"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Saturday, August 24, 2013

नरेंद्र दाभोळकरांची हत्या आणि शरद पवार…

कै. नरेंद्र दाभोळकरांच्या दुःखद निधनानंतर मी माझ्या फेसबुक भिंतीवर खालीलप्रमाणे ‘कॉमेंट’ केली होती.
दाभोळकरांची हत्या आणि शरद पवार… 

कै. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येने कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे निश्चित आहे पण सर्व जनतेला आठवते आहे की, महाराष्ट्रातील दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम श्री शरद पवार थोड्याच दिवसांपूर्वी आपल्या वक्तव्याने केले होते…दहशतवाद्यांची बाजू घेऊन त्यांना एक प्रकारची मोकळीकच शरद पवारांनी दिली होती (पुणे येथील भाषण !)
माझे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र आवाहन आहे की जर खरीच इच्छाशक्ती असेल तर इथे तिथे फुकटचे वायबार न काढता शरद पवारांवर खटला भरावा कारण कुणाही सूज्ञाला पुणे येथील त्यांचे दहशतवाद्यांची बाजू घेणारे भाषण आणि कालची धडक कृती याचा सबंध नाकारता येईल???

ज्यावर मोजक्या प्रतिक्रिया आल्या व जवळपास २५ जणांनी आजमितीस ‘लाईक’ केले आहे.परंतु खाजगीत अनेकजणांनी याबाबतीत बोलणे केले. काहींनी नापसंती दर्शविली, काहींनी टीका केली, प्रश्न विचारले, तर्क जाणून घेतला, तर बरेच जणांनी सहमती दर्शवली. पण या सर्वामुळे ती प्रतिक्रिया विस्ताराने विषद करावी असे वाटले आणि त्यामुळे हा लेखनप्रपंच.

दहशतवाद हा एकच प्रकारचा नसतो. स्फोटके, शस्त्रहल्ले इथपासून ते वर्गात मुख्याध्यापकांच्या पाऊलांची चाहूल लागताच धाकाने, दहशतीने चिडीचूप होणारी चिमणी पाखरं, हप्ते वसूल करणारे, वाळूमाफिये, गल्लीचा दादा, वर्गणीखोर या सर्वांची दहशतच असते. दहशतवादाला आर्थिक (व्यापारीवर्गाद्वारे), धार्मिक (जिहाद), भौगोलिक (सीमावाद), राजकीय (निवडणुका-हत्या), जातीय (जात-पंचायती) अशी अनेक कारणे असतात. बॉम्बस्फोट झाला की, आम्ही नेहमीच उच्चरवाने ऐकतो बुआ, ‘दहशतवादाला धर्म नसतो, रंग नसतो वगैरे; पण हिंदुत्वाला दहशतवादाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या ढुढ्ढाचार्यांनाही आम्ही नेहमीच पाहतो. असो.

तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींचे दोन संच पकडण्यात आले. एक हिंदू तर एक मुस्लीम. दोघांवरही अजून गुन्हे सिद्ध झालेले नाहीत. पण मुस्लीम युवकांची सुटका करण्यात आली अन् साध्वी प्रज्ञासिंह वगैरे हिंदू गटातील आरोपी (तेही अद्याप निर्दोषच आहेत) मात्र अजूनही तुरुंगातच आहेत. मुळात आधी हा प्रचंड जटिल प्रश्न आहे की, सरकारने दोन विविध तपासयंत्रणांकडे हा तपास वेगवेगळ्या वेळी का सोपवला – NIA (National Investigation Agency) आणि ATS-MH ( Anti Terrorism Squad, Maharashtra). त्यामुळे तपासाचे तीनतेरा तर वाजलेच पण सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. राज्यकर्ते मोकाटच राहिले आपल्या फायद्यासाठी या तपासाचा वापर करून घ्यायला. आणि त्याचीच परिणती ही शरद पवारांनी अक्कलहुशारीने आपली स्वार्थाची पोळी भाजून घेण्यात केली.
पुण्यामध्ये दि. १० ऑगस्टच्या आसपास भाषण करताना ते म्हणाले की,

 . त्यांची मजल हे म्हणण्यापर्यंत गेली की त्यांनी का या देशाकडे आपला देश म्हणून बघावं? आता अशाप्रकारे दहशतवादाचे अथवा समाजाविरुद्ध घातक काम करण्याचे समर्थन कोणी करणार असेल आणि तेही आमच्यासारख्या कुणी ‘सोम्यागोम्या’ नव्हे तर महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय कृषिमंत्री राहिलेला-असलेला माणूस, तर मग कोणाचे मनोधैर्य उंचावणार नाही हो?!

