"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Wednesday, February 1, 2012

मंडुकोपनिषद

निवडणुकांचा मोसम आला...पडघम वाजू लागले...काही दिवसांनी मतदानाचा पाउस पडेल...हिरवे गवत उगवेल नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे आणि लुसलुशीत कुरणे तयार होतील...पुन्हा नव्याने चरायला...


मला माझ्या रुपारेल कॉलेजची खूप आठवण होते.. विशेषतः पावसाळ्यातल्या त्या मस्त कँपसची..
पावसाळा आला की तिथे पहिल्या आठवड्यात नुसते डराँव डराँव चालू असायचे बेडकांचे..! इथून तिथे उड्या घेत असत हे बेडूक. आजचे उमेदवार आणि राजकीय नेते हे असेच नव्हेत काय? या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून अजून पलिकडे...
कसलाच धरबंध नाही...कोणी तिकीट मिळाले नाही म्हणून, कोणी कोणाला तिकीट दिले म्हणून, कोणी हव्या त्या मतदारसंघाचे तिकीट मिळाले नाही म्हणून, कोणी नातेवाईकाला उमेदवारी दिली नाही म्हणून...

मग काहींनी तर पक्षाच्याच कार्यालयावर हल्ले केले. खळ्ळ-खट्टॅक, फळ्ळ-फट्टॅक अन् राडा सुरु झाला. नासधूस, धक्काबुक्की, शिवीगाळ, तोडफोड अशा शब्दांना उठाव आला. समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. चूक या निराश-हताश इच्छुकांचीच आहे. आपण कोणत्या स्वार्थी जमातीची तळी उचलून भांडत आहोत हे बिचाऱ्यांना आधीच समजायला हवे होते. कोणासाठी आपण पोलिस केसेस अंगावर घेत आहोत, कोणासाठी वडापाव खाऊन उन्हातान्हात कंठशोष करून घोषणाबाजी करत आहोत, कोणासाठी बायकामुलांकडे दुर्लक्ष करत आहोत हे कळायला हवे होते. तेव्हा बाईकवर झेंडे लावून घेतले, नंबरप्लेट्स बदलून घेतल्या, रॅल्या काढल्या.. आणि आता जेव्हा उमेदवारी कोणाला कोणत्या निकषावर दिली गेली, त्यामागचा ‘अर्थ’ कळल्यावर भ्रमनिरास झाला.

पक्षनिष्ठा हा शब्द तर कालबाह्यच झालाय जणू. पद-प्रतिष्ठा-पैसा हे मिळायला हवे, मग ते कोणत्याही पक्षातून का असेना, हा विचार बळावत चाललेला दिसून येतो. आयाराम-गयाराम ने ग्रासलेली राजनीती सर्वांचेच नुकसान करणारी आहे. ‘उमेदवारी नाही मिळाली तरी मी पक्षाचे काम करत राहीन कारण त्या विचारसरणीवर माझी श्रद्धा आहे. त्यासाठी मी घाम गाळला आहे.’ हा विचार होत नाही. पक्ष कोणाला तरी एकालाच तिकीट/उमेदवारी देऊ शकतो हेही तितकेच खरे. परंतु या कार्यकर्त्यांचेही बरोबर आहे, जर पैसे घेऊन तिकीट दिले जात असेल, नातेवाईकांना उमेदवारी दिली जात असेल तर त्यांनी तरी गप्प का बसावे?

तेव्हा बेडूकरावांचे गर्जन सुरु झाले आहे. टपाटप उड्या चालू झाल्यात. कुणी ‘आनंद’ घ्या कुणी मुकुंद घ्या अशी परिस्थिती आहे. कोणाचा कोणाला पायपोस नाही. नेत्यांनाही हे कळण्याची आवश्यकता आहे की आपण ज्याला राबवून घेतला आणि इतरांची डोकी फोडायला, राडा करायला वापरला तोच आपल्यावर उलटू शकतो. ‘करावे तसे भरावे’ या न्यायाने आपण जे बी लावले त्याची येणारी ही फळे आहेत. ती चाखावीच लागणार.  


1 comment:

  1. just great! nivadnukanch natyamay pan atishay balish ani tyamule bhitidayak suddha..asa swarup dolyasamor ubh rahila..
    ase ekmekanchyat bhandat basle ani ekmekanche paay odhnyasathich tatpar aslele he nete kaay karnaar deshasahi..!!

    ReplyDelete