मेकॉलेची दूरदृष्टी- एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला माहित नसावी पण माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. इंग्रज या देशातून निघून गेले तरी please, sorry आणि thanks हे ठेऊन गेले असे म्हणतात. पण एवढ्याच इंग्रजीपुरता हा प्रश्न सीमित नाही. मराठी ( किंवा भारतीय भाषांच्या ) शाळा ज्या झपाट्याने बंद होत आहेत , त्यामागे आपली भाषा व पर्यायाने संस्कृती संपवण्याचा विडा घेतलेले काहीजण या देशात आहेत. दुर्दैवाने "मराठी मराठी असा घोष कंठी, तयांची मुले मात्र कॉनव्हेंटी"! ही परिस्थिती असल्याने इतरांकडून आशा करणेच व्यर्थ आहे. तरीही आजवर संस्कृती, अस्मिता आणि स्वाभिमान याचे जतन सामान्य जनतेनेच, 'नाराज' न होता
केले आहे, कोण्या नेत्याने नव्हे, म्हणून तुम्हा-आम्हा सामान्य जनांसाठी हा लेखप्रपंच! मेकॉलेने जाताना अशी व्यवस्था करून ठेवली, की ज्या आधारे इंग्रज देशांना 'सुशिक्षित काळे मजूर' मिळत राहतील. जे शरीराने भारतीय असतील पण शिक्षणामुळे मनाने 'इंग्रज' असतील. असे इंग्रजाळलेले लोक सहजरीत्या कामाला उपलब्ध होतील अशी सोय करून इंग्रज गेले.

भाषा आणि संस्कार- कोणी म्हणेल की एखाद्या भाषेत शिक्षण घेतल्याने संस्कार, संस्कृती थोडीच बदलते? परंतु ह्याचे उत्तर दुर्दैवाने 'होय' असे आहे. भाषा ही केवळ अक्षरसमूह नव्हे...भाषा आली की त्याबरोबर त्यातल्या गोष्टी, त्यातले विचार, भावना, ती व्यक्त करण्याची पद्धत, उपमा या सर्व गोष्टी येतात. आणि सर्व गोष्टी भाषांतराने साध्य नाही होत, कारण त्या संस्कृतीत तो भावच जर नसेल तर तो व्यक्त कसा करणार? आता 'पतिव्रता', 'पुण्यशील', 'उपनयन', 'गर्भसंस्कार', 'तपस्या', 'वनवास' , 'रामराज्य', 'अश्वमेध', 'यज्ञ', 'वानप्रस्थ', 'ब्रह्मचारी' इ. शब्दांचे भाषांतर अशक्य कोटीतले आहेच. पण त्याच बरोबर काही गोष्टी जसे 'कालियामर्दन', ' 'झारीतील शुक्राचार्य', 'समुद्रमंथन', 'बुलंद दरवाजा', 'अस्मानी-सुलतानी', 'अन्न हे पूर्णब्रह्म', 'सात्विक भोजन', अशा गोष्टीही पूर्ण भावाप्रत भाषांतरित नाही करता येणार. आणि म्हणूनच भावना व्यक्त होणार नाहीत. जर या भावना कळल्या नाहीत तर संस्कारयुक्त बालक कसे घडेल? प्रस्तुत लेखाचा हा विषय नाही. पण आवश्यक वाटल्याने विषयांतर केले.
इंग्रजी माध्यमाच्या काही (विशेषतः कॉनव्हेंट) शाळांमधून तर कुंकू, टिळा, बांगड्या या गोष्टींवर बंदी असते! शिवाय आपसात संवादसुद्धा 'इंग्रजीतच' साधायचा, आपल्या मातृभाषेत नाही...अन्यथा 'पनिशमेंट' दिली जाते. का हा अट्टाहास? उत्तर शोधण्याची गरज नाही, कारण ते मेकॉलेने आधीच देऊन ठेवले आहे!
आता जनगणना आणि या षड्यंत्राचा काय संबंध? जनगणनेत भाषावार चित्रही स्पष्ट होते. आणि त्या आधारावर सरकार आपले भाषाविषयक धोरण ठरवत असते. कोणत्या भाषेला आधाराची गरज आहे? कोणती भाषा मृतवत आहे? कोणत्या भाषेवर आधारित कार्यक्रम, उपक्रम चालवले जावेत हे सर्व यातून ठरणार आहे.
