"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, July 11, 2010

"सारे प्रवासी ओढीचे"...
प्रस्तुत लेख हा खरंतर लोकाग्रहास्तव लिहिला आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ह्यावर्षीच्या तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गाला नागपूरला गेलो होतो. तिथून परतल्यावर बऱ्याच स्वयंसेवक/कार्यकर्त्यांनी उत्सुकतेपोटी विचारलं, “काय काय झालं तिथे?” आणि त्याहूनही दुप्पट संघद्वेष्ट्यांनी विचारले, “नक्की काय केलंस तिथे?”  आणि म्हणूनच या लेखात माहितीही येईल आणि भावनिक प्रसंगही येतील. संपूर्ण लेख म्हणजे मी जर तांब्याभर अमृत-रसपान केले असेल तर त्यातला एक थेंब तुम्हाला चाखायला देण्यासारखे आहे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वतःची अशी एक अनोखी कार्यपद्धती आहे. उघड्या मैदानावर चालणाऱ्या नित्य शाखा हा एक भाग झाला. त्यातून स्वयंसेवकांचे प्रशिक्षण तर होतच असते परंतु ज्या हिंदू संघटनाचा संघ उच्चार करत असतो, त्यासाठी आवश्यक ते सहजीवन केवळ एक तासाच्या शाखेत भेटून होऊ शकत नाही. शिवाय शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रशिक्षणासाठी वर्गांची गरज भासली जी ‘संघ शिक्षा वर्ग’ या माध्यमातून पूर्ण केली जाते.

प्राथमिक शिक्षा वर्ग हा विभाग स्तरावर होतो आणि ७ दिवसांचा असतो. मग प्रथम संघ शिक्षा वर्ग २१ दिवसांचा प्रांत स्तरावर होतो. उदा. कोंकण प्रांत, बंगाल प्रांत, आसाम प्रांत इ. त्यानंतर मग कार्यकर्त्याला द्वितीय संघ शिक्षा वर्गाला पाठवले जाते, जो एकेका क्षेत्राचा होतो आणि २१ दिवसांचा असतो. उदा. पश्चिम क्षेत्र (महाराष्ट्र, गोवा व गुजरात), दक्षिण क्षेत्र (कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश). हे प्रशिक्षण घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात संघकार्याचा अनुभव घेतल्यावर मग कार्यकर्त्याला तृतीय संघ शिक्षा वर्गाला पाठवले जाते. जो ३० दिवसांचा आणि केवळ नागपूरलाच होतो. हा अखिल भारतीय वर्ग असल्याने येथे संपूर्ण भारतातून कार्यकर्ते येतात. दरवर्षी जवळपास १००० च्या आत कार्यकर्ते असतात.

ह्यावर्षी वर्गात ८८१ कार्यकर्ते होते. आम्हाला विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी ८५ शिक्षक होते व या सर्वांची व्यवस्था पाहण्यासाठी १५०-२०० स्वयंसेवक होते. भोजन व्यवस्था, जल व्यवस्था, वस्तू भांडार, रुग्णालय, विद्युत व ध्वनी, यातायात(परिवहन), स्वच्छता, प्रक्षालन, रक्षणव्यवस्था असे विभाग होते. आणि हे सर्व स्वयंसेवकांनीच सांभाळले. १ व्यवस्थाप्रमुख, त्यांच्या सहकार्यासाठी सोबतीला प्रत्येक विभागाचा प्रमुख आणि त्यांच्या विभागाच्या संचात नागपूर व आजूबाजूच्या परिसरातून महिनाभर काढून आलेले स्वयंसेवक. रात्री १२-१ पर्यंत फिरणारे व ३.३०-४.०० ला परत उठणारे व्यवस्थाप्रमुख! असे सर्व मिळून आम्ही जवळपास १२०० जण महिनाभर एकत्र राहिलो.
यात वयानुसार आणि विषयानुसार गण पाडले होते. म्हणजे ज्यांनी दंडयुद्ध विषय निवडला आहे आणि कॉलेजवयीन आहेत असे एका गणात. योगासन विषय आणि वय यानुसार वेगळे गण. अशी विभागणी होती. आमच्या गणात २४ जण होते. आम्ही २४ जणांनी एका कक्षात राहायचे. यात पंजाब मधून १, गुजरात १, आंध्र प्रदेश ३, बंगाल १, केरळ १, आसाम १, तामिळनाडू १, हिमाचल प्रदेश १, महाराष्ट्र ३, राजस्थान ३, दिल्ली १, मध्य प्रदेश २, उत्तर प्रदेश १, ओरिसा १, कर्नाटक १, झारखंड १, असे कार्यकर्ते होते.

