"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, July 11, 2010

"सारे प्रवासी ओढीचे"...








प्रस्तुत लेख हा खरंतर लोकाग्रहास्तव लिहिला आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ह्यावर्षीच्या तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गाला नागपूरला गेलो होतो. तिथून परतल्यावर बऱ्याच स्वयंसेवक/कार्यकर्त्यांनी उत्सुकतेपोटी विचारलं, “काय काय झालं तिथे?” आणि त्याहूनही दुप्पट संघद्वेष्ट्यांनी विचारले, “नक्की काय केलंस तिथे?”  आणि म्हणूनच या लेखात माहितीही येईल आणि भावनिक प्रसंगही येतील. संपूर्ण लेख म्हणजे मी जर तांब्याभर अमृत-रसपान केले असेल तर त्यातला एक थेंब तुम्हाला चाखायला देण्यासारखे आहे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वतःची अशी एक अनोखी कार्यपद्धती आहे. उघड्या मैदानावर चालणाऱ्या नित्य शाखा हा एक भाग झाला. त्यातून स्वयंसेवकांचे प्रशिक्षण तर होतच असते परंतु ज्या हिंदू संघटनाचा संघ उच्चार करत असतो, त्यासाठी आवश्यक ते सहजीवन केवळ एक तासाच्या शाखेत भेटून होऊ शकत नाही. शिवाय शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रशिक्षणासाठी वर्गांची गरज भासली जी ‘संघ शिक्षा वर्ग’ या माध्यमातून पूर्ण केली जाते.

प्राथमिक शिक्षा वर्ग हा विभाग स्तरावर होतो आणि ७ दिवसांचा असतो. मग प्रथम संघ शिक्षा वर्ग २१ दिवसांचा प्रांत स्तरावर होतो. उदा. कोंकण प्रांत, बंगाल प्रांत, आसाम प्रांत इ. त्यानंतर मग कार्यकर्त्याला द्वितीय संघ शिक्षा वर्गाला पाठवले जाते, जो एकेका क्षेत्राचा होतो आणि २१ दिवसांचा असतो. उदा. पश्चिम क्षेत्र (महाराष्ट्र, गोवा व गुजरात), दक्षिण क्षेत्र (कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश). हे प्रशिक्षण घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात संघकार्याचा अनुभव घेतल्यावर मग कार्यकर्त्याला तृतीय संघ शिक्षा वर्गाला पाठवले जाते. जो ३० दिवसांचा आणि केवळ नागपूरलाच होतो. हा अखिल भारतीय वर्ग असल्याने येथे संपूर्ण भारतातून कार्यकर्ते येतात. दरवर्षी जवळपास १००० च्या आत कार्यकर्ते असतात.

ह्यावर्षी वर्गात ८८१ कार्यकर्ते होते. आम्हाला विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी ८५ शिक्षक होते व या सर्वांची व्यवस्था पाहण्यासाठी १५०-२०० स्वयंसेवक होते. भोजन व्यवस्था, जल व्यवस्था, वस्तू भांडार, रुग्णालय, विद्युत व ध्वनी, यातायात(परिवहन), स्वच्छता, प्रक्षालन, रक्षणव्यवस्था असे विभाग होते. आणि हे सर्व स्वयंसेवकांनीच सांभाळले. १ व्यवस्थाप्रमुख, त्यांच्या सहकार्यासाठी सोबतीला प्रत्येक विभागाचा प्रमुख आणि त्यांच्या विभागाच्या संचात नागपूर व आजूबाजूच्या परिसरातून महिनाभर काढून आलेले स्वयंसेवक. रात्री १२-१ पर्यंत फिरणारे व ३.३०-४.०० ला परत उठणारे व्यवस्थाप्रमुख! असे सर्व मिळून आम्ही जवळपास १२०० जण महिनाभर एकत्र राहिलो.