शिवाय ‘दहशतवादाला धर्म तर नसतोच’ ही बांग आम्ही दिवसातून ५-५ वेळा ऐकतो त्यामुळे पवारांनी केलेले विधान हे समाजातील तद्दन दहशतवादी शक्तींना खतपाणीच होते हे निखालस सिद्ध आहे, जिथे अशाप्रकारे मोकळीक मिळते अथवा दहशतवादाचे स्पष्टीकरण होते तिथे दहशतवादाने डोके वर नाही काढले तरच नवल! म्हणजे गरम तेलात फोडणी टाकायची अन् वर तडतडू नये म्हणून कल्पना करायची हा कोणता शहाजोगपणा?

निश्चितच पवारांनी पुण्यात केलेल्या या अदाकारीमुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढल्याचे कोणीही सांगू शकेल. राज्ययंत्रणाच पाठीशी आहे म्हटल्यावर कोण चिंता करतो हो?

कै. नरेंद्र दाभोळकरांची वैचारिक पार्श्वभूमी काय होती, त्यांचा हिंदुत्वाला विरोध होता अथवा नाही; त्यांनी ख्रिश्चन, मुस्लीम संप्रदायातील अंधश्रद्धांवर सोयीस्कर मौन राखले अथवा कसे यासबंधी प्रस्तुत लेखात बोलणे हे विषयांतर होईल; परंतु नरेंद्र दाभोळकरांची हत्या हा निखालसपणे दहशतवाद आहे, कारण ज्या कृत्याने जनसामान्यांच्या मनात प्रथमतः भीतीचे आणि मग रागाचे वातावरण तयार होते – तो दहशतवाद!

नरेंद्र दाभोळकर हे कोण होते हा भाग इथे तितकासा महत्वाचा नाही. ते कुणी तुका बाजी पाटील, रंगा भिवा म्हात्रे अथवा जिवा हरी देठे असा सामान्य अनोळखी, अपरिचित माणूस असता तरीही हा दहशतवादच ठरला असता.

त्यांच्या हत्येचे कारण हे त्यांची अंधश्रद्धाविषयक कामगिरी, धर्मविचारांचे प्रतिपादन याच्याशी सबंधित आहे अथवा मालमत्ता वाद, आर्थिक बाब, मानापमान असे अन्य काहीही आहे यावरूनसुद्धा ‘दहशतवाद’ आणि त्याची भीषणता यात तसूभरही फरक पडत नाही.

याहीपलीकडे अगदी टोकास जाऊन म्हणायचे तर मारेकऱ्यांनी दुसरेच कुणी समजून चुकून नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या घातल्या असल्या तरीही तो दहशतवादच!
तेव्हा दहशतवादी कृत्य तर होय आणि करणारे कोणीही वर उल्लेखिलेल्या विविध शक्याशक्यतांच्या कोणत्याही हेतूने प्रेरित असले तरीही ते दहशतवादीच नव्हेत काय?

दोन्हीही बाबी आता अत्यंत स्पष्ट दिसू लागलेल्या आहेत. शरद पवारांचे भाषण ही पुढील ‘दहशतवादी’ कृत्यांना प्रेरणा तर आहेच. आणि नरेंद्र दाभोळकर यांची हत्या हे दहशतवादी कृत्य आहे.

म्हणून माझे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणे आहे, की राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा तर वाजलेच आहेत पण त्यामागे कोण हवा देते आहे हेही निश्चित झालेले आहे. तेव्हा आता अधिक वेळ न दवडता त्वरेने कार्यवाही करावी अथवा कायद्याचे भय आणि समानता ही तत्वे जनमानसाच्या मनातून पुसट होत जातील. आपला कारभार केवळ स्वच्छ असणे गरजेचे नाही तर कर्तव्यकठोर असणेही आवश्यक आहे. शरद पवार आणि तत्सम व्यक्ती यांच्यावर कायद्यानुसार त्वरित कार्यवाही सुरु करावी तर आपल्या कुर्रेबाज केसात कर्तव्याचे पीस खोवले जाईल...


4 comments:

  1. "जाणत्या राजाच्या" उल्लेखित भाषणातील वक्तव्याची थोडी अधिक चिरफाड वाचकांना उद्बोधक ठरली असती.

    ReplyDelete
    Replies
    1. होय. पण वाचकांनी ते भाषण याचि देही याचि डोळा पहावं आणि स्वतः खातरजमा करून घ्यावी म्हणून व्हिडिओ दिला आहे. :)

      Delete
  2. जर बदल घेणे चुकीचे नसेल तर महाराष्ट्र सरकार ने जनरल वैद्यांवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्या हरजिन्दर सिंह जिंदा आणि सुखदेव सिंह सुखा ह्या खलिस्तान कमांडो फोर्से च्या सदस्यांना का फासावर चढवले इंदिरा गांधीच्या मारेकर्यांना का फासावर चढवले ते सर्व सुद्धा सुवर्ण मंदिरावर झालेल्या हल्याचा आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदलाच घेत होते. एका साठी एक न्याय आणि दुसऱ्या साठी दुसरा असा का?

    ReplyDelete