गोष्ट आहे दूरदूरची. अगदी डोंगरापल्याडची. आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावर आहे सिंधुदुर्ग जिल्हा. तिथे कुडाळ नावाचे शहर बनू पाहणारे विकसनशील केंद्र. आणि त्याच्यापासून सुमारे १२ किमी वर आहे ‘तेंडोली’ नावाचे गाव. त्यातली ‘कुमणोस’ नावाची वाडी.
‘तेंडोली’ गावच्या त्या कुमणोस वाडीपर्यंत एस.टी. ने जायचे. तिथून पुढे दुचाकीने डोंगराच्या पायथ्याशी. डोंगर पूर्ण चढून जायचा. मग लागतात काही प्लॉट्स आंबा-काजूची लागवड असलेले. तेही संपल्यावर पुढे पठारावर चालत जायचे साधारण किलोमीटरभर. त्या विस्तीर्ण माळावर आहे ‘धनगरवाडी’. धनगरांची घरं, गुरं आणि शेळ्या. सुमारे ११ घरं. आणि ५६ लोकसंख्या. त्यात शिक्षण घेत असलेली ८-१० जणं!
प्रत्येक घरासमोर तुळशीवृंदावन. अंगावर कांबळ घेतलेले धडधाकट धनगर पुरुष आणि आतिथ्याचं लेणं ल्यालेला धनगर स्त्रिया तुमच्या स्वागताला सिद्ध असतात. लगेचच आसपासची १०-१५ कच्चीबच्ची जमा होतात. मग तुम्ही एखाद्या घरात बसल्यावर ती दरवाज्याआडून, भिंतींआडून पाहत असतात. तुम्ही थकला असणार हे धनगर जाणतो. मग प्रवासाचा शीण घालवण्यासाठी शीतल पाणी. सोबत चहाची विचारणा. तुम्ही आसपास नजर फिरवत नाही म्हणणार. तरीही ते आग्रहाने चहा ठेवायला सांगणार. इथे सापडेल खरा ‘अतुल्य भारत’!
घरामध्ये तुम्हाला दिसणार दिवे, विजेचा ‘मेन स्विच’. पण त्या सर्वाचा काहीच उपयोग नाही. आणि हीच व्यथा आहे धनगरवाडीची! इथे अजून वीज नाही. भारत स्वतंत्र होऊन झाली ६० वर्षे. आणि धनगरवाडीने घरात स्विचेस, दिवे बसवून झाली ७ वर्षे. प्रतीक्षा विजेची. मूकपणे, सहनशीलतेने ७ वर्षे वाट पाहतोय धनगर विजेची. सध्या रात्री प्रकाश देणारा एकमेव सौरदीप सोडला तर तिथे वीज नाही.
आता तुम्ही विचार करू लागता कारणांचा. ५६ एवढी लोकसंख्या असलेली ही वस्ती भटके-विमुक्त या सदरात मोडणारी नाही; स्थायी आहे. घरात आवश्यक अशी सर्व न्यूनतम विद्युत उपकरणं बसवून झालीत. मग का नाही वीज आली इथवर? चौकशी केली तर अनेक कारणं ऐकायला मिळतील. पण शोधावा लागेल तो उपाय!
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधे इथली लोकसंख्या मोजली जाते ती ‘इतके मतदाता’ अशी. वीज आली तर पुढच्या निवडणुकीत आश्वासन कसले देणार? त्यामुळे वीज न येण्यातच शहाणपण आहे हे राजकारणी जाणून आहेत अशी बतावणी काहीजणांकडून होते. तर काहीजण म्हणतात की जिथून ‘लाईन’ जाणार आहे तिथले काहीजण ‘पोल’ टाकायला देत नाहीयेत. कारण त्या जमीन मालकाची पोल टाकू देण्याच्या बदल्यात काही ‘अपेक्षा’ आहे. आणि ती विच्छा पुरी करणार कोण? धनगर तर ही इच्छा पुरी करण्यास असमर्थ आहे. काहीजण म्हणतात आता दोनेक महिन्यात येईल वीज. पण असे दोनेक महिने सात वर्षांपासून येताहेत आणि जाताहेत. मॉल्समध्ये चकचकाट आहे, पण इथे मात्र रखरखाट आहे.
आपण आपल्या परीने ह्या वस्तीला उजाळून टाकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपली शक्ती-युक्ती, वजन-ओळख वापरून अशा दुर्गम भागांसाठी झटायला हवे. वीज येणे हे धनगरांच्या नाही तर आपल्या हातात आहे. वीज येणे अगदीच दुरापास्त दिसले तर किमान अजून काही सौरदीप लागण्यासाठी तरी प्रयत्न करावे लागतील. एखादी कॉर्पोरेट कंपनी अन् तिचे CSR डिपार्टमेंट यांच्यासाठी तर हा डाव्या हाताचा मळ आहे.
इथले विजेवर चालणारे दिवे लागलेले नसले तरी त्यांच्या डोळ्यातले आशेचे दिवे अजूनही विझलेले नाहीत. पण उशीर नको व्हायला.
Gele 10 divas Punya javalchya ashach eka gavachya samparkat hoto. Gavache nav KOLEWADI. Punyapasun phakt 12 kilometervar pan 2010 pasun kupach door. Neet rasta nahi. Shelya, mendhya v gure charane v talyatil masemari ha mukhy vyavsay, Mahadeokoli ha mukhy smaj gavat aahe. AAmhi keval Sanghachya(RSS) Hiwali Bal Shibiramule gavachya samparkat aalo.
ReplyDeleteOne could try for unconventional energy sources at such a place. This could reduce/remove the dependence on government infrastructure and in principle also the burden on it. If primary requirement is just the light bulbs, then this could probably be achieved by taking help from NGOs. Institutes like IITs or regional engineering colleges should take initiative in such a work.
ReplyDelete