अनामवीरा या मालिकेतील दुसरे पुष्प गुंफताना आज आपण पाहणार आहोत श्री गेंदालाल दीक्षित यांचे संक्षिप्त चरित्र .
गेंदालाल यांचा जन्म तीस नोव्हेंबर १८८८ रोजी आताच्या उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील माई गावी झाला . वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचे निधन झाल्यानंतर वडील भोलानाथ दीक्षित यांनी त्यांचा सांभाळ केला . गावीच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इटावाच्या सरकारी हायस्कूलात त्यांनी पुढचे शिक्षण घेतले आणि आग्र्याहून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले . औरैया येथील शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी पत्करली . राष्ट्रकार्याचा योग काही जणांच्या कपाळीच लिहिलेला असतो . त्यामुळे ते कुठेही असले, कुठल्याही नोकरीधंद्यात-व्यवसायात असले तरी तो योग त्यांना स्वस्थ बसू देत नाही.. तसेच काहीसे गेंदालाल दीक्षित यांचे झाले .
जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचा घाट घातला तेव्हा स्वदेशी चळवळ संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली. त्याच सुमारास लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ज्वलंत अग्रलेख वाचून पंडित गेंदालाल दीक्षित यांच्याही मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटली. आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे, या स्वातंत्र्यप्राप्तीच्या यज्ञामध्ये आपणही योगदान दिले पाहिजे असे त्यांच्या मनाला वाटू लागले . त्यावेळी लोकमान्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला शिवजयंती उत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता उत्तर भारतातही त्याचे अनुकरण व्हावे असे दीक्षित यांना वाटू लागले . त्यासाठी त्यांनी शिवाजी समितीची स्थापना केली . नोकरीमध्ये सुट्टी घेऊन जवळच्याच ग्वालियर किंवा ग्वाल्हेर संस्थानात ते जाऊन पोहोचले . ग्वाल्हेर संस्थानातील लोक हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे आणि शिवाजी महाराजांप्रती कमालीचा आदर असणारे होते . तिथली बरीच कुटुंबं मूळची महाराष्ट्रातीलच होती . दीक्षित यांनी तिथल्या तरुणांना स्वातंत्र्यलढयात सहभागी होण्याचे आणि त्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्याचे आव्हान केले .
शिवाजी समितीच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे साहित्य छापून आणायला सुरुवात केली . राष्ट्रकार्यात जुंपलेल्या प्रचारकाचे काम दुहेरी स्वरूपाचे असते, सज्जन लोकांना शक्तिशाली बनवणे आणि शक्तिशाली लोकांना सज्जन बनवणे अशी दोन्ही कामे त्याला करावी लागतात . त्यामुळेच मध्य प्रदेशातील भिंड आणि मुरैना भागातील दरोडेखोरांकडे गेंदालाल दीक्षितांचे लक्ष न वळते तरच नवल . ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गनिमी कावा वापरून औरंगजेब आणि अन्य मुघल सरदारांच्या फौजांना सळो की पळो करून सोडले होते त्याप्रमाणेच केंदाला दीक्षितांनी या दरोडेखोरांना शस्त्रास्त्रे जमून इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केले . याच दरोडेखोरांनी आग्रा आणि ग्वालियर जवळच्या ग्रामीण भागात दरोडे घालून दीक्षितांना अर्थसहाय्य करायला सुरुवात केली .
सोमदेव नावाच्या एका क्रांतिकारकांनी दीक्षित आणि रामप्रसाद बिस्मिल यांची ओळख करून दिली . रामप्रसाद बिस्मिल यांनी शाहजहांपूरमध्ये मातृवेदी नावाची एक संघटना स्थापन केली होती. त्यामुळे रामप्रसाद बिस्मिल व गेंदालाल दीक्षित यांची भेट झाली तर त्यातून दोघांच्याही कार्याला पुष्टी मिळेल असा विचार सोमदेव यांनी केला .
२८ जानेवारी १९१८ ला बिस्मिल यांनी ‘देशवासियों के नाम संदेश’ या नावाने एक पत्रक बनवले आणि ते सगळीकडे वितरित केले . त्यातल्या ‘मैनपुरी की प्रतिज्ञा’ या कवितेचा विशेष परिणाम जनमानसावर झाला . त्याच्यानंतर तीन ठिकाणी छापे घालून निधी उभारणी करण्यात आली . पोलिसांनी पत्रक छापणाऱ्यांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण बिस्मिल पोलिसांच्या हाती लागले नाहीत . पुढे दिल्ली व आग्र्याच्या मध्ये अजून एका छाप्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना मिळालेल्या खबरीनुसार बिस्मिल व त्यांच्या साथीदारांना पकडण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला . कमालीचे चपळ असलेल्या बिस्मिल यांनी यमुना नदीमध्ये उडी घेतली आणि पाण्याखालून पोहत पोहत तीर गाठला . पोलिसांना वाटले की बिस्मिल यांचा अंत पाण्यात बुडून झाला . त्याचवेळी दलपतसिंह नावाच्या युवकाने केलेल्या फितुरीमुळे श्री गेंदालाल दीक्षित आणि त्याच्या काही साथीदारांना पकडण्यात मात्र पोलिसांना यश मिळाले. त्यांना पकडून आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवण्यात आले .