गेल्या जनगणनेतील धडा- गेल्या जनगणनेत असे लक्षात आले आहे, की आपल्या देशात इंग्रजी बोलणार्यांची संख्या खूप आहे आणि म्हणून इंग्रजीसाठी जास्त वाव (शाळा, शिक्षण, नोकरी) देण्याची गरज ओघानेच आली. याहून धक्कादायक बाब ही आहे, की इंग्रजी ही बहुसंख्य लोकांची 'मातृभाषा' असल्याचे सत्य(?) पुढे आले आहे. आणि संस्कृत तर मृतप्राय घोषित करण्याची कोण घाई झाली आहे! हे सर्व पुढे आले आहे ते जनगणनेतील आकडेवारीमुळे. गेल्या जनगणना वृत्तानुसार २ लाख २६ हजार ४४९ (२,२६,४४९) नागरिकांनी आपली प्रथम भाषा इंग्रजी असल्याचे नमूद केले, ८ कोटी ६० लाख नागरिकांनी द्वितीय आणि ३ कोटी ९० लाख नागरिकांनी इंग्रजी तृतीय भाषा असल्याचे नोंदविले. या सर्व अंकगणिताद्वारे हे 'सत्य'(?) प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला, की आपल्या देशात हिंदी खालोखाल सर्वाधिक बोलली जाणारी ज्ञात भाषा इंग्रजी आहे. सरकार (म्हणजे सरकारातील लोक) साहजिकच हा विचार करणार नाही की इंग्रजी ही या देशातील एवढ्या मोठ्या वर्गाची 'मातृभाषा' कशी काय असेल? 'इटलीच्या' प्रेरणेतून चालणार्यांना याच्याशी काय देणेघेणे! किंबहुना असे लक्षात येते की येत्या जनगणनेत हे चित्र अधिकच भयावह होणार आहे. तेव्हा 'इटलीच्या' किटलीतून चहा ऐवजी भलतेच काही आपल्या पेल्यात पडणार नाही ना याची आत्ताच चिंता करणे आवश्यक आहे.
आपले काय चुकले?- आपली चूक ही अज्ञानातून झालेली आहे. त्यामुळे चूक म्हणण्यापेक्षा त्याला दिशाभूल म्हणणे योग्य ठरेल. शिवाय त्यावेळी आपल्याला हा विषय माहितच नव्हता. खानेसुमारीसाठी आलेल्या अधिकार्यांनी जेव्हा आपल्याला विचारले "की कोणकोणत्या भाषा आपण जाणतो"? तेव्हा आपण अनवधानाने 'मराठी' आणि 'इंग्रजी' हे सांगून मोकळे झालो असणार. आपल्यापैकी काहींनी तर आधी 'इंग्रजी' आणि मग एका भारतीय भाषेचा उल्लेख केला असेल. 'संस्कृत' तर आपल्या मनी-ध्यानीही नाही! ८वी ते १०वी चे हमखास गुण आणि काही स्तोत्र हे सोडले तर आपले संस्कृत संपलेच की! यातूनच संस्कृतसाठी 'घंटासुराने' धोक्याची घंटा वाजवली आहे. आणि याच अनवधानातून झालेल्या चुकीवर उतारा म्हणून येणार्या जनगणनेकडे प्रसंगावधान राखून एक सुसंधी म्हणून पाहिले पाहिजे.