वर्ग प्रारंभ झाला. पहाटे ३.४५ ला शंख(बिगुल) वाजत असे. आम्ही ३.१५-३० ला उठून, एकमेकांना उठवून मुखमार्जनाला जात असू. मग चहा घेऊन स्मृति-मंदिराच्या दिशेने पावले वळत असत.
पवित्र पावन स्मृति-मंदिर. ऊर्जेचा आणि प्रेरणेचा अक्षय्य स्त्रोत.
स्मृति-मंदिरात आद्य सरसंघचालक आणि संघ संस्थापक परमपूजनीय डॉ. हेडगेवारांचा पूर्णाकृती पुतळा आहे. सचेतन शिल्पच ते. त्याखाली तळघरात त्यांची समाधीस्थली आहे. आणि समोर पूजनीय श्रीगुरुजींचे स्मृतिचिन्ह. पहाटेच्या त्या प्रहरी अत्यंत भावविभोर वातावरण असतं. थंडगार, मंद वारा वहात असतो आणि स्मृति-मंदिरासमोर काही प्रांतातले स्वयंसेवक प्रांतशः बसून आपापल्या भाषेतील डॉ. व श्रीगुरुजी यांचे स्मरण करणारी गीते गात असतात. आसमंतातून वाहणाऱ्या शीतल वायुलहरींना या स्वरलहरी साथ करत असतात. कुठे मल्याळम तर कुठे बंगाली गीत चालू असते. तोच भाव, तीच आर्तता. हळूहळू पूर्वेला लाली चढत असते. कोणी हौशी सूर्यनमस्कार, जोर बैठका काढत असतो तर कोणी आदल्या दिवशीचे दंडाचे प्रयोग दुसऱ्याला शिकवत असतो. बाजूला सर्व शिक्षकांचा गण चालू असतो. त्यांनी आज शिक्षार्थ्यांना जे शिकवायचे आहे त्याची उजळणी.


मग सर्वजण केवळ एका शिट्टीसरशी आपापल्या गणात बसतात. एक आखूड शिट्टी आणि ८८१ जण ४२ पंक्तींमध्ये ६० सेकंदांच्या आत. कुठेही आवाज नाही. गडबड नाही. मग एकात्मता स्तोत्र सुरु होते. त्यात भारतातील प्रमुख नद्या, पर्वत, तीर्थक्षेत्रे असे प्राकृतिक उल्लेख झाल्यानंतर महान स्त्रिया, महापुरुष, साहित्यिक, संशोधक, योद्धे, क्रांतिकारक अशांचे स्मरण केले जाते. मग एकात्मता मंत्र होऊन संघस्थानाला प्रारंभ होतो.

संघस्थान म्हणजे शारीरिक प्रशिक्षणाचाच भाग. यात कालांश (periods) पाडलेले असतात. योगासन, दंडयुद्ध, पदविन्यास, खेळ अशा तासिका असतात. शारीरिक दृष्ट्या चिवट, चपळ आणि मजबूत बनविण्यासाठी या संघास्थानाचा खूप उपयोग होतो. दंडयुद्ध आणि नियुद्धात झुंजार वृत्ती वाढवण्याचा आणि आक्रमणाचा सामना करण्याचा सराव होतो. यात आधी द्वंद्व म्हणजे एक विरुद्ध एक, मग एक विरुद्ध दोन, एक विरुद्ध पाच आणि शेवटी एक विरुद्ध अनेक असा सराव होतो.
 दंडयुद्ध. प्रकार "एक विरुद्ध अनेक" (हल्लाफोड)
संघस्थान झाल्यावर २० मिनिटांचा श्रमसाधना कालांश. यामध्ये स्वयंसेवकांच्या गटांना ठराविक काम नेमून दिलेले असते. उदा. शौचालाय स्वच्छता, संघस्थानाचे रेखांकन, स्मृती-मंदिर परिसर स्वच्छता इ. आणि मग न्याहारी.

