"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Tuesday, May 4, 2010

मानवी बॉम्ब...

मानवी बॉम्ब म्हणजे ‘स्वतःच्या अंगाला स्फोटकं बांधून घेऊन ती नियोजित स्थळी, नियोजित वेळी उडवून देणे’. हा झाला प्रचलित अर्थ. परंतु मला हा अर्थ अभिप्रेत नाही. ज्या माणसाच्या मनात येतं की ‘आपण स्फोट घडवून आणवून दहशतवादी कृत्य करावं’ तोच खरा ‘मानवी बॉम्ब’!

असे मानवी बॉम्ब का निर्माण होतात? जगभर चाललेल्या या थैमानाला एकच एक कारण नाही. आंतरराष्ट्रीय धोरणापासून, सांप्रदायिक अभिनिवेश, भावनिक गुंतागुंत, आर्थिक देवघेव, प्रादेशिक अस्मिता ही आणि अशी इतर कारणं आहेत. भारतीय उपखंडात हे सर्वच प्रकार पहावयास मिळतात. पण भारतात गेल्या काही दशकात नवीन प्रकार अस्तित्वात आले आहेत. आणि त्याचाच उहापोह या लेखात केला आहे.

जगाला ज्या भस्मासुराने भंडावून सोडलं आहे, तो ‘सांप्रदायिक अभिनिवेशापोटी’ (धार्मिक नव्हे! कारण धर्म आणि रिलीजन यात फरक आहे. रिलीजन म्हणजे संप्रदाय होऊ शकेल) जन्माला आलेला आहे. आपलाच संप्रदाय (ज्याला लोक धर्म म्हणतात) श्रेष्ठ आणि बाकीचे टाकाऊ. असे इतर संप्रदाय, उपासनापद्धती मानणारे ‘नॉन बिलिव्हर्स’ आहेत आणि त्यांना संपवले पाहिजे, या विचाराने प्रेरित दहशतवादी आपण पहिले आहेत. आणि आज नव्याने नव्हे, तर पूर्वीपासून होणारी आक्रमणं, अत्याचार, कत्तली, प्रार्थनास्थळांचे विध्वंस, जबरदस्तीचे मतांतरण असे प्रकार आपल्या पूर्वसुरींनी अनुभवले आहेत. त्यामुळे भारतात तो प्रकार आहेच. मला त्याचं नाव घेण्याची गरज नाही. सर्वविदित सत्याचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही. पण काळजीचा प्रश्न आहे तो म्हणजे हिंदुत्वाला मानणारे, हिंदुत्वासाठी काम करणारे आणि हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे काहीजण या मार्गाला लागत आहेत की काय? की काही समीकरणे जुळविण्यासाठी मुद्दाम त्यांना गोवलं जातंय? दोन्ही बाजू समान करून समीकरण जुळविण्यात आणि आपली राजकीय गणितं पक्की करण्यात राजकारण्यांचा हात कोणी धरू शकणार नाही.

असे प्रकार घडत असतीलही. ते अस्वीकारार्ह आहेतच. पण ते ‘घडू नयेत म्हणून’, ‘का घडतायत’ याचा मागोवा घ्यायला हवा. त्यामुळे क्षणभरासाठी असे धरून चालू की, असे काही अगदी तुरळक प्रकार घडले आहेत. अहिंसा, शांती, विश्वकल्याण, एकात्म मानवदर्शन यांचा घोष करणाऱ्या हिंदुत्वाचा ज्यांना अभिमान आहे ते अशा मार्गाला का वळतायत? आणि जर ते वळत असतील तर हा घातक मार्ग सुरुवातीलाच बंद करायला हवा.