यात वयानुसार आणि विषयानुसार गण पाडले होते. म्हणजे ज्यांनी दंडयुद्ध विषय निवडला आहे आणि कॉलेजवयीन आहेत असे एका गणात. योगासन विषय आणि वय यानुसार वेगळे गण. अशी विभागणी होती. आमच्या गणात २४ जण होते. आम्ही २४ जणांनी एका कक्षात राहायचे. यात पंजाब मधून १, गुजरात १, आंध्र प्रदेश ३, बंगाल १, केरळ १, आसाम १, तामिळनाडू १, हिमाचल प्रदेश १, महाराष्ट्र ३, राजस्थान ३, दिल्ली १, मध्य प्रदेश २, उत्तर प्रदेश १, ओरिसा १, कर्नाटक १, झारखंड १, असे कार्यकर्ते होते.

वर्ग प्रारंभ झाला. पहाटे ३.४५ ला शंख(बिगुल) वाजत असे. आम्ही ३.१५-३० ला उठून, एकमेकांना उठवून मुखमार्जनाला जात असू. मग चहा घेऊन स्मृति-मंदिराच्या दिशेने पावले वळत असत.
पवित्र पावन स्मृति-मंदिर. ऊर्जेचा आणि प्रेरणेचा अक्षय्य स्त्रोत.
स्मृति-मंदिरात आद्य सरसंघचालक आणि संघ संस्थापक परमपूजनीय डॉ. हेडगेवारांचा पूर्णाकृती पुतळा आहे. सचेतन शिल्पच ते. त्याखाली तळघरात त्यांची समाधीस्थली आहे. आणि समोर पूजनीय श्रीगुरुजींचे स्मृतिचिन्ह. पहाटेच्या त्या प्रहरी अत्यंत भावविभोर वातावरण असतं. थंडगार, मंद वारा वहात असतो आणि स्मृति-मंदिरासमोर काही प्रांतातले स्वयंसेवक प्रांतशः बसून आपापल्या भाषेतील डॉ. व श्रीगुरुजी यांचे स्मरण करणारी गीते गात असतात. आसमंतातून वाहणाऱ्या शीतल वायुलहरींना या स्वरलहरी साथ करत असतात. कुठे मल्याळम तर कुठे बंगाली गीत चालू असते. तोच भाव, तीच आर्तता. हळूहळू पूर्वेला लाली चढत असते. कोणी हौशी सूर्यनमस्कार, जोर बैठका काढत असतो तर कोणी आदल्या दिवशीचे दंडाचे प्रयोग दुसऱ्याला शिकवत असतो. बाजूला सर्व शिक्षकांचा गण चालू असतो. त्यांनी आज शिक्षार्थ्यांना जे शिकवायचे आहे त्याची उजळणी.






मग सर्वजण केवळ एका शिट्टीसरशी आपापल्या गणात बसतात. एक आखूड शिट्टी आणि ८८१ जण ४२ पंक्तींमध्ये ६० सेकंदांच्या आत. कुठेही आवाज नाही. गडबड नाही. मग एकात्मता स्तोत्र सुरु होते. त्यात भारतातील प्रमुख नद्या, पर्वत, तीर्थक्षेत्रे असे प्राकृतिक उल्लेख झाल्यानंतर महान स्त्रिया, महापुरुष, साहित्यिक, संशोधक, योद्धे, क्रांतिकारक अशांचे स्मरण केले जाते. मग एकात्मता मंत्र होऊन संघस्थानाला प्रारंभ होतो.

संघस्थान म्हणजे शारीरिक प्रशिक्षणाचाच भाग. यात कालांश (periods) पाडलेले असतात. योगासन, दंडयुद्ध, पदविन्यास, खेळ अशा तासिका असतात. शारीरिक दृष्ट्या चिवट, चपळ आणि मजबूत बनविण्यासाठी या संघास्थानाचा खूप उपयोग होतो. दंडयुद्ध आणि नियुद्धात झुंजार वृत्ती वाढवण्याचा आणि आक्रमणाचा सामना करण्याचा सराव होतो. यात आधी द्वंद्व म्हणजे एक विरुद्ध एक, मग एक विरुद्ध दोन, एक विरुद्ध पाच आणि शेवटी एक विरुद्ध अनेक असा सराव होतो.
 दंडयुद्ध. प्रकार "एक विरुद्ध अनेक" (हल्लाफोड)
संघस्थान झाल्यावर २० मिनिटांचा श्रमसाधना कालांश. यामध्ये स्वयंसेवकांच्या गटांना ठराविक काम नेमून दिलेले असते. उदा. शौचालाय स्वच्छता, संघस्थानाचे रेखांकन, स्मृती-मंदिर परिसर स्वच्छता इ. आणि मग न्याहारी.





