"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, April 21, 2013

महाराष्ट्र टाईम्स : नैतिकतेचा बुरखा...


मराठी वृत्तपत्रांची स्थिती आजघडीला काही विशेष चांगली नाही. नाव घेण्यासारखी वृत्तपत्रे अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढी. त्यातही जसा संपादक असेल तशी दिशा वर्तमानपत्रे घेतात याचाही मराठी वाचक साक्षीदार आहे. ‘जुन्याकाळ’ च्या एका वर्तमानपत्रात एका ‘नव’ पक्षाबद्दल आणि त्याच्या नेत्याबद्दल बातम्या/अग्रलेख छापून येत होते. मग कार्यकर्ते त्याच्या जम्बो झेरॉक्स काढून पक्षाच्या फलकावर लावत असत! ‘परस्परं प्रशंसन्ति’ अशातलाच काहीसा हा प्रकार! असो.

‘लोकसत्ता’ चा मध्यंतरीच्या काळातला हिंदूविरोध/हिंदुत्वविरोध हा स्पष्टपणे पूर्वग्रहदूषित होता. त्यात काही कोर्ट केसेस झाल्या ज्या चालू आहेत आणि ज्यात संबंधितांनी घाबरून सपशेल माफी मागितल्याचेही समोर आले आहे. या साऱ्या प्रकारामुळे मग संबंधितांची उचलबांगडी म्हणा वा हकालपट्टी म्हणा; जे काही झाले त्यानंतर लोकसत्तेची दिशा पुन्हा बदलली. पण पूर्वीपासूनच लोकसत्ताच्या पुरवण्या वाचनीय असतात. चतुरंग आणि लोकरंग तर संग्राह्य असतात. त्यातले ‘दोन फुल एक हाफ’, ‘ऐकावे ते नवलच’, ‘मुक्तपीठ’, अशी काही सदरे तर कायम लक्षात राहतील.

सकाळ हे वर्तमानपत्र मला फार सुबक आणि स्वच्छ वाटते. स्वस्त असूनही उत्तम छपाई, सुंदर फॉण्ट आणि बातम्याही एकांगी वाटत नाहीत. श्री. कांबळे यांचे लेखनसुद्धा मला खूप आवडते. सकाळच्या पुरवण्यासुद्धा वाचनीय असतात.

पुढारी सुद्धा वाचनीय आहे. हिंदुत्वाबद्दल सडेतोड भूमिका, अन्यायाची चीड, बहुजनांची कदर हे या वृत्तपत्रातून स्पष्टपणे दृग्गोचर होते. मुंबईत तूर्तास विशेष वितरण नसल्याने वाचकांना पुढारी अजून समजलेला नाही.

महाराष्ट्र टाईम्स म्हणजे तर आंग्लाळलेला पेपर! आज दुर्दैवाने अशी स्थिती आहे की, अगदी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ची भाषांतरित आवृत्ती म्हणून जरी काढली तरी म.टा. चा दर्जा सुधारेल. धर्माच्या नावाने बोटं मोडायची, ‘सेक्युलर’ आहोत हे दाखवण्याची जी स्पर्धा आहे त्यात अग्रेसर होण्याचे स्वप्न पहायचे आणि शिवाय मुखपृष्ठावर वर मध्यभागी गणपतीचे दररोज वेगळे चित्र छापायचे हा कुठला दुटप्पीपणा? स्वीकारा की हिंदू संस्कृती या देशाचा मूलाधार आहे. सोंग टाकाल तेव्हाच शक्य होईल ना ते! असो. सामाजिक कार्यात बरीच दशके असलेल्या बाईंना मध्यंतरी भेटण्याचा योग आला तेव्हा त्या म्हणाल्या की ‘म.टा. वाचलात तर निद्रेतच राहाल.’ खरे वाटते ते. म.टा. ची वेबसाईट म्हणजे तर अश्लीलतेच्या सीमारेषेवर रेंगाळणारी  बनावट सज्जन व्यक्ती वाटते. कुणाला वाटेल की मी म.टा. ला लक्ष्य करतो आहे. पण अजूनही मी सध्याचा संपादक कोण आहे, विचारधारा काय आहे इत्यादी तपशील अजिबात तपासलेले नाहीत. आणि पुढेही कधी पहावे असेही वाटत नाही. पण आज कित्येक मराठी घरांमध्ये म.टा. जातो आणि त्यात लोकांचे विचार, भूमिका बदलण्याची ताकद आहे म्हणून या लेखात प्रामुख्याने म.टा. वर टीका केली आहे.

दिल्ली बलात्काराची घटना घडल्यानंतर सर्वांनीच स्वाभाविकपणे संताप, शोक व्यक्त केला. काळजीचे वातावरणही तयार झाले. प्रसारमाध्यमांनी समाजमनाच्या जडणघडणीत खूप महत्वाची भूमिका बजावायची आहे. पण आज दुर्दैवाने समाजाची नीतीमूल्ये ढासळायला प्रसारमाध्यमेही जबाबदार आहेत. चित्रपट, टी.व्ही. मालिका यांचा तर विचारच नको पण वर्तमानपत्रेसुद्धा स्त्रीचे चित्रीकरण अशा पद्धतीने करताना दिसतात की कुटुंबात आपला पेपर जातो त्यात शाळकरी मुले-मुली असतात या गोष्टीचा जणू त्यांना विसरच पडलेला आहे.