धर्माला संरक्षणासाठी शस्त्रावलंब करण्याचे वावडे नाही. जवळपास प्रत्येक हिंदू देवतेच्या हातात शस्त्र आहे. पण ते असुरनिर्दालनासाठी. आपल्याच देशात अशांतता माजवण्यासाठी नव्हे. आपल्या देशात क्रांतीकार्याला तोटा नाही. क्रांतिकारक हे स्वातंत्र्यपूर्व काळात शस्त्रे मिळवून, शास्त्र शिकून स्फोटकं बनवून त्याचा वापर करत असत. हिंदुत्ववादी क्रांतिकारकांना याचे वावडे नव्हते. स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, मदनलाल धिंग्रा असतील किंवा डॉ. हेडगेवार असतील, या सर्वांनी या मार्गाचा अंशतः अनुभव घेतला होता. डॉ. हेडगेवार (रा.स्व.संघ संस्थापक) जेव्हा कलकत्त्याला शिकायला गेले, तेव्हा बंगाल हे क्रांतिकारकांचे एक प्रमुख केंद्र होते. अनुशीलन समितीच्या कार्यात डॉ. सहभागी झाले. जेव्हा बॉम्ब बनवण्याच्या छुप्या जागेमध्ये चुकीने बॉम्बस्फोट झाला आणि इंग्रज सरकारद्वारा धरपकड सुरु झाली तेव्हा डॉ. हेडगेवारांना या मार्गाच्या मर्यादितपणाची जाणीव झाली. त्यांच्या लक्षात आलं की या मार्गाने स्वातंत्र्यप्राप्ती अनिश्चित, सुदूर आणि विलंबित आहे. म्हणून त्यांनी तो मार्ग सोडून दिला.

आजचे हिंदुत्ववादी या मार्गाकडे वळतायत का? आज भारत स्वतंत्र आहे. आपले सरकार आहे. आपले राज्य आहे. मग अजूनही या निष्फळ मार्गाकडे वळणे पसंत का करावे?

देशातील सरकारचे धोरण हे बहुसंख्य समाजाच्या विरोधात आणि अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचे राहिले आहे. शाहबानो प्रकरणात सरकार त्वरेने झुकले, न्यायव्यवस्थेला फाट्यावर मारले आणि अशी अनेक उदाहरणे स्वतंत्र भारतात बघायला मिळाली, ज्यामुळे सरकारच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आजचे ‘मानवी बॉम्ब’ हे सरकार आणि असे नेते निर्माण करत आहेत.
ही कोणत्या प्रकारची धर्मनिरपेक्षता? 
या देशातील संसाधनांवर सर्वांचा समान हक्क आहे हे सांगण्याचे सोडून ‘अल्पसंख्यांकांचा अग्रहक्क आहे’ असे आग्रहाने प्रतिपादणारे पंतप्रधान. वारंवार विद्वेषमूलक विधाने करूनही मोकाट राहणारे जामा मशिदीचे इमाम, पण शंकराचार्यांना त्वरेने पकडणारे सरकार. सच्चर समितीचा अहवाल लादू पाहणारे सरकार. विकासाच्या नावाखाली रामसेतू तोडण्याचा प्रयत्न करणारे सरकार, ‘कुतुब मिनार’ मुळे मेट्रोचा मार्ग बदलू शकते. ‘हिंदूंची आत्मघातकी पथके निर्माण झाली पाहिजेत’ अशी चिथावणीखोर भाषणे करणारे तथाकथित हिंदू नेते आणि काही ‘सम्राट’. हिंदूंची जनजागृती करण्याच्या नावाखाली विद्वेष पसरविणाऱ्या संस्था. म्हाडामध्ये अल्पसंख्यांकांसाठी राखीव जागा/घरे ठेवण्याचे सुतोवाच करणारे निर्लज्ज शरद पवार. त्यांची बाजू घेऊन बाष्कळ विधानं करणारे जितेंद्र आव्हाड. केवळ हिंदू विद्यार्थ्यांना फी लावणारे राज्य सरकार. पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावर यात हिंदुत्ववाद्यांचा हात असू शकतो अशी मुक्ताफळं उधळणारे राज्य सरकार. आणि धड काही न सांगता येणारे, या राज्याचे गृहराज्यमंत्री बागवे (हेच ते ज्यांनी स्वामीनिष्ठा दाखविण्यासाठी राहुल गांधींचे जोडे उचलून कवटाळले होते! त्यांच्याकडून अधिक काय अपेक्षा असणार म्हणा!). या २ बातम्या पहा- १) http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=9937 २) http://www.esakal.com/esakal/20100409/5654627742262238642.htm. या परस्परविरोधी बातम्या आहेत. एक तर तपास पूर्ण झाल्याशिवाय बडबड का करावी? आणि ठाम माहिती असल्याशिवाय अशा गोष्टी प्रकट करू नयेत. मराठीतील एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे ‘सुमार’ संपादक मोठ्या आवेशाने आपल्या लेखात नेहेमीच गुळगुळीत विधाने करतात, ‘दहशतवादाला कोणता धर्म नसतो वगैरे. पण मग चवीने स्फोटामागे ‘हिंदू दहशतवादी’ असल्याचेही छापतात. का हा दुटप्पीपणा? बहुसंख्य समाजाला डिवचणे म्हणजे धर्मनिरपेक्षता का? काश्मिरी पंडितांचे हलाखीचे जीवन न दिसणारी तीस्ता सेटलवाड. भारतमातेचे आणि हिंदू देवतांचे नग्न चित्र रेखाटणारा विकृत हुसेन. त्याला सन्मानित करणारे सरकार. हुसेन गेल्याची हळहळ व्यक्त करणारी देशद्रोही जमात. अशा सर्व प्रकारांमुळे उद्रेक होण्याला वाव मिळतो. फहीम, सबाउद्दीन निर्दोष सुटतात, पण प्रज्ञासिंग, पुरोहित हे अटकेत राहतात आणि निकालाअभावी पिचत राहतात. ही धर्मनिरपेक्षता का? दहशतवाद्यांना भेटणारा, मदत करणारा बेशरम अबू आझमी मोकळा राहू शकतो ही बाबच रक्त तापण्यास पुरेशी आहे. दिल्लीत बाटला हाऊस एन्काऊंटरमध्ये ज्यांनी जीवाची बाजी लावून अतिरेक्यांना नरकात पाठवलं त्या हुतात्मा मोहनचंद्र शर्मांवर संशय घेतो अमरसिंग. कोणाच्या दाढीला कुरवाळण्यासाठी? ही समाजवादी पार्टी खरोखरच ‘स’माजवादी पार्टी (माजासहित!) झाली आहे. संघावर वर्षानुवर्षे तोंडसुख घेण्यात धन्यता मानणारे महाराष्ट्रातील समाजवादी कुठे ‘ग्रेट भेट’ घेण्यात मग्न आहेत? त्यांना हे समाजवादाच्या नावाखाली काय चालू आहे ते दिसत नाही का? स्वतःच्या पायाखाली काय जळते आहे ते पहा!