आमच्या गटाला यात एक दिवस काम आले ते कंपोस्ट खताचे! म्हणजे दररोज च्या १०००-१२०० जणांच्या जेवणाचे जे खरकटे २ मोठाल्या पिंपात आणि एका गाड्यात जमा केले जात असे ते दूर संघस्थानाच्या शेवटी २ मोठे खड्डे खणून त्यात ओतायचे, विशिष्ट पावडर शिंपडून माती लोटायची. आमच्या गणशिक्षकांनी आम्हा ४ जणांना सांगितले, “जाओ और तुरंत वह सब जूठन (खरकटे) लेकर आओ”.  आम्ही लगेच गेलो. २ पिंपे लाकडी गाडीवर चढवली आणि निघालो. त्या ठिकाणी जाऊन पोहोचताच पिंपे खाली उतरवायला गाडीवर चढलो तोच दुसरे शिक्षक म्हणाले, “अरे आतल्या प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या करा”. त्या पिम्पातील ब्रह्मांडाकडे बघताच पोटातील प्रतिक्षिप्त क्रिया होऊ लागल्या. मंथन चालू असतानाच खाली उभ्या असलेल्या एका स्वयंसेवकाने एक छोटी काठी दिली. काम सुरु झाले. हळूहळू ती काठी गेली आणि सरळ हाताने काम चालू झाले. एकदा हात घातल्यावर काय. मग १० मिनिटे तो कार्यक्रम चालला. आतमध्ये भाताची शिते, मिरच्या, कांदे, लोणच्याच्या फोडी, लगदा, आणि अन्य पदार्थांचे अंश होते. आदल्या दिवशी “जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर होते”, ते ते सर्व आता विपरीत स्थितीत होते! जवळपास सर्व प्लास्टिक वेगळे केले. मग ती पिंपे उतरवली. शिक्षक म्हणाले, “अरे विक्रम, तुला ग्लोव्ज नाही दिले?”. मी कपाळावर हात (मारला असता, स्वच्छ असता तर!) न मारता म्हटले, “फार लवकर सांगितलेत..आता उद्या द्या”. पण माझी खात्री आहे की त्यांनी मुद्दामहून माझी तयारी होण्यासाठी हे असं करवून घेतलं. अन्य स्वयंसेवकांनी तोपर्यंत खड्डा खणून मोठा केला होता. काहींनी पिंपे आत ओतली. पावडर शिंपडून माती लोटली. कालांश पूर्ण झाला! मग न्याहारी. आता कशाने आणि कितीवेळ हात धुऊ असं झालं होतं...पण वेळ एवढा कमी की उशीर झाला तर न्याहारी नाही मिळायची. म्हणून हात धुतले, समाधान करून घेतले आणि न्याहारी खाल्ली. दिवसभराचा विचार करताना जाणवलं की आपल्याला १० मिनिटांसाठी काय वाटलं...परंतु ज्यांचा जन्मच अशा कामामध्ये जातो ते आयुष्य काय असेल? किती श्रमप्रतिष्ठा देतो त्या कामाला आपण? त्यांनी हे काम करायचे नाकारले तर? शहरांचे काय होईल? सोसायट्यांचे काय होईल? असो. श्रीरामकृष्ण परमहंसांची एक गोष्टही आठवली. असं म्हणतात की रामकृष्णांनी साधनाकालामधे अंतिम टप्प्यात संपूर्ण कलकत्त्याचा मैला जिथे टाकला जात असे तिथे जाऊन २ कांड्या सरळ आत खुपसल्या व ते ग्रहण करायला सुरुवात केली. सर्वच ब्रह्म. स्वहस्ते आश्रमातील शौचालयं साफ करणाऱ्या गांधीजींचीही आठवण आली. सकाळी एकात्मता स्तोत्रात आपण ही नावे उगाच नाही घेत हे जाणवलं!










