६. शचीन्द्रनाथ सान्याल
“ ‘हिंदुस्थान’ हे एकराष्ट्र नसून अनेक
राष्ट्रांचा समूह आहे” ही धारणा पद्धतशीरपणे पसरवण्याचा प्रयत्न केवळ परकीय
सत्तांकडूनच नव्हे; तर परकियांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या कित्येक एतद्देशीय
तथाकथित इतिहासकार असामींकडूनही अगदी आजही होताना दिस्तोदिसतो. याचे प्रमुख कारण
म्हणजे या देशात हिंदू समाजाने मनोमन जपलेली विविधता! या विविधतेही समान
संस्कृतीमूल्ये, चिन्हे, आचरणाच्या पद्धती, जय-पराजयाच्या समान संकल्पना,
प्रांतोप्रांतीच्या राष्ट्रपुरुषांबद्दल अभिमानाची भावना यातून भावात्मक
राष्ट्रसंकल्पना प्रतीत होते. एकराष्ट्रीयत्वाची भावना ही अनुभूतीची गोष्ट आहे.
संक्षेपाने
राष्ट्र संकल्पनेबद्दल नमूद करण्याचे कारण एवढेच की, ‘अनामवीरा’ मालिकेतील सर्वचजण
आमच्यासाठी राष्ट्रपुरुष आहेत. ते बंगाल, महाराष्ट्र, पंजाब अशा ‘प्रांतांसाठी’ लढले
नाहीत – ते रयतेसाठी लढले – ते या पवित्र भूमीच्या पवित्रतम कणासाठी लढले,
गंगा-सिंधू-सरस्वतीच्या जलबिंदूसाठी त्यांनी रक्तबिंदू अर्पण केले. हे राष्ट्र
स्वतंत्र राहावे म्हणून त्यांनी भारतमातेच्या चरणी रुधिराभिषेक केला. दुसरी बाजू
म्हणजे आधीच्या इतिहासातील महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोबिंदसिंह
यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली होती.
आजचा अनामवीर ‘शचीन्द्रनाथ सान्याल’ याचा जन्म १८९३ मध्ये
बनारसला हरिनाथ सान्याल व खिरोदवासिनी देवी यांच्यापोटी झाला. बालपणीच त्याला
भारतमातेच्या स्वातंत्र्याची आस लागली; पण विविध मार्गांमुळे निर्माण झालेले
द्वंद्व किंवा वैचारिक संघर्ष शचीन्द्रनाथ सान्याल यांच्या आयुष्यात पाहायला
मिळते. बनारसला क्रांतिकारी संघटनेची सुरुवात शचीन्द्रनाथने केल्यानंतर
कलकत्त्याहून आलेल्या एका समवयस्क मित्राचा प्रभाव त्यांच्यावर पडू लागला. त्याची
भेट होण्याआधी सशस्त्र क्रांती हाच एकमेव पर्याय हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी
आहे, त्यासाठी पुरेसा शस्त्रसंग्रह करावा लागेल, युवकांची संघटना उभारावी लागेल
अशा विचारांचा होता शचीन्द्रनाथ. तो शिवाजीला (शिवाजी महाराजांना) आदर्श पुरुष
मानत असे. ‘तू मोठेपणी कोण होणार’ असे वडिलांनी विचारले असता तो म्हणत असे मी
शिवाजी होणार, नेपोलियन होणार. पण आता ह्या मित्राने शची च्या मनात द्वंद्व
निर्माण केले. केवळ पंधरा-सोळा वयाचे दोघेही जण. त्या मित्राचे विचार हे
विरक्तीकडे झुकणारे होते. संन्यास घ्यावा आणि सामाजिक कामापासून वेगळे होऊन
स्वतःच्या उन्नतीसाठी साधना करत जीवन व्यतीत करावे असे त्याचे म्हणणे होते. शचीसाठी
हे समाजापासून दूर जाणे, आपली आपण साधना करत राहणे कठीणच होते. परंतु त्या
मित्राच्या मते, मनुष्याचा श्रेष्ठ आदर्श म्हणजे जीवनात ईश्वरप्राप्ती करून घेणे,
सत्याची अनुभूती घेणे आणि त्यानंतरच समाजासाठी काम करणे उचित राहील. ईश्वराचा
साक्षात्कार झाल्याशिवाय समाजाची सेवा करणे म्हणजे आंधळ्याने आंधळ्याला मार्गदर्शन