आमच्या गटाला यात एक दिवस काम आले ते कंपोस्ट खताचे! म्हणजे दररोज च्या १०००-१२०० जणांच्या जेवणाचे जे खरकटे २ मोठाल्या पिंपात आणि एका गाड्यात जमा केले जात असे ते दूर संघस्थानाच्या शेवटी २ मोठे खड्डे खणून त्यात ओतायचे, विशिष्ट पावडर शिंपडून माती लोटायची. आमच्या गणशिक्षकांनी आम्हा ४ जणांना सांगितले, “जाओ और तुरंत वह सब जूठन (खरकटे) लेकर आओ”.  आम्ही लगेच गेलो. २ पिंपे लाकडी गाडीवर चढवली आणि निघालो. त्या ठिकाणी जाऊन पोहोचताच पिंपे खाली उतरवायला गाडीवर चढलो तोच दुसरे शिक्षक म्हणाले, “अरे आतल्या प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या करा”. त्या पिम्पातील ब्रह्मांडाकडे बघताच पोटातील प्रतिक्षिप्त क्रिया होऊ लागल्या. मंथन चालू असतानाच खाली उभ्या असलेल्या एका स्वयंसेवकाने एक छोटी काठी दिली. काम सुरु झाले. हळूहळू ती काठी गेली आणि सरळ हाताने काम चालू झाले. एकदा हात घातल्यावर काय. मग १० मिनिटे तो कार्यक्रम चालला. आतमध्ये भाताची शिते, मिरच्या, कांदे, लोणच्याच्या फोडी, लगदा, आणि अन्य पदार्थांचे अंश होते. आदल्या दिवशी “जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर होते”, ते ते सर्व आता विपरीत स्थितीत होते! जवळपास सर्व प्लास्टिक वेगळे केले. मग ती पिंपे उतरवली. शिक्षक म्हणाले, “अरे विक्रम, तुला ग्लोव्ज नाही दिले?”. मी कपाळावर हात (मारला असता, स्वच्छ असता तर!) न मारता म्हटले, “फार लवकर सांगितलेत..आता उद्या द्या”. पण माझी खात्री आहे की त्यांनी मुद्दामहून माझी तयारी होण्यासाठी हे असं करवून घेतलं. अन्य स्वयंसेवकांनी तोपर्यंत खड्डा खणून मोठा केला होता. काहींनी पिंपे आत ओतली. पावडर शिंपडून माती लोटली. कालांश पूर्ण झाला! मग न्याहारी. आता कशाने आणि कितीवेळ हात धुऊ असं झालं होतं...पण वेळ एवढा कमी की उशीर झाला तर न्याहारी नाही मिळायची. म्हणून हात धुतले, समाधान करून घेतले आणि न्याहारी खाल्ली. दिवसभराचा विचार करताना जाणवलं की आपल्याला १० मिनिटांसाठी काय वाटलं...परंतु ज्यांचा जन्मच अशा कामामध्ये जातो ते आयुष्य काय असेल? किती श्रमप्रतिष्ठा देतो त्या कामाला आपण? त्यांनी हे काम करायचे नाकारले तर? शहरांचे काय होईल? सोसायट्यांचे काय होईल? असो. श्रीरामकृष्ण परमहंसांची एक गोष्टही आठवली. असं म्हणतात की रामकृष्णांनी साधनाकालामधे अंतिम टप्प्यात संपूर्ण कलकत्त्याचा मैला जिथे टाकला जात असे तिथे जाऊन २ कांड्या सरळ आत खुपसल्या व ते ग्रहण करायला सुरुवात केली. सर्वच ब्रह्म. स्वहस्ते आश्रमातील शौचालयं साफ करणाऱ्या गांधीजींचीही आठवण आली. सकाळी एकात्मता स्तोत्रात आपण ही नावे उगाच नाही घेत हे जाणवलं!


