4. शशिभूषण रायचौधुरी ऊर्फ शशिदा
शिक्षक आणि शेतकरी यांच्या प्रमाणे नवनिर्मितीचं मूलभूत काम क्वचितच अन्य समाजघटक करत असतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही या दोन्ही घटकांचे अनन्यसाधारण योगदान आहे.
तसंही क्रांतिकारक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शस्त्र परजून ब्रिटिश राजवटीवर चालून जाणारा युवक येतो, जो नंतर फासावर बलिदान देतो; पण वैचारिक क्रांती, शस्त्रहीन असूनही जाज्वल्य देशाभिमान जोपासणे, नि:शस्त्र राहून अखंड कार्य करीत राहणे अशा गोष्टी आपल्या लेखी कदाचित क्रांती या घटकात मोडणाऱ्या नाहीत, म्हणून आपण अशांना समाजसुधारक, विचारवंत म्हणतो पण अशांनीही आपले जीवन राष्ट्रयज्ञाच्या बलिवेदीवर समर्पित केल्याने आणि क्रांती कार्यातील आपला वाटा उचलल्याने मी त्यांनाही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकच म्हणेन. आणि अशांपैकीच थोडी वेगळी वाट चोखाळणारे एक अल्पपरिचित क्रांतिकारक म्हणजे बंगाल प्रांतातील शशिभूषण रायचौधुरी उर्फ शशिदा!
आठ जानेवारी १८६३ ला बराकपूरच्या जवळील तेघारिया गावी सौदामिनी देवी आणि आनंदचंद्र या प्रतिष्ठित दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेला शशिभूषण हा त्या दाम्पत्याचा सगळ्यात लहान मुलगा. स्वतः सोडेपूर उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतानाच शशीने गरीब घरातील मुलांसाठी पारंपरिक पद्धतीने शिक्षण देणारी पाठशाळा सुरू केली. अशा मुला-कुटुंबांना अन्यथा ख्रिश्चन धर्मप्रसारक हेरत असत. कालांतराने शशिभूषणने प्रौढांसाठीचे सायंकालीन वर्ग सुरू केले त्यातून बंगाली भाषा, इतिहास, गणित या बरोबरीने विणकाम, शेती, रेशीमकिड्यांची पैदास अशा प्रकारचे जीवनोपयोगी प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्तीही केली.
१८८० ला कलकत्त्याच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्युशनची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याचे पुढचे शिक्षण सुरू झाले. तिथले संचालक ईश्वरचंद्र विद्यासागर आणि शिक्षक म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी, खुदीराम बोस (हुतात्मा नव्हे) अशांचा सहवास लाभला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी योगेंद्र विद्याभूषणला इटालियन क्रांतिकारक मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे आपल्या भाषणातून प्रसिद्ध करायला सांगितली होती. शिवाय कॉलेजमध्ये चंडीदास घोष यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक प्रशिक्षणाचा तास चालत असे. अशा वातावरणात शशिभूषण शांत राहणे शक्यच नव्हते. आनंदमोहन बसूच्या सहकार्याने शशीने विद्यार्थी संघटना सुरू केली. शशी नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन शरीरसाधना करीत असे. पारंपरिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणासाठी तो स्वामी विवेकानंदांना भेटल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. स्वामी विवेकानंदांच्या ‘व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण’ या विचारांनी शशिभूषणच्या जीवनाची दिशा निश्चित केली.
१९०० ला कलकत्यात अनुशीलन समितीसाठी काही चारित्र्यवान आणि सक्षम तरुणांची मागणी शशिभूषणकडे करण्यात आली. तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या शशिदाने सतीश मुखर्जी, निबारण भट्टाचार्य, इंद्रनाथ नंदी, निखिलेश्वर राय मौलिक, जतींद्रनाथ मुखर्जी असे युवक पाठवले.
याच सुमारास रवींद्रनाथ टागोरांचे शांतिनिकेतन आकार घेत होते. ६ जानेवारी १९०२ ला शिक्षकांच्या पहिल्या तुकडीत शशिदा सहभागी झाले. मार्च १९०२ ला शशिदा कलकत्त्याला परतले ते अनुशीलन समितीच्या उद्घाटनासाठी. अनुशीलन समितीने शशिदांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्रमजीवी विद्यालय’ सुरू केले.
बंगालमधील थंडीच्या दिवसातील एक संध्याकाळ. हिवाळ्यामुळे अंधार लवकर झालेला. दिवेलागणी होऊन कचेऱ्यांतून लोक आपापल्या घरी परतत होते. ठिकठिकाणच्या कालिमाता मंदिरांतून घंटानाद आणि सर्बमाँगल माँगल्ये शिबे सर्बार्थसाधिके या श्लोकाचे स्वर अनुनादित होत होते आणि पारंपारिक वेशातले बंगाली स्त्री पुरुष बाजारहाट करायला बाहेर पडले होते. त्याचवेळी ‘श्रमजीवी विद्यालय’ गॅसबत्त्या-कंदील यांनी उजळून गेले होते. कामकरी वर्गातील गरीब घरातील स्त्री पुरुष हातात कंदील घेऊन विद्यालयात येत होते. तिथे केवळ अक्षरओळख अथवा साक्षरता हे लक्ष्य नसून येणाऱ्या प्रौढांना साबण बनवणे, शिवणकाम, उदबत्त्या बनविणे, विणकाम, मातीची भांडी बनविणे असे रोजगाराभिमुख प्रशिक्षणही दिले जात होते, बाजारात त्या उत्पादनांची विक्री करणारे ‘छात्र भंडार’ होते ज्याची जबाबदारी नंतर अमरेंद्रनाथ चॅटर्जी यांनी घेतली .