बिस्मिलनी आग्र्याच्या किल्ल्यात दीक्षितांची भेट घेतली आणि पलायनाचा बेत आखला; परंतु तो प्रत्यक्षात येण्यापूर्वीच दीक्षित यांना मैनपुरीला नेण्यात आले जेथे त्यांच्याविरुद्ध ‘मैनपुरी कटाचा खटला’ दाखल करण्यात आला . दीक्षितांनी उत्तर प्रांतातल्या दरोड्यांचा खुलासा करण्यासाठी आपण तयार असल्याचे दाखवले आणि पोलिसांनी त्यावर विश्वसून त्यांना मातृवेदी संघटनेच्या तरुणांबरोबर कैदेत ठेवले . मैनपुरीच्या तुरुंगाधिकाऱ्यांना श्री गेंदालाल दीक्षित यांनी असे पटवून दिले की सरकारी साक्षीदार रामनारायण यांना त्यांच्याबरोबर जर ठेवले तर अजून काही जणांचा पर्दाफाश करता येईल आणि त्यांना सुद्धा पकडता येईल . तुरुंगाधिकाऱ्यांनी श्री गेंदालाल दीक्षित व सरकारी साक्षीदार रामनारायण यांना एकाच हातकडीने बांधून ठेवले . पण क्रांतिकार्यात तरबेज असलेल्या दीक्षित यांनी रामनारायण यांच्यासकट कैदेतून पोबारा केला . मैनपुरीच्या पोलीस जेलमधून गेंदालाल दीक्षित निसटले आणि दिल्लीला जाऊन राहिले . एक नोव्हेंबर १९१९ ला मैनपुरीच्या मॅजिस्ट्रेटनी, श्री बी एस क्रिस यांनी, सर्व आरोपींविरुद्ध निर्णय घोषित केला आणि दीक्षित व रामप्रसाद बिस्मिल यांना फरार म्हणून घोषित केले . दीक्षितांनी वेषांतर करून दिल्लीतील आपले घर गाठले परंतु त्यांच्या वडिलांनी आपल्यावर आणि घरावर बला नको म्हणून पोलिसांना कळविण्याचा निर्णय घेतला . दीक्षितांनी कशीबशी वडिलांची समजूत काढली व घर सोडण्याचा निर्णय घेतला . दोन तीन दिवसांत घर सोडून गेंदालाल निघाले दिल्लीतील एका प्याऊवर त्यांनी नोकरी पत्करली . शरीरप्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. टीबीने आता भीषण स्वरूप धारण केले होते . सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या अशा क्रांतिकारकांची सोय स्वतःच्याच काय, पण अन्य कुठल्याही घरात होऊ नये याहून अधिक दुर्दैव ते कोणते!
त्यांनी आपल्या धाकट्या भावाला व पत्नीला बोलावून घेतले. पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू पाहून ते म्हणाले, " तुम रोती क्यों हो ? पत्नी ने रोते हुए उत्तर दिया मेरा संसार में कौन है ?
पंडित जी ने एक ठंठी सांस ली मुस्कुराकर कहने लगे – ‘’ आज लाखो विधवाओं का कौन है ? लाखो अनाथो का कौन है ? 22 करोड़ भूखे किसानो का कौन है ? दासता में जकड़ी हुई भारत माता का कौन है ? जो इन सबका मालिक है वही तुम्हारा भी | तुम अपने आपको परम सौभाग्वती समझना , यदि मेरे प्राण इसी प्रकार देश – प्रेम की लगन में निकल जावे और मैं शत्रुओ के हाथ न आऊ | मुझे तो दुःख तो केवल इतना है कि मैं अत्याचारियों को अत्याचार का बदला न दे सका , मन ही मन में रह गयी | मेरा यह शरीर नष्ट हो जाएगा , किन्तु मेरी आत्मा इन्ही भावो को लेकर फिर दूसरा शरीर धारण करेगी | अबकी बार नवीं शक्तियों के साथ जन्म लेंगे शत्रुओ का नाश करूंगा ‘’
उस समय उनके मुख पर एक दिव्य ज्योति का प्रकाश छा गया | आप फिर कहने लगे रहा खाने – पीने का , सो तुम्हारे पिता जीवित है | तुम्हारे भाई है , मेरे कुटुम्बी है ; और फिर मेरे मित्र है जो तुम्हे अपनी माता समझ तुम्हारा आदर करेंगे | " भावाने त्यांची अवस्था बघून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांच्या पत्नीला एका दुसऱ्या ठिकाणी ठेवून तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला . त्याने बघितले तर पंडितजींचे केवळ मृत शरीर शय्येवर पडून होते . २१ डिसेंबर १९२० ला दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये टीबीने त्यांचे निधन झाले . गेंदालाल दीक्षित म्हणत असत ,
थाती नर तन पाय के, क्यों करता है नेह ।
मुँह उज्ज्वल कर सौंप दे, जिसको जिसकी देह ।।
स्वतः श्री रामप्रसाद बिस्मिल यांनी हिंदीमध्ये गेंदालाल दीक्षित यांचे चरित्र लिहून ते कानपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या प्रभा नावाच्या नियतकालिकात तीन सप्टेंबर १९२४ च्या अंकात अज्ञात या टोपणनावाने लिहिले आहे .
दिल्लीच्या आत्माराम अँड सन्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या मन्मथनाथ गुप्ता यांच्या ‘भारतीय क्रांतिकारी आंदोलन का इतिहास’ आणि प्रभात प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या श्रीकृष्ण सरल यांच्या ‘क्रांतिकारी कोश’ या पुस्तकांत अधिक माहिती वाचता येईल.