Sunday, November 22, 2009
जाहिरात - कशासाठी? कोणासाठी?
Friday, November 6, 2009
स्वदेशी उत्पादने
Friday, October 9, 2009
वनवासी कल्याण आश्रम
आधी या समाजाला 'आदिवासी' म्हणणेच चूक आहे. कोण आधी कोण नंतर राहावयास आले, असा विचार केला तर मग शहरातीलही बरेचजण 'आदिवासी' होतील! म्हणूनच शहरवासी, ग्रामवासी ह्याप्रमाणे वनात राहणारे ते 'वनवासी'. त्यामुळे 'आदिवासी' या शब्दाऐवजी 'वनवासी' शब्दच आपण वापरला पाहिजे. जेव्हा या वनवासी बांधवांचा विकास होईल तेव्हा समग्र समाजाच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वाच्या जवळ जाईल, कारण हा समाज पोहोचायला खूप कठीण आहे आणि म्हणून अंतिम घटकांपैकी एक आहे.
वनवासी हे निसर्गपूजक आहेत. वृक्ष, नाग, सूर्य, नदी ह्यांना ते देवता मानतात. त्यादृष्टीने ते पूर्णपणे हिंदूच आहेत. परंतु ’तुम्ही हिंदू आहात’ असं जाणीवपूर्वक सांगायला कोणी गेलं नव्हतं. जेव्हा ख्रिश्चन मिशनरी या देशात आले आणि आपले सावज शोधू लागले तेव्हा हे वनवासी त्यांच्या नजरेतून सुटले असते तरच नवल! त्यांनी वनवासी बांधवांना सुविधा देऊ केल्या व बदल्यात ख्रिश्चन मत त्यांच्यावर लादले.
अशाप्रकारचे दुर्भाग्यपूर्ण मतपरिवर्तन सुरु असतानाच बाळासाहेब देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मध्य प्रदेशात काम करत होते. त्यांना जो प्रदेश दिला होता त्यातील जशपूर या ठिकाणी अशी उपासना पद्धतीची चाललेली विक्री त्यांनी हेरली. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची स्थापना १९५२ साली केली. वनवासी बंधूंची उन्नती आणि त्यांची मूळ उपासनापद्धती टिकवून ठेवणे ही आव्हाने समोर ठेवून वनवासी कल्याण आश्रम कामाला लागली. या कामी त्यांना जशपूरच्या राष्ट्रीय दृष्टिकोण असलेल्या महाराजांचे फार सहकार्य झाले.
हळुहळू आश्रमाचे कार्यक्षेत्र वाढू लागले. समाजातील सज्जनशक्तीचे सहकार्य लाभू लागले. आणि वनवासी कल्याण आश्रमाने एका नव्या पहाटेची निश्चिती केली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, प्रचारक, व.क.आ चे कार्यकर्ते या सर्वांमुळे आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशभरातील दुर्गम भागांमध्ये काम सुरु आहे. त्याचे संख्यात्मक विवरण पुढे दिले आहे. सद्यस्थितीत ३१५ हून अधिक जिल्ह्यांत , १०,००० हून अधिक ठिकाणी आश्रमाचे काम सुरु आहे. यात शेकडो पूर्णवेळ कार्यकर्ते समर्पित वृत्तीने काम करत आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रात पुढील प्रमाणे काम सुरु आहे-
शैक्षणिक प्रकल्प-वसतिगृहे - १९, प्राथमिक शाळा - २, माध्यमिक शाळा - २, बाल संस्कार केंद्रे - १२
लाभार्थी - १,६००
आर्थिक विकास प्रकल्प-औद्योगिक शिक्षण केंद्र - २८, शेतकी प्रकल्प - ४, बचत गट - ५५८
लाभार्थी - १६,०००
आरोग्य प्रकल्प-साप्ताहिक आरोग्य केंद्रे - ४, दैनिक केंद्रे - १, आरोग्य रक्षक - ५८६
लाभार्थी - ४,००,०००
खेलकूद केंद्रे - १५
श्रद्धा जागरण केंद्रे - ६०
एकूण प्रकल्प १,१२३
पूर्णवेळ कार्यकर्ते ८१ - ६५ पुरुष, १६ महिला.
वनवासी कल्याण आश्रमाला सहकार्य करण्यासाठी आपण या लेखाला प्रतिसाद देऊ शकता.
Thursday, October 8, 2009
तरुण आहे कार्य(कर्ता) अजुनी...
आपल्या देशातील राजकीय पक्षांनी ही युवाशक्ती ओळखली नसती तरच नवल! युवकांना पक्षात सामील करून घेण्यासाठी विद्यार्थी संघटना हे एक साधन समजले जाते. आणि युवकसुद्धा आपल्या राजकीय महत्वाकांक्षांना न्याय देण्यासाठी विद्यार्थी संघटनांचा उपयोग करून घेतात हे सर्वश्रुतच आहे.या विद्यार्थी संघटना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांची जडण-घडण याबाबत खरंच किती विचार करतात हा प्रश्नच आहे. प्रत्येक मोठ्या पक्षाची त्या पक्षाशी संलग्न अशी विद्यार्थी संघटना आज अस्तित्वात आहे. नवीन पक्षसुद्धा आपली विद्यार्थी संघटना असावी म्हणून प्रयत्नशील असतात। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थी संघटनेत सामील करून घेण्याची अहमहमिकाच लागलेली असते. त्यातून वाद आणि हाणामारीसुद्धा होते. माझ्या कॉलेज जीवनात मी या सर्वाचा साक्षीदार आहे...मूक साक्षीदार नव्हे, तर सहभागी साक्षीदार!
विद्यार्थी संघटनांमधून विद्यार्थी नेतृत्व तयार होते ही खरी गोष्ट आहे. परंतु निकोप वातावरण न राहता सध्या गोष्टीही विकोपाला जातात हेही तितकेच खरे. राजकीय पक्षांनी विद्यार्थी संघटनांना प्रोत्साहन देण्यामागे त्यांचा उद्देश स्पष्ट असतो. त्यांना एकतर जास्त विचार न करणारी, तत्पर, तडफदार अशी तयार फौज मिळत असते आणि नेतृत्वनिर्मितीही होत असते. हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीत तरुणांकडे पुरेशा प्रमाणात पैसा, वाहन, वेळ, एखादे फुटकळ पद या गोष्टी असतात. त्यामुळे असे तरुण लगेच उपलब्ध होऊ शकतात. पण कोणत्या गोष्टींसाठी ते उपलब्ध केले जातात ह्यावर विचार होतो का?
लोकसभेतील रालोआच्या पराभवाला आणि संपुआच्या विजयाला वृध्द विरुद्ध तरुण ह्याही परिमाणाचे कारण होते. परंतु रालोआने त्याला परिपक्व विरुद्ध अवखळ असे स्वरूप दिले होते. जनतेने कौल दिला. ह्यातून सर्वांनीच धडा घ्यायला हवा. नाहीतर "तरुण आहे कार्य(कर्ता) अजुनी...रालोआ निजलास का रे" असं म्हणावं लागेल. हळुहळू वृद्धत्वाकडे झुकणारे नेते शीर्षस्थ पदावर राहून संपूर्ण पक्षाला आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छित असतील तर ते कधीच साध्य होणार नाही, कारण तरूण तुर्कांना म्हातारे अर्क आपल्या मुठीत ठेवू शकत नाहीत। त्यापेक्षा योग्य वेळ येताच त्यांनी सन्मानाने उच्च पदावरून पाय उतार व्हावे आणि ‘सांगेन युक्तीच्या चार’ या भूमिकेत शिरावे. 'काँग्रेसने तरुण नेतृत्वाला संधी दिली' हे जर राहुल गांधींकडे बघून आपण म्हणणार असू तर ते चूक ठरेल कारण तो काँग्रेसच्या घराणेशाहीचा स्वाभाविक आविष्कार आहे. परंतु तरीही संपुआने ज्योतिरादित्य सिंधिया, पायलट, अगाथा संगमा, मिलिंद देवरा अशा अनेकांना लोकसभेत जिंकून आणून एक तरुण नेतृत्वाची फळीच उभी केली आहे. यातील बहुतेकांच्या मागे त्यांच्या घराण्याचे नाव असले तरीही हे तरुण नेतृत्व आश्वासक आहे। या चौदाव्या लोकसभेतील खासदारांचे सरासरी वय ५२.७ आहे. तर २५ ते ४० या वयोगटातील सदस्यांचे प्रमाण १५% आहे जे १४व्या लोकसभेत केवळ ६.३% होते. आणि ७१ ते १०० या वयोगटातील सदस्यांचे प्रमाण ११.७% वरून केवळ ७% आले आहे. अखिल भारतीय स्तरावर झालेला हा बदल स्वागतार्ह आहे. (pic courtesy: greathindu.com)
संसदेतील या बदलाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बदल होणार का? महाराष्ट्रसुद्धा तरूण नेतृत्व पाहील का, हे विधानसभेचे निकालच सांगू शकतील. मनसे च्या स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग राजकारणात सक्रिय झाला हे मान्य करावेच लागेल. विघातक की विधायक हा वाद-प्रतिवाद करण्याचा मुद्दा होऊ शकेल, परंतु तो नंतरचा मुद्दा आहे. मनसेच्या स्थापनेतून तरुणांचे राजकीयीकरण (politicization of youth) मात्र झाले. तरुण राजकीय मुद्यांवर तावातावाने बोलू लागले, आपली मते मांडू लागले, वेळप्रसंगी शक्तिप्रदर्शन करू लागले. या तरुणांना विधायक कामांमध्ये जोडायला हवे. परंतु कदाचित तसे होताना आत्ता दिसत आहेत तेवढे तरुण दिसणार नाहीत. त्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, कारण हुल्लडबाजी करणे सोपे असते पण नि:स्वार्थ बुद्धीने काम करणे कठीण असते. त्यामुळेच प्रसिद्धीपासून लांब राहून आपले काम करत राहणार्या सामाजिक संस्थांमध्ये तरूण कमीच दिसतात. समाजकारणात नाही तर नाही, परंतु विधायक राजकारणात तरूणांची संख्या वाढली तरी चित्र समाधानकारक असेल. अन्य राजकीय पक्ष मनसेकडे जाणारा तरुण वर्ग पाहून नक्कीच धास्तावले आहेत. युवक काँग्रेस, भा.ज.यु.मो. आणि तत्सम सर्वांनाच आपल्या रणनीतीची फेररचना करावी लागणार आहे।
येणारा काळ हा भारतासाठी मोठ्या प्रमाणावर युवाशक्ती पुरविणारा असेल असे म्हटले जाते. लोकसंख्येच्या पोतानुसार (pattern) तरुणांचे प्रमाण लक्षणीय होणार आहे. त्यामुळे कार्यशक्ती तर वाढेलच, परंतु राजकीय क्षेत्रातही बदल होतील. तेव्हा त्यादृष्टीने आत्तापासून पावले उचलणारा यशस्वी ठरेल.