तुम्ही हे करणार ना?- आता जेव्हा आपल्याकडे अशी विचारणा होईल की कोणत्या ३ भाषा आपण जाणतो? तेव्हा 'मराठी' (आपली मातृभाषा), 'हिंदी' (आपली राष्ट्र्भाषा) आणि 'संस्कृत' (आपली भाषांची जननी-देवभाषा) अशा त्रिभाषासूत्राचा अवलंब करावा. सध्या ' 'हिंदी' ही राष्ट्रभाषा नाहीच' असा खोडसाळ प्रचार केला जात आहे आणि 'हिंदीद्वेष' जाणीवपूर्वक भिनवला जातो आहे. आपण तात्पुरते त्या बहकाव्यात आलो असलो, तरी आपल्यातील भांडणाचा फायदा विरुद्ध शक्तीला होणार नाही, एवढी काळजी घेतली तरी पुरे! म्हणून 'हिंदी' नसेल द्यायची तर ठीक, परंतु 'इंग्रजी' देऊ नये, जरी आपल्याला ती येत असली तरी. मग आपली मातृभाषा आणि संस्कृत या २ भाषा द्याव्यात. महत्वाची गोष्ट म्हणजे जनगणना करण्यासाठी आलेले कर्मचारी 'तुम्हाला ही भाषा खरोखरच येते का?' हे विचारू शकत नाहीत. दिलेली माहिती नोंदविण्याचे काम फक्त त्यांनी करायचे आहे. आणि शिवाय संस्कृतोद्भव शब्दच (गुरु, संगीत, पाठशाला, औषधी, वनस्पती, पर्वत, वृक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, राज्य, नौदल, सूर्यनमस्कार, योगासन इ.) आपल्या भारतीय भाषांमध्ये आहेत कारण ती या भाषांची जननी आहे. आपली नावेही 'संस्कृतोद्भव'च आहेत, 'प्रतिभा', 'मनमोहन', 'प्रणव', 'शरद', 'अशोक'...असो.
तात्पर्य- आपली गीर्वाणभारती ही आजही भारतात सन्मानावस्थेत आहे हे दाखविण्यासाठी दुर्दैवाने 'आकड्यांचा' आधार घ्यावा लागतो आहे. संस्कृतप्रेमी नागरिक, संस्कृत शिक्षक, प्राध्यापक, संस्कृत संस्थांचे कार्यकर्ते यांच्यावर तर विशेष जबाबदारी आहे. त्यांनी प्रथम भाषा संस्कृत द्यायला हवी. आणि या विचाराचे प्रकटीकरण आपापल्या माध्यमातून करायला हवे. भारतीय भाषा-भूषा, संस्कार, संस्कृती यांचे उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध असलेल्यांचे हे षड्यंत्र जसे वेळीच आपल्या लक्षात आले आहे, तसे ते आपण इतरांच्याही लक्षात आणून द्यायला हवे. वार्ताफलक, वृत्तपत्रलेखन, बातमी, इमेल अशा माध्यमांतून त्वरेने हा विचार प्रसृत करायला हवा कारण जनगणनेचा प्रारंभ झालेला आहे. विचित्र राजकारणाने मतपेटीवर डोळा ठेऊन जरी आज आपल्या भारतीय भाषा बोलणार्या विविध गटांमध्ये भांडणे लावली असली तरी 'माकड खवा घेऊन जाणार नाही' हे आपणच पहायला हवे आणि म्हणूनच भारतातील अन्य भाषांचा द्वेष करताना 'इंग्रजीचे' फावणार नाही हे पाहिले पाहिजे. येणारी जनगणना त्यादृष्टीने महत्वाची आहे.
-----विक्रम नरेन्द्र वालावलकर - (vnwbhai@gmail.com)
"हमारी सभी भाषाएँ चाहे वह तमिळ हो या बंगला, मराठी हो या पंजाबी हमारी राष्ट्रीय भाषाएँ हैं | वे सभी भाषाएँ और उपभाषाएँ अनेकों खिले हुए पुष्पों के समान हैं, जिससे हमारी राष्ट्रीय संस्कृती की सुरभि प्रसारित होती है | इन सभी के लिए प्रेरणा का स्त्रोत, भाषाओं की रानी, देववाणी संस्कृत रही है | अपने वैभव एवं पावन साहचर्य के कारण वही हमारे राष्ट्रीय पारस्पारिक व्यवहार के लिए एक महान संयोजक सूत्र है | किंतु दुर्भाग्य से आज उसका व्यवहार सामान्यरूप से नहीं होता | संपूर्ण देश की एक भाषा की समस्या के निराकरण के लिए जब तक संस्कृत स्थान नहीं ले लेती, सुविधा हेतु हमें हिंदी को प्रधानता देनी पडेगी |"
---परमपूजनीय श्रीगुरुजी (अमृतवाणी ३२:१)
हा लेख तुम्ही मुक्तपणे अग्रेषित (fwd) करू शकता. लेखकाच्या परवानगी ची आवश्यकता नाही. पण ब्लॉगची/लेखाची जोडणी (लिंक) द्यावी.