स्नान आणि घोषवर्ग आटोपून मग असे योगनिद्रा (म्हणजे शवासन/चैतन्यासन) आणि चर्चा. चर्चागट वेगळे असत. शैक्षणिक आणि कामाच्या स्वरूपावर हे चर्चागट पाडले होते. विविध विषयांवर चर्चा होत असे. या चर्चेला दिशा देण्यासाठी चर्चा प्रवर्तक असतात. चर्चा गटात दररोज एकाने आपला विस्तृत परिचय द्यायचा असतो. म्हणजे आपला संघप्रवेश कसा झाला, घरी कोण-कोण आहेत, आपल्या क्षेत्राचा परिचय, प्रसिद्ध गोष्टी वगैरे...आमच्या चर्चा गटात आंध्र प्रदेश चा राजू होता. विस्तृत परिचय चालू होता..आणि आम्ही अवाक झालो. कारण राजू तोडक्या-मोडक्या हिंदी-इंग्रजीत सांगत होता, “I lost my father...यहां आनेका बाद”. मग चर्चागट प्रवर्तकांनी विचारलं, “तुम गये नही”? ..“हम जाके वापस आया.”  सर्वजण स्तब्ध. चर्चा प्रवर्तक मग भानावर येत पुढे म्हणाले कैसा हुवा वगैरे. पण राजूचे उदाहरण सर्वांच्या काळजावर कायमचे उमटून गेले! वर्गात आल्यावर ८ दिवसांनी कळतं की, घरी वडील गेले आहेत आणि तो स्वयंसेवक वर्गातून घरी जाऊन अंत्यसंस्कार आटोपून १ दिवस राहून परत वर्गात येऊन समरस होऊन जातो. याला काय म्हणावं?

चर्चागट कधीकधी खूप रंगतो. परस्परविरोधी मतं असतात. प्रत्येकजण युक्तिवाद करत असतो. परंतु या सर्वांना नंतर समेवर आणून कोरसमध्ये ‘संघराग’ गायला लावणे हे चर्चा प्रवर्तकाचे काम. आणि यात कालांश संपल्याचा शंख(बिगुल) कधी वाजतो ते कळतही नाही. 




चर्चागट झाल्यावर प्रवचन कालांश. यात संघ अधिकारी येऊन शाखेची बौद्धिक/शारीरिक/संपर्क रचना, धर्मजागरण विभाग, असे एकेक विषय स्पष्ट करतात. ४ दिवस प्रचार अथवा सेवा विभागाचे प्रशिक्षण. आणि मग संध्याकाळचे बौद्धिक.




संघबाह्य मंडळींमध्ये या बौद्धिकाबद्दल खूप भ्रामक कल्पना आहेत. बौद्धिक रटाळ, शुष्क, तेच तेच असतं इ. पण बौद्धिक म्हणजे एक मेजवानी असते. विचारधारेत न्हाऊन निघणे म्हणजे काय ते बौद्धिक ऐकल्यावर जाणवतं. काठावर बसून नदीचे पाणी भलतेच गार असणार हो, खूप खोल असणार हो, आत प्राणी असतील हो, विषारी वनस्पती असतील हो अशा नाना शंकाकुशंका काढणारे कधी पोहतही नाहीत आणि पोहणाऱ्यांना प्रोत्साहनही देत नाहीत. पोहणारे मात्र मजा तर घेतातच पण प्रवाह म्हणजे काय आणि प्रवाहाच्या उलट पोहणे म्हणजे काय हे अनुभवतात. काठावरच्यांना काय सांगणार त्यात काय आनंद असतो ते! कधी कधी काठावरचे निसर्गाच्या तडाख्यासरशी पडतात येऊन प्रवाहात. सवय नसल्याने नाका-तोंडात जाऊ लागतं पाणी. पण मग पोहणारे त्यांना आधाराचा हात देतात. तसं या बौद्धिकांचं वर्णन काय करणार. ते अनुभवायलाच हवं. संघाचे मूलगामी चिंतन काय आहे? विचारधारेचे आणि कार्यपद्धतीचे अपरिवर्तनीय भाग कोणकोणते आहेत? कोणत्या बाबींमध्ये युगानुकूल परिवर्तन होऊ शकते? संघ ध्येयप्राप्तीसाठी कोणत्या मार्गावरून मार्गक्रमणा करत आहे? हिंदुत्व, एकात्म मानवतावाद, धर्म, राष्ट्रीयता, स्वदेशी, आर्थिक चिंतन, शैक्षणिक चिंतन, राजकीय चिंतन, राष्ट्र-संकल्पना, परमपूजनीय डॉक्टरजींचे जीवन अशा अनेक बाबींवर बौद्धिक होतं. 

