"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Saturday, November 18, 2017

अनामवीरा - १

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारक आपल्याला माहिती असतात परंतु अशाही अगणित क्रांतिकारकांची मालिका भारतीय स्वातंत्र्यलढ्यात होऊन गेली ज्यांच्याबाबत दुर्दैवाने आपल्याला फारशी माहिती नसते.
          अशाच काही क्रांतिकारकांबद्दल आपल्याला अंशरूपाने का होईना थोडीफार माहिती व्हावी, त्यांचे संक्षिप्त चरित्र वाचून आपल्याला त्यांच्याबाबत अधिक वाचण्याची प्रेरणा मिळावी आणि आपल्या कुटुंबातील, परिसरातील शालेय वयोगटातील मुलांना तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ही लेखमाला अवश्य वाचून दाखवावी, म्हणून हा लेखनप्रपंच! दर शनिवारी सकाळी इथेच, या ब्लॉगवर एक नवीन पुष्प!
 यात मुख्यत्वे इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती आणि वाचनालयातील पुस्तके यांच्या आधारे लेख लिहिले आहेत. त्यात काही चुकाही असू शकतील, काही संदर्भही चुकले असण्याची शक्यता आहे; त्यामुळे जाणकारांनी त्यावर अवश्य प्रकाश टाकावा व मला लेखात झालेल्या चुका जरूर सुचवाव्यात ही विनंती.

 आपल्याला ही "अनामवीरा" लेखनमाला कशी वाटली हेही मला प्रतिसाद देऊन अवश्य कळवावे.
१. विष्णू गणेश पिंगळे 