स्नान आणि घोषवर्ग आटोपून मग असे योगनिद्रा (म्हणजे शवासन/चैतन्यासन) आणि चर्चा. चर्चागट वेगळे असत. शैक्षणिक आणि कामाच्या स्वरूपावर हे चर्चागट पाडले होते. विविध विषयांवर चर्चा होत असे. या चर्चेला दिशा देण्यासाठी चर्चा प्रवर्तक असतात. चर्चा गटात दररोज एकाने आपला विस्तृत परिचय द्यायचा असतो. म्हणजे आपला संघप्रवेश कसा झाला, घरी कोण-कोण आहेत, आपल्या क्षेत्राचा परिचय, प्रसिद्ध गोष्टी वगैरे...आमच्या चर्चा गटात आंध्र प्रदेश चा राजू होता. विस्तृत परिचय चालू होता..आणि आम्ही अवाक झालो. कारण राजू तोडक्या-मोडक्या हिंदी-इंग्रजीत सांगत होता, “I lost my father...यहां आनेका बाद”. मग चर्चागट प्रवर्तकांनी विचारलं, “तुम गये नही”? ..“हम जाके वापस आया.”  सर्वजण स्तब्ध. चर्चा प्रवर्तक मग भानावर येत पुढे म्हणाले कैसा हुवा वगैरे. पण राजूचे उदाहरण सर्वांच्या काळजावर कायमचे उमटून गेले! वर्गात आल्यावर ८ दिवसांनी कळतं की, घरी वडील गेले आहेत आणि तो स्वयंसेवक वर्गातून घरी जाऊन अंत्यसंस्कार आटोपून १ दिवस राहून परत वर्गात येऊन समरस होऊन जातो. याला काय म्हणावं?

चर्चागट कधीकधी खूप रंगतो. परस्परविरोधी मतं असतात. प्रत्येकजण युक्तिवाद करत असतो. परंतु या सर्वांना नंतर समेवर आणून कोरसमध्ये ‘संघराग’ गायला लावणे हे चर्चा प्रवर्तकाचे काम. आणि यात कालांश संपल्याचा शंख(बिगुल) कधी वाजतो ते कळतही नाही. 
चर्चागट झाल्यावर प्रवचन कालांश. यात संघ अधिकारी येऊन शाखेची बौद्धिक/शारीरिक/संपर्क रचना, धर्मजागरण विभाग, असे एकेक विषय स्पष्ट करतात. ४ दिवस प्रचार अथवा सेवा विभागाचे प्रशिक्षण. आणि मग संध्याकाळचे बौद्धिक.
संघबाह्य मंडळींमध्ये या बौद्धिकाबद्दल खूप भ्रामक कल्पना आहेत. बौद्धिक रटाळ, शुष्क, तेच तेच असतं इ. पण बौद्धिक म्हणजे एक मेजवानी असते. विचारधारेत न्हाऊन निघणे म्हणजे काय ते बौद्धिक ऐकल्यावर जाणवतं. काठावर बसून नदीचे पाणी भलतेच गार असणार हो, खूप खोल असणार हो, आत प्राणी असतील हो, विषारी वनस्पती असतील हो अशा नाना शंकाकुशंका काढणारे कधी पोहतही नाहीत आणि पोहणाऱ्यांना प्रोत्साहनही देत नाहीत. पोहणारे मात्र मजा तर घेतातच पण प्रवाह म्हणजे काय आणि प्रवाहाच्या उलट पोहणे म्हणजे काय हे अनुभवतात. काठावरच्यांना काय सांगणार त्यात काय आनंद असतो ते! कधी कधी काठावरचे निसर्गाच्या तडाख्यासरशी पडतात येऊन प्रवाहात. सवय नसल्याने नाका-तोंडात जाऊ लागतं पाणी. पण मग पोहणारे त्यांना आधाराचा हात देतात. तसं या बौद्धिकांचं वर्णन काय करणार. ते अनुभवायलाच हवं. संघाचे मूलगामी चिंतन काय आहे? विचारधारेचे आणि कार्यपद्धतीचे अपरिवर्तनीय भाग कोणकोणते आहेत? कोणत्या बाबींमध्ये युगानुकूल परिवर्तन होऊ शकते? संघ ध्येयप्राप्तीसाठी कोणत्या मार्गावरून मार्गक्रमणा करत आहे? हिंदुत्व, एकात्म मानवतावाद, धर्म, राष्ट्रीयता, स्वदेशी, आर्थिक चिंतन, शैक्षणिक चिंतन, राजकीय चिंतन, राष्ट्र-संकल्पना, परमपूजनीय डॉक्टरजींचे जीवन अशा अनेक बाबींवर बौद्धिक होतं. 

