पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा ४
ज्ञात युवकांनी मध्यरात्रीच्या गहन काळोखात कापून काढला आणि तो जवळच्या प्रवाहात
फेकून दिला. या प्रवाहपतित आणि दिग्भ्रमित तरुणांमुळे राम गणेश गडकरी हे नाव आणि
त्यांची साहित्यकृती ‘राजसंन्यास’ नाटक हे दोघेही प्रकाशझोतात आले. अचानक
महाराष्ट्रात पुन्हा राम
गणेश गडकरी कोण होते? संभाजी महाराज चरित्र? आणि त्याआडून नेहमीचा आवडता खेळ ‘तुही
जात कंची हाय ?’ हे सुरु झाले.
मीही जिज्ञासा शमविण्यासाठी ‘राजसंन्यास’ शोधण्याच्या मागे
लागलो. शोध जवळच्याच वाचनालयात संपला. श्री. वसंत सावरकर यांनी चालवलेल्या वसंत
वाचनालयाने दखल घेऊन माझ्यासाठी ‘संपूर्ण गडकरी’- खंड पहिला (१९८४ चे पुनर्मुद्रण)
त्वरित शोधून काढले. त्यांना आणि कर्मचाऱ्यांना धन्यवाद देऊन नाटक वाचायला सुरुवात
केली. आज ते वाचून पूर्ण केल्यानंतर ब्लॉगच्या वाचकांसमोर माझी प्रतिक्रिया व्यक्त
करावी म्हणून हा लेखनप्रपंच.
या पाच अंकी नाटकाची सुरुवात मालवणच्या पाणकोट सिंधुदुर्गात
होते. तुळशी, मंजुळा, दौलतराव, संभाजीराजे, तानाजी मालुसरेंचा मुलगा रायाजी, रायाजीची
प्रेयसी शिवांगी, जिवाजीपंत, देहू, कबजी, हिरोजी, साबाजी, येसूबाई, ही प्रमुख
पात्रे आहेत. मी ज्या प्रतीतून वाचले त्यात तरी सुरुवातीला पात्र परिचय दिलेला
नाही त्यामुळे वाचकाला नाटक वाचता वाचता पात्रांचा आपसातील संबंध लावत लावतच पुढे
जावे लागते. संपूर्ण नाटक संभाजीराजांना
केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहे अथवा त्यांच्याभोवती फिरते असे मला मुळीच वाटले
नाही. सुरुवातीला संभाजीराजांचा प्रवेश आहे आणि शेवटी आहे. त्या दोन्ही ठिकाणी
संभाजीराजे चारित्र्याने, स्त्री-संबंधाने थोडेसे ढिले होते असे दाखवले आहे.
सुरुवातीला तुळशीबरोबरचे त्यांचे वागणे आणि शेवटचे साबाजीबरोबर बोलणे, जे
बऱ्याचअंशी स्वगत प्रकारचे म्हणजे स्वतःच कबुली दिल्यासारखे आहे, (पहा पृ. २, ३, ४, ५, ६) या दोन ठिकाणी
लेखकाने संभाजीराजांना रंगेल दाखवले आहे. ते आक्षेपार्ह वाटण्यासारखे आहे.
जिवाजी/जिवाजीपंत हा कीर्द-खतावण्या लिहिणारा, लेखणी
धरणारा, कारकुनी करणारा असा दाखवला आहे. त्याला स्पष्टपणे ब्राह्मण दाखविलेले नसले
तरी तो बिगर मराठा असल्याचे त्याच्या स्वतःबद्दलच्या संवादातून जाणवते. त्याला
स्वतःच्या कारकुनी पेशाचा माज आहे. लेखणीच्य ताकदीवर कुणाचेही बरेवाईट करू शकतो ही
प्रौढी तो स्वतःच मिरवतो. पण त्याला नाटककाराने वाईटच दाखवले आहे. तो
शिवाजीराजांबद्दल अनुदार उद्गार काढतो तसेच समर्थ रामदासांबद्दलही काढतो. रामदास
स्वामींना अगदी एकेरी लेखून तो बोलतो. देहू नावाच्या पात्राला स्वतः पराक्रमी राजा
होण्याची ईर्ष्या असते. तो अंगापिंडाने मजबूत असतो पण बुद्धीने थोडा कमीच दाखवला
आहे, त्यामुळे त्याला हा जिवाजीपंत आपल्या घोळात घेतो आणि तुला जर शिवाजी सारखा
राजा व्हायचे असेल तर रामदासासारखा कोणीतरी तुझ्यामागे हवा आणि तो मी होऊ शकतो अशी
आशा दाखवतो. अशा कारकुनाशिवाय राजाचे चालत नाही वगैरे. पण त्यासाठी तो मोबदला
मागताना दाखवला आहे. अगदी दारू-बाई असा मोबदला. त्यामुळे ह्या
ब्राह्मण-ब्राह्मणसदृश पात्राला नाटककाराने चांगलेच वाईट, दुटप्पी भूमिका घेणारा
असे रंगवले आहे हेही लक्षात घ्यावे लागेल. पहा पृ. १.