१९०४ च्या अखेरीस शशिदा बिहारमधील मुंगेरला गेले. तिथे निमधारी सिंह आणि अन्य प्रांतीय नेत्यांच्या सहकार्याने त्यांनी ‘आदर्श विद्यालय’ सुरू केले. १९०५ मध्ये ते ओरिसाला गेले आणि त्यांच्या प्रेरणेतून उत्कलमणी गोपालबंधू दास यांनी शारीरिक व सांस्कृतिक शिक्षण देणारे केंद्र भुवनेश्वरला चालू केले. १९०९ला ‘सत्यवादी विद्यालय’ सुरू झाले.
शशिदांचे अनुशीलन समितीतील सहकारी सशस्त्र क्रांतीचा मार्ग समांतर रीतीने चोखाळत होतेच पण अलीपूर बॉम्ब खटल्यानंतर सरकारने क्रांतिकारी संघटनांना त्वेषाने दडपायला सुरुवात केली. १९०९च्या सुमाराला रासबिहारी बोस यांच्यावर ब्रिटिशांची करडी नजर आहे असा सुगावा लागल्याने शशिदांनी रासबिहारींना डेहराडूनला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. शशिदा स्वतः दौलतपूर कॉलेजच्या हॉस्टेलचे अधीक्षक म्हणून रुजू झाले. शशिदा, उपप्राचार्य महेंद्रनाथ सेठ, विद्यार्थी नेता भूपेंद्र कुमार दत्ता हे तिघेही एकत्र राहात असत. पुढे १९१७ ला तिघांनाही एकत्रच अटक करण्यात आली; पण तत्पूर्वी दररोज सकाळी आणि संध्याकाळी शारीरिक व्यायाम, कसरत, योग-ध्यान, निवडक वाचन, देव देशभक्तीपर गीते यासाठी तरुण एकत्र जमत असत. बाघा जतीन (ज्यांचे चरित्रही आपण या अनामवीरा मालिकेत कालांतराने पाहणार आहोत) सुद्धा १९११पासून आपल्या प्रवासात या कॅम्पसला आवर्जून भेट देत असत. त्यांच्या प्रेरणेने तरुण घोडेस्वारी, पोहणे, लष्करी कवायत हेही करू लागले १९१३ च्या सुमारास दामोदर नदीला भीषण पूर आला. जनजीवन विस्कळीत झाले. शशिदांनी स्वयंसेवक दल बनवून बाघा जतिनच्या नेतृत्वाखाली दामोदर नदी पूरग्रस्त सहाय्यतेसाठी पाठवून दिला .
या सर्व कालावधीत म्हणजेच १९१० ते १९१५ मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार कलकत्त्यात होते. वैद्यकीय शिक्षण घेत होते. ते अनुशीलन समितीचेही सदस्य होते. दामोदर नदी पूरग्रस्त सहायतेसाठी तेही गेले होते, त्यामुळे स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन शशिभूषण रॉयचौधुरी तरुणांना जमवून सकाळी आणि संध्याकाळी जे शारीरिक बौद्धिक प्रशिक्षण देत असत त्याचा पूर्ण परिणाम डॉक्टर हेडगेवारांनी १९२५ ला स्थापना केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर दिसून येतो त्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेतील कार्याचे प्रत्यक्षातील क्रियान्वयन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने झाले व संघशाखा त्याचे मूर्तस्वरूप ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये .
१९१५ ला बाघा जतिनच्या हौतात्म्याने शशिदा व्यथित झाले आणि अधिक गतीने सेवा कार्य त्यांनी सुरू केले. १९१७ ला ब्रिटिश सरकारने शशिदांना अटक केली पण त्यांना झालेला टीबी लक्षात घेता सरकारने त्यांची पत्नी ऊर्मिला देवी, मुलगी राणी आणि दुर्गा आणि मुलगा अशोक यांच्यासह आधी दौलतपूर आणि नंतर खुलना येथे त्यांना स्थानबद्धतेत ठेवले. १९१९ ला सुटका झाल्यानंतर ते तेघारिया येथे परतले. त्यांच्या शाळेचा दर्जा सुधारणे, मलेरियाबाबत जनजागृती करणे या कामाला त्यांनी जुंपून घेतले. अखेर एप्रिल १९२२ला मृत्यूने गाठेपर्यंत त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले .