3. बसंत कुमार बिस्वास
“बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए” । हा आनंद सिनेमातला डायलॉग आपल्याला आठवत असेल. हा डायलॉग प्रत्यक्ष जगलेला, उणंपुरं २० वर्षांचं आयुष्य लाभलेला बसंत कुमार बिस्वास हा आहे आजचा अनामवीर!
महाराष्ट्र, बंगाल, पंजाब म्हणजे क्रांतिकारकांसाठी सुपिक भूमीच जणू. स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक अशांपासून प्रेरणा घेऊन क्रांतिकार्यासाठी जीवन समर्पण करणारे हजारो युवक प्रांतोप्रांती तयार झाले. वधस्तंभावर जाणारा एक युवक म्हणजे पुढच्या कित्येक वीरांसाठी प्रेरणा. ६ फेब्रुवारी १८९५ ला बंगालमधील नादिया जिल्ह्यातील पोरगछा या ठिकाणी मतिलाल आणि कुंजबाला बिस्वास या दाम्पत्याच्या पोटी बसंतचा जन्म झाला. दिगंबर बिस्वास आणि मन्मथनाथ बिस्वास अशा क्रांतिकारकांच्या घराण्यात जन्मल्यामुळे त्याच्याही धमन्यांतून क्रांतीचे रक्त न खेळते तरच नवल! गावातल्याच शाळेत त्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली पण पुढे बसंत जवळच्याच माधवपूर नावाच्या गावातील शाळेत जाऊ लागला जिची स्थापना प्रख्यात समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक गगनचंद्र बिस्वास यांनी केली होती . पुढे १९०६ ला मुरगच्चा शाळेत त्याचा प्रवेश झाला जिथे खिरोधचंद्र गांगुली हे मुख्याध्यापक होते. खिरोधचंद्राच्या मार्गदर्शनाखाली बसंतचा स्वातंत्र्यलढ्यातील प्रवास सुरू झाला. आणि पुढे मग रासबिहारी बोस यांच्या संपर्कात आल्यानंतर बसंतचे शस्त्रास्त्रे व स्फोटके यातील प्रशिक्षण सुरू झाले. रासबिहारी त्याला बिशे दास अशी प्रेमळ हाक मारत असत.
१९११ ला किंगजॉर्ज पंचम याचा भारतप्रवास होता आणि राजधानी म्हणून कलकत्त्याऐवजी दिल्लीची घोषणाही झाली होती. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग कलकत्त्याहून दिल्लीत आला होता. त्याचा स्वागतसमारंभ होता. तो दिवस होता, २३ डिसेंबर १९१२. दिल्लीच्या चांदणी चौकात मोठीच सजावट करण्यात आली होती. सर्वत्र रोषणाई केली गेली होती. फुलांच्या माळांची आरास लक्ष वेधून घेत होती. आणि एका सजवलेल्या गजराजाचे आगमन झाले. मऊ झूल पांघरलेल्या त्या हत्तीवरच्या हौद्यात लॉर्ड हार्डिंग व त्याची पत्नी बसले होते. अन्याय आणि जुलूम यांची परकीय राजवट असली तरी आत्मविस्मृत भारतीय कसे स्वत्व विसरून आपले जंगी स्वागत करत आहेत ही मौज पाहण्यात हार्डिंग दाम्पत्य मग्न होते. आजूबाजूच्या आत्मशून्य गर्दीत एका तरुणीची तीक्ष्ण व भेदक नजर चहूबाजूंना फिरत होती. बरोबरच्या तरुणाबरोबर तिची नेत्रपल्लवीही चालली होती. तो क्षण आला आणि त्या तरुणीने हार्डिंगच्या दिशेने बाँब भिरकावला. बाँबसुद्धा गद्दार निघाला! त्याने अभागी माहुताचा बळी घेतला पण हार्डिंग दाम्पत्य बचावले. चार्ल्स हार्डिंगला जखमा झाल्या. हत्ती बावचळून गेला. सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. काही क्षणांपूर्वीच्या समारंभमग्न चांदणी चौकाचे स्वरूप एकदमच बदलून गेले. जो तो वाट फुटेल तिथे पळू लागला. याच गर्दीचा फायदा घेऊन ती तरुणी व तिचे सहकारी निसटले. ती तरुणी म्हणजेच पौरुषत्वाचे दर्शन घडविणारा पोरसवदा बसंत होता! त्याच्याबरोबरचा साथीदार म्हणजे मन्मथनाथ बिस्वास! आणि या कटाचे योजक सूत्रधार होते रासबिहारी बोस.