पुण्यातल्या तळेगाव-ढमढेरे येथे जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. ९ भावंडांमधले हे सर्वात लहान. सुरुवातीला तळेगाव येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या महाराष्ट्र विद्यालय या शाळेत प्रवेश घेतला. तिथे शिकत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात ते आले. त्या अलौकिक स्वातंत्र्यसूर्याचा स्पर्श होताच विष्णूच्या मनात स्वातंत्र्यप्राप्ती आणि राष्ट्रप्रेम यांचे बीज न अंकुरते तरच नवल! महाराष्ट्र विद्यालय बंद पडल्यानंतर १९०८ साली तळेगावच्या समर्थ विद्यालयात त्यांना भरती करण्यात आलं. दुर्दैवाने १९१० साली ब्रिटीश सरकारने समर्थ विद्यालयही बंद करून टाकलं. ह्या घटनांवरून त्याकाळी शिक्षणाची आणि त्यातूनही राष्ट्रीय विचार देणाऱ्या शिक्षणाची कशी परवड होत होती हे लक्षात येतं.
विष्णूने पुढे मुंबई गाठली आणि गोविंदराव पोतदार यांच्या ‘पायोनियर अल्कली वर्क्स’ या कंपनीत माहीमला नोकरी करू लागला. इथेही श्रीयुत पोतदार हे राष्ट्रीय विचारांचे होते आणि स्फोटकांच्या बाबतीतले तज्ञ होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विष्णूची ओळख करून दिली. त्यातल्या हरी लक्ष्मण पाटील या वसईला राहणाऱ्या वकिलांशी विष्णूची खास मैत्री झाली. पुढे स्वदेशी चळवळ ऐन भरात असताना जपानी हातमाग उद्योगांपासून प्रेरणा घेऊन पिंगळे यांनी लातूरजवळ स्वतःचा स्वदेशी हातमाग सुरु केला. पण त्यांची मनिषा ही नेहमीच एक अभियंता बनावं अशी होती.
 विष्णू गणेश पिंगळे यांनी अमेरिकेत जाण्याचा आपला मनोदय थोरले बंधू केशवराव यांचेकडे रेल्वेस्थानकावर प्रकट केला. प्रवासाला सुरुवात झाली. हाँगकाँग मार्गे ते अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत १९१२ साली त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग ला प्रवेश घेतला.  अमेरिकेतल्या सिअटेल (Seattle) विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. अमेरिकेत असतानाचा ते इंडिअन रेव्होल्युशनरी पार्टीया संस्थेचे सभासद झाले आणि त्यांनी सशस्त्र दलांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष पसरवायला सुरुवात केली. अनेक नावे बदलून आणि वेषांतर करून त्यांनी देशभर प्रवास केला. ठिकठिकाणी ते इंग्रजांच्या विरुद्धच्या असंतोषाची बीजे पेरीत गेले. जनमानस चेतवीत गेले.
गदर कटाचा भाग झाले. ऑक्टोबर १९१४ ला स्वतः पिंगळे, सत्येन भूषण सेन, कर्तारसिंग सराभा आणि काही शीख क्रांतिकारक अमेरिकेतून निघाले. सत्येन आणि पिंगळे चीनमधे काही दिवस थांबले. त्यांचा उद्देश होता तहाल सेन आणि अन्य नेत्यांना भेटून सहकार्याची चाचपणी करणे. डॉ सन् यत् सेन यांचीही भेट चीनमधे झाली. नोव्हेंबर १९१४ ला सत्येन आणि पिंगळे कलकत्त्यात पोहोचले. तिथे सत्येन ने पिंगळेंची ओळख जतिंद्रनाथ मुखर्जी म्हणजेच बाघा जतिन यांच्याशी करून दिली. बाघा जतिन यांच्याशी विस्तृत चर्चा झाल्यावर त्यांनी पिंगळेंना रासबिहारी बोस यांच्याकडे बनारसला पाठवले. बनारस त्यावेळी क्रांतिकारकांचे केंद्र बनले होते. तिथून लाहोर, कलकत्ता, अमृतसर, बनारस असा प्रवास पिंगळे करत राहिले. क्रांतिकारकांमधला दुवा म्हणून कार्यरत राहिले. इंग्रज सैन्याच्या विविध तुकड्यांमधील सैनिकांच्या संपर्कात राहिले. सगळं व्यवस्थित जुळवत आणलं होतं. फेब्रुवारी १९१५ ला उठाव करायचा असं ठरलं. पंजाबमधले २३ वे घोडदळ २१ फेब्रुवारीच्या दिवशी उठाव करून शस्त्रे हस्तगत करून आपल्या अधिकाऱ्यांना मारून टाकणार होते. त्यावर लगेच २६ वी पलटण पंजाबात बंड करणार होती; जो लाहोर आणि दिल्लीच्या उठावांसाठी संकेत ठरला होता. क्रांतिकारकांनी ढाक्यातल्या शीख सैनिकांना आपल्यात सामील करून घेण्यात यश मिळवले होते. जर पंजाबातला उठाव यशस्वी झाला तर हावरा स्टेशनला येणारी ‘पंजाब मेल’ रद्द झाली असती. आणि हाच संकेत तिथल्या उठावासाठी ठरला होता. दळणवळणाची साधने मुळातच तुटपुंजी, वेगवान साधनांचा तर अभाव, आणि वरून इंग्रज गुप्तहेर खात्याची वक्रदृष्टी ह्यातून मार्ग काढण्यासाठी असे संकेत ठरले होते. पण,........
नेहमीचाच शाप पुन्हा एकदा! फंदफितुरी! पंजाब सी.आय.डी. ने किरपाल सिंग नावाच्या अमेरिकेतून परतलेल्या आपल्या गुप्तहेराच्या मदतीने सर्व कट अगदी अंतिम क्षणी यशस्वीरित्या जाणून घेतला. हा किरपाल २३ व्या घोदडळात सैनिक असलेल्या बळवंत सिंग चा भाऊ होता. १५ फेब्रुवारी १९१५ ला लाहोर ला रासबिहारी यांच्याकडे पिंगळेंसकट डझनभर क्रांतिकारक जमले होते. तिथे किरपाल सिंग ने प्रवेश मिळवला होता.
१३०व्या बलुच रेजिमेंटचा रंगून इथला उठाव २१ फेब्रुवारीला मोडून काढण्यात आला. २६ वी पंजाब, ७ वी राजपूत, २४ वा जाट तोफखाना हे सगळे उठाव मोडून काढण्यात आले. फिरोझपूर, आग्रा, लाहोर हे सारे उठाव निर्दयीपणे चिरडून टाकण्यात आले. तरीही कर्तारसिंग आणि पिंगळे यांनी १२ व्या घोडदळ रेजिमेंट मधे मेरठ (मीरत) ला उठाव घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कर्तारसिंग यांना बनारसहून अटकेत घेण्यात आले आणि पिंगळे यांना मेरठहून २३ मार्च १९१५ च्या रात्री अटक करण्यात आली.  
२३ मार्च १९१५ ला त्यांना अटक करण्यात आली त्यावेळी त्यांच्या ताब्यात अति ज्वालाग्राही स्फोटके सापडली. तत्कालीन मुंबई पोलिसांच्या रिपोर्टनुसार ‘लॉर्ड हार्डिंग्ज वर दिल्लीत जो बॉम्ब फेकण्यात आला होता तशाप्रकारचे १० बॉम्ब्स विष्णू पिंगळेंकडे होते’. एक अख्खी रेजिमेंट उडवून देण्यासाठी हे पुरेसे होते. ह्यानंतर मोठ्या प्रमाणावर धरपकड झाली. रासबिहारी बोस लाहोरहून मे १९१५ ला जपानला निसटले. ग्यानी प्रीतम सिंग, स्वामी सत्यानंद पुरी, आणि अन्य नेते थायलंड वगैरे देशांमध्ये निघून गेले.
विष्णू गणेश पिंगळेंवर ब्रिटीश सैन्यातील सैनिकांना भडकवण्याचा आणि इंग्रजी सत्ता उलथून टाकण्यासाठीचा असंतोष सैन्यदलात पसरवण्याच आरोप ठेवण्यात आला. कर्तारसिंग, हरनाम सिंग, भाई परमानंद यांच्याबरोबरीने ‘लाहोर कटाचा खटला’ डिफेन्स ऑफ इंडिया अॅक्ट, १९१५ च्या अंतर्गत निर्मिलेल्या विशेष प्राधिकरणाने एप्रिल १९१५ मधे चालवून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. १७ नोव्हेंबर १९१५ ला लाहोर च्या सेन्ट्रल जेलमध्ये त्यांना आणि कर्तारसिंग यांना फासावर चढविण्यात आले. किती त्वरेने हा खटला चालवला गेला असेल पहा. एक तेजस्वी शलाका त्यांच्या रूपाने स्वातंत्र्याच्या नभोमंडळात चमकून गेली, अनेकांना प्रेरणा देऊन गेली, भावी पिढ्यांसाठी राष्ट्रभक्तीचे नंदादीप तेवत ठेवून गेली..
त्यांचे पुण्यस्मरण म्हणून मुंबईतील चिंचपोकळी येथील एका रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे.