जो कोणी दोषी असेल त्याच्यावर भारतीय न्यायप्रणाली अनुसार कारवाई केली पाहिजे, परंतु दुटप्पी धोरण आणि सरकारचा दबाव यामुळे बहुसंख्य समाजाच्या मनात आज चीड निर्माण होत राहिली आहे, त्याचा दबाव निर्माण होत राहिला आहे ज्याला कुठेतरी चुकीची वाट मिळत राहिली आहे. पण ही वाफ कोंडणारे या स्फोटांना कारणीभूत आहेत.

त्यामुळे जेव्हा जेव्हा हिंदुत्ववादी या प्रकरणात गोवले जातील तेव्हा ते खोटे असून समीकरण जुळविण्यासाठी असेल किंवा वाट चुकलेले हिंदुत्ववादी या प्रकारच्या घटनांमध्ये खरेच असतील तर ते वरील लोकांमुळे. बाहेरून भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्यांना ठराविक विचारसरणी आहे. केवळ भारतद्वेष नसून संपूर्ण जग पादाक्रांत करण्यासाठी निघालेली ती टोळधाड आहे. पण किमान भारतातच असे माथेफिरू तयार न होऊ देणे हे आपल्या हातात आहे. तेव्हा वैयक्तिक, राजकीय स्वार्थासाठी दुटप्पी भूमिका घेण्याचे सोडून देऊया आणि मानवी बॉम्ब तयार करणं थांबवूया.



हिंदू विद्यार्थ्यांनी काय गुन्हा केलाय? की हिंदू म्हणून जन्माला येणं हीच त्यांची चूक???