मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला लागलो. सुरुवातीला खूप कंटाळा करत असे..पण हळूहळू संध्याकाळ झाली की राहावेनासे व्हायला लागले..पावले शाखेकडे वळत असत.
आज अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे मी एक ‘स्वयंसेवक’ आहे. ही अनुभूती आहे.
आज कितीक उन्हाळे, पावसाळे आणि हिवाळे शाखेच्या संघस्थानावर घालवले. अनेक वर्ग, बैठका, संघ शिक्षा वर्ग, शिबिरे यात सहभागी झालो..माझ्या कार्यक्षेत्रातील कित्येक घरांमध्ये त्या कुटुंबाचा सदस्यच झालो.
ज्याप्रमाणे वाळूत किंवा मातीत त्यावरून चालणाऱ्या असंख्य लोकांचे ठसे उमटत राहतात..काही पुसले जातात, काही खोलवर राहतात...तसेच आजवरच्या संघकार्यात स्मृतीपटलावर कोरले गेलेले काही ‘ठसे’!
क्रमशः
१. मी लहान असताना मला शाखेत न्यायला एक शिक्षक येत असत. मी बिल्डींगमध्ये सायकलवरून फेऱ्या मारत असताना ते ठरलेल्या वेळी न चुकता, न कंटाळता येऊन मला घेऊन जात असत. खेळ उत्तम खेळत असत. पुढे ते CA झाले. मध्यंतरीच्या कालावधीत काही क्षुल्लक कारणांनी ते कामातून बाजूला झाले. मी जबाबदारी घेऊन कामाला लागेपर्यंत ते पूर्णतः बाजूला झाले होते. मला वाटत असे कामामुळे, वेळेअभावी येणे होत नसेल. पण मग लक्षात आलं की काहीतरी बिनसलं आहे.
पण मी संपर्क सुरु ठेवला. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता त्यांच्या मुलाला शाखेत घेऊन जाण्यासाठी ते मला सांगत होते! एव्हाना ते मूळ कारणसुद्धा विसरले. गणपतीला मी गेलो होतो तेव्हा निवांत गप्पा झाल्या. माझ्याबरोबर काही तरुण स्वयंसेवक होते. जुन्या आठवणी सांगून त्यांना उद्देशून ते म्हणाले, “मी ह्यांना सोडलं ....तरी ह्यांनी मला सोडलं नाही”! चष्म्यातून चमकणाऱ्या डोळ्यातली भावुकता ‘ठसा’ उमटवून गेली!
२. लहानपणी मी एका दिवाळी वर्गाला गेलो होतो. हनुमान टेकडी नावाच्या एका ठिकाणी हा वर्ग होता. रात्री थंड हवा होती. झोपण्याची वेळ झाली. आमच्या शाखेतील आम्ही बरेचजण असल्याने लगेच झोपू हे अशक्यच होतं. पडून गप्पा मारत होतो. काहीजण झोपून गेले. मंद वारा वाहात होता. टेकडी असल्याने अंधार बऱ्यापैकी होता. दूरवर कुठेतरी दिव्याचा प्रकाश जाणवत होता. मला अनोळखी ठिकाणी झोप येतच नसे. अजूनही नाही येत. तर शेवटी मी एकटाच जागा राहिलो डोळे मिटून. साधारण १-१.३० च्या सुमारास मला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. एक वृद्ध स्वयंसेवक आले...आणि ज्यांच्या अंगावरची चादर बाजूला गेली आहे त्यांच्यावर नीट पांघरून गेले. त्या थंडीमध्ये आपले स्वयंसेवक नकळत कुडकुडू नयेत म्हणून ही काळजी! मग पुन्हा दोनेक तासांनी.. ह्यावेळी मला चाहूल लागल्यावर मी मुद्दाम अर्धवट चादर बाजूला करून ठेवली. ते आले..आणि अंगावर व्यवस्थित चादर घालून गेले. एवढं छान वाटलं.. मग पहाटेपर्यंत अजून एकदा फेरी झाली. मी पुन्हा एकदा तो ऊबदार अनुभव घेतला. लहानच होतो..आमच्या शाखेतून गेलेल्या सर्व स्वयंसेवकात सर्वात लहान! तेव्हा कळलं नव्हतं की हा पक्का ‘ठसा’ अशी कायमची साथ करेल म्हणून...
पुढे वाचण्यासाठी - http://vikramwalawalkar.blogspot.com/2010/11/httpvikramwalawalkar.html