बौद्धिक झाल्यावर चहापान-न्याहारी आणि गणवेश तयारी. सर्वजण आपापल्या गणवेशाला कडक तयार करत असतात. बुटांना आणि पट्ट्याला पॉलिश करून गणवेश चढवून सर्वजण संघस्थानावर येतात. सकाळप्रमाणेच संध्याकाळचे संघस्थान. पण संध्याकाळच्या तासिका वेगळ्या. त्यात आचारपद्धती, संचलन, रचना, समता, यांचा अभ्यास. संघस्थान प्रार्थना होऊन संपते. सकाळचे संघस्थान प्रारंभ होताना जो सूर्यनारायण पूर्वेहून कौतुकाने बघत असतो तोही आता संघस्थान संपणार या मनस्थितीत स्वगृही जात असतो. संधिप्रकाशात ध्वज उतरत असताना शंखाचे निनादणारे स्वर वातावरण भावूक बनवतात.
दुपारचे चर्चागट झाल्यावर भोजन असतं आणि संध्याकाळी संघस्थान झाल्यावर एखादा माहितीप्रद कार्यक्रम झाल्यावर भोजन. संघ शिक्षा वर्गातील भोजन हा एक पाहण्यासारखा सोहळाच असतो. पंगत बसलेली असते. ठराविक गणांना वाढप व्यवस्था (वितरण) दिलेली असते. प्रत्येकाचा गाळा ठरलेला असतो, तिथेच त्याने वाढप करायचे. जवळपास ९०० जणांची पंगत मोठ्या सभागृहात बसत असे आणि त्याला वाढपव्यवस्था. कुठेही गडबड नाही-गोंधळ नाही. भोजन मंत्र होतो. आणि मग भोजनाला सुरुवात. पहिली पंगत झाल्यावर मग त्यातील ज्यांना नेमून दिलेले असेल त्यांनी दुसऱ्या पंगतीत पहिल्या वितरणाच्या स्वयंसेवकांना वाढायचे. क्वचित एक दिवस खडा-भोजन असते. म्हणजे गणवेश न उतरवता उभ्याने जेवायचे. जेवणही लवकर आटोपले पाहिजे आणि गणवेशाला कळताही कामा नये भोजन झाले ते! कधी मौन कालांश. म्हणजे बाहेरून जाणाऱ्यांना वाटेल अरे सभागृहात तर कोणीच नाही, पण प्रत्यक्षात ९०० जण आनंदाने जेवत असतात!
जेवण झाल्यावर मग गप्पा मारत मारत सर्वजण निद्रेच्या अधीन होतात. हा साधारण दिनक्रम. यात घोषवर्ग, शहरातून संचलन, विशेष सराव या गोष्टी चालतच असतात. हळूहळू शेवटचे दिवस सुरु झाल्याची जाणीव होऊ लागते. सगळ्यांची मने अस्वस्थ होऊ लागतात. एकमेकांचे संपर्काचे पत्ते, दूरध्वनी घेणं सुरु होतं. जाहीर समारोपाच्या प्रात्यक्षिकांची तयारी जोरात सुरु असते. शिवाय सर्व शारीरिक विषयांवर परीक्षाही असते. त्याचा अभ्यासक्रम लावला जातो. एकमेकांना विचारून, शिकवून, शिकून परीक्षेला तयार होतात.
जाहीर सामारोपातील घोष प्रात्यक्षिक.

जाहीर समारोप मोठ्या उत्साहात होतो. आलेल्या सर्व प्रेक्षकांसमोर व प्रमुख अतिथींसमोर शिक्षार्थी महिन्याभराच्या प्रशिक्षणाची झलक सादर करतात. होणाऱ्या कौतुकाने साफल्य वाटत असले तरी मनात उद्या आपण विलग होणार ही भावना घर करून असते.

