संत तुकाराम हा विषय खरा लेखाचा नाहीच. तो अनुभूतीचा विषय
आहे. पण नुकताच नवा ‘संत तुकाराम’ चित्रपट पाहणे झाले आणि त्या विषयावर
विचारप्रकटन करावेसे वाटले.
अणुरणीया थोकडा...तुका आकाशाएवढा..
‘श्वास’ पासून बरेच दर्जेदार चित्रपट येऊ लागले. कारणे
काहीही असोत – शासनाकडून मिळणारी ‘टॅक्स फ्री’ ची सूट असेल किंवा अनुदानाचे आमिष
असेल, अथवा चित्रपटगृहांना मराठी सिनेमे लावण्याची सक्ती असेल परंतु मराठी चित्रपट
भरपूर येऊ लागले. अगदी टुकार चित्रपटही पासरीला पन्नास आहेत. विनोदाच्या नावाखाली
बाष्कळपणा करणारे अभिनेते, अंगप्रदर्शन करणाऱ्या नट्यांचे नृत्याविष्कार (?) आणि
अमराठी निर्मात्यांची गुंतवणूक यांचा समावेश असलेले सिनेमे उदंड जाहले. कोणी एक
अभिनेता-निर्माता मराठी अस्मिता जागवणारे सिनेमे काढत सुटलाय.शिवरायांच्या हुकमी नाण्याला
बाजारात विकायचे. असो. तरीही हे मान्य करावेच लागेल की मराठी चित्रपटांना चांगले
दिवस आले आहेत.
काल्पनिक कथानाकांपेक्षा वास्तवात घडून गेलेल्या व्यक्तिरेखांच्यावरील
दर्जेदार चित्रपट आले आहेत. उदा. बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, अजिंठा,
वासुदेव बळवंत फडके आणि याच यादीतला अगदी अलीकडचा ‘संत तुकाराम’.
संत तुकारामांच्या जीवनचरित्रातील अनेक ज्ञात-अज्ञात पैलू चित्रपटात
येऊन गेले आहेत. तुकारामांच्या बालपणापासून सुरुवात झालेला हा सिनेमा प्रेक्षकाला
मध्यंतरापर्यंत चांगलेच खिळवून ठेवतो. आणि मध्यांतरानंतरही ही पकड ढिली होत नाही.
कर्णमधुर संगीताने सजलेली गाणी आणि सुंदर छायाचित्रण यांचा मनोहारी मिलाफ आहे. बोलबच्चन च्या या बाष्कळ युगात हा चित्रपट काढल्याबद्दल लेखक – दिग्दर्शक – निर्माते यांना मला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.
लहानपणीचे तुकाराम, त्यांचे सवंगड्यांबरोबरचे खेळ, मस्ती,
नदीत डुंबणं वडिलांना प्रश्न विचारणं हे बालपण दाखवून त्यानंतर हळूहळू
कारुण्यपातळी वाढवत नेली आहे. कधीकधी तर डोळ्यात पाणी येतं, अंगावर शहारे उठतात. दुष्काळाचे भीषण चित्रणही यात आले आहे. गुरे, माणसे पटापट मरतात..शुष्क माळराने, सुक्या विहिरी, सांगाडे आणि तुकोबांच्या घरातील मृत्यू असे हृदयद्रावक प्रसंगही आले आहेत. दुष्काळात तुकोबा आपल्या घरातील साठवलेले धान्य लोकांना मुक्तहस्ते वाटून टाकतात. लोकांची झुंबड उडते आणि शेवटी तर लोक हमरीतुमरीवर आल्यासारखे भांडतात. तुटून पडतात धान्यावर. तुकोबांना हा एक धक्का असतो..की लोकांना आपले भलेही कळत नाही. असाच एक दाहक अनुभव त्यांना येतो. घरात आईचा मृत्यू झाल्यावर ते तेराव्याचे गावजेवण घालतात. त्यात लाडू वाटतात. नंतर सर्व पंगत उठल्यावर एक स्त्री (तुकोबांच्या आईची मैत्रीण) निरोप घ्यायला आणि सांत्वन करायला म्हणून येते. तुकारामांच्या घरातले सर्वजण भावूक होतात. तुकोबा पाया पडायला म्हणून वाकतात, ती स्त्रीही पटकन खाली वाकते अन् त्या धांदलीत तिच्या ओच्यात घेतलेले लाडू पटापट खाली पडतात. ती ओशाळं हसते आणि म्हणते “घरात जरा ह्यांना...”. तुकोबा काही बोलत नाहीत. नंतर तुकारामांची पहिली पत्नी आजारी असते तर गावातले लोक मधेमधे येऊन चौकशी करतात. त्यामागचा खरा हेतू असतो तिचा मृत्यू झाला तर आपल्याला गावजेवण मिळेल आणि एकवेळचे तरी चांगले खायला मिळेल. तुकारामांच्या दुसऱ्या बायकोच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर ती सर्वांना कठोर बोलून हाकलून लावते. किंबहुना म्हणूनच तुकोबा आपले समाजप्रबोधनाचे काम जोराने सुरु ठेवतात.