सर्व क्रांतिकारकांनी कमालीची गुप्तता बाळगली. पण ब्रिटिशांनी हा हल्ला मनाला लावून घेतला. त्यांनी बारकाईने तपास सुरु केला. सहभागी लोकांची नावे सांगणाऱ्यांना मोठी इनामे जाहीर करण्यात आली. पण हाताशी काहीच लागत नव्हते. गंमतीचा भाग म्हणजे त्यादिवशी रासबिहारी बोस त्या गर्दीतून निसटून रेल्वेने डेहराडून ला येऊन आपल्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट मधे दाखल झाले. आणि काही महिन्यांनी लॉर्ड हार्डिंग ची भेट डेहराडून ला त्यांच्या कार्यालयात असताना त्याच्या सन्मानार्थ मेजवानीचेही आयोजन त्यांनी केले. त्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून हार्डिंग सहीसलामत वाचल्याबद्दल ईश्वराचे आभारही मानले गेले! पण फंदफितुरीचा शाप लागलेल्या समाजाविरुद्ध लढणे सोपे असते. ब्रिटिशांना हळूहळू सुगावा लागत होता.
बसंतच्या मागावर पोलीस लागले. बसंत पोलिसांना गुंगारा देत होता पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार करायला आलेल्या बसंतला २६ फेब्रुवारी १९१४ ला पोलिसांनी बरोबर पकडले. पोलीस आज ना उद्या आपल्यालाही पकडणार ही खात्री झाल्याने रासबिहारी चंदननगर ला स्थलांतरित झाले. तिथे भूमिगत राहिल्यानंतर एप्रिल १९१५ ला ते जपानला निघाले.
इथे २३ मे १९१४ ला दिल्ली-लाहोर कटाचा खटला सुरु झाला. ५ ऑक्टोबर ला बसंत ला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अमीर चरिध, अबधबिहारी आणि बालमुकुंद या तिघांना त्याच खटल्यात फाशीची शिक्षा फर्मावली गेली. ‘ब्रिटिशांचे शासन छान होते हो, त्यांची न्यायव्यवस्था वाखाणण्यासारखी होती’ असे उमाळे आजही दाटून येणाऱ्या लोकांची कमी नाही. त्यांनी पुढील घटनाक्रम लक्षात घेण्याजोगा आहे.
बसंतला फाशीची शिक्षा न होता जन्मठेपेची झाली. त्यामुळे फाशीसाठी आग्रही असणाऱ्या सरकारने लाहोर उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावेळी बसंत हा अल्पवयीन असल्याची वास्तविकता बदलण्यासाठी अंबाला सेंट्रल जेलमधील रेकॉर्ड्स बदलण्यात आले. बसंत होता त्यापेक्षा २ वर्षांनी मोठा असल्याचे दाखवण्यात आले. त्यानुसार त्यावर आरोपनिश्चिती करून त्याला दोषी ठरवून पंजाब मधल्या अंबाला सेंट्रल जेलमध्ये ११ मे १९१५ ला फाशी देण्यात आले. विसाव्या वर्षी धीरोदात्तपणे वधस्तंभावर जाणारा बसंत हा विसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्यलढयातील सर्वात तरुण क्रांतिकारकांपैकी एक ठरला.
आज आम्ही बसंतला विसरलो असू, पण जपानच्या टोकियो शहरात तेत्सुकोंग हिओची गार्डन या उद्यानात रासबिहारींनी बसवलेला बसंतचा पुतळा पहायला मिळतो. नादिया या त्याच्या जन्मठिकाणी मुरगच्चा स्कूल आणि सुवेंदु मेमोरियल ट्रस्ट ह्या ठिकाणी तसेच रबीन्द्रभवन ऑडिटोरियम, कृष्णनगर इथे त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारके आहेत.
संसदेच्या म्युझियममध्ये मात्र त्यांचे तैलचित्र लावायला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचा कार्यकाळ उजाडावा लागला. आमच्या पाठ्यपुस्तकात बसंतच्या वाटयाला किती ओळी आणि त्याही कधी येतील हे कुणालाच सांगता यायचे नाही. त्यामुळे ह्या लेखाद्वारे एक छोटीशी पणती आपले जीवन भारतमातेच्या चरणी अर्पण करणाऱ्या अनामवीर बसंतच्या स्मृतिसाठी!
No comments:
Post a Comment