जाहीर समारोपाचे विहंगम दृश्य.


दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वजण शुचिर्भूत होऊन, शाखावेशात बौद्धिक सभागृहात येतात. दीक्षांत समारोह असतो. दीक्षांताचे उद्बोधन झाले की प्रार्थना होते आणि मग सर्व शिक्षार्थी तृतीय वर्ष शिक्षित होतात!
आपापल्या कार्यक्षेत्रात जायचे. महिनाभर ज्यांच्याबरोबर राहिलो त्यांना निरोप द्यायचा. 

स्मृतीमन्दिराजवळ भेटायचे ठरलेले असते. आदल्या दिवशी सर्वांचे मोबाईल मिळाल्याने छायाचित्रं काढणं सुरु असतं. एकमेकाला आलिंगन देऊन ‘या हृदयीचे त्या हृदयी घालूया’ हा संघमंत्र जपत-जगत हळूहळू आपापल्या प्रवासाला लागतात सारे. साऱ्या वातावरणात उत्साह आणि खिन्नता यांचे एक अजबच मिश्रण असते. स्मृतिमंदिरात गर्दी होते. सर्व डोळ्यात साठवून घेऊन विशाल भारत आपल्या प्रवासाला निघतो. कोणी पार उत्तर सीमेला जाणार, कोणी दक्षिण किनाऱ्यावर. कोणी पूर्वांचलात जाणार तर कोणी पश्चिम किनारपट्टीवर. वर्गातून प्रेरणा घेऊन काही स्वयंसेवक ‘प्रचारक’ म्हणून निघतात. म्हणजे घर सोडून संघ सांगेल तिथे ‘पूर्णवेळ’ संघाचेच काम करायचे. अशा प्रचारकांचे मनोज्ञ दर्शन या वर्गात घडते.

परत असे एकत्र भेटणे तेही गणातील २४ जणांनी हे अशक्यच. तेव्हा कधी भेट होईल हे सांगता येत नसते. ‘मायेच्या हळव्या स्पर्शाने’ आभाळानेही धरणीवर थेंबांचा शिडकावा केलेला असतो. मृद्गंध सुटलेला असतो. इथे ‘सारे प्रवासी घडीचे’ नसतात तर ‘सारे प्रवासी ओढीचे’ झालेले असतात. आणि आपले हजारो जणांचे विशाल कुटुंब असल्याचा अनुभव घेऊन पुलकित झालेली ही मने नव्या चैतन्याची आणि स्फूर्तीची संघपहाट आणण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात उमेदीने परततात. 

21 comments:

 1. बौद्धिक हा कार्यक्रम फक्त इतरांचे विचार ऐकून घेणे आणि त्यावर पूर्वग्रह न बाळगता चिंतन करणे हे वैयक्तिकरीत्या शक्य असल्यासच समजून घेणे शक्य आहे. पण पूर्वग्रह टिकवून धरणे म्हणजेच अस्मिता जपणे अशी समजूत रूढ असल्याने बौद्धिक हा प्रकार मानवणे कठीण आहे.

  ReplyDelete
 2. विक्रमजी..
  संघाचा स्वंयसेवक असूनही तृतिय वर्ष संघ शिबिराबद्दल विशेष माहीती नव्हती.तुमच्या या उत्तम लेखामुळे संघ समर्थकांबरोबरच विरोधी विचारसरणीच्या लोकांचीही संघाबद्दलची पूर्वग्रहदूषीत मतं बदलायला नक्कीच मदत होइल.धन्यवाद!

  ReplyDelete
 3. @ शरयू जी,- बौद्धिक देण्यार्या वक्त्याची काही मते पटली नाहीत तर बौद्धिक संपल्यावर त्याला भेटण्याची संधी प्रत्येकाला असते. कोणीही जाऊन भेटू शकतं, आणि त्यावेळी आपलं मत सांगू शकतं. शिवाय दर दिवशी चर्चागट सुरु होतो तोच आदल्या दिवशी झालेल्या बौद्धिकाविषयीच्या चर्चेने. संघाच्या विचारसरणीचे मूलभूत बिंदू मान्य असल्याशिवाय तृतीयला (तृतीयपर्यंत!) जाणेच शक्य नाही. त्याला 'पूर्वग्रह' ही म्हणू शकतो किंवा 'अढळ' ध्येयनिष्ठाही!

