सकाळचा संपर्क, भेटीगाठी आटोपून घरी जात असतानाच सूचना मिळाली की, प्रचंड मोठी आग दादासाहेब फाळके मार्गावरील एका मिलमध्ये लागली आहे. ती आग एवढी भीषण होती की शिवाजी पार्क वरून सुद्धा धुराचे लोळ आकाशात दिसत होते, सूर्य त्या गडद धुरामुळे झाकोळून जात होता. त्याच क्षणी निर्णय झाला की आपण निघाले पाहिजे. रा.स्व.संघाच्या शिवाजी उद्यान रात्र शाखेचा मुख्य शिक्षक संपन्न आणि मी असे दोघे शाखेची खाकी विजार घालून निघालो. मिलच्या मागच्या गेटवर गेलो असता तेथील अग्निशमन दलाच्या अधिकार्याने सांगितले की 'मुख्य प्रवेशद्वाराकडून आत जा, तिथे गरज आहे'. आम्ही धावतपळत मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. जमलेल्या तमाम जनतेला अडवून ठेवले होते. आत एकाही 'नागरिकाला' सोडत नव्हते.
परंतु आम्ही जाताच आम्हाला वाट मोकळी करून दिली व आम्ही सहज आत पोहोचलो. बहुधा शाखेच्या विजारीमुळे हे शक्य झालं!
पुढे आत गेल्यावर प्रत्यक्ष परिस्थितीचं अवलोकन करायला मिळालं. एका विभागाच्या आतील भागात आग लागली होती आणि तापमान प्रचंड वाढले होते.
छताचे लाकडी वासे, लाकडी खिडक्या ह्यांनी पेट घेतला होता. अग्निशमन दलाचे बंब आले होते आणि पाईप्स जोडून ते पुढेपर्यंत नेण्याचे काम करायचे होते. एकमेकांत गुंतलेले पाईप्स सोडवून होल्डर मध्ये ते अडकवत पुढे न्यायचे होते. आधी ओरडणारे, हुकूम सोडणारे आणि आतमध्ये आधीपासून असणार्या काही कर्मचार्यांवर खेकसून मध्ये न येण्याचे दरडावणारे अग्निशमन दलाचे अधिकारी बघून भीती वाटली की हे आपल्याला बाहेर तर घालवणार नाहीत! परंतु आम्ही स्वाभाविकपणे दिसणारे काम करायला सुरुवात केली आणि आधी इतरांना पाईपला हात लावू नका असे सांगणारे अधिकारी आम्हाला मात्र स्मितहास्याने स्वीकारत असल्याची खात्री झाली.पुढे आम्ही त्या हॉलसदृश यंत्र विभागात गेलो. जवान आगीची परवा न करता पुढे जात होते पण आग आणि
बरोबरीने तापमान इतके वाढले की त्यांना थोडे मागे यावे लागले. टेबलं, पट्ट्या, फळ्या असे लाकडी सामान आम्ही ओढून स्थलांतरित केले. बाजूच्या पूर्ण बोळाला (passage) आग लागली होती. वरून छपराचा भाग मध्येच कोसळत होता. आणि खिडक्या जळाल्याने काचा तडकत होत्या.
तिथे तासाभरापेक्षा अधिक वेळ झुंजल्यानंतर अग्निशमन दलाची एक अद्ययावत गाडी आली. ती आत येण्यासाठी आधीचे पसरलेले आणि उच्च दाबाने पाण्याचे वहन करणारे पाईप्स सरकवून रस्ता मोकळा करावा लागला आणि त्यात बर्यापैकी वेळ गेला. उंच शिडी असलेल्या त्या गाडीने काम सुरु करताच आग आटोक्यात येत असल्याचा आभास निर्माण झाला. तेवढ्यात हॉलबाहेरील रस्त्यावर जे जुने दस्तावेज आणि बांबू होते ते धुमसत असल्याचे आमच्या नजरेस आले. मग
तेथीलच एक नळ आणि उपलब्ध मडके घेऊन पाणी भरून नेऊन ती आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. एक छोटा पाईप जणू आमची वाटच बघत होता...तो नळाला जोडला आणि तिथपर्यंत पोहोचला,
मग काम सुकर झाले.