बौद्धिक झाल्यावर चहापान-न्याहारी आणि गणवेश तयारी. सर्वजण आपापल्या गणवेशाला कडक तयार करत असतात. बुटांना आणि पट्ट्याला पॉलिश करून गणवेश चढवून सर्वजण संघस्थानावर येतात. सकाळप्रमाणेच संध्याकाळचे संघस्थान. पण संध्याकाळच्या तासिका वेगळ्या. त्यात आचारपद्धती, संचलन, रचना, समता, यांचा अभ्यास. संघस्थान प्रार्थना होऊन संपते. सकाळचे संघस्थान प्रारंभ होताना जो सूर्यनारायण पूर्वेहून कौतुकाने बघत असतो तोही आता संघस्थान संपणार या मनस्थितीत स्वगृही जात असतो. संधिप्रकाशात ध्वज उतरत असताना शंखाचे निनादणारे स्वर वातावरण भावूक बनवतात.




दुपारचे चर्चागट झाल्यावर भोजन असतं आणि संध्याकाळी संघस्थान झाल्यावर एखादा माहितीप्रद कार्यक्रम झाल्यावर भोजन. संघ शिक्षा वर्गातील भोजन हा एक पाहण्यासारखा सोहळाच असतो. पंगत बसलेली असते. ठराविक गणांना वाढप व्यवस्था (वितरण) दिलेली असते. प्रत्येकाचा गाळा ठरलेला असतो, तिथेच त्याने वाढप करायचे. जवळपास ९०० जणांची पंगत मोठ्या सभागृहात बसत असे आणि त्याला वाढपव्यवस्था. कुठेही गडबड नाही-गोंधळ नाही. भोजन मंत्र होतो. आणि मग भोजनाला सुरुवात. पहिली पंगत झाल्यावर मग त्यातील ज्यांना नेमून दिलेले असेल त्यांनी दुसऱ्या पंगतीत पहिल्या वितरणाच्या स्वयंसेवकांना वाढायचे. क्वचित एक दिवस खडा-भोजन असते. म्हणजे गणवेश न उतरवता उभ्याने जेवायचे. जेवणही लवकर आटोपले पाहिजे आणि गणवेशाला कळताही कामा नये भोजन झाले ते! कधी मौन कालांश. म्हणजे बाहेरून जाणाऱ्यांना वाटेल अरे सभागृहात तर कोणीच नाही, पण प्रत्यक्षात ९०० जण आनंदाने जेवत असतात!




जेवण झाल्यावर मग गप्पा मारत मारत सर्वजण निद्रेच्या अधीन होतात. हा साधारण दिनक्रम. यात घोषवर्ग, शहरातून संचलन, विशेष सराव या गोष्टी चालतच असतात. हळूहळू शेवटचे दिवस सुरु झाल्याची जाणीव होऊ लागते. सगळ्यांची मने अस्वस्थ होऊ लागतात. एकमेकांचे संपर्काचे पत्ते, दूरध्वनी घेणं सुरु होतं. जाहीर समारोपाच्या प्रात्यक्षिकांची तयारी जोरात सुरु असते. शिवाय सर्व शारीरिक विषयांवर परीक्षाही असते. त्याचा अभ्यासक्रम लावला जातो. एकमेकांना विचारून, शिकवून, शिकून परीक्षेला तयार होतात.




