत जातात. एक अदृश्य चित्र
स्पष्टपणे समोर येऊ लागते. कारागृहातून जामिनावर बाहेर पडल्यानंतर प्रस्तुत
लेखकाला माहिती अधिकाराच्या अर्जांवर काही माहिती मिळते, आरोपींच्या वकिलांची भेट
होते, जुने रेकॉर्ड्स चाळता येतात, अन्य व्यक्तिंना भेटता येते आणि मग
परिश्रमपूर्वक या सर्व सामग्रीवर पुस्तकाची निर्मिती होते.
हे पुस्तक हे केवळ पुस्तक नाही, ती एक व्यथा आहे. अनाकलनीय
वाटणारे सोपे करून सांगण्याची केलेली शर्थ आहे. पहिल्याच प्रकरणात लेखक
लिखाणामागची भूमिका तर स्पष्ट करतोच पण हेही सांगतो की त्याने सत्याशी प्रतारणा न
करता, ऐकीव माहितीपेक्षा कागदपत्रांवर अधिक भर देऊन निर्भीडपणे ते वाचकांसमोर
मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसऱ्या प्रकरणात मालेगाव प्रकरणातील आरोपींची भेट कशी झाली
याचा उल्लेख करून एक आरोपी श्री. समीर कुलकर्णी यांनी कारागृह प्रशासनाकडे
‘रक्तदानाच्या परवानगीची मागणी’, ती धुडकावून लावल्यावर त्यांनी पत्राद्वारे उच्च
न्यायालयात केलेली याचिका, मेजर रमेश उपाध्याय यांचे कारागृह प्रश्न
सुधारण्यासाठीचे प्रयत्न यांची नोंद आहे.
तिसऱ्या प्रकरणापासून पुस्तक मनाची पकड घ्यायला लागते. यात
पात्रपरिचय आला आहे. अगदी इथूनच आपण पुस्तकाशी समरस व्हायला सुरुवात होते. जणू
पहिल्या रांगेत बसून पाहतोय असे. संस्कृतमधे एम.ए. केलेले सुधाकर चतुर्वेदी
कारागृहातच या बंद्यांना कालिदासाचे मेघदूत रंगवून सांगत होते. लेखकाला हे समीकरण
कळेना. हळव्या मनाचा, विद्वान, सुसंस्कृत माणूस अन् मानवतेला काळिमा फासणाऱ्या
बॉम्बस्फोटाच्या आरोपावरून तुरुंगात? म्हणून विक्रमजी सुधाकर चतुर्वेदींना विचारते
झाले आणि पाचव्या प्रकरणात ए.टी.एस. ने कशाप्रकारे फसवून त्यांना ताब्यात घेतले
याचा उहापोह आला आहे. कुणी बागडे नावाच्या अधिकाऱ्याने आणि त्यांच्या ४-५ धटिंगण
सहकाऱ्यांनी पकडून सुधाकरजींना शिव्या देत, कानाखाली मारून जीपमध्ये कोंबले.
पुन्हा शिव्या हासडत म्हणाले “मादरचोद, बॉम्बस्फोट करता काय? आता तुझ्या गांडीत
बॉम्ब लावतो, सगळी आय-माय आठवेल तुला भडव्या.” हात-पाय बांधून लाथाबुक्क्यांनी
तुडवत पोलीस स्टेशनात नेले. पुढची २ पाने हा अत्याचार वाचवत नाही अशाप्रकारचा आहे.
हवे ते जबाब काढून घेण्यासाठी मारहाण, त्याचे प्रकार आणि मारणारे अधिकारी यांचा
नावासकट उल्लेख आला आहे. कोरे कागद पुढ्यात ठेऊन बळजबरीने साक्ष द्यायला लावली,
खोटे पंचनामे तयार केले, अंगावरचे सर्व कपडे फाडून टाकले या गोष्टी कपोलकल्पित वाटत
नाहीत.
पुढे तर मुंबई ते भोपाळ हा विमानप्रवास कसा खोट्या नावाने
म्हणजे सुधाकर चतुर्वेदीला ‘संग्रामसिंग’ दाखवून केला गेला. ते विमान ‘इंडिया
बुल्स’ या खाजगी कंपनीचे सात आसनी विमान होते. भोपाळ ला सुधाकरजींना समीर
कुलकर्णीला फोन करायला लावला. त्याला फसवून ताब्यात घेतले आणि परतीच्या प्रवासातसुद्धा
‘संग्रामसिंग’ ही खोटी नोंद करून तशी बनावट कागदपत्रे ए.टी.एस. च्या
अधिकाऱ्यांनी सादर करून मुंबई गाठली. परतीला सुद्धा ‘इंडिया बुल्स’ कंपनीचे तेच सात
आसनी विमान होते. ही सर्व माहिती ए.टी.एस. च्या त्या अधिकाऱ्यांच्या नावांसकट
माहिती अधिकारात उघड झाली आहे. वास्तविक ह्यात खाजगी कंपनी कशी आली? कोणाच्या
इशाऱ्यावर हे सर्व चालू होते? ‘इंडिया बुल्स’ आणि त्याच्या मालकांची/अधिकाऱ्यांची
या सर्व प्रकारात चौकशी व्हायला नको का? ए.टी.एस. चे अधिकारी मिंधे झाले होते काय?
