कोळसा खाणी, २-जी, दुष्काळ सहाय्यता निधी
घोटाळा, सिंचन घोटाळा या आणि अशा घोटाळ्यांनी गांजलेल्या जनतेला ‘स्वच्छ भारत’
स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सत्तापालट करावा लागला आणि त्यानंतर सुरु झाली हळूहळू
असहिष्णुतेवर चर्चा! कायदा-सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे आद्यकर्तव्य. समाजात
शांतता आणि सौहार्द असेल, सारे गुण्यागोविंदाने नांदत असतील तरच समाज विकासाच्या
दिशेने पुढे जाऊ शकतो. केवळ रस्ते, पाणी, वीज असली तरी भांडणारा, झगडणारा समाज
प्रगती करू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारांनी पोलीस दल, गुप्तचर यंत्रणा यांचा
योग्य तो वापर करून समाजात खेळीमेळीचे आणि सुरक्षित वातावरण राहील हे पहायचे असते.
ज्याप्रमाणे गोध्रा हत्याकांड झाल्यानंतर गुजरात सरकारवर चहुबाजूंनी ताशेरे ओढले
गेले, किंवा २६/११ चा हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठली आणि
सरकारने त्वरित पावले उचलत उपाययोजना केली, त्याचप्रमाणे दादरीमधील निंदनीय घटना
घडल्यानंतर मात्र तेथील राज्य सरकारला कोणीच जाब विचारला नाही. एकदम येथील हिंदू
समाज हा असहिष्णू झाल्याचा आभास निर्माण केला गेला.
साहित्यिक, कलाकार,
संशोधक यांनी निषेध म्हणून आपल्याला मिळालेले कित्येक वर्षांपूर्वीचे पुरस्कार परत
करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी एकच कारण दिले की संपूर्ण देशात
असहिष्णुतेचे वातावरण पसरले आहे. यातील फोलपणा तेव्हाच सर्वांना समजला कारण आजची
परिस्थिती ही कितीतरी पटीने चांगली असे दिवस आणि अशा रात्रीही येथील समाजाने
पूर्वी अनुभवल्या आहेत. ठराविक समाजाची घरे जाळणे, ठराविक समाजाला अगदी दिवसाढवळ्या
ट्रेन्समधून बाहेर काढून मारणे, स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी आणि स्वतःचे बूड
स्थिर करण्यासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणे, न्यायालयांचे निर्णय
कायदे करून वाकवणे, सत्तेच्या हव्यासापायी विनाकारण हजारो लोकांना तुरुंगात डांबून
हजारो कुटुंबांची वाताहत करणे यावेळी जणू असहिष्णुताही घाबरून कुठल्यातरी
कोनाड्यात लपून बसली होती की काय म्हणून कुणाला त्यावेळी पुरस्कार परत करावे वाटले
नाहीत!
पण आता एकदम
सर्वांना जाणवू लागले की देशात असहिष्णुता फोफावली आहे. मग इथल्याच समाजाच्या
आधारावर मोठ्या झालेल्या काही कलाकारांनी आपल्या बायकोचा हवाला देऊन खुल्या
मंचावरून सांगितले की त्यांना एवढे असुरक्षित वाटते की ‘हा देशच सोडून जावे’. पण
त्यांना कुठल्या देशात ‘सुरक्षित’ वाटते ते सांगणे मात्र शिताफीने टाळले. आसपासचे
सोडा पण अन्य खंडातील एकही देश सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये असा दिसत नाही की,
जो सुरक्षित आणि सहिष्णू समाजाची शाश्वती देऊ शकेल. त्यामुळे इथला मुळातच सहिष्णू
असलेला आणि आपल्या घरातच साप पाळून त्यांना दुग्धपान करायची सवय असलेला समाज न
खवळता तरच नवल! बहुतांश समाजाने वरील प्रकारच्या वक्तव्यावर तिखटपणे प्रतिक्रिया
द्यायला सुरुवात केली. प्रसारमाध्यमातून त्याचे पडसाद उमटू लागले आणि मग
असहिष्णुतेचा प्रचार करणाऱ्यांना मोकळे रानच मिळाले. विविध विषय आणि खऱ्या
समस्या यांवरून लक्ष उडवून विनाकारण समाजात तेढ पसरवण्याचे उद्योग सुरु झाले.
संसदेचे कामकाज रोखायला काही इंधन तयार झाले.