जाहीर सामारोपातील घोष प्रात्यक्षिक.





जाहीर समारोप मोठ्या उत्साहात होतो. आलेल्या सर्व प्रेक्षकांसमोर व प्रमुख अतिथींसमोर शिक्षार्थी महिन्याभराच्या प्रशिक्षणाची झलक सादर करतात. होणाऱ्या कौतुकाने साफल्य वाटत असले तरी मनात उद्या आपण विलग होणार ही भावना घर करून असते.

जाहीर समारोपाचे विहंगम दृश्य.






दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वजण शुचिर्भूत होऊन, शाखावेशात बौद्धिक सभागृहात येतात. दीक्षांत समारोह असतो. दीक्षांताचे उद्बोधन झाले की प्रार्थना होते आणि मग सर्व शिक्षार्थी तृतीय वर्ष शिक्षित होतात!
आपापल्या कार्यक्षेत्रात जायचे. महिनाभर ज्यांच्याबरोबर राहिलो त्यांना निरोप द्यायचा. 

स्मृतीमन्दिराजवळ भेटायचे ठरलेले असते. आदल्या दिवशी सर्वांचे मोबाईल मिळाल्याने छायाचित्रं काढणं सुरु असतं. एकमेकाला आलिंगन देऊन ‘या हृदयीचे त्या हृदयी घालूया’ हा संघमंत्र जपत-जगत हळूहळू आपापल्या प्रवासाला लागतात सारे. साऱ्या वातावरणात उत्साह आणि खिन्नता यांचे एक अजबच मिश्रण असते. स्मृतिमंदिरात गर्दी होते. सर्व डोळ्यात साठवून घेऊन विशाल भारत आपल्या प्रवासाला निघतो. कोणी पार उत्तर सीमेला जाणार, कोणी दक्षिण किनाऱ्यावर. कोणी पूर्वांचलात जाणार तर कोणी पश्चिम किनारपट्टीवर. वर्गातून प्रेरणा घेऊन काही स्वयंसेवक ‘प्रचारक’ म्हणून निघतात. म्हणजे घर सोडून संघ सांगेल तिथे ‘पूर्णवेळ’ संघाचेच काम करायचे. अशा प्रचारकांचे मनोज्ञ दर्शन या वर्गात घडते.

परत असे एकत्र भेटणे तेही गणातील २४ जणांनी हे अशक्यच. तेव्हा कधी भेट होईल हे सांगता येत नसते. ‘मायेच्या हळव्या स्पर्शाने’ आभाळानेही धरणीवर थेंबांचा शिडकावा केलेला असतो. मृद्गंध सुटलेला असतो. इथे ‘सारे प्रवासी घडीचे’ नसतात तर ‘सारे प्रवासी ओढीचे’ झालेले असतात. आणि आपले हजारो जणांचे विशाल कुटुंब असल्याचा अनुभव घेऊन पुलकित झालेली ही मने नव्या चैतन्याची आणि स्फूर्तीची संघपहाट आणण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात उमेदीने परततात. 

Tuesday, July 6, 2010

“नावात काय ( नाही) आहे?”



“नावात काय आहे?”  असं हिटलरने म्हटलं आहे. का चमकलात? जर नावात काही नसेल तर हिटलर काय आणि शेक्सपियर काय...काय फरक पडणार आहे? परंतु असं चालणार नाही. नावाशिवाय गोष्टी अनाकलनीय आणि दुर्बोध होतील. आणि गोंधळ उडेल तो वेगळाच. म्हणजे विशिष्ट नावाची आवश्यकता तर आहे.