दुपार टळायला आली होती. मग आत झुंजून आलेल्या काही जवानांना पाणी पिण्याची 'आठवण' झाली. त्यांच्यासाठी बाटल्या भरून देणे सुरु केले. बाजूच्या वस्तीतील रहिवासी आम्ही छतावर फेकलेल्या रिकाम्या बाटल्या भरून देण्याचे काम करत होते. हळूहळू आम्ही पुढे सरकलो..पाहतो तर काय खूप पुढेही जवान आतपर्यंत जाऊन आग विझवत होते. त्यातील काही बाहेर आलेले म्हणाले, 'अहो पाणी काय जरा चहा वगैरे..' त्यांची उद्विग्नता चेहेर्यावर स्पष्ट दिसत होती. मग आम्ही निघालो चहाच्या कामगिरीवर. गेटवर आलो तर प्रचंड जनसमुदाय. पण चहाची सोय आत हवी आहे हे ज्याला सांगू तो गायब होत होता! मग एक तरुणांचे टोळके उभे होते ते स्थानिक वाटल्याने त्यांच्याजवळ गेलो व 'चहाची टपरी दाखवा' असे म्हणालो तेव्हा ते तयार झाले. टपरीवर चहा तयार झाला आणि एवढा वेळ समंजस वाटणारा दुकानदार म्हणाला 'एक कटिंग ४ रुपया'. नेहेमीपेक्षा छोटा असणारा कप आणि अडचणीची वेळ, धंद्याचे गणित मस्तच जुळले होते! खिशात अत्यंत अपुरे पैसे असतानाही 'ईश्वरी कार्याची जी भक्कम पुंजी' होती त्या आधारावर आम्ही म्हटले ठीक आहे...
आत चहा घेऊन गेलो. सर्व जवान आनंदित झाले. मग हळूच एका अधिकार्याला विचारले, 'साहेब, तुमची काही याबाबतीत व्यवस्था आहे का? यासाठी काही निधी मुक्रर..?'. ते म्हणाले, "अहो तुम्ही कशाला यात पडलात? आम्ही तर सूचना मिळताच तसेच गणवेश चढवून निघतो..पैसे, पाकीट वगैरे काहीच नाही. आणि खरंतर ज्याची जागा आहे त्याने द्यायला हवं." आता त्यांना काय सांगणार आम्ही यात का पडलो? 'स्वयंस्वीकृत' काम असल्याने हा मार्गही 'सुगम' होणार ह्याची खात्री मात्र होती! चहाची टाकी (नळ असलेले छोटे डबा सदृश पिंप!) संपत आली. त्या मुलाने सुरु केले, ''साहब पैसे दे दो. ५० कप हुए. २०० रु.'' मी म्हटलं, ''और लाओ..अभीभी बहोत बचे हैं''. "नहीं साहब, पेहले पैसा दिलवा दो". तेवढ्यात चौकशीसाठी पोलीस आले. त्यांच्याबरोबर मिल व्यवस्थापनाचे काही अधिकारी होते. त्यांना जाऊन भेटलो आणि पृच्छा केली की, "आपले हे जवान सकाळपासून अशा रीतीने झुंजत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ही पाण्याची आणि चहाची सोय केली आहे. तर पैशांचं काय?". तो अधिकारी लगेच तयार झाला. शिवाय आम्ही मग न्याहारीसाठीही प्रयत्न केला. तो म्हणाला बघा किती लोकं आहेत आणि सांगा त्यानुसार..मग आम्ही अंदाज बांधला आणि आमच्या पुढ्यात ७५ वडापावची ऑर्डर दिली गेली. आमचा कार्यभाग झाला होता.
सूर्य अस्ताला जात होता.. ६.३० वाजून गेले होते...आम्हालाही थकवा जाणवू लागला होता. उपस्थित जवानांचा निरोप घेऊ लागलो. प्रचंड तापमान, कोसळणारे छत याची पर्वा न करता, पाण्याचा धो-धो साठा हातात असताना एकही थेंब पिऊ न शकणारे जिगरबाज जवान आमच्यावर बेहद खूष होते. कित्येकजण आम्हाला, 'कोणती शाखा?' 'काय करता?' 'तुम्ही आलात हे फार बरं झालं' असं सांगत होते. सकाळपासूनचा पट डोळ्यासमोरून सरकला तेव्हा जाणवलं की, 'संघकार्य हे ईश्वरी कार्य असल्याचा' आपला विश्वास आणि त्यामुळे आजवर आपल्यावर असलेला लोकांचा विश्वास हा गोल्डमोहर मिलमधील आजच्या आगीमुळे तावून-सुलाखून निघाला आहे आणि त्यावर 'गोल्डमोहर' च जणू लागली आहे!
We are proud of them, but they are confidant about us!