पहा पृ. १
साबाजी हा एक अत्यंत इमानी मावळा. तो कसेतरी करून
संभाजीराजे ज्या छावणीत शेवटी कैद असतात तिथे बुरखा पांघरून प्रवेश मिळवतो आणि
त्यांना तिथून बाहेर निघून जाण्याची विनंती करतो कारण त्याच्याकडे बेगमेकडून
मिळवलेला एक शिक्का असतो ज्याच्या आधारावर कुठल्याही चौकशीविना विनासायास छावणीतून
बाहेर निसटण्याची हमी तो राजांना देतो. पण धीरोदात्त संभाजीराजे त्याला नकार
देतात. ह्या शेवटच्या भागात संभाजीराजे स्वतःच्या तथाकथित केलेल्या वाईट कृत्यांची
कबुली देतात. सर्वांची माफी मागतात असे दाखवले आहे. यासाठी नाटककाराने कुठली
ऐतिहासिक साधने वापरली आहेत, कुठल्या बखरी वगैरेंचा संदर्भ घेतला आहे, कुठल्या
कागदपत्रांच्या आधारे हे सर्व लिहिले आहे ह्याचा बोध होत नाही. परंतु त्यातील काही
संवाद हे मला व्यक्तिशः अयोग्य आणि अनाठायी वाटले. लेखकाला पात्र रंगविण्याची मुभा
असली तरी संभाजीराजांसारखे ऐतिहासिक पात्र रंगवताना विशेष काळजी घ्यायला हवी होती.
ज्यांनी प्राणांतिक हालअपेष्टा सोसूनही शेवटपर्यंत हिंदू धर्म सोडला नाही आणि
अभिमानाने मृत्यूला कवटाळते झाले त्या संभाजीराजांबाबत बोलताना एवढे उद्गार काढणे
अनुचितच वाटतात. केवळ हिंदुत्वाला चिकटून राहिल्याने छळछावणीत कितीही अत्याचार
झाले तरी ‘हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार’ हे संभाजीराजांनीच
दाखवून दिले! त्यामुळे थोडे तारतम्य बाळगता आले असते, पण ते लेखकाचे स्वातंत्र्य.
खाली दिलेल्या काही उताऱ्यांवरून वाचकांना कल्पना येईलच पण वानगीदाखल हे उद्धरण
पहा:-
संभाजी : गोब्राह्मणप्रतिपालक
हिंदूपदपादशहा श्रीमंत छत्रपति संभाजीमहाराज! नाही, साबाजी, ही माझी किताबत
नाही! संभाजी हा म्हणजे केवळ रंडीबाज छाकटा! काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर
एकवटून छत्रपतींनी बांधिलेल्या राष्ट्रतीर्थाची – श्रीगंगासागराची ज्याने
व्यभिचाराच्या दिवाणखान्यातील मोरी बनवली तो हा संभाजी ! वैराग्याच्या वेगाने
फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूबाजाचे तोंड पुसण्याचा दस्तरुमाल केला ! महाराष्ट्रलक्ष्मीच्या वैभवाचा जरीपटका फाडून
त्याची रंडेसाठी काचोळी केली ! साबाजी, माझ्या नऊ वर्षांच्या नावलौकीकाची इमारत
नीटपणे पाहा ! चिटणीसाला हत्तीच्या पायाखाली तुडवून तिचा पाया घातला. मातोश्री सोयराबाईसाहेबांना जितेपणी भिंतीत
चिणून तिच्या भिंती उभारल्या; ती पातकी इमारत उंचावता उंचावता कळसाला
पोचण्यापूर्वीच कोसळून तिच्याखाली संभाजीचा चुराडा होऊन गेला. ...
पहा पृ. २
पहा पृ. ३
पहा पृ. ४
पहा पृ. ५
पहा पृ. ६
इत्यादि मजकूर हा खचितच संभाजीराजांना मानणाऱ्या कुठल्याही
धर्माभिमान्यास लागेल असाच आहे. त्यातून त्यांचा पुतळा संभाजी उद्यानात असणे हे
थोडेसे विपरीतच आहे. आता पुतळा आधी बसवला की उद्यानाचे नामकरण आधी झाले ही माहिती
ह्या संदर्भात महत्वाची असली तरी ती माझ्याकडे तूर्तास नाही. आणि कसेही असले
तरी अर्थात त्यांचा पुतळा उखडून टाकणे आणि
तोही मध्यरात्रीच्या काळोखात ह्यात काय शौर्य आहे देव जाणे. आणि ती गोष्टही आत्ताच
का व्हावी हे सांगायलाही कोण मोठ्या राजकीय विश्लेषकाची आवश्यकता नाही. असो. कसेही
असले तरी नाटकातून संभाजीराजांच्या प्रतिमेला मलीन केल्याचे जाणवते आणि हे माझे
व्यक्तिगत आकलन आणि मत आहे.