पण ही आवश्यकता केवळ एखाद्या गोष्टीचा निर्देश करण्यासाठी आहे का? अगदी मुळात जेव्हा शब्द अस्तित्वात आले किंवा येतात त्यावेळेला निर्देशनासाठी म्हणून. परंतु त्याचा जसजसा वापर होऊ लागतो तसा त्या शब्दामागचा संभार वाढत जातो. वर्षानुवर्षांच्या, पिढ्यांपिढ्यांच्या वापराने नावाला विशिष्ट वजन, अस्मिता, इतिहास, प्रेरणा जोडत जाते. त्या नामोच्चाराबरोबरच त्याला चिकटलेला इतिहास जागृत होतो. पानिपत. म्हटले तर ठिकाणाचे नाव. पण आठवतोच ना इतिहास? पावनखिंड, हळदीघाटी, झाशी, कुरुक्षेत्र, सिंहगड’ अशा नावांनी वीरश्री संचारते आणि आपण यशस्वीरित्या परतून लावलेल्या रानटी आक्रमणांची आठवण येते. तसंच काशी, वृंदावन, केदारनाथ, प्रयाग’, ‘रामेश्वरम्’ ही नावे येताच आपल्या मनात ईश्वर, भक्ती, अध्यात्म असे पवित्र भाव दाटून येतात. आपली तीर्थक्षेत्रे आहेत ती. पण तेच अयोध्या, सोमनाथ, अमरनाथ, तुळजाभवानी या नावांनी वेगळे आणि संमिश्र भाव येतात. आपण सत्य रक्षणासाठी, न्याय मिळवण्यासाठी वेळोवेळी दिलेले, देत असलेले लढे आठवतात.

म्हणजेच आपल्या भारतात आपल्याला जो संघर्षरत परंतु विजिगीषु इतिहास, जी वैभवशाली परंपरा आणि ज्या समृद्ध, अर्थवाही, आशयघन भाषा लाभल्या आहे त्यामुळे स्थानांच्या नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळेच आपण ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’, ‘बॉम्बे’, ‘कलकत्ता’ ही नावे बदलली. असं म्हणतात की रविंद्रनाथ टागोरांचे आडनाव हे खरे तर ‘ठाकूर’. पण ब्रिटीशांनी त्याचे केले ‘टागोर’. ते तसेच चालू राहिले! तशीच बंडोपाध्याय, चट्टोपाध्याय व मुखोपाध्याय ही नावे उच्चारायला कठीण म्हणून त्याचे केले गेले अनुक्रमे ‘बॅनर्जी’, ‘चटर्जी’ व ‘मुखर्जी’! आणि त्यातच आपल्याला स्वभाषेची अॅलर्जी आणि राखायची  ब्रिटीशांची मर्जी! म्हणून जो येईल तो सोयीनुसार बदलतो नावे.

भारतात आपण अजूनही अशाच काही स्थानांची नावे जपून आहोत, जी बदलण्याची आवश्यकता आहे. औरंगाबाद. औरंगजेबाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे नाव! आणि औरंगाबाद म्हणजे औरंग्या ‘बाद’ झाला असे नव्हे, तर आबादी-आबाद मधला आबाद जोडला औरंगला आणि झाला औरंगाबाद. तसंच उस्मानाबाद, अहमदनगर, हैदराबाद, अहमदाबाद, दौलताबाद, अलाहाबाद, निजामपूर, गाझियाबाद, मोरादाबाद अशी एक न संपणारी जखमांची यादी भारतभर विखुरलेली आहे. ज्या निजामाने अत्याचार केले, औरंग्याने मुलुख च्या मुलुख बेचिराख केले त्यांची आठवण आपण जपत आहोत का? धर्मांध औरंग्याने संभाजीराजांनी हिंदू धर्म सोडावा म्हणून हालहाल करून मारले. परंतु सिंहाचा बछडा मृत्यूला घाबरला नाही. ‘स्वधर्मे निधनं श्रेय:’ हे वचन जगून दाखवले त्या धर्मवीर संभाजीराजांचे नाव तिथे हवे. तिथली राष्ट्रभक्त जनता जिल्हा-‘संभाजीनगर’ म्हणूनच सांगते. अन्य ठिकाणीही आपण औरंगाबादला संभाजीनगर म्हणणेच सुरु केले पाहिजे. असे बदल हळूहळूच घडत असतात.