त्यांना कुणाची भीती वाटत होती? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता? न्यायालयाने ‘इंडिया
बुल्स’ आणि असे कर्तव्यच्युत अधिकारी यांजकडे खुलासा मागून सखोल चौकशीचे आदेश
द्यायला हवेत की नको? ही सर्व प्रश्नांची जंत्री वाचकाच्या डोक्यात फिरत राहते..
चतुर्वेदींना अटक झालीये २०.११.२००८ रोजी..पण त्यांची ब्रेन
मॅपिंग ची चाचणी मात्र ११.११.२००८ रोजी करण्यात आली. काय ही तत्परता! कोणाच्या
इशाऱ्यावर?
चतुर्वेदींनी तर सरळच कोर्टाकडे केलेल्या याचिकेत म्हटले
आहे की आपले अपहरण करून आपल्याकडून घराच्या किल्ल्या काढून घेण्यात आल्या आणि ए.टी.एस.
चे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बागडे यांनी आर.डी.एक्स. मिश्रित माती तेथे
टाकली आणि याच मातीचा पुढे पंचनामा करून बॉम्ब तिथेच बनवल्याचा सपशेल खोटा पुअरावा
तयार करण्यात आला. बागडे यांची चौकशी कसून व्हायला नको का? इंडिया बुल्स चे विमान
अटकेआधीच कसे वापरायला मिळते याचा खुलासा व्हायला नको का?
असे वेचक, अचूक आणि वाचकाच्या मनात रुतणारे १४ मुद्दे देऊन
लेखक पुढे सरकतो. ७ व्या प्रकरणात मुस्लिम आरोपींच्या कथा-व्यथा आल्या आहेत. लेखक
प्रकरणाची सुरुवात आपल्याशी निगडित खटल्यातील साक्षीदाराचे उदाहरण देऊन करतो. शरद
बळीद या इसमाला पोलिसांनी साक्षीदार म्हणून उभा केले. त्याने हिंदू असल्याचे
सांगितले. पण उलटतपासणीत त्याने बरेच आढेवेढे घेऊन मग ख्रिश्चन असल्याचे मान्य
केले. शिवाय चर्चच्या आवारात आपण राहतो याचीही कबुली त्याने दिली. ख्रिस्ती
धर्मांतरणाला विरोध करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्याच्या भूमिकेतून
त्यांना गोवणे हा शरद बळीद चा हेतू असावा हा लेखकाने दिलेला तर्क नाकारता येत
नाही. मा. न्यायालयाने या शरद ची साक्ष रद्दबातल ठरवली. पुढे लेखक कोल्हापूरला
गेल्यावर त्याच्या लक्षात आले की शरद बळीद हा पोलिसांचा आवडता साक्षीदार आहे.
कित्येक प्रकरणांत त्याने साक्षीदाराची आणि पंचाची निर्णायक भूमिका निभावली आहे
आणि ते गरीब बिचारे आरोपी अशा पुराव्यांच्या आधारे आज तुरुंगवास भोगत आहेत. या
पार्श्वभूमीवर मुस्लिम आरोपींना सुद्धा फसवून गोवल्याचे लेखक विविध तर्कांच्या आणि
माहितीच्या आधारे निर्भेळपणे स्पष्ट करतो. मुस्लिम आरोपींची कारागृहातील वागणूक,
त्यांची धर्मनिष्ठ आणि प्रेमळ वागणूक, डॉ. फारूक इकबाल चे कैद्यांना वाटणारे
आधाराचे स्थान, आणि स्वतः मिळवलेली कागदपत्रे, कायद्याची माहिती, सहाय्यभूत
न्यायनिवाडे उदार मनाने आणि मोकळेपणाने हिंदू सहबंद्यांना देणे याचाही उल्लेख आला
आहे. मालेगाव प्रकरणात गोवले गेलेले हे मुस्लिम आरोपी आपले सहबंदी हिंदू आरोपी
न्यायालयातून पुन्हा आल्यावर उत्कंठेने विचारत असत की आज काय काय झाले.. माझ्यामते
हे मुस्लिम आरोपी आज जामिनावर बाहेर आहेत.
