गुन्हेगारीतील राजकारणापेक्षा राजकारणातील गुन्हेगारी हा चिंतेचा विषय आहे. गुन्हेगारीतील राजकारणाने त्यात सामील असलेल्या गुंडांच्या जीवावर बेतू शकते; परंतु राजकारणातील गुन्हेगारीने संपूर्ण समाजाच्याच जिवाशी खेळ होणार आहे. तडीपार केलेले, गंभीर गुन्हे नावावर असलेले, कुप्रसिद्ध असलेले, आणि दहशत असणारे असे गुंड ही जणू पक्षाची बलस्थाने झाली आहेत.
स्वत: भीतीदायक, दहशत पसरवणारे, समाजविघातक गोष्टी करणारे पक्ष काढू शकत असतील आणि स्वत:च्या अंगावर केसेस असूनही यांना 'उदंड झाली लेकुरे' (सभांना!) असा प्रतिसाद तरुणाई कडून मिळत असेल तर अजून काय सांगावे. यांच्यावरच्या गंभीर गुन्ह्यांची साधी 'किणकिण' सुद्धा बाहेर येऊ नये यातच आपल्या व्यवस्थेचे तीनतेरा दिसून येतात. बोगस रेशनकार्डाँपेक्षा हे भयानक आहे.
परंतु आपण हा विचार करताच नाही. भावनिक आवाहन केले की आपल्याला ते अस्मिता टिकवण्याचे आव्हानच वाटते आणि आपण वाहावत जातो. स्वप्न रंगवून दिले की आपण ते पहायला मोकळे! भीतीचा बागुलबोवा उभा करायचा आणि मी यातून तुम्हाला वाचवू शकतो असा आभास निर्माण करायचा.
या निवडणुकीत आपण उमेदवाराचा विचार करुया. अपक्ष असला तरी चालेल. परंतु गुंड आणि दहशतवादी नको. आणि एकाहून अधिक चांगले उमेदवार असतील तर ज्या पक्षाची ध्येयधोरणे पटतात त्याला मत देऊया. ही निवड फारशी कठीण नाही. आणि अपक्ष जास्ती प्रमाणात निवडून आले तर 'घोडेबाजार' अथवा अस्थिर सरकार यांचीही भीती वाटायचे कारण नाही कारण निवडून दिलेले अपक्ष हे चांगलेच असतील. शिवाय 'स्थिर' सरकार काय दिवे लावते आहे ते आपण पाहिलेच आहे.
त्यामुळे चांगला, सुशील, सच्छील उमेदवार हीच आपली निवड असू द्या.