त्यामुळे भारतभर असे विविध आबाद आहेतच.. आणि आबादीही वाढते आहे! तिथल्या जनतेने जागृत होऊन आणि शासनाने पुढाकार घेऊन ही अपमानजनक आणि कटू स्मृतींची चिन्हे मिटवायला हवीत.
जर कोणी असा युक्तिवाद केला की “आम्हाला बुवा औरंगाबाद म्हटल्यावर केवळ स्थानाचाच बोध होतो, इतिहास-बितिहास काऽही आठवत नाही.” तर त्याचे स्पष्टीकरण वर काही स्थानांचा उल्लेख करून पुरेसे झालेले आहे.

नावाबाबतीत आपल्या देशाचेही तसेच. विचारून पहा- आपल्या देशाचे नाव काय? ‘भारत अथवा हिंदुस्थान’ लगेच उत्तर येते...आणि इंग्रजीत? -‘इंडिया’. सोप्पे आहे! मग त्या व्यक्तीला त्याचे नाव विचारा.. उदाहरणार्थ प्रकाश. मग इंग्रजीत? Mr. Light?? नाही. प्रकाशच राहणार. फार तर Mr. प्रकाश. जपानीत? प्रकाश. अरबीत? प्रकाशच. एव्हाना तो माणूस चिडायला लागलेला असतो. मग जगातली कोणतीही भाषा असो आसामी, तामिळ, सिंधी, रशियन, फ्रेंच; हे प्रकाश काही बदलणार नाही. मग जर आपले नाव जगाच्या पाठीवरल्या कोणत्याही भाषेत बदलत नाही तर मग आपल्या देशाचे नाव तरी का बदलावे? हिंदी-मराठीत भारत आणि इंग्रजीत इंडिया हा हास्यास्पद प्रकार थांबवूया. मान्य आहे की शतकांच्या गुलामगिरीमुळे हा पगडा आहे. पण आता आपल्याला जर जाणीव झाली आहे, समजले आहे तर तरी बदलूया.

आपली राष्ट्रीयता भारतीय आहे. इंडियन नव्हे! तेव्हा इंग्रजीत लिहितानाही (अर्ज भरतानाही) Nationality (राष्ट्रीयता) समोर अभिमानाने Bharateey लिहूया. सुदैवाने आपल्या घटनाकारांनी संविधानाच्या सुरुवातीलाच म्हणून ठेवले आहे ‘India that is Bharat’. त्यामुळे कोणी आपल्याला आक्षेप घेऊ शकत नाही. काही बुद्धिजीवी विचारवंत मला म्हणतीलही की “एकच बोध होणार आहे तर हे भारत आणि इंडिया असा भेद कशाला?” अगदी बरोबर. तर मग आपण भारत हेच म्हणूया ना. आणि ज्या पूर्वसूरींनी, संविधान बनवताना ‘India that is Bharat’ अशी सुरुवात केली ती का केली? ती केली नसती. सरळ इंडिया म्हणून पुढे गेले असते. पण आज न उद्या भारत हे नाव प्रस्थापित व्हावे आणि इंडिया हे गळून पडावे ही अंतर्निहित इच्छा असल्यानेच त्यांनी असे म्हणून ठेवले.


तेव्हा नावात काय आहे असे शेक्सपियरला वाटले असेल ते भाषेमुळे अथवा अन्य कारणांनी. स्वाभाविकही आहे ते. पण इथे त्यामुळे ‘जॅक अँड जिल्’ आणि ‘हम्प्टी-डम्प्टी’ एवढे ते सोपे नाही. इथल्या ‘राम-शाम’ लाही इतिहास आणि प्रीती आहे आणि ‘सीता-गीता’ लाही वनवास आणि नीती आहे! भारतातील अर्थवाही, सुस्पष्ट आणि आशयघन भाषांमुळे नावांना विशिष्ट अर्थ तर आहेच पण समृद्ध परंपरेमुळे, संघर्षरत आणि विजिगीषु इतिहासामुळे नावांना एक विशिष्ट बोध आहे.

झुगारा ते अन्यायाचे आणि गुलामीचे जोखड आणि अभिमानाने सांगा आपल्या देशाचे नाव.

भारतमाता की जय!