पुढे कर्नल श्री. पुरोहित, बेपत्ता दिलीप पाटीदार चे गूढ, मेजर
श्री. रमेश उपाध्याय यांच्यावरील आरोप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील आरोप, साध्वी
प्रज्ञासिंग अशा अनेक पैलूंचा धांडोळा लेखकाने घेतला आहे.
साध्वीवरील पोलिसी अत्याचारांची परिसीमा तर रक्त खवळून
टाकते. तिला आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा न पुरविण्याबरोबरच तिला संभोगाच्या
अश्लील चित्रफिती दाखवण्यात आल्या आणि नृशंस मारझोड करण्यात आली या बातम्या केवळ ऐकीव
नसाव्यात. साध्वी प्रज्ञासिंगला अजूनही जामीन मिळू नये आणि कारागृहात पिचत
राहण्याची सत्वपरीक्षा तिला द्यावी लागावी यापरतें अधिक दुर्दैव ते कोणते!
साध्वीवर कारागृहातीलाच एका मुस्लिम महिलेने केलेल्या हल्ल्याची दखल घेतली जात नाही.
पण सिमीच्या काही सदस्यांनी भारतविरोधी घोषणा देऊन एका तुरुंग कर्मचाऱ्याला मारहाण
केली त्याबाबत तुरुंगाधिकारी स्वाती साठे यांनी कडक पावले उचलताच काही निवडक अधिकाऱ्यांना
गृहमंत्रालयाने बोलावून घेऊन सज्जड दम भरला आणि ‘स्वाती साठे यांना अडकवा’ असे
सांगितल्याची कुजबूज लेखकाच्या कानावर येत असे. याच स्वाती साठेंवर बिलाल नाझकी या
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ठपका ठेऊन खटला चालवायला दिला आणि
साठेंविरुद्ध निकाल दिला. हे निकालपत्र सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढले. स्वाती
साठे यांच्यावर दोषारोप करणाऱ्या पाकिस्तानवादी कैद्यांची बाजू श्री. नाझकी यांनी
का घेतली असावी? नाझकी यांनी काश्मिरात लढणाऱ्या भारतीय जवानांविरुद्ध गरळ ओकण्याचे
कारण काय? श्री. नाझकी यांचे धोरण कोणाला धार्जिणे आहे? असे प्रश्न लेखक उपस्थित
करतो. याची सखोल चौकशी व्हायला हवी.
लेखक साहित्यिक ताकदीने विषयाला भिडतो – “चतुर्वेदी
यांनी केलेली याचिका व सैन्यात असलेली अस्वस्थता, यांमुळे राष्ट्रीय तपास
यंत्रणेला कोंबडे झाकून सूर्याचे उगवणे थांबविण्याच्या आपल्या सत्यद्रोही
खटाटोपातील व्यर्थता एक दिवस निश्चितपणे जाणवेल.”
या पुस्तकात असे अनेक पैलू आले आहेत ज्या सर्वाचीच नोंद मी
इथे करणार नाही. पण हे पुस्तक सर्व विचार करणाऱ्या, चिंता करणाऱ्या सुजाण नागरिकांनी
वाचायला हवे. शरद पवारांनी पुण्यातील भाषणात दहशतवादाचे उघडपणे केलेले समर्थन,
इफ्तार पार्ट्या झोडणारे आपले नेते, हज अनुदान बंद करा असे सर्वोच्च न्यायालयाने
निकाल देऊनही नवीन हज हाऊसेस बांधणारे सरकार, मदरशांवर कोट्यवधींची खैरात उधळणारे
दळभद्री राज्यकारभारी, भाषणांनी हिंदू आणि मुस्लिम जनतेला चिथावणी देणारे हिंदू
आणि मुस्लिम ‘स्वयंघोषित’ नेते हे असे सर्वजण अजूनही अदृश्य राहू शकतील? अस्वस्थ
करणारे प्रश्न...
पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ
पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क करा – गुरुकृपा प्रतिष्ठान,
द्वारा – हिंदू विधिज्ञ परिषद, ३०५, बिर्या हाऊस, पेरिन नरीमन रस्ता, बाजारगेट
फोर्ट, मुंबई – ४००००१. मो. ९२०९१७०४४५.
आणि हो, आपल्या प्रतिक्रियांची प्रतिक्षा मला आहेच, नेहेमीप्रमाणे...
आणि हो, आपल्या प्रतिक्रियांची प्रतिक्षा मला आहेच, नेहेमीप्रमाणे...