शिवरायांची भेट हा एक हृद्य प्रसंग आहे. हिंदुत्व रक्षण करणाऱ्या शिवरायांना संतांचे मोलाचे सहकार्य लाभले. किंबहुना आपल्या हिंदूराष्ट्राची ही परंपराच आहे – की केवळ बळ असून चालत नाही तर मानवकल्याणासाठी बळाच्या बरोबरीनेच विवेकबुद्धीही असावी लागते. हिंदू समाज म्हणून नेहेमीच ‘शापादपि शरादपि’ या भूमिकेत राहिला आहे. शास्त्रांच्या रक्षणासाठी शस्त्रांची आवश्यकता असते. हिंदू देवदेवता शस्त्रसज्ज आणि सद्रक्षणासाठी नित्यसिद्ध आहेत. हेच काम राजे आणि संतांनी वेळोवेळी केले. राजांनी सज्जनांना बलशाली बनवण्याचे प्रयत्न केले तर संतांनी बलवंतांना सज्जन बनवण्याचे काम केले. आणि म्हणूनच शक्ती आणि भक्ती या दोहोंचीही समाजाला गरज असते. केवळ एकाने चालत नाही. शिवरायांच्या बाबतीत संत तुकाराम किंवा संत रामदास यांनी हेच काम केले. चित्रपटात त्यांच्या भेटीत तुकोबांनी हा स्पष्ट उल्लेख केला आहे. की तुम्ही हे शक्तिजागरणाचे काम करायचे आणि आम्ही त्यात युवकांना आणि जनतेला जोडण्याचे, सहाय्यभूत करण्याचे कार्य करायचे. उदाहरणादाखल एक प्रसंग दाखवला आहे. दोन लांडग्यांशी एकट्याने झुंज घेणाऱ्या एका शूर तरुणाला तुकोबा शिवरायांच्या सेनेत भरती होण्याचे सुचवतात आणि पुढे लढाईत तो मावळा कामी येऊन शिवराय स्वतः त्याची रक्षा घेऊन त्या वीराच्या वडिलांना भेटायला येतात. तिथेच तुकोबांची पहिली भेट होते आणि तुकोबा राजांना घेऊन त्या घरी जातात. त्या वीरपित्याचे सांत्वन करतात, आणि स्वराज्याच्या कामी आल्याचा गौरवदेखील करतात.

तत्कालीन सामाजिक परिस्थितीचेही चित्रण यात आले आहे.