याच
सुमारास फ्रान्समधे अतिरेक्यांनी हल्ला केला. तोही कुठे? तर संगीताच्या
कार्यक्रमाला जमलेल्या रसिक, निःशस्त्र लोकांवर. त्यावरही आपल्या येथील काही
तथाकथित विचारवंत तावातावाने ह्या सर्वामागची ‘आर्थिक गणिते’, तेलाचे राजकारण
वगैरे समजावून सांगत होते! कधीकधी तर असे वाटते की आपल्या खुर्चीखाली बॉम्ब
फुटेपर्यंत खऱ्या दहशतवादाला हे लोक ओळखणारच नाहीत काय? एखाद्या गटाच्या, अतिरेकी
संघटनेच्या विस्तारामागे, शस्त्रास्त्र पुरवठ्यामागे जशी आर्थिक बाजू असते तशी त्या
अतिरेकालाही आर्थिक कारणे असतीलच. ‘तण्डुलाः
प्रस्थमूलाः’ हे आहेच; पण ज्यामुळे हजारो पद्मिनी जोहार करत्या झाल्या, ज्यामुळे
संभाजीराजांना हालहाल करून ठार मारले गेले, ज्यामुळे जोरावरसिंह आणि फतेहसिंह ह्या
गुरुपुत्रांना भिंतीत जिवंत चिणून मारले गेले, आगगाड्या भरून मृतदेह स्वतंत्र
भारतात पाठवले गेले आणि अशी असंख्य उदाहरणे जी देताना लेखणी झिजेल पण अत्याचारांची
मालिका संपणार नाही, त्या सांप्रदायिक उन्मादाला मोकळेपणाने ओळखण्यात एवढी भीड का
पडावी? आणि त्याहून घोर थट्टा म्हणजे अशा रानटी, अमानवी आणि राक्षसी जमातीची तुलना
ही सुसंस्कृत, शांतताप्रिय, सहिष्णू हिंदू समाजाशी करायची. संस्कृत भाषेत एक
सुभाषित आहे,
अहं
स्वर्णम् न मे दुःखं अग्निदाहेन ताडयेत् |
एतद् तु मे महादुःखं गुञ्जया सह तोलनम् ||
म्हणजे थोडक्यात सोन्याला
दागिना घडवताना अगदी आगीत तापवून, वितळवून दागिना घडवतानाही दुःख होत नाही पण
जेव्हा त्याची व्यवहारात गुंजेशी तुलना (वजन मापण्यासाठी एका पारड्यात सोन्याचा
दागिना आणि दुसऱ्यात गुंजेच्या बिया) केली जाते तेव्हा सोन्याला खरे दुःख होते.
१०८
वेळा नदीवर जाऊन आंघोळ करण्याची सहिष्णुता हा समाज जपतो. उकळत्या तेलात टाकले आणि
शरीरदाह केला तरी ईश्वरावरची अतूट निष्ठा मानणारा हा समाज आहे. सतरावेळा लढाईत
पराभव करून शरण मागितल्यानंतर उदार मनाने अभय देणारा हा समाज आहे. ह्या समाजाला
सहिष्णुतेचे पाठ कोणी शिकवायला नकोत. त्याच्या रक्तातच सहिष्णुता आहे. गौतम बुद्ध,
भगवान महावीर, शिबीराजा, चिलया बाळ, कर्ण, युधिष्ठिर अशी मालिका केवळ याच पावन
भूमीवर होऊ शकते. दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे, त्याच्याही मताचा आदर करणे हे अगदी
चार्वाकापासून चालत आलेले आहे. पण म्हणून त्याचवेळी हा समाज वीर्यहीन नाही याचीही
जाण ठेवणे गरजेचे आहे. गोमातेच्या रक्षणासाठी कायदेशीर लढाई देणारा पण त्याचवेळी
पूर्वकल्पना देऊन कसायाचा हात बुंध्यापासून कलम करणारा, स्वतःचे मुलगे लढाईत मारले
गेल्यावरही अभेद्य आत्मविश्वासाने हुंकार भरणाऱ्या शीख गुरुंच्या ‘इन सिख्वन के
शीश पर, वार दिये सुत चार | चार मरे तो क्या हुआ, जीवित कई हजार’ या वाणीचे स्मरण
करणारा, आणि तीच परंपरा आजही जपत ‘माझी मुलेही देशरक्षणासाठी सैन्यातच जातील’
म्हणणाऱ्या वीरगती प्राप्त कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी, वीरप्रसवा यांचा
हा समाज आहे. त्यामुळे कुणा छछोर माणसाची बायको शयनगृहात त्याला काय म्हणते ह्याला
महत्व द्यायचे, की स्वप्राणांचे बलिदान देणाऱ्या पतीच्या चितेच्या प्रकाशात आपल्या
मुलांनाही मातृभूमीच्या ओंजळीत अर्पण करणाऱ्या वीरपत्नीचे धीरोद्गार मनात जपायचे
हे ज्याचे त्याने ठरवायचे.