  ReplyDelete
 4. फार छान लिहिलं आहेस... माहितीपूर्ण, भावूक, आणि प्रेरणादायी...फारच छान

  ReplyDelete
 5. या 'मास्टरपीस'ची बरेच दिवस वाट पाहत होतो..

  ReplyDelete
 6. Namaskar,
  Great blog. Thanks for sharing your experience there. Please keep writing.

  Dhanywad,
  Jayant Pant

  ReplyDelete
 7. Namaskar,

  Khoop Chan Varnan !!!

  ~Pushpahas

  ReplyDelete
 8. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 9. Apratim !!!!

  Blog atishay sadhya va sopya bhashet lihila ahe.

  Maza swatacha anubhav ahe. Pratham varsha zalyavar swatah madhe khup badal zale.
  Vaicharik disha va Swabhiman mala Vargatun milale.


  Tritiya va dvitiy varsha kiti majeshir asatil....lekh vachatana janavate.

  ReplyDelete
 10. Dear Vikram, very well written narrative experience. It can be quite educative to people uninitiated in Sangh. Thanks for your efforts.

  ReplyDelete
 11. Sundar lihila ahes, kharkatyacha bhaag tar faar chhan ahe. Evana compost tayar zala asel :) Ghanichya bhavanecha suddha. Ek suggestion ahe: Kalansh vagairesarkhya shabdanaivaji Kaal ashasarkhya shabda vaparle tar vachtana adkhallyasarkha nahi vatnar.

  ReplyDelete
 12. amrutacha ek kan milala ki amrut prashanchi lalasa vadhis lagate yacha anubhav dusara nahi!

  ReplyDelete
 13. खुप छान लेख आहे.

  ReplyDelete
 14. apratim lekh .. atishay sundar.. lekhatil pratyek kshan mee jagalo .. tase anekjanhi jagale asateel. Antarnishthachya Khuna |Antarnishthach janatee!

  ReplyDelete
 15. Namsakar,

  Varanan sundar aahe. Vachun aanand vatala aani thodya vel Trutila jaun aalo. dhanyavad ti anubhuti dilya baddal.

  Kailas Narawade
  Akshar Bharati Coordinator, Pune. 9604533919

  ReplyDelete
 16. खूप छान वर्णन मांडलं आहे. मला तर खूप कठीण वाटत अस लिहिण.
  या लेख मुळे ज्यांना संघ माहित नाही त्यांना चान्ल्या प्रकारे माहित मिळेल.

  ReplyDelete
 17. सामाजिक सहजिवनाचा असा मार्ग आणी अशि शाळा उत्तम भारतीय नागरीक घडउ शकेल. जयहिंद .

  ReplyDelete
 18. aananda cha dohi budavile tumhi ....
  budatana aamhi dhanya zalo......

  ReplyDelete
 19. @ वेधस - धन्यवाद वेधस. तुझा प्रतिसाद फार महत्वाचा असतो.
  @ पुष्कर - अरे मी सुद्धा वाट पाहत होतो, कधी तयार होतो हा 'पीस' आता 'मास्टरपीस' वगैरे तुम्ही ठरवायचे.
  @ जयंतपंत - keep reading. dhanyavad.
  @ पुष्पहास आणि प्रसन्न - धन्यवाद. असाच प्रतिसाद देत राहा.
  @ रतन जी - धन्यवाद. आपले आशीर्वाद.

  ReplyDelete
 20. Priy Vikram,

  Khoop sundar lihile ahes. Mi hi yacha ek sakshidar asalyane adhik bhavle, javalche vatale. Ek avismaraniy, aitihasik, utsahvardhak asach anubhav hota to! Aso, keep it up!

  ReplyDelete
 21. Mitraaa, tuza Marathi Apratim aahe !
  hats off to u....
  Keep posting..

  Love and more ...
  Abhijit

  ReplyDelete