विशेषतः जन्माधारित वर्णव्यवस्था कशाप्रकारे मूळ पकडून होती आणि भेदाभेदाचे जळजळीत
वास्तव कसे सहन करावे लागत असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. आजही या परिस्थितीत
विशेष फरक पडला असेल असे नाही. तुकोबांना स्वतःला अनेक ठिकाणी ‘वाणी’ म्हणून
उपरोधिक उल्लेखाला सामोरे जावे लागलेले आहे. गीतेवर, वेदावर बोलतो म्हणून अपमान
सहन करावा लागलेला आहे. मंबाजी आणि अन्य स्वयंघोषित ब्राह्मणांनी कशाप्रकारे तुकोबांसारख्या
संतांना अपमानित केलं, समाजासमोर हिणवलं, आणि धर्मपीठासमोर उभं केलं याचं
वास्तववादी चित्रण झालं आहे. धर्मपीठासमोर तुकोबांवर आरोप ठेवला जातो की त्यांना
वेदावर बोलण्याचा अधिकार नाही, गीतेचे निरुपण करण्याचा अधिकार नाही कारण त्यांचा
जन्म उच्च जातीत झालेला नाही. तुकोबाही आपली बाजू मांडतात. परंतु तत्कालीन कर्मठ
आणि मूर्ख पंडित त्यांना दोषी ठरवून शिक्षा फर्मावतात.
अशासारख्या तथाकथित ब्राह्मण
लोकांनी हिंदू समाजाची आणि धर्माची अपरिमित हानी केली आहे. तुकारामांना त्यांच्या कथित गुन्ह्याची शिक्षा
हीच की त्यांनी आपल्या अभंगरचनांचे कागद स्वहस्ते इंद्रायणीत बुडवायचे. तुकोबा
जातात काठावर आणि आपल्या रचनांना प्रवाह देतात. या भागाचेही चित्रण खूप छान झाले
आहे. जनसमुदाय जमा होतो. तुकाराम अन्नत्याग करतात. लोक जमून राहतात आणि मग एकजण
त्यांचा एक अभंग म्हणतो, दुसरा माणूस दुसरा अभंग म्हणतो..अशाप्रकारे हेच
दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की स्मृतीरुपाने ते अभंग चिरजीवी झाले. पुन्हा ते पाण्यातून
वर आले हे दाखवण्याचं खुबीने टाळलं आहे असं मला वाटतं.
तुकारामांचे महत्व आहे कारण स्वतः प्रपंचात राहून भगवद्भक्ती,
ईश्वरस्मरण, नामसंकीर्तन याची आवश्यकता त्यांनी पटवून दिली. नेहेमीच्या जीवनात, सांसारिक, प्रापंचिक
समस्यांमध्ये मार्गदर्शक ठरतील अशा रचना केल्या. त्या केवळ उपदेशात्मक नाहीत तर
व्यावहारिक जीवनाचा परिपाठ घालून देणाऱ्या मौलिक सूचना आहेत. मनुष्यस्वभावाची ओळख,
पारख, व्यवहारचातुर्य असे अनेक पैलू त्यांच्या रचनांमधून आढळतात. विठ्ठलावरची अभंग
– अखंड श्रद्धा आणि जनहिताचे ध्येय हाच त्यांच्या जीवनाचा पाया होता.
सिनेमाला खूप गर्दी होती. थिएटरवर तर बाहेर काही लोक जवळ
येऊन बोलत होते, “घ्या तुकाराम घ्या ६० रुपये..बाल्कनी घ्या”! तुकाराम एवढे ‘डिमांड’
मधे आल्याचा आनंदच झाला! परिवारासकट लोक आले होते. जेव्हा एका बहिणाबाई नावाच्या
तत्कालीन संत महिलेचा उल्लेख आला तेव्हा आमच्या मागच्या रांगेत बसलेला एक पालक आपल्या
मुलीला सांगत होता की “तुला शाळेत ज्यांची ‘पोएम्’ आहे ना, त्याच ह्या!” मला गंमत
वाटली पण खूप बरं वाटलं की, लोक आवर्जून आपल्या मुलांना घेऊन आले होते. उत्तरोत्तर असेच मराठी चित्रपट निघावेत.
या चित्रपटातील गाणी तुम्ही ऐकू शकाल - http://www.dhingana.com/marathi/tukaram-songs-jitendra-joshi-radhika-apte-22607d1