दिल्ली बलात्कार घटनेनंतर म.टा. ने १९ डिसेंबर २०१२ च्या आपल्या अग्रलेखातून कोण नैतिकतेचे धडे दिले. ‘राष्ट्राचा विचार’, ‘स्त्री-पुरुष नात्याची घट्ट वीण’, ‘स्त्रियांची असुरक्षितता’ असे तारे तोडले आहेत. आणि शिवाय पुढे म्हटले आहे, आपल्या मिथक कथांमध्ये तरुणींच्या छेडखानीच्या कथांना एक रोमँटिक वलय प्राप्त झाले आहे .तरुणवयात पुरुषांना ते आपल्या मर्दानगीचेही लक्षण वाटते . पण याच कारणामुळे ग्रामीण भागातील लहान मुलीआणि तरुणी कायम भयाच्या सावटाखाली जगत असतात . गावपातळीवर मुलींच्या शाळागळतीचे मुख्य कारण हीछेडछाडच आहे . परंतु कौटुंबिक पातळीपासून पोलिसस्तरापर्यंत कोणालाही तो गुन्हा वाटत नाही . शहरातहीस्थिती वेगळी नाही . स्त्रियांकडे रोखून बघण्यात पुरुषांना गैर वाटत नाही . यात पांढरपेशे आणि पापभिरूम्हणवणारेही पुरुष असतात . आपल्या नजरेचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल , हे त्यांच्या गावीही नसते.पुढे अग्रलेख म्हणतो, “बाई ही भोगवस्तू आहे हे समजण्याची सुरुवात इथून होत असते आणि पुढे तो अनेकांना आपला हक्क वाटतो .पण स्वतः महाराष्ट्र टाईम्स या अशा प्रकारच्या भोगवस्तू दृष्टीकोनाला कारणीभूत आहे हे सोयीस्कररित्या विसरतो. कारण स्वतः म.टा. च्या वेबसाईटवर स्त्रीला ‘भोगवस्तू’ मानून स्त्रीदेहाचे उत्तान प्रदर्शन असलेले हजारो फोटो आहेत. त्यातले वानगीदाखल काही खाली दिले आहेत.

हे एकाच समाजपुरुषाचेदोन चेहरे आहेत . आपण आपल्या आरशाची काच एकदा फोडून टाकावी , म्हणजे कळेल की पलीकडे आणखी एकचेहरा आहे आणि तो हिंस्र आणि विद्रूप आहे . हे वरील अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे म.टा. ला देखील लागू होते.  

जाहिरातींवर हल्ली पेपर चालतो म्हणतात. जाहिराती छापून उरलेल्या जागेत बातम्या छापायच्या अशी काहीशी परिस्थिती उद्भवलेली आहे. म्हणून पहिले पान असते एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पाची जाहिरात. पण या जाहिराती जर अश्लील, बीभत्स असतील तर त्याला ठाम नकार देण्याचे धैर्य वृत्तपत्राने दाखवायला हवे. म.टा. चे वरील चित्र आणि व्हिडिओ प्रकरण हे कुणाला वाटेल जाहिरात म्हणून आहे. वेबसाईट चालवायची तर अशा जाहिरातीतून महसूल मिळेल इत्यादी. पण तसे नाही. वस्तुस्थिती अशी आहे की म.टा. स्वतः यात ‘रस’ घेऊन या फोटोज चे संकलन आणि प्रदर्शन करतो आहे.
म.टा. च्या नक्की कोणाची निवड? ताजं टवटवीत???
पहा वरील चित्रातील लाल चौकट. ‘आमची निवड’?!? ‘sexy models in bikini’ आणि ‘Lesbian Photo shoot for a cause!” ही यांची निवड? हे निवडीला बसले होते अशी सर्व चित्रे घेऊन? आणि त्यात ही त्यांनी निवडली त्यांना भावली म्हणून! हा म.टा. चा कोणता चेहरा म्हणायचा? की आंग्लाळलेल्या त्यांना यात काहीच वावगे वाटत नाही? टाईम्स ऑफ इंडिया ‘बॉम्बे टाईम्स’ या नावाने जी काही निरुपयोगी रद्दी वाचकांच्या गळ्यात मारतो त्याचेच हे मराठी स्वरूप तर नसेल? प्रश्न खूप झाले पण उत्तर साधे आहे. महाराष्ट्र टाईम्स ने त्वरित हा प्रकार थांबवावा आणि अश्लील चित्रांचे प्रदर्शन आणि त्याला देण्यात येणारे प्रोत्साहन हे थांबवावे. अन्यथा मराठी वाचक नक्कीच याचा गांभीर्याने विचार करतील. 
म. टा. च्या निर्लज्जपणाचा कळस