पुढील लेख :- vikramwalawalkar.blogspot.in/2017/11/blog-post_26.html


12 comments:

  1. क्रांतिकारक पिंगळे ह्यांची स्फूर्तिदायक जीवनगाथा त्या रस्त्याच्या नामफलकाशेजारी लावली तर?

    ReplyDelete
  2. ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध उभा टाकणाऱ्या आणि भरताच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या या क्रांतिकारकास विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  3. फार छान माहिती व संशोधनात्मक लेख आहे, आपल्या लेखांत बरीच माहिती समजुन येत असुन अश्या क्रांतिकारकांना खरोखरच विनम्र अभिवादन आहे.

    ReplyDelete
  4. खूपच छान माहिती आणि अश्या प्रेरणादाई क्रांतिवीर देशभक्तना लाख लाख प्रणाम...

    ReplyDelete
  5. Parag Kale; November 26th 2017
    A good start. Hope you will write on many other unknown freedom fighters and eventually it would be published in book form.
    I would suggest that you research and write on the revolutionaries transported to Andaman Islands too.

    ReplyDelete
  6. वीर विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म दिनांक नक्की करता येईल का ? तळेगाव-ढमढ्रे येथील स्थानिक नगरपालिकेकडे कदाचित् ही माहिती मिळू शकेल. तसेच एक विनंती की अशा वीरांच्या नावामागे कैलासवासी वा अन्य कोणतीहि बिरूदावली न लावता त्यांचा उल्लेख "वीर अमुक तमुक" असा करावा. तशी प्रथा पाडता आली तर अशा वीरांचे वेगळेपण समाजात उठून दिसेल.

    ReplyDelete