करण्यासारखे आहे. ईश्वराच्या
साक्षात्कारानंतर त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या आज्ञेनुसार समाजाची सेवा करणे
सार्थकी लागेल. आपल्या मतांना पुष्टी देण्यासाठी त्या मित्राने श्रीरामकृष्ण
परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रांचा उल्लेख केला. शची च्या मनातील
द्वंद्व संपेना. एका बाजूला तो समाजापासून दूर जाऊ शकत नव्हता पण मित्राचेही
म्हणणे त्याला अगदीच अमान्य नव्हते. सहा महिने ही घालमेल चालली. शची ने
श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची चरित्रे वाचली. त्यांच्या वचनांवर
एकांतात एकाग्रतेने त्याने गहन विचार केला. उपनिषद आणि गीतेचा अनुवाद त्याने
वारंवार वाचला, साधू-संतांच्या सहवासात राहिला. पण विश्वकल्याणाची कामना करणारे
साधू-संत हिंदुस्थान पारतंत्र्यात असताना स्वतःच्याच कल्याणात मग्न आहेत हे त्याला
जाणवले. ते लोकांमध्ये मिसळत नाहीत, त्यांना राष्ट्रभक्ती, स्वदेशप्रेम यांबद्दल
उचित मार्गदर्शन करत नाहीत तर केवळ परमार्थ, ईश्वरसाधना, भजन यात मग्न राहतात.
शेवटी गीतेतील कर्मयोगाने त्याच्या मनातील द्वंद्व संपवले. स्वामी विवेकानंदांनी
केलेला कर्मयोग व संन्यास यांचा योग्य मिलाफ त्याच्या मनातील वादळ शांत करता झाला.
कुठलाही मार्ग उच्च अथवा नीच नाही. प्रत्येक मार्ग आपापल्या ठिकाणी योग्यच आहे,
विविध महापुरुषांनी वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सत्याची अनुभूती घेतली आहे. तेव्हा एकाच
गंतव्याकडे जाणारे विविध मार्ग असू शकतात आणि ते सर्व योग्यही असू शकतात याबद्दल
त्याच्या मनाची खात्री पटली. आपले आयुष्य कर्मयोगी बनून व्यतीत करण्याचे त्याने ठरवले.
भारतात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांची सद्गुणावली एकवटलेले महापुरुष
जन्माला यावेत अशी त्याची इच्छा होती. कर्महीन झाल्यामुळे भारतवर्षाचे अधःपतन झाले
आहे ही त्याची धारणा दृढ होत गेली.
श्री अरविंद घोषांच्या रूपाने
(औरोबिंदो घोष) त्याला आध्यात्म आणि स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व याचा योग्य संगम
पहायला मिळाला. १९११ ला योगी अरविंदांची भेट घेण्यासाठी त्याने पुदुच्चेरी गाठले.
पण दुर्दैवाने भेट होऊ शकली नाही. १९२० ला काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आल्यानंतर
त्याने पाहिले की महात्मा गांधींचा उदय राष्ट्रीय क्षितिजावर झाला आहे.
क्रांतिकारी आंदोलनाच्या विरोधात असणाऱ्या गांधीजींच्या विचारांनी त्याला अस्वस्थ
केले. बेळगाव कॉंग्रेस अधिवेशनात गांधीजींच्या भाषणाने व्यथित होऊन त्याने
प्रत्युत्तर म्हणून एक पत्र गांधीजींना पाठवले जे १२ फेब्रुवारी १९२५ च्या ‘यंग
इंडिया’ मध्ये जसेच्या तसे प्रकाशित करण्यात आले व सोबत गांधीजीनी त्याला दिलेले
उत्तरही!
१९२३ च्या सुमारास शचीचा संबंध
कम्युनिस्ट विचारधारेशी आला. साम्यवादाच्या सिद्धांतांचा सखोल अभ्यास त्याने केला.
विशेषत्वाने साम्यवादाचे आर्थिक चिंतन त्याला पटले, पण बाकी बाबतीत तो शेवटपर्यंत
साम्यवादी विचारधारेच्या विरूद्धच राहिला. धार्मिक वृत्ती, हिंदू धर्माप्रती
आस्था, जनसामान्यांची सेवा यामुळे शचीन्द्रनाथ साम्यवादाच्या भोवऱ्यात अडकले
नाहीत. आधुनिक विज्ञानातून प्राचीन भारतीय दर्शनशास्त्राच्या सिद्धांतांची पुष्टीच
होत जात आहे असे शचीचे म्हणणे होते. आपल्या देशातील काही लोक परानुकरणामुळे
आत्मवादाचा स्वीकार करत नाहीत आणि जे लोक आत्मवादावर विश्वास ठेवतात त्यांचीही ते
खिल्ली उडवतात.
“राष्ट्रीय क्षेत्रामध्ये जे लोक
त्याग आणि वीरवृत्तीने पुढे जात असतात त्यांच्या विचारधारेचा प्रभाव सामान्य
तरुणांवर पडत असतो, आणि रशियन क्रांतीच्या आंदोलनाच्या यशस्वीतेमुळे आपल्या देशातील
बहुतांश तरुण त्यामागे जाताना दिसतात. पण सगळ्याच्या मुळाशी आर्थिक कारणे आहेत या
मार्क्सवादी सिद्धांताशी मी सहमत नाही. साम्यवादाचा स्पर्श नसलेल्या जगातील
जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इटली, अमेरिका, जपान इत्यादि देशांकडेही पहायला हवे.
त्यांच्याकडूनही शिकायला हवे.”
अशी वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्या शचीन्द्रनाथने अनुशीलन समितीची एक शाखा १९१३ ला पटण्याला सुरु केली.
गदर कटाच्या आखणीत त्याचा सिंहाचा वाट होता. तो कट फेब्रुवारी १९१५ ला उघडकीला
आल्यानंतर शची भूमिगत झाला. रासबिहारी बोसांचा तो अगदी जवळचा सहकारी होता. बोस
जपानला निसटल्यानंतर सान्याल हा भारतीय क्रांतिकारकांचा सर्वात ज्येष्ठ नेता बनला.
सान्यालच्या कटातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा देऊन त्याची रवानगी अंदमान
निकोबारच्या सेल्युलर तुरुंगात करण्यात आली. तिथे त्याने ‘बंदी जीवन’ हे पुस्तक
लिहिले. त्याची तात्पुरती सुटका करण्यात आली खरी पण स्वस्थ बसेल तर तो क्रांतिकारक
कसला! हाडाचा देशभक्त असलेला शची पुन्हा इंग्रज विरोधी कारवायात गुंतून गेला. त्याची
पुन्हा तुरुंगात पाठवणी करण्यात आली आणि त्याचे बनारसमधील कुटुंबाचे घर जप्त
करण्यात आले.
१९२२ ला असहकार आंदोलन संपल्यानंतर
सान्याल, रामप्रसाद बिस्मिल आणि अन्य क्रांतिकारकांनी ऑक्टोबर १९२४ च्या सुमारास
हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना केली. संस्थेचे घोषणापत्र (manifesto)
शचीनेच तयार केले. ३१ डिसेंबर १९२४ च्या दिवशी उत्तर भारतातील मोठ्या शहरांमधून ते
वाटले गेले.
काकोरी कटातील सहभागाबद्दल शचीन्द्रनाथला पुन्हा तुरुंगवास घडला. पण ऑगस्ट १९३७ ला नैनी सेन्ट्रल
तुरुंगातून त्याला सोडण्यात आले. त्यामुळे पोर्ट ब्लेअर च्या सेल्युलर तुरुंगात
दोनदा धाडण्यात आलेला क्रांतिकारक हाही आगळावेगळा बहुमान शचीच्या नावावर आहे.
कारावासातच शचीला टीबी झाला आणि त्याला त्याच्या अंतिम महिन्यांमध्ये गोरखपूरच्या
तुरुंगात पाठवण्यात आले. शची १९४२ मधे निधन पावला.
दिल्लीच्या आत्माराम एंड संस,
कश्मीरी गेट, दिल्ली यांनी शचीचे आत्मवृत्त ‘बंदी जीवन’ हे ३ भागात प्रसिद्ध केले
आहे. इंटरनेटवरही त्याचे पीडीएफ